मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३३ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३३ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३३ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः॥ अग्निसंभूत याज्ञसेनी ॥ जी साक्षात अवतरली भवानी ॥ कीचक बोलिला पापखाणी ॥ प्रतिवचन त्यासी देत ॥१॥मी कदा तुज योग्य नाहीं ॥ पडूं नको व्यर्थ प्रवाहीं ॥ परदाराभिलाषें पाहीं ॥ प्राणें जाशी दुरात्म्या ॥२॥परांगना परधन ॥ येथें रमे ज्याचें मन ॥ तो सर्वांचा द्वेषी पूर्ण ॥ आलें मरण जवळी त्या ॥३॥मी दासी नव्हें निर्धार ॥ माझे पंच गंधर्व भ्रतार ॥ माझा अभिलाष धरी जो पामर ॥ त्यासी ते मारितील क्षणार्धे ॥४॥टाकूनियां स्वधर्मपथ ॥ आडमार्गे चालसी यथार्थ ॥ तरी समीप आला अनर्थ ॥ कीचका तुज निर्धारें ॥५॥ज्या गोष्टीनें अनर्थ थोर ॥ होय स्वकुलाचा संहार ॥ ऐशिया विचारीं चतुर ॥ सहसाही न प्रवर्तती ॥६॥समर्थाशीं विरोध करिती ॥ आपुलें कल्याण चिंतिती ॥ ते अपायनदींत बुडती ॥ न काढी कोणी तयांतें ॥७॥याकरितां विचार करीं ॥ परतोनि जाईं स्वमंदिरीं ॥ तो सूतपुत्र यावरी ॥ कीचक बोले दुरात्मा ॥८॥मी खवळलिया जाण ॥ नाटोपें कोणा प्रलयाग्न ॥ सकल राजे मजअधीन ॥ मी करीन तेंचि होय ॥९॥विराटही मजअधीन ॥ माझेनें त्यासी राज्यासन ॥ एकशत पांच पूर्ण ॥ बंधु माझे पाठिराखे ॥१०॥भीम आणि हनुमंत ॥ मी जिंकीन एके क्षणांत ॥ तुझे पंच गंधर्व दावीं त्वरित ॥ मारुनि टाकीन क्षणार्धे ।११॥द्रौपदी म्हणे सिंहकन्यका ॥ कैसी प्राप्त होईल जंबुका ॥ राजहंसविभाग देखा ॥ काग कैसा नेईल ॥१२॥दीपासी आलिंगितां पतंग ॥ तत्काल होय प्राणभंग ॥ मज स्पर्शतां सवेग ॥ तेचि गति तुज साच ॥१३॥माझा करितां अभिलाष ॥ होईल तुझा प्राणनाश ॥ शाहणा होईं जाईं घरास्म ॥ उभा न राहें क्षणभरी ॥१४॥गंगा पूरें भरतां तुंबळ ॥ परपारा केवीं जाय बाळ ॥ गगनींचे सूर्यमंडळ ॥ मानवाहातीं न चढेचि ॥१५॥रत्नराशि पडली थोर ॥ म्हणोनि भरी खदिरांगार ॥ कीं हा नीलरत्नांचा हार ॥ म्हणोनि विखार धरुं नको ॥१६॥महाविष स्वयें भक्षून ॥ प्रचीत पहावया इच्छी कोण ॥ ब्रह्मद्रोहेंकरुन ॥ कोण कल्याण पावला ॥१७॥माझा अभिलाष धरितां चित्तीं ॥ तेचि होईल तुज गती ॥ ऐसें ऐकतां तो मंदमती ॥ सुदेष्णेच्या गृहा गेला ॥१८॥तिला म्हणे सैरंध्रीसी ॥ बोधूनि पाठवीं मजपाशीं ॥ नाहीं तरी मी प्राणासी ॥ त्यागीन आतां जाण पां ॥१९॥मग सुदेष्णा बोले वचन ॥ मी तिजहातीं पाठवित्यें अन्न ॥ तूं तिजला आकळून ॥ बळेंचि भोगीं कीचका ॥२०॥कीचक गेला मंदिरासी ॥ सवेंचि प्राप्त जाहली निशी ॥ बोलावूनि सैरंध्रीसी ॥ म्हणे अन्न नेईं कीचका ॥२१॥कीचकासी हें अन्न देईं ॥ सुरा उत्तम घेऊनि येईं ॥ येरी म्हणे सहसाही ॥ मी न जाईं त्या स्थाना ॥२२॥महादुरात्मा कीचक ॥ मी न पाहें त्याचें मुख ॥ मज स्पर्शतां तो मूर्ख ॥ भस्म होईल जाण पां ॥२३॥अतिसहवासेंकरुन ॥ माझें ठाउकें आहे तुज लक्षण ॥ आणिकाहातीं दे पाठवून ॥ मजकारणें योग्य नव्हे ॥२४॥येरी म्हणे मीं पाठविल्यावरी ॥ तो सहसा तुज कांहीं न करी ॥ परम खेद मानूनि सैरंध्री ॥ निघत अन्न घेऊनी ॥२५॥नयनीं वाहती अश्रुधारा ॥ हंसगती जात पांडवदारा ॥ म्हणे श्रीकृष्णा यादवेद्रा ॥ परम संकटीं रक्षीं तूं ॥२६॥मी सत्य पतिव्रता पूर्ण ॥ श्रीकृष्णभजनी असेल मन ॥ तरी त्याची शक्ति होऊनि क्षीण ॥ मज दुर्जन नातळे ॥२७॥वाटेनें जातां सत्वर ॥ द्रौपदी वदे सूर्यस्तोत्र ॥ म्हणे हे भास्कर दिनकर ॥ रक्षीं मज तूं आतां ॥२८॥सकलनेत्रप्रकाशका ॥ अंबर चूडामणे त्रैलोक्यदीपका ॥ दिनकरा तरणी तमांतका ॥ सर्वव्यापका दिनमणे ॥२९॥जाणोनि द्रौपदीचें मानस ॥ सूर्ये पाठविला एक राक्षस ॥ तो रक्षीत द्रौपदीस ॥ गुप्तरुपें चालिला ॥३०॥द्रौपदी येतां कीचक ॥ उभा ठाकला हास्यमुख ॥ म्हणे हें भाग्य तुझें सकळिक ॥ होईं स्वामिणी सर्वस्वें ॥३१॥येरी म्हणे उत्तम सुरा ॥ सुदेष्णेणें मागितली सत्वरा ॥ कीचक म्हणे त्या अवसरा ॥ आणिकाहातीं पाठवितों ॥३२॥ऐसें बोलूनि सव्यहस्तीं ॥ धरिली द्रौपदी महासती ॥ म्हणे भुललासी पापमती ॥ व्यभिचारिणी मी नव्हें ॥३३॥द्रौपदीनें आसुडिला हस्त ॥ करें लोटिला कीचक तेथ ॥ रक्षकराक्षसें अकस्मात ॥ पाडिला गुप्त धरेवरी ॥३४॥वृक्ष उन्मळोनि पडिला ॥ तैसा उताणा आपटला ॥ तेथूनि धांवत द्रुपदबाळा ॥ राजसभेसी पातली ॥३५॥राजा आणि कंक ॥ बैसले प्रधान सभानायक ॥ तंव मागूनि कीचक ॥ धांवत सभे पातला ॥३६॥केशीं धरुनि उन्मत्त ॥ द्रौपदीस मारिली लात ॥ तों राक्षस होता जो गुप्त ॥ तेणें कीचक धुमसिला ॥३७॥गुप्तरुपें लत्ताप्रहार ॥ कीचकासी दिधले अपार ॥ भूमीपरी पाडिला दुराचार ॥ भोंवंडी नेत्र मूर्च्छेनें ॥३८॥तेव्हां सभेसी होता वृकोदर ॥ रागें दशनीं रगडिला अधर ॥ खदिरांगारासम केले नेत्र ॥ भोंवयां गांथी घातली ॥३९॥उठोनियां भीमसेन ॥ कीचकाचा घेऊं पाहे प्राण ॥ तों धर्मे भ्रूसंकेत दावून ॥ म्हणे नव्हे वेळ ही ॥४०॥दिवस उरले किचित ॥ प्रकट होईल लोकांत ॥ ऐसें जाणोनि स्वस्थ ॥ भीम बैसला उगाचि ॥४१॥अंकुशें आकर्षिला वारण ॥ कीं उदकें शांतविजे हुताशन ॥ कीं महाभुजंग बळेंकरुन ॥ आकर्षी जैसा मंत्रवादी ॥४२॥अन्योक्तीनें धर्म बोलत ॥ इंधन होईल तुज बहुत ॥ वृक्ष तोडूं पाहसी येथ ॥ नव्हे उचित ये स्थळीं ॥४३॥तरी एकीकडे जाऊन ॥ करीं सावकाश वृक्षखंडन ॥ चितमाजी घालून ॥ भस्म करीं मनेच्छा ॥४४॥उत्तम वृक्ष रक्षूनी ॥ कंटकतरु तोडावे मुळींहूनी ॥ वृश्चिक निघतां सदनीं ॥ पादरक्षेनें ताडिजे ॥४५॥दृष्टीं पडतां दंदशूक ॥ आधीं ठेंचावें त्याचें मुख ॥ रक्षावे जीव सात्त्विक ॥ सांगणें बहुत नलगेचि ॥४६॥इकडे द्रुपदराजकुमारी ॥ नेत्रीं अश्रु येती खेद करी ॥ माझे गंधर्व असतां अंबरीं ॥ सूतपुत्रें मज मारिलें ॥४७॥पंच गंधर्व महामती ॥ काय हें निर्वाण पाहती ॥ त्यांच्या क्रोधाची शांती ॥ कैसी जाहली एकसरें ॥४८॥काय जाहला त्यांचा पुरुषार्थ ॥ न जाणती एवढा अनर्थ ॥ राया तूं कैसा आहेस पाहात ॥ अद्भुत अन्याय या वेळे ॥४९॥न्यायान्यायनिवाडा न करी ॥ तरी तो राजा नव्हे निर्धारीं ॥ विराटा तुझे सभेभीतरी ॥ धर्म नाहींच वाटतें ॥५०॥तुम्ही म्हणवितां सभासद ॥ दृष्टीं देखतां अनर्थ ॥ लोक द्रौपदीस स्तवीत ॥ म्हणती सत्य बोलतेसी ॥५१॥कीचक परम चांडाळ ॥ हा राज्य बुडवील सकळ ॥ याचे भिडेनें भूपाळ ॥ सर्वथा कांहीं बोलेना ॥५२॥येणें वास्ना धरिली विपरीत ॥ तरी जवळी यासी आला मृत्यु ॥ ऐसें सरस्वती भविष्य सांगत ॥ जन मुखें करुनियां ॥५३॥कंक म्हणे सैरंध्रीप्रती ॥ पंच गंधर्व तुझे पती ॥ संकटीं मोठे पडिले असती ॥ यास्तव न येती धांवोनि ॥५४॥न्याय अन्याय निर्धार ॥ अवलोकीत जगदीश्वर ॥ कर्ता हर्ता सूत्रधार ॥ तो करील साच तेंचि ॥५५॥ईश्वर आहे जयवंत ॥ तो क्षणांत करील विपरीत ॥ तूं मंदिराप्रति जाईं त्वरित ॥ सुदेष्णेपाशीं सांग हें ॥५६॥विपरीत कर्माची गती ॥ समर्थ महाव्यसनीं पडती ॥ न्याय अन्याय न लक्षिती ॥ विपरीत गति कालाची ॥५७॥तुझे पतींचा कोण समय ॥ हें तूं सैरंध्री नेणसी काय ॥ कालप्रतीक्षा करिती पाहें ॥ वरारोहे गंधर्व तुझे ॥५८॥तूं रडतेस दुःखेंकरुन ॥ तेणें मत्स्यराज्यांत होईल विघ्न ॥ असो सैरंध्री तेथून ॥ मंदिराप्रती प्रवेशली ॥५९॥मुक्तकेशा आरक्तनेत्री ॥ श्वासोच्छवास टाकी वक्रीं ॥ सुदेष्णा म्हणे चारुगात्री ॥ कां रडसी वरारोहे ॥६०॥सैरंध्रे सांगे वर्तमान ॥ सुदेष्णा म्हणे ऐकें वचन ॥ कीचकासी मी दंड करीन ॥ न धरीं अन्य मनीं तूं ॥६१॥द्रौपदी म्हणे त्यासी मारणार ॥ वेगळेचि असती साचार ॥ अर्कसुताचें पाहावया मंदिर ॥ जाईल क्षण न लागतां ॥६२॥मग द्रुपदबाळा गृहीं जाऊन ॥ करिती जाहली सचैल स्त्रान ॥ चांडाळ स्पर्शला म्हणोन ॥ श्रीकृष्णनामजक करी ॥६३॥सर्व प्रायश्वित्तांसी कारण ॥ श्रीहरीचें नामस्मरण ॥ यावरी रजनींत उठोन ॥ द्रौपदी जाय गुप्तरुपें ॥६४॥जे प्रत्यक्ष भवानी ॥ कीचकवध इच्छी मनीं ॥ भीमाजवळी येऊनी ॥ एकांतीं सांगे निजगुज ॥६५॥झोंप लागली तुम्हां कैसी ॥ ऊठ महावीरा काय पाहसी ॥ माझी दुर्दशा सभेसी ॥ केली कैसी दुर्जनें ॥६६॥कष्ट भोगिले अमित ॥ सर्वांसी कारण कपटद्यूत ॥ खेळूनि राज्य हरविलें समस्त ॥ म्हणोनि कंक सेवा करी ॥६७॥व्यास नारदादि विदुर ॥ यांहीं शिकविले बहु प्रकार ॥ ते अवघे विसरोनि युधिष्ठिर ॥ द्यूत खूळोनि बुडविलें ॥६८॥पृथ्वीचे राजे कर जोडून ॥ धर्माचें करिती स्तवन ॥ तो पराचें भक्षूनि अन्न ॥ अतिदीन दिसताहे ॥६९॥हरिश्चंद्र पृथ्वीपति सत्य ॥ परी डोंबाघरीं सेवा करीत ॥ तैसाचि धर्म खेळोनि द्यूत ॥ सेवा येथें करीतसे ॥७०॥जो धर्म मयसभेसी ॥ बैसे वेष्टितमहर्षी ॥ गजस्कंधी बैसोनि जयापाशीं ॥ भाट वर्णिती पृथ्वीचे ॥७१॥दहा सहस्त्र संन्यासी ॥ सुखें राहिले धर्मपाशीं ॥ धर्माश्रयें महर्षी ॥ कुटुंबांसह राहिले ॥७२॥सदा घरी अन्नसत्र ॥ लक्षावधि जेविती विप्र ॥ ज्या अन्नसुवासें अमर ॥ लाळ घोंटिती जेवावया ॥७३॥तोचि हा धर्म येथ ॥ कंका कंका ये त्वरित ॥ म्हणोनि विराटराव बोलावीत ॥ खेळों द्यूत पोटभरी ॥७४॥केरळदेशींचा नृपती ॥ राजसूययज्ञीं आला भेटीप्रती ॥ रत्नजडित उपानह हातीं ॥ आणोनि पुढें ठेविल्या ॥७५॥एकीं हिर्यांच्या पादुका आणोनी ॥ स्वहस्तें लेवविल्या धर्मचरणीं ॥ तो धर्मराज परसदनीं ॥ पाहतें मी दीनाऐसा ॥७६॥तैसाचि तूं महाराज भीम ॥ अंतकाहूनि थोर पराक्रम ॥ हिडिंब बक अधम ॥ न लागतां क्षण मर्दिले ॥७७॥पर्वत भुजबळें लोटोनी ॥ समान करिशील हे धरणी ॥ तो तूं विराटाचे सदनीं ॥ स्वयंपाकी जाहलासी ॥७८॥ऐसा तूं महामती ॥ तुज सभेस नेऊनि भ्याडविती ॥ सकल स्त्रिया हांसती ॥ मी खेद चित्तीं पावत्यें ॥७९॥खांडववन देऊनि सत्वर ॥ तृप्त केला वैश्वानर ॥ शरपंथें निर्जर ॥ केले जर्जर समरांगणीं ॥८०॥तो हा बृहन्नटा होऊन ॥ स्त्रियांसी शिकवी नर्तन ॥ गोधन अश्वपालन ॥ सहदेव नकुल करिताती ॥८१॥श्रीरंगाची मी भगिनी ॥ पांचालनृपतीची प्रियनंदिनी ॥ पांडवसिंहांची पत्नी ॥ स्त्रुषा पंडुनृपाची ॥८२॥ते मी विराटसभेंत ॥ कीचकाची साहिली लात ॥ माझा न जाहला देहपात ॥ कासया व्यर्थ वांचलें ॥८३॥विलाप करितां द्रुपदपुत्री ॥ अश्रु आले भीमाचे नेत्रीं ॥ म्हणे चतुर्वक्रा संसारीं ॥ व्यर्थ कासया घातलें ॥८४॥जळो माझ्या भुजांचे बळ ॥ जळो गदा गांडीव सबळ ॥ ईश्वरी क्षोभचि केवळ ॥ आम्हांवरी जाहला ॥८५॥ईश्वर जाहलिया पाठिमोरा ॥ नसतीं विघ्नें येती घरा ॥ महारत्नें होती गारा ॥ कोणी पुसेना तयांतें ॥८६॥आपुलें द्रव्य लोकांवरी ॥ बुडोनि जाय न लाभे करीं ॥ ज्याचें घ्यावें तो द्वारीं ॥ बैसे आण घालोनि ॥८७॥वैरियांकरी सांपडे वर्म ॥ अवदशेनें बुडे धर्म ॥ विशेष वाढे क्रोध काम ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥८८॥अपुले जे कां शत्रु पूर्ण ॥ ज्यांसी आपण गांजिलें दारुण ॥ अडल्या धरणें त्यांचे चरण ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥८९॥लाभाकारणें निघे उदिमास ॥ तों हानीच होय दिवसेंदिवस ॥ पूज्यस्थानीं अपमान विशेष ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥९०॥सुहृद आप्त द्वेष करिती ॥ नसते व्यवहार येऊनि पडती ॥ सदा तळमळ वाटे चित्तीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥९१॥आपुलें राज्य संपत्तिधन ॥ शत्रु भोगूं पाहे आपण ॥ शरीर पीडे व्याधीविण ॥ तरी क्षोभ देवाचा ॥९२॥विद्या जवळी बहुत असे ॥ परी तया कोणी न पुसे ॥ बोलों जातां मति भ्रंशे ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥९३॥वृद्धपणीं ये दरिद्र ॥ स्त्री मृत्यु पावे जाती नेत्र ॥ हेळसिती सुना पुत्र ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥९४॥असो द्रौपदीस म्हणे भीमसेन ॥ कीचकासी आजचि मारीन ॥ मृद्धटवत करीन चूर्ण ॥ पाहें आतां मृगाक्षी ॥९५॥तुज जेव्हां मारिली लात ॥ तेव्हांचि करितों निःपात ॥ परी धर्मे दाविला भ्रूसंकेत ॥ प्रकट होऊं म्हणोनी ॥९६॥हे नीलोत्पलदलवर्णे ॥ हरिमध्ये सुहास्यवदने ॥ पंचदश दिन कुरंगनयने ॥ आतां उरले असती पैं ॥९८॥खेद न करीं सहसाही ॥ द्रौपदी भीमें धरिली हृदयीं ॥ तिचे नेत्रोदकें ते समयीं ॥ अंग भिजलें भिमाचें ॥९९॥भीम म्हणे न करीं शोक ॥ क्षणांत मारितों कीचक ॥ चित्रशाळा सुरेख ॥ रात्रीं शून्य असते पैं ॥१००॥मी तये शाळेंत जाऊन ॥ गुप्तरुपें करितों शयन ॥ कीचकासी सांग जाऊन ॥ चित्रशाळे येइंजे ॥१०१॥तुझा माझा समागम ॥ तेथें होईल मोठा संभ्रम ॥ जाण माझा हाचि नेम ॥ एकटा येईं अंधारीं ॥१०२॥ऐकोनि भीमाचें वचन ॥ द्रौपदी बोले सुहास्यवदन ॥ तुम्हीं आधीं सत्वर जाऊन ॥ तेथें शयन करावें ॥१०३॥मग उठूनि लावण्यसूंदरी ॥ सहज आली बाहेरी ॥ तों कीचक ते अवसरीं ॥ सन्मुख येऊनि बोलत ॥१०४॥म्हणे मजपासूनि अंतर ॥ सैरंध्री पडिलें साचार ॥ तुज म्यां केला लत्ताप्रहार ॥ अपराध क्षमा करीं पैं ॥१०५॥मी तुझा शरणागत पाहीं ॥ एकदां अंगसंग तुझा देईं ॥ हें राज्य माझेंचि सर्वही ॥ विराट काय मशक पैं ॥१०६॥कौरव आणि पांडव ॥ क्षण न लागतां मारीन सर्व ॥ हस्तिनापुरींची राणीव ॥ तुजसहित करीन मी ॥१०७॥द्रौपदी म्हणे कीचकास ॥ तूं कळों नेदीं कोणास ॥ रावराणिवेसी रहस्य ॥ कळों नेदीं तत्त्वतां ॥१०८॥अंधारांत येईं गुप्त ॥ गंधर्वांसी न कळवीं मात ॥ मी जाऊनि चित्रशाळेंत ॥ निद्रा करितें अंधारीं ॥१०९॥तूं न धरीं दुजयाची चाड ॥ तेथें तुझें कोड ॥ भोगिशी सुख उदंड ॥ सांडोनि भीड सर्वही ॥११०॥तों सैरंध्रीशी एकान्त ॥ कीचकें मांडिलासे बहुत ॥ हें जाणोनि विराटें त्वरित ॥ कीचकासी ॥ बोलाविलें ॥१११॥कीचक जाऊनि करी वंदन ॥ म्हणे बोलाविलें कोण कारण ॥ विराट म्हणे अपशकुन ॥ नगरीं बहु होताती ॥११२॥दुष्टस्वप्न देखती नरनारी ॥ शिवा वोभाती अहोरात्री ॥ दिवसा दुर्गभिंतीवरी ॥ शब्द करिती दिवाभीतें ॥११३॥धरणी क्षणक्षणां कांपत ॥ निद्रित नारी ओसणत ॥ अहाहा झाला थोर घात ॥ प्रेतें पसरलीं चहूंकडे ॥११४॥तुज शनैश्वर जन्मस्थ ॥ मज बारावा कठिण बहुत ॥ तुज अथवा मज मृत्यु ॥ सांगती पंडित जाणते ॥११५॥तुज मागणें हेंचि यथार्थ ॥ सोडीं सैरंध्रीची मात ॥ तिचे पांच गंधर्व गुप्त ॥ करितील घात क्षणार्धे ॥११६॥तरी सैरंध्रीशीं एकान्त ॥ करितां होईल तुझा घात ॥ माझें वचन यथार्थ ॥ कीचका मानीं एवढें ॥११७॥हे केवळ आहे कृत्या ॥ कलहकल्लोळघोरसरिता ॥ शक्ररिजनकें नेतां सीता ॥ पावला घाता समूळ ॥११८॥कीचक म्हणे रावणें ॥ दश मस्तकें दिलीं सीतेकारणें ॥ मी सैरंध्रीस एक देणें ॥ परम उचित हें असे ॥११९॥जाईल तरी जावो प्राण ॥ परी मी न सोडीं तिजलागून ॥ तिचें माझें वचन ॥ एकांतीं दृढ जाहलें ॥१२०॥विराट म्हणे तूं कामातुर ॥ भय लज्जा सोडिली समग्र ॥ यावरी कीचक सत्वर ॥ निजमंदिराप्रति गेला ॥१२१॥यावरी तो श्रृंगार ॥ अवघा वेळ करी पामर ॥ दिव्य वस्त्रें दिव्यालंकार ॥ सुगंधें शरीर चर्चिलें ॥१२२॥मरण जवळी आलें असे ॥ बहुत सुंदर कीचक दिसे ॥ जातेसमयीं प्रकाशे ॥ दीप जैसा बहुतचि ॥१२३॥कीचक उतावीळ मनीं ॥ केव्हां प्राप्त होईल रजनी ॥ म्हणे नष्टा वासरमणी ॥ अस्ताचला न जासी ॥१२४॥श्रृंगार करितां बहुवस ॥ सहजचि मावळला दिवस ॥ मध्यरात्र होतां तामस ॥ एकलाचि चालिला ॥१२५॥इकडे चित्रशाळेंत ॥ भीमसेन निजलासे गुप्त ॥ कीचकाची वाट पाहात ॥ तंव तो तेथें पातला ॥१२६॥शून्य अवघें नर्तनागार ॥ पडला असे अंधकार ॥ हळू हळू कीचक पामर ॥ चांचपीत जवळी आला ॥१२७॥कीचक कामें व्यापला जाण ॥ क्रोधें संतप्त भीमसेन ॥ कौतेय तो केवळ पंचानन ॥ कीचक वारण तेथें आला ॥१२८॥कीचक बोले मंजुळ ॥ सैरंध्री तूं धन्य वेल्हाळ ॥ तुजलांगीं मी उतावीळ ॥ सर्व सांडोनि पातलों ॥१२९॥दास दासी बहुत मंदिरें ॥ तुजला सिद्ध केलीं सुकुमारें ॥ दिव्यालंकार दिव्य चीरें ॥ सिद्ध करुनि ठेविलीं ॥१३०॥प्रथम येथें भोग ॥ मग मंदिरा जाऊं सवेग ॥ तूं मज वरिलिया मग ॥ भय नसे कोणाचें ॥१३१॥तुझे पंच गंधर्वांचा निःपात ॥ कर्नि टाकीन क्षणांत ॥ म्यां श्रृंगार केला बहुत ॥ अंधारांत दिसेना ॥१३२॥माझें सौंदर्य देखोन ॥ सकल स्त्रिया करिती स्तवन ॥ तूं न बोलसी एकही वचन ॥ कठिण मन कैसें तुझें ॥१३३॥तूं न बोलसी जरी वचन ॥ तरी मी देईन आपुला प्राण ॥ हें शरीर ओंवाळून ॥ तुजवरुन टाकीन मी ॥१३४॥मग हळूचे बोले भीमसेन ॥ जवळी येईं दे आलिंगन ॥ कीचक तें ऐकोन ॥ अंग स्पर्शत हळू हळू ॥१३५॥भीमें धरिला तयाचा हस्त ॥ भूमीवरी बळें आपटीत ॥ कीचक म्हणे सैरंध्री घात ॥ करुं इच्छिसी माझा तूं ॥१३६॥भीम म्हणे तत्काळ ॥ घे सैरंध्रीचें भोगफळ ॥ कीचक म्हणे हा पुरुष सबळ ॥ गंधर्वचि पातला ॥१३७॥मग मल्लयुद्ध अद्बुत ॥ जाहलें दोन घटिका तेथ ॥ पर्वत पर्वतावरी आदळत ॥ तैसे ताडिती एकमेकां ॥१३८॥करचरण मोडूं पाहती ॥ मुष्टिप्रहार निष्ठुर देती ॥ पृष्ठभागीं गुडघे हणिती ॥ मोडूं इच्छिती मध्यभाग ।१३९॥सुग्रीव आणि वाली ॥ तैसे भिडती तये वेळीं ॥ कीचकही परम बळी ॥ हिडिंबबकांसारिखा ॥१४०॥मग भीमें बळेंकरुन ॥ भूमीवरी पालथा पाडून ॥ ग्रीवा चरण धरुन ॥ मध्यभागीं मोडिला ॥१४१॥कीचकें घोर घोष करुन ॥ तत्काल तेथें सोडिला प्राण ॥ भीमें करचरण मोडून ॥ पोटांत त्याच्या खोंविले ॥१४२॥शिर मोडूनि ते अवसरी ॥ तेंही खोंविलें तयाचे उदरीं ॥ ज्वाला करुनि झडकरी ॥ पांचाळीस दावीत ॥१४३॥मग भीम गेला तेथून ॥ चित्रशाळेबाहेर येऊन ॥ रक्षकांप्रति वचन ॥ सैरंध्री तेव्हां बोलत ॥१४४॥म्हणे उठा उठा सकळिक ॥ गंधर्वीं मारिला कीचक ॥ चुडिया घेऊनि सवेग ॥ पाहते जाहले तेधवां ॥१४५॥तों देखिली मांसाची मोट ॥ सेवकीं नगरांत केला बोभाट ॥ एकशत पांच सदट ॥ बंधू धांवले कीचकाचे ॥१४६॥केचकाकारणें रडतीं समग्र ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ विराट सुदेष्णा सत्वर ॥ गजबजून धांवलीं ॥१४७॥कीचकस्त्रिया बहुत ॥ धांवती महाशब्द करीत ॥ सैरंध्रीपायीं यथार्थ ॥ कीचक मारिला गंधर्वीं ॥१४८॥तों स्तंभाआड सैरंध्री ॥ कीचकीं देखिली ते अवसरीं ॥ केशीं धरोनि झडकरी ॥ ओढिली बळें तेधवां ॥१४९॥म्हणती इच्या पायीं मृत्यु ॥ कीचकासी जाहला सत्य ॥ तरी हीस घालावें अग्नींत ॥ कीचकाचे समागमें ॥१५०॥ऐसें बोलूनि समस्त ॥ द्रौपदी आणि कीचकप्रेत ॥ दोघांसही उचलूनि त्वरित ॥ नेते जाहले चिताभूमीं ॥१५१॥द्रौपदी आक्रोशें रडत ॥ घाबरी चहूंकडे पाहात ॥ म्हणे हे कृष्ण द्वारकानाथ ॥ कोठें गेलासी या वेळे ॥१५२॥जय जयंत विजय ॥ जयत्सेन जयद्वल हो आर्य ॥ धांवा वेगें पाहतां काय ॥ मजला नेलें कीचकांनी ॥१५३॥तुम्ही पांच असतां शिरीं ॥ गांजिलें मज सूतपुत्रीं ॥ ते करुणाशब्द श्रोत्रीं ॥ बल्लवें ऐकिले तेधवां ॥१५४॥इत्युक्यांत रुप पालटोन ॥ गेला नगरदुर्ग उडून ॥ चिताभूमि ओलांडून ॥ हांकें गगन गाजविलें ॥१५५॥महाविटप वृक्ष ते वेळां ॥ भीमें उपटूनि करीं घेतला ॥ कीं कालदंड उभारिला ॥ संहारावया विश्वातें ॥१५६॥भीमाचे अंगवातेंकरुन ॥ महावृक्ष पडती उन्मळोन ॥ पक्ष्यांऐसे उडोन ॥ गगनीं गेले तेधवां ॥१५७॥तेणें उचंबळलें समुद्रजल ॥ हेलावला ब्रह्मांडगोल ॥ पाताळीं फणिपाल ॥ म्हणती कल्पान्त मांडला ॥१५८॥अचाट भीमाची आरोळी ॥ बैसली मेघांची दांतखिळी ॥ तों कीचकीं चिता पाजळिली ॥ ज्वालामाली चेतविला ॥१५९॥तों कीचकीं देखिला दुरोन ॥ येत महावृक्ष घेऊन ॥ म्हणती आला रे धांवोन ॥ सैरंध्रीचा गंधर्व ॥१६०॥एक म्हणती उचला सैरंध्री ॥ वेगें टाका अग्नीमाझारी ॥ अवघे कीचक दुराचारी ॥ ओढिती तेव्हां तियेतें ॥१६१॥एक म्हणती टाका उचलून ॥ गंधर्व काय करील येऊन ॥ तों प्रलयहांक मारुन ॥ भीमसेन पातला ॥१६२॥देखतां भीम भयायक ॥ पळों लागले सर्व कीचक ॥ तों वृक्षघायें सकळिक ॥ एकदांचि संहारिले ॥१६३॥मृत्तिकेचे घट फुटले ॥ कीं मत्कुण एकदांचि रगडिले ॥ एकशत पांच आगळे ॥ संहारिले क्षणार्धे ॥१६४॥द्रौपदीस म्हणे वृकोदर ॥ तूं नगरांत जाईं सत्वर ॥ मग तेथूनि कुंतीकुमार ॥ गुप्तरुपें चालिला ॥१६५॥नगरदुर्ग उडोन ॥ स्वस्थानीं बैसला जाऊन ॥ पूर्वस्वरुप धरुन ॥ बाहेर येऊन पुसतसे ॥१६६॥म्हणे वर्तमान काय जाहलें ॥ कोणीं हे कींचक मारिले ॥ तों सैरंध्री ते वेळे ॥ स्वस्थानासी पातली ॥१६७॥रायासी सांगती दूत ॥ कीचक मारिले समस्त ॥ सैरंध्रे आली घरांत ॥ भयभीत नगर जाहलें ॥१६८॥हे कैंची आणूनि ठेविली ॥ इशीं कोणीं न करावी बोली ॥ इची दृष्टि नव्हे भली ॥ संहारील सकल जनांतें ॥१६९॥इकडे रायें सेवक धाडून ॥ अवघे कीचक एकत्र करुन ॥ एके चितेंत घालून ॥ केले दहन एकदांचि ॥१७०॥क्रियाकर्म समस्त ॥ रायें करविलें यथोक्त ॥ विराट येऊनि मंदिरांत ॥ सुदेष्णेप्रति सांगतसे ॥१७१॥सैरंध्रीस निरोप देईं ॥ इचें काम नसेचि कांहीं ॥ हे कोठील कैसी काई ॥ कलहकारिणी ठेविली ॥१७२॥हे असतां येथें साचार ॥ न राहेचि आमुचें नगर ॥ नगरलोक नारी नर ॥ इचें नाम घेऊं भीती ॥१७३॥इकडे श्रीरंगाची भगिनी ॥ सचैल स्त्रान करी ते क्षणीं ॥ स्वस्थ मानस करुनी ॥ ध्यान धरी श्रीहरीचें ॥१७४॥जपे श्रीकृष्णनाममाला ॥ शीतळ जाहली द्रुपदबाळा ॥ पंचगंधर्वांचे ते वेळां ॥ स्तवन करी द्रौपदी ॥१७५॥मग अंतर्गृहीं जाऊन ॥ घेत बृहन्नटेचें दर्शन ॥ सकल राजकुमारी येऊन ॥ म्हणती धन्य सैरंध्री ॥१७६॥कीचकांहातींची सुटोन ॥ माये आलीस परतोन ॥ बृहन्नटा बोले हांसोन ॥ थोर कल्याण जाहलें ॥१७७॥बृहन्नटेसी म्हणे सैरंध्री ॥ शिकवूनियां राजकुमारी ॥ सुखी आहेस अंतःपुरीं ॥ चिंता सर्व सोडोनियां ॥१७८॥सुदेष्णा म्हणे सैरंध्रीबाई ॥ तूं आतांचि येथूनि जाईं ॥ पुरुषमात्र सर्वही ॥ भीती तुज देखतां ॥१७९॥सैरंध्री म्हणे तेरा दिवस ॥ क्षमा कीजे आम्हांस ॥ माझे भ्रतार पांच पुरुष ॥ कल्याण तुमचें चिंतिती ॥१८०॥तुम्हांवरी उपकार करुन ॥ मग आम्ही जाऊं येथून ॥ स्वस्थ करोनियां मन ॥ सुखें तुम्हीं असावें ॥१८१॥कीचक मारिले सकळी ॥ हे देशोदेशीं मात गेली ॥ इकडे दुर्योधनें ते वेळीं ॥ हेर धाडिले पृथ्वींत ॥१८२॥म्हणे अवनी धुंडावी सकळ ॥ पर्वत वन कठिनस्थळ ॥ पांडव धुंडोनि एक वेळ ॥ ओळखोनि सोडावे ॥१८३॥सप्तद्वीपें नवखंडे ॥ छप्पन्न देश पाहोनि निवाडें ॥ कठिण विवरें पर्वतकडे ॥ शोधूनि दूत परतती ॥१८४॥सुयोधनासी सांगती हेर ॥ माग न लागे अणुमात्र ॥ शोधिलें पांचालनगर ॥ धौम्य पुरोहित तेथें असे ॥१८५॥पांडवांचे पांच पुत्र पाहीं ॥ ते आहेत पांचालगृहीं ॥ सुभद्रा सौभद्र सर्वही ॥ द्वारकेसी आहेत ॥१८६॥पांडवांचा समाचार ॥ कोठें न लागे अणुमात्र ॥ परी विराटनगरीं थोर ॥ अद्बुत एक वर्तलें ॥१८७॥एकशत पांच आगळे ॥ कीचक गंधर्वीं मारिले ॥ ऐसें ऐकतां ते वेळे ॥ मन दचकलें दुर्योधनाचें ॥१८८॥अंग जाहलें सत्त्वहीन ॥ तंव बोलिला वीर कर्ण ॥ दुसरे हेर पाठवून ॥ समाचार आणावा ॥१८९॥गंधर्व कोठील कोण ॥ कीचक मारिले काय कारण ॥ जीमूतमल्ल टाकिला मारुन ॥ तो कोण ओळखावा ॥१९०॥पाणवठां समाचार ॥ कळे ग्रामांतील समग्र ॥ एक म्हणती निर्धार ॥ पांडव नाशातें पावले ॥१९१॥तों द्रोण सांगे पंडुनंदन ॥ श्रीकृष्णभक्तिपरायण ॥ संकट किंवा मरण ॥ कल्पांतींही न पावती ॥१९२॥भीष्म म्हणे धर्मराज ॥ सोमवंशविजयध्वज ॥ अजातशत्रु तेजःपुंज ॥ जयवंत सर्वां ठायीं ॥१९३॥जेथें वसत असेल धर्म ॥ धर्म तेथें आनंद परम ॥ आनंद तेथें आराम ॥ पावती जन सर्वही ॥१९४॥जन तेथें जगदीश्वर ॥ जगदीश्वर तेथें भक्त समग्र ॥ भक्त तेथें परमानंद थोर ॥ वसतसे नेमेंशीं ॥१९५॥आनंद तेथें विचार ॥ विचार तेथें सच्छास्त्र ॥ सच्छात्र तेथें समग्र ॥ संतमंडळी असेल ॥१९६॥संत तेथें अद्वयसुख ॥ सुख तेथें दया अधिक ॥ दया असे तेथें देख ॥ समाधान वसतसे ॥१९७॥समाधान तेथें निजबोध ॥ बोध तेथें अभेद ॥ अभेद तेथें ब्रह्मानंद ॥ निजखूण जाणिजे ॥१९८॥गंगातनय वरिष्ठ ॥ जो विवेकरत्नांचा मुकुट ॥ कीं स्वानंदाचा लोट ॥ सोमवंशीं लोटला ॥१९९॥पांडवांचें निवासस्थळ ॥ तीं लक्षणें वर्णीत निर्मळ ॥ दुर्योधन दुष्ट केवळ ॥ ऐकोनि तटस्थ राहिला ॥२००॥आतां रसाळ कथा पूर्ण ॥ दक्षिण उत्तर गोग्रहण ॥ तो सुरस रस गहन ॥ कर्णपात्रीं घेइंजे ॥२०१॥पांडवपालका ॥ पांडुरंगा । पुंडलीकहृदयारविंदभृंगा ॥ ब्रह्मानंदा निःसंगा ॥ अजा ॥ अव्यया ॥ जगद्नुरो ॥२०२॥श्रीनिवासा श्रीधरवरदा ॥ ब्रह्मांडनायका ब्रह्मानंदा ॥ सुहास्यवदना स्वानंदकंदा ॥ सुरस कथा वदवीं पुढें ॥२०३॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ तेहतिसाव्यांत कर्थियेला ॥२०४॥इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे विराटपर्वणि कीचकवध कौरवचिंतावर्तपतनं नाम त्रयस्त्रिंशाध्यायः ॥३३॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP