मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय २९ वा

पांडवप्रताप - अध्याय २९ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ वनपर्व विशाल गहन ॥ बोलिला सत्यती ह्रदयरत्न ॥ त्याचिये ॥ ज्याचिये मतीशीं मेदिनीवसन ॥ उपमा देतां तुळेना ॥१॥
हरीचे गुण हें चिदाकाश ॥ त्याचा अंत पहावया विशेष ॥ मराळ होऊनि वेदव्यास ॥ भेदीत गेला निजबळें ॥२॥
तोही श्रमला बहुत ॥ नेणेचि गुण गगनाचा अंत ॥ तरी मानवशलभां प्रांत ॥ कैसा पावेल सांग पां ॥३॥
वरुणालयाचें जल अमूप ॥ टिटवा करूं शके केवीं माप ॥ उर्वीवजन होथ सुखरूप ॥ ऐसें करपाळें नसेचि ॥४॥
उचलावया गगनस्वयंभ ॥ ऐसा कोठूनि योजावा स्तंभ ॥ केवढें आहे सूर्यबिंब ॥ तें मशक केवीं पाहोन ये ॥५॥
श्रीमद्भीमातट विहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा रुक्मिणीवरा ॥ या भारता चिया परपारा ॥ माझेनें कदा न जाववे ॥६॥
मी तुझें नाम जपेन अद्भुत ॥ माझेनें न वर्णवे  भारत ॥ किती लिहूं न लागे अंत ॥ म्हणोनि ग्रंथ राहविला ॥७॥
सोडूनि दिधेलें लेखन ॥ पांडुरंगनगरीं स्वेच्छेन ॥ तेथें केलें सुखें शयन ॥ तों नवल पूर्ण जाहलें ॥८॥
स्वयें येऊनि पंढरीनाथ ॥ जवळी बैसोनि थापटीत ॥ श्रीधरा सखया ऊठ त्वरित ॥ लिहीं भारत पुढें तूं ॥९॥
आपुले हातें लेखनी करून ॥ मषीपात्र पुढें आणून ॥ पुस्तक ठेविलें सोडून ॥ करीं धरून ऊठवी ॥१०॥
वदन कुरवाळूनि हातें ॥ हनुवटी धरिली पंढरीनाथें ॥ हातीं देऊनि लेखनीतें ॥ म्हणे पुरतें करीं भारत हें ॥११॥
म्हणे तूम जे जे बोलसी बोल ॥ तेथें रस मी पुरवीन सबल ॥ हा ग्रंथ ह्रदयीं धरितील सकल ॥ भक्त संत पंडित जे ॥१२॥
तो दक्षिणद्वारकानगरविहारी ॥ सच्चिदानंदतनु सूत्रधारी ॥ ऐसें लाघव दावूनि झडकरी ॥ विटेवरी उभा ठेला ॥१३॥
मी सावध होऊनि पाहें ॥ तों लेखनी नीट करूनि स्वयें ॥ मषीपात्र ग्रंथ ठेविला आहे ॥ सोडोनि श्रीविठ्ठलें ॥१४॥
पाठिराखा रुक्पिणीवर ॥ ब्रह्मानंदें जाणोनि श्रीधर ॥ करूनियां जयजयकार ॥ पुढें ग्रंथ चालविला ॥१५॥
अष्टाविंशति अध्याय सुरस ॥ तेथें बहु सांगितला इतिहास ॥ वैशंपायन जनमेजयास ॥ निरोपीत अत्यादरें ॥१६॥
काननपर्व हें विशेष ॥ गोड गहन परम सुरस ॥ जेथें स्वामी वेदव्यास ॥ तीर्थीं अपार बोलिला ॥१७॥
कोणे तीर्थीं कैसें माहात्म्य ॥ तेथींचा यथार्थ ॥ श्रीधर कर जोडूनि विनवीत ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१९॥
तीर्थमाला करितां श्रवण ॥ होय महापापक्षालन ॥ नित्य करितां पठण श्रवण ॥ अपार महिमा नेणवे ॥२०॥
काशी विश्वेश्वर निर्मळ ॥ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ॥ ओंकार अमलेश्वर जाश्वनीळ ॥ बदरिकेदार घृष्णेश्वर पैं ॥२१॥
नागनाथ वैजनाथ थोर ॥ मल्लिकार्जुन भीमाशंकर ॥ सोमनाथ आणि रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंगें द्वादश हीं ॥२२॥
अयोध्या मथुरा हरिद्वार ॥ काशी कांची अवंनीनगर ॥ द्वारावती गोमतीतीर ॥ सप्तपुर्‍या अनुक्रमें ॥२३॥
तीर्थराज मुख्य त्रिवेणी ॥ पंचप्रयाग पुण्यखाणी ॥ ब्रह्मप्रयाग कर्णप्रयाग अघहरणी ॥ गुप्तयाग समर्थ तो ॥२४॥
देवप्रयाग शिवप्रयाग पापहरण ॥ नैमिषारण्य धर्मारण्य ॥ पंचकारण्य ब्रह्मारण्य़ वेदारण्य़ ॥ बदरिकाश्रम पावन तो ॥२५॥
यमुना सरस्वती भागीरथी ॥ गौतमी गोमती कृष्णा भीमरथी ॥ तापी नर्मदा भोगावती ॥ प्रवरा पुण्यवती मंदाकिनी ॥२६॥
आनंदवर्धिनी पयोष्णी ॥ पिनाकी तुंगा कल्मषनाशिनी ॥ कृतमाला कावेरी पयस्विनी ॥ सुवर्ण मुखरी शिशुमालिनी ॥२७॥
कपिला ताम्रपर्णी शरावती ॥ तुंगभद्रा आणि सोमवती ॥ सावित्री रेवा ककुद्मती ॥ वेगवती मलापहारिणी ॥२८॥
घटप्रभा हरिदिनी मालिनी ॥ गंडकी शरय़ू वैतरणी ॥ स्वामिकार्तिकी पंचघृता पृथ्वीवरी ॥ विख्यात प्रवाह जयांचे ॥३०॥
जटाकलिका श्रमहारिणी ॥ महेंद्रकाली त्रिशूली मंत्रर्धिनी ॥ नीरा सुरनदी शंखोद्धारिणी ॥ जयंती आणि अहिर्णवी ॥३१॥
नाटका आनी अलकनंदा ॥ फल्गु सर्वांतका त्रिपदा ॥ शांता बाणनदी सुखदा ॥ मणिकर्णिका नद्या सर्व ॥३२॥
शेषाद्रि आणि ब्रह्माद्रि ॥ मूळपीठ पर्वत सह्याद्रि ॥ विंध्याद्रि आणि हिमाद्रि ॥ मानससरोवरीं स्नानदान ॥३३॥
अरुणाचल आनंदवर्धन ॥ कमलालय चिदंबर पूर्ण ॥ अगस्त्याश्रम पावन ॥ श्रीरंगपट्टण शोभिवंत ॥३४॥
जनार्दन कन्याकुमारी ॥ शिवकांची विष्णुकांची सुंदरी ॥ मत्स्यतीर्थ पक्षितीर्थ उर्वीवरी ॥ शंखोद्धार वेदोद्धार पैं ॥३५॥
हिरण्यनदी संध्यावट ॥ ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभत ॥ ब्रह्मयोनि पृथोदक वरिष्ठ ॥ कुरुक्षेत्र बिंदुतीर्थ पैं ॥३६॥
धर्मालय कलापग्राम ॥ गंगासागर सिंधुसंगम ॥ कौंडिण्यपुर अंबिका परम ॥ प्रेमपुर मार्तंड पैं ॥३७॥
बाळा कल्होळ कल्हेश्वरी ॥ विराटस्वरूपिणी रक्तांबरी ॥ भ्रमरांबा ज्वालामुखी सुंदरी ॥ पीतांबरी महाशक्ति ॥३८॥
जोगळादेवी भैरवी ॥ करवीरवासिनी शांभवी ॥ सप्तश्रृंगी महादेवी रौद्रवी ॥ हिंगुळजा आणि कमळजा ॥३९॥
नागदेव आणि मोरेश्वर ॥ गुप्तकेदार वटेश्वर ॥ चक्रपाणी कुंदभुलेश्वर ॥ त्रिकूटाचल सुंदर पैं ॥४०॥
हरिहरेश्वर नरसिंहपुर ॥ अक्षय्यवट त्रिकूटाचल पवित्र ॥ मूळमाधन विज्ञानेश्वर ॥ जुनाट नागेंद्र गौतमेश्वर ॥४१॥
सप्तयोजन ॥ कोटेश्वर ॥ दक्षिणप्रयाग माधवेश्वर ॥ सिद्धवट धूतपाप सिद्धेश्वर ॥ पूर्वसागर तीर्थराज ॥४२॥
वैराट पुष्कराज महाबळेश्वर ॥ धूळखेटकशंकर नारायण थोर ॥ मल्लहर सर्वेश्वर पांचालेश्वर ॥ सत्यनाथ पर्णालय ॥४३॥
सिंधुपुर महामुरडेश्वर ॥ आदित्रिमल्ल त्रिसप्तकोटेश्वर ॥ करपात्र ब्रह्मकपालेश्वर ॥ भीमचंडी पुण्यालया ॥४४॥
शिवक्रांती ॥ गोरक्षमठ आश्रम काळहस्ती ॥ वेदपुर गया अरुणावती ॥ उडपी शेषशायी सर्वेश ॥४५॥
त्रिपत्ति अहोबळ स्त्रामितीर्थ ॥ सुबह्मण्य किष्किंधा मातंगपर्वत ॥ हंपीविरूपाक्ष मूर्तिमंत ॥ पंपासरोवर निर्मळ तें ॥४६॥
चित्रकूट रुक्मकूट लोण्हार ॥ अंबुज अयोध्या महंकाऊन ॥ कालचंद्रिका अर्धोदय पवित्र ॥ गोकर्ण कृष्णसागर पैं ॥४७॥
हरिहरतीर्थ जंबुकेश्वर ॥ अनंशायी विमलेश्वर ॥ मंथरा विकर्ण प्रभाकर ॥ विश्रांतिवन तपोवन ॥४८॥
कुंभकोण वृंदारण्य मंजरथ ॥ मातुलिंग धूलिखेटक त्रिविक्रमतीर्थ ॥ मुद्नलमांधाता ओढयाजगन्नाथ ॥ पंढरीक्षेत्र चंद्राभागा ॥४९॥
त्रिकोण आणि कर्ममूळ ॥ नागर गौररंगजळ ॥ असिपुरी नेपाळ आदित्रिमळ ॥ मंथनकाळेश्वर कुशतर्पण ॥५०॥
मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर ॥ सिता असिता चिदंबरेश्वर ॥ ब्रह्मकटाह हरिद्वार ॥ आदित्य वैश्वानर महातीर्थ ॥५१॥
ब्रह्यानंदें म्हणे श्रीधर ॥ इतुकीं तीर्थें करूनि युधिष्ठिर ॥ गंधमादनपर्वतीं पंडुकुमार ॥ द्रौपदीसहित राहिला ॥५२॥
इतुकिया तीर्थांचीं माहात्म्यें विशेष ॥ धर्मासी ऋषि सांगे लोमश ॥ त्यांतील तीर्थें सुरस ॥ ब्रह्मानंदें वर्णिलीं ॥५३॥
अमरावतीस असतां अर्जुन ॥ सकळ विद्या आकळिल्या पूर्ण ॥ तों समुद्रामाजी दोघे जन ॥ निवातकवच दैत्य वसती ॥५४॥
ते माजले बहुत असुर ॥ समरीं पराभविला सुरेश्वर ॥ देवीं युद्ध केलें अपार ॥ परी ते सहसाही नाटोपती ॥५५॥
चिंताक्रांत पुरंदर ॥ देखोनि बोले पंडुकुमार ॥ आज्ञा मज द्या सत्वर ॥ निवातकवच वधावया ॥५६॥
ऐसें ऐकतां पाकशासन ॥ ह्रदयीं धरिला प्रेमें अर्जुन ॥ सबीज मंत्र शस्त्रें देऊनि ॥ धर्मानुज धाडिला ॥५७॥
