मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५२ वा

पांडवप्रताप - अध्याय ५२ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ मागें गदापर्व संपलें देख ॥ पुढें आरंभिलें सौप्तिक ॥ वैशंपायन वक्ता सुरेख ॥ जन मेजया प्रति सांगे ॥१॥
सबळ गदाघायें करून ॥ आरंबळे दुर्यो धन ॥ सिद्ध जाहले जावया प्राण ॥ परी आंगवण न सोडी ॥२॥
एका द्श अक्षौहिणि  दळ संहारिलें ॥ त्यात तिघे जण उरले ॥ कृत वर्मा कृपा चार्य वहिले ॥ आणि तिसरा अश्वत्थामा ॥३॥
सेनापतित्व गुरु सुता ॥ दुर्यो धन जाहला देता ॥ शपथ करोनि तत्त्वतां ॥ तिघे वीर निघाले ॥४॥
इतुका जाहला गतकथार्थ ॥ पुढें सावध ऐकोत पंडित ॥ कर्णपिता पावला अस्त ॥ अंधार घोर पडियेला ॥५॥
पांडवसेने समीप जाण ॥ तिघे गुप्तरूपें येऊन ॥ जैसें धनाढयाचें लक्षोनि सदन ॥ तस्कर पाळती पाहती ॥६॥
तों वीरांचा होतसे गजर ॥ जयवाद्यांचा नाद थोर ॥ फेरे घेती घरटीकार ॥ दीपिका अपार न गणवती ॥७॥
लाग न चले तेथें कांहीं ॥ तिघे निघाले लवलाहीं ॥ न्यग्रोधतळीं ते समयीं ॥ रथ सोडिला क्षणभरी ॥८॥
अंतरीं चिंतेनें कष्टी बहुत ॥ सुयोधनाचे दुःखें आरंबळत ॥ क्षतें पडलीं तेणें समस्त ॥ गात्रें तिडका हाणिती ॥९॥
उतरोनि गेला रणमद ॥ परा जयाचा परम खेद ॥ म्हणती पांडवांचा अपराध ॥ ब्रह्मांडांत न समाये ॥१०॥
तों वटवृक्ष जैसा पर्वत ॥ सहस्त्र शाखांनीं मंडित ॥ त्याखालीं तिघे जण चिंताक्रांत ॥ श्वासोच्छ्वास टाकिती ॥११॥
संध्या करूनि क्षितीवरी ॥ तिघे निजले शेजारीं ॥ दुःखनिद्रा ते अवसरीं ॥ दोघां जणां लागली ॥१२॥
कृतवर्मा आणि गौतमनंदन ॥ निद्रार्णवीं जाहले निमग्न ॥ परी कृपी सुत दुःखें करून ॥ आरंबळत न ये निद्रा ॥१३॥
महा सर्प जैसा धुसधुशित ॥ तेवीं वेळोवेळां श्वास टाकीत ॥ घोर निशा होतां प्राप्त ॥ श्वापदें पक्षी बाहती ॥१४॥
पिंगळियांचे किल किलाट ॥ शिवा तेथें भुंकती सैराट ॥ उटूकांचे शब्द अचाट ॥ भूतांचे थाट हिंडती ॥१५॥
निधानें फिरावया निघती ॥ क्षणक्षणां प्रकाश दाविती ॥ येऊं येऊं ऐसें पुसती ॥ सभाग्याचे सदनासी ॥१६॥
बाहेर निघाले महाफणी ॥ मस्तकीं झळकती दिव्यमणी ॥ यक्ष पिशाच राक्षसिणी ॥ सैरावैरां हिंडती ॥१७॥
मिठया घालूनियां रीस ॥ वृक्षीं बैसले सावकाश ॥ जाण्हवीजळावरूनि प्राणेश ॥ सुशीतळ येतसे ॥१८॥
ऐसी ते निशा काळी ॥ कीं काळपुरुषाची कांबळी ॥ कीं काजळाची उटी घेतली ॥ पृथ्वी आणि आकाशें ॥१९॥
असो जागा तेथें द्रोण सुत ॥ तों त्या वटवृक्षा वरी निद्रित ॥ सहस्त्र काग कुटुंबां सहित ॥ सुखेकरोनि राहती ॥२०॥
तंव तेथें आला दिवाभीत ॥ परमविशाळ अति उन्मत्त ॥ वृक्षा वरी वेगें चढत ॥ तस्करगतीनें तेधवां ॥२१॥
उलूकें ख्याती केली ते क्षणीं ॥ सहस्त्र कागांच्या माना मोडूनी ॥ वृक्षातळीं टाकूनी ॥ गेला निघूनि क्षणार्धें ॥२२॥
द्रौणी तटस्थ पाहे ते वेळां ॥ म्हणे एकें उलूकें सर्व संहार केला ॥ हा आम्हांसी सुरु जाहला ॥ दीक्षा आतां हेचि घेऊं ॥२३॥
त्या दोघांसी जागें करून ॥ म्हणे उठा न लावावा क्षण ॥ उलूक गुरु येऊन ॥ दीक्षा आम्हांसी दिधली पैं ॥२४॥
पांचाळ आणि पंडुकुमार ॥ यांचा ऐसाचि करीन संहार ॥ चला नका करूं उशीर ॥ संहारूनि येऊं त्यांसी ॥२५॥
मग म्हणे शारद्वत ॥ न कळत केवीं करावा घात ॥ क्षत्रिय धर्म येथ ॥ कोठें उरेल सांग पां ॥२६॥
गुरु सुत म्हणे ते वेळां ॥ तिंहीं धर्म कोठें सांभाळिला ॥ या ऐशा दुष्टां सकलां ॥ गुप्तरूपें मारीन मी ॥२७॥
कृतवर्मा म्हणे निश्चित ॥ लोक हांसतील समस्त ॥ गुरु पुत्र दुष्ट यथार्थ ॥ केला घात निद्रितांचा ॥२८॥
अश्वत्थामा म्हणे हे बोल ॥ तुमचे वाटती विषतुल्य ॥ पूर्वीच म्यां निश्चय अढळ ॥ केला तो तुम्ही जाणतां ॥२९॥
पांचाळ पांडव मारिल्या विण साच ॥ न काढीं कदा अंगींचें कवच ॥ दुर्यो धनाचे प्राण पांच ॥ तळमळत पाहिले कीं ॥३०॥
पृत्वी पति दुर्यो धन वीर ॥ त्याचे मस्तकींचा दिव्य कोटीर ॥ भीमें हाणोनि लत्ता प्रहार ॥ कैसा चूर्ण पैं केला ॥३१॥
त्याचे मस्तकीं पद देऊन ॥ मर्दूनि तेणें केला चूर्ण ॥ मांडयांवरी गदा हाणून ॥ अधर्में कैसें मारिलें ॥३२॥
परमक्रोधें गुरु सुत ॥ कडकडां दांत खात ॥ म्हणे तुम्ही सर्व बैसा येथ ॥ एकलाचि तेथें जातों मी ॥३३॥
मग रथा रूढ होऊन ॥ वेगें चालिला गुरु नंदन ॥ मग तेही दोघे जण ॥ सवेंचि जाते जाहले ॥३४॥
मनासी मागें टाकून ॥ शिबिरा जवळी आले जाण ॥ काळ रूपी तिघे जण ॥ उभे ठाकले तेधवां ॥३५॥
सकल सेना निद्रित ॥ कोणी जागें नाहीं तेथ ॥ तों पार्थें बळी देऊनि त्वरित ॥ महारुद्र स्थापिला असे ॥३६॥
स्वरूप परम भयंकर ॥ कृतांता ऐसें पसरिलें वक्र ॥ केसर ऊर्ध्व पिंगट शरीर ॥ भस्म चर्चिलें सर्वांगीं ॥३७॥
सिंदूर गंगा वाहात ॥ तैसी जिव्हा लळलळित ॥ त्रिशूलादि आयुधें समस्त ॥ भयंकर झळकती ॥३८॥
विश्व ग्रासील संपूर्ण ॥ ऐसें पसरिलें तेणें वदन ॥ तें महद्भूत देखोन ॥ अश्वत्थामा दचकला ॥३९॥
म्हणे हें तों आलें थोर विघ्न ॥ महद्भूत अत्यंत दारुण ॥ मग सोडिता जाहला बाण ॥ अति तीक्ष्ण तेजाळ ॥४०॥
ज्या बाण घायें करून ॥ महानग होतील चूर्ण ॥ तो शर न लागतां क्षण ॥ मुख पसरोन गिळीतसे ॥४१॥
तो शरनदीचे महापूर ॥ गिळिता जाहला श्रीशंकर ॥ मग तूणीर सरला समग्र ॥ गुरु पुत्र तट्स्थ राहे ॥४२॥
शक्ति टाकिली दारुण ॥ तीही चूर्ण केली चावून ॥ गदा दिधली भिरकावून ॥ तीही गिळिली तेधवां ॥४३॥
खड्ग हाणिलें सुभत ॥ तेंही दंतानें केलें पिष्ट ॥ गुरु पुत्र परम धीट ॥ नाना शस्त्रें वर्षतसे ॥४४॥
द्रौणीचे पाठीशीं भयभीत ॥ कृतवर्मा आणि शारद्वत ॥ अश्वत्थामा चिंता क्रांत ॥ म्हणे हें भूत केवीं आवरे ॥४५॥
म्यां अधर्म मांडिला दारुण ॥ म्हणोनि हें प्रकटलें विघ्न ॥ मज वारीत होता गौतमनंदन ॥ परी म्यां तें ऐकिलें नाहीं ॥४६॥
मग अद्भुत शिव स्तवन ॥ करिता जाहला गुरु नंदन ॥ म्हणे हे काळ रूप विशाल वदन ॥ कालात्मया काल रूपा ॥४७॥
हे भवभवांतका भवानीवरा ॥ भाललो चना भस्मा सुरहरा ॥ भस्मोद्धूलना भयंकरा ॥ भद्रकारका पशुपते ॥४८॥
त्रिगुणातीता त्र्यंबका ॥ त्रिशूलधारका त्रिपुरांतका ॥ त्रिदोषरहिता त्रितापमोचका ॥ कृपा करीं करीं ये वेळें ॥४९॥
कामांतका कामरहिता ॥ काकोलधरा क्षयवर्जिता ॥ दक्षमख विध्वंसका अपरिमिता ॥ गजास्य जनका गजारे ॥५०॥
य क्षाधिप मित्रा मृडानीशा ॥ मृत्युं जया श्मशानवासा ॥ वामदेवा विरूपाक्षा ॥ अंधक प्राण मोचक तूं ॥५१॥
भूताधिपति विश्वेश्वरा ॥ विश्वपालका महापापहरा ॥ अनादिसिद्धा दुष्टसंहारा ॥ विश्वव्यापका जगद्नुरो ॥५२॥
ऐसें करू नियां स्तवन ॥ मग वेदिका त्या पुढें निर्मून ॥ करिता जाहला हवन ॥ महारुद्न प्रीत्यर्थ ॥५३॥
तों भूतांचे अपार पाळे ॥ भयंकररूपें मुखें विशाळें ॥ हांका देती पसरती आवाळें ॥ चाटिती त्यांकडे पहावेना ॥५४॥
गुरु सुत टाकी आहुती ॥ म्हणे जय जय शंकरा उमापती ॥ आतां या वेदी मध्यें पूर्णा हुती ॥ माझी टाकितों भक्षीं कां ॥५५॥
सरसावला गुरु नंदन ॥ उडी टाकितो हें जाणोन ॥ प्रकटला तेथें उमारमण ॥ पंचवदन दशभुज जो ॥५६॥
म्हणे माग मी जाहलों प्रसन्न ॥ यावरी बोले गुरु नंदन ॥ म्यां जें आरंभिलें कारण ॥ सिद्धी पाववीं समस्त ॥५७॥
यावरी बोले कैला सपती ॥ सिद्धीस पावेल धरिलें चित्तीं ॥ दिव्यखड्ग दिधलें हातीं ॥ कृतान्तजिव्हे सारिखें ॥५८॥
मग पाय वंदूनि सत्वर ॥ पुढें गेले तिघे तस्कर ॥ शारद्वत कृत वर्मा द्वार ॥ रक्षिती तेव्हां सादरें ॥५९॥
गुरु सुत म्हणे अवधारा ॥ जो बाहेर निघेल त्यासी मारा ॥ पाहूं नका लहान थोरा ॥ सकट संहारा सर्वही ॥६०॥
जैसी धर्म धेनुकंठावरी ॥ बळें बैसतां वक्रसुरी ॥ सगट मोकळी होय धरित्री ॥ तेचि परी करा तुम्ही ॥६१॥
ऐसें त्यां प्रति सांगोन ॥ आंत प्रवेशला द्रोण नंदन ॥ जैसा मूषकबिळीं अहि दारुण ॥ धुसधुशित संचरला ॥६२॥
कीं कुरंग निद्रित असतां ॥ तेथें व्याघ्र आला अवचितां ॥ कीं शुष्कतृण पर्वता ॥ ज्वाला माली जाळीत ॥६३॥
अवींचे कोठारां जेवीं देख ॥ विभांडीत निघे वृक ॥ तैसा तो गुरु सुत देख ॥ आधीं शोधीत धृष्टद्युम्ना ॥६४॥
ज्या शिबिरीं होता धृष्टद्युम्न ॥ तेथेंचि गेला गुरु नंदन ॥ लत्ता प्रहार हाणोन ॥ केशीं धरोन जागा करी ॥६५॥
घाबरा पाहे द्रुपदसुत ॥ तों काळ रूप द्रौणी दिसत ॥ आपुले गळां घालीत ॥ येरू येत काकुळती ॥६६॥
म्हणे हे आचार्य पुत्रा अवधारीं ॥ मज आतां शस्त्रानें मारीं ॥ आपदा करूं नको ये अवसरीं ॥ बोले यावरी गुरु सुत ॥६७॥
तूं गुरु ह्रया केली पापमती ॥ तुज कैंची अधमा सुगती धृष्टद्युम्नाच्या युवती ॥ जाग्या जाहल्या तेधवां ॥६८॥
सेवक समस्त पळती ॥ नितंबिनी वक्षःस्थळें बडविती ॥ गळां पाश घालूनि क्षितीं ॥ मारो नियां टाकिला ॥६९॥
ऐसें घोर कर्म करून ॥ तेथूनि निघाला गुरु नंदन ॥ धृष्टद्युम्नाच्या स्त्रिया मिळोन ॥ महा शब्द गाज विती ॥७०॥
लोक जागे समस्त ॥ द्रौणी धृष्टद्युम्नाच्या रथीं बैसत ॥ मग उत्तमौजासी मारिलें तेथ ॥ क्षणमात्र न लागतां ॥७१॥
युधामन्यु धांवला तेथ ॥ गदा घायें तयासी हाणीत ॥ येरें खड्ग काढूनि शिव दत्त ॥ क्षणें तयासी मारिलें ॥७२॥
आणीक निजले होते पांचाळ ॥ ते तेथेंचि मारिले तत्काळ ॥ खड्ग धारा तेजाळ ॥ घायें उरी न उरेचि ॥७३॥
हत्ती घोडे पाय दळ ॥ संहारीत जाय सकळ ॥ सहस्त्रावधि वीर सबळ ॥ संहारीत तेधवां ॥७४॥    
जैसा कृषिकार करी सवं गण ॥ तैसीं शिरें टाकिलीं छेदून ॥ तों द्रौपदीचे पंच नंदन ॥ शस्त्रें घेऊन भांडती ॥७५॥
प्रतिविंध्य श्रुत सोम ॥ श्रुतकर्मा शतानीक नाम ॥ श्रुत सेन पांचवा परम ॥ युद्ध करिती तेधवां ॥७६॥
शिखंडी उठला तिकडून ॥ तेणें युद्ध केलें एक क्षण ॥ परी तो काळ गुरु नंदन ॥ त्या वरी हाणी शिव खड्ग ॥७७॥
शिखंडीचें शिर कमळ ॥ खड्गें छेदिलें तत्काळ ॥ तरी पांचही ते द्रौपदीचे बाळ ॥ अनिवार पणें भांडती ॥७८॥
तें प्रतिपांडव घेऊनि पाश ॥ युद्ध करिती आस मास ॥ सकल शस्त्रें तो तामस ॥ छेदिता जाहला एकदांचि ॥७९॥
रथांचीं चाकें घेऊन ॥ टाकिती द्रौपदीचे नंदन ॥ आणीक शस्त्रें दारुण ॥ वर्षते जाहले अपार ॥८०॥
परी तो काळ रूप द्रौणी ॥ पांचही मारिले तये क्षणीं ॥ शिरें टाकिलीं छेदूनी ॥ नालविरहित जेवीं कमळें ॥८१॥
सोमवंशींचे राजे पवित्र ॥ विराटाचे कित्येक पुत्र ॥ एवं मारिले सर्वत्र ॥ कोणी उरला नाहींच ॥८२॥
पांडवांचे अवघे रक्षक ॥ नाना परींचे सेवक ॥ कोणी उरला नाहीं हांक ॥ फोडावया कारणें ॥८३॥
निजल्या ठायीं मारिले फार ॥ तों मोकळे सुटले कुंजर ॥ रगडीत चालिले जीव मात्र ॥ तुरंग हिंसत धांवती ॥८४॥
प्रेतें पडलीं अपार ॥ भूतावळी धांवल्या समग्र ॥ मांस ग्रासिती सत्वर ॥ मिटक्या देती भक्षितां ॥८५॥
मनुष्यांचीं काढूनि आंतें ॥ आग्रहें देती एकमेकांतें ॥ अनंदें करू नियां तेथें ॥ हांका देती एकदांचि ॥८६॥
इकडे कुंजर मातले बहुत ॥ शिबिरें मोडूनि जीव रगडीत ॥ शुंडेनें स्यंदन भिरकावीत ॥ कित्येक चूर्ण होती घायें ॥८७॥
कज्जलें ब्रह्यांडगोल चर्चिला ॥ तैसा घोर अंधार पडला ॥ त्यांत सवेग वायु सुटला ॥ धुरळा निबिड न गणवे ॥८८॥
कित्येक उरले निश्चितीं ॥ ते आपणांतें आपण मारिती ॥ पुत्रांसी पिते नोळ खती ॥ हाणोनि पाडिती पृथ्वी वरी ॥८९॥
कोणी शिबिरा बाहेर निघत ॥ तों कृतवर्मा आणि शारद्वत ॥ शस्त्रघायें संहारीत ॥ जाहला अंत सर्वांचा ॥९०॥
मग शिबिरासी लाविला अग्न ॥ उजेडें मारिले अवघे जण ॥ रक्तनिम्नगा करून ॥ लवणाब्धि पाहों धांवती ॥९१॥
प्रेतें पडलीं बहुत ॥ धरणी रिती न दिसे तेथ ॥ एक म्हणतो येथ ॥ राक्षस येऊनि पडियेले ॥९२॥
भूतें झोटिंग धांवती ॥ रक्त मज्जा मांस भक्षिती ॥ एक मेकांचे हातींचे घेती ॥ हिरो नियां विनोदें ॥९३॥
पांडव नव्हते ते स्थळीं ॥ अगाध जाणोनि वन माळी ॥ कटका बाहेर एकांत स्थळीं ॥ शिबिर एक दिधलें होतें ॥९४॥
तेथें पांडव सात्यकी श्रीकृष्ण ॥ विचारीं बैसले सातही जण ॥ कीं ते सप्त ऋषि निर्वाण ॥ एकांतीं गुहेंत बैसले ॥९५॥
लीला विग्रही श्रीधर ॥ तोचि अवघें नाचवी सूत्र ॥ एवं वांचले पंडुपुत्र ॥ वरकड संहार जाहला ॥९६॥
सात अक्षौहिणी संपूर्ण दळ ॥ संहारोनि गेलें सकळ ॥ आपणा सहित सात निर्मळ ॥ उरवूनियां ठेविले ॥९७॥
असो इकडे तिघे जण ॥ एकत्र होऊनि गेले निघोन ॥ स्यंदनावरी बैसोन ॥ पवनवेगें चालिले ॥९८॥
केलीं कर्में तीं निश्चितीं ॥ एकमेकां प्रति सांगती ॥ इकडे दुर्यो धन पापमती ॥ कासावीस होतसे ॥९९॥
हात पाय असे आखुडित ॥ परी प्राण न जाय त्वरित ॥ तों तिघे पातले अकस्मात ॥ रक्त चर्चित सर्वांगीं ॥१००॥
शिबिरांत नसतां पंडुनंदन ॥ निजलियांसी आले मारून ॥ जैसें शून्य घरीं वाण ॥ नेऊ नियां दिधलें पैं ॥१०१॥
असो दुर्यो धन त्यांसी देखत ॥ जाहला परम हर्षयुक्त ॥ तिघे वृत्तान्त सांगत ॥ संहारिले सर्वही ॥१०२॥
एक पांडव वेगळे करूनी ॥ उरला नाहीं तेथें कोणी ॥ सात्यकी कृष्ण पांडव कोणत्या स्थानीं ॥ पळूनि गेले कळेना ॥१०३॥
शोधिलीं सर्वही स्थानें ॥ परी ते काढूनि नेले श्रीकृष्णें ॥ सांपडते तरी तत्क्षणें ॥ मारू नियां टाकितों ॥१०४॥
दुर्यो धन पहुडला क्षितितलीं ॥ जवळी गदा विशाल पडली ॥ जैसी कां सेजे पहुडली ॥ पट्टराणी प्रीतीनें ॥१०५॥
त्यांकडे पाहे दुर्यो धन ॥ म्हणे मी आतां सोडीन प्राण ॥ माझें जाहलें समाधान ॥ उत्तम कार्य तुम्हीं केलें ॥१०६॥
तों ते तिघे जण म्हणती ॥ धन्य तूं दुर्यो धना या क्षितीं ॥ पांडव परम पापमती ॥ तुज अधर्में मारिलें ॥१०७॥
तूं जातोसी स्वर्ग सदना ॥ तुझें वियोग दुःख सोसवेना ॥ आम्हांसी पृथ्वी ठाव देईना ॥ यावरी ऐसें वाटतें ॥१०८॥
आम्हीं पाप केलें दारुण ॥ निज लियां आलों मारून ॥ पांडव भायनें रान ॥ आम्हीं कोणतें घ्यावें आजि ॥१०९॥
तूं स्वर्गा प्रती ॥ तुज भीष्म द्रोण कर्ण भेटती ॥ आम्हीं सर्व मारिले ही ख्याती ॥ सांग त्यां प्रति तत्त्वतां ॥११०॥
त्यांचे अवघे उरले सात ॥ आम्ही उरलों तीन येथ ॥ दुर्यो धन म्हणे मनो रथ ॥ माझे पूर्ण तुम्हीं केले ॥१११॥
यावरी तिघे काय बोलिले ॥ आमुच्या कष्टांचें सार्थक न झालें ॥ जरी तूं वांचतासी ये वेळे ॥ तरी सर्व बरें होतें ॥११२॥
तिघांचे नेत्रीं अवधारा ॥ सुटल्या तेव्हां अश्रुधारा ॥ अहा दुर्यो धना नृपवरा ॥ जासी आम्हीं टाकूनियां ॥११३॥
ऐसें बोलती तिघे जण ॥ तो सुयो धनें वटारिले नयन ॥ हुंकारूनि सोडिला प्राण ॥ हिरस्मरण कैंचें त्यासी ॥११४॥
त्रिभुवनींचा मत्सर ॥ करूनि घडिला तो एकत्र ॥ कृष्ण द्वेषी दुराचार ॥ त्याचे मुखीं नाम कैंचें ॥११५॥
संजय म्हणे कुरुनाथा ॥ मी सर्व पाहोनि आलों आतां ॥ तुमची क्रिया तत्ततां ॥ तुम्हांसीच फळा आली ॥११६॥
सौप्तिकपर्व समाप्त ॥ एकाचि अध्यायांत जाहलें येथ ॥ पुढें ऐषिकपर्व पंडित ॥ श्रवण करोत आदरें ॥११७॥
ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ श्रीधरवरद अत्यद्भुत ॥ तो जें जें कर्णीं सांगत ॥ तेंचि येथें लिहिलें असे ॥११८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सौप्तिकपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ बावन्नाव्यांत कथियेला ॥११९॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे धृष्टद्युम्नादिनिधनं नाम द्विपंचाशत्तमाध्यायः ॥५२॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ श्रीपांडवप्रताप सौप्तिकपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP