मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ६३ वा

पांडवप्रताप - अध्याय ६३ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ दिग्विजय करून ॥ परतोनि आला फाल्गुन ॥ सकल राजे दोन्ही श्याम कर्ण ॥ धर्म राया भेट विले ॥१॥
भूमी शुद्ध खणून ॥ आधिलें यज्ञमंडपप्रमाण ॥ साडेतीन हातांची यष्टि जाण ॥ चरशें मोजिल्या चतुरस्र ॥२॥
जेथें व्यास विधि सांगणार ॥ तेथें कांहींच न पडे अंतर ॥ विटबंदी वेदिका सुंदर ॥ प्रमाण यथोक्तयोग केली ॥३॥
मंडपाचीं अष्ट द्वारें ॥ अष्ट ध्वज अष्ट कुंडें परिकरें ॥ दशविध दर्भ सर्व यज्ञपात्रें ॥ यथाशास्त्र निर्मिलीं ॥४॥
सोमवल्ली उलूखल मुसळ ॥ एवं सर्व सामुग्री निर्मळ ॥ जग द्नूरु व्यास दयाळ ॥ आचार्य मुख्य जाहला ॥५॥
पितामह बकदाल्भ्य केला ॥ वीस सहस्र ब्राह्मणांचा मेळा ॥ एक संवत्सर जाहला ॥ जपासी धर्म राजें घातले ॥६॥
भीम आणि पार्थ ॥ हे यज्ञरक्ष्क जाहले तेथ ॥ कार्यें वांटिलिया समस्त ॥ जेथींचे तेथें ठायीं ठायीं ॥७॥
मृगश्रृंगें कंडूनिरसन ॥ धर्माचे हातीं सदा जाण ॥ मृगा जिन प्रावरण ॥ नाहीं भाषण इतरांशीं ॥८॥
बोलिला सत्यवती सुत ॥ उदक आणा वया दंपत्य ॥ चौसष्ट सिद्ध करावीं येथ ॥ अति उत्तम निवडूनि ॥९॥
शिरीं सुवर्ण कलश घेती ॥ निघालीं वसिष्ठ अरुंधती ॥ पल्लवीं गांठी देऊनि प्रीतीं ॥ अत्रि अनसूया चालिलीं हो ॥१०॥
रुक्मिणी आणि श्रीकृष्ण ॥ मिरवत चालिलीं शोभाय मान ॥ रति आणि प्रद्युम्न ॥ अनिरुद्ध उखा उभयतां ॥११॥
वृषकेत आणि प्रभावती ॥ युवनाश्व आणि वेदावती ॥ बुभ्रुवाहन स्त्री रूपवती ॥ जाती कलश घेऊनि ॥१२॥
पदरीं दिधल्या दंपत्य ग्रंथी ॥ पुढें चतुर्विध वाद्यें वाजती ॥ वसुदेव देवकी सती ॥ तींही निघती मिरवत ॥१३॥
सत्यभामेचे सदनीं ॥ प्रवेशोनि सांगे नारद मुनी ॥ सर्व रायां देखतां रुक्मिणी ॥ विशेष मान घेतसे ॥१४॥
पदरीं देऊनि ग्रंथी ॥ मुख्य दोघें मिरवती ॥ सेवक उपचार समर्पिती ॥ शिरीं छत्र विरा जतसे ॥१५॥
तुज टाकूनि जगन्मोहन ॥ गेला तीस संगें घेऊन ॥ सत्यभामा बोले हांसोन ॥ घरांत श्रीकृष्ण आहे कीं ॥१६॥
घरांत गेला नारद मुनी ॥ तों मंचकीं पहुडला मोक्षदानी ॥ म्हणे सभे होता चक्र पाणी ॥ उदकासी रुक्मिणी सहित गेला ॥१७॥
रुक्मिणीसी सोडून ॥ पहुडसी येथें येऊन ॥ सत्यभामा म्हणे ग्रंथी बांधोन ॥ उदका जाऊं आम्ही आतां ॥१८॥
मग जांबवतीच्या घरांत ॥ नारदमुनि प्रवेशत ॥ तीसही तैसेंचि सांगत ॥ न मानी श्रीकृष्ण तूतें पैं ॥१९॥
ते म्हणे गृहांत चक्र पाणी ॥ कां कलि लावितां नारद मुनी ॥ आंत प्रवेशतां म्हणे चक्रपाणी ॥ आलासी येथें केधवां ॥२०॥
अष्टनायिका आदिकरूनी ॥ सोळा सहस्त्र कृष्ण कामिनी ॥ सर्वां घरीं आहे मोक्षदानी ॥ शून्य सदन नसे कोठें ॥२१॥
सर्वही घरें फिरोन ॥ धर्म मंडपासी आला परतोन ॥ तों सर्व साहित्य श्रीकृष्ण ॥ करीत तेथें बैसला ॥२२॥
इकडे उदकासी गेलीं दंपत्यें ॥ सत्यवती सुत गेला सांगातें ॥ मंत्रू नियां उदक तेथें ॥ भरूनि कलश पूजियेला ॥२३॥
सुभद्रा आणि अर्जुन ॥ जों आलीं भरूनि जीवन ॥ अरुंधतीनें कलश भरून ॥ रुक्मिणीच्या मस्तकीं ठेविला ॥२४॥
म्हणे तुज पुष्पभार न सोसे ॥ कैसा कलश नेशील राजसे ॥ तों हास्यवदनें बोल तसे ॥ सुभद्रा देवी तेधवां ॥२५॥
जेणें गोवर्धन सप्त दिन ॥ नखाग्रीं घेतला उचलून ॥ अनंत ब्रह्मांडें संपूर्ण ॥ उदरा माजी वाहातसे वाहातसे ॥२६॥
त्यासी हे ह्रदया वरी धरीत ॥ कलशाची गोष्टी कायसी तेथ ॥ भीमकी म्हणे ऐसेंचि निश्चित ॥ तुम्हीही नित्य करीत जा ॥२७॥
असो उदक भरूनि सकळीं ॥ यज्ञमंडपासी मिरवत आलीं ॥ त्या उदकें तत्काळीं ॥ श्याम कर्ण ॥ न्हाणिला ॥२८॥
मंत्रूनि घोडा तेजा गळा ॥ स्तंभासी द्दढ बांधिला ॥ सकल ऋषि चक्र ते वेळां ॥ वेदघोषें गर्ज तसे ॥२९॥
रत्न वस्त्रालंकारीं ॥ ऋषी पूजिले ते अवसरीं ॥ घोडयासी म्हणती पशुत्व करीं ॥ तंव तो मान हालवीत ॥३०॥
अश्वज्ञानी निपुण तेथ ॥ नकुल सांगे करूनि अर्थ ॥ म्हणे श्याम कर्णाचें ऐसें आहे चित्त ॥ इतर गतीस न जाय म्हणे ॥३१॥
येथें आहे श्रीकृष्ण ॥ मी तरी पूर्ण पदासी पावेन ॥ इतर लोक नेघें म्हणोन ॥ हालवी मान अर्थ हा ॥३२॥
यावरी वेद मंत्रें करून ॥ ठायीं बांधिला श्याम कर्ण ॥ धौम्यें पिळिला कान ॥ तों दुग्धधारा निघाल्या ॥३३॥
रक्त नाहीं अणु मात्र ॥ मग भीमें घेतलें दिव्य शस्त्र ॥ छेदिलें अश्वाचें शिर ॥ वाद्य गजर उठविला ॥३४॥
श्याम कर्णाचें शिर उडालें ॥ तें सूर्य बिंबांत प्रवेशलें ॥ सकल ऋषी स्तविते जाहले ॥ ऐसें देखिलें नाहीं कोठें ॥३५॥
श्याम कर्णाची अंतर्ज्योति निघाली ॥ ते श्रीकृष्ण मुखीं प्रवेशली ॥ वरकड शरीर पाहती सकळी ॥ राक्षि पडली कर्पूराची ॥३६॥
अस्थि मांस रुधिर ॥ न देखती कोणी अणु मात्र ॥ मग सत्यवती ह्रदया ञभ्रमर ॥ टाकी अवदानें तयांचीं ॥३७॥
इंद्रादि देव समस्त ॥ त्या अवदानें जाहले तृप्त ॥ ऋषी म्हणती याग अद्भुत ॥ यावरी आतां न होय ऐसा ॥३८॥