इंद्रस्यंदनारूढ पंडुनंदन ॥ मातिलि सारथी कुशल पूर्ण ॥ मनोगतीं रथ चालवून ॥ मेदिनीवसनतीरा आले ॥५८॥
लेकेऐसें त्यांचें नगर ॥ बळें पराक्रमें अतिथोर ॥ त्रिभुवनपीडक असुर ॥ शचीवर धाक वाहे ॥५९॥
देवदत्त कुंतीकुमार ॥ वाजवितां दणाणलें नगर ॥ भयें गडबडला सागर ॥ निवातकवच हडबडिले ॥६०॥
निवातकवच घेऊनि वाहिनी ॥ बाहेर आले तये क्षणीं ॥ तों अर्जुनें व्यापिलें बाणीं ॥ गगनीं वासरमणि दिसेना ॥६१॥
जैसे रावण कुंभकर्ण ॥ रामें मारिले पराक्रमेंकरून ॥ तैसा सप्तदिवस अर्जुन ॥ युद्ध निर्वाण करिता जाहला ॥६२॥
वृक्ष शिळा पर्वत ॥ पार्थावरी टाकिती अपरिमित ॥ परी सुघड धनुर्धर सुभद्राकांत ॥ आपणावरी पडों नेदी ॥६३॥
नाना प्रकारचीं अस्त्रें ॥ संख्येरहित वर्षती शस्त्रें ॥ विमानीं बैसोनि दशशतनेत्रें ॥ पाहिलें युद्ध तयांचें ॥६४॥
युद्ध करितां अद्भुत ॥ निवातकवच होती गुप्त ॥ नाना मायावी रूपें धरीत ॥ तरी पार्थ नाटोपे ॥६५॥
शेवटीं ब्रह्मास्त्र घालून ॥ पार्थें एकाचि शरेंकरून ॥ दोघांचीं शिरें छेदून ॥ इंद्रापाशीं पाठविलीं ॥६६॥
जाहला एकचि जयजयकार ॥ आनंदाश्रु टाकी सहस्त्रनेत्र ॥ निजहस्तें पुष्पसंभार ॥ पार्थमस्तकीं ओपीत ॥६७॥
वाजती दुंदुभी एके घाईं ॥ नाद न माये भुवनत्रयीं ॥ पार्थें शत्रुनगरीं ते समयीं ॥ ठानें बसविलें देवांचें ॥६८॥
विजयी होऊनि अर्जुन ॥ येत अमरावतीस परतोन ॥ देवभारांशीं सहस्त्रनयन ॥ सामोरा येऊन आलिंगी ॥६९॥
दिव्य वस्त्रादि भूषणीं ॥ आत्मज गौरविला ते क्षणीं ॥ यावरी शक्राची आज्ञा घेऊनी ॥ पार्थ खालीं उतरला ॥७०॥
बैसोनियां दिव्य रथीं ॥ पुढें धुरे मातलि सारथी ॥ गंधमादनपर्वतीं ॥ अकस्मात उतरला ॥७१॥
मूर्तिमंत सूर्यचि उतरला ॥ तैसा विजय धम देखिला ॥ चौघे बंधु ते वेळां ॥ पुढें धांवती भेटावया ॥७२॥
पांच संवत्सरपर्यंत ॥ अंतरला होता वीर पार्थ ॥ धर्में देखतां अकस्मात ॥ आनंदाश्रु लोटले ॥७३॥
कनकदंड पडे धरणीवरी ॥ तैसा पार्थ धर्मासी नमस्कारी ॥ दोन्ही भुजा पसरोनि झडकरी ॥ युधिष्ठिर आलिंगी ॥७४॥
रामें ह्रदयीं धरिला भरत ॥ कीं संजीवनी साधिल्या यथार्थ ॥ कचासी आलिंगी अमरनाथ ॥ तेवीं पार्थ युधिष्ठिरें ॥७५॥
रेवतीरमर्णें रुक्मिणीजीवन ॥ धरिजे ह्रदयी प्रीतीकरून ॥ तैसा वृकोदरें अर्जुन ॥ ह्रदयीं द्दढ आलिंगिला ॥७६॥
षडास्य आणि गजास्य ॥ ह्रदयीं धरी ब्योमकेश ॥ तैसा नकुलसहदेवांस ॥ सुभद्राकांत भेटला ॥७७॥
धौम्यचरणांवरी माथा ॥ ठेवी तेव्हां अभिमन्युपिता ॥ लोमशादिऋषिसमस्तां ॥ अनुक्रमें वंदिलें ॥७८॥
सुहास्यवदनी पद्मलोचनी ॥ जे कृष्णा श्रीरंगभगिनी ॥ ते अर्जुनाचे चरणीं ॥ मस्तक ठेवी आदरें ॥७९॥
रथासहित मातलि पूजिला ॥ शक्रापाशीं पाठविला ॥ मग स्वर्गींच्या कथा सकल ॥ पार्थ सांगे सविस्तर ॥८०॥
उत्तम वस्त्रें अलंकार ॥ अमूल्य वस्तूंचे संभार ॥ इंद्रें दिधले सकल उपचार ॥ ते धर्मापुढे समर्पी ॥८१॥
तों सकल देवांसहित ॥ विमानीं बैसोनि अमरनाथ ॥ गंधमादन पर्वत ॥ लक्षूनि खालीं उतरला ॥८२॥
सामोरे धांवूनि पांडव ॥ सप्रेम वंदिला वासव ॥ पांचांसी भेटूनि गौरव ॥ इंद्रें बहुत दिधला पैं ॥८३॥
पांडवीं तेव्हां सप्रेम रीतीं ॥ आदरें पूजिला अमरपती ॥ कर जोडूनि पुढें तिष्ठती ॥ तंव बोले पाकशासन ॥८४॥
अल्पकालेंकरून ॥ शत्रु जातील संहारून ॥ द्विरदपुरीचें छत्र सिंहासन ॥ प्राप्त होईल तुम्हांसी ॥८५॥
ऐसें सांगोनि सहस्त्रनेत्र ॥ स्वपदासी गेला सत्वर ॥ इकडे पांचालीसह पंडुकुमार ॥ द्वैतवनाप्रति जाती ॥८६॥
मार्गीं जातां पंडुनंदन ॥ वृषपर्व्याचें देखिलें वन ॥ तेथें प्रवेशला भीमसेन ॥ करी गर्जन अट्टहास्यें ॥८७॥
भीमाची गर्जना ऐकोन ॥ भयें वनचरांचे गेले प्राण ॥ तों महाअजगरें धांवोन ॥ भीमसेन धरियेला ॥८८॥
नवनागसहस्त्रबळी पूर्ण ॥ तो अजगरें केला क्षीण ॥ सर्वांगासी वेढे घालून ॥ वृकोदर आकळिला ॥८९॥
कां न येचि अजूनि भीम ॥ मग पाहों पातला धर्म ॥ तों अजगरें वेष्टिला परम ॥ बलक्षीण जाहला ॥९०॥
धर्म म्हणे हे अजगरा ॥ तुज देतों बहुत आहारा ॥ सोडीं माझिया वृकोदरा ॥ यावरी अजगर काय अबोले ॥९१॥
या भीमासी मी भक्षीन ॥ तुजलाही सवेंचि गिळीन ॥ धर्म म्हणे तूं कोण ॥ पूर्व स्मरोन सांग पां ॥९२॥
अहि म्हणे मी राव नहुष ॥ पुण्यक्रिया केली विशेष ॥ याग केले निर्दोष ॥ मिति दानां नसेचि ॥९३॥
धरोनियाम सहस्त्र ब्राह्मण ॥ त्यांचे स्कंधीं शिबिका देऊन ॥ मी तीमाजीं बैसोन ॥ अमरावतीये चालिलों ॥९४॥
अन्याय देखोनि अमूप ॥ कुंभोद्भवें दिधला शाप ॥ या सर्पयोनीं पापरूप ॥ बहुकाळ राहिलों ॥९५॥
तरी मी पुसतों जे प्रश्न ॥ ते सांगें आधीं मजलागून ॥ मग सोडीन भीमसेन ॥ सत्य जाण धर्मराया ॥९६॥
शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ सांग यांचें काय लक्षण ॥ अजातशत्रु धर्म पूर्ण ॥ विप्रमहिमा वर्णीत ॥९७॥
शम दम शौच तप जाण ॥ संतोष क्षमा आर्जव पूर्ण ॥ भगवद्धक्ति दया सत्य संपूर्ण ॥द आस लक्षणें ब्राह्मणांचीं ॥९८॥
तेज बळ धृति शौर्य ॥ तितिक्षा प्रजापलन औदार्य ॥ स्थिरबुद्धि ब्राह्मणभक्ति ऐश्वर्य ॥ दश लक्षणें क्षत्रियांचीं ॥९९॥
आस्तिक्यबुद्धि विप्रसेवन ॥ ब्रह्मनिष्ठता अदंभभजन ॥ निर्मत्सर हे पांच गुण ॥ वैश्याचे अंगीं जाण पां ॥१००॥
गायीद्विजांचें पालन ॥ भग्वद्धक्ति भूमिसेवन ॥ पांचवें लक्षण दान ॥ शूद्रचिन्हें जाण हीं ॥१०१॥
जैसा मुकुटावैरि हिरा पूर्ण ॥ तैसा श्रेष्ठा ब्राह्मण जाण ॥ ज्याचें पद रुक्मिणीरमण ॥ ह्रदयीं मिरवी तत्त्वतां ॥१०२॥
दशावतारांची घरटी ॥ गोब्राह्मणपालनासाठीं ॥ स्वयें घेत जगजेठी ॥ धन्य सृष्टीं ब्राह्मण ॥१०३॥
तीन सप्तकें मही ॥ निर्वीर केली सर्वही ॥ विप्रांसी दिधली पाहीं ॥ भार्गवरामें जाण पां ॥१०४॥
ब्राह्मण रंकाचा करिती इंद्रा ॥ ब्राह्मणें प्राशिला समुद्रा ॥ कोपोनि क्षयरोगी केला चंद्रा ॥ सहस्त्रभगें शचीवरा ॥१०५॥
ब्राह्मणशाप दारुण ॥ जाहलें शिवाचेम लिंगपतन ॥ सागरीं स्वर्गसंपत्ति संपूर्ण ॥ ब्राह्मणशापें पडियेली ॥१०६॥
म्हणूनि सर्वभावेंकरून ॥ प्रसन्न करावे ब्राह्मण ॥ ऐसें अजगरें ऐकोन ॥ भीमसेन सोडिला ॥१०७॥
दिव्यदेह पावोनि विशेष ॥ विमानीं बैसोनि गेला नहुष ॥ मग द्वैतवनाप्रति निःशेष ॥ पांडव आले पूर्वस्थळीं ॥१०८॥
जो ब्रह्मांडनायक परमात्मा ॥ संगें घेऊनि सत्यभामा ॥ जाणोनि पांडवांच्या प्रेमा ॥ भेटला तेव्हां येऊनि ॥१०९॥
पंडुकुमार पांचही जण ॥ द्दढ धरिती कृष्णचरण ॥ ब्रह्मानंदें उचंबळून ॥ द्रौपदी वंदी जगदीश्वरा ॥११०॥
धर्मराज म्हणे यादवेंद्रा ॥ सुखी कीं अभिमन्यु सुभद्रा ॥ आनकदुंदुभि देवकी गुणसमुद्रा ॥ बलभद्र सुखी असे कीं ॥१११॥
मग म्हणे मीनध्वजतात ॥ सुखरूप आहेत समस्त ॥ परी तुमचा समस्तांसी हेत ॥ निशिदिवस लागला ॥११२॥
शर्म म्हणे अरविंदनेत्रा ॥ अभिनवजलधरकोमलगात्रा ॥ तारकारिजनकप्राण मित्रा ॥ जगदीशा जनार्दना ॥११३॥
ऐशियावरी जगज्जीवन ॥ द्वारके गेला आज्ञा घेऊन ॥ त्यावरी मार्कंडेय येऊन ॥ पांडवांसी भेटला ॥११४॥
पांडवीं तयासी नमूनी ॥ परमादरें पूजिला मुनी ॥ मार्कंडेय म्हणे धर्मा येथूनी ॥ कलियुग जवळी असे पैं ॥११५॥
तुम्हांसारिखे धर्मपरायण ॥ कलियुगीं न होती सज्जन ॥ धृतराष्ट्राऐसे दुर्जन ॥ बहुसाल जन्मतील ॥११६॥
कलि प्रवर्तेल दारूण ॥ एकरूपी होतील चार्‍ही वर्ण ॥ कोणी कोणाचा विटाळ न मानून ॥ यथासुखें वर्तती ॥११७॥
विप्र वेदमंत्र त्यजून ॥ करितील शूद्राचें आचरण ॥ स्त्रिया पुरुषांसी छळून ॥ जारकर्मीं रत होती ॥११८॥
बुडेल वेदशास्त्रपुराण ॥ नाना कुतर्क उठतील पूर्ण ॥ टाकूनि शिवविष्णुपूजन ॥ कुमार्गा जन आचरती ॥११९॥
ब्राह्मणकर्म गायत्रीजप ॥ शूद्र आवरतील पापरूप ॥ स्वधर्म सांडोनि विप्र अमूप ॥ शूद्रकर्में आचरती ॥१२०॥
गायी म्हशी न दुभती ॥ अवि अजा लोक पाळिती ॥ मद्यमांसरत जन होती ॥ मत्स्य भक्षिती मुख्य वर्ण ॥१२१॥
देव नवसा न पावती ॥ पाषाणप्रतिमा केवळ उरती ॥ तेथें कोणी न भजती ॥ यवन टाकिती फोडूनि ॥१२२॥
मातापितरांची निंदा ॥ पुत्र करितील बहु आपदा ॥ शिष्य न धरिती गुरुमर्यादा ॥ आज्ञा कदा न पाळिती ॥१२३॥
देवनिंदा करिती अपार ॥ तेणें येईल दरिद्र ॥ विधवांचीं धनें समग्र ॥ नेतील नूप हिरोनि ॥१२४॥
विप्र घेतील दुषदान ॥ राजे होतील कोशहीन ॥ पापद्र्व्य मेळवून ॥ धर्मवाटा पाडिती ॥१२५॥
क्षात्रधर्म सोडून ॥ समर सांडूनि घेतील रान ॥ कन्या उगाचि उचलून ॥ नेती एकएकांच्या ॥१२६॥
शाखाभेदक गोत्रें सकळ ॥ बुडोनि होती म्लेच्छ केवळ ॥ चार्‍ही वर्णांत होईल ऐकमेळ ॥ वाढेल कुमार्ग पैं ॥१२७॥
आगम राहील एकीकडे ॥ भ्रष्ट होतील रोकडे ॥ वृद्धांच्या बुद्धीं चोहींकडे ॥ बालवत होतील पैं ॥१२८॥
स्वेच्छाचारें स्त्रिया पुरुष ॥ दाता नाहींच निःशेष ॥ विप्र विकिती नानार्स ॥ ध्यान स्त्रियांचें परपुरुषीं ॥१२९॥
लोपेल वैराग्य भक्ति ज्ञान ॥ वाढेल कापटय जारण मारण ॥ नाना उपाय करून ॥ द्रव्या हरिती परस्परें ॥१३०॥
टाकिती उद्यानें मोडून ॥ तीर्थयात्रा जाती लोपोन ॥ शूद्र विप्रांचा करितील अपमान ॥ द्रव्य हरून नेतील ॥१३१॥
विप्र गिरिकंदरें सेवितीं ॥ तस्कर चहूंकडे प्रकटती ॥ शूद्र गुरुत्व भोगिती ॥ शिष्य होती विप्र त्यांचे ॥१३२॥
शूद्रमुखें पुराण ॥ ऐकों लागतील ब्राह्मण ॥ होतील हिंसापरायण ॥ क्षेत्रमहिमा लोपेल ॥१३३॥
बीजें सकळ जाती जळोन ॥ मंत्रीं सत्त्वा न राहे संपूर्ण ॥ आपणा आवडे तोचि जाण ॥ मान्य करितील आचार ॥१३४॥
गुरुत्व जाईल बुडोन ॥ अकालीं वर्षेल घन ॥ करितील मातापितागुरुहनन ॥ विष घालोन परस्परें ॥१३५॥
सूर्य तपेल फार ॥ वायूचा उत्कर्ष अपार ॥ अनावृष्टि अतिवृष्टि क्षोभेल वैश्वानर ॥ गंगा ग्राम बुडविती ॥१३६॥
पौर्णिमा कुहू सांडून ॥ आडतिथीस लागेल ग्रहण ॥ पुत्राश्रय संपादून ॥ स्त्रिया मारिती भ्रतारा ॥१३७॥
कोणी कोणाचा स्त्रेह न धरी ॥ द्र्व्यलोभी जन अहोरात्रीं ॥ प्राणान्त जाहलिया निर्धारीं ॥ ठेवणें आपुलें न सांगती ॥१३८॥
संत ब्राह्मण राव दाता ॥ कलियुगीं विरळा चारी वस्ता ॥ पुत्र सेवक बंधु शिष्य तत्त्वतां ॥ श्री नाहीं कलियुगीं ॥१३९॥
अधर्मरत सर्व जन ॥ द्र्व्यालागीं वेंचिती प्राण ॥ असत्यक्रिया करून ॥ भाषनेम मोडिती ॥१४०॥
परधन परदारा ॥ यालागीं अनर्थ होतील राजेंद्रा ॥ ज्याचें ऋण घ्यावें त्या सत्वरा ॥ विष घालूनि मारिती ॥१४१॥
माता आणि पितर ॥ यांसी पुत्र घालिती बाहेर ॥ बालविधवा करोनि भ्रतार ॥ करिती संसार अन्यदेशीं ॥१४२॥
वेदविक्रय करितील ब्राह्मण ॥ कन्यागोरसविक्रय करितील पूर्ण ॥ वृक्ष निष्फल धेनु न दुभती जाण ॥ समयीम घन वर्षेना ॥१४३॥
माता पिता आणि सुत ॥ द्र्व्यसंबंधें यांत अनर्थ ॥ माता करितील पुत्रघात ॥ मागें पुढें न पाहती ॥१४४॥
पुत्र क्मारिळ पित्यातें ॥ सुत मरेल पितृहस्तें ॥ भ्रताराचे प्राणातें ॥ स्त्री घेईल धनलोभें ॥१४५॥
बंधूंचा घेती प्राण ॥ गुरुशिष्यांत विकल्प पूर्ण ॥ संन्यासी दिगंबर धन ॥ सांचवून ठेविती ॥१४६॥
साधु राजद्वारा धांवती ॥ धनाढयाप्रति ज्ञान बोधिती ॥ भक्ति वैराग्य ज्ञान शांती ॥ यांसी न देती ठाव कोणी ॥१४७॥
चोरी हिंसा अनृत दंभ भेद ॥ काम क्रोध वैर मद ॥ अविश्वास कपटवाद ॥ वर्धमान होती पैं ॥१४८॥
कलियुग घोर बहुत ॥ सर्वधर्मविवर्जित ॥ पापाचे होतील पर्वत ॥ पुण्य सर्षपप्रमाण ॥१४९॥
सरिता तीर्थें जाती आटून ॥ न दिसे भागीरथीचें जीवन ॥ शिश्रोदरपरायण ॥ लोक होतील सर्वही ॥१५०॥
करितील स्त्रियांची भक्ती ॥ हेमकिंकर सर्व होती ॥ सर्व ब्रह्म वाचे वदती ॥ समस्त टाकिती सत्कर्में ॥१५१॥
परस्त्रियेप्रति मानस आसक्त ॥ वादप्रतिवादा सदा उदित ॥ नास्तिक्य पशुबुद्धि समस्त ॥ विद्या किंचित मद बहु ॥१५२॥
गुरूचा करिती अपमान ॥ रात्रंदिवस पाहती न्य़ून ॥ म्हणती याचा नाहीं बरा गुण ॥ जाती शरण आणिका ॥१५३॥
गुरु त्यागितां निश्चयेंशीं ॥ पाणी होती अल्पायुषी ॥ दरिद्री होऊनि नरकासी ॥ जाती अंतीं नेमेंशीं ॥१५४॥
शूद्राचें इच्छी मन ॥ कीं करावें शालिग्रामपूजन ॥ करिती गायत्रीपुरश्चरण ॥ अल्पायुषी नरक पुढें ॥१५५॥
स्वधर्मकर्म निंदिती ॥ द्विजस्त्रियांचे पुनर्विवाह होती ॥ महापाणी स्नुषा निश्चिती ॥ घालिती विष वृद्धांतें ॥१५६॥
जारकर्मीं स्त्रिया रत ॥ लेखिती भ्रतारासी भृतारासी भृत्यवत ॥ धर्म बुडेल समस्त ॥ शौर्यभ्रष्ट क्षत्रिय होती ॥१५७॥
अग्निहोत्रें होतील विच्छिन्न ॥ गुरुभक्ति जाईल उडोन ॥ शतमूर्ख गुरुत्व धरून ॥ भ्रष्टमार्ग आचरती ॥१५८॥
आठ दहा वर्षात ॥ स्त्रिया होतील प्रसूत ॥ एका पुरुषा बहुत ॥ स्त्रिया धांवती जारिणी ॥१५९॥
क्षीरावरी नवनीत ॥ मथितां न निघे किंचित ॥ वृद्धपण षोडश वर्षांत ॥ होईल प्राप्त पुरुषांतें ॥१६०॥
पुरुषांचें भ्रष्टेल पुरुषल ॥ स्त्रियांसी काम अद्भुत ॥ यवनाचा उत्कर्ष बहुत ॥ कलीमाजी राज्य त्यांचें ॥१६१॥
होतां पांच सहस्त्र संवत्सर ॥ भौमदैवतें जातील समग्र ॥ दहा सहस्त्र वर्षें हरिहर ॥ पृथ्वीवरी न वागती ॥१६२॥
येथें तरतील कोण ॥ ऐकें धर्मा त्यांचें लक्षण ॥ परधन परदारा टाकून ॥ हरिस्मरणीं रत जे कां ॥१६३॥
क्कचित उरतील भक्त ॥ तेचि तरतील कलियुगांत ॥ ब्राह्मण्य द्रविडदेशांत ॥ उरेल किंचित शेवटीं ॥१६४॥
कावेरी आणि ताम्रपर्णी ॥ कृष्णामाल अपयस्विनी ॥ या नद्यांचे उदकस्थानीं ॥ ब्राह्मण्य कांहीं उरेल ॥१६५॥
चंद्र सूर्य बृहस्पती ॥ एके राशीस जैं येती ॥ तैं पुण्यक्रिया मागुती ॥ लोक आचरती पूर्ववत ॥१६६॥
मार्कंडेय म्हणे धर्मा ॥ पूर्वीं जैसा शिबिराज धर्मात्मा ॥ युधिष्ठिरा तेवीं तुझा महिमा ॥ एकवदनें न वर्णवे ॥१६७॥
धर्म म्हणे महाऋषी ॥ सांगें शिबिराजाची कथा कैसी ॥ मार्कंडेय म्हणे परियेसीं ॥ सादर चित्त करूनियां ॥१६८॥
सूर्यवंशीं चक्रवर्ति ॥ शिबिराजा उर्वीपति ॥ पुण्यपरायण यशकीर्ति ॥ ज्याची ब्रह्मांडांत न माये ॥१६९॥
तो अयोध्येचा नायक ॥ विधिपूर्वक करितां शतमख ॥ अपार ऋषी मिळाले देख ॥ नामें सांगतां न सरती ॥१७०॥
नव्याण्णव याग संपूर्ण ॥ शिबीनें केले कृष्णार्पण ॥ शेवटींचा क्रतु जाण ॥ आरंभिला आनंदें ॥१७१॥
तों नारद आला अकस्मात ॥ देखोनि परम आश्चर्य करीत ॥ म्हणे धन्य शिबिराय अद्भुत ॥ महिमा याचा न वर्णवे ॥१७२॥
मग इंद्रापाशीं जाऊन ॥ नारद सांगे वर्तमान ॥ म्हणे धन्य शिबिराज सज्जन ॥ शतमख जाण करीतसे  ॥१७३॥
शेवटींचा याग आरंभिला ॥ ऐकतां शचीवर चचकला ॥ सांगातें द्विमूर्धा घेतला ॥ येता जाहला अयोध्ये ॥१७४॥
अग्नि होऊनि कपोत ॥ राजसदनांत जात पळत ॥ श्येनपक्षी अमरनाथ ॥ होऊनि धांवे त्यापाठीं ॥१७५॥
लक्षानुलक्ष महाऋषी ॥ बैसले असतां यागासी ॥ तों कपोत येऊनि रायापाशीं ॥ रक्षीं रक्षीं म्हणतसे ॥१७६॥
कपोत भयभीत होऊन ॥ मांडीवरी बैसला दीनवदन ॥ तों ससाना धांवोन ॥ सभारंगणीं बैसला ॥१७७॥
कपोत म्हणे रायासी ॥ शरणागता घालीं पाठीशीं ॥ नृपश्रेष्ठा पुण्यराशी ॥ सर्व जाणसी शास्त्रार्थ ॥१७८॥
ससाण बोले सत्वर ॥ राया माझा देईं आहार ॥ ज्याचें त्यासी द्यावया विचार ॥ कासया करिसी सांग पां ॥१७९॥
माझा ग्रास घेसी जरी ठेवून ॥ तरी निष्फळ सर्व तुझा यज्ञ ॥ मी प्राणत्याग करीन ॥ आतांचि एथें पृपवर्या ॥१८०॥
राजयाचे पोटांत ॥ भयेंकरूनि कपोत दडत ॥ म्हणे मी पाठीं रिघालों सत्य ॥ नुपेक्षीं तूं स्त्रेहाळा ॥१८१॥
चार सहा अष्टादश बोलत ॥ नुपेक्षावे शरणागत ॥ तरी आपुलें सुकृत ॥ रक्षीं त्वरित पृथ्वीशा ॥१८२॥
ससाणा म्हणे तीन दिवस ॥ पडले निर्वाण उपवास ॥ वनीं कष्टलों बहुवस ॥ देईं ग्रास माझा तूं ॥१८३॥
बैसले तुझे सभेंत पंडित ॥ त्यांसी पुसें हा शास्त्रार्थ ॥ ज्याचें त्यासी देतां निश्चित ॥ यश अद्भुत जोडेल ॥१८४॥
पाहोनि रायाचें वदन ॥ कपोत रडे स्फुंदस्फुंदोन ॥ बाळें माझीं तान्हीं दीन ॥ अशक्त जाण स्त्री माझी ॥१८५॥
अवचित सांपडलों या व्यसनांत ॥ रक्षीं माझा होतो कुटुंबघात ॥ बैसले ऋषिसभे संत ॥ त्यांसी वृत्तान्त पुसें हा ॥१८६॥
ससाणा म्हणे नृपवर्या ॥ घरीं गर्भिण माझी जाया ॥ तुज कैसी नुपजे माया ॥ पडेल काया आतां हे ॥१८७॥
रायासी थोर संकट पडलें ॥ मग सुबुद्धिप्रधान ॥ सुपुत्र बोले ॥ म्हणे जया पाठीसीं घातलें ॥ तयासी देऊं नये तूं ॥१८८॥
ससाणा दवडावा येथून ॥ जीवघातकी परम दुर्जन ॥ ऐसें ऐकतां श्येन ॥ क्रोधानळें खवळला ॥१८९॥
म्हणे सुबुद्धि आणि धर्म ॥ कासया ठेविलें तुझें नाम ॥ नामासारिखी उत्तम ॥ करणी नाहीं तुजपाशीं ॥१९०॥
जंबुक द्दष्टीं देखतां पळे ॥ त्यासी केसरी नाम ठेविलें ॥ दोन्ही नेत्रांसी वडस वाढले ॥ कमलनयन नाम तया ॥१९१॥
कोरान्न मागतां न मिळे अन्न ॥ नाम ठेविलें शचीरमण ॥ क्षीरसिंधूचा जातां प्राण ॥ तक्र कोणी नेदीच ॥१९२॥
नाम जयाचें उदारकर्णं ॥ अडका वेंचितां जाय प्राण ॥ बृहस्पति नाम जयालागून ॥ धड वचन बोलतां न ये ॥१९३॥
निर्नासिका नाम मदन सत्य ॥ परद्वारिया नाम हनुमंत ॥ ज्याचें नाम भास्कर विख्यात ॥ तो अंधारीं पडियेला ॥१९४॥
अजारक्षका नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥ कीं दरिद्रियासी नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥१९५॥
जैसे अजागलस्तन ॥ कीं मुखमंडन बधिरकर्ण ॥ कीं जन्मांधाचे विशाल नयन ॥ तैसेंचि जाण नाम तुझें ॥१९६॥
रासभासी सिंहासन ॥ श्वानासी अग्रपूजा जाण ॥ दिव्यांबर परिधान ॥ उष्ट्रासी काय व्यर्थचि ॥१९७॥
कनकवृक्ष धोत्र्यासी म्हणती ॥ चर्मकगृहींचा लोहहस्ती ॥ पक्ष्या नाम भारद्वाज म्हणती ॥ तैसेंचि नाम तुमचें पैं ॥१९८॥
ऐसें ससाणा बोलोन ॥ तेथें पडे मूर्च्छा येऊन ॥ तंद्री लागली प्राण ॥ सांडूं पाहे तेधवां ॥१९९॥
राव धांवोनि जवळी येत ॥ उदक शिंपूजि सावध करीत ॥ आहार देतों घे घे म्हणत ॥ किंचित उघडी नेत्र तेव्हां ॥२००॥
चंचू पसरी मिचकावी नेत्र ॥ म्हणे कपोत मुखीं घालीं सत्वर ॥ राव म्हणे ससाण्या विचार ॥ एक आतां परिस तूं ॥२०१॥
कपोताचे भारंभार ॥ मांस घेईं करीम आहार ॥ येरू म्हणे नरमांस सत्वर ॥ देईं मज आणोनि ॥२०२॥
चोरहेरांचें घेसी विकत ॥ तें मी नेघें निश्चित ॥ तों सत्यवती येऊनि बोलत ॥ राजपत्नी तेधवां ॥२०३॥
माझें मांस देतें पाहीं ॥ येरू म्हणे न घडे सहसाही ॥ शिबिराज म्हणे माझें घेईं ॥ मान्य करीं पक्षिया ॥२०४॥
अवश्य ससाणा म्हणत ॥ रायें तुळा आणविली तेथ ॥ एके भागीं कपोत ॥ बैसवूनि शस्त्र घेतलें ॥२०५॥
ससाणा म्हणे तये क्षणीं ॥ येथें हाहाकार ॥ करितां कोणी ॥ कीं अश्रुपात ढाळितां नयनीं ॥ जाईन उठोनि राजेंद्रा ॥२०६॥
सत्याचा सागर सत्वधीर ॥ रायें करीं घेतलीं शस्त्रा॥ निजमांस छेदूनि सत्वर ॥ तुळेमाजी घालीतसे ॥२०७॥
रायाचें सत्त्व पाहात ॥ हळूहळू कपोत जड होत ॥ तीन टांक उणें येत ॥ मागुता ओपी चक्रवर्ती ॥२०८॥
विमानीं दाटलें अंबर ॥ करिती आश्चर्य सुरवर ॥ मृत्युलोकीं नारी नर ॥ अत्यद्भुत पाहती ॥२०९॥
वरिचेवरी मांस घाली नृपनायक ॥ मागुती उणें होय तीन टांक ॥ सरलें मांस सकळिक ॥ अस्थि उघडया जाहल्या ॥२१०॥
अस्थि प्राण आणि शिर ॥ उरलीं तेव्हां साचार ॥ माथा डोलविती ऋषीश्वर ॥ सव्यतर्जनी उचलोनि ॥२११॥
तें देखोनि नारदमुनी ॥ गेला विकुंठासी धांवोनी ॥ दीनदयाळा अजूनी ॥ सत्त्व किती पाहसी ॥२१२॥
सर्वांगाचें काढोनि मांस ॥ शिबिरायें दिलें निःशेष ॥ ऐसें ऐकतां सर्वेश ॥ न सांवरत ऊठिला ॥२१३॥
लगबग जाहली बहुत ॥ कौस्तुभमाळा न सांवरत ॥ पीतांबर भूमीस रुळत ॥ सुमनें संडत त्वरें जातां ॥२१४॥
सद्नद होऊनि जगजेठी ॥ रायाचे गळां घातली मिठी ॥ दिव्य शरीर जाहलें द्दष्टीं ॥ लोक सर्व पाहती ॥२१५॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुर वर्षती सुमनसंभार ॥ अयोध्येसह नृपवर ॥ दिव्यविमानीं बैसविला ॥२१६॥
चतुर्भुज नृपासी करून ॥ निजपदीं स्थापिला नेऊन ॥ धर्माप्रति कथा गहन ॥ मार्कंडेय मुनि सांगे हे ॥२१७॥
मुनि म्हणे धर्मराया ॥ शिबीऐसी तुझी चर्या ॥ ऐसी कथा सांगोनियां ॥ ऋषी पावले अंतर्धान ॥२१८॥
किरीटीस म्हणे युधिष्ठिर ॥ तूं शक्रपुरीं होतासी पांच संवत्सर ॥ ईश्वर आणि न निर्जरेंद्र ॥ विद्या शिकलासी त्यांपाशीं ॥२१९॥
चौदा विद्या चौसष्टि कला ॥ अनुच्छिष्ट मंत्रास्त्रमाला ज्यांचा प्रताप आगळा ॥ या त्रिभुवनामाझारीं ॥२२०॥
तरी तीं क्षणभरी सोडोनियां ॥ प्रताप मज दावीं बा धनंजया ॥ येरू म्हणे महाप्रलया ॥ भावितील कीं जन सर्व ॥२२१॥
अस्त्रें सोडितां कुंभिनी ॥ सनग गजबजेल ये क्षणीं ॥ तरी शतांशेंकरूनी ॥ दावीन क्षणैक पहावें ॥२२२॥
नाना अस्त्रांचें प्रेरण ॥ करिता जाहला सुभद्रारमण ॥ विध्यंड डळमळलें तेणेंकरून ॥ अद्भुत तेज प्रकटलें ॥२२३॥
हेलावले सप्तपाताळ ॥ गडबडले देव सकळ ॥ वारणपुरींत हलकल्लोळ ॥ कौरव थरथरां कांपती ॥२२४॥
शारद्वत द्रोण स्वर्धुनीसुत ॥ म्हणती काय मांडिला अंत ॥ द्रोण ज्ञानें विचारीत ॥ पार्थ विद्या दावितो ॥२२५॥
इकडे धर्म म्हणे पार्था ॥ प्राणसखया गुणभरिता ॥ अपुलीं अस्त्रें आवरीं आतां ॥ महाप्रलय वर्तला ॥२२६॥
जैसा सर्प गारुडया आधीन ॥ पेटारां घालिती मागुतेन ॥ तैसा अस्त्रें आवरी कृष्ण ॥ चमत्कार दावोनियां ॥२२७॥
ऋषी आश्चर्य करिती संपूर्ण ॥ धन्य महावीर अर्जुन ॥ अस्त्रप्रेरण आकर्षण ॥ रणपंडित सर्व जाणे ॥२२८॥
धर्मरायासी नमून ॥ स्वस्थ बैसला सुभद्रारमण ॥ पुढें कथा संपूर्ण ॥ सुधारसाहून गोड असे ॥२२९॥
बोले लोमशऋषीश्वर ॥ युधिष्ठिर कथा ऐकें सुंदर ॥ पूर्वीं राजा हरिश्चंद्र ॥ सत्त्वशील तुज ऐसा ॥२३०॥
धर्म चरणीं लागूनी ॥ म्हणे ते कथा सांगा लोमशमुनी ॥ जे ऐकतां श्रवणीं ॥ पाप ताप न उरेचि ॥३३१॥
जनमेजयासी म्हणे वैशंपायन ॥ लोमशें कथाअ कथिली संपूर्ण ॥ तुम्ही होऊनि सावधान ॥ एकचित्तें ऐका पां ॥३३२॥
पांडवप्रताप ग्रंथ गहन ॥ वनपर्व हें सुरस पूर्व ॥ बोलिला सत्यवतीनंदन ॥ वैशंपायन निजमुखें ॥३३३॥
तेचि कथा रसाळ फार ॥ ब्रह्मानंदें वर्णील श्रीधर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ सर्व कार्य टाकूनियां ॥३३४॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकोणतिसाव्यांत कथियेला ॥३३५॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि एकोनत्रिंशाध्यायः ॥२९॥ श्री कृष्णार्पणमस्मु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP