राम अधीक अहंता, रावण बेरीज येतसे पाही ॥
रावण उणें अहंता, बाकी श्रीराम संशयो नाहीं ॥१॥
देह-अयोध्या नगरीं वसतो ह्रदयाभिराम श्रीराम ॥
सीता ही निजशांती, अर्धांगी रामपत्नि निष्काम ॥२॥
इंद्रिय ग्रामीं राहुनि देव इतर करिति रामसेवेला ॥
पंचक अंत:करणीं त्यापरि राहोनि करिति कार्याला ॥३॥
घ्राणेंद्रियांत अश्विनिकुमार, जिव्हेंद्रियांत वरुण वसे ॥
नेत्नेंद्रियांत रवि, त्वक्इंद्रियग्रामांतवायु राहतसे ॥४॥
श्रोत्रेंद्रियीं दिशा, गुदइंद्रियग्रामांत यम करी काम ॥
शिश्नेंद्रियीं प्रजापति, पादेंद्रियि देवता उपेंद्र सम ॥५॥
पाणींद्रियांत राही इंद्रच, वागींद्रियांत तो अग्नी ॥
बेहेंद्रियकर्मासी चालविती, सकल देव राबोनी ॥६॥
अंत:करणीं विष्णु, चंद्र मनामधिं, तसाच बुद्धींत ॥
ब्रह्मा, चित्तांत वसे नारायण, रुद्र तो अहंतेंत ॥७॥
निरहंकारें चाले जोंवरि हें देहकर्म सहजीच ॥
तोंवरि श्रीरामाचें चाले साम्राज्य समज रे साच ॥८॥
सहजपणा मोडोनी, “मी या देवास राबवी” ऐसा ॥
अभिमान उठे तैं, तो रामचि रावण बने पहा कैसा ॥९॥
रामचि रावण होतां, हरण करी शांतिधाम ती सीता ॥
सीताशोधन रडुनी राम करी, शोकमग्न होत्साता ॥१०॥
जीवचि शिव; परि झाला जीव अहंतेमुळें असा भिन्न ॥
संसारताप भोगी, स्वानंदसुखासि अग्नि लावून ॥११॥
एक अहंता निमता, रावण तो राम, जीव तोचि शिव ॥
उभयांत भेद नाहीं, भेद दिसे काल्पनीक तो भाव ॥१२॥