व्यास देवें आवाहनून ॥ साक्षात आणिला पाकशा सन ॥ तैसेचि सर्व दिक्पाल बोलावून ॥ भाग तयांसी दिधले पैं ॥३९॥
तृप्त जाहले देव समस्त ॥ संतोषला वैकुंठनाथ ॥ वाद्य गजरें महोत्साह करीत ॥ अवभृथ स्नाना चालिले ॥४०॥
सोमपान करूनि निर्दोष ॥ सर्वांनीं घेतला मग पुरोडाश ॥ सकल पृथ्वीचे नरेश ॥ धर्म द्रौपदींसी पूजिती ॥४१॥
धर्म राजें सकल अवनी ॥ समर्पिली वेदव्यासा लागूनी ॥ तेणें तत्काल विकूनी ॥ द्र्व्य ब्राह्मणां वांटिलें ॥४२॥
यागांतीं सर्व ब्राह्मणां ॥ धर्म राज देत दक्षिणा ॥ एक हस्ती एक तुरंग जाणा ॥ पांच माण सुवर्ण तें ॥४३॥
एक एक पायली रत्नें ॥ दिधलीं धर्में ब्राह्मणां कारणें ॥ यावरी जें जें इच्छिलें मनें ॥ तें तें सर्व पुरवीत ॥४४॥
मग पृथ्वीचे जे भूभुज ॥ त्यांसी पूजी अनुक्रमें धर्म राज ॥ कोटि द्र्व्य सहस्त्र रथ ॥ तेजःपुंज देत अश्व दहा शतें ॥४५॥
छप्पन्न कोटी यादव ॥ त्यांचे द्विगुण पूजिले सर्व ॥ इच्छिलें तें तें धर्म राव ॥ वस्तु देऊन तोषवीत ॥४६॥
यावरी मग द्वाराकानाथ ॥ षोडश सहस्त्र स्रियां सहित ॥ वरी अधिक अष्टोत्तर शत ॥ पूजिता जाहला आदरें ॥४७॥
जज्ञ फळ संपूर्ण ॥ श्रीकृष्ण करीं केलें अर्पण ॥ षड्रस अन्नें निर्मून ॥ चतुर्विधर सागळीं ॥४८॥
ऋष्यादि चार्‍ही वर्ण ॥ तृप्त केले देऊनि भोजन ॥ जेथें पूर्ण कर्ता भगवान ॥ तें अन्न काय वर्णावें ॥४९॥
सुवर्ण पीठें बैसावया ॥ पात्रां प्रति रत्न दीप समया ॥ योगिनी जेथें वाढा वया ॥ चौसष्ट संख्या विरा जती ॥५०॥
रत्न जडित झार्‍या सुंदर ॥ माजी भरिलें सुवा सिक नीर ॥ दिव्य गंध सुमनें समग्र ॥ चर्चिलें भाळा शोभती ॥५१॥
त्या अन्नासी देखोन ॥ वसंत करी प्रदक्षिण ॥ देव लाळ घोंटिती पूर्ण ॥ भोजना लागीं टोंकती ॥५२॥
जैसी विद्युल्लता तळपत ॥ तैसी द्रौपदी तेथें वाढीत ॥ हातीं चुडे झळकत ॥ उजेड पडत जेवित्यांवरी ॥५३॥
अरण्यवासी ऋषी समस्त ॥ चतुर्विध अन्नें असंख्यात ॥ ते देखोनि नांवें पुसत ॥ एकमेकांसी परस्परें ॥५४॥
फेणिया देखोनि वर्तुळा ॥ म्हणती चंद्र बिंब चिरूनि केल्या ॥ वडे पाहूनि म्हणती ते वेळां ॥ चक्रें सूर्य रथाचीं हीं ॥५५॥
म्हणती अमृत आळवून ॥ मांडे केले निर्माण ॥ सुवर्णचि शिजवून ॥ केलें वरान्न वाटतसे ॥५६॥
सोमकांताचा पर्वत ॥ शिजवूनि केला भात ॥ म्हणती सुवास जिवितां घृत ॥ घुसळूनि अमृत काढिलें ॥५७॥
एवं सर्व जाहले तप्त ॥ त्रयोदश गुणी विडे घेत ॥ दक्षिणा देऊनि समस्त ॥ ऋषि राज बोळ विले ॥५८॥
माझा यज्ञ सिद्धीस गेला ॥ धर्मासी हा गर्व जाहला ॥ तों एक मुंगूस ते वेळां ॥ बिळांतूनि आला तेथें ॥५९॥
तो नकुळ बोले वचन ॥ माझें अर्धांग जाहलें सुवर्ण ॥ तुझ्या यागांत येऊन ॥ परी कांहींच होईना ॥६०॥
धर्मा तुझा यज्ञ कांहीं ॥ सकल शुद्ध जाहला नाहीं ॥ धर्म म्हणे जेथें व्यास श्रीकृष्ण पाहीं ॥ तेथें व्यंग नव्हे कदा ॥६१॥
नकुळ म्हणे मुद्रुल बाह्मण ॥ स्त्री पुत्र आणि सून ॥ बहुत दुर्भिक्ष पडोन ॥ लोक संपूर्ण आटले ॥६२॥
चौघीं ष्ण्मास करूनि यत्न ॥ तीन चौंगे मेळविलें धान्य ॥ त्यांत पंच महायज्ञ ॥ अनुक्रमें करीत ॥६३॥
ब्रह्ययज्ञ पितृयज्ञ ॥ मनुष्ययज्ञ देवयज्ञ ॥ पांचवा तो भूतयज्ञ ॥ पंच महायज्ञ हेचि पैं ॥६४॥
अग्नीचा विभाग देऊन ॥ सहा मासां करूं बैसले भोजन ॥ त्यांच्या डोळां उतराला प्राण ॥ अस्थिपंजर दिसती ते ॥६५॥
पाठ पोट एक होऊन ॥ चौघें दिसती अत्यंत दीन ॥ अस्थींचा पिंजरा संपूर्ण ॥ त्वचेंतून वरी दिसे ॥६६॥
परमहं सवेष धरून ॥ तेथें एक आला ब्राह्मण ॥ मुद्न्लें परम आनंदोन ॥ पूजा केली प्रेम युक्त ॥६७॥
ब्राह्मण भोजना बैसविला ॥ मुद्नलें आपुला भाग दिधला ॥ विप्र क्षुधानळें व्यापिला ॥ इच्छिता जाहला आणीक अन्न ॥६८॥
मग तिघांहीं विभाग देऊन ॥ तृप्त केला प्रीतीनेम ब्राह्मण ॥ तेणें स्वरूप प्रकटिलें पूर्ण ॥ यम धर्म साक्षात तो ॥६९॥
प्रसन्न जाहला मुद्नुलासी ॥ म्हणे इच्छिलें फळ सर्व पावसी ॥ हरिहर ब्रह्मा दिकांसी ॥ तोष विसी दर्शनें तूं ॥७०॥
तुज सर्व याग घडले ॥ अवघ्या तपांचें फळ हाता आलें ॥ तों पुष्प वर्षाव जाहले ॥ मुद्नुला वरी तेधवां ॥७१॥
प्रिय बोलोनि जे दान ॥ तेंचि उत्तम मानी श्रीभगवान ॥ अहंकर्ते पण नुरवून ॥ सदा निमग्न हरिरूपीं ॥७२॥
रंतिदेवनामें ब्राह्मण ॥ तेणें तृषार्तासी पाजिलें जीवन ॥ प्रेमें भक्ति पूर्वक जाण ॥ तेणें करून उद्धरला ॥७३॥
मग तो मुद्नल स्त्री उत्र स्नुषां सहित ॥ हरि रूप होऊनि वैकुंठीं जात ॥ त्याचा याग ऐसा अद्भुत ॥ मी जाण तेथें लोळलों धर्मा ॥७४॥
अर्धाग जाहलें सुवर्ण ॥ मग या यागीं लोळलों पूर्ण ॥ परी अणुमात्र न पालटे वर्ण ॥ ऐसें वदोन नकुळ गेला ॥७५॥
मग धर्में गर्व टाकून ॥ धरीत जग द्वंद्याचे चरण ॥ म्हणे मीं तुझी लीला देखिली गहन ॥ ते वेद शास्त्रां न कळेचि ॥७६॥
ऋषी राजे गेले समस्त ॥ एक मास राहिला द्वार कानाथ ॥ तों सौदागर आणि ब्राह्मण तेथ ॥ आले भांडत धर्मा पाशीं ॥७७॥
जैमिनि म्हणे जन मेज यास ॥ ऐकें कथा ते आहे सुरस ॥ लीला विग्रही जगन्निवास ॥ दावी धर्मास चमत्कार ॥७८॥
कुंजर पुरीं नवल वर्तलें ॥ एकें सौदागरें आपुलें ॥ स्वस्थळ बाह्मणा दिधलें ॥ ग्रह बांधा वया म्हणोनि ॥७९॥
गृहासी पूर्वींचा होता पाया ॥ ब्राह्मण मुहूर्त पाहो नियां ॥ गेला जंव खणा वया ॥ तों द्रव्य घट लागला ॥८०॥
विप्रें द्रव्याचा घट उचलिला ॥ सौदागरा पाशीं आणिला ॥ म्हणे हा द्राव्य घट वहिला ॥ घेईं आपुला महा राजा ॥८१॥
सौदागर म्हणे स्वामी ॥ द्र्व्य उदंड आहे माझिया धामीं ॥ हें घेऊनि जावें तुम्हीं ॥ अर्पिलें आम्हीं सर्वही ॥८२॥
जेव्हां तुम्हांसी स्थळ दिधलें ॥ तेथें जितुकें द्रव्य लाधलें ॥ तितुकें तुम्हांसी अर्पिलें ॥ न्यावें वहिलें घरासी तें ॥८३॥
आणिक द्र्व्य लागो अपार ॥ तेंही तुमचेंचि असे साचार ॥ मग बोलिला जें विप्र ॥ तेंचि सादर परिसिंजे ॥८४॥
म्हणे हें नलगे आम्हांसी धन ॥ संकल्पितां तें स्थळ दिधलें दान ॥ नाहीं द्र्व्याचें आम्हां कारण ॥ प्रलय संपूर्ण द्रव्य संगें ॥८५॥
द्र्व्या मुळें अनर्थ ॥ द्रव्या मुळें नासतो स्वार्थ ॥ द्र्व्यामुळें परमार्थ ॥ सर्व जातो हातींचा ॥८६॥
सौदागर म्हणे मी नेघें ॥ आपुल्या घरासी न्या वेगें ॥ ब्राह्मण म्हणे मजही नलगे ॥ दोघे चालिले व्यवहारासी ॥८७॥
आले धर्म राजा पाशीं ॥ तों कृष्णजी होते त्या समयासी ॥ दोघे म्हणती रायासी ॥ यथार्थ निवडीं व्यवहार ॥८८॥
सांगितला सकळ वृत्तान्त ॥ धर्म राज संतोषत ॥ धन्य माझें भाग्य निश्चित ॥ लोक नगरांत धर्मिष्ठ हे ॥८९॥
धर्म म्हणे कृष्ण राया ॥ पहा नगरींची पवित्र चर्या ॥ दोघे नातळती द्र्व्य संचया ॥ कैसें स्वामिया करावें ॥९०॥
कैसा निवडेल हा व्यवहार ॥ मनांत म्हणे रुक्मिणीवर ॥ मी निज धामा गेलिया सर्व ॥ कलि दुर्धर पेटेल ॥९१॥
लोक अधर्मीं होती रत ॥ करिती एकमेकांचे घात ॥ द्रव्या लागीं महा अनर्थ ॥ घडतील पर्वत पापाचे ॥९२॥
ते प्रचीत दाखवावया किंचित ॥ धर्मासी म्हणे कृष्णनाथ ॥ व्यवहार हा निवडे सत्य ॥ चला निश्चत शेषापाशीं ॥९३॥
द्रव्या सौदागर ब्राह्मण ॥ धर्म राज जगज्जीवन ॥ पाताळीं शेषद्वारीं येऊन ॥ अवलोकीत चहूंकडे ॥९४॥
तों तेथें महावृक्ष दोनी ॥ मध्यें एक पुरुष बांधिला आकळूनी ॥ स्थळो स्थळीं बंद देऊनी ॥ द्दढ बांधूनि रक्षिला ॥९५॥
काजळ पर्वता ऐसा थोर ॥ भाळीं चर्चिला सिंदूर ॥ महा विक्राळ भयंकर ॥ धर्मा प्रति बोल तसे ॥९६॥
महा भाग्या धर्म शीळा ॥ माझ्या सर्वांगासी लागल्या कळा ॥ क्षण भरी सोडवीं दयाळा ॥ प्राण जाहला कासा विस ॥९७॥
माझें सर्वांग तिडकतें ॥ महाराजा सोडवीं आजि मातें ॥ धर्म कळवळला चित्तें ॥ म्हणे तूतें सोडवीन ॥९८॥
कळला शेषासी समाचार ॥ भेटी आले धर्म यादवेश्वर ॥ मग येऊनि समोर ॥ लोटां गण घातलें ॥९९॥
सिंहासनीं बैसवूनी ॥ अनुक्रमें पूजा करूनी ॥ धर्म विचारी मनीं ॥ आधीं तो प्राणी सोडवूं ॥१००॥
मग निवडेल यांचा व्यवहार ॥ शेषासी म्हणे युधिष्ठिर ॥ वृक्षासी बांधिला तो सत्वर ॥ प्राणी सोडवूनि देइंजे ॥१०१॥
आमुची गोष्टी येवढी चालवा ॥ आधीं तो प्राणी सोडवा ॥ शेष म्हणे कमला धवा ॥ सोडूं येधवां काय जी ॥१०२॥
कृष्ण म्हणे धर्मासी पुसोनी ॥ मग द्यावा सोडूनी ॥ धर्म म्हणे तये क्षणीं ॥ सोडा प्राणी एकदां ॥१०३॥
शेष म्हणे मी सोडीन ॥ मागुती तूं करविसी बंधन ॥ मग बोले पंडुनंदन ॥ ऐसें न घडे सर्वथा ॥१०४॥
मग दुतांसी आज्ञा देऊनी ॥ सोडविला बंधनांतूनी ॥ तो उसळला तत्क्षणीं ॥ गेला पळोनि मृत्यु लोका ॥१०५॥
यावरी शेष म्हणे ॥ का येथें जाहलें आपुलें येणें ॥ धर्म म्हणे व्यवहार निवडणें ॥ या दोघांचा येधवां ॥१०६॥
शेष म्हणे कासयाचा व्यवहार ॥ तों क्रोधें बोले द्विजवर ॥ म्हणे या सौदागरें थोर ॥ कहर मज वरी मांडिला ॥१०७॥
जेव्हां मज स्थळ दिधलें दान ॥ तेव्हांचि द्र्व्य संकल्पिलें संपूर्ण ॥ आतां बळेंचि घेतो हिरोन ॥ मी प्राण देईन महाराजा ॥१०८॥
सौदागर म्हणे ते वेळीं ॥ माझीं अवघीं गिळिलीं कोहळीं ॥ माझें द्रव्य अपार आहे ते स्थळीं ॥ किंचित आम्हां जवळी आणिलें ॥१०९॥
या ब्राह्मणासी देईन मार ॥ द्र्व्य आणवीन समग्र ॥ विघ्र म्हणे मि निर्धार ॥ हत्या करीन आपुली ॥११०॥
मी आतांचि येथें क्रिया करीन ॥ द्र्व्या समवेत केलें गृहदान ॥ आश्चर्य करी पंडुनंदन ॥ म्हणे नवल पूर्ण वर्तलें ॥१११॥
धर्म म्हणे वैकुंठपती ॥ कां भ्रंशली यांची मती ॥ हरि म्हणे त्या कली प्रती ॥ सोडवितांचि गति हे जाहली ॥११२॥
कलि सुटतां मोकळा ॥ बुद्धीसी पालट जाहला सकळां ॥ कलियुगाचा आरंभ जाहला ॥ धर्म चालिला बुडत पैं ॥११३॥
परदारा आणि परधन ॥ यालागीं होतील अनर्थ पूर्ण ॥ एकमेकांचे घेतील प्राण ॥ असत्य पूर्ण वर्तेल ॥११४॥
द्र्व्या मुळें पिता पुत्र ॥ कलह करितील दुर्धर ॥ मातेसी घालितील बाहेर ॥ पाप अपार वर्तेल ॥११५॥
द्रव्या लागीं वेदविक्रय होती ॥ कन्या गोविक्रयें द्रव्य अर्जिती ॥ वृक्ष निष्फळ धेनु न दुभती ॥ घन क्षितीं वर्षेना ॥११६॥
माता आणि पुत्रां मध्यें ॥ इष्टत्व तुटे द्र्व्य संबंधें ॥ माता पुत्रांसी विष देती क्रोधें ॥ द्रव्य निमित्तें जाण पां ॥११७॥
पिता घेईल पुत्राचा प्राण ॥ पुत्र करील पित्याचें हनन ॥ स्निया मारितील भ्रतारा लागून ॥ द्र्व्य चोरून नेतील ॥११८॥
गुरु शिष्यां मध्यें विकल्प पडती ॥ बंधु बंधूंचा प्राण घेती ॥ कोणी धर्म वाटा पाडिती ॥ द्रव्य नेती हिरो नियां ॥११९॥
संन्यासी दिगंबर तापसी ॥ तेही संग्रहितील द्र्व्यासी ॥ साधु धांवतील राज द्वरासी ॥ धनाढया लोकांसी भजतील ॥१२०॥
वेश्येसी नेसवितील पट्टकूल ॥ मातेसी चिंध्या लावितील ॥ धर्म पत्नी विसरतील ॥ रत होतील परदारीं ॥१२१॥
उत्तम सुमनहार गुंफून ॥ घालिती वेश्येच्या गळां नेऊन ॥ कंटकपुष्पें सुवा सहीन ॥ देवावरी टाकिती ॥१२२॥
हस्तिनापुरींचे तुझे बंधू ॥ ते आतांचि जपती तुज वधूं ॥ भीमासी उपजेल क्रोधू ॥ राज्य संबंधू तुज नाहीं ॥१२३॥
अर्जुनादि बंधु सर्व ॥ आम्हींच मारिले म्हणतील कौरव ॥ धर्मासी नेदूं राणीव ॥ आमुचा गौरव आम्हांसी ॥१२४॥
लोक भाविती हस्तिनापुरींचे ॥ पांडव हे कोणाचे ॥ कोठील कोणाच्या वीर्याचे ॥ राज्य कैंचें तयांसी ॥१२५॥
आतां कैसा जाशील हस्तिनापुरा ॥ धर्म म्हणे यादवेश्वरा ॥ त्या कलीसी आधीं धरा ॥ बांधा बरा आकळून ॥१२६॥
धर्म पुनःपुन्हां विनवीतसे ॥ जंववरी माझें राज्य असे ॥ तोंवरी बांधविजे यासी ह्रषीकेशें ॥ आज्ञा शेषातें करूनि ॥१२७॥
हरि म्हणे दूत पाठवून ॥ कलीस आणवीं बांधोन ॥ शेषाज्ञें सेवक जन ॥ धरूनि आणिती क्षणार्धें ॥१२८॥
पहिल्याहूनि आकळूनि बांधिती ॥ ब्राह्मण म्हणे सौदागरा प्रती ॥ मज द्र्व्य नलगे निश्चितीं ॥ बोले प्रीतीं द्विज तेधवां ॥१२९॥
सौदागर म्हणे द्विव्य न्यावें आपुले घरा ॥ तुमच्या आशीर्वादें अवधारा ॥ द्र्व्य भांडारीं बहु असे ॥१३०॥
धर्म म्हणे कृष्णनाथा ॥ कलि ऐसेंचि करील पुढें आतां ॥ कलियुगा माजी राहतां ॥ बरें सर्वथा नव्हेचि ॥१३१॥
शेषें याचकांसी द्रव्य वांटिलें ॥ विप्र सौदागर संतोषले ॥ श्रीकृष्ण आज्ञा घेऊनि आले ॥ अवघ्यां समवेत गज पुरासी ॥१३२॥
मग पुसोनि पांडवांसी ॥ कुंतीद्रौपदी सुभद्रेसी ॥ म्हणे आम्ही जातों द्वारकेसी ॥ बहुत दिवस जाहले ॥१३३॥
सद्नद जाहले पंडुनंदन ॥ जा न म्हणवे मुखांतून ॥ म्हणती लवकरी यावें परतोन ॥ शरणागतां पहावया ॥१३४॥
मग छप्पन्नकोटी यादवां सहित ॥ द्वारकेसी आले वैकुंठनाथ ॥ सोळा सहस्त्र एकशत ॥ अष्टनायिका सांगातें ॥१३५॥
एक संवत्सर जाहला पूर्ण ॥ संपादूनि अश्वमेध यज्ञ ॥ द्वारकेसी जातां मधु सुदन ॥ पंडूनंदन बोळवूं आले ॥१३६॥
पांचही सप्रेम पाय धरिती ॥ परतोनि यावें द्वारकापती ॥ तुझे कृपेनें समाप्ती ॥ अश्वमेध पावला ॥१३७॥
बोळवूनि सखया श्रीधरा ॥ पांडव आले हस्तिनापुरा ॥ द्वारकेंत परात्पर सोयरा ॥ कुटुंबेंशीं प्रवेशला ॥१३८॥
जैमिनि म्हणे जन मेजया ॥ अश्वमेध संपला येथू नियां ॥ श्रवण करितां जाती विलया ॥ क्षुद्रप्रकीर्णक पातकें ॥१३९॥
करितां अश्वमेध श्रवण ॥ सहस्र धेनु दिधल्या समान ॥ सकलकलिमलनाशन ॥ अश्वमेध श्रवणें पुण्य होय ॥१४०॥
आणि सर्वदा शत्रु परा जय ॥ चतुर्वर्णांसी विद्या प्राप्त हो ॥ धन धान्य घरीं न समाय ॥ लया जाती आधिव्याधी ॥१४१॥
संपूर्ण भारताचें पुण ॥ एक अश्वमेध करितां श्रवण ॥ हें पुस्तक लिहून ॥ द्यावें दान सत्पात्रीं ॥१४२॥
अश्वमेध ऐकोन ॥ द्यावें ब्राह्मणांसी अश्वदान ॥ वक्त्या प्रति पूजून ॥ ब्राह्नण भोजन करावें ॥१४३॥
हें सोळावें पर्व येथ ॥ अश्वमेध जाहला समाप्त ॥ यावरी आश्रमवासिक अद्भुत ॥ पर्व शेवटीं कथियेलें ॥१४४॥
पद्मना भात्मजजातोद्भवोद्भव ॥ तत्सुत सुताचें भय सर्व ॥ न बाधी ऐकतां हें पर्व ॥ ऐसें वचन व्यासाचें ॥१४५॥
प्रासादावरी कळस ॥ आतां शेवटींचा अध्याय सुरस ॥ श्रवण करोत सावकाश ॥ जे कां पंडित सप्रेम ॥१४६॥
जैमिनि अश्वमेध पाहोन ॥ कथा त्याचि कथिल्या संपूर्ण ॥ वाउग्या दंतकथा ऐकोन ॥ नाहीं लिहिल्या ग्रंथीं या ॥१४७॥
दुंदुभीविभ्रवंशी आख्यान ॥ मूळग्रंथीं नाहींच जाण ॥ इतर कवि बोलिले सत्कारून ॥ कशावरून न कळे तें ॥१४८॥
मूळ संस्कृत आधारा विण ॥ कविता करी जो अज्ञान ॥ तयासी होय बंधन ॥ कल्पांतवरी यमलोकीं ॥१४९॥
कथा असती जरी भारतीं ॥ तरी कां वर्ण वया माझी मती ॥ शिणती हें विचारोनि श्रोतीं ॥ दोष न ठेवावा ग्रंथातें ॥१५०॥
असो पुढें एक अध्यायाचें पर्व ॥ आश्रमवा सिक नाम अपूर्व ॥ तें श्रवण करा प्रीतीनें सर्व ॥ कळसाध्याय गोड तो ॥१५१॥
श्रीमद्भीमातीरनिवासा ॥ बह्मानंदा आदिपुरुषा ॥ श्रीधरवरदा पंढरीशा ॥ अज अविनाशा अभंगा ॥१५२॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जैमिनिकृत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेसष्टव्यांत कथियेला ॥१५३॥
इति त्रिषष्टितमाध्यायः ॥६३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ इति अश्वमेधपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP