मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २४ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २४ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २४ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ जनमेजय म्हणे वैशंपायनास ॥ तुझ्या वदनें अति सुरस ॥ कथा गोड लागे सुधारस ॥ तुच्छ वाटे याहूनि ॥१॥वैशंपायन म्हणे राया ॥ तुझ्या पूर्वजांची पवित्र चर्या ॥ ऐकतां निरसे तापत्रयमाया ॥ होय काया शीतळ ॥२॥वंदोनियां कृष्ण चरणा ॥ सांगेन अद्भुत कथेची रचना ॥ पांडव वनीं असतां जाणा ॥ कृष्ण भजना न विसरती ॥३॥प्रत्यहीं लक्ष संख्या ब्राह्मण ॥ नित्य त्यांसी षड्रसान्न ॥ धर्मराज देत भोजन ॥ त्रिभुवनीं ख्याती पूर्ण जाहली ॥४॥ब्राह्मण येऊनि गजपुरासी ॥ कीर्ति सांगती दुर्योधनासी ॥ म्हणती धन्य उपमा पांडवांसी ॥ त्रिजगतीं असेना ॥५॥तुम्हीं बाहेर दिलें दवडून ॥ परी त्यांसी रक्षीत जगज्जीवन ॥ प्रत्यहीं लक्षसंख्या ब्राह्मण ॥ पंक्तीसी जेविती धर्माचे ॥६॥ऐकोचि पांडवांची स्तुती ॥ दुर्योंधन संतप्त चित्तीं ॥ परिसोनि संतांची स्थिती ॥ निंदक तापती मानसीं ॥७॥वसंत ऋतुराज देखोनी ॥ कोकिला करिती मधुर ध्वनीं ॥ तो सुंदर स्वर ऐकोनी ॥ वायस मनीं संतापे ॥८॥देखोनि पंडित व्युत्पन्न ॥ मूर्खाचें ह्रदय जाय जळोन ॥ कीं ऐकोनि हरिकीर्तन ॥ भूतप्रेतें विटती पैं ॥९॥तैसा दुर्योधान पापमती ॥ अपाय योजी नाना चित्तीं ॥ तों दुर्वास ऋषि महामती ॥ अकस्मात पातला ॥१०॥त्यासी देखोनि दुर्योधन ॥ करिता जाहला साष्टांग नम ॥ मनीं कापटय कल्पूनि पूर्ण ॥ पांडवां छळूं पाहात ॥११॥जारण मारणादि अनुष्ठान ॥ तेथें आवडी धरिती कुजन ॥ तैसाचि अर्थ कल्पून ॥ सेवा दुर्योधन करीतसे ॥१२॥जे जे समयीं जें जें मागे ॥ तें तें देऊनि तोषवी अंगें ॥ रात्रीं चार प्रहर जागे ॥ सेवा स्वांगें दावीतसे ॥१३॥भूतप्रेत साधनां लागूनी ॥ कुटिल कपटी जागती श्मशानीं ॥ तैसी बहुत सेवा करूनी ॥ दुर्वासऋषि प्रसन्न केला ॥१४॥तो म्हणे माग वरदान ॥ येरू बोले कर जोडून ॥ आमुचे दायाद पांडव जाण ॥ त्यांसी छळोन येइंजे ॥१५॥सूर्यें थाली दिली त्यांप्रती ॥ असंख्य जेविती ऋषिपंक्ती ॥ शेवटीं जेवूनि द्रौपदी सती ॥ थाली पालथी घालीत ॥१६॥थाली पालथी घालितां रात्रीं ॥ मग तेथें अन्न नाहीं निश्चितीं ॥ आपण जावें त्या समया प्रती ॥ भोजन प्रीतीं मागावें ॥१७॥ते करिती जरी अनमान ॥ तरी भस्म करावें शापून ॥ तों बोले अत्रिनंदन ॥ अवश्य करणें हें आम्हां ॥१८॥दुर्योधन दुःशासन दुर्वास ॥ तिघांची एक राशि एक रस ॥ तरी अत्रिनंदन निर्दोष ॥ त्यासी मति ऐसी कां ॥१९॥एक मास पर्यंत जाण ॥ भक्षिलें कौरवांचें अन्न ॥ दुर्जनांचे अन्नाचा गुण ॥ पांडव छळावे वाटलें ॥२०॥सज्जनाचें सेवितां अन्न ॥ सुबुद्धि उपजे तेणें करून ॥ असो दुर्वासाचें उतावीळ मन ॥ जाहलें पांडव छळावया ॥२१॥साठसह्स्त्र शिष्यभार ॥ घेऊनि चालिला अत्रिपुत्र ॥ रात्र जाहली दोन प्रहर ॥ द्वैतवना पातले ॥२२॥ऐकोनि ब्राह्मणांची गजबज ॥ जागा जाहला धर्मराज ॥ बंधूंसह तेजःपुंज ॥ लोटांगण तया घालीत ॥२३॥म्हणे धन्य धन्य आजिचा दिन ॥ जाहलें साधूचें दर्शन ॥ दुर्वास म्हणे तुझें स्तवन ॥ गोड न लागे ये वेळे ॥२४॥पोटीं क्षुधेचा अनल अनल ॥ प्राण होताति आमुचे विकल ॥ तुझे उपचार पावले सकल ॥ भोजन आधीं देइंजे ॥२५॥समय पाहूनि पूजन ॥ चतूरें करावें जाण ॥ कासावीस होताती प्राण ॥ झडकरी अन्न दे आतां ॥२६॥इच्छा धरूनि भोजनीं ॥ वेगें येतां मार्ग क्रमूनी ॥ तों अस्ता गेला वासरमणी ॥ म्हणोनि रजनी जाहली ॥२७॥सत्वर येतों स्त्रान करून ॥ पात्रीं वाढोनि ठेवा अन्न ॥ विलंब जाहल्या जाण ॥ मग शापीन क्षणार्धें ॥२८॥ऐकोनि ऋषीचें वचन ॥ धर्म दचकला मनीं पूर्ण ॥ पाहे द्रौपदीचें वदन ॥ म्हणे परम विघ्न ओढवलें ॥२९॥द्रौपदी म्हणे धर्मराजा ॥ स्त्राना जाऊं द्या सत्वर द्विजां ॥ ऐसें बोलतां द्रुपदात्मजा ॥ मुनि उठिले सत्वर ॥३०॥दुर्वास बोले वचन ॥ आमुचें दिवसा जाहलें संध्यानृष्ठान ॥ आतां योतों स्त्रान करून ॥ द्रौपदी म्हणे अवश्य ॥३१॥घेऊनि ऋषींचे भार ॥ स्त्रानासी गेला अत्रिपुत्र ॥ मागें धर्मराज दीनवक्र ॥ द्रौपदीलागीं बोलतसे ॥३२॥कैसी करावी आतां गोष्टी ॥ रिघावें कवणा चिया पाठीं ॥ द्रौपदी म्हणे पडतां संकटीं ॥ याद वराया स्मरावें ॥३३॥मग ते पांडवांची पत्नी ॥ उभी ठाकली वृंदावनीं ॥ द्वारकेकडे कर जोडूनी ॥ मूर्ति ध्यानीं आठविली ॥३४॥म्हणे श्रीरंगा इंदिरावरा ॥ धराधरशयना विश्वंभरा ॥ भक्तमान सचकोर चंद्रा ॥ करूणा समुद्रा गोपाळा ॥३५॥मनो अनंत ब्रह्मांड नायका ॥ हे दयार्णवा विश्वव्यापका ॥ वैकुंठपते भव मोचका ॥ मदनजनका जगत्पते ॥३६॥हे कृष्णा जगदंकुरकंदा ॥ साधु ह्रदया रविंदमिलिंदा ॥ निजजनचातकजलदा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥३७॥कमलोद्भव जनका कमल नयना ॥ कमल नाभा कमल शयना ॥ कमला नायका कमलवदना ॥ कमल सदना कमल प्रिया ॥३८॥जय जय श्री कृष्णा विश्वपालना ॥ विश्वव्यापका विश्वकारणा ॥ विश्वमतिचालका विश्वजीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥३९॥जय जय श्री कृष्णा कमल पत्राक्षा ॥ कंसांतका सर्वसाक्षा ॥ मखपालका निर्विकल्प वृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥४०॥लाक्षा सदनीं रक्षिलें श्रीहरी ॥ उघडें करितां सभेभीतरीं ॥ उडी घालूनि मुरारी ॥ पूर्ण कैवारी जाहलासी ॥४१॥तुजवांचूनि ये संसारीं ॥ तारक कोण आहे कंसारी ॥ या वेळीं सत्त्व राखें श्रीहरी ॥ धांव झडकरी माउलिये ॥४२॥भक्तवत्सला अतिउदारा ॥ श्रीकरधरा श्यामसुंदरा ॥ माझे विसांविया सर्वेश्वरा ॥ करावी त्वरा ये वेळे ॥४३॥माझे सांवळे कृष्णाबाई ॥ बिरडें सुटलें वाढिते समयीं ॥ मज चतुर्भुज केलें लवलाहीं ॥ तैसा ये समयीं धांवें कीं ॥४४॥धांवा पुकारीत याज्ञ सेनी ॥ उभी राहोनि वृंदावनीं ॥ द्वारकेउझू बद्धपाणी ॥ स्तवन करी कृष्णाचें ॥४५॥तों इकडे द्वारकावतीस ते वेळे ॥ ताट रुक्मिणीनें विस्तारिलें ॥ ग्रास घ्यावा तों घननीळें ॥ शब्द ऐकिले भगिनीचे ॥४६॥द्रौपदीचे शब्द कोमळ ॥ करुणारसभरित सुढाळ ॥ ह्रदयीं गहिंवरला गोपाळ ॥ ताट दूरी ढकलिलें ॥४७॥उभा राहिला चक्रपाणी ॥ तटस्थ पाहे रुक्मिणी ॥ धांव घेतली ते क्षणीं ॥ न बोलतां अति वेगें ॥४८॥सत्वर येऊनि वनमाळी ॥ उभा ठाकला द्रौपदीजवळी ॥ प्रेमें आलिंगिली पांचाळी ॥ तये वेळीं गोपाळें ॥४९॥नेत्र उघडोनि द्रौपदी पाहे ॥ तों पुढें घनश्याम उभा आहे ॥ द्दढ धरूनियां पाय ॥ मुख पाहे श्रीहरीचें ॥५०॥सुहास्यवदन अति उदार ॥ मुकुटकुंडलें मकराकार ॥ आकर्णनेत्र सुकुमार ॥ निढळीं केशर विराजे ॥५१॥सर्वालंकारीं मनोहर ॥ उभा देखिला जगदुद्धार ॥ द्रौपदी म्हणे ऋषीश्वर ॥ स्त्राना गेले गोविंदा ॥५२॥श्रींरग म्हणे द्रौपदीमाये ॥ मज बहु क्षुधा लागली आहे ॥ धांवोनि आलों लवलाहें ॥ ताट दूरी करोनियां ॥५३॥द्रौपदी म्हणे कमलाधवा ॥ ऋषींलागीं केला तुझा धांवा ॥ जगज्जीवना केशवा ॥ आतां बाहुं कोणासी ॥५४॥कृष्ण म्हणे झडकरी ॥ कांहीं तरी पाहें गृहांतरीं ॥ थाली मज दावीं लवकरी ॥ कांहीं तरी असेल आंत ॥५५॥द्रौपदी सद्नद बोले वचन ॥ थाली म्यां पालथी घातली धुऊन ॥ कृष्ण म्हणे कांहीं भक्षिल्याविण ॥ माझें मन तृप्त नव्हें ॥५६॥थाली मज पाहूं दे आधीं ॥ ते आणोनि दाखवी द्रौपदी ॥ तों एक भाजीचें पान कृपानिधी ॥ दावी हात करोनियां ॥५७॥जगत्पालक जगन्नाथ ॥ द्रौपदीपुढें ओढवी हात ॥ येरीनें घातलें त्यरित ॥ म्हणे मी तृप्त इतुकेनि ॥५८॥तें शाकादल लवलाहीं ॥ मुखीं घाली क्षीराब्धीचा जांवई ॥ ढेंकर दिधला ते समयीं ॥ म्हणे धालें त्रिभुवन हो ॥५९॥आतां पाचारा ब्राह्मण ॥ द्रौपदी पाहे आश्रमांत येऊन ॥ तों अन्नाचे पर्वत देखिले पूर्ण ॥ जेणें त्रिभुवन जेवूनि उरे ॥६०॥तों गंगा तीरीं ऋषि मंडळी ॥ अघमर्षणीं गंगाजळीं ॥ तेथें प्रकटोनि वनमाळी ॥ भोजन शाला रचियेल्या ॥६१॥द्रौपदी आणि पांडव ॥ दुसरे निर्मूनि माधव ॥ दुर्वा सादि ऋषि ॥ जेवा वया बैसवी ॥६२॥घमघमीत सुवा सान्न ॥ देवही लाळ घोंटिती देखोन ॥ वसंन करी प्रदक्षिण ॥ म्हणे हें अन्न कैंचे मज ॥६३॥देवें अमृत दिधलें आणोन ॥ तरी ऋषि म्हणती नेदूं हें अन्न ॥ ब्रह्मा दिकांसी दुर्लभ पूर्ण ॥ प्रीती करून जेविती ॥६४॥रत्न जडित आडणिया तळीं ॥ त्यांवरी कनकाचीं ताटें मांडिलीं ॥ बैसा वया सुवर्णपीठें दिधलीं ॥ समसमान सर्वांसी ॥६५॥पृथक् पृथक् ठाणविया ॥ वरी रत्न दीपिका लावोनियां ॥ कांचना चिया झारिया ॥ उदकें भरिल्या सुवासें ॥६६॥जैसा सोमकांताचा पर्वत ॥ तैसा वाढिलासे शुभ्र भात ॥ सुवर्णाचल अद्भुत ॥ तैसें वरान्न दिसतसे ॥६७॥पंचभक्ष्य परमान्न ॥ साठ पत्रशाखा सुवासें पूर्ण ॥ धृतमधुदुग्धसरोवरें जाण ॥ दधि शर्करा अपार ॥६८॥जैसें अलात चक्र फिरताहे ॥ तैसी द्रौपदी वाढूनि जाय ॥ चुडे झळकती विद्युत्प्राय ॥ उजेड ऋषींवरीं ॥६९॥प्रार्थना करीतसे कृष्ण ॥ भीम विनवी कर जोडुन ॥ स्वामी सावकाश कीजे भोजन ॥ उशीर बहु जाहला कीं ॥७०॥तृप्त जाहले ऋषि समस्त ॥ म्हणती सदा काळ रहावें येथ ॥ सद्भक्तांचें अन्न पुनीत ॥ द्रौपदीहस्तें जेविजे ॥७१॥आयुष्य असावें कल्पवरी ॥ सदा रहावें धर्माचे घरीं ॥ ऐसें बोलोनि ऋषीश्वरीं ॥ कर प्रक्षालन केलें पैं ॥७२॥सकल ऋषी आंचवले ॥ त्रयोदश गूणी विडे घेतले ॥ सर्वही सुगंधें चर्चिले ॥ मग निजले नावेक ॥७३॥मंत्राक्षता द्यावयासी ॥ उठले मागुती जों ऋषी ॥ तों पांचाळी सहित ह्रषीकेशी ॥ गुप्त जाहले पांडवही ॥७४॥तों सहदेव पातला वेगेंसीं ॥ म्हणे स्वामी चलावें भोजनासी ॥ पात्रें वाढूनि तुम्हांसी ॥ बोलावूं मी पातलों ॥७५॥मग बोले अत्रिनंदन ॥ परम चांडाल दुर्योधन ॥ हरिभक्तांची छळणा करून ॥ तपश्चर्ये आंचवलों ॥७६॥दुर्जनांची बुद्धि ऐकिजे ॥ हरिभक्तांचें छळण कीजे ॥ साधूंचा अंत पाहिजे ॥ हिं द्वारें अनर्थाचीं ॥७७॥पूर्वीं अंबऋषीचें केळें छलन ॥ पाठीं लागलें सुदर्शन ॥ परम चांडाळ दुर्योधन ॥ तेणें बुद्धि चेतविली ॥७८॥दुर्वास म्हणे सहदेवातें ॥ माझा आशीर्वाद सांगा धर्मातें ॥ विजय कल्याण हो तुम्हांतें ॥ शत्रु क्षयातें पावती ॥७९॥वज्रचूडे मंडित महासती ॥ माझा आशीर्वाद सांगा तिज प्रती ॥ तुज साह्य असेल सर्वार्थी ॥ जो कां श्रीपति सर्वदा ॥८०॥ब्राह्यण गेले तेथून ॥ सहदेव आला परतोन ॥ मग येऊनि जगज्जीवन ॥ प्रकट भेटला पांडवां ॥८१॥आलिंगोनि पांडवांप्रती ॥ ह्रदयीं धरिली द्रौपदी सती ॥ म्हणे तुम्ही पडल्या संकटावर्तीं ॥ मी श्रीपति रक्षीन ॥८२॥ब्रह्मानंद यादवेंद्र ॥ आज्ञा मागोनि सर्वेश्वर ॥ द्वारकेसी गेला श्रीकरधर ॥ अभंग साचार न विटे ॥८३॥असो यावरी द्वैतवनीं ॥ असतां पांडव याज्ञ सेनी ॥ तों जगद्नुरु येऊनी ॥ व्या सदेव भेटला ॥८४॥शत्रुविध्वंसासी कारण ॥ अर्जुना करी तूं तीर्थटन ॥ शिव आणि शचीरमण ॥ अस्त्रें शस्त्रें देतील बहु ॥८५॥ऐसें बोलोनि अर्जुनासी ॥ व्यास गेला बदरिकाश्रमासी ॥ अर्जुन उद्विग्न मानसीं ॥ तपोवनासी जावया ॥८६॥गुरु बुद्धि विशेष जाणोन ॥ तीर्थाटना निघाला अर्जुन ॥ हिमालय पर्यत ओलांडून ॥ इंद्रकील पर्वता ॥८७॥तेथें वृक्षपर्णें भक्षून ॥ घोर तप करी अर्जुन ॥ दुसरे मासीं जल सेवून ॥ धूम्रपान तृतीयमासीं ॥८८॥चवथे मासीं वायु आहार ॥ एकांगुष्ठावरी पार्थवीर ॥ ऊर्ध्व बाहु करूनि तीव्र ॥ तप आचरे कौतेय तो ॥८९॥जैसा माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तपें तेजस्वी तैसा अर्जुन ॥ भोंवत तपस्वी ब्राह्मण ॥ पार्थतेज साहूं न शकती ॥९०॥व्योमकेशा प्रति जाऊन ॥ ऋषी सांगती वर्तमान ॥ अर्जुनाच्या तप स्तेजें करून ॥ सहस्त्रकिरण झांकोळला ॥९१॥ऐसें ऐकोनि मृडानी भर्ता ॥ येता जाहला इंद्रकील पर्वता ॥ किरात रूप जाहला धरिता ॥ अतिविशाल तेजस्वी ॥९२॥रूप पालटोनि शक्ती ॥ संगें वना आली हैमवती ॥ भूतपाळे असंख्य निघती ॥ उमाधवा वेष्टीत ॥९३॥तों मूकनामें दैत्य बलविशेष ॥ त्या प्रति बोले व्यो मकेश ॥ तूं धरोनि वराहवेष ॥ अर्जुना सन्मुख जाईं पैं ॥९४॥मग आज्ञा वंदूनि तो असुर ॥ वराहवेषें धांवे भयंकर ॥ मुसांडी घेऊनि सत्वर ॥ पार्थावरी चवताळला ॥९५॥मेघनादाहूनि घोष गहन ॥ सूकर करितां ऐके अर्जुन ॥ गांडिवासी सित चढवून ॥ लाविला बाण चापासी ॥९६॥पवनवेगें सूकर जाता ॥ पाठीं लागला वीर पार्थ ॥ तों किरातरूपें उमाकांत ॥ वेगें धांवत आडवा ॥९७॥पार्थासी म्हणे उमावर ॥ म्यां पिटीट आणिला सूकर ॥ संधानीं लक्षिला साचार ॥ तूं त्यासी मारूं नको ॥९८॥तें न मानीच अर्जुन ॥ धांवोनि चापासी लाविया बाण ॥ वर्मीं भेदितां जाण ॥ सूकरें प्राण सोडिला ॥९९॥परम पुरुषार्थी सुभद्रारमण ॥ किरातासी पुसे तूं कोण ॥ स्त्रिये सहित निर्भय पूर्ण ॥ एकला वनीं विचरसी ॥१००॥किरात म्हणे येचि भूमीं ॥ वसती करितों सदा आम्ही ॥ तूं कोण आहेस अधर्मी ॥ सूकर माझा वधिला कां ॥१०१॥तूं गर्व बहुत करिसी ॥ तरी युद्ध करीं मजशीं ॥ आमुच्या वना तूं कां आलासी ॥ मानववेषें सुकुमारा ॥१०२॥योद्धा म्हणविसी निपुण ॥ तरी टाकीं मजवरी स्वेच्छ बाण ॥ अर्जुनें मांडिलें वज्रठाण ॥ शर दारुण सोडीत ॥१०३॥असंख्यात सोडिले बाण ॥ परी शिवा अंगीं न रुपती जाऊन ॥ सुमनवृष्टि होतां जाण ॥ इभ जैसा न गणीच ॥१०४॥तृण शिला पडतां सबळ ॥ अचल न सोडी जैसें स्थळ ॥ तैसें पार्थाचें बाणजाळ ॥ जाश्वनीळ मानीना ॥१०५॥जें जें पार्थ सोडी अस्त्र ॥ मुख पसरोनि ग्रासी त्रिनेत्र ॥ कुंतीचा जो तृतीयपुत्र ॥ विस्मित होऊनि पाहातसे ॥१०६॥मग सुभद्रामनोरंजन ॥ म्हणे तूं सांग रुद्र कीं शचीरमण ॥ किरात न बोले एकही वचन ॥ अपार बाण ग्रासीत ॥१०७॥बाणजाल सोडितां बहुत ॥ परम त्रासला वीर पार्थ ॥ बाण सरले समस्त ॥ अक्षय्य भाता रिता पैं ॥१०८॥म्हणे अग्निदत्त अक्षय्य तूणीर ॥ बाण कां आजि सरले समग्र ॥ हा कोण पुरुष निर्धार ॥ न कळे पार तयाचा ॥१०९॥मग गांडीवदंडें करून ॥ मारीत उठिला अर्जुन ॥ तों रुद्रें पस्रोनि वदन ॥ चापही गिळिलें तेधवां ॥११०॥मग दिव्य खङ्ग घेऊन ॥ शिवासी ताडी अर्जुन ॥ तेंही गिळिलें न लागतां क्षण ॥ मग अर्जुनें वृक्ष टाकिले ॥१११॥वृक्ष सरले संपूर्ण ॥ शिला पर्वत घाली उचलोन ॥ हाणितां मुष्टि प्रहारें करून ॥ मल्लयुद्धासी मिसळले ॥११२॥चार घटिका पर्यंत ॥ शिवें युद्ध केलें अद्भुत ॥ अर्जुन जाहला मूर्च्छागत ॥ मग उमाकांत काय करी ॥११३॥कृपाकरें कुरवाळून ॥ सावध केला अर्जुन ॥ प्रत्यक्ष दशभुज पंचानन ॥ प्रकट जाहला तेधवां ॥११४॥म्हणे प्राण सखया पार्था ॥ प्रसन्न जाहलोम माग आतां ॥ विजयी होईं सर्वथा ॥ शत्रुसंग्रामीं सर्वदा तूं ॥११५॥पार्थें घातलें लोटांगण ॥ स्कंदतातें दिधलें अलिंगन ॥ मग श्वेतवाहनें पूजून ॥ दिव्य स्तवन मांडिलें ॥११६॥पंचवदना विरूपाक्षा ॥ विश्वंभरा कर्माध्यक्षा ॥ भक्त वल्लभा सर्वसाक्षा ॥ माया चक्रचालका ॥११७॥गंगा धरा हिमनग जामाता ॥ गजास्यजनका विश्वनाथा ॥ विष्णुवल्लभा प्रतापवंत ॥ त्रिपुरांतका त्रिलोचना ॥११८॥विशाल भाला कर्पूरगौरा ॥ नीलग्रीवा सुहास्यवक्रा ॥ दक्षमखदलना विश्वेश्वरा ॥ गजांतका स्मरारे ॥११९॥हे भवभवांतका भवनिवारा ॥ भोगि भूषणा महाभयहरा ॥ हेमगर्भक्तजन प्रियकरा ॥ अंधक संहारा वृषभध्वजा ॥१२०॥तारकारिजनका त्र्यंबका ॥ गुणातीता ताप त्रयहारका ॥ हे पशुपते दोषत्रयनिवारका ॥ पंचमुकुटा पुरातना ॥१२१॥पंचवदनें ऐकूनि ऐसें स्तवन ॥ ह्रदयीं आलिंगिला फाल्गुन ॥ विज म्हणे माझे अपराध संपूर्ण ॥ क्षमा करीं दयाळा ॥१२२॥गिळिलें होतें चाप तूणीर ॥ शिवें दिधलें काढूनि समग्र ॥ मग पाशुपत ब्रह्मास्त्र ॥ किरीटी लागीं दीधलें ॥१२३॥स्त्रान करूनि अर्जुन ॥ न्यासमंत्र विधिपूर्वक जाण ॥ अत्यादरें शिव पूजन ॥ बीभत्सु करिता जाहला ॥१२४॥मग म्हणे उमाकांत ॥ जे निर्बल युद्ध टाकोनि पळत ॥ त्यांवरी हीं अस्त्रें टाकितां यथार्थ ॥ जाळितील त्रिभुवना ॥१२५॥तरी पुढें युद्ध मांडेले दारुण ॥ गुरुसुत गुरु कानीन ॥ त्यांवरीच प्रेरीं हीं गहन ॥ आणि कां योग्य न होती ॥१२६॥अर्जुनें करितां अस्त्र ग्रहण ॥ कुंभिनी गजबजली भयें करून ॥ सकलरायां अंगीं ज्वरशहारे दारुण ॥ कंप सुटला दुष्टांसी ॥१२७॥धन्य धन्य मी कृतकृत्य ॥ ऐसें मानोनि वीर पार्थ ॥ पुढत पुढती नमीत ॥ विरूपाक्षासी आदरें ॥१२८॥यावरी अष्टदिक्पाल ॥ विजय पहावया आले सकल ॥ शचीसहित आखंडल ॥ स्तविती तेव्हां पार्थातें ॥१२९॥यम दंडास्त्र देत ॥ वरुण मंत्र देत विधियुक्त ॥ प्रसारणा कुंचन सहित ॥ वरुणें पाश दीधले ॥१३०॥कुबरे प्रस्वापनास्त्र देत ॥ कृशानु शक्ति ओपी अद्भुत ॥ लोकप्राणेश समर्पीत ॥ वेग अत्यंत स्यंदनाचा ॥१३१॥बिडौजा म्हणे पार्था ॥ तूं अमरावतीस येईं तत्त्वतां ॥ मातलि सारथी आणि रथा ॥ न्यावयालागीं पाठवितों ॥१३२॥पार्थासी देऊनि वरदाना ॥ दिक्पाल गेले स्वस्थाना ॥ तों मातलि घेऊनि स्यंदना ॥ गगनपंथें येतसे ॥१३३॥भूतळीं उतरला सूर्य नारायण ॥ कीं विकुंठींहूनि उतरला सुपर्ण ॥ तैसा तो उत्तम रथ घेऊन ॥ मातलि आला पार्थापाशीं ॥१३४॥म्हणे शक्रात्मजा शक्रें ये वेळे ॥ तुम्हां स्वपद पहावया बोलाविलें ॥ मग अर्जुनें स्त्रानदान केलें ॥ शुचिष्मंत होऊनि ॥१३५॥उदयाचलीं उगवला मित्र ॥ तैसा रथीं शोभला कृष्ण मित्र ॥ वृत्र शत्रु पहावया सत्वर ॥ सुभद्रावर चालिला ॥१३६॥तंव सहस्त्रांचीं सहस्त्र विमानें ॥ अंतरिक्षीं देखिलीं कुंतीनंदनें ॥ जैशीं जल सागरीं गहनें ॥ जहाजें सत्वर धांवती ॥१३७॥कीं पृथ्वीवरी पुरें पट्टनें ॥ दिसती श्रीयुक्त विराज मानें ॥ स्वर्गवासी राजे नयनें ॥ पार्थवीरें विलोकिले ॥१३८॥मनुष्यांसी तारे दिसत ॥ परी ते स्वर्गस्थ ॥ मूर्ति मंत ॥ तों अमरावती देखे पार्थ ॥ ऐरावत द्वारीं उभा असे ॥१३९॥कर्पूरा ऐसा शुद्ध श्वेत ॥ कीं दुसरा कनकाद्रि मूर्ति मंत ॥ तो सहज चालतां ऐरावत ॥ उर्वी लवत भारें ज्याचे ॥१४०॥हिर्यां ऐसे चार दंत ॥ विशाल जैसा मलय पर्वत ॥ वरी उद्यानें विराजत ॥ सरोवरें उचंबळती ॥१४१॥जवळ देखिलें नंदनवन ॥ लागलें कल्पद्रुमांचें वन ॥ जे मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ ते तरु तेथें विराजती ॥१४२॥कामधेनूंची खिल्लारें ॥ चिंतामणींचीं धवळारें ॥ चंद्र सूर्य़ां ऐसे तेजाक्ररें ॥ पाषाण तेथें मिरवती ॥१४३॥ऐसें तें शक्रपद वरिष्ठ ॥ निर्जरांचा जेथें थाट ॥ तेथें अर्जुन पावला सुभट ॥ शक्रादरें करोनियां ॥१४४॥महा पुण्य़ाच्या कोटयनुकोटी ॥ शुद्ध असती ज्याचे गांठीं ॥ त्याचे अमरावती पडे द्दष्टी ॥ ते पाहे किरीटी प्रीतीनें ॥१४५॥तेथें वेदांच्या प्रत्यक्ष मूर्ति ॥ शास्त्रें समोर ॥ पार्थें शक्रासी नमस्कार ॥ साष्टांग केला तेधवां ॥१४७॥पुढें सप्रेम धांवोन ॥ अमरेशें दिधलें आलिंगन ॥ करूनि मस्तकीं अवघ्राण ॥ मांडीवरी बैसविला ॥१४८॥ह्रदयींच्या परम आर्तें ॥ मुख कुरवाळिलें अमरनाथें ॥ विजय मूर्ति पाहतां शक्रांतें ॥ तृत्पि नव्हे सर्वांशीं ॥१४९॥आपुले निजासनावरी ॥ शक्रें बैसविला शेजारीं ॥ अष्टनायिका ते अवसरीं ॥ नृत्य करिती चपलत्वें ॥१५०॥ज्यांचे अंगींचा सुवास पूर्ण ॥ भोंवता धांवे एक योजन ॥ ज्यांचिया पदनखांवरून ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१५१॥पद्मिणी नागिणी सुंदरी ॥ वर्णिती बहुत लोकांतरीं ॥ त्या दासीपणें निर्धारीं ॥ शचीनायकापाशीं सर्वदा ॥१५२॥असो त्यांचें नृत्य गायन ॥ पाहूनि तोषला अर्जुन ॥ पांच संवत्सर संपूर्ण ॥ राहिला तेथें कोंतेय ॥१५३॥सकल विद्या अस्त्रें ॥ जे अनुच्छिष्ट मंत्र यथाविधि यंत्रें ॥ चौसष्टिकला पार्थवीरें ॥ चतुर्दश विद्या अभ्यासिल्या ॥१५४॥चित्रसेन गंधर्वा पासून ॥ गायाननृत्यकला संपूर्ण ॥ तांडव अनालस्यें करून ॥ यथासांग अभ्यासी ॥१५५॥राग उपराग भार्यां सहित ॥ मूर्च्छना सारी कल्पित ॥ पुढें राग मूर्ति मंत ॥ आळवितां उभे ठाकती ॥१५६॥कोणे एके दिवशीं ॥ नृत्या निघाली उर्वशी ॥ अर्जुन विलोकितां तिजसी ॥ परम संतोष वाटला ॥१५७॥उर्वशीचें मन नयन ॥ वेधले पार्थ मुख पाहोन ॥ दुसरे दिवशी सहस्त्र नयन ॥ चित्ररथा प्रति सांगत ॥१५८॥अर्जुना चिये सेवेसी ॥ वेगें पाठवीं उर्वशी ॥ गंधर्वें बोधोनि तियेसी ॥ निशीमाजी धाडिलें ॥१५९॥ते श्रृंगारसरोवरमराळिका ॥ जे सकल प्रमदांची नायिका ॥ नयनकटाक्षें देखा ॥ मूर्च्छित तापसां पाडीत ॥१६०॥द्विजराज मुखी परम सगुण ॥ मृगराज कटी विराज मान ॥ करिराज सम जिचें गमन ॥ पार्थापाशी त्वरें आली ॥१६१॥धनंजय निजला निज सदनीं ॥ तों जाणविलें सेवकें येऊनी ॥ उर्वशी आली हंसगमनी ॥ दर्शनालागीं तुमच्या पैं ॥१६२॥तो उर्वशीस देखोन ॥ पार्थें दिधलें अभ्युत्थान ॥ म्हणे माते आपुलें आगमन ॥ काय निमित्त जाहलें ॥१६३॥उर्वशी सांगें वर्तमान ॥ शक्रें पाठविलें मजलागून ॥ तूं बोलसी माते म्हणोन ॥ जाहलें क्षीण तेणें मी ॥१६४॥अर्जुन म्हणे जैसी शारद्वती ॥ माता माद्री किंवा ॥ कीं रमा शची आम्हां प्रती ॥ त्याचि पंक्तींत माये तूं ॥१६५॥तुझे मी धरितों चरण ॥ स्वस्थळा जाईं परतोन ॥ उर्वशी बोले शापवचन ॥ नपुंसकत्व पावसी तूं ॥१६६॥स्त्री ना पुरुष निर्धार ॥ होशील एक संवत्सर ॥ स्त्रियां मध्यें वास निरंतर ॥ तुज घडेल मम शापें ॥१६७॥उर्वशा गेली परतोन ॥ पार्थ सांगे शक्रासी येऊन ॥ गेली ती मज व्यर्थ शापून ॥ मग शचीरमण बोलत ॥१६८॥हा हित रूपी शाप निर्धार ॥ तुज कार्या येईल एक संवत्सर ॥ अज्ञा तवास करितां साचार ॥ विराट गृहीं जाण पां ॥१६९॥ऐकोनि पार्थ संतोषला ॥ तों लोमशषि तेथें आला ॥ शक्रें सन्मानूनि बैसविला ॥ काय बोलिला मुनि तो ॥१७०॥तुझे आसनीं बैसला पार्थ ॥ कोण पुण्य आचरला बहुत ॥ शक्र म्हणे हा माझा सुत ॥ मजसमान तेजस्वी ॥१७१॥विष्णु आणि हा जिष्णु जाण ॥ बद्रिकाश्रमीं तप करून ॥ अवतरले नरनारायण ॥ भूभार सर्व उतरावया ॥१७२॥इंद्र म्हणे लोमशऋषी ॥ तुवां जावें द्वैतवनासी ॥ इतुकें सांगें धर्मासी ॥ मजपाशीं पार्थ आहे ॥१७३॥संपूर्ण विद्या शिकवून ॥ पाठवितों तुझे भेटी लागून ॥ लोमश द्वैतवन लक्षून ॥ येता जाहला भूतळीं ॥१७४॥ इकडे व्यासशिष्य संजय जाण ॥ धृतराष्ट्रासी सांगे वर्तमान ॥ सकळविद्या प्रवीण ॥ पार्थ जाहला शक्रापाशीं ॥१७५॥प्रसन्न जाहला उमारमण ॥ शस्त्रास्त्रें दिधलीं संपूर्ण ॥ सकल देवांनीं वरदान ॥ बहुसाल दिधलें तया ॥१७६॥तुझे पुत्रांचें कर्मस्मरण ॥ रात्रंदिवस करितो सुभद्रारमण ॥ केव्हां मांडेल घोर रण ॥ घेईन प्राण शत्रूचा ॥१७७॥वस्त्रहरण आठवून ॥ गदा घेऊनि भीमसेन ॥ वधावया उदित पूर्ण ॥ परी धर्मराज आवरी तया ॥१७८॥जैसा वारणचक्रांत येऊन ॥ एकला संहारी पंचानन ॥ कीं एकला विष्णुवाहन ॥ असंख्य संहारी विखार ॥१७९॥तैसा एक सुटतां वृकोदर ॥ करील असंख्य वीरांचा संहार ॥ तुझे पुत्रां विषयीं थोर ॥ धुसधुसीत अंतरीं ॥१८०॥नकुल सहदेव बलाद्भुत ॥ रणसमयाची वाट पाहात ॥ ऐसा ऐकतां घृत्तान्त ॥ धृतराष्ट्र उद्विग्न जाहला ॥१८१॥ असो इकडे द्वैतारण्यांत ॥ धर्म भीम माद्रीसुत ॥ रात्रं दिवस चिंत्ता करीत ॥ वाट पाहात पार्थाची ॥१८२॥पांच संवत्सर जाहले संपूर्ण ॥ कां अजूनि न येचि अर्जुन ॥ माझे जिवलगासी आलिंगन ॥ केव्हां देईन मी आतां ॥१८३॥भीम म्हणे पार्थाविण ॥ आम्ही दिसतों अवघे दीन ॥ जैसें दीपाविण सदन ॥ कीं नासिकाविण वदन पैं ॥१८४॥प्राणाविण शरीर ॥ कीं जीवनाविण सरोवर ॥ तेवीं पार्थाविण आम्ही समग्र ॥ दीन बलहीन दिसतों पैं ॥१८५॥धर्मभीमांचे नयनां ॥ अश्रु येती क्षणक्षणां ॥ आठवूनि पार्थाचिया गुणां ॥ चिंताग्रस्त द्रौपदी ॥१८६॥भीम म्हणे धर्मा लागून ॥ तुझें टाळितां न ये नेमवचन ॥ नाहीं तरी गजपुरा जाऊन ॥ कौरव मारीन सर्वही ॥१८७॥कपट द्युत पणें करून ॥ केवढें पाडिलें दुर्धर व्यसन ॥ त्रयोदश वर्षें संपूर्ण ॥ कधीं होतील नेणवे ॥१८८॥दुःशासनाचें ह्रदय फोडून ॥ केव्हां करीन रक्तपान ॥ त्याचा सव्य हस्त उपडून ॥ दावीन केव्हां द्रौपदीसी ॥१८९॥दुर्योधन अंकावरी बैस ॥ सभेंत बोलिला द्रौपदीस ॥ त्याचा अंक कधीं निःशेष ॥ चूर्ण करीन गदाघायें ॥१९०॥ धिक् गांडीव सायकासन ॥ धिक् हे गदा काय रक्षून ॥ आरण्यांतील शुष्क हीन ॥ शत्रूंनीं नांव ठेविलें आम्हां ॥१९१॥असो चिंताग्रस्त मानसीं ॥ धर्म भीम अहर्निशीं ॥ तों बृहदश्वा महाऋषी ॥ धर्मापाशीं पातला ॥१९२॥करूनि तयाचें पूजन ॥ धर्म सांगे आपुलें वर्तमान ॥ आम्ही वनवासें पीडलों पूर्ण ॥ दुःख दारुण आमुचें ॥१९३॥आम्हां सारिखे कष्टी ॥ सांगा कोण असती सृष्टीं ॥ पूर्वींही ऐसी गोष्टी ॥ कवणासी जाहली नसेल ॥१९४॥मग बृहदश्वा म्हणे धर्मासी ॥ तुमचे कष्टांची लेखा कायसी ॥ नैषधरायाचे कष्टांसी ॥ गणती नाहीं धर्मराया ॥१९५॥तेणेंही द्यूत खेळोन ॥ हारविलें राज्य संपूर्ण ॥ सेवूनि एकाकी घोर विपिन ॥ बहुत क्लेश पावला ॥१९६॥तूं बंधुस्त्रीसमवेत ॥ सुखी अससी वनांत ॥ मुनिजन सदा वेष्टित ॥ अन्न सत्र तुजपासीं ॥१९७॥धर्म म्हणे जी आतां ॥ सांगावी नलाची कथा ॥ बृहदश्वा म्हणे समस्तां ॥ सावध ऐका प्रीतीनें ॥१९८॥द्रौपदी आणि पांडव ॥ सावध ऐकती ऋषी सर्व ॥ वैशंपायन म्हणे नरदेव ॥ कथा अपूर्व ऐका हे ॥१९९॥ब्रह्मा नंद म्हणे श्रीधर ॥ कथा सुरस रसाळ फार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ सप्रेमचित्तेंकरोनियां ॥२००॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चोविसाव्यांत कथियेला ॥२०१॥॥ इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि चतुर्विंशाध्यायः ॥२४॥ श्री कृष्णार्पनमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 09, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP