मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४२ वा

पांडवप्रताप - अध्याय ४२ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीकृष्णकृपेचें बळ अद्भुत ॥ दिसती पांडव अतिसमर्थ ॥ कवचालंकारमंडित ॥ सिद्ध जाहले दळभारें ॥१॥
रणतुरांची घाई आगळी ॥ दोन्ही दळीं एकचि लागली ॥ पांच पांडव आणि वनमाळी ॥ त्राहाटिती शंख बळें ॥२॥
दोन्ही दळींची हांक गाजली ॥ धाकें कुंभिनी डोलों लागली ॥ तों भीमें हांक फोडिली ॥ भयें दचकली धरा तेव्हां ॥३॥
महारथी कांपले सर्वत्र ॥ गज अश्व करिती मलमूत्र ॥ त्रिभुवन कांपलें समग्र ॥ म्हणती कृतान्त दुसरा हा ॥४॥
चपळा चपळत्वें धांवे परम ॥ तैसा परदळीं प्रवेशला भीम ॥ कीं असंख्य पापांवरी नाम ॥ श्रीकृष्णाचें एक जैसें ॥५॥
असंख्य देखोनि दंदशूक ॥ त्यांवरी निःशंक उठे विनायक ॥ कीं अजा भारामाजी वृक ॥ निर्भय जैसा प्रवेशे ॥६॥
तों दुर्योधनादि बंधु समग्र ॥ शतही धांवले महावीर ॥ शरधारा सोडिती अपार ॥ भीमावर एकसरें ॥७॥
तितुक्यांचेही बाण ॥ छेदूनि पाडी भीमसेन ॥ शरांशीं शर होतां घर्षण ॥ कृशानुवृष्टि होय तेथें ॥८॥
तंव तो महाराज देवव्रत ॥ सर्वांत श्रेष्ठ रणपंडित ॥ लक्षोनियां वीर पार्थ ॥ शर सोडीत धांवला ॥९॥
मेरुमंदार करितील चूर्ण ॥ ऐसे भीष्माचे बाण तीक्ष्ण ॥ ते अर्जुन समरीं तोडून ॥ सोडी आपण चपलत्वें ॥१०॥
प्रलयशर पार्थाचे पाहीं ॥ खडतरले गंगात्माजाचे ह्रदयीं ॥ परी कंपाय मान सर्व थाही ॥ शरीर त्याचें न जाहलें ॥११॥
सात्यकी कृतवर्मा दोघे जण ॥ युद्ध करिते जाहले निर्वाण ॥ बृहद्वल आणि अभिमन्य ॥ भिडती जाण समर भूमीं ॥१२॥
दुर्योधन आणि भीम ॥ घोर करिती तेव्हां संग्राम ॥ सहदेव आणि दुर्धर्ष परम ॥ निःशंक भिडती समरां गणीं ॥१३॥
दुर्मुखावरी नकुल ॥ धर्मावरी धांवला शल्य ॥ धृष्टद्युम्न गुरु द्रोण चपल ॥ युद्ध करिती अतिनिकरें ॥१४॥
शंखनामा विराट सुत ॥ तेणें पाचारिला सोमदत्त ॥ बाल्हीक आणि धृष्टकेत ॥ शिशु पालाच पुत्र तो ॥१५॥
अलंबुष घटोत्कच नाहीं ॥ असुर दोघे भिडती शंका नाहीं ॥ शिखंडी द्रौणी लवलाहीं ॥ शर सोडिती अतिनिकरें ॥१६॥
विराट आणि भगदत्त ॥ बृहत्क्षत्र आणि गौतम सुत ॥ द्रुपद आणि जय द्रथ ॥ निकरें करूनि झुंजती ॥१७॥
श्रुत सोम आणि विकर्ण ॥ सुशर्मा आणि चेकितान ॥ शकुनि प्रतिविंध्य दोघे जण ॥ सुलक्षण आणि श्रुतकर्मा ॥१८॥
श्रुतायुध इलावान भिडतो सतेज ॥ विंदानु विंदावरी कुंति भोज ॥ पंचबंधु कैकय राज ॥ त्रिगर्तावरी लोटले ॥१९॥
वीरबाहु आणि उत्तर ॥ चेदिराज उलूक शकुनि पुत्र ॥ ऐसीं द्वंद्वें सहस्त्र ॥ एक प्रहर युद्ध जाहलें ॥२०॥
सुरवर विमानीं पाहती ॥ एकाचे रथ एक छेदिती ॥ तूणीर सायकासनें तोडिती ॥ ध्वज पाडिती क्षितीवरी ॥२१॥
परस्परें मारिती सारथी ॥ उसणें परस्परें फेडिती ॥ सवेंचि ह्रदयीं शर भेदिती ॥ वाद्यें वाजती दोन्ही दळीं ॥२२॥
बाण जाळ पसरलें अमूप ॥ तेणें झांकोळला आकाशमंडप ॥ जे परम धीट त्यांसी सुटला चळकंप ॥ हिमज्वरें व्यापिले ॥२३॥
भारती युद्ध अद्भुत पाहीं ॥ त्यासी दुजी उपमा नाहीं ॥ ऐसे वीर निर्वाण पाहीं ॥ कोठेंचि नाहीं झुंजले ॥२४॥
वीर विदेही होऊन ॥ रणांगणीं भिडती निर्वाण ॥ सुह्रन्माया दारा धन ॥ थोरपण नाठवेचि ॥२५॥
देहाचें स्मरण नाहीं तयांप्रती ॥ म्हणोनि वीरांसी समरीं मुक्ती ॥ पूर्णापार बोलिजे पंडितीं ॥ शास्त्ररीति निर्धारीं ॥२६॥
थोर माजली रणधुमाळी ॥ रिते कुंजर धांवती दळीं ॥ ध्वज अपार पडती भूतळीं ॥ रिते रथ अश्व नेती ॥२७॥
नग्न शस्त्रें पडलीं अपार ॥ वीरांचे पसरले अलंकार ॥ असो जेवीं उदयाचळीं सहस्त्रकर ॥ गंगा कुमार तेवीं दिसे ॥२८॥
पंच पताकी शोभे रथ ॥ महारथी पाठीशीं अपरिमित ॥ असंख्य बाण तेव्हां वर्षत ॥ खिळीत पांडवसेनेतें ॥२९॥
बहुत वीरांचीं शस्त्रें ॥ छेदूनि पाडिलीं क्षणमात्रें ॥ तों श्रीरंग भगिनी पुत्रें ॥ केलें धांवणें सत्वर ॥३०॥
तो केवळ प्रत्यर्जुन ॥ दोन्ही हातांचें समसंधान ॥ शतबाणीं गंगानंदन ॥ भेदिला तेणें समरांगणीं ॥३१॥
कृतवर्मा खिळिला नवबाणीं ॥ तैसाचि शल्य विंधिला ते क्षणीं ॥ सारथ्यांचीं शिरें धरणीं ॥ सहस्त्रावधि पाडिलीं ॥३२॥
हस्तलाघव देखोन ॥ सकल वीर डोलविती मान ॥ सव्यतर्जनी उचलोन ॥ धन्य सर्व सूर म्हणती ॥३३॥
आणिक घालोनि बाण जाळ ॥ खिळिलें सर्व कौरव दळ ॥ मग तो भीष्म केवळ काळ ॥ कोपला प्रलयाग्नि जैसा कां ॥३४॥
मग सर्व वीर मिळोन ॥ सौभद्रावरी टाकिती बाण ॥ तितुक्यांचेंही तो संधान ॥ टाकी छेदून क्षणमात्रें ॥३५॥
मग भीष्में सोडूनि निर्वाण बाण ॥ सर्वांगीं खिळिला अभिमन्य ॥ कठिण देखोनि दहा जण ॥ महारथी धांवले ॥३६॥
दळा सहित धांवला विराट ॥ भीमें हांक दिधली अचाट ॥ बाण वर्षती सदट ॥ भीष्मावरी ते काळीं ॥३७॥
तीन बाणीं गंगा नंदन ॥ भेदिता जाहला भीमसेन ॥ शल्य गजावरी बैसोन ॥ उत्तरावरी धांवला ॥३८॥
शल्यें टाकिली दिव्य शक्ती ॥ उत्तर मूर्च्छित पडला क्षितीं ॥ उत्तराचा चपल हस्ती ॥ बाण घायीं मारिला ॥३९॥
उत्तर सावध होऊनि सवेग ॥ मारिले शल्यरथाचे तुरंग ॥ भीष्में बाण जाळ सवेंचि मग ॥ सैन्यावरी घातलें ॥४०॥
भीष्माचे लागले नाहींत बाण ॥ ऐसा वीर नसेचि कवण ॥ मयूर जेवीं पिच्छें पसरून ॥ तैसे वीर दिसती पैं ॥४१॥
श्वेतनामें विराट सुत ॥ तो परम योद्धा अद्भुत ॥ तेणें युद्ध अपरिमित ॥ केलें भीष्माशीं ते काळीं ॥४२॥
एकेचि दिवशीं संपूर्ण ॥ सेना आटिता गंगा नंदन ॥ परी श्वेतें युद्ध निर्वाण ॥ करूनि भीष्म आवरिला ॥४३॥
श्वेतें बहु आगळें दाविलें ॥ शतही कौरव शरीं जर्जर केले ॥ पळों लागलीं शत्रु दळें ॥ पाठ देऊनि रणभूमी ॥४४॥
सवेंचि श्वेतें परतोन ॥ शतबाणीं खिळिला गंगा नंदन ॥ भीष्मेंही शर टाकून ॥ सर्वांगीं तो खिळियेला ॥४५॥
परी तो दांडगा वीर ते क्षणीं ॥ कदा न निघे समराहूनी ॥ तेणें भीष्माचें चाप छेदूनी ॥ दहा वेळ टाकिलें ॥४६॥
भीष्माचे ध्वज सारथी ॥ श्वेत छेदी त्वरितगती ॥ हाहाकार कौरव करिती ॥ वाजविती पांडव जय वाद्यें ॥४७॥
मग दुर्यो धनें ते अवसरीं ॥ सर्व सेना प्रेरिली त्यावरी ॥ श्वेतें ख्याति केली यावरी ॥ समरीं शरीं सर्व खिळिले ॥४८॥
पांडव माथे डोलविती ॥ धन्य विराट पुत्र वानिती ॥ शरजाळीं भीष्मा प्रती ॥ त्रासिलें तेणें पराक्रमें ॥४९॥
मग प्रलयीं खवळे जैसा कृतान्त ॥ तैसा क्रोधावला शंत नुसुत ॥ घोडे सारथी ध्वज रथ ॥ भीष्में छेदूनि टाकिले ॥५०॥
धरणीवरी आला श्वेत ॥ तीक्ष्ण बाण जाळ  वर्षत ॥ शक्ति घेऊनि त्वरित ॥ धांवला श्वेत भीष्मावरी ॥५१॥
बळें सोडिली शक्ती ॥ अनावर वाटे भीष्मा प्रती ॥ मग नवांठायीं ते निश्चितीं ॥ छेदोनि क्षितीं पाडिली ॥५२॥
श्वेत धांवला गदा घेऊन ॥ केला भीष्माचा रथ चूर्ण ॥ सारथी तुरंग संहारून ॥ महावीरें टाकिले ॥५३॥
धरणी वरी उभा गंगा कुमार ॥ तों धांवले कौरवांचे भार ॥ दुसरे रथीं सत्वर ॥ शंतनुज बैसला ॥५४॥
तों श्वेतवीर घेऊनि खड्ग ॥ भीष्माचे रथीं चढला सर्वग ॥ हातींचें चाप सुरंग ॥ एकाचि घायें तोडिलें ॥५५॥
मग भार्गवदत्त बाण ॥ नूतन चापावरी लावून ॥ काळदंडा ऐसा सोडून ॥ गंगात्मजें दिधला पैं ॥५६॥
तो श्वेताचें ह्रदय भेदून ॥ गेला पृथ्वीतल फोडून ॥ जैसा सूर्य पावे अस्तमान ॥ तैसा श्वेत रणीं पडियेला ॥५७॥
पांडवदळीं हाहाकार ॥ कौरव हर्षें होती निर्भर ॥ म्हणती ख्याती करूनि हा वीर ॥ रणांगणीं पडियेला ॥५८॥
तों श्वेताचा बंधु शंखवीर ॥ तेणें पाचारिला गंगा कुमार ॥ चार घटिका घोरांदर ॥ युद्ध तेणें माजविलें ॥५९॥
द्रुपदाचें सैन्य ते क्षणीं ॥ भीष्में आटिलें निर्वाण बाणीं ॥ मध्यान्हींचा तीव्र तरणी ॥ तैसा गंगा त्मज दिसे पैं ॥६०॥
रवि गेला अस्तमानास ॥ ऐसा जाहला पूर्ण दिवस ॥ वाजविती वाद्य घोष ॥ दळें पावलीं स्वस्थाना ॥६१॥
धर्म आपुले शिबिरांत ॥ बैसला होऊन चिंताक्रांत ॥ श्रीरंगा प्रति बोलत ॥ विचार कैसा करावा ॥६२॥
भीष्मासी समरीं जिंकी ॥ ऐसा वीर नाहीं त्रिलोकीं ॥ आमुचे राजे रणपर्यंकीं ॥ पहुडवील भीष्म नेमें ॥६३॥
माझिया बंधूंचा प्राण ॥ भीष्म घेईल न लागतां क्षण ॥ हरि मज नलगे राज्यासन ॥ मी करीन वनवास ॥६४॥
मग बोले वैकुंठनायक ॥ धर्मा तूं कदा करीं न शोक ॥  तुझे बंधु आणि नृपनायक ॥ प्रलय उदयीक करितील ॥
ऐसें बोलतां रजनी सरली ॥ दोन्ही दळीं सत्कर्में सारिलीं ॥ वाद्यांची घाई लागली ॥ सेना लोटली समरांगणीं ॥६६॥
दुर्यो धन म्हणे गंगा नंदना ॥ तुम्हीं काल आटिली इतुकी सेना ॥ तरी सतेज दिसते पहा नयनां ॥ अधिकाधिक नूतन ॥६७॥
मकरव्य़ूह रचिला कोरव वीरीं ॥ धृष्टद्युम्न क्रौंचव्यूह करी ॥ शंख त्राहाटिले तेणें थरारी ॥ पृथ्वीतळ तेधवां ॥६८॥
पांच जन्य देवदत्त ॥ वाजविती मदनतात पार्थ ॥ अनंत विजय शंख सत्य ॥ युधिष्ठिरें त्राहाटिला ॥६९॥
पौंड्रक तो वृकोदरें ॥ सुघोष मणिपुष्पक माद्री कुमारें ॥ दुमदुमलीं दिशांचीं अंतरें ॥ एकचि हांक गाजिन्नली ॥७०॥
प्रलयीं जैसा कृतान्त ॥ विश्व भक्षूं पाहे क्षुधित ॥ तैसा भीष्म देखोनि पार्थ ॥ म्हणे ऐक जगदीशा ॥७१॥
लोटीं वेगें आजि स्यंदन ॥ मी भीष्माचा घेईन प्राण ॥ तैं पवनासी मागें टाकून ॥ रथ लोटिला त्वरेनें ॥७२॥
अर्जुन आणि गंगा कुमार ॥ रणीं राहिले समोर ॥ जैसा मेरु आणि मंदार ॥ कीं रमावर उमावर ते ॥७३॥
कीं रोहिणीवर आणि दिनकर ॥ कीं समुद्र आणि अंबर ॥ कीं वसिष्ठ आणि विश्वा मित्र ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥७४॥
भीष्में ओढिलें सायकासन ॥ सोडिले सत्याहत्तर बाण ॥ ते पार्थें वरिच्यावरी तोडून ॥ केलें संधान चपलत्वें ॥७५॥
शतबाणीं गंगा नंदन ॥ पार्थें ताडिला न लागतां क्षण ॥ तों द्रोणें पंचवीस मार्गण ॥ पार्थावरी घातले ॥७६॥
दुर्यो धनें चौसष्ट बाण ॥ पार्थावरी दिधले सोडून ॥ शतार्धबाणीं गौतम नंदन ॥ ताडिता जाहला सक्रोधें ॥७७॥
पार्थें त्याचिया द्विगुणीं ॥ सायक सोडिले तये क्षणीं ॥ तितुके खिळिले समरांगणीं ॥ पराक्रमें करू नियां ॥७८॥
सवेंचि भीष्मावरी ऐशीं शर ॥ टाकी तेव्हां सुभद्रावर ॥ तेणें विकळ गंगा कुमार ॥ घटिका एक जाहला ॥७९॥
भीष्म मूर्च्छित जाणोन ॥ कौरव सेनेंत प्रवेशला अर्जुन ॥ जैसे भोगींद्र असंख्य देखोन ॥ अरुणा नुज संहारी ॥८०॥
तैसे लक्ष वीर समरांगणीं ॥ पार्थें मारिले तये क्षणीं ॥ धडी मुंडीं रणमेदिनी ॥ झांकोनि गेली दिसेना ॥८१॥
पार्थवीरें शिरांची लाखोली ॥ भूलिंगासी जैं समर्पिली ॥ भीष्मा प्रति ते वेळीं ॥ सुयो धन बोलतसे ॥८२॥
बहुत मातला अर्जुन ॥ पृतना टाकिली संहारून ॥ तुम्हां निमित्त वीर कर्ण ॥ नेम करून बैसला ॥८३॥
काय कौतुक पाहतां एथ ॥ आजि समरीं मारावा पार्थ ॥ मग भीष्में लोटिला रथ ॥ उथयकृष्ण लक्षोनियां ॥८४॥
नवबाणीं वीर पार्थ ॥ भेदीत बळें गंगा सुत ॥ सवेंचि शतबाणीं तो रणपंडित ॥ भेदिता जाहला भीष्मातें ॥८५॥
श्रीरंगाचे ह्र्दयीं तीन बाण ॥ भीष्में भेदिले दारुण ॥ पार्थें भीष्माचा सारथी लक्षून ॥ सत्तर बाणीं खिळियेला ॥८६॥
हस्तलाघव दावी गंगा नंदन ॥ त्याहूनि आगळें करी अर्जुन ॥ इकडे द्रोण धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती अतिनिकरें ॥८७॥
निर्वाणींच एक बाण ॥ द्रोणें सोडिला जेवीं चंडकिरण ॥ परी तो अग्निगर्भ धृष्टद्युम्न ॥ नाहीं भ्याला तयासी ॥८८॥
बाण जेवीं कृतान्त ॥ परी तेणें तोडिला अकस्मात ॥ अरुणानुज खंडित ॥ गगनीं जैसा व्याळातें ॥८९॥
वीर म्हणती धन्य धन्य ॥ प्रतापी वीर हा धृष्टद्युम्न ॥ यावरी पांचाळें शक्ति उचलून ॥ द्रोणावरी सोडिली ॥९०॥
द्रोणें दिव्य शर सोडोनी ॥ शक्ति खंडूनि पाडिली धरणीं ॥ सर्वांग भेदिलें बाणीं ॥ मयूरा ऐसे दिसती पैं ॥९१॥
कलिंग देशींचा नृपनाथ ॥ नाम जयाचें केतुमंत ॥ भीमाशीं युद्ध अद्भुत ॥ तेणें केलें तेधवां ॥९२॥
मेदिनीवसनाची वाट गा ॥ शोधीत धांवती रक्तनिम्नगा ॥ कलिंगाचा पुत्र दांडगा ॥ भीमावरी कोसळला ॥९३॥
अश्वावरी तो बैसोन ॥ भीमावरी सोडी बाण ॥ तों वृकोदरें गदा भोंवंडून ॥ मत्कुणापरी मारिला ॥९४॥
ज्याचें नाम चक्रवीर ॥ भीमें केला त्याचा संहार ॥ मग असिलता घेऊनि वृकोदर ॥ कौरव भारीं मिसळला ॥९५॥
चहूंकडूनि बाणांचे पूर ॥ भीमावरी येती अपार ॥ असिलतेनें वृकोदर ॥ तोडूनि पाडी एकीकडे ॥९६॥
जैसा कां बहिरी ससाणा ॥ निवटीत उठे द्विजगणां ॥ त्याचपरी भीम जाणा ॥ पाडी सेना चपलत्वें ॥९७॥
कलिंगाचा दुसरा सुत ॥ नाम त्याचें भानुमंत ॥ शलभ विजेशी धरूं धांवत ॥ तैसा लोटला भीमावरी ॥९८॥
भीमाचे करींची असिलता ॥ झळके जैसी विद्युल्लता ॥ एकाचि घायें भानुमंता ॥ यमसदनासी धाडिलें ॥९९॥
कलिंगाचा तिसरा सुत ॥ शतायुनामा वीर धांवत ॥ मातोनियां जैसा बस्त ॥ महाव्याघ्रावरी पडे ॥१००॥
जैसा मृद्धट होय चूर्ण ॥ तेवीं भीमें टाकिला मारून ॥ शेवटीं कलिंग ॥ आपण ॥ उसणें घ्यावया धांवला ॥१०१॥
वृकोदराचा मार अनिवार ॥ उडविलें कलिंगाचें शिर ॥ भेदीत गेलें अंबर ॥ कौरव पाहती ऊर्ध्वमुखें ॥१०२॥
दोन सहस्त्र हस्ती ॥ सात शतें महारथीं ॥ कलिंगाची सेना संपत्ती ॥ संहारिली भीम सेनें ॥१०३॥
तैसीच धृष्टद्युम्नें ते क्षणीं ॥ संहारिली कौरव वाहिनी ॥ तें भीष्म वीर देखोनी ॥ बाण वर्षत धांवला ॥१०४॥
भीष्मावरी शक्ती ॥ भीमें टाकिली अवचिती ॥ ते तत्काल छेदूनि क्षितीं ॥ देवव्रतें पाडिली ॥१०५॥
अश्वत्थामा धृष्टद्युम्न ॥ युद्ध करीत निर्वाण ॥ त्याची पाठी राखीत अभिमन्य ॥ वर्षत बाण ऊठिला ॥१०६॥
महावीर तवे क्षणीं ॥ सौभद्रें खिळिलें निजबाणीं ॥ दुर्यो धन पुत्र धांवोनी ॥ लक्ष्मण पुढें पातला ॥१०७॥
लक्ष्मणें सोडिले तीव्र बाण ॥ त्या अभिमन्य़ूवरी लक्षून ॥ जैसा पंडितापुढें भाषण ॥ शतमूर्ख करूं आला ॥१०८॥
त्या मूर्खाचें वारजाल समस्त ॥ एकाचि वचनें छेदी पंडित ॥ तैसे लक्ष्मणाचे शर समस्त ॥ एकचि शरें तोडिले ॥१०९॥
मग अभिमन्यें निर्वाणबाणीं ॥ मूर्च्छित लक्ष्मण पाडिला रणीं ॥ दुर्यो धन तें देखोनी ॥ सैन्या सह धांवला ॥११०॥
सौभद्रासी सकळीं वेढिलें ॥ तें कपिवर ध्वजें दुरोनि देखिलें ॥ मग खगवर ध्वजें ते वेळे ॥ स्यंदन वेगें पीटिला ॥१११॥
विद्युल्लता पडे जैसी पर्वतीं ॥ तैसा कौरवांत आला सुभद्रापती ॥ तितुकेही वीर शरपंथीं ॥ जर्जर केले पराक्रमें ॥११२॥
सूर्यरथा पर्यंत ॥ धुरोळा दाटला तेथ ॥ कौरव भार सर्व पळत ॥ पार्थ भयेंकरो नियां ॥११३॥
रण भूमि माजली फार ॥ रिते धांवती अश्व कुंजर ॥ मोकळे रथ अपार ॥ गगन मार्गें झुगारती ॥११४॥
शस्त्रास्त्रां सहित हस्त ॥ अपार पडले भूषणमंडित ॥ किरीट कुंडलां सहित ॥ शिरें अगणित पडलीं पैं ॥११५॥
ब्रीदां सहित पडले चरण ॥ हातीं अंकुश घेऊन ॥ गजाकर्षक मरून ॥ चहूंकडे पडियेले ॥११६॥
वाग्दोरे तैसेचि हातीं ॥ सूत पडले बहु क्षितीं ॥ भीष्म म्हणे द्रोणा प्रती ॥ धन्य जगतीं वीर पार्थ ॥११७॥
सूर्य पावला अस्तमान ॥ संपूर्ण जाहला द्वितीय दिन ॥ निशा संपतां चडकिरण ॥ उदय पावला तेधवां ॥११८॥
भीष्में सुपर्णव्यूह रचिला ॥ पांचाळें अर्धचंद्राकार केला ॥ सकल सेनेसी रक्षक जाहला ॥ धृष्टद्युम्न तेधवां ॥११९॥
त्यासही रक्षक पार्थ वीर ॥ पार्थासी रक्षक जग दीश्वर ॥ मांडलें युद्धाचें घन चक्र ॥ शिरें अपार उडताती ॥१२०॥
सात्यकी आणि शकुनी ॥ भिडती तेव्हां रण मेदिनीं ॥ तों कपटि यासी विरथ करूनी ॥ रणांतूनि पळविला ॥१२१॥
भीम सेनावरी सुयो धन ॥ उठिला तेव्हां वर्षत बाण ॥ तों घटोत्कच गदा घेऊन ॥ भीमासी साह्य जाहला ॥१२२॥
एक काळ एक कृतान्त ॥ तेवीं भीम आणि हिडिंबसुत ॥ कौरव दळाचा निःपात ॥ केला बहुत ते क्षणीं ॥१२३॥
भीष्मासी हिणावी सुयो धन ॥ तूं वीरांमाजी सहस्त्रकिरण ॥ पांडवांचीं मुलें येऊन ॥ तुज शरीं जर्जर करिती ॥२४॥
तुझें मनीं त्यांचें कल्याण ॥ व्हावें हें मी जाणें पूर्ण ॥ प्रतिज्ञा करूनि वीर कर्ण ॥ राहिला पुढें न येचि ॥१२५॥
भीष्म म्हणे पूर्वींच समस्त ॥ तुज म्यां केलें असे श्रुत ॥ पांडव वीर प्रतापवंत ॥ कळिकाळासी न गणिती ॥१२६॥
तरी मी आजि निर्वाण ॥ पाहें नयनीं युद्ध करीन ॥ मग महावीरें स्यंदन ॥ पांडवदळीं लोटिला ॥१२७॥
पांडवचमूचा संहार ॥ भीष्में केला तेव्हां अपार ॥ पुलले शिंशुकतरुवर ॥ तैसे वीर दिसताती ॥१२८॥
परम चपल देवव्रत ॥ क्षणांत पूर्वेसी जाय रथ ॥ सवेंचि पश्चिमेसी जात ॥ त्रुटिमात्र न वाजतां ॥१२९॥
क्षणें उत्तर क्षणें दक्षिण ॥ अलातचक्रवत फिरे स्यंदन ॥ चहूंकदोनि सोडी बाण ॥ वरी द्दष्टि न ठरे कोणची ॥१३०॥
श्येनपक्षी जैसा फिरे ॥ तेसा रहंवर जाय त्वरें ॥ चतुरंगसेना अपारें ॥ संहारिली ते दिवसीं ॥१३१॥
तें देखोनि कृष्णार्जुन ॥ म्हणती धन्य वीर गंगा नंदन ॥ धांडोळितां हें त्रिभुवन ॥ ऐसा शूर दुजा नसे ॥१३२॥
श्रीरंग म्हणे अर्जुना ॥ भीष्में आटिली सर्व सेना ॥ तुझी कोठें राहिली प्रतिज्ञा ॥ लाज कां तुज न वाटे ॥१३३॥
अर्जुन म्हणे श्रीकृष्णा ॥ आतां प्रेरीं सत्वर स्यंदना ॥ तों निमेष न लागतां जाणा ॥ अर्जुनें केलें अद्भुत ॥१३४॥
लाघव आणि हस्तवेग जाण ॥ दाखवी भीष्माहूनि दशगुण ॥ हरि म्हणे पार्था स्यंदन ॥ चालवितों पहा कैसा तो ॥१३५॥
पार्थें सोडिला आधीं बाण ॥ मग श्रीरंगें प्रेरिला स्यंदन ॥ बाणासी मागें टाकून ॥ रथ गेला त्वरेनें ॥१३६॥
सवेंचि परत विला रहंवर ॥ तों पुढें येऊनि पडिला शर ॥ मग पार्थ स्तवन ॥ करी अपार ॥ म्हणे पार नेणवे तुझा ॥१३७॥
स्वामी सर्वज्ञा श्रीकरधरा ॥ अश्वांमाजी हे कैंची त्वरा ॥ विश्वव्यापका त्रिभुवनेश्वरा ॥ गती समग्र तुझ्याचि ॥१३८॥
असो नरवीरें बाण टाकून ॥ छेदिलें भीष्माचें सायकासन ॥ भीष्म म्हणे पार्था धन्य ॥ तुज देखोनि सुखावें मी ॥१३९॥
माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा दिसे तीव्र अर्जुन ॥ भीष्म म्हणे निर्वाण ॥ झुंजें मजशीं आजि तूं ॥१४०॥
ते दिवशीं आदिपुरुष ॥ अंगीं कवच घाली निर्दोष ॥ मस्तकीं कोटीर झळके विशेष ॥ तेज न समाये अंबरीं ॥१४१॥
कर्णीं कुंडलांचे जोड ॥ सर्व सारथियां माजी सुघड ॥ तो द्वारकाधीश उघड ॥ पाठी राखे पार्थाची ॥१४२॥
यावरी तो देवव्रत ॥ करिता जाहला कर्म अद्भुत ॥ म्हणे हे जगज्जीवन मदनतात ॥ प्रतिज्ञा माझी अवधारीं ॥१४३॥
तुझा नेम शस्त्र न धरीं ॥ तरी मी धरवीन आजि समरीं ॥ कंसांतका मधुमुरारी ॥ प्रतिज्ञा खरी करीन मी ॥१४४॥
हें जरी न करवे माझेनी ॥ तरी व्यर्थ ॥ प्रसवली स्वर्धुनी ॥ शंतनुतनुज आज पासोनी ॥ सर्वथाही म्हणवींना ॥१४५॥
विजयरथ करीन चूर्ण ॥ कीं कपिवर ध्वज खालीं पाडीन ॥ तेव्हां मग शस्त्र घेऊन ॥ धांवसी कीं आम्हांवरी ॥१४६॥
सेने सहित त्रासीन अर्जुन ॥ सर्वांचीं शिरें खालीं पाडीन ॥ तेव्हां मग शस्त्र घेऊन ॥ धांवसी कीं आम्हांवरी ॥१४७॥
रक्ताचे पूर वाहवीन ॥ पांडवादिक सकल सैन्य ॥ हें समग्र बाणें आटीन ॥ मग सुदर्शन धरिसी कीं ॥१४८॥
आजि हे खरी करीन प्रतिज्ञा ॥ तुझीच आण कंस प्राण हरणा ॥ माझा क्षत्रिय धर्म जनार्दना ॥ अवलोकीं तूं यावरी ॥१४९॥
ऐसें देवव्रतें बोलोनी ॥ चाप टणत्कारिलें तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघुकिंकिणी ॥ ऐकोनि कर्णीं सर्व भ्याले ॥१५०॥
प्रलयीं क्षोभला कृतान्त ॥ तेवीं समरीं दिसे गंगा सुत ॥ शरवृष्टि करितां अपरिमित ॥ लेखा शेषा न करवे ॥१५१॥
वृक्षाग्रींचें फळ लक्षून ॥ जैसे पक्षी येती धांवोन ॥ तैसीं बाणें शिरें उडवून ॥ ऊर्ध्वपंथें बहु जाती ॥१५२॥
लक्षांचीं लक्ष शिरें ॥ उडविलीं तेव्हां गंगा कुमारें ॥ कित्येक कंदुकां ऐसीं त्वरें ॥ आकाशपंथें उसळलीं ॥१५३॥
पांडवदळीं हाहाकार ॥ असंख्य वीरांचा केला संहार ॥ अलातचक्रवत गंगा कुमार ॥ सेने माजी धांवतसे ॥१५४॥
बाणपर्जन्याच्या धारा ॥ त्यांमाजी वर्षती शिरें गारा ॥ अशुद्धजीवनाचे सत्वरा ॥ पूर चालिले चहूंकडे ॥१५५॥
पळावया नाहीं वाव ॥ नेदी पृथ्वी लपावया ठाव ॥ रथगजां आड वीर सर्व ॥ लपतांडी न वांचती ॥१५६॥
भीष्माचें शर तीक्ष्ण ॥ गजकलेवरें फोडून ॥ सवेंचि अश्वनरांसी भेदून ॥ पृथ्वी माजी प्रवेशती ॥१५७॥
उरले वीर सांडूनि समर ॥ पळती घेत दिगंतर ॥ महायोद्धे रणधीर ॥ न येती समोर भीष्माचे ॥१५८॥
आकांत वर्तला थोर ॥ भीष्में पार्थ लक्षोनि समोर ॥ प्रेरिला बाणांचा पूर ॥ खिळिला वीर सर्वांगीं ॥१५९॥
अर्जुन सोडीन शर ॥ ते वरच्यावरी तोदी गंगा कुमार ॥ पार्थ दिसे जैसा सपिच्छ मयूर ॥ बाण पिच्छेंकरो नियां ॥१६०॥
विशेष भीष्म बाण प्रताप ॥ गळालें पार्थाचें गांडीव चाप ॥ मूर्च्छा येऊनि सकंप ॥ ध्वजस्तंभीं टेंकला ॥१६१॥
रथ फेरीत जगन्मोहन ॥ पार्थाकडे पाहे परतोन ॥ म्हणे कां रे न सोडिसी बाण ॥ तों तेणें नयन झांकिले ॥१६२॥
गळालें करींचें सायकासन ॥ देखोनि खवळला मघुसूदन ॥ करितां सुदर्शनाचें स्मरण ॥ न लागतां क्षण हाता आलें ॥१६३॥
उडी टाकूनि मुरारी ॥ करीवरी चपेटे जैसा हरी ॥ पीतांबर मागें न सांवरी ॥ धरणीवरी लोळतसे ॥१६४॥
उगवले नेणों सहस्त्रकिरण ॥ तेवीं झळके करीं सुदर्शन ॥ बिंबाधरारक्तद्शन ॥ क्रोधें करून रगडिले ॥१६५॥
कौरव दळीं हाहाकार ॥ महाशूर घेती गिरिकंदर ॥ वाटे सर्वांचीं शिरें समग्र ॥ एका घायें पाडील पैं ॥१६६॥
आतां कैंचा गंगा नंदन ॥ झांकले सर्वांचे नयन ॥ कौरव सर्व मूर्च्छा येऊन ॥ पडती पालथे पृथ्वीवरी ॥१६७॥
परम कोपाय मान श्रीधर ॥ ब्रह्मांड हें जाळील समग्र ॥ दोन्ही दळीं आकांत थोर ॥ हांक एकचि गाजली ॥१६८॥
पृथ्वी तडतडां वाजत ॥ अंबर थरथरां कांपत ॥ वायु फिरों न लाहे तेथ ॥ सप्त समुद्र तप्त जाहले ॥१६९॥
सुदर्शनतेजाचे आवर्तीं ॥ चंद्र सूर्य बुचकळ्या देती ॥ सूष्टि गेली गेली म्हणती ॥ सुर पळविती विमानें ॥१७०॥
चक्रवत फिरवी सुदर्शन ॥ सावध पाहे गंगा नंदन ॥ म्हणे हे जगन्निवास मनमोहन ॥ येईं झडकरी ॥१७१॥
हे द्वारका नगर विहारी ॥ हे मधुसूदना कैटभारी ॥ माझी प्रतिज्ञा झाली खरी ॥ वधीं यावरीं मज आतां ॥१७२॥
हे रविकर वरांबरधरा ॥ विषकंठवंद्या गुण गंभीरा ॥ छेदीं आतां माझिया शिरा ॥ सोडचीं संसारा पासोनी ॥१७३॥
जन्मापासोनि आज पर्यंत ॥ आचरलों जें ब्रह्मचर्यव्रत ॥ तें सफळ जाहलें समस्त ॥ पावेन मृत्यु हरिहस्तें ॥१७४॥
दुर्जनांचे संगेंकरून ॥ आजवरी शिणलें माझें मन ॥ सोडवीं या देहापासून ॥ घे मेळवून तुज माजी ॥१७५॥
भक्त जन संताप नाशका ॥ इंदिरावरा नेत्र सुखदायका ॥ षांडवजन प्रति पालका ॥ सोडीं सुदर्शन सत्वर ॥१७६॥
सावध होऊनि पाहे अर्जुन ॥ मग धांवला उडी टाकून ॥ हरिजघनीं मिठी घालून ॥ धरिले चरण आवडीं ॥१७७॥
पार्थासी झिडकावी श्रीधर ॥ म्हणे सोडीं मज छेदितों शिर ॥ चरण न सोडी सुभद्रावर ॥ स्तवन फार करीतसे ॥१७८॥
माझिया हातें कंसारी ॥ हें कौरव दळ संहारीं ॥ भीष्मासी मारवीं यावरी ॥ चला रथावरी श्रीरंगा ॥१७९॥
ऐसें अर्जुन अनुवादोन ॥ हातीं धरूनि रुक्मिणी जीवन ॥ निजर थावरी बैसवून ॥ आपण वरी आरूढला ॥१८०॥
हरीचे इच्छें करूनि जाणा ॥ सुदर्शन गेलें स्वस्थाना ॥ मग अर्जुन वर्षत बाणां ॥ सहस्त्रवदना लेखा नव्हे ॥१८१॥
प्रलय विजे समान ॥ झळके गांडीव शरासन ॥ प्रचंड चाप टणत्कारोन ॥ शरीं व्यापिले कौरव ॥१८२॥
नाना शस्त्रांचे मार ॥ कौरव करिते जाहले अपार ॥ तोमर शक्ति पाश चक्र ॥ मुद्नर पट्टिश असिलता ॥१८३॥
जितुकीं शस्त्रें कौरव प्रेरिती ॥ तितुकीं छेदी सुभद्रापती ॥ सर्व वीर पार्थें शरपंथीं ॥ जर्जर केले तेधवां ॥१८४॥
दोन्ही दळींचे वाद्य नाद ॥ आणि वीरांच्या हांका सुबद्ध ॥ परी गांडीवाचा शब्द अगाध ॥ त्यांहूनही आगळा ॥१८५॥
राघवचरणा रविंद भ्रमर ॥ ध्वजस्तंभीं देत भुभुःकार ॥ भूतांच्या हांका अनिवार ॥ ऐकतां कृतान्त चळीं कांपे ॥१८६॥
असो दिवस जाहले तीन ॥ अस्तासी गेला चंडकिरण ॥ लक्षवधि दीपिका पाजळून ॥ पार्थ परतला शिबिरा प्रति ॥१८७॥
चवथे दिवशीं सर्पाकार ॥ व्यूह रची गंगा कुमार ॥ तीच रचना पांचाळ वीर ॥ पांडवदळीं करी तेव्हां ॥१८८॥
अर्जुनाचा देखोनि रथ ॥ कौरव दळें भयभीत ॥ तों धांवला सुभद्रासुत ॥ बाण वर्षत भीष्मावरी ॥१८९॥
देखोनि सौभद्राचें संधान ॥ भीष्म जाहला आनंद घन ॥ म्हणे होय हा प्रत्यर्जुन ॥ धन्य वंश याचेनि ॥१९०॥
सोमदत्तें ते अवसरीं ॥ शक्ति टाकिली अभिमन्य़ूवरी ॥ येरें छेदोनि झडकरी ॥ त्याची त्यावरीच पाडिली ॥१९१॥
यावरी तो उत्तरापती ॥ महारनपंडित पुरुषार्थी ॥ बाण जाळीं सकलां प्रती ॥ जर्जर करिता जाहला ॥१९२॥
शल्य नामा कौरव वीर ॥ धांवला धृष्टद्युम्ना समोर ॥ बाण धारीं रहंवर ॥ अश्व सारथी मारिले ॥१९३॥
मग चरण चालीं धृष्टद्युम्न ॥ हातीं घेऊनि असिलता ओढण ॥ शल्यवीराचें कंठनाल छेदून ॥ एकीकडे टाकिलें ॥१९४॥
त्याचा पिता शय मिनी ॥ तेणें रण माजविलें तये क्षणीं ॥ त्यासी सात्यकिवीरें छेदूनी ॥ यम सदना पाठविलें ॥१९५॥
तों अपर सेना घेऊन ॥ पुढें धांवला सुयोधन ॥ त्यावरी धांवला भीम सेन ॥ हांकें गगन गाजवीत ॥१९६॥
पंचवीस सहस्त्र हस्ती ॥ गदाघायें पाडिलें क्षितीं ॥ तीन सहस्त्र रथी ॥ चूर्ण केले रणीं तेव्हां ॥१९७॥
गजारुढ भगदत्त ॥ भीमावरी धांवला शर वर्षत ॥ बाण जाळ घालूनि अद्भुत ॥ वृकोदर झांकियेला ॥१९८॥
तों घटोत्कच हांक देत ॥ धांवला जैसा प्रलय कृतान्त ॥ वर्षता झाला शिला पर्वत ॥ तेणें भगदत्त घाबरला ॥१९९॥
पाडितां शिलांचा पर्जन्य ॥ पळूं लागलें सकल सैन्य ॥ तों अस्त गेला चंडकिरण ॥ दिवस पूर्ण चार जाहले ॥२००॥
उपरी प्रातःकाल जाहला ॥ मकरव्य़ूह कौरवीं रचिला ॥ श्येनपक्ष्या ऐसा शोभला ॥ पांडवांचा व्य़ूह तेव्हां ॥२०१॥
पांडवसेनेचें परम बळ ॥ अवघे वीर उतावीळ ॥ दुर्यो धनाचें ह्रदय कमळ ॥ धग धगलें भयें बहु ॥२०२॥
दुर्यो धन म्हणे गंगा नंदना ॥ पांडवीं आटिली माझी सेना ॥ उरली तेही उरेना ॥ पूर्ण मज हें कळों आलें ॥२०३॥
तुम्हीं वडिलीं सांगितली नीती ॥ ती म्यां धरिली नाहीं चित्तीं ॥ भीष्म म्हणे आतां प्रचीती ॥ आली तुज सुयो धना ॥२०४॥
ज्या पक्षीं असे विकुंठनाथ ॥ जय लाभ तिकडेचि समस्त ॥ पांडव सन्मार्गें वर्तत ॥ यश प्राप्त सदा त्यांसी ॥२०५॥
अजूनि तरी सुयो धना ॥ शरण रिघें श्रीकृष्ण चरणां ॥ तो ब्रह्मा नंद वैकुंठा राणा ॥  वेदपुराणां वंद्य जो ॥२०६॥
ब्रह्मा दिकांचें निज ध्यान ॥ अपर्णावराचें देवतार्चन ॥ तयासी तूं रिघें शरण ॥ सोडीं अभिमान पापी हा ॥२०७॥
मग म्हणे दुर्यो धन ॥ पहिलाचि गेलों चुकोन ॥ आतां अभिमानें द्यावा प्राण ॥ परी शरण न जावें ॥२०८॥
मिळाले पृथ्वीचे नृपवर ॥ यांदेखतां जोडूनि कर ॥ शरण जाऊनि पंडुकुमार ॥ कैसे आणूं गज पुरा ॥२०९॥
तूं भीष्म काळासी अनिवार ॥ द्रोण कर्ण त्रैलोक्य जिंकणार ॥ मज शरण जा म्हणतां निर्धार ॥ लाज गेली तुमची पैं ॥२१०॥
युद्ध मांडलें विशेष ॥ आजि चालतो पांचवा दिवस ॥ पुढें माजवावा वीररस ॥ जो सुरस भुवनत्रयीं ॥२११॥
ब्रह्मानंदें जोडूनि कर ॥ श्रोत यांसी म्हणे श्रीधर ॥ पुढील अध्यायीं गंगा कुमार ॥ ख्याती करील रणांगणीं ॥२१२॥
स्वामी माझा पंढरीनाथ ॥ ब्रह्मा नंद अति समर्थ ॥ पांडवांची पाठी रक्षीत ॥ दिवसनिशीं न विसंबे ॥२१३॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ बेचाळिसाव्यांत कथियेला ॥२१४॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि भीष्मपांडवयुद्धसमारंबो नाम द्विचत्वारिंशाध्यायः ॥४२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीपांडवप्रताप भीष्मपर्व द्विचत्वारिंशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP