मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४४ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४४ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४४ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ पुंडलीकवरदा पुरुषोत्तमा ॥ भक्त मान सोद्यान विहंगमा ॥ भीमातट विहारा मेघश्यामा ॥ निगमागमा वंद्या तूं ॥१॥पांडवरक्षका पंढरीशा ॥ विला सिया परम पुरुषा भगिनी मानूनि पंडुस्नुषा ॥ पार्था प्रति रक्षिसी तूं ॥२॥पांडवांचे भाग्य देखा ॥ न वर्णवेचि सहस्त्र मुखा ॥ तूं तयांचा पाठिराखा ॥ अंतर्बाह्य ॥ अंतर्बाह्य रक्षिसी ॥३॥मागें संपलें ॥ आतां द्रोणपर्व आरंभिलें ॥ जें अत्यंत रसागळें ॥ सादर श्रोतीं परिसिजे ॥४॥पदकां मध्यें नायक हिरा ॥ तैसें द्रोण पर्व अवधारा ॥ उरी न उरे दोष मात्रा ॥ श्रवण करितां साक्षेपें ॥५॥जेथें माजला वीररस ॥ ऐकतां चतुरां परम सुरस ॥ जन मेजय पुसे वैशंपायनास ॥ सांग विशेष कथा पुढें ॥६॥गंगा त्मज पहुडला शरपंजरीं ॥ मग समर माज विला कोणेपरी ॥ व्यासशिष्य म्हणे अवधारीं ॥ जन मेजया राजेंद्रा ॥७॥शंतनुज पडलियावरी ॥ शोभा न दिसे पृतनेवरी ॥ जैशी विगत धवा नारी ॥ कीं निम्नगा सलिला विण ॥८॥भंगली नौका महाजळीं ॥ बुडावया जैसी डळमळी ॥ तैसीच चमू ते काळीं ॥ भयें व्याप्त दिसतसे ॥९॥भीष्मासी बाण उशी देऊन ॥ कौरव पांडव करिती नमन ॥ करू नियां प्रदक्षिण ॥ मग युद्धासी प्रवर्तले ॥१०॥पूर्ण दशदिन पर्यंत ॥ तेणें युद्ध केलें अद्भुत ॥ दहा सहस्त्र रणपंडित ॥ महारथी नित्य पाडिले ॥११॥भीष्म प्रताप आठवून ॥ शोक करिती कौरव संपूर्ण ॥ द्रोण आणि शारद्वत कर्ण ॥ अत्युद्विग्न जाहले ॥१२॥दुर्यो धन तेचि रात्रीं ॥ चिंतानळें आहाळे चित्तीं ॥ मग जाऊनि गुरु शिभिरा प्रती ॥ नमूनि बोलता जाहला ॥१३॥म्हणे कवींद्र गुरुं हूनियां ॥ तुझा महिमा द्रोणाचार्या ॥ यावरी चमू रक्षावया ॥ तुजहूनि कोणी थोर नसे ॥१४॥काळ मृत्यु भयंकर ॥ यांपासूनि रक्षिता तूं आचार्य ॥ तूं शिरीं असतां पाहें ॥ सदा निर्भय असों आम्ही ॥१५॥मग वस्त्रें भूषणें आणोन ॥ प्रीतीनें पूजिला गुरु द्रोण ॥ सेनापतित्व रणपट्टा पूर्ण ॥ आचार्यासी दिधला पैं ॥१६॥चार्ही वेद मुखोद्नत ॥ सकल शास्त्रीं पारंगत ॥ पाठीशीं तूणीर विरा जत ॥ विजे ऐसें सायकासन ॥१७॥पांडव कौरव यादव समस्त ॥ हे द्रोणाचे शिष्य अंकित ॥ ज्याच्या वरदहस्तें मिरवत ॥ मुकुट सुभद्रापतीचा ॥१८॥तो प्रसन्न होऊनि गुरुराणा ॥ म्हणे वर मागें सुयो धना ॥ मग तो लागोनि आचार्यचरणां ॥ कौरवेश बोलतसे ॥१९॥तरी अजात शत्रु कुंती सुत ॥ धरूनि देईं आम्हांसी जित ॥ धर्माचा वध मी निश्चित ॥ इच्छीत नाहीं आचार्या ॥२०॥धर्मासी वधितां जाण ॥ आम्हांसी उरों नेदी अर्जुन ॥ तया जित धरितां शरण ॥ सर्व येतील आम्हांतें ॥२१॥पुढती खेळोनियां द्यूत ॥ वनवासासी पाठवूं पांडव त्वरित ॥ मग म्हणे भरद्वाज सुत ॥ तूं बोललासी ॥२२॥माझा शिष्य होय अर्जुन ॥ परी विद्येनें आगळा मजहून ॥ तारकारिजनक पाकशासन ॥ केले प्रसन्न स्वर्गीं तेणें ॥२३॥शस्त्रें अस्त्रें मंत्र विशेष ॥ जीं त्रिभुवनीं न ठाउकीं कोणास ॥ ते विद्या ठाउकी सव्यसाचीस ॥ तरी तो फोडीं यांवेगळा ॥२४॥वेगळा होतांचि फाल्गुन ॥ क्षणमात्रें धर्मासी धरीन ॥ ऐसें ऐकतां दुर्यो धन ॥ परम आनंदें बोलत ॥२५॥म्हणे नाना उपाय करून ॥ वेगळा नेतों श्वेतवाहन ॥ अजात शतु धरून ॥ जीत आम्हांसी द्यावा तुम्हीं ॥२६॥ऐसा नेम होतां तत्काळ ॥ गाजलीं रणवाद्यें तुंबळ ॥ तो समाचार सकळ ॥ पांडवपांचाळां समजला ॥२७॥धर्म म्हणे आचार्य प्रतिज्ञा ॥ कळली असे कीं अर्जुना ॥ सांवरूनि सकळ पृतना ॥ सावधान असावें ॥२८॥पार्थ म्हणे आलियाही कृतान्त ॥ मी तुज रक्षीन यथार्थ ॥ परी एक कर्म अद्भुत ॥ सहसा माझेनें न करवे ॥२९॥मर्यादा सांडील मेदिनीवसन ॥ वरूण दिशे उगवेल सहस्त्र किरण ॥ हेंही घडे परी माझेन ॥ आचार्यवध न करवे ॥३०॥मृग जळीं बुडेल अगस्ती ॥ तमकूपीं पडेल गभस्ती ॥ तृणालिका धरूनि नेती ॥ अरुणा नुजासी घडेल हें ॥३१॥मशक धरीक सौदामिनी ॥ भोगींद्र सांडील कुंभिनी ॥ परी द्रोणवध माझेनी ॥ कल्पांतींही करवेना ॥३२॥जो वाचस्पतीची अपर प्रतिमा ॥ ज्याचा त्रिभुवनीं न माये महिमा ॥ पृथ्वीहूनि आगळी क्षमा ॥ तो माझेनें धर्मा न वधवे ॥३३॥द्रोण स्नेहाचे समुद्रीं ॥ म्यां बुडी दिधली अहो रात्रीं ॥ जेणें पुत्राहूनि मजवरी ॥ प्रीति ठेविली अपार ॥३४॥या शरीराच्या करून ॥ आचार्यपदीं लेववीन ॥ परी मी नव्हेंचि उत्तीर्ण ॥ कांहीं एक तयाचा ॥३५॥समरांगणीं टाकूनि बाण ॥ त्याशीं धर्म युद्ध निर्वाण ॥ करीन परी गुरूचा प्राण ॥ कदा माझेंनें न घेववे ॥३६॥तुज धरा वया येतो द्रोण ॥ माझी प्रतिज्ञा तुज रक्षीन ॥ असो उदय पावला सह्स्त्र किरण ॥ दरिद्रा अंतीं भाग्य जैसें ॥३७॥वाद्यें गर्जती नानाविध ॥ दोन्ही दळें जाहलीं सिद्ध ॥ पांच जन्य देवदत्तांचा नाद ॥ गगना माजी न सांठवे ॥३८॥तों गजर जाहला तुंबळ ॥ नादें डळमळला भूगोळ ॥ चतुर्दश लोक सकळ ॥ भयें काळ कांपतसे ॥३९॥वाटे गगन पडेल तुटोनी ॥ कीं वरती जाईल अवनी ॥ भगणें रिचवती मेदिनीं ॥ दचके मनीं उरगेंद्र ॥४०॥कूर्म खालीं पृष्ठी सांवरीत ॥ आदिसूकर निटावी दांत ॥ तो कोल्हाळ ऐकतां कांपत ॥ महाबलवंत धोंकड जे ॥४१॥नाना वाद्यांचे बोभाट ॥ उभयदळांचा कडकडाट ॥ त्यांचे मध्य भागीं अचाट ॥ विजयरथ पार्थाचा ॥४२॥ध्वज स्तंभीं महारुद्र ॥ वेळोवेळां करी भुभुःकार ॥ रण सागरीं रथ जहाज थोर ॥ कर्ण धार हनुमंत वरी ॥४३॥रथीं सारथीं इंदिरावर ॥ जो लावण्याब्धि शतपत्रनेत्र ॥ पांडव भाग्य जो सहस्त्रवक्र ॥ तोही वर्णूं शकेना ॥४४॥सर्वांत श्रेष्ठ वैकुंठ धाम ॥ तैसा दिसतो रथोत्तम ॥ प्रलयचपले ऐसा ध्वज परम ॥ पालवीत परवीरां ॥४५॥जैसा सुपर्णपक्ष फडकत ॥ तैसें ध्वजाचें तेज तळपत ॥ हरिहर दोघे रक्षीत ॥ धनंजयासी रणांगणीं ॥४६॥इकडे कौरव दळीं गुरु द्रोण ॥ जैसा निरभ्र गगनीं चंडकिरण ॥ पांडवचमू परम दारुण ॥ न धरी द्दष्टींत पुरुषार्थें ॥४७॥आचार्य तेज अद्भुत ॥ पाहतां पांडव पृतना भयभीत ॥ वाटे समरांगणीं कृतान्त ॥ द्रोण रूपें अवतरला ॥४८॥पांडवसेना सरितापती ॥ घोटूं इच्छी द्रोण अगस्ती ॥ तेव्हां वाद्य गजरें ॥ थरथरत क्षणक्षणां ॥४९॥जैसी तरूवरी चपला पडे तुटोन ॥ तैसा पुढें धांवला गुरु द्रोण ॥ तेव्हां सायकासना पासून ॥ बाण घन वर्षत ॥५०॥शिखी जाळी तृणकानन ॥ कीं द्विजेंद्र संहारी काद्रवेयगण ॥ तैसी पांडववाहिनी गुरु द्रोण ॥ संहारीत गण वेना ॥५१॥कणसें छेदूनि नेत कृषीवल ॥ रिते दंड दिसती सरळ ॥ शिरांरहित वीर सबळ ॥ केले बहुत आचार्यें ॥५२॥पदक्रमवर्ण क्रमें करून ॥ द्रोणे केलें वेदाध्ययन ॥ त्याचि त्वरेनें मार्गण ॥ सुटती चापा पासूनी ॥५३॥चापमेघ अनिवार ॥ शरधारा सुटल्या अपार ॥ चालिले रुधिराचे आरक्त पूर ॥ पुसती मार्ग सिंधूचा ॥५४॥ऐसें द्रोणें केलें अभिनव ॥ तों स्यंदनारूढ सहदेव ॥ शकुनीवरी वर्षाव ॥ बाणांचा करीत धांवला ॥५५॥तंव परम क्रोधें शकुनी ॥ बाण वर्षत तये क्षणीं ॥ जैसा सव्यापसव्य आर्षवचनीं ॥ मूढ पंडिता पुढें अनुवादे ॥५६॥संवत्सरसंख्या बाणीं ॥ शकुनी खिळिला सहदेवें रणीं ॥ तूणीर चाप रथ छेदूनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥५७॥मारिले अश्व आणि सारथी ॥ मग शकुनी होऊनि विरथी ॥ गदा घेऊनि त्वरितगतीं ॥ सहदेवावरी लोटला ॥५८॥गदा घायें रणांगणीं ॥ सारथी मारिला तये क्षणीं ॥ सहदेवें शक्ति टाकूनी ॥ शकुनी ह्रदयीं भेदिला ॥५९॥तों रथारूढ भीम सेन ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥ दुर्यो धनाचें सैन्य ॥ अपार भेदिलें तेणें पैं ॥६०॥तों दुर्यो धन बंधु निश्चिती ॥ जयाचें नाम विंशती ॥ तो पुढें धांवला त्वरितगती ॥ मागें टाकूनि सैन्यातें ॥६१॥त्याचे ह्रदयीं वीस बाण ॥ विधिता जाहला भीम सेन ॥ तेणें तीस बाण टाकून ॥ वृकोदरासी भेदिलें ॥६२॥भीमकरींचें सायका सन ॥ तेणें छेदिलें न लागतां क्षण ॥ मग पवना त्मज गदा घेऊन ॥ पवनवेगें धांवला ॥६३॥रथ सारथी अश्व पाहें ॥ चूर्ण केले एकाचि घायें ॥ जैसे काम क्रोध लोभ ज्ञानियें ॥ मनोजयें जिंकिले पैं ॥६४॥जो नकुलाचा मातुळ ॥ माद्रीबंधु शल्य सबळ ॥ त्यावरी नकुळ परम चपळ ॥ मनो जवें धांवला ॥६५॥शल्याचे अंगीं बाण ॥ नकुळ भेदी बळें करून ॥ रथ सारथी तुरंग जाण ॥ पाडी छेदून तत्काळ ॥६६॥शल्य दुसरे रथीं बैसत ॥ दश बाण टाकूनि त्वरित ॥ ह्रदयीं भेदिला भगिनी सुत ॥ पराक्रमें रणांगणीं ॥६७॥चैद्य देशींचा राजा धृष्टकेत ॥ तेणें देखिला शारद्वत ॥ दोघांचें युद्ध अद्भुत ॥ होतें जाहलें तेधवां ॥६८॥विद्युल्लता पडे अकस्मात ॥ तैसा सात्यकी धांवला त्वरित ॥ सत्तर बाणीं बलाद्भुत ॥ कृतवर्मा तेणें खिळियेला ॥६९॥तेणें सत्याहत्तर बाणीं ॥ सात्यकी भेदिला तये क्षणीं ॥ सभापति पांडवांकडूनी ॥ सुशर्म्यावरी धांविन्नला ॥७०॥कर्ण आणि विराट ॥ युद्ध करिती तेव्हां अचाट ॥ भगदत्त द्रुपद सुभत ॥ रणांगणीं भीडती ॥७१॥शिखंडी आणि भूरिश्रव ॥ दाविती युद्धाचें लाघव ॥ घटोत्कच बलार्णव ॥ तेणें अलंबुष पाचारिला ॥७२॥पांडवदळांतूनि चेकितान ॥ धांवला विंदानुविंद लक्षून ॥ श्रीरंगभगिनी नंदन ॥ स्यंदनारूढ धांवला ॥७३॥उद्यानीं संचरे सौदामिनी ॥ तेवीं अरिसेनेंत प्रवेशे ते क्षणीं ॥ कौरव जर्जर केले रणीं ॥ निजर पाहती ॥७४॥सुयोधनबंधु नाम पौरव ॥ तेणें सौभद्रावरी घातली धांव ॥ जैसी अळिकेनें घेतली हांव उरगरिपु जिंकावया ॥७५॥तो महावीर प्रत्यर्जुन ॥ पौरवावरी निर्वाण सोडिले बाण ॥ ध्वज रथ सूत शरासन ॥ न लागतां क्षण छेदिले ॥७६॥ह्रदयीं भेदिले दश बाण ॥ पौरव पडला मूर्च्छा येऊन ॥ तों कृतवर्म्यानें अभिमन्य ॥ सिंहनादें पाचारिला ॥७७॥कृतवर्मा वर्षे बाण जाळ ॥ तें छेदी सुभद्रा बाळ ॥ बाळ नव्हे तो केवळ काळ ॥ कौरव चमू संहारी ॥७८॥कृतवर्मा शत बाणीं ॥ जर्जर केला समरांगणीं ॥ तंव पौरव मागुत्यानी ॥ गदा घेऊनि धांवला ॥७९॥गदा भिरकावितां जाण ॥ छेदूनि पाडी अभिमन्य ॥ मग तो पौरव केशीं धरून ॥ मुष्टि प्रहारें धुमसिला ॥८०॥जैसें कुंजरें मार्जार धरूनी ॥ मर्दिलें शुंडादंडें करूनी ॥ तों जय द्रथ खडग घेऊनी ॥ सोभद्रावरी धांवला ॥८१॥तंत्र दुर्यो धनाचा शालक ॥ मस्तकीं करूनि खेटक ॥ रथाखालीं रिघोनि देख ॥ अश्वा स्यंदन छेदीतसे ॥८२॥श्येनपक्षी उडे बलाद्भुत ॥ तैसा उडाला पार्थसुत ॥ गदाघायें जय द्रथ ॥ विकळ केला भूतळीं ॥८३॥सवेंचि उठोनि जय द्रथ ॥ शक्ति दोहीं हातीं ओपीत ॥ तों अभिमन्यें धरूनि अकस्मात ॥ त्या जवरी भिरका विली ॥८४॥अविधि देखोनि दैवत ॥ साधकावरी जेवीं परतत ॥ तैसा शक्तीनें जय द्रथ ॥ भुजा स्थानीं भेदिला ॥८५॥सवेंचि रथीं चढे पार्थ सुय ॥ बहु बाणीं भेदिला जय द्रथ ॥ अवघे भुभुज मान वित ॥ युद्ध देखोनि तयाचें ॥८६॥इंदिरावर भगिनी सुत ॥ त्याचा पराक्रम देखोनि अद्भुत ॥ कौरव लोटले समस्त ॥ काक जैसे हंसावरी ॥८७॥शल्यें टाकूनि बाण ॥ छेदिला अभिमन्याचा स्यंदन ॥ उणें देखतां भीम सेन ॥ पंचाननापरी धांवे ॥८८॥देखो नियां महाव्याघ्र ॥ पळती जैसे मृगांचे भार ॥ तैसा कौरव सेना सागर ॥ पळाला तो भीमभयें ॥८९॥पळतां गज पायीं धरी ॥ आपटूनि भिरकावी अंबरीं ॥ गदा घायें चूर्ण करी ॥ स्यंदन आणि वीरांतें ॥९०॥पर्वतावरी पडे पर्वत ॥ तैसा शल्य भीमावरी धांवत ॥ दोन घटिका पर्यंत ॥ महायुद्ध जाहलें ॥९१॥वर्म पाहूनि रण मंडळीं ॥ गदा हाणिती महाबळी ॥ नाना मंडळें गति आगळी ॥ थोर चमत्कार दाविती ॥९२॥एक मेरु एक मंदार ॥ एक समुद्र एक अंबर ॥ एक वासुकी एक सहस्त्रवक्र ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥९३॥दोन्ही दळींचे नृपती ॥ युद्ध पाहोनि ग्रीवा तुका विती ॥ पर्वत कुंकुमें चर्चिजेती ॥ तैसे दिसती दोघेही ॥९४॥गदा घायें दोघे जण ॥ पडले तेव्हां मूर्च्छा येऊन ॥ मग शल्यासी स्यंदनीं घालोन ॥ नेत कृतवर्मा तेधवां ॥९५॥जैसा लागतां प्रभंजन ॥ जलद जाल जाय वितळोन ॥ तैसी कौरव सेना भयें करून ॥ पाळती जाहली तेधवां ॥९६॥यावरी कर्ण पुत्र वृष सेन ॥ धांवे रहंवरीं आरूढ होऊन ॥ तों शतानीक तिकडून ॥ पार्थ पुत्र धांवला ॥९७॥युद्ध जाहलें घटिका एक ॥ किंचित माघारला शतानीक ॥ तों प्रतिविंध्यादि चौघे देख ॥ पाठीराखे धांवले ॥९८॥त्या पंच कुमारीं मिळोनी ॥ खिळिली सकळ कौरव वाहिनी ॥ हस्तला घव पाहतां नयनीं ॥ पांडव मनीं आनंदले ॥९९॥तों कौरव समस्त लोटले ॥ देखतां कौंतेय पांचाळ उठले ॥ कोटयवधि बाण सोडिले ॥ क्षीण केले महावीर ॥१००॥मग तो प्रतापार्क अद्भुत ॥ आचार्य धांवला जैसा कृतान्त ॥ त्यावरी धर्म राज अकस्मात ॥ परम वेगें धांवला ॥१०१॥द्रोणें पांच बाणीं पाहीं ॥ धर्म राज भेदिला ह्रदयीं ॥ तों युधिष्ठिरें लवलाहीं ॥ उसणें घेतलें तयाचें ॥१०२॥शतार्ध बाण सोडून ॥ सर्वांगीं भेदिला गुरु द्रोण ॥ तों धांवला धृष्टद्युम्न ॥ अपार बाण वर्षत ॥१०३॥प्रलयीं खवळे जैसा काळ ॥ तैसा द्रोण कोपला पुण्य शील ॥ धृष्टद्युम्न तत्काळ ॥ शत बाणीं खिळियेला ॥१०४॥सूर्य कला संख्यबाणीं ॥ शिखंडी खिळिला तये क्षणीं ॥ दश मुख नेत्र संख्य बाणीं ॥ उत्तमौजा भेदिला ॥१०५॥भूत संख्य टाकूनि बाण ॥ नकुल भेदी गुरु द्रोण सागर संख्य बाणें करून ॥ सहदेव खिळियेला ॥१०६॥विद्या संख्य दिव्य शरीं ॥ धर्म राज भेदिला समरीं ॥ द्रौपदीच्या पंच पुत्रांवरी ॥ वेदसंख्या समान ॥१०७॥शशिकला संख्य सोडूनि शर ॥ समरीं खिळिला सात्यकी वीर ॥ पुराण संख्य बाणीं वृकोदर ॥ एकएकीं विंधिला ॥१०८॥मग जितुका वीरमात्र ॥ अवतार संख्या प्रमाण टाकूनि शर ॥ विराट पांचाळ भूभुज जर्जर ॥ केले सर्वत्र आचार्यें ॥१०९॥द्रोण पराक्रम देखोन ॥ डोळविती ग्रीवा सुरगण ॥ पृथ्वीचे नृप संपूर्ण ॥ धन्य धन्य म्हणती द्रोणासी ॥११०॥ऐसें देखोनि विपरीत ॥ जेवीं उदया चळीं उगवे आदित्य ॥ तैसा विजयरथारूढ अकस्मात ॥ सुभद्रानाथ धांवला ॥१११॥ते वेळीं सायकांचा घन ॥ द्रोणावरी पाडीत अर्जुन ॥ बाण जाळें करून ॥ अंबरमणि आच्छादिला ॥११२॥द्रोणें तैसेचि घालोनि शर ॥ आच्छादिलें तेव्हां अंबर ॥ तम दाटलें धुमधुमाकार ॥ कोणी कोणा दिसेना ॥११३॥जलधारा सुटती अपार ॥ तैसे वीरां अंगीं रुतती शर ॥ दोन्ही दळींचे वीर ॥ भयातुर पाहती ॥११४॥द्रोण आणि सुभद्रापती ॥ एकासी एक न दिसती ॥ तों मावळला गभस्ती ॥ शिबिरा प्रति चालिले ॥११५॥परम घोर निशा काळी ॥ कृष्ण वर्ण वस्त्र नेसली ॥ भगणें अपार उगवलीं ॥ ठसे झळकती ठायीं ठायीं ॥११६॥आचार्य शिबिरा प्रति जाऊन ॥ बोलता जाहला सुयोधन ॥ म्हणे तुमचें नेमवचन ॥ धर्म जीवंत धरावा ॥११७॥श्रेष्ठीं बोलिलें जें वचन ॥ तें दावावें सत्य करून ॥ तरीच पुरुषार्थें परिपूर्ण ॥ त्रिभुवन भरेल हें साच ॥११८॥मग बोले भरद्वाज नंदन ॥ धर्मासी रथितो अर्जुन ॥ तयाशीं युद्ध कंदन ॥ कृतान्त करूं न शकेचि ॥११९॥जो वैकुंठींचा वेल्हाळ ॥ तो सारथी ज्याचा तमालनीळ ॥ ध्वजस्तंभीं जो कां केवळ ॥ महारुद्र रक्षीतसे ॥१२०॥अर्जुन स्वयें अमरपती ॥ निर्वैर करावया हे क्षिती ॥ अवतरला असे निश्चितीं ॥ काय कीर्ति सांगावी ॥१२१॥हरि हर मघवा पाहीं ॥ तिघे जाहले एके ठायीं ॥ विजयरथ न हाले कांहीं ॥ गांडीव तूणीर अक्षय्य ॥१२२॥तरी तो विजय धर्मा पासून ॥ वेगळा न्यावा तुम्हीं फोडून ॥ आजि एक महारथी मारीन ॥ प्रतिज्ञा पूर्ण करीन मी ॥१२३॥तों सुशर्मा सुवर्मा सुरथ ॥ सुधन्वा सुबाहु बलाद्भुत ॥ मेळवूनि अवघे त्रिगर्त ॥ बोलती तेधवां ॥१२४॥समसप्तकांसी मेळवून ॥ उद्यां नेतों फोडूनि अर्जुन ॥ रणीं घेऊं त्याचा प्राण ॥ सुयो धना जाण हें ॥१२५॥हें जरी न करवे तत्त्वतां ॥ तरी पंक्तिभेद गुरुहत्या ॥ तीं पापें आमुच्या माथां ॥ जरी पार्थ न जिंकं ॥१२६॥रणीं जिंकूं अर्जुन ॥ अथवा देऊं आपुला प्राण ॥ देहान्तप्रायश्चित्त घेऊन ॥ होम दान करूं पैं ॥१२७॥परम संतोषोनि दुर्यो धन ॥ ह्रदयीं आलिंगी पांच जण ॥ म्हणे वस्त्रें भूषणें देऊन ॥ विजय वधून सत्वर या ॥१२८॥उदया चलावरी रविचक्र आलें ॥ सिद्ध जाहलीं दोन्ही दळें ॥ रणतुरें खांखाती सबळें ॥ हाकांनीं भरलें अंबर ॥१२९॥मग दुर्यो धनें काय केलें ॥ समसप्तक वेगळे निवडिले ॥ तीस लक्ष दिधले ॥ सुशर्मा श्रेष्ठ त्यांमाजी ॥१३०॥जो बोलावील युद्धासी ॥ तिकडेचि जाणें पार्थासी ॥ धनंजया युद्ध करीं आम्हांशीं ॥ ऐसें समसप्तक बोलिले ॥१३१॥वृषभ माजले जेवीं बहुत ॥ सिंहाशीं युद्ध करूं पाहात ॥ कीं दंद शूक उन्प्रत्त ॥ पाचारिती विनायका ॥१३२॥चंद्रार्धव्य़ूह रचून ॥ म्हणती कां न ये अर्जुन ॥ अवघे कोलाहल करिती मिळोन ॥ शस्त्रें उचलोन उदित पैं ॥१३३॥श्रीरंगासी म्हणे पार्थ ॥ हे कोल्हाळ करिती त्रिगर्त ॥ आजि यांचा करीन अंत ॥ जाहले मत्त बहुत हे ॥१३४॥मग भीमासी म्हणे अर्जुन ॥ नकुळ सहदेव आदिकरून ॥ पांचाळ विराट मिळोन ॥ धर्मरा यासी रक्षावें ॥१३५॥न लागतां एकही क्षण ॥ समसप्तकांसी येतों ॥ मारून ॥ श्रीकृष्णासी म्हणे अर्जुन ॥ चालवीं स्यंदन त्वरेनें ॥१३६॥धन्य धन्य तो पार्थवीर ॥ सच्चिदानंद सर्वेश्वर ॥ वैकुंठपति इंदिरावर ॥ सारथी जाहला जयाचा ॥१३७॥सांवळें अनुपम वदन ॥ आकर्ण विशाल राजीव नयन ॥ मुकुट कुंडलें अधर पूर्ण ॥ पोंवळवेली सारिखे ॥१३८॥विशाळ भाळीं दिव्य केशर ॥ कौस्तुभ वैजयंती मनोहर ॥ कांसे कसिला पीतांबर ॥ चरणीं तोडर ब्रीदावळी ॥१३९॥चतुर्भुज श्याम सुंदर ॥ रथीं सारथी रमावर ॥ ध्वजस्तंभीं महारुद्र ॥ केला भुभुःकार सत्राणें ॥१४०॥हनुमंता भोंवतीं भूतें अपार ॥ तींही हांक फोडिती अनिवार ॥ विष्णु वाहन पक्षांचा फडत्कार ॥ तैसा ध्वज तळपतसे ॥१४१॥घडघडिला विजय रथ ॥ पवन वेगें वारू जात ॥ पांच जन्य देवदत्त ॥ रमानाथ पार्थ वाजविती ॥१४२॥ आला आला रे अर्जुन ॥ भुभुःकारे वायु नंदन ॥ सकळ दळ कंपाय मान ॥ धुळीनें नभ पूर्ण भरलें ॥१४३॥पार्थ कृष्णा कडे पाहे विलोकून ॥ धुळीनें भरलें मुकुट वदन ॥ श्रीरसागरींचें निधान ॥ हो हो म्हणोनि वारू थोपी ॥१४४॥गांडीव धनुष्य चढविलें ॥ अर्जुनें निर्वाण मांडिलें ॥ अमर्याद रण पाडिलें ॥ वीर पळती दशदिशां ॥१४५॥पळत्यांसी सुशर्मा म्हणत ॥ धीर धरा परता समस्त ॥ दुर्यो धनाशीं शपथ ॥ केली व्यर्थ आजि कां ॥१४६॥ मग समस्तीं तये क्षणीं ॥ विजय रथ झांकिला बाणीं ॥ जैसे बहुत मूर्ख निळोनी ॥ पांडिताशीं वाद करिती ॥१४७॥चपले ऐसा त्वरें करून ॥ रथ फिरवीत भगवान ॥ समसप्तकांचे भार मोडून ॥ जाय स्यंदन पलीकडे ॥१४८॥अलातचक्रा ऐसा रथ ॥ फिरतां कोणा न दिसे व्यक्त ॥ शर सोडिती अमित ॥ परी ते न लागती पार्थातें ॥१४९॥लक्ष्य चुकोनि सत्वर ॥ आपुल्या वीरांसी लागती शर ॥ पार्थरूप येरायेर ॥ परस्परें दिसताती ॥१५०॥एकासी एक मारिती घाय ॥ ऐसाचि जाहला सेनाक्षय ॥ कंबधें उडती झाडूनि पाय ॥ टाळ्या वाजवीत नाचती ॥१५१॥इकडे धृष्टद्युम्न आणि द्रोण ॥ युद्ध करिती निर्वाण ॥ परस्परें सोडूनि बाण ॥ घेऊं प्राण इच्छिती ॥१५२॥आचार्य पराक्रम अद्भुत ॥ पांडवसैन्य भंगलें समस्त ॥ तों महावीर सत्यजित ॥ द्रोणावरी धांवला ॥१५३॥तेणें सोडूनि साठ शर ॥ द्रोणाचार्य केला जर्जर ॥ उडविलें सारथ्याचें शिर ॥ ध्वज छेदूनि पाडिला ॥१५४॥परम संतप्त होऊनि द्रोण ॥ विचारूनि टाकीतसे बाण ॥ त्याचें करावया निवारण ॥ कृतान्त शक्त नव्हेचि ॥१५५॥कल्पान्तचपले समान ॥ अकस्मात आला बाण ॥ सत्यजिताचें शिर छेदून ॥ आकाशपंथें उडविलें ॥१५६॥विराट बंधु जो शतानीक ॥ तो शर सोडी द्रोणा सन्मुख ॥ जैसा पर्वत गिळावया मशक ॥ मुख पसरूनि धांवला ॥१५७॥सोडूनि एक अर्धचंद्र शर ॥ शतानी काचें उडविलें शिर ॥ वसुनामा द्रुपद कुमार ॥ तोही धाडिला यमालया ॥१५८॥भयभीत झाला युधिष्ठिर ॥ सेना वितळली समग्र ॥ आचार्यस्तवन अपार ॥ सुयो धन करी तेव्हां ॥१५९॥सकळ पापांवरी एक हरिनाम ॥ जैसें जाळूनि क्षणें करी भस्म ॥ तैसा मारीत उठला भीम ॥ तो पराक्रम न वर्णवे ॥१६०॥धर्म सहदेव नकुळ ॥ उठिले विराट पांचाळ ॥ द्रौपदीचे पांच बाळ ॥ शर सोडीत धांवती ॥१६१॥घालूनियां बाण जाळ ॥ आच्छादिलें कौरव दळ ॥ गांधार धांवले सकळ ॥ एकदांचि पराक्रमें ॥१६२॥दुर्मर्षण सुबाहु जय द्रथ ॥ विंदानुविंद बलाद्भुत ॥ शल्य बाल्हीक गुरु सुत ॥ सुयो धन दुःशाशसन पैं ॥१६३॥दोःशासनी लक्ष्मण विकर्ण ॥ दुर्मुख पुरुजित आणि कर्ण ॥ वार्ध्यक्षमी सोमदत्त मणिमंत जाण ॥ अलंबुष राक्षस तो ॥१६४॥इतुके उठिले महावीर ॥ करिती पांडवचमू संहार ॥ पूर्वीं युद्धें जाहलीं अपार ॥ परी हा प्रकार नाहीं कोठें ॥१६५॥पूर्वीं वृत्रारि शत्रु जनक ॥ आणि श्रावणारितनय देख ॥ यांचें युद्ध वर्णिलें बहुतेक ॥ परी हें अद्भुत त्याहूनि ॥१६६॥अजा भारीं प्रवेशे वृक ॥ तैसा गज सेनेंत वृकोदर देख ॥ संहारीत असंख्य ॥ मदोन्मत्त इभ तेव्हां ॥१६७॥निबिड जलद जाल गहन ॥ क्षणांत निवारी चंड पवन ॥ तैसे कुंजर भीम सेन ॥ संहारून अक्षयी उभा ॥१६८॥हें देखोनि सुयोधन ॥ धांवला वर्षत मार्गण ॥ भीमें तुणीर सायका सन ॥ रथ ध्वज छेदिला ॥१६९॥ऐसें देखोनियां सवेग ॥ म्लेंच्छमेळा घेऊनि धांवे अंग ॥ धर्मानु जावरी सवेरी ॥ बाण घन वर्षतसे ॥१७०॥दिव्य शर सोडोनि वृकोदर ॥ उडवी अंगरायाचें शिर ॥ केला यवनांचा संहार ॥ गगनीं सुरवर पाहती ॥१७१॥तों प्राग्ज्योतिषपुरींचा नृपनाथ ॥ नरक सुत जो भगदत्त ॥ महागजारूढ बलोन्मत्त ॥ बाण वर्षत धांवला ॥१७२॥सोडूनि शशिवदन बाण ॥ भीमाचा स्यंदन केला चूर्ण ॥ मग तो वृकोदर गदा घेऊन ॥ नरक सुतावरी धांवला ॥१७३॥ कुलालचक्रापरी देख ॥ महाद्विप फेरी तो भगद्त्त ॥ भीम गजासी आकळीत ॥ परी तो सहसा नाटोपे ॥१७४॥गदाघायें झोडी वृकोदर ॥ परी कधीं नाटोपे अनिवार ॥ जिकडे तळपे कुंती कुमार ॥ पाठीलाग न सोडी ॥१७५॥द्रौपदीचे पंचनंदन ॥ शिखंडी द्रुपद धृष्टद्युम्न ॥ भगदत्तावरी बाण ॥ जाळ वर्षती तेधवां ॥१७६॥परी तो भगदत्त महावीर ॥ तितुक्यांचेही तोडूनि शर ॥ आपुल्या सायकीं जर्जर ॥ सकळ वीर केले त्याणें ॥१७७॥सात्यकीनें शत बाण ॥ भगदत्तावरी सोडिले निर्वाण ॥ परी तितुकेही छेदून ॥ गज लोटिला सात्यकीवरी ॥१७८॥गजें धरूनि स्य़ंदन ॥ अश्वासहित केला चूर्ण ॥ सत्यकी चपल उसळोन ॥ एकीकडे निघाला ॥१७९॥ऐरावतारूढ संक्रंदन ॥ तैसा दिसे नरक नंदन ॥ वीरांसहित गज अश्व धरून ॥ आपटूनियां टाकीतसे ॥१८०॥कित्येक गजें मारिले रथी ॥ बहुतांचे मारिले सारथी ॥ भगदत्तें लाविली ख्याती ॥ कोणी येती न समोर ॥१८१॥रुचिपर्वा प्रतापी विराट पुत्र ॥ त्यावरी भगदत्तें टाकूनि शर ॥ ऊर्ध्वपंथें उडविलें शिर ॥ महावीर पाहती ॥१८२॥गोरक्षक पिटी गोभार ॥ तैसे महावीरांचे संभार ॥ पळविता जाहला कुंजर ॥ अनिवार सर्वांसी ॥१८३॥हें धर्मराजें देखोन ॥ सोडी त्यावरी शत बाण ॥ नव्वद बाणीं धृष्टद्युम्न ॥ भेदिता जाहला तयातें ॥१८४॥अर्धशत दिव्य शर ॥ सोडिता जाहला वृकोदर ॥ द्रौपदीचे पंच पुत्र ॥ शत शत शर टाकिती ॥१८५॥तितुक्यांचेंही बाण जाळ ॥ भगद्त्तें तोडिलें तत्काळ ॥ गजें संहारिलें बहुत दळ ॥ जाहला कोल्हाळ तेधवां ॥१८६॥परम आनंदला दुर्योधन ॥ वाद्यें वाजविती विजय वर्धन ॥ वारंवार करिती गर्जन ॥ तें अर्जुन ऐकतसे ॥१८७॥घालू नियां ब्रह्मास्त्र ॥ समसप्तकांचा केला संहार ॥ सुशर्मा सांडूनि समर ॥ पळता जाहला तेधवां ॥१८८॥कृष्णासी श्रीकृष्ण म्हणे ते क्षणीं ॥ धन्य तूं वीरचक्रचूडामणी ॥ आतां चला भगदत्तें वाहिनी ॥ आटिली तिकडे आमुची ॥१८९॥करावया धर्मरक्षण ॥ वेगें धांवले कृष्णार्जुन ॥ अहो ते घोडे सुपर्णा समान ॥ जगन्मोहन धांवडी ॥१९०॥कडकडूनि होय चपलापात ॥ तैसे रथा सहित कृष्ण पार्थ ॥ भगदत्तापुढें आले अकस्मात ॥ दोन्ही दळें देखती ॥१९१॥कौरव दळ भयभीत ॥ म्हणती करील सैन्याचा निःपात ॥ तों बाण वर्षों लागला पार्थ ॥ नव्हें गणित तयांचें ॥१९२॥वणवा जाळी तृणविपिन ॥ तैसे पाडीत अपार सैन्य ॥ तें भगदत्तें देखोन ॥ किरीटीवरी लोटला ॥१९३॥कृष्णार्जुनांवरी बाण ॥ भगदत्त टाकी लक्षून ॥ परी रथ फेरी जगन्मोहन ॥ एक मार्गण लागों नेदी ॥१९४॥अलातचक्राहून ॥ चपल फेरीतसे स्यंदन ॥ दश बाणीं नरकनंदन ॥ भेदीत तेव्हां मुरहरा ॥१९५॥सच्चिदानंदतनु सगुण ॥ भेदूनि गेले दश बाण ॥ परी रथावरूनि मधुसूदन ॥ अणुमात्र न चळेचि ॥१९६॥बाण सोडी श्वेतवाहन ॥ तोडिलें हातींचें शरासन ॥ नरकसुतें भिरकावून ॥ चौदा तोमर दीधले ॥१९७॥तितुकेही छेदूनि पार्थें ॥ निष्फळ दवडिले गगनपंथें ॥ यावरी सुभद्राकांतें ॥ द्वादश बाण सोडिले ॥१९८॥भगदत्ताचे ह्रदयीं ॥ बाण भेदले ते समयीं ॥ यावरी शक्ति टाकिली लवलाहीं ॥ कृष्णावरी दैत्यसुतें ॥१९९॥ती वरिचेवरी अर्जुनें ॥ त्रिखंड केली त्याचि क्षणें ॥ सवेंचि पार्थें वज्रबाणें ॥ इभ भेदिला कुंभस्थळीं ॥२००॥भयभीत जाहला वारण ॥ नाटोपेचि घेतलें रान ॥ जैशी दुर्बळाची स्त्री वैरीण ॥ नाटोपेचि तयासी ॥२०१॥सवेंचि पार्थें बाण सोडिले ॥ गजाचे अंगींचे कवच ॥ छेदिलें ॥ चार्ही चरण ॥ तोडिले ॥ क्षण एक न लागतां ॥२०२॥वृक्ष पडे उन्मळोन ॥ तैसा गज जाहला गत प्राण ॥ भगदत्त परिघ घेऊन ॥ कृष्णावरी लोटला ॥२०३॥मग सव्यसाची काढी बाण ॥ धाराग्रीं दैवत सहस्त्र नयन ॥ सहस्त्र करतुल्य वदन ॥ शरासनीं योजिला तो ॥२०४॥भगदत्ताचा कंठ लक्षून ॥ बाण गेला न लागतां क्षण ॥ ऊर्ध्वपंथें उडवून ॥ शिर नेलें क्षणमात्रें ॥२०५॥मुकुटकुंडलमंडित ॥ शिर पडलें कौरव दळांत ॥ जय वाद्यें वाजवीत ॥ पांडवदळीं तेधवां ॥२०६॥कौरव दळीं हाहाकार ॥ म्हणती पडला महावीर ॥ शकुनीचे बंधु सोडीत शर ॥ किरीटीवर धांवले ॥२०७॥नामें वृषकेतु आणि अचळ ॥ पार्थें सोडिले शर तेजाळ ॥ दोघांचीं शिरें तत्काळ ॥ छेदूनि नेलीं ऊर्ध्वपंथें ॥२०८॥हाहाकार जाहला ते क्षणीं ॥ क्रोधें युद्धा आला शकुनी ॥ कापटयकोश पापखाणी ॥ सर्वा अनर्थांसी मूळ जो ॥२०९॥कापटय विद्या करोनि तेथें ॥ पार्थावरी सोडिलीं भूतें प्रेतें ॥ वेष्टूनियां पार्थाचे रथाचे ॥ हांका देत भीडती ॥२१०॥विक्राळ वदन नानावर्ण ॥ देखतां अशुचि कंपाय मान ॥ त्यांवरी पार्थें ब्रह्मास्त्र सोडून ॥ एकदांचि संहारिलीं ॥२११॥जैसें घेतां एक नाम ॥ महापापें होती भस्म ॥ कीं काम क्रोध मोह भ्रम ॥ आत्म विज्ञानें वितळती ॥२१२॥आणिक अस्त्रांचे संभार ॥ शकुनी सोडी कापटय सागर ॥ परी तो श्रीरंगभगिनीवर ॥ क्षणमात्रें निवारी ॥२१३॥पार्थ म्हणे रे शकुनी ॥ दुरात्मा तूं पाप खाणी ॥ मजशीं संघट्टोनि रणीं ॥ जय कैसा पावसी ॥२१४॥आपुलें तेज खद्योत ॥ वासरमणीप्रति दावीत ॥ कीं मृगेंद्रा पुढें दावी उन्मत्त ॥ मार्जार आपुलीं उड्डाणें ॥२१५॥पंडितापुढें मूढ ॥ वृथा करीत बडबड ॥ कीं ब्रीदें बांधोनि प्रचंड ॥ रासभ गात तुंबरू पुढें ॥२१६॥राजहंसा समोर जाण ॥ काक दाखवी जेवीं उड्डाण ॥ कीं मूषक टाकारून ॥ भोगींद्रावरी चालिला ॥२१७॥ऐसें बोलूनि तत्काळ ॥ शकुनीवरी घातलें शरजाळ ॥ पांच शत वीर प्रबळ ॥ शकुनीचे तेव्हां मारिले ॥२१८॥अश्व सारथी स्यंदन ॥ शकुनीचा केला चूर्ण ॥ धनुष्य कवच तूणीर तोडून ॥ क्षणमात्रें टाकिलें ॥२१९॥विपरीत समय देखोन ॥ शकुनी पळाला सोडूनि रण ॥ जैसा भ्रष्टला टाकूनि स्वजन ॥ परदेशा प्रति जाय ॥२२०॥कौरव सेना जाहली जर्जर ॥ वाहनें टाकूनि पळती वीर ॥ त्यांसी धीर देत द्रोण पुत्र ॥ बाण वर्षत धांवला ॥२२१॥तयावरी भीम सेन ॥ सोडी बाणांपाठीं बाण ॥ अस्ताचलासी सहस्त्रकिरण ॥ जाता जाहला तेधवां ॥२२२॥पांडवप्रताप ग्रंथ थोर ॥ द्रोणपर्व सुरस अपार ॥ पुढें श्रीरंगभगिनी कुमार ॥ भंगेल रणीं परिसा तें ॥२२३॥श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ पांडवरक्षका गोविंदा ॥ पार्थसारथी जाहलासि तूं ॥२२४॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोणपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चव्वेचाळिसाव्यांत कथियेला ॥२२५॥इति श्रीपांडवप्रतापे चतुश्चत्वारिंशाध्यायः ॥४४॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP