मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४६ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४६ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४६ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ रणीं पडला जय द्रथ ॥ पांडवदळ आनंद भरित ॥ संजया प्रति अंबिकासुत ॥ पुसता जाहला तेधवां ॥१॥संजया मज सांगें निश्चिय ॥ कोणी कडे ये संपूर्व जय ॥ माझ्या पुत्रांचें कैसें होय ॥ चिंता बहुत मज लगीं ॥२॥येरू म्हणे ऐकें साचार ॥ ब्राह्मण तेथें आचार ॥ पंडित तेथें विचार ॥ सर्व दाही वसतसे ॥३॥मित्र तेथें प्रकाश ॥ सुख तेथें उल्हास ॥ गुरु तेथें सद्विद्या विशेष ॥ मान जैसा वसतसे ॥४॥भक्ति तेथें प्रेम ॥ औदार्य तेथें धर्म ॥ ज्ञान तेथें निःसीम ॥ शांति सुख वसतसे ॥५॥शांति तेथें दया वसे ॥ दया तेथें क्षमा असे ॥ क्षमा तेथें विलसे ॥ निजबोध सर्वदा ॥६॥बोध तेथें आनंद ॥ आनंद तेथें ब्रह्या नंद ॥ तो ब्रह्मा नंदचि गोविंद ॥ पार्थ रथीं सर्वदा ॥७॥तो पार्थ आणि जगत्पती ॥ ज्याचे दळीं विराजती ॥ तरी जय तिकडेचि नृपती ॥ काय पुससी वेळोवेळां ॥८॥पुढें ऐकें समरवृत्तान्त ॥ युद्धा निघाला शारद्वत ॥ तों तिकडूनि अभिमन्युतात ॥ अत्यावेशें धांवला ॥९॥परस्परें शर मारीत ॥ युद्ध जाहलें अत्यद्भुत ॥ वर्णीं बाण बैसले बहुत ॥ मूर्च्छा येत कृपाचार्या ॥१०॥कृपाचार्य पडला म्हणोनी ॥ चमूमाजी उठला ध्वनी ॥ सारथी रथ काढूनी ॥ नेता जाहला एकीकडे ॥११॥जाहलें युद्ध अत्युद्भुत पूर्ण ॥ धनंजय तेव्हां सद्न्द होऊन ॥ म्हणे जळो हा क्षत्रिय धर्म हीन ॥ काय करूं गोविंदा ॥१२॥जो माता पिता गुरु परम ॥ ज्याची सेवा करावी उत्तम ॥ ज्याच्या पादुका शिरीं धरिजे सप्रेम ॥ त्याशीं युद्ध करणें पडे ॥१३॥निर्वाणास्त्र कपट भावें ॥ गुरूवरी सहसा न टाकावें ॥ कृपाचार्यें कृपाळुवें ॥ सांगितलेंसे पूर्वीं मज ॥१४॥माता क्रोधावली पूर्ण ॥ देत जरी गालि प्रदान ॥ तरी पुत्रासी व्हावें मरण ॥ सहसाही कल्पीना ॥१५॥तैसे शारद्वत आणि द्रोण ॥ मजवरी प्रेरिती जरी बाण ॥ तरी जावा माझा प्राण ॥ सहसा मनीं नसे त्यांचे ॥१६॥जळो हा दुर्यो धन चांडाळ ॥ याच्यापायीं आटलें कुळ ॥ असो ऐसा बीभत्सु व्याकुळ ॥ आचार्यस्नेहेम जाहला ॥१७॥तों रथा रूढ सूर्य नंदन ॥ येत वेगें पवनाहून ॥ श्रीकृष्णासी म्हणे अर्जुन ॥ रथ प्रेरीं कर्णाकडे ॥१८॥तंव तो भक्त काज कैवारी ॥ म्हणे कर्ण जातो सात्यकीवरी ॥ तूं त्यासी युद्धा न पाचारीं ॥ आजिचा दिन तत्त्वतां ॥१९॥त्यापाशीं आहे वासवी शक्ती ॥ ते तुजवरी टाकील अवचितीं ॥ त्या शक्तीचें भय अहोरातीं ॥ माझें चित्तीं वसतसे ॥२०॥त्या शक्तीसी निवारिता पाहीं ॥ ऐसा पुरुष जाहलाचि नाहीं ॥ ते तुजवरी घालीन लवलाहीं ॥ हें उत्कंठा सदा कर्णाची ॥२१॥तरी ते शक्ति आजि रात्रीं ॥ टाकील एका महावीरावरी ॥ मग तूं त्याशीं युद्ध करीं ॥ निर्भय समरीं मनेच्छें ॥२२॥इकडे सात्यकीशीं भास्करी ॥ युद्ध करीत घटिका चारी ॥ परस्परीं तीक्ष्ण शरीं ॥ खिळिलीं अंगें उभयांचीं ॥२३॥आदित्यात्मजें सोडूनि बाण ॥ छेदिला सात्यकीचा स्यंदन ॥ सारथी तुरंग मारून ॥ विरथ केला तेधवां ॥२४॥ऐसें देखोनि जग दीश्वर ॥ दरुका सहित आपुला रहंवर ॥ ध्वजीं ज्याचिया खगवर ॥ सात्यकी प्रति देतसे ॥२५॥सात्यकी बैसूनि तये रथीं ॥ युद्ध करितां सर्व पाहती ॥ कर्णाचा रथ आणि सारथी ॥ समरांगणीं चूर्ण केले ॥२६॥यावरी तो भास्करी ॥ आणिके रथीं आरोहण करी ॥ बाण जाळ ते अवसरीं ॥ सात्यकीवरी घालीत ॥२७॥मित्र पुत्र महारथी ॥ सात्यकी खिळिला शरपंथीं ॥ तों युधामन्यु द्रुपदनृपती ॥ उत्तमौजा धांवला ॥२८॥शर सोडीत अपार ॥ सर्वांगीं खिळिला रवि पुत्र ॥ दिसे जैसा मयूर ॥ पिच्छें पसरी स्वइच्छें ॥२९॥द्रुपदें छेदूनि रथ ॥ राधेय केला समरीं विरथ ॥ उणें देखोणि कौरव समस्त ॥ एकदांचि धांवले ॥३०॥परम बाल मित्र कर्ण ॥ दुर्यो धनासी आवडे प्राणांहून ॥ यालागीं त्वरें हात देऊन ॥ आपुले रथीं बैसविला ॥३१॥सात्यकी महाराज यादववीर ॥ कौरव बाणीं केले जर्जर ॥ दारुकें फेरिला रहंवर ॥ कुलालचक्रसारिखा ॥३२॥प्रज्ञाचक्षुसी संजय बोलत ॥ भीमें तुझें एकतीस सुत ॥ मारिले जाण आजिपर्यंत ॥ पुढेंही अनर्थ ॥ दिसतसे ॥३३॥सात्यकीनें महावीर ॥ समरांगणीं मारिले अपार ॥ भीमासी म्हणे अर्कपुत्र ॥ बालयुद्ध काय करिसी ॥३४॥अस्त्र विद्या आतां कांहीं ॥ तुजपाशीं रे दिसत नाहीं ॥ अर्जुन म्हणे ते समयीं ॥ सूत पूत्रा ऐकें तूं ॥३५॥सात्यकीनें तुज केलें विरथ ॥ तूं म्हण विसी रणपंडित ॥ गर्व धरिला आहेसी बहुत ॥ परी तुज मी सत्य मारीन ॥३६॥तूं आपुले भोग ॥ येईं सकल मित्रांसी पुसोन ॥ मागें कांहीं इच्छा ठेवून ॥ आतां येऊं नको रे ॥३७॥तुज मी रणीं मारीन सत्य ॥ म्हणोनि गांडीवा घाली हात ॥ कर्ण म्हणे बोलसी बहुत ॥ गर्व अंगीं धरू नियां ॥३८॥काय बोलोनि बहुत वाणी ॥ रणी ॥ रणीं करूनि दाख वीन करणी ॥ चिंतार्णवीं कौरव वाहिनी ॥ पडली तेव्हां जाण पां ॥३९॥म्हणती पडले वीर सकळ ॥ उरले ते दिसती निर्बळ ॥ रोगिष्ठा ऐसें विकळ ॥ दळ सकळ दिसतसे ॥४०॥दुर्यो धन बोले संतप्त ॥ इतुके असतां रणपंडित ॥ रक्षिला नाहीं जय द्रथ ॥ केला घात शत्रूंनीं ॥४१॥परम संतप्त कौरवेश्वर ॥ जैसा कपाळ शूळें तळमळे व्याघ्र ॥ कीं उदर शूळीं पादोदर ॥ आरंबळत जैसा कां ॥४२॥वणव्यांत आहाळला अजगर ॥ कीं महाकूपीं पडिला मृगेंद्र ॥ तैसा दुःखी दुर्यो धन सत्वर ॥ द्रोणा प्रति बोलतसे ॥४३॥पहा कैसें कर्म प्रबळ ॥ सात अक्षौहिणी आटिलें दळ ॥ एकतीस बंधू सबळ ॥ मृत्यु नगरा बोळविले ॥४४॥अहो यावरी गुरु वर्या ॥ पृथ्वी ठाव नेदी मज लपावया ॥ तरी मी आतां युद्ध करू नियां ॥ मारीन किंवा मरेन ॥४५॥तुझी कृपा पार्था वरी फार ॥ वरिवरी युद्ध करिसी समोर ॥ जैसा कमळीं बैसे भ्रमर ॥ परी केसर तुटों नेदी ॥४६॥तरी तूं गुरु आम्हांसी ॥ मृत्यु रूप वाटतोसी ॥ द्रोण म्हणे कां विंधितोसी ॥ वाग्बाणें व्यर्थ तूं ॥४७॥पार्थाशीं भिडे समरांगणीं ॥ ऐसी कोण प्रसवली जननी ॥ कपटद्यूत खेळोनी ॥ तुम्हीं त्यांसी जिंकिलें ॥४८॥ते सत्यधर्में निश्चितीं ॥ समरीं तुम्हांसी जिंकिती ॥ सभेसी तुम्ही आणूनि द्रौपदी सती ॥ गांजिली कैसी अधर्में ॥४९॥तीस साह्य जगन्निवास ॥ वस्त्रें पुरविलीं आसमास ॥ पांडव धाडिले वनवासास ॥ बहुत श्रेष्ठीं वर्जितां ॥५०॥द्रौपदीचें समाधान ॥ करितां बोलिला जगन्मोहन ॥ कीं कौरव मिळोनि जाण ॥ गांजिली पूर्ण देवकीच ॥५१॥त्याचें फळ हेंचि जाण ॥ पांडवांसी साह्य होऊन ॥ कौरव कुल संहारीन ॥ प्रतिज्ञा केली श्रीधरें ॥५२॥पार्थ तो केवळ वासव ॥ साह्य हे माधव उमाधव ॥ त्याशीं समरांगणीं धरी हाव ॥ ऐसा पुरुष कोण आहे ॥५३॥भगवद्भक्तांशीं करिती द्वेष ॥ त्यांसी निर्दाळी ह्रषीकेश ॥ तुज आम्हीं शिकविलें बहुवस ॥ नाय कसी सर्वथा ॥५४॥तुझ्या दोषे करून ॥ आम्ही समस्त गेलों बुडोन ॥ शिष्याचें पाप दारुण ॥ मस्तकीं बैसे गुरूच्या ॥५५॥मैत्रेय़ विदुर व्यास ऋषी ॥ इंहीं तुज शिकविलें बहुवसीं ॥ परी तूं मतिमंदा नायकिलेंसी ॥ आतां रडतोसी कासया ॥५६॥तरी आतां प्रतिज्ञा हेच ॥ आंगींचें मी न काढीं कवच ॥ सर्वांसी जिंकीन एक मीच ॥ किंवा परंधाम पावेन पैं ॥५७॥यावरी तो कौरव नायक ॥ करी कर्णा जवळी परम शोक ॥ म्हणे गुरूचें मन अधिक ॥ पार्था कडे असे पां ॥५८॥व्यूहद्वारीं वाट देऊन ॥ येणेंचि प्रेरिला अर्जुन ॥ येणेंचि जय द्र्थ राहवून ॥ घेतला प्राण तयाचा ॥५९॥कर्ण म्हणे निर्धारीं ॥ गुरु निंदा तूं सहसा न करीं ॥ धनंजय नाटोपे समरीं ॥ इंद्रादिकां सहसाही ॥६०॥ज्याच्या रथावरी हरिहर ॥ विजय चाप विजय तूणीर ॥ समरीं विजय रहंवर ॥ न ढळे अणुमात्र माघारा ॥६१॥गुरु निंदा करितां पाहें ॥ तत्काल होय कुलक्षय ॥ तूं आचार्याचें ह्रदय ॥ दुःखी सहसा करूं नको ॥६२॥स्वकर्मचि मुख्य प्रधान ॥ आमुचें रुद्राक्षौहिणी द्ळ दारुण ॥ त्यांची ऋषि अक्षौहिणी चमू संपूर्ण ॥ परी जय जाण त्यांज कडे ॥६३॥आम्ही तुझ्या स्नेहें करून ॥ समरांगणीं वेंचूं प्राण ॥ परी जिकडे आहे रुक्मिणी जीवन ॥ शेवटीं जय तिकडेचि ॥६४॥असो यावरी रणतूयाची घाई ॥ दोन्ही दळीं गाजतसे ते समयीं ॥ दुर्यो धन ॥ लवलाहीं ॥ रथा रूढ जाहला ॥६५॥अपार सोडिले बाण ॥ द्विरद विध्वंसी कमल वन ॥ तैसें पांडवद्ळ संपूर्ण ॥ विध्वंसिलें दुर्यो धनें ॥६६॥तीक्ष्ण वर्षें बाण जाळ ॥ पुत्रा सहित पळविला पांचाळ ॥ कुंतीचा तृतीय पुत्र सबळ ॥ शतबाणीं विंधिला ॥६७॥सत्तर बाणीं सबळा ॥ विंधिला सहदेव नकुळ ॥ धर्मा वरीही तेजाळ ॥ ऐशीं बाण घातले ॥६८॥नव्वद बाणें करून ॥ सात्यकीस विंधी सुयोधन ॥ विराटावरी क्रोधें करून ॥ पन्नास बाण घातले ॥६९॥द्रुपद धृष्टद्युम्न ते वेळे ॥ साठ बाणीं खिळियेले ॥ अवघें दळ जर्जर केलें ॥ दुर्यो धनें तेधवां ॥७०॥कर्णपिता अस्ताचलीं ॥ मावळतां रजनी प्रवर्तली ॥ युद्धाची झडी लागली ॥ अधिकाधिक तेधवां ॥७१॥वायु संगें चेतला कृशान ॥ तैसा खवळला भीमसेन ॥ बहु सोडूनि मार्गण ॥ कौरव सैन्य खिळियेलें ॥७२॥दुर्यो धनाचे बंधु तिघे जण ॥ दीर्घ बाहु दुर्मद दुष्कर्ण ॥ त्यांचीं शिरं बाणें करून ॥ भीमसेनें उडविलीं ॥७३॥भीमावरी एक शक्ती ॥ कर्णें प्रेरिली शीघ्रगतीं ॥ येतां देखोनि हस्तीं ॥ भीमें धरिली पराक्रमें ॥७४॥मग ती तेणें स्वबळें करूनी ॥ कर्णावरी दिधली झोंकूनी ॥ ते शकुनीवरी जाऊनी ॥ पडावी जों अकस्मात ॥७५॥तों कर्णें शर सोडूनि निवाडें ॥ शक्ति पाडिली एकीकडे ॥ यावरी चपला अकस्मात पडे ॥ तैसा आचार्य धांवला ॥७६॥सात्यकी सोडी सायक ॥ परी तो द्रोण प्रतापपार्क ॥ तूळराशीस जाळी पावक ॥ तैसें सैन्य संहारीत ॥७७॥तेव्हां शिरांच्या लाखोल्या ॥ गुरुनें भूलिंगासी समर्पिल्या ॥ एकचि आकांत वर्तला ॥ पांडवदळीं तेधवां ॥७८॥तों समसप्तकांसी परा भवून ॥ अकस्मात आला अर्जुन ॥ जैसा संकटीं धांवे भगवान ॥ भक्तांलागीं एका एकीं ॥७९॥जैसा प्रभं जन जल दजाळ ॥ पुरुषार्थें विदारी तत्काळ ॥ तैसें कौरवांचें दळ कौरवांचें दळ ॥ केलें विकळ शरपंथें ॥८०॥प्रकटला केवळ कृतान्त ॥ तैसा पुढें आला वृकोदरसुत ॥ अष्टचक्र जयाचा रथ ॥ किंवा पर्वत दुसरा पैं ॥८१॥जो घटोत्कच भयानक वदन ॥ आरक्तध्वज गृध्रचिन्ह ॥ त्याची गर्जना ऐकून ॥ कौरव दळ दचकलें ॥८२॥एक म्हणती आला काळ ॥ ग्रासील हा अवघें दळ ॥ सवें राक्षससेन प्रबळ ॥ भयानक न लक्षवे ॥८३॥घटोत्कच सोडी जे शर ॥ ते चपले समान ॥ अनिवार ॥ वल्मीकांत संचरती विखार ॥ वीरां अंगीं तेवीं रुतती ॥८४॥ऐसें देखोनि अद्भुत ॥ त्यावरी धांवला गुरु सुत ॥ तीक्ष्ण सायक एक शत ॥ घटोत्कचावरी टाकिले ॥८५॥कुंजरावरी सुमन भार ॥ तैसे न गणी तो तीक्ष्ण शर ॥ मग हे गुरु पुत्रा धरीं धीर ॥ म्हणोनि हांक फोडिली ॥८६॥कालदंडवत सत्तर बाणीं ॥ भीमात्मजें खिळिला द्रौणी ॥ तों घटोत्कच पुत्र ते क्षणीं ॥ अंजन पर्वा धांवला ॥८७॥चक्रें सोडी अनिवार ॥ निवटीत कौरवांचे भार ॥ मिळोनि सर्व कौरव वीर ॥ वर्षत शर सूटले ॥८८॥दुर्यो धन कर्ण द्रौणी ॥ शरीं राक्षस खिळिले ते क्षणीं ॥ असुर वर्षत वृक्षणाषाणीं ॥ कौरव बाणीं उडविती ॥८९॥कर्णें अद्भुत सोडोनि शर ॥ छेदिलें अंजनपर्व्याचें शिर ॥ कौरव दळीं आनंद थोर ॥ कीं महावीर पडियेला ॥९०॥ देखोनि पुत्राचें मरण ॥ घटोत्कच खवळला दारुण ॥ पर्वत वृक्ष उपटून ॥ अरिसेनेवरी वर्षतसे ॥९१॥साठ सहस्त्र दळ घेऊनी ॥ पांडवांवरी धांवली शकुनी ॥ दोन्ही दळें मिसळलीं ते क्षणीं ॥ झोड धरणी होतसे ॥९२॥होत युद्धाचें घन चक्र ॥ गुरु सुतें प्रेरिलें अग्न्यस्त्र ॥ असुर जाळिले अपार ॥ प्रलय थोर वर्तला ॥९३॥अनिवार ते रजनीचर ॥ वर्षती शिळा आणि तरुवर ॥ घटोत्कचें शक्ति तीव्र ॥ द्रौणी वरी भिरका विली ॥९४॥ते शक्ती परम अचाट ॥ सबळ घंटा बांधल्या आठ ॥ करीत प्रलयबो भाट ॥ अश्वत्थाम्यावरी आली ॥९५॥परमपराक्रमी वीर द्रौणी ॥ शक्री धरिली करें करूनी ॥ घटोत्कचावरी परतोनी ॥ टाकिली तेव्हां अतिबळें ॥९६॥घटोत्कचाचा महारथ ॥ शक्तीनें जाळिला क्षणांत ॥ मग आणिके रथीं भीमसुत ॥ आरूढत सवेंचि ॥९७॥परमपुरुषार्थी गुरु पुत्र ॥ द्वयदळीं वर्णिती चरित्र ॥ रथ जाळूनि शक्ती अनिवार ॥ पृथ्वी गर्भीं प्रवेशली ॥९८॥सुरथ आणि शत्रुं जय ॥ द्रुपदाचे पुत्र पाहें ॥ गुरु पुत्रा पुढें येऊनि लवलाहें ॥ युद्ध करिती अपार ॥९९॥गुरु पुत्रानें दोन बाणीं ॥ दोघांचीं शिरें उडविलीं गगनीं ॥ कुंति भोजाचे दश पुत्र रणीं ॥ प्रेतें करूनि टाकिले ॥१००॥ भूरिश्रवपिता अद्भुत ॥ नाम जयाचें सोमदत्त ॥ तो महावीर रणपंडित ॥ मारी बहु पांचाळसेना ॥१०१॥तों सात्यकीनें समरांगणीं ॥ त्याचें शिर उडविलें गगनीं ॥ भीमें चौघे पुत्र रणीं ॥ शकुनीचे संहारिले ॥१०२॥तों बाल्हीकें निजशरें करून ॥ रणीं खिळिला भीम सेन ॥ जैसा मयूर वेष्टित पिच्छें करून ॥ तैसा भीम शोभतसे ॥१०३॥भीमें गदा भोंवंडूनी ॥ बाल्हीक मारिला समरांगणीं ॥ दुर्यो धनाचें बंधु ते क्षणीं ॥ दहा जण वधियेले ॥१०४॥त्यावरी घालूनि गदा घात ॥ मारिले कर्णाचे चौघे सुत ॥ देशोदेशींचे राजे बहुत ॥ धर्म राजें आटिले ॥१०५॥परम पुरुषार्थीं युधिष्ठिर ॥ मारीत उठिला अनिवार ॥ सहस्त्रांचे सहस्त्र वीर ॥ शत्रु आटिले रणांगणीं ॥१०६॥धर्माचा पराक्रम देखोन ॥ आचार्य धांवला वर्षत बाण ॥ दहा सहस्त्र बाण सोडून ॥ धर्म भेदिला ह्रदया वरी ॥१०७॥साठ बाणीं द्रोण समरीं ॥ धर्में खिळिला ते अवसरीं ॥ धर्माचा रथ सारथी झडकरी ॥ चूर्ण केला आचार्यें ॥१०८॥तीस बाणीं तत्काळ ॥ धर्म रणीं केला विकळ ॥ नकुल रथीं वाहूनि तत्काळ ॥ नेता जाहला तेधवां ॥१०९॥दुर्यो धन म्हणे कर्णवीरा ॥ रणपंडिता समर धीरा ॥ माझे नमोरथ चतुरा ॥ करिसील पूर्ण केव्हां तूं ॥११०॥अर्कज म्हणे ऐकें नृपती ॥ आतां सोडीन वासवी शक्ती ॥ रणांगणीं सुभद्रापती ॥ पहुडवीन निश्चियें ॥१११॥मग बोले शारद्वत ॥ वल्गना कां करिसी व्यर्थ ॥ जों देखिला नाहीं वीर पार्थ ॥ कपिवर ध्वज श्रेष्ठ तो ॥११२॥निवात कवच योद्धा अभिनव ॥ त्याचा पार्थें पुशिला ठाव ॥ व्योमकेश आणि वासव ॥ समरांगणीं तोष विले ॥११३॥गोग्रहणीं तुमची गती ॥ कैसी केली आठवा चित्तीं ॥ स्वाहास्वधेचा जो पती ॥ आरोग्य केला पुरुषार्थें ॥११४॥ऐकतां कोपला वीर कर्ण ॥ शारद्वतासी बोले तीक्ष्ण ॥ मज वाटतें जिव्हा छेदून ॥ तुझी टाकवी बाह्मणी ॥११५॥तूं आणि गुरु द्रोण ॥ पार्थाचे कैवारी केवळ पूर्ण ॥ तों द्रौणी खडग घेऊन ॥ कर्णा वरी धांवला ॥११६॥म्हणे अकालीं मेघ गडगडत ॥ बिंदु न टाकी अवनीं व्यर्थ ॥ तैसी बडबड एथ ॥ मूर्खा तुझी जाण पां ॥११७॥कपिवर ध्वज सिंहा पुढें ॥ तूं जंबुक कायसें बापुढें ॥ आचार्यनिंदा करिसी तोंडें ॥ करीन खंडें तुझीं आतां ॥१८॥गुरु निंदा करिसी जाण ॥ तरी निकट आलें तुज मरण ॥ आतांचि तुझें शिर छेदीन ॥ म्हणोन शस्त्र उचलिलें ॥११९॥शस्त्रें घेऊनि भानु सुत ॥ क्रोधें त्यावरी लोटों पाहात ॥ दुर्यो धन आणि शारद्वत ॥ निवारिती दोघां जणां ॥१२०॥दोघांसी म्हणे दुर्यो धन ॥ काल कैसा पहा विलोकून ॥ रणीं आटले थोर लहान ॥ व्यर्थ भांडण करितां कां ॥१२१॥असो त्यावरी युद्ध मांडलें सबळ ॥ उठले वीर पांचाळ ॥ त्यांवरी सूर्य पुत्र केवळ काळ ॥ संहारीत ऊठिला ॥१२२॥सहस्त्र वीरांचीं शीर्षें ॥ कर्णें छेदिलीं अत्यावेशें ॥ देखतां दुर्यो धन संतोषे ॥ बोले कर्ण धन्य पूर्ण ॥१२३॥कर्णा ऐसा रणपंडित ॥ ऐशासी निंदितो गुरु सुत ॥ असो भानुजें वीर बहुत ॥ समर भूमीं पहुडविले ॥१२४॥कर्णाचा पुरुषार्थ थोर ॥ देखोनि गर्जती कौरव वीर ॥ तें ऐकोनि किरीटी यदुवीर ॥ मनोवेगें धांविन्नले ॥१२५॥कर्णा समोर अकस्मात ॥ उभा केला विजय रथ ॥ पार्थें बाण टाकूनि तीन शत ॥ सूर्य सुत खिळियेला ॥१२६॥चाप आणि बाण भाता ॥ घोडे सारथी आणि रथा ॥ विजय छेदी क्षण न लागतां ॥ धन्य पार्थ वीर म्हणती ॥१२७॥कर्ण विरथ उभा उभा जगतीं ॥ मग गौत मसुतें बैसविला रथीं ॥ वरकड दळ भार पळती ॥ पार्थ भयें करू नियां ॥१२८॥ऐसें देखोनि सुयो धन ॥ म्हणे मी आजि झुंजेन निर्वाण ॥ मग गुरु पुत्र गौतम नंदन ॥ निवारिती दुर्यो धना ॥१२९॥समीप असतां द्ळें अपारें ॥ उडी न घालावी कदा नृपवरें ॥ दुर्यो धन म्हणे निर्धारें ॥ मंद भाग्य सत्य मी ॥१३०॥तुम्ही मंद युद्ध करितां ॥ जरी मनीं धराल तत्त्वतां ॥ तरी निःपांडवी पृथ्वी आतां ॥ क्षण न लागतां कराल ॥१३१॥कृपी पुत्र म्हणे ते अवसरीं ॥ अमुचें युद्ध पाहें यावरी ॥ वीज संचरे उद्यानांतरीं ॥ तैसा वेगें धांविन्नला ॥१३२॥चापमेघा पासून ॥ वर्षत शरांचा दाट घन ॥ पळविलें पांडव सैन्य ॥ दश दिशा ते वेळे ॥१३३॥तें देखोनि धृष्टद्युम्न ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥ म्हणे रे गुरु पुत्रा तूं बाह्मण ॥ परम अधम जाण पां ॥१३४॥सांडूनि याग अनुष्ठान तप ॥ राजहिंसा करितां हें पाप ॥ तूं आणि तुझा बाप ॥ परम अधम निर्धारें ॥१३५॥तूझिया पित याचा प्राण ॥ मीच घेईन सत्यवचन ॥ मग यावरी धृष्टद्युम्न ॥ वर्षें पर्जन्य शरांचा ॥१३६॥पार्थें टाकूनि बाण जाळ ॥ भूभुज पळविले सबळ ॥ किंशुक फुलती सकळ ॥ तैसे वीर दिसती पैं ॥१३७॥रात्रीं युद्ध होत घोरांदर ॥ सुगंध स्नेह परम सुंदर ॥ त्याच्या दीपिका अपार ॥ दोन्ही दळीं पाजळिल्या ॥१३८॥लक्षानुलक्ष चंद्र ज्योती ॥ लावितां उजळली सर्व जगती ॥ कर्पूरदीपिकांची दीप्ती ॥ गगना माजी न समाये ॥१३९॥रथ इभ स्वारां प्रती ॥ पांच पांच दीपिका प्रका शती ॥ सुवर्ण कवचें झळकती ॥ चपले ऐसीं तेजाळ ॥१४०॥अलंकार मुकुटांची प्रभा ॥ तेणें आणिली दश दिशां शोभा ॥ वस्त्रें आणि चापें नभा ॥ उजळिती स्वतेजें ॥१४१॥ध्वज झळकती अपार ॥ रात्रींचें युद्ध घोरांदर ॥ द्रोणाचे पाठीशीं कौरव वीर ॥ लक्षूनि बळ असती पैं ॥१४२॥रथांशीं रथ दाटले ॥ गजांशीं गज संघट्टले ॥ स्वारांशीं स्वार भेटले ॥ हांकें भरलें ब्रह्मांड ॥१४३॥तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचे होती गजर ॥ कृतवर्मा आणि युधिष्ठिर ॥ परमावेशें भिडती पैं ॥१४४॥शारद्वत सुत अर्जुन ॥ द्रोण विराट दोघे जण ॥ माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा आचार्य शोभतसे ॥१४५॥तों भीमें दिधली आरोळी ॥ जेणें कृतांतही कांपे चळीं ॥ गदा घेऊनि महाबळी ॥ गज भारीं संचरला ॥१४६॥सहस्त्रांचे सहस्त्र भद्रजाती ॥ भीमें बळें आपटिले क्षितीं ॥ भिरका वितां गगन पंथीं ॥ वायु चक्रीं पडिले ते ॥१४७॥अद्याप भोंवती नभोमंडलीं ॥ कित्येक पडले समुद्र जलीं ॥ लंकादुर्गीं आदळलीं ॥ गजकलेवरें कित्येक ॥१४८॥चर्या पडती ढांसळोन ॥ आश्चर्य करी बिभीषण ॥ मग कुरुक्षेत्रासी आला धांवोन ॥ भारती युद्ध पहावया ॥१४९॥गजावरी गज घालोन ॥ रणीं मारी भीमसेन ॥ वीरां सहित अश्व उचलून ॥ आपटीत भूमीवरी ॥१५०॥रथावरी घालूनि रथ ॥ शतांचीं शतें चूर्ण करीत ॥ ऐसा प्रलय अद्भुत ॥ भीमें केला कौरव दळीं ॥१५१॥रथा वरूनि सहदेव चपळ ॥ कर्णावरी सोडी शरजाळ ॥ आदित्यात्मजें तत्काळ ॥ रथ सारथी छेदिला ॥१५२॥विरथ होतां माद्री सुत ॥ असिलता घेऊनि धांवत ॥ तीही छेदिली अकस्मात ॥ रवितनुजें तेधवां ॥१५३॥मग धांवे गदा घेऊनी ॥ तेही छेदिली ते क्षणीं ॥ सवेंचि शक्ति घेत बळें करूनी ॥ तेही तोडिली येतयेतां ॥१५४॥मग घेऊनि रथांग सत्वर ॥ तळपतसे माद्री कुमार ॥ राघेयें तें टाकूनि शर ॥ छेदूनि पाडिलें एकी कडे ॥१५५॥मग मृत गज कलेवरें ॥ उचलूनि टाकिलीं माद्री पुत्रें ॥ यावरी कर्ण हास्यवक्रें ॥ सर्वही छेदी क्षणार्धें ॥१५६॥तेव्हां कृपाकौतुकें करून ॥ उदार कर्ण बोले वचन ॥ रणपंडित जे महादारुण ॥ त्यांशीं युद्ध करूं नको ॥१५७॥समवय सम विद्या पाहोन ॥ युद्ध करावें तुवां जाण ॥ जंबुक सिंहावरी जाय चढोन ॥ तैसा मज पुढें येऊं नको ॥१५८॥आतां पळोनि जाईं पार्था आड ॥ न धरीं युद्धाची कदा चाड ॥ माझा कोप गग नाहूनि वाड ॥ त्या वरचढ होऊं नको ॥१५९॥सहदेव नेदी प्रतिवचन ॥ गेला पांचालरथीं बैसोन ॥ इकडे विराट शल्य दोघे जण ॥ महायुद्धासी प्रवर्तले ॥१६०॥विराट बंधु शतानीक वीर ॥ शल्यें त्याचें छेदिलें शिर ॥ त्यावरी मत्स्यरायें अपार ॥ बाण जाळ घातलें ॥१६१॥सहस्त्र बाणीं अचाट ॥ शल्यें खिळिला विराट ॥ सकल चमूचा केला आट ॥ अतिसंकट ओढवलें ॥१६२॥हें देख्नोनि पंडुपुत्र ॥ धांवले शल्यावरी सत्वर ॥ बाणें करूनि जर्जर ॥ पराभविला तेधवां ॥१६३॥यावरी धनुर्वेदपरायण ॥ तो पुढें धांवला गुरु द्रोण ॥ पांडवदळ कंपाय मान ॥ पाहोनि संधान तयाचें ॥१६४॥टाकिला बाण न जाय व्यर्थ ॥ महाझुंजार रणपंडित ॥ हें पाहोनि विराट धांवत ॥ निजदळाशीं तेधवां ॥१६५॥विराटाचे पुत्र जाण ॥ सुबाहु बलबाहु वीरसेन ॥ मणिमंत आणि सुकर्ण ॥ त्याही पुढें धांविन्नले ॥१६६॥विराट माघारां घालून ॥ युद्ध केलें तिंहीं निर्वाण ॥ सर्वांगीं विंधिला द्रोण ॥ अवघे जण पाहती ॥१६७॥द्रोणाचार्य प्रचंड वीर ॥ टाकिले पांच निर्वाण शर ॥ पांचांचीं शिरें सत्वर ॥ आकाश मार्गीं उडविलीं ॥१६८॥ऐसें देखतां विराट नृप ॥ पुढें धांवत नावरे कोप ॥ बाप सोडीत अमूप ॥ भारद्वाज लक्षूनियां ॥१६९॥तुरंग सारथी स्यंदन ॥ विराटें बाणीं केले चूर्ण ॥ सहस्त्र बाणांहीं करून ॥ खिळिला द्रोण सर्वांगीं ॥१७०॥आणिके रथीं द्रोण बैसत ॥ क्षोभला जैसा प्रलयकृतान्त ॥ चपले ऐसे बाण सोडीत ॥ अंगीं भेदत विराटाचे ॥१७१॥चाप सारथी स्यंदन ॥ समरीं आचार्यें केले चूर्ण ॥ मग काढूनि निर्वाण बाण ॥ चापावरी योजिला ॥१७२॥उदया चलावरी जैसा मित्र ॥ तैसा बाण दिसे परम तीव्र ॥ चापा पासूनि सुटतां सत्वर ॥ मोह पावती दोन्ही द्ळें ॥१७३॥विराटाचें कंठनाळ ॥ छेदूनि उडविलें तत्काळ ॥ पांडव दळीं कोल्हाळ ॥ हाहाकार जाहला ॥१७४॥समसप्तकांकडे अर्जुन ॥ युद्ध करीतसे निर्वाण ॥ इकडे चौघे बंधु धांवोन ॥ द्रोणावरी चालिले ॥१७५॥द्रुपदराज सहपरिवारें ॥ लोटला त्याही पुढें ॥ चंद्र ज्योति दीपिका एकसरें ॥ पजळूनि धांवती ॥१७६॥द्रुपद म्हणे द्रोणा लागून ॥ तुवां सांडूनि तपानुष्ठान ॥ दुष्टांसी साह्य होऊन ॥ राजहिंसा करितोसी ॥१७७॥तुज मज पूर्वींचें बैर ॥ परधर्म आचरसी अधर्म विप्र ॥ आजि तुझें छेदीन शिर ॥ समरांगणीं जाण पां ॥१७८॥द्रोण म्हणे रे मशका ॥ ब्रह्मद्वेषिया परमनिंदका ॥ पार्था हातीं कीटका ॥ तुज बांधोनि आणि विलें ॥१७९॥गुरु द्रोही तूं दुष्ट पूर्ण ॥ तुझें न पाहावें कदा वदन ॥ आतां सांभाळीं आले बाण ॥ तुझे प्राण हतें जे ॥१८०॥त्यावरी दहा शरीं ॥ द्रुपद खिळिला ह्र्दया वरी ॥ येरें शत बाण झडकरी ॥ द्रोणावरी सोडिले ॥१८१॥बाण टाकितां परस्परीं ॥ शरमंडप दाटला अंबरीं ॥ अस्त्रें सोडिलीं समरीं ॥ रामरावणां समान ॥१८२॥परस्परें तोडितां स्यंदन ॥ सवेंचि आणविती नूतन ॥ यावरी आचार्यें एक बाण ॥ भार्ग वदत्त काढिला ॥१८३॥जैसी प्रलयींची चपला ॥ तैसा बाण वेगें सुटला ॥ द्रुपदाचा कंठ छेदिला ॥ कमल न्यायें अकस्मात ॥१८४॥पांडवदळीं हाहाकार ॥ कौरवांकडे वाद्यांचा गजर ॥ म्हणती धन्य धन्य आचार्य वीर ॥ केला संहार पांडवांचा ॥१८५॥दाटली शर्वरी तमें घोर ॥ होतसे युद्धाचें घन चक्र ॥ पांडवदळें समग्र ॥ पळतां देखिलीं घटोत्कचें ॥१८६॥मग समस्तांसी धीर देऊन ॥ दळें परत विलीं संपूर्ण ॥ अष्टचक्र त्याचा स्यंदन ॥ पुढें लोटिला तेधवां ॥१८७॥पूर्वीं अतिकाय इंद्रजित ॥ तैसा योद्धा तो भीमसेन सुत ॥ राक्ष सदळ अत्युद्भुत ॥ घेऊ नियां लोटला ॥१८८॥घालू नियां वायु अस्त्र ॥ दीपिका परदळींच्या समग्र ॥ विझवू वियां तीक्ष्ण शर ॥ सोडिता जाहला तेधवां ॥१८९॥विजां ऐसे दिव्य बाण ॥ असंख्य देतसे सोडोन ॥ पर्वत आणि पाषाण ॥ यांचा पर्जन्य पडतसे ॥१९०॥पर्वतशिलांचे तळीं जाण ॥ महावीर होती चूर्ण ॥ जैसे मृद्धट जाती फुटोन ॥ अकस्मात आदळतां ॥१९१॥मायावी युद्ध परम घोर ॥ दशदिशांनीं येती शर ॥ शक्ती सुटती अपार ॥ तैसे तोमर न गणवती ॥१९२॥द्रोण कर्ण आणि कृपीसुत ॥ कौरवही शरीं खिळिले समस्त ॥ परस्परें हांका फोडीत ॥ न चाले बळ कोणाचें ॥१९३॥प्रलय वर्तलासे थोर ॥ कौरव दळीं हाहाकार ॥ गदाचक्रांचे भार ॥ आकाशांतूनि रिचवती ॥१९४॥वृक्ष पाषाण पर्वत ॥ राक्षस टाकिती असंख्यात ॥ कौरव दळ भयें पळत ॥ दशदिशांनीं नाटोपे ॥१९५॥अकस्मात शस्त्रें येती ॥ महावीरांचे अंगीं खोंचती ॥ तेव्हां दुर्यो धन कर्णा प्रती ॥ दीन वदनें बोलतसे ॥१९६॥घटोत्कचाची माया दारुण ॥ आलें सर्वांसी आतां मरण ॥ या वेळेसी राखीं आमुचा प्राण ॥ वासवी सोडीं जाजवरी ॥१९७॥कर्ण म्हणे तये वेळीं ॥ ते म्यां अर्जुनाकरितां ठेविली ॥ प्राणांवरोबरी रक्षिली ॥ आजिवरी शक्ति ते ॥१९८॥दुर्यो धन म्हणे तरी प्राणान्त ॥ आतांचि ओढवला कीं त्वरित ॥ कर्णासी विनविता समस्त ॥ टाकीं शक्ति याजवरी ॥१९९॥मग दीपिकांचे भंबाळ ॥ कौरवीं पाजळिले तत्काळ ॥ घटोत्कचावरी दानशीळ ॥ भास्करपुत्र धांवला ॥२००॥हरिमाया परमगहन ॥ हें कर्तृत्व त्याचेंचि पूर्ण ॥ रक्षावया पार्थाचा प्राण ॥ चरित्र जाण केलें हें ॥२०१॥शर टाकूनि अमित ॥ असुरांचीं शस्त्रें निवारीत ॥ मग जे इंद्र शक्ति अद्भुत ॥ गवसणी तिची फाडिली ॥२०२॥उगवले सहस्त्र वासरमणी ॥ तेवीं प्रकाश पडला धरणीं ॥ दोन्ही दळांवरी तये क्षणीं ॥ प्रभा पसरली अद्भुत ॥२०३॥ते कृतान्त जिव्हाचि तेजाळ ॥ कीं यमदंष्ट्रा अति विशाळ ॥ कीं दावाग्नीची तीक्ष्ण ज्वाळ ॥ किंवा गरळ काळसर्पाची ॥२०४॥ते महाप्रलयींची सौदामिनी ॥ कीं काळ पुरुषाची ज्येष्ठ भगिनी ॥ कीं सकल विद्या गाळोनी ॥ एकरूपिणी ओतिली ॥२०५॥सप्तकोटि महा मंत्र पाहीं ॥ त्यांचें सामर्थ्य या शक्तीचे ठायीं ॥ शक्र प्रसन्न होऊनि एके समयीं ॥ कर्णा प्रति दिधली तेणें ॥२०६॥न्यास मंत्र कर्णें जपोन ॥ केलें शक्तीचें पूजन ॥ मग दोन्ही हस्तीं धरून ॥ घटोत्कचावरी सोडिली ॥२०७॥चतुरानन आणि हरिहर ॥ यांसी जे शक्ति अनिवार ॥ ते कडकडली परम तीव्र ॥ पळविती सुरवर विमानें ॥२०८॥सहस्त्र चपला कडकडत ॥ तैसी चालली प्रलय करीत ॥ ब्रह्मांड अवघें उजळत ॥ जाहला आकांत दोन्ही दळीं ॥२०९॥पथ्वी तल डळमळी ॥ मेदिनीवसन ॥ भयें खळबळी ॥ जलचर वनचर ॥ ते वेळीं ॥ गत प्राण जाहले ॥२१०॥दोन्ही दळींचे वीर ॥ पळती घेतलें गिरिकंदर ॥ अधीरांचे प्राण ॥ समग्र ॥ एकवटोनि पडियेले ॥२११॥असो शक्ति कडकडोनि ते समयीं ॥ भरली घटोत्कचाचे ह्रदयीं ॥ गवाक्ष पाडूनि लवलाहीं ॥ षड्दल भेदूनि गेली ते ॥२१२॥महावृक्ष उन्मळला ॥ कीं गजासी पर्वतपात जाहला ॥ कीं मेरूचा कडा कोसळला ॥ तैसा पडला घटोत्कच ॥२१३॥मग कर्ण आणि द्रोण ॥ इंहीं बाण जाळ घालून ॥ राक्ष ससेना जाळून ॥ तृणप्राय टाकिली ॥२१४॥कौरव परम आनंदती ॥ जय वाद्यें वाज विती ॥ शोकसमुद्रीं केली वस्ती ॥ पंडुपुत्रीं तेधवां ॥२१५॥प्रलय गजर ऐकोन ॥ आले कृष्णार्जुन धांवोन ॥ तों विराट पांचाळ भीमनंदन ॥ महावीर पडियेले ॥२१६॥कालरूप समरांगणीं ॥ द्रोण उभा देखती नयनीं ॥ यावरी विश्वचालक चक्रपाणी ॥ काय करिता जाहला ॥२१७॥म्हणे रे रजनी उरली किंचित ॥ जय वाद्यें वाजवा बहुत ॥ रणीं पडला द्रोण सुत ॥ म्हणोनि गजर बहुत करा ॥२१८॥धर्मासी म्हणे जगज्जीवन ॥ तुज पुसेल येऊनि द्रोण ॥ तूं इतुकें बोलें वचन ॥ की अश्वत्थामा पडियेला ॥२१९॥मग म्हणे पंडुनंदन ॥ जन्मा दारभ्य असत्य वचन ॥ मी बोलिलों नाहीं जाण ॥ जळो भाषण असत्य तें ॥२२०॥कृष्ण म्हणे सर्वांचें कल्याण ॥ होय तें असत्य बोलावें वचन ॥ हिंसक शोधीत आला गोधन ॥ तरी काय सत्य बोलावें ॥२२१॥वाटपाडे पुसती तांतडी ॥ ये वाटे गेले काय कापडी ॥ तेथें असत्य बोलतां जोडी ॥ होय द्विगुण सत्याची ॥२२२॥नरो वा कुंजरो वा म्हणोन ॥ इतुकें तरी बोलें वचन ॥ या शब्दें कार्य साधोन ॥ बहुत येतें आमुचें पैं ॥२२३॥कां बोल वितो हें जगज्जीवन ॥ धर्मासी न कळे वर्तमान ॥ श्रीकृष्णाचे भिडेंकरून ॥ अवश्य म्हणे तेधवां ॥२२४॥आधींच रात्रींचा अंवसर ॥ जाहला वाद्यांचा गजर ॥ हांका फोडिती वीर ॥ अश्वत्थामा पडियेला ॥२२५॥तें द्रोणें ऐकोनि कर्णी ॥ परम दचकला अंतःकरणीं ॥ म्हणे चिरंजीव ॥ द्रौणी ॥ केवीं मरण पावला ॥२२६॥दोन्ही दळीं गाजली मात ॥ पडिला पडिला गुरु सुत ॥ द्रोण म्हणे हा वृत्तान्त ॥ धर्मासी सत्य पुसावा ॥२२७॥तो आहे सत्य सागर ॥ मग द्रोणें प्रेरिला रहंवर ॥ पांडवदळ भयातुर ॥ म्हणती द्रोण कां आला ॥२२८॥रथा जवळी आला रथ ॥ धर्म राज नमन करीन ॥ गुरु म्हणे बोलें सत्य ॥ अश्वत्थामा पडियेला ॥२२९॥कृष्णें करविला वाद्यांचा गजर ॥ त्यांत धर्म बोलिला हें उत्तर ॥ नरो वा कुंजरो वा साचार ॥ एक जण पडियेला ॥२३०॥वाद्य गजर तत्क्षणीं ॥ नरो वा इतुकें पडिलें कानीं ॥ पुत्र सत्य पडिला मानूनी ॥ द्रोण परतला तेधवां ॥२३१॥जाऊ नियां आपुले दळीं ॥ रथावरीच ते वेळीं ॥ धनुष्य बाण ठेवूनि महाबळी ॥ द्दढा सन घातलें ॥२३२॥चार्ही वेद मुखोद्नत ॥ सर्व शास्त्रीं पारंगत ॥ अष्टादश पुराणें समस्त ॥ दश ग्रंथ करत लामल ॥२३३॥चौदा विद्या चौसष्ट कला ॥ जाणे सकल मंत्र माळा ॥ अस्त्र शस्त्रें अत्या गळा ॥ धनुर्वेदीं निपुण जो ॥२३४॥भूत भविष्य वर्त मान ॥ जाणोनि झांकिले आचार्यें नयन ॥ ज्ञान द्दष्टी करूनि संपूर्ण ॥ विलोकीत ब्रह्मांड हें ॥२३५॥म्हणे अश्वत्थामा मरोन ॥ राहिला कोणे लोकीं जाऊन ॥ विचार करितां जाण ॥ तों अपूर्व वर्तलें ॥२३६॥ध्यानां तरींच जाण ॥ पक्ष्यांचें रूप धरून ॥ सप्तर्षि भेटले येऊन ॥ ब्रह्म नंदन नारदादि ॥२३७॥विश्वामित्र पिता भरद्वाज पुण्य रूप ॥ जमदग्नि गौतम ॥ अत्रि दिव्य रूप ॥ वसिष्ठ आणि सातवा कश्यप ॥ नारद स्वामी वेगळा ॥२३८॥म्हणती द्रोणा सावधान ॥ पहा एका दुष्ट संगावांचून ॥ राज हिंसा करा वया कारण ॥ कांहींच नाहीं विचारीं ॥२३९॥कैंची कांता कैंचा पुत्र ॥ मृग जलन्यायें संसार विचित्र ॥ कौरव पांडव सेना समग्र ॥ स्वन्पवत आभास हा ॥२४०॥सोडीं आतां मायिक कर्मा ॥ चाल जाऊं परंधामा ॥ स्वरूपीं पावें विश्रामा ॥ नामा नामातीत जें ॥२४१॥कन्या पुत्र गृहदारीं ॥ स्वन्पीं नांदत मस्करी ॥ जागा होऊनि विचारीं ॥ मिथ्या सर्व जाहलें ॥२४२॥तैसें करितां आत्मचिंतन ॥ नाना परींचे दोष दारुण ॥ सर्व जाती भस्म होऊन ॥ अग्निसंगें तृण जैसें ॥२४३॥ऐसें ऋषिवर बोधून ॥ तत्काल पावले अंतर्धान ॥ द्रोणें प्राणा पान आकर्षून ॥ इंद्रिय मार्ग निरोधिला ॥२४४॥सांडोनि माया मोह द्वंद्व ॥ आचार्य जाहला ब्रह्मा नंद ॥ दूरी गेला सर्व खेद ॥ भेदाभेद विराले ॥२४५॥कौरव पांडव समस्त ॥ आचार्य मूर्ति विलोकीत ॥ निजधामा गेला गुरु सुत ॥ हें तों समजलें समस्तां ॥२४६॥तों पितयाचें वैर आठवून ॥ परम दुष्ट घृष्टद्युम्न ॥ धांवला असिलता घेऊन ॥ शिर छेदिलें द्रोणाचें ॥२४७॥संपूर्ण जाहले पांच दिवस ॥ उदय पावला चंडांश ॥ तों घृष्टद्युम्नें विशेष ॥ विपरीत कर्म केलें हें ॥२४८॥त्रुटि न वाजतां शिर छेदून ॥ गेला परतोनि घृष्टद्यम्न ॥ आचार्य पावला स्वर्ग भुवन ॥ हांक तेव्हां गालली ॥२४९॥दोन्ही दळीं हाहाकार ॥ अश्रुधारा टाकी युधिष्ठिर ॥ धरणीवरी लोटिलें शरीर ॥ पार्थ वीरें तेधवां ॥२५०॥सहदेव नकुल भीमसेन ॥ आठवूनि आचार्याचे गुण ॥ शोकार्णवीं जाहले निमग्न ॥ म्हणती धन्य द्रोण गुरु ॥२५१॥बाल पणापा सोनि चरित्र ॥ पार्थों आठ विलें विचित्र ॥ आठवूनि गुरूचे उपकार ॥ खेद अपार करीतसे ॥२५२॥पार्थ बैसला उठोन ॥ म्हणे धृष्टद्युम्नाचें शिर छेदीन ॥ तों सात्यकी शस्त्र घेऊन ॥ पांचाला वरी चवताळला ॥२५३॥म्हणे गुरु द्रोही तूं चांडाल साचार ॥ तुझें आतांचि छेदितों शिर ॥ मग सात्यकी यादव वीर ॥ भीम सेनें आटोपिला ॥२५४॥अर्जुनासी म्हणे श्रीपती ॥ होणार तें न चुके कल्पांतीं ॥ आचार्य पावला स्वरूपस्थिती ॥ स्थूल देह त्यजूनियां ॥२५५॥प्रेत शिर टाकिलें छेदूनी ॥ पुरुषार्थ कोण मानी ॥ तेणें द्रुपद मारिला रणीं ॥ तें धृष्टद्यम्ना न मानलें ॥२५६॥पित्याचा सूड घेऊन ॥ तेणें पुरुषार्थ दाविला पूर्ण ॥ शून्य घरीं नेऊनि वाण ॥ वर्थ जैसें ठेविलें ॥२५७॥योगबळें करून ॥ आचार्यें सोडिला निज प्राण ॥ एरवीं त्याशीं समरां गण ॥ काळही करूं शकेना ॥२५८॥ऐसें बोलतां मन्मथतात ॥ उगेचि राहिले सात्यकी पार्थ ॥ तों अश्वत्थामा पिटीत रथ ॥ पितया जवळी पातला ॥२५९॥आचार्य गेला निज धामा ॥ धरणीवरी पडला अश्वत्थामा ॥ संसार माया मोहप्रेमा ॥ झळंबला ते काळीं ॥२६०॥कर्ण दुर्यो धन शारद्वत ॥ शांत विती तेव्हां गुरु सुत ॥ म्हणती रडसी काय ऊठ त्वरित ॥ सूड घेईं पित याचा ॥२६१॥मग तो अश्वत्थामा वीर ॥ रथा रूढ जाहला सत्वर ॥ पाठीशीं सकल कौरव भार ॥ युद्ध घोर मांडलें ॥२६२॥जैसा कल्पांतीं त्रिनेत्र ॥ तैसाचि दिसे द्रोण पुत्र ॥ पांडव सेना समग्र ॥ शरधारीं खिळियेली ॥२६३॥द्रोण पुत्राचा थोर मार ॥ कोणीही साहों न शकती समोर ॥ मग तो कपिध्वज सोडीत शर ॥ परम आवेशें धांवला ॥२६४॥बाण जाळ घालूनि बहुत ॥ समरीं खिळिला गुरु सुत ॥ चाप सारथी तूणीर रथ ॥ छेदू नियां पाडिला ॥२६५॥परा भव पावला गुरु सुत ॥ युद्ध टाकूनि गेला त्वरित ॥ सरस्वतीतीरीं बैसत ॥ द्दढ आसन घालू नियां ॥२६६॥पांडवरहित करावी धरणी ॥ ऐसें तप मांडिलें ते क्षणीं ॥ तों वेदव्यास येऊनी ॥ उभा ठाकला त्या पुढें ॥२६७॥म्हणे नर आणि नारायण ॥ ते हे अवतरले कृष्णार्जुन ॥ तूं तप व्यर्थ काय करून ॥ सिद्धि न पावे सर्वथा ॥२६८॥युद्ध सोडूनियां येथ ॥ तूं बैसलासी तप करीत ॥ तरी वीर हांसतील समस्त ॥ लाज गेली जन्मवरी ॥२६९॥म्हणतील हा अधीर विप्र सत्य ॥ पित याचा सूड न घेववे बलहत ॥ म्हणोनि बैसला तप करीत ॥ द्रोणी यथार्थ म्हणे तेव्हां ॥२७०॥मग स्यंदना रूढ होऊन ॥ सेनेंत मिसळला येऊन ॥ द्रोण पर्व संपलें येथून ॥ कर्ण पर्व पुढें असे ॥२७१॥द्रोण पर्व करितां श्रवण ॥ एकशत यज्ञांचें श्रेय संपूर्ण ॥ ऐकतां विजय कल्याण ॥ होय क्षालन महादोषां ॥२७२॥रसाळ कथा व्यास भारत ॥ लेखक जाहला गौरी सुत ॥ परम विशाल अत्यद्भुत ॥ नाटोपेंचि आकळितां ॥२७३॥कथा न तुटतां सत्य ॥ त्यांतील सारांश जो रसभरित ॥ तोचि लिहिला असे येथ ॥ पंढरीनाथ प्रसादें ॥२७४॥भीमातीर दिगंबर ॥ ब्रह्मा नंद अत्युदार ॥ श्रीधर वरद निर्विकार ॥ अभंग साचार न विटे ॥२७५॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ शेचाळिसाव्यांत कथियेला ॥२७६॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे द्रोणपर्वणि द्रोणनिधनं नाम षट्चत्वारिंशाध्यायः ॥४६॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शूभं भवतु ॥॥ श्रीपांडवप्रताप द्रोणपर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP