मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४७ वा

पांडवप्रताप - अध्याय ४७ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ जन मेज यासी म्हणे वैशंपायन ॥ परंधाम पावला गुरु द्रोण ॥ एथूनि कर्ण पर्व संपूर्ण ॥ स्वस्थचितें ऐका पां ॥१॥
शारद्वत दुर्यो धन कर्ण ॥ अश्वत्थामा जो गुरु नंदन ॥ त्याचिया शिबिरा प्रति जाऊन ॥ समाधान करिती तेव्हां ॥२॥
प्राणा विण शरीर ॥ कीं फला विण तरुवर ॥ तैसी द्रोणा विण सेना समग्र ॥ शून्य़वत दिसतसे ॥३॥
सकल सेना भयभीत ॥ म्हणती आतां आला अंत ॥ शस्त्रें हातींचीं गळालीं समस्त ॥ नक्षत्रें पडती ज्यापरी ॥४॥
दुर्यो धन म्हणे कर्ण वीरा ॥ बाल मित्रा प्रीतिपात्रा ॥ तुझिया बळें उदारा ॥ न गणीं मी इंद्रासी ॥५॥
भीष्म आणि गुरु द्रोण ॥ यांचें पांडवांकडे मन ॥ गंगा नंदनें दश दिन ॥ युद्ध उगेंचि लांब विलें ॥६॥
पांच दिवस द्रोणें पाहें ॥ युद्ध करोनि केलें काय ॥ दोघांनींही आमुचा जय ॥ इच्छिला नाहीं तत्त्वतां ॥७॥
ते परम कपटी कृतघ्न ॥ तरीच पावले अपयश मरण ॥ कर्णा तूं आमुचा प्राण ॥ सेना रक्षीं यावरी ॥८॥
पुरुषां माजी तूं महावाघ्र ॥ तुज पुढें कायसे पंडुपुत्र ॥ सुवर्ण कुंभीं भरोनि नीर ॥ दुर्यो धनें आण विलें ॥९॥
अभिषेक करूनि प्रीतीं ॥ कर्ण केला सेना पती ॥ वस्त्रें भूषणें अश्व हस्ती ॥ दुर्यो धनें दीधले ॥१०॥
अरिष्टनाशक दानें ॥ बहुत दिधलीं दुर्यो धनें ॥ ओंवाळूनि वस्तु निंबलोणें ॥ नीच याचकां देतसे ॥११॥
पार्थासी म्हणे विश्वकर्ता ॥ यावरी तूं आराधीं सविता ॥ सूर्यासी शरण जाईं आतां ॥ सकल विघ्नें नासती ॥१२॥
मग आदित्य ह्रदय जपोन ॥ करी तृचाकल्प अर्ध्यप्रदान ॥ सूर्य करोनि सुप्रसन्न ॥ युद्धासी अर्जुन निघाला ॥१३॥
विजय रथा रूढ होय पार्थ ॥ रणतुरें वाजलीं अद्भुत ॥ कौरवां सहित हिरण्यगर्भ सुत ॥ रथा रूढ जाहला ॥१४॥
मकर व्यूह ते वेळां ॥ दिन मणिसुतें रचियेला ॥ पांडवीं व्यूह आकारिला ॥ अर्धचंद्रवत तेधवां ॥१५॥
दाटलीं जैसीं खगमंडलें ॥ तैसें पांडवसैन्य उठावलें ॥ परी द्दष्टीं न धरी ते वेळे ॥ सवितात्मज सहसाही ॥१६॥
इकडे पार्थासी धर्म नृपती ॥ गौरवीत परम प्रीतीं ॥ म्हणे आजि कर्णा प्रती ॥ वधूनि विजयी होईं तूं ॥१७॥
रणपंडिता सद्नणालया ॥ यशस्वी असोत तुझिया बाह्या ॥ प्रेमें ह्रदयीं आलिंगो नियां ॥ म्हणे काया अक्षय्य असो ॥१८॥
जगद्वंद्य जो विश्वकर्ता ॥ त्याचे करीं धर्म देत पार्था ॥ म्हणे तूंचि माता तूंचि पिता ॥ बहुत आतां काय बोलूं ॥१९॥
रुक्मिणी ह्र्दयाञमिलिंद ॥ जो पूर्व ब्रह्म सच्चिदा नंद ॥ तो म्हणे आजि कर्णवध ॥ किरीटिहस्तें करवी न पैं ॥२०॥
वाद्यें धडकलीं प्रबळ ॥ गजर जाहला परम तुंबळ ॥ एकवटलें चतुरंग दळ ॥ परमावेशें भिडती पैं ॥२१॥
पक्षी उडती वृक्षा वरूनी ॥ तैसीं शिरें उसळती गगनीं ॥ कीं ते कंदुक खेळती रणीं ॥ कौरव पांडव आवेशें ॥२२॥
जैसे पंच फणी पादोदर ॥ तैसे वीरांचे पडले कर ॥ मुकुट पडिले अपार ॥ वीरवर्यांचे झळकती ॥२३॥
कबंधें उठोनि शीघ्र गती ॥ नाचोनि टाळिया वाज विती ॥ आम्ही मुक्त झालों धारातीर्थीं ॥ परमगति पावलों ॥२४॥
समर टाकूनि जे भ्याड पळती ॥ त्यांसी देखोनि शिरें हांसती ॥ आम्ही रण शूर पावलों गती ॥ म्हणोनि नाचती आनंदें ॥२५॥
ऊर्ध्वपंथें शिरें जाती ॥ सवेंचि माघारीं कां फिरती ॥ तरी नाशिवंत स्वर्ग निश्चिती ॥ क्षणिक वस्ती काय ते ॥२६॥
पार्थ रथीं वैकुंठनाथ ॥ या देखतां आम्ही जाहलों मुक्त ॥ नलगे स्वर्ग नाशिवंत ॥ शिरें परतती म्हणो नियां ॥२७॥
ऐरावता समान हस्ती ॥ हिरे पाच जडले दांतीं ॥ मुक्तजाळिया वरी मिखती ॥ समीरगति धांवे रणीं ॥२८॥
तया द्विपावरी कवच लेवून ॥ बैसोनि धांवला भीम सेन ॥ तों क्षेमधृति कौरवां कडून ॥ तोही गजारूढ पातला ॥२९॥
सिंहनादें दोघे गर्जती ॥ अलातचक्रवत इभ फेरिती ॥ परस्परें बाण सोडिती ॥ चापें तोडिती लक्षोनियां ॥३०॥
शास्त्र संख्य तोमर ॥ क्षेमधृतीनें सोडिले अनिवार ॥ ह्र्दयीं ताडिला द्वितीय पुत्र ॥ पृथादेवीचा तेधवां ॥३१॥
भीमें नूतन चाप घेऊनी ॥ ह्रदयीं ताडिला विंशतिबाणीं ॥ सवेंचि गदाघायें करूनी ॥ इभ रणीं संहारिला ॥३२॥
क्षेमधृति असिलता घेऊन ॥ भीमावरी पडिला येऊन ॥ मग भीमें गदाघायें करून ॥ केला चूर्ण समरांगणीं ॥३३॥
कौरव दळीं हाहाकार ॥ पुढें धांवला मरीचि कुमार ॥ त्या वरी सोडीत शर ॥ नकुल वीर लोटला ॥३४॥
भीम आणि गुरु नंदन ॥ विंदानु विंद दोघे जण ॥ दे दुर्यो धनाचे बंधु जाण ॥ तयांवरी सात्यकी धांवला ॥३५॥
श्रुतकर्मा आणि चित्र सेन ॥ धर्म राज आणि सुयो धन ॥ समसप्तकांवरी अर्जुन ॥ कृतवर्मा आणि शिखंडी ॥३६॥
शल्य शुतकीर्ति दोघे जण ॥ सददेव आणि दुःशासन ॥ कैकेय राज आणि धृष्टद्युम्न ॥ परम आवेशें भिडती पैं ॥३७॥
विंदानुविंदांचीं शिरें ॥ पाडिलीं तेव्हां सात्यकीवीरें ॥ युद्ध होत असे अतिगजरें ॥ उर्वीतळ डळमळी ॥३८॥
इकडे श्रुतकर्मा चित्र सेन ॥ दोघीं बाणीं भरिलें गगन ॥ चाप आणि स्यंदन ॥ छेदिते जाहले परस्परें ॥३९॥
श्रुतकर्मा द्रौपदी पुत्र ॥ तेणें कर्म केलें विचित्र ॥ चित्र सेनाचें शिर ॥ दिव्य बाणें उडविलें ॥४०॥
श्रुतकर्मा महावीर ॥ बाणीं कौरव केले जर्जर ॥ मस्तक डोलविती नृपवर ॥ सव्यतर्जनी उचलोनी ॥४१॥
श्रुतकीर्ति द्रौपदी कुमार ॥ तेणें मारिला अभिसार ॥ प्रतिविंध्यवीरें त्रिवीर ॥ क्षण न लागतां वधियेला ॥४२॥
तंव कौरव अवघे वळंघले ॥ प्रतिविंध्यावरी कोसळले ॥ नाना शस्त्रें अस्त्रें वर्षले ॥ एकदांचि चहूंकडोनी ॥४३॥
तों द्रौपडीचा ज्येष्ठ नंदन ॥ जो जाहला धर्मा पासून ॥ तेणें स्वप्रतापें करून ॥ शस्त्रें छेदिलीं अवघ्यांचीं ॥४४॥
महावीरांचे भार ॥ तेणें बाणीं केले जर्जर ॥ पाठ देऊनि धार्त राष्ट्र ॥ पळते जाहले तया पुढें ॥४५॥
इकडे गुरु सुतावरी भीम सेन ॥ घालिता जाहला असंख्य बाण ॥ सहस्त्र शरीं आचार्य नंदन ॥ आच्छादीत भीमातें ॥४६॥
गिरीवरी पडे जल धर ॥ तैसे भीम न गणी त्याचे शर ॥ सिंहनादें कुंती पुत्र ॥ भरी अंबर तेधवां ॥४७॥
पांच शत बाणें करून ॥ भीमें खिळिला गुरु नंदन ॥ तोडोनि टाकिला स्यंदन ॥ तुरंग सूतां समवेत ॥४८॥
मग चरण चाली गुरु सुत ॥ वृकोदराचा रथ छेदीत ॥ दोघे सिंहनादें गर्जत ॥ देव कांपती विमानीं ॥४९॥
गदाघायें दोघे जण ॥ चरण चालीं करिती भांडण ॥ दोन्ही दळींचे वीर पाहोन ॥ धन्य युद्ध वानिती ॥५०॥
नानागति मंडलें करून ॥ स्थिर चमक बैसका उड्डाण ॥ गदा झगडतां उसळे अग्न ॥ दळें पोळून पळताती ॥५१॥
गदाघायीं दोघांसी तये क्षणा ॥ येती जाहली महामूर्च्छना ॥ रथ आणोनि दोघां जणां ॥ नेते जाहले दोहीं कडे ॥५२॥
यावरी तो सुभद्राकांत ॥ वेगें धांवला बाण वर्षत ॥ कौरव दळीं आकांत ॥ शिरें अपार छेदिलीं ॥५३॥
जेवीं नालरहित कमलें ॥ तैसे शिरांचे भार पडिले ॥ रथांचे अंक छेदिले ॥ सहस्त्रावधि तेधवां ॥५४॥
सहस्त्रवीर रणपंडित ॥ नांवाजिक अतिबळवंत ॥ त्यांतुल्य एक सुभद्राकांत ॥ बोले गणित वैशंपायन ॥५५॥
पुष्पवर्षाव सतेज ॥ वारंवार करी विबुधराज ॥ तें न साहोनि द्रोणतनुज ॥ वर्षत बाण ॥ धांवला ॥५६॥
शत बाणीं अभिमन्युतात ॥ खिळिता जाहला कृपी सुत ॥ सहस्त्र बाणीं पार्थ ॥ विंधिता जाहला तयातें ॥५७॥
त्याचें भ्रूमंडल लक्षोन ॥ पार्थें एक सोडिला बाण ॥ तो गुरु सुताचे कपाळीं जाऊन ॥ पूर्ण भेदून गुप्त जाहला ॥५८॥
अनेक शरीं भेदलें क्षेत्र ॥ मयूरा ऐसा दिसे गुरु पुत्र ॥ यावरी कौरव सर्वत्र ॥ केले जर्जर बाण घायें ॥५९॥
पदक्रमीं वर्ण क्रमीं जाणा ॥ पंडितांची जेवीं चालेर रसना ॥ तयापरी पार्थ वीर जाणा ॥ सोडी बाण चपलत्वें ॥६०॥
उभयहस्तांचें समसंधान ॥ केव्हां काढी न कळे मार्गण ॥ विद्युल्लते ऐसें सायकासन ॥ झळके कानाडी ओढितां ॥६१॥
असो बाण जाळीं जर्जर ॥ पार्थें केला गुरु पुत्र ॥ मग अंग काढूनि तो महावीर ॥ कर्ण दळीं प्रवेशला ॥६२॥
तों गजा रूढ सत्वर ॥ भगदत्ताचा ॥ बंधु दंडधार ॥ पार्थावरी सोडीत शर ॥ अत्यावेशें धांविन्नला ॥६३॥
शत शत बाण टाकोनी ॥ उभय कृष्ण भेदिले रणीं ॥ समर भूमीसी घटिका दोनी ॥ महावीर भिडला तो ॥६४॥
मग पार्थें टाकोनि शर ॥ दंडधराचें उडविलें शिर ॥ उगुरायुध महावीर ॥ तोही तैसाचि धांवला ॥६५॥
श्रीकृष्ण म्हणे पार्थ वीरेशा ॥ क्रीडसी काय बाळा ऐसा ॥ आतां कर्ण वधिसी कैसा ॥ त्वरा करीं युद्धाची ॥६६॥
उग्रायुधाचें शिर जाण ॥ अर्जुनें छेदिलें न लागतां क्षण ॥ येरीकडे मेघपति अंग दारुण ॥ नकुलें रणीं संहारिले ॥६७॥
नकुलावरी दुःशासन ॥ धांवला तेव्हां वर्षत बाण ॥ सहस्त्र सायक टाकून ॥ समरीं दुर्जन खिळियेला ॥६८॥
दुःशासन विकल रथीं ॥ देखोनि रथ फिरवी सारथी ॥ मग तो नकुल सुमती ॥ कर्णा प्रती बोलत ॥६९॥
हा अनर्थ व्हावया मूळ ॥ अरे कर्णा तूचि केवळ ॥ षंढतिळ जैसे अरण्यांतील ॥ आम्हांसी नांव ठेविलें त्वां ॥७०॥
आम्ही षंढ कीं रणशूर ॥ समरीं मनासी आणीं बा रे ॥ कर्ण म्हणे नकुला समोर ॥ युद्ध करीं पाहूं कैसें ॥७१॥
मग कर्णें परम कोपोनी ॥ नकुल विंधिला सत्तर बाणीं ॥ तेणें ऐशीं सायकेंकरोनी ॥ सूर्य सुत भेदिला ॥७२॥
कर्णाचा परम प्रताप ॥ छेदिलें नकुलाचें चाप ॥ शत बाणीं कवच देदीप्य ॥ सवेंचि छेदोनि पाडिलें ॥७३॥
नकुलें टाकोनि सत्तर बाण ॥ कर्णाचें छेदिलें बाणा सन ॥ सवेंचि तेणें नूतन ॥ चाप घेतलें हस्तकीं ॥७४॥
मग तीन शत बाणीं ॥ नकुल विंधिला तये क्षणीं ॥ रथ टाकिला तोडूनी ॥ सारथि अश्व छेदिले ॥७५॥
नकुलें परिघ टाकिला ॥ तो कर्णें मध्येंचि चूर्ण केला ॥ मग माद्रीसुत निघाला ॥ समर सोडूनि तेधवां ॥७६॥
तों कर्णें धांवोनि ते वेळां ॥ चाप घातलें नकुलाचे गळां ॥ मग म्हणे रे बाळा ॥ कैसें आतां करिसील ॥७७॥
मग कुंतीचें वचन ॥ आठवून ॥ नकुल दिधला सोडून ॥ म्हणे मज समोर आजि पासून ॥ समरीं सर्वथा येऊं नको ॥७८॥
वीर आपणा समान पाहोन ॥ त्वां करावें युद्ध कंदन ॥ सुईचे रंध्राएवढें वदन ॥ त्यांत पर्वत केवीं मावे ॥७९॥
कल्पांत वीज धांवोनी ॥ शलभ केवीं गिळील वदनीं ॥ लवणनौका सिंधु जीवनीं ॥ केवीं तरोनि जाईल ॥८०॥
कर्ण म्हणे हांसोनी ॥ लपें पार्था आड जाऊनी ॥ परम लज्जित होऊनी ॥ नकुल पायीं परतला ॥८१॥
मग पांचालावरी कर्ण ॥ उठिला तेव्हां वर्षत बाण ॥ युयुत्सु आणि उलूक जाण ॥ युद्ध दारुण करिते जाहले ॥८२॥
कर्णें घालितां बाण जाळ ॥ पळालें पांचाळाचें दळ ॥ हें देखोनि प्रतापशीळ ॥ हरिवर ध्वज धांवला ॥८३॥
कौरव दळ महामार्गणी ॥ पार्थें मारिलें तयें क्षणीं ॥ संश्रुताचें शिर उडवूनी ॥ आकाशपंथें धाडिलें ॥८४॥
सत्यसेन धांवला तये क्षणीं ॥ लोहतोमर हातीं घेऊनी ॥ ह्रदयीं ताडिला चक्रपाणी ॥ रथा समीप येऊ नियां ॥८५॥
तेणें मूर्छा आली त्वरें ॥ गळाले हातींचे वाग्दोरे ॥ ऐसें देखोनि पार्थ वीरें ॥ शर सोडिला शशि मुख ॥८६॥
सत्य सेनाचें शिर उडविलें ॥ कौरव सेनेंत पाडिलें ॥ सुशर्म्यासी खिळिलें ॥ वक्षःस्थळीं सप्त शरीं ॥८७॥
सावध होऊनि कमला वरें ॥ सांवरोनि धरिले वाग्दोरे ॥ मग लक्षावधि शिरें ॥ पार्थें पाडिलीं परवीरांचीं ॥८८॥
मांस कर्दमीं तत्त्वतां ॥ चक्रें न ढळती अश्वीं ओढितां ॥ गजाश्वकलेवरें पाहतां ॥ पर्वत प्राय पडियेलीं ॥८९॥
रथासी न चले वाट ॥ अरिभार पडती अचाट ॥ कुंडलां सहित अपार मुकुट ॥ रणांगणीं पडियेले ॥९०॥
कित्येक रिते रथ ॥ ओढूनी ॥ अश्व हिंडती रणांगणीं ॥ मोकळे कुंजर उचलोनी ॥ भिरका विती रथांतें ॥९१॥
तों रथा रूढ दुर्यो धन ॥ आला आर्था वरी धांवोन ॥ सोडिता जाहला शत बाण ॥ कृष्णार्जुन लक्षो नियां ॥९२॥
पार्थें सोडोनियां शर ॥ छेदिलें मस्तकींचें आतपत्र ॥ सारथि रहंवर चाप तूणीर ॥ पाडिले तेव्हां पुरुषार्थें ॥९३॥
मग एक निर्वाणींचा बाण ॥ पार्थें दिधला सोडून ॥ तो सातां ठायीं छेदून ॥ कृपीसुतें पाडिला ॥९४॥
ऐसें युद्ध होतां घोरांदर ॥ तों अस्तासी गेला सहस्त्रकर ॥ वाद्यें वाजवीत वीर ॥ शिबिरांत गेले आपु लिया ॥९५॥
कौरव दळींचे वीर बहुत ॥ वानिती पांडवांचा पुरुषार्थ ॥ कर्ण परा क्रम अद्भुत ॥ दुर्यो धन वानी तसे ॥९६॥
कर्ण म्हणे रे दुर्यो धना ॥ उद्यां वधीन मी अर्जुना ॥ तरीच पाहीन तुझिया वदना ॥ नाहीं तरी भेटी हेचि ॥९७॥
भार्ग वचाप आहे मज जवळी ॥ तरी वासवी शक्ति वेंचूनि गेली ॥ मज चिंता थोर लागली ॥ ते बाहेरी दावितां न ये ॥९८॥
भुजंगाचे पाडिले दांत ॥ महाव्याघ्राचे तोडिले हात ॥ कीं आडांत पडला मृगनाथ ॥ तेवीं सत्य जाहलें ॥९९॥
त्याचे रथा वरी हरिहर ॥ विजय रथ चाप तूणीर ॥ मज सारथी नाहीं चतुर ॥ तरी एक करीं सुयो धना ॥१००॥
अश्व ह्रदय संपूर्ण ॥ शल्य किंवा जाणे कृष्ण ॥ धनुर्धर मी एक किंवा अर्जुन ॥ तिसरा नाहीं या वेळे ॥१०१॥
शल्य सारथी होईल जरी ॥ तरी उद्यांचि मारीन पार्थ समरीं ॥ यावरी शल्या चिया शिबिरीं ॥ दुर्यो धन येता जाहला ॥१०२॥
बहुत करोनियां स्तुती ॥ म्हणे मज तूं प्रसन्न होईं नृपती ॥ होईं कर्णाचा सारथी ॥ एक दिवस महावीरा ॥१०३॥
ऐसा ऐकतां बोल ॥ कोपा रूढ जाहला शल्य ॥ म्हणे कर्ण सूत पुत्र मशक केवळ ॥ मी भूपाळ मद्रदेशींचा ॥१०४॥
मी एकलाचि युद्ध करीन ॥ पांडवदळ संहारीन ॥ त्वां मांडिला माझा अपमान ॥ तरी मी जाईन स्वदेशा ॥१०५॥
मी राज पुत्र छत्रपती ॥ पृथ्वी घालीन हे पालथी ॥ किरात पुत्र कर्ण म्हणती ॥ मी सारथी त्यासी कैसा ॥१०६॥
मग नम्रता धरून ॥ बहुत विनवी दुर्यो धन ॥ तुजहूनि थोर नव्हे कर्ण ॥ हें संपूर्ण मी जाणें ॥१०७॥
मज देईं जीव दान ॥ पाहें सारथी जाहला श्रीकृष्ण ॥ त्रिपुरवधीं चतुरानन ॥ सारथी जाहला शिवाचा ॥१०८॥
तूं कृष्णाहूनि थोर ॥ ऐकतां तोषला शल्य वीर ॥ म्हणे सारथी होतों निर्धार ॥ कर्णाचा मी यावरी ॥१०९॥
परी मी जें बोलेन ॥ तें कर्णें उगेंचि सोसावें ॥ तेणें अधिक मज न बोलावें ॥ दुर्यो धन ॥ अवश्य म्हणे ॥११०॥
मज अधिक बोलतां कर्ण ॥ मी जाईन रथ सोडून ॥ त्यासी नाटोपे अर्जुन ॥ हें मी पूर्ण जाण तसें ॥१११॥
तथापि तेणें मारिला अर्जुन ॥ तरी कृष्ण घेईल सुदर्शन ॥ तुम्हांसी टाकील संहारून ॥ क्षणमात्र न लागतां ॥११२॥
यावरी बोले सुयो धन ॥ तूं कर्णासी टाकिसी निर्भर्त्सून ॥ परी ऐसा धनुर्वेदपरायण ॥ कुंभिनी वरी असेना ॥११३॥
घटोत्कचाची माया ॥ ब्रह्मा दिकांसी न ये आया ॥ तो वासवी शक्ति टाको नियां ॥ क्षणमात्रें मारिला ॥११४॥
जेणें जर्जर केला भीम सेन ॥ नकुलाचे गळां चाप घालून ॥ मागुती देऊनि जीवदान ॥ सोडिला बाळ म्हणो नियां ॥११५॥
शल्य म्हणे मी जें बोलेन ॥ तें कर्णें करावें सहन ॥ मानसी येईल तेव्हां जाईन ॥ नसे आधीन कोणाचे ॥११६॥
मग कर्णाचे गळां धांवोन ॥ दुर्यो धन प्रीतीनें मिठी घालून ॥ म्हणे अर्जुनासी वधून ॥ विजय़ी होऊन येईं कां ॥११७॥
यावरी बोले तरणि कुमार ॥ शल्य सारथी दुष्ट फार ॥ वैरियांसी वारंवार ॥ वर्णूनि आम्हां निर्भर्त्सितो ॥११८॥
गांधार म्हणे शल्या लागून ॥ जैसा धनंजयासी रक्षी कृष्ण ॥ तैसा तूं रक्षीं आतां कर्ण ॥ दुष्टवचन बोलों नको ॥११९॥
असो सूर्यासी नमूनि ते अवसरीं ॥ रथावरी चढला भास्की ॥ माद्रीबंधु झडकरी ॥ धुरेसी सारथी जाहला ॥१२०॥
इंद्राचे रथीं मातली सतेज ॥ कीं मित्र रथीं सुपर्णा ग्रज ॥ तैसा रथ चालवी मद्रराज ॥ जेवीं जहाज समुद्रीं ॥१२१॥
शंभुसारथी स्वयंभू जाण ॥ तैसा चातुर्यें चालवी स्यंदन ॥ उदया चला वरी सहस्त्र किरण ॥ तैसा कर्ण रथीं तो दिसे ॥१२२॥
धनुष्य टणत्कारिलें तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघुकिंकिणी ॥ तो वाद्यनादें धरणी ॥ डळमळूं लागली तेधवां ॥१२३॥
कर्ण म्हणे प्रेरीं स्यंदन ॥ आजि अर्जुनासी मी मारीन ॥ शल्य म्हणे बोलसी वचन ॥ तितुकें निष्फळ सर्वही ॥१२४॥
पार्थ आणि वृकोदर ॥ इंहीं पराक्रम केला थोर ॥ तो मनांत आठवीं वारंवार ॥ वृथा वचन बोलूं नको ॥१२५॥
एकें सुखी केला पावक ॥ एकें मारिले शत कीचक ॥ गोग्रहणीं वस्त्रें हरी सुभद्रा नायक ॥ भीमें बक मर्दिला ॥१२६॥
पार्थेंनिवात कवच मारिले रणीं ॥ भीमें हिडिंब किर्मीर टाकिले मर्दूनी ॥ त्यांसी तूं जिंकीन म्हणसी रणीं ॥ व्यर्थ वल्गना तुझी हे ॥१२७॥
जों न देखसी वानर ध्वज ॥ भीमें जों आपटिले नाहीं गज ॥ तोंवरीच तुझें तेज ॥ शब्द बळ जाण पां ॥१२८॥
कर्ण म्हणे व्यर्थ काय बोलोन ॥ आतां दावितों करणी करून ॥ अकाळीं मेघ करी गर्जन ॥ तैसें भाषण कासया ॥१२९॥
वाद्य गजरें कौरव भार ॥ उभे कर्णाचे पाठीशीं सादर ॥ जैसे यजमाना भोंवते आश्रित विप्र ॥ मिळती भाग्य देखूनि ॥१३०॥
तों जाहला अपशकुन ॥ घोडे पडले अडखळोन ॥ गृध्रीं शिरें आणोन ॥ रथा पुढें टाकिलीं ॥१३१॥
तों धूमकेतु शिखाकेत ॥ गगनीं उदेले अद्भुत ॥ ते अपशकुन न गणी सूर्य सुत ॥ वीर श्रीमदें करू नियां ॥१३२॥
कर्ण बोले पुरुषार्थ ॥ आजि रणीं मारीन पार्थ ॥ कीं भीष्म द्रोण गेले तो पंथ ॥ मीही जाईन लक्षोनि ॥१३३॥
शल्य म्हणे मनोरथ ॥ जैसे दरिद्रियाचे सर्व व्यर्थ ॥ तैसें तूं चिंतिसी मनांत ॥ तें सिद्धी न पावे तत्त्वतां ॥१३४॥
तडाग आणि सागर ॥ कीं रंक आणि देवेंद्र ॥ झोटिंग आणि उमावर ॥ समान कैसे होती पां ॥१३५॥
तरणि आणि उडुगण ॥ अलिका आणि सहस्त्र वदन ॥ परिस आणि पाषाण ॥ कैसे समान होती पां ॥१३६॥
खद्योत आणि चंद्र ॥ राक्षस आणि राम चंद्र ॥ कंस आणि कमला वर ॥ कैसे समान होती पां ॥१३७॥
वेदांती आणि चार्वाक ॥ मीमांसक आणि कौलिक ॥ काग आणि खग नायक ॥ कैसे समान होती पां ॥१३८॥
तैसा राधेय आणि धनंजय ॥ युद्धीं कैसा समान होय ॥ तुझा परा क्रम कथिला जाय ॥ कौरव भोंवते मिळवूनि ॥१३९॥
द्रौपदीस नेतां जयद्र्थें ॥ पांच पाट काढिले पार्थें ॥ कौरव गंधर्वीं नेतां ऊर्ध्वपंथें ॥ पार्थें पुरुषार्थें सोडविले ॥१४०॥
कौरव बांधितां आकर्षोन ॥ तूं पळा लासी घेतलें रान ॥ आतां म्हणसी जिंकीन अर्जुन ॥ व्यर्थ वल्गना हे तुझी ॥१४१॥
ऐसें माद्रीचा सहोदर ॥ बोलतां संतप्त सूर्य कुमार ॥ परी न बोले निष्ठुर उत्तर ॥ कार्यवर द्दष्टि देऊ नियां ॥१४२॥
कर्ण म्हणे जो कोणी ॥ अर्जुन मज दाखवील रणीं ॥ त्यासी शतग्राम देऊनि ये क्षणीं ॥ गौरवीन अधिक मानें ॥१४३॥
हस्ती भरोनि सुवर्ण ॥ पांच शतें तुरंग देईन ॥ कोणी मज दाखवा रे अर्जुन ॥ घेईन प्राण तयाचा ॥१४४॥
शल्य म्हणे इतुकें देसी ॥ अपात्रीं कां दान करिसी ॥ तेंचि देईं ब्राह्मणांसी ॥ पार्थ देखसी त्वरित तूं ॥१४५॥
तूं बोलसी जीं जीं वचनें ॥ तीं वंध्यावल्लीचीं सुमनें ॥ आंत खोटें असोनि नाणें ॥ वरी सुवर्णें झांकिलें ॥१४६॥
जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतलपण ॥ कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥१४७॥
कीं पारध्याचें गायन ॥ कीं दांभिकाचें वरिवरी भजन ॥ कीं धनलुब्धकाचें तत्त्वज्ञान ॥ परधनाचे हरणार्थ ॥१४८॥
वरिवरी सुंदर वृंदावन ॥ कीं बकाची शांति गहन ॥ कीं वेश्येचें मुख मंडन ॥ कामिक मनोहरणार्थ ॥१४९॥
साधुवेष घेऊनि शुद्ध ॥ यात्रेसी आले जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे निर्जनीं सिद्ध ॥ होऊ नियां बैसले ॥१५०॥
कोल्हाटियाचें शूरत्व जाण ॥ अजाकंठीं जैसे स्तन ॥ कीं विगत धवेचें नवयौवन ॥ किंवा ज्ञान दांभिकाचें ॥१५१॥
कीं जन्मांधाचे विशाल नेत्र ॥ कीं मद्यपियाचें अपवित्र पात्र ॥ अदात्याचें उंच मंदिर ॥ व्यर्थ काय जाळावें ॥१५२॥
कीं जाराचा व्यर्थ आचार ॥ कीं मूर्खाचें पांडित्य थोर ॥ तैसे तुझे बोल समग्र ॥ व्यर्थ वल्गना सर्वही ॥१५३॥
जैसा बाळ मागे शशी ॥ परी तो कैसा येईल हातासी ॥ जेवीं शशक भावी मानसीं ॥ क्षणें सिंहासी जिंकीन ॥१५४॥
कर्ण म्हणे तूं आमुचा मित्र ॥ शब्द शस्त्रें कां छेदिसी गात्र ॥ माझा पराक्रम विचित्र ॥ रणीं आतां देखसी तूं ॥१५५॥
मज पाशीं निर्वाण शर ॥ एक आहे जैसा सतेज मित्र ॥ किरिष्टी अथवा यादवेंद्र ॥ घेईल प्राण एकाचा ॥१५६॥
कृष्णा र्जुनांचा घेईन प्राण ॥ मग शल्या तुझाही वध करीन ॥ तूं पाप देशीं जाह लासी निर्माण ॥ तेथींचे गुण तुझे हे ॥१५७॥
ज्या देशींच्या नितं बिनी ॥ महापापिष्ठा व्य़भिचारिणी ॥ पाहात असतां भ्रतार नयनीं ॥ जार कर्म करिती ज्या ॥१५८॥
मद्यपानी पिशिता शन ॥ शौच हीन क्रिया हीन ॥ जेथींच्या स्त्रिया मत्त होऊन ॥ पुरुषा लागीं झोंबती ॥१५९॥
त्या देशीं तूं मित्रघ्न ॥ शल्या जाहलासी निर्माण ॥ जेथें वरारोहा भ्रतारा लागून ॥ विष घालून मारिती ॥१६०॥
शल्य म्हणे कर्णास ॥ तूं कौरव बळें माजलास ॥ तुज एक गोष्ट सांगतों मानस ॥ स्वस्थ करोनि ऐकें ते ॥१६१॥
समुद्रतीरीं एक वैश्य थोर ॥ त्याचीं बाळें सुकुमार ॥ नित्य अन्नें भक्षितां परिकर ॥ उच्छिष्ट समग्र टाकिती ॥१६२॥
तों एक काग येऊनि तेथ ॥ उच्छिष्ट भक्षोनि जाहला मस्त ॥ कुमार त्यासी दाटोनि घालीत ॥ कौतुकेंकरोनि सर्वदा ॥१६३॥
मग तो मुलांसी म्हणे वायस ॥ मी जाहलों आतां राज हंस ॥ क्षणें जिंकीन रमेश ॥ वाहना लागीं निर्धारें ॥१६४॥
तों तेथें आले मराळ ॥ तयां प्रति बोलती बाळ ॥ तुम्ही उडाल काय सबळ ॥ आमुच्या कागा बरोबरी ॥१६५॥
गदगदां हांसती राज हंस ॥ तों तेथें पातला वायस ॥ गर्वें न लेखी कोणीस ॥ मग मराळ बोलती ॥१६६॥
आमुचें उड्डाण साचार ॥ त्यांत आहेत शत प्रकार ॥ ते तुज आम्ही न पुसों समग्र ॥ परी समुद्र उडों चला ॥१६७॥
कागें धरिला अभिमान ॥ हंसांसंगें चालिला उडोन ॥ भयें करोनि तो दुर्जन ॥ कासावीस जाहला ॥१६८॥
भ्रमोनि काग अंतराळीं ॥ पडला तेव्हां समुद्र जळीं ॥ मराळ म्हणती ते वेळीं ॥ पावलासी पतन कां ॥१६९॥
काग न सोडी अभिमान ॥ म्हणे खोल पाहतोंख किती जीवन ॥ सवेंचि मत्स्य शोधून ॥ पाहतों मी समुद्र जळीं ॥१७०॥
रत्नें किती आहेत यांत ॥ आतां घेतों तोही अंत ॥ पाणी गोड कीं क्षार अत्यंत ॥ चाखो नियां पाहतों ॥१७१॥
सवेंचि म्हणे करितों स्नान ॥ येतों गग मंडल उडोन ॥ तों कासा वीस जाहले पंच प्राण ॥ भोंवंडी नयन मूर्च्छेनें ॥१७२॥
मग म्हणे हंसां लागोन ॥ मज द्या आतां जीव दान ॥ मग हंसीं पृष्ठावरी घेऊन ॥ पूर्व स्थळीं ठेविला ॥१७३॥
तैसाचि तूं कर्णा साचार ॥ तरेन म्हणसी सेना सागर ॥ गोग्रहणीं एकला पार्थ वीर ॥ न धरवेचि धीर तुमचेनें ॥१७४॥
कागें वांचविला आपुला प्राण ॥ तैसाचि तूं पार्थासी जाईं शरण ॥ व्यर्थ धरू नियां अभिमान ॥ यमसदना कां जासी ॥१७५॥
कर्ण म्हणे मी बलक्षीण ॥ कित्येक गोष्टींनीं जाहलों जाहलों जाण ॥ वासवी गेली वेंचून ॥ कवचकुंडलें शक्रें नेलीं ॥१७६॥
इंद्रें केलें बलक्षीण ॥ चहूंकडूनि पडिलें न्य़ून ॥ शेवटीं विद्या होईल क्षीण ॥ गुरु भार्गवें शापिलें ॥१७७॥
मृगयेसी गेलों वनाप्रती ॥ तेथें एक ऋषीची गाय होती ॥ म्यां न कळत अवचितीं ॥ बाण टाकोनि मारिली ॥१७८॥
त्या ऋषीनें येऊनि त्वरें ॥ मज ताडिलें शापशस्त्रें ॥ म्यां त्याचे पाय धरोनि आदरें ॥ बहुत पकारें प्रार्थिला ॥१७९॥
देत होतों सहस्त्र गोदानें ॥ शतहस्ती भरोनि सोनें ॥ परी न घेतलें ब्राह्मणानें ॥ दिला दारुण शाप मज ॥१८०॥
कीं प्राणांत समयीं रणीं ॥ रथचक्रें गिळील धरणी ॥ परम संकटीं पडोनी ॥ टाकशील देहातें ॥१८१॥
माझा शाप अन्याथा ॥ हरिहरांसी नव्हे तत्त्वतां ॥ ते मज वरी पडली गोहत्या ॥ मग प्रायश्चित्त घेतलें ॥१८२॥
इतुक्या प्रकारें जाहलों क्षीण ॥ तरी झुंजेन मी रणीं निर्वाण ॥ शल्या तूं मज लागोन ॥ भेडसावूं नको सर्वथा ॥१८३॥
म्यां तुझें सोशिलें बहुत ॥ आतां उगाचि चालवीं रथ ॥ सर्वांसी अजिंक्य सांगसी पार्थ ॥ परी कर्णा पुढें न चाले तें ॥१८४॥
सर्वासी जिंकी मीन केतन ॥ परी शिवा पुढें जाहला क्षीण ॥ काननें जाळी बहु कृशान ॥ परी बलक्षीण मेघा पुढें ॥१८५॥
सर्वांत श्रेष्ठ जरी वारण ॥ परी पंचा नाना पुढें सोडी प्राण ॥ समुद्र गर्वें करी गर्जन ॥ परी क्षीण अगस्त्या पुढें ॥१८६॥
वज्र धाकुटें परी फोडी पर्वत ॥ सूर्य लहान परी पृथ्वी प्रकाशीत ॥ बळीचें बलदर्प सामर्थ्य ॥ वामनें क्षणांत क्षीन केलें ॥१८७॥
तैसें अर्जुनाचें सामर्थ्य ॥ मज पुढें न चाले यथार्थ ॥ शल्या प्रबुद्ध जाहलासी बहुत ॥ परी शत मूर्ख अत्यंत तूं ॥१८८॥
तूं व्यर्थ प्रबुद्ध होऊन ॥ बुद्धिहीन बाल कास मान ॥ कोणासी काय बोलावें वचन ॥ हें तुज न कळे शत मूर्खा ॥१८९॥
ज्यासी शब्दोपशब्दीं नाहीं ज्ञान ॥ तोचि बाळ परम ॥ अज्ञान ॥ मज वाटे तूं वांचून ॥ भूमिभार ॥ जाहलासी ॥१९०॥
तुझें म्यां सोशिलें बहुत ॥ आतां चालवीं उगाचि रथ ॥ तों तिकडे सेनापति द्रुपद सुत ॥ तेणें व्य़ूह ॥ रचियेला ॥१९१॥
कौरवीं व्यूह रचिला ते वेळीं ॥ वाद्यें वाजती उभय दळीं ॥ मग कर्णें हांक दिधली ॥ पाचारिलें कृष्णार्जुनां ॥१९२॥
माध्यान्हीं मधुमासीं चंडकिरण ॥ तैसा रथीं देदीप्यमान कर्ण ॥ तें धर्म राज विलोकून ॥ इंदिरावरा प्रति बोलत ॥१९३॥
सत्यप्रतिज्ञा कृत द्दढा ॥ वेद शास्त्रां परम गूढा ॥ द्वारकापुरसुहाडा ॥ विजय आपुला सांभाळीं ॥१९४॥
आजि वीर श्रीचा कल्लोळ ॥ रण माजेल तुंबळ ॥ कर्णाचा उत्कर्ष प्रबळ ॥ ब्रह्मांडा माजी न समाये ॥१९५॥
इकडे शल्य म्हणे रे कर्णा ॥ तूं पुसत होतासी अर्जुना ॥ पाहें उघडोनि नयनां ॥ कृतांता ऐसा येतसे ॥१९६॥
जैसा प्रलय कालींचा ज्वाला माली ॥ तैसा रथीं जाज्वल्य वन माळी ॥ जो इच्छामात्रें जाळी ॥ ब्रह्मांडरचना क्षणांत ॥१९७॥
पाहें रे तो श्वेतवाहन ॥ घेऊं इच्छितो तुझा प्राण ॥ तुज जाहलें अप शकुन ॥ जीवासी नाशक होत जे ॥१९८॥
जैसें कालकूट उसळलें ॥ तैसें पांडव दळ उचंबळलें ॥ हे सकल रायांचे ध्वज रेखिले ॥ तडित्प्राय पालवती ॥१९९॥
ज्याचिया रथावरी हरिहर ॥ गांडीव चाप अक्षय्य तूणीर ॥ कर्णा तुझेनें न धरवे धीर ॥ हें मज पूर्ण समजलें ॥२००॥
ऐसी कर्णाच्ची तेजो हानी ॥ शल्य करीत क्षणक्षणीं ॥ पूर्णीं धर्में प्रर्थिला म्हणोनी ॥ हिरमोड करीतसे ॥२०१॥
पांड्व कौरव सेना ॥ याचि दोन्ही गंगाय मुना ॥ प्रवाह गुप्त न दिसे कोणा ॥ सर स्वती तिजी तेचि पैं ॥२०२॥
हा वीरांतक प्रयाग निश्चितीं ॥ एथें रण शूरज्ञानी मुक्त होती ॥ पुढें प्रयाग माधव रथीं ॥ धनंजयाचें वाहातसे ॥२०३॥
अद्भुत माजेल वीररस ॥ युद्ध होईल कर्णार्जुनांस ॥ जें ऐकतां महत्पापास ॥ संहार होय तत्काळ ॥२०४॥
धन्य धन्य पांडववीर ॥ ज्यांचा सारथी इंदिरावर ॥ तो हा कटीं ठेवूनि कर ॥ पंढरीस उभा असे ॥२०५॥
पांडवपालका पंढरीशा ॥ श्रीमद्भी मातीर विलासा ॥ ब्रह्मा नंदा अविनाशा ॥ श्रीधर वरदा अभंगा ॥२०६॥
प्राकृत भाषा हे साचार ॥ परी अर्थ संग्रह भांडार ॥ ब्रह्या नंदें श्रीधर ॥ निरभिमानें पाहात ॥२०७॥
दुजियाची कविता देखतां ॥ द्वेष उपजे ज्या चिया चित्त ॥ तो शत मूर्ख जाणिजे तत्त्वतां ॥ नव्हे पंडित विवेकी तो ॥२०८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्णपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्तेचाळिसा व्यांत कथियेला ॥२०९॥
इति श्री श्रीधरकृत पांडवप्रतापे कर्णपर्वणि कर्णशल्य संवादे युद्धारंभकथनं नाम सप्तचत्वारिंशाध्यायः ॥४७॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP