मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय १ ला पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय १ ला पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय १ ला Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॐ नमो जी दिगंबरा ॥ ब्रह्मानंदा निर्विकारा ॥ पुराणपुरुषा परात्परा ॥ जगदुद्धारा जगत्पते ॥१॥श्रीमद्भीमातटविहारा ॥ कमलोद्भवजनका अतिउदारा ॥ अनादिसिद्धा सत्पथसारा ॥ रुक्मिणीवरा पांडुरंगा ॥२॥तूंचि जाहलासी सिद्धिविनायक ॥ मंगलारंभीं मंगलकारक ॥ करणार तूं वरदायक ॥ सर्वविद्याप्रद तूंचि पैं ॥३॥अरुणोदयसंध्याराग ॥ आरक्त रत्नांचे मेळविले रंग ॥ कीं ग्रीष्मऋतुबालार्कसुरंग ॥ तैसें अंग सतेज पैं ॥४॥सिंदूरचर्चित मंदरगिरी ॥ रम्यदोंदील त्रिभुवन उदरीं ॥ हेरंबा तव ध्यान अंतरीं ॥ ऋषिसुरनरीं सेविजे ॥५॥निजमस्तकींचा दिव्य सुगंध ॥ तेथें विद्वज्जन जाहले मिलिंद ॥ लीलाविग्रही सच्चिदानंद ॥ आनंदकंद मंगलमूर्ति ॥६॥उगवले दोन्ही वासरमनी ॥ तैसीं मकराकार कुंडलें श्रवणीं ॥ नक्षत्रपुंज ओंविले गुणीं ॥ मुक्तामाला तेवीं दिसती ॥७॥नक्षत्रीं वेष्टिला रोहिणीकांत ॥ तैसें पदक ह्रदयीं विराजित ॥ सौदामिनीवेषें झळकत ॥ शुभ्र वस्त्र गणपतीचें ॥८॥सिद्धि बुद्धि जवळी तिष्ठत ॥ कीं कनकाचल मूर्तिमंत ॥ सुरासुर ऋषि समस्त ॥ चरणांबुज सेविती ॥९॥दंतदिनकर झळकत ॥ देखतां अज्ञानतम पळत ॥ तो विनायक वरद ह्स्त ॥ उचलोन देत नाभीकारातें ॥१०॥म्हणे मी आहे पाठीशीं ॥ पांडवप्रतापग्रंथराशी ॥ वदें साहित्यद्दष्टांतेंशीं ॥ नवरसीं सुरस जो ॥११॥वंदूं कमलोद्भवकुमारी ॥ जे वर्षे शब्दसंभारीं ॥ जे ज्ञानगंगा स्वानंदलहरी ॥ ब्रह्मानंदसागरींची ॥१२॥जे सदा विलसे कविजिव्हाग्रीं ॥ जे त्रिभुवनलावण्यासुंदरी ॥ साहित्यकल्हारभ्रमरी ॥ जे सुरासुरीं वंदिजे ॥१३॥जे पदरचनेची सहस्त्रवदना ॥ कीं नवरसीं भरली यमुना ॥ गुप्त राहोनि हालवी रसना ॥ शब्द वर्षे सरस्वती ॥१४॥सकळविद्यांचे मूळपीठ ॥ जे चातुर्यसौभाग्यवरिष्ठ ॥ प्रमेयरत्नखाणी सुभट ॥ स्वामीण कविकुशलांची ॥१५॥विधि विष्णु उमापती ॥ हे तुझे उपासक सरस्वती ॥ व्यास वाल्मीकादि ऋषिपंक्ती ॥ तुज स्तविती सर्वदा ॥१६॥निगमकामधेनूचे कांसेस ॥ अर्थदुग्ध भरलें सुरस ॥ तें हें भारत भरितनवरस ॥ पंचम वेद बोलती ॥१७॥त्यांतून काढूनि नवनीता ॥ कविबालका देत माता ॥ ते भारती वंदिली तत्त्वतां ॥ ग्रंथारंभीं प्रीतीनें ॥१८॥ते वाग्वादिनी ब्रह्मपुत्री ॥ जे रसना नाचवी निजसूत्रीं ॥ जे शब्दब्रह्माची धात्री ॥ ठाणें जिव्हाग्रीं घालीत ॥१९॥ मी सर्वांचे जिव्हाग्रीं वसें ॥ शुभाशुभ फळें बोलवीतसें ॥ सद्भक्तांसी शब्दविलासें ॥ मीचवर्षें सरस्वती ॥२०॥श्रीधर म्हणे त्रिभुवनजननी ॥ ब्रह्मानंदपददायिनी ॥ भारतरचना एथूनी ॥ सुरस वदवीं माउलिये ॥२१॥देशिकराज ब्रह्मानंद ॥ लीलाविग्रही स्वानंदकंद ॥ त्याचें चरणारविंद सुगंध ॥ तेथें मिलिंद होईन मी ॥२२॥उत्तरे विज्ञानगोदावरी ॥ अनुभवकृष्णा दक्षिणपारीं ॥ मध्यें भीमरथी सुंदरी ॥ ब्रह्मानंदें वाहातसे ॥२३॥भागीरथी कीं भीमरथी ॥ ज्या त्रिभुवनीं विख्यात मिरवती ॥ यालागीं पुंडलीकवरद प्रीतीं ॥ अक्षय वस्ती करी तेथें ॥२४॥जे कां दक्षिणद्वारावती ॥ पंढरीची त्रिभुवनीं कीर्ती ॥ जेथें विराजे पांडुरंगमूर्ती ॥ भीमरथीतीरीं सर्वदा ॥२५॥त्या पांडुरंगक्षेत्रीं निश्चित ॥ ब्रह्मानंदयति समाधिस्थ ॥ जो वेदांतज्ञानी अद्भुत ॥ महिमा त्याचा न वर्णवे ॥२६॥वंदूं कुलदैवत निश्चियेंसीं ॥ जो महाराजा प्रेमपुरविलासी ॥ मणिमल्लमर्दन कैलासवासी ॥ स्वानंदराशि जगदात्मा ॥२७॥वैराग्यतुरंगीं बैसला ॥ बोधखांडा हातीं धरिला ॥ अर्धांगीं विलसे ज्ञानकळा ॥ म्हाळसादेवी चिच्छक्ति ॥२८॥तदिदंबर परम तेजाळ ॥ कीं उगवलें मार्तंडमंडळ ॥ मणिमल्लादि कुटिल खळ ॥ दळासहित मर्दिले ॥२९॥शातकुंभप्रभेसमान ॥ उधळे भावहरिद्राचूर्ण ॥ ग्रंथारंभीं मणिमल्लमर्दन ॥ प्रेमभावें वंदिला ॥३०॥जे करवीरपुरविलासिनी ॥ आदिमाया त्रिजगज्जननी ॥ तिचा अनुग्रहबोधतरणी ॥ हृदयाकाशीं उगवला ॥३१॥जे लावण्यामृताची सरिता ॥ मनोरथ पुरवी कल्पलता ॥ शक्रनंदन विधि सविता ॥ जिचें करिती आराधन ॥३२॥भेदकोल्हासुरसंहारके ॥ निजज्ञानामृतदायिके ॥ श्रीधरतान्हें कौतुकें ॥ ओसंगा घेईं आपुल्या ॥३३॥पाजूनियां प्रेमपान्हा ॥ बोलवीं पांडवप्रतापरचना ॥ ते आदिमाया विष्णुललना ॥ ब्रह्मानंदें वंदिली ॥३४॥वंदूं तो दक्षिणकेदार ॥ रत्नाचलविलासी प्रतापशूर ॥ करीत दैत्यांचा संहार ॥ दक्षिणदिशे पातला ॥३५॥जो भक्तांस सौम्य शीतल ॥ दैत्यांस भासे प्रलयकाल ॥ ऋषि सुर नर सकल ॥ पदकमल वंदिती सदा ॥३६॥अन्नसत्रकथा भारती ॥ नवरसान्नें स्वाद देती ॥ श्रवणभोजना संतपंक्ती ॥ परमप्रीतीं बैसली ॥३७॥मूळभारतकर्ता वेदव्यास ॥ लेखक जाहला जेथें गणेश ॥ तेथें म्यां ग्रंथ केला हा सोस ॥ व्यर्थ कासया घेइजे ॥३८॥व्यास वाल्मीक कविश्रेष्ठ ॥ कवि गुरु गौतम वसिष्ठ ॥ पूर्वींचे कवि संत वरिष्ठ ॥ महिमा अद्भुत तयांचा ॥३९॥कलियुगीं जाहले जे संत ॥ वर्तमानींचे आतां समस्त ॥ पुढें होणार जे निश्चित ॥ दीर्घ दंडवत समस्तांतें ॥४०॥श्रोते बोलती कुशल ॥ सांडोनि आतां सर्व पाल्हाळ ॥ बोलें भारत रसाळ ॥ आदिपर्वापासोनि ॥४१॥आधींच भारतग्रंथ थोर ॥ तो तूं बोलसी सविस्त ॥ तरी ग्रंथ होईल जैसा समुद्र ॥ श्रोते चतुर विटती पैं ॥४२॥बोलसी ध्वनित गुह्यार्थ ॥ तरी अबलांस न कळे यथार्थ ॥ तरी थोडक्यांत रस अद्भुत ॥ कथा समस्त आवरीं ॥४३॥ब्रह्मानंदपुत्र श्रीधर ॥ सकल कविसंतांचा किंकर ॥ साष्टांग घालूनि नमस्कार ॥ म्हणे सादरपरिसा आतां ॥४४॥उग्रश्रवा लोमहर्षणी ॥ शौनकादिक अपार मुनी ॥ सूतास पुसती नैमिषारण्यीं ॥ भारत निरोपीं आम्हांतें ॥४५॥ जो वैकुंठनारायण ॥ तोच अवतरला कृष्णद्वैपायन ॥ तेणें शब्दब्रह्म मथून ॥ भारतसार काढिलें ॥४६॥साठ लक्ष महाभारत ॥ देवलोकीं अर्ध दिधलें यथार्थ ॥ पंचदश लक्ष गोड बहुत ॥ पितृलोकीं ठेविलें ॥४७॥पावणेचवदा लक्ष सुरस ॥ गंधर्वलोकीं ठेवी वेदव्यास ॥ सवालक्ष मनुष्यांस ॥ मृत्युलोकीं ठेविलें ॥४८॥मनुष्यांचे अन्नगत प्राण ॥ अल्पायुषी बहुत विघ्न ॥ कृपाळु सत्यवतीनंदन ॥ तेणें सुरस काढिलें ॥४९॥तें जनमेजयें करितां प्रश्न ॥ व्यासशिष्य वैशंपायन ॥ तेणें सांगतां संपूर्ण ॥ मग प्रकटलें जगतीवरी ॥५०॥हरिवंशासमवेत ॥ अवघें सवालक्ष भारत ॥ बृह्दश्वा हे कथा अद्भुत ॥ स्वर्गीं सांगे निर्जरां ॥५१॥असित ऋषि विख्यात ॥ तो पितृलोकीं हे कथा वर्णीत ॥ यक्ष राक्षस विद्याधर समस्त ॥ शुकमुखें श्रवण करिती ॥५२॥मनुष्यलोकीं सर्वज्ञ ॥ जनमेजया सांगे वैशंपायन ॥ त्यामाजी आख्यानें पावन ॥ गीता सनत्सुजातादि ॥५३॥स्वयें बोलिला सत्यवतीसुत ॥ भारतीं शब्दकूटगणित ॥ आठ सहस्त्र आठ शत ॥ संख्या नेमस्त म्यां केली ॥५४॥त्यांत मी मानितों यथार्थ ॥ शुक्र जाणे तेथींचा अर्थ ॥ संजय चतुर बहुत ॥ जाणतो किंवा नेणतो पैं ॥५५॥अर्थ मनास आणीत ॥ हेरंब चपलत्वें लिहीत ॥ म्हणोनि कूटें अद्भुत ॥ व्यास घालीत ठायीं ठायीं ॥५६॥असो कथा ऐका विचित्र ॥ कुरुक्षेत्रीं दीर्घसत्र ॥ जनमेजय आचरितां पवित्र ॥ सिद्धी न पावे सर्वथा ॥५७॥श्रुतसेन उग्रसेन भीमसेन ॥ हे जनमेजयाचे बंधु तिघेजण ॥ सकळ आधिपत्य त्य़ां आधीन ॥ रायें केलें सत्रींचें ॥५८॥तिहीं देवशुनीचा सुत ॥ सारमेय दूर होता क्रीडत ॥ अन्याय नसतां किंचित ॥ दंडप्रहारें ताडिला ॥५९॥तो रोदन करीत मातेस सांगे ॥ येरी राजसभे पातली वेगें ॥ म्हणे अनीतिवेश्येसंगें ॥ दवडिली नीतिधर्मपत्नी ॥६०॥राव विचारी बंधूंस ॥ तों अन्याय लगटला अंगास ॥ बोलावया वाग्देवीस ॥ शब्द सहसा फुटेना ॥६१॥शुनी बोले शापवचन ॥ सिद्धि न पावे तुझा यज्ञ ॥ राजा होऊनि उद्विग्न ॥ मृगयेप्रति चालिला ॥६२॥श्रुतश्रव्याचा सुत ॥ सोमश्रवा ज्ञाणी अद्भुत ॥ त्याचे हातें नृपनाथ ॥ आरंभीत सत्रातें ॥६३॥धौम्यऋषि परमपावन ॥ त्याचे शिष्य तिघेजण ॥ बैद अरुणी उपमन्य ॥ आज्ञापीत गुरु त्यांतें ॥६४॥पांचाळखंडा जाऊनी ॥ केदार आणीं बांधूनी ॥ ऐसें ऐकोनि अरुणी ॥ पाणी नेत वाफियांतें ॥६५॥वाटेस फुटतां केदार ॥ न मिळे मृत्तिका पाषाण अणुमात्र ॥ आडवें घालूनि आपुलें शरीर ॥ बहुत दिवस निजलासे ॥६६॥काय जाहलें शिष्यवत्सासी ॥ म्हणोनि धौम्य पाहूं आला त्यासी ॥ सद्नदित होऊनि मानसीं ॥ ह्रदयीं धरिला सप्रेम ॥६७॥म्हणे तूं धन्य गुरुदास ॥ ऐश्वर्य सर्व निर्दोष ॥ प्रज्ञा आणि ज्ञान विशेष ॥ हो वाढतें तुझें ठायीं ॥६८॥आतां दुसरा शिष्य उपमन्य ॥ तो करिता जाहला गोरक्षण ॥ धर्मारण्यांत नेऊन ॥ गोशुश्रूषा बहुत करी ॥६९॥जाहले दिवस बहुत ॥ धौम्य उपमन्या पुसत ॥ बालका शरीररक्षणार्थ ॥ काय उपाय करितोसी ॥७०॥येरू म्हणे भिक्षान्नें असें जीवित ॥ गुरु म्हणे तें निषिद्ध यथार्थ ॥ सद्नुरूस अर्ध द्यावें सत्य ॥ अन्न तरीच पावन तें ॥७१॥येरू म्हणे आज्ञा प्रमाण ॥ मग अर्धभिक्षा देत आणून ॥ पक्ष मास लोटतां पूर्ण ॥ गुरु पुढती आज्ञापी ॥७२॥म्हणे वत्सा अवंचकपणें ॥ भिक्षा अवघी आम्हांस देणें ॥ उपमन्य अवश्य म्हणे ॥ आज्ञेप्रमाणें वर्ततों ॥७३॥दुसर्यानें भिक्षा करीत ॥ गुरुनें तेंही वर्जिलें समस्त ॥ जनांस पीडिशी बहुत ॥ द्विवार भिक्षा न मागें तूं ॥७४॥अवश्य म्हणोनि तो कुमार ॥ वनीं धेनु चारी निराहार ॥ बहु पीडितां क्षुधावैश्वानर ॥ सेवी गोक्षीर द्रोणभरी ॥७५॥गुरु म्हणे उच्छिष्ट केलें ॥ यज्ञासी नाहीं कदा घेतलें ॥ मग तेंही शिष्यें वर्जिलें ॥ क्लेश तिरस्कार न मानितां ॥७६॥मग वत्सें दुग्ध पितां विशेष ॥ मुखांतून गळूं लागला फेंग ॥ तो पान करितां कायेस ॥ दीप्ति पुढती चढतसे ॥७७॥गुरु तयासी पुसत ॥ येरू वर्तलें तें सांगत ॥ आचार्य म्हणे पातक बहुत ॥ पान न करीं सहसाही ॥७८॥अवश्य म्हणे उपमन्य ॥ मग अर्कीचा चीक काढून ॥ पान करितां द्रोण भरून ॥ गेले नयन विषें तया ॥७९॥धेनु आणितां गृहालागून ॥ कूपांत पडला उपमन्य ॥ गुरु म्हणे परम सहिष्ण ॥ बाल काय जाहला ॥८०॥गुरु परम सद्नद होऊनी ॥ बाह्त हिंडे घोर काननीं ॥ वत्सा उपमन्या येऊनी ॥ मज भेटें रे स्त्रेहाळा ॥८१॥तंव तो कूपांतून तांतडीं ॥ सद्नुरुनामें हांक फोडी ॥ स्वामी मज एथूनि काढीं ॥ अति अवघडीं पडियेलों ॥८२॥तेथें गुरु आला ते अवसरीं ॥ म्हणे वत्सा तूं भय न धरीं ॥ अश्विनौदेवांचें स्तवन ॥ करीं ॥ कृपा तुजवरी करतील ते ॥८३॥स्तवनासरसे दोघे येती ॥ अपूप आणून दिधला हातीं ॥ येरू म्हणे मी न भक्षीं कल्पांतीं ॥ सद्नुरूप्रति न देतां ॥८४॥देखोनि निकट गुरु दास ॥ अश्विनौदेव पावले हर्ष ॥ दिव्य द्दष्टि देऊनि त्यास ॥ कूपाबाहेर काढिलें ॥८५॥प्रसन्न होऊन ते क्षणीं ॥ वर देती आनंद दोनी ॥ वेदशास्त्रसंपन्न होऊनी ॥ अनुभवज्ञानी निपुण हो ॥८६॥ऋद्धि सिद्धि तुझे घरीं ॥ वोळंघती अहोरात्रीं ॥ तुझे दर्शनें या धरित्रीं ॥ उद्धरतील जीव बहु ॥८७॥शेवटीं स्वच्छंदें होईल मरण ॥ पावसी हरिपद निर्वाण ॥ ऐसें बोलोनि दोघे जण ॥ अंतर्धान पावले ॥८८॥यावरी तो उपमन्य ॥ जाऊनि धरी सद्नुरूचे चरण ॥ तेणेंही तैसेच वर देऊन ॥ आश्रमा आपुल्या धाडिला ॥८९॥यावरी तृतीय शिष्य बैद सत्य ॥ तेणें गुरुसेवा केली बहुत ॥ जाणोनि गुरूचें मनोगत ॥ पुरवी अर्थ सर्वही ॥९०॥गुरूस प्रिय तेंचि आचरत ॥ न सांगतां मनींचें जाणत ॥ केलें न मिरवीत ॥ झिजवी शरीर सेवेसी ॥९१॥आलियाही मरण ॥ न सांडी मर्यादा जाण ॥ अर्पियेलें तनुमनधन ॥ वरकड तेथें कायसें ॥९२॥अग्रापासूनि मूलपर्यंत ॥ इक्षुदंड गोड बहुत ॥ तैसा भजनीं उल्हासत ॥ दिवसेंदिवस आगळा ॥९३॥गुरूहून ईश्वर भिन्न ॥ ऐसें कल्पीना गेलिया प्राण ॥ गुरुसेवा परमानुष्ठान ॥ मंत्र पूर्ण गुरुनाम ॥९४॥सेवा देखोनि धौम्य ऋषी ॥ परम संतोषला मानसीं ॥ आलिंगोनियां तयासी ॥ मस्तकीं हस्त ठेविला ॥९५॥सर्वज्ञ आणि अगर्वता ॥ रूपवती आणि पतिव्रता ॥ सभाग्य आणि उदारता ॥ हें तों दुर्लभ त्रिभुवनीं ॥९६॥सभाग्य़ पुत्र आणि पितृभक्त ॥ शास्त्रज्ञ आणि वैराग्युयुक्त ॥ ब्रह्मज्ञानी आणि निरपेक्षचित्त ॥ हें तों दुर्लभ त्रिभुवनीं ॥९७॥गुरु पंडित आणि उदास ॥ शिष्य प्रज्ञावंत भावविशेष ॥ हिरा आणि तोचि परीस ॥ हें तों दुर्लभ त्रिभुवनीं ॥९८॥असो संतोषोनि गुरुनाथ ॥ बैदशिष्यास आज्ञा देत ॥ म्हणे वत्सा आश्रमा त्वरित ॥ जाऊनि नांदें यथाविधि ॥९९॥संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ हें हो प्राप्त तुजलागून ॥ यावरी तो आज्ञा घेऊन ॥ निजाश्रमीं राहिला ॥१००॥तेणें करूनि तीन शिष्य ॥ पाळी पुत्राहून विशेष ॥ गुरुगृहीं आपण भोगिले क्लेश ॥ म्हणूनि सेवा न सांगें त्यां ॥१०१॥तेणें उत्तंकनामा शिष्य जाण ॥ गृहीं ठेवूनियां रक्षण ॥ जनमेजयाचे सत्रीं जाऊन ॥ ऋत्विज जाहला बैद तो ॥१०२॥मागें भार्या तरुण रूपवती ॥ कामानलें आहाळली चित्तीं ॥ प्रार्थिती जाहली उत्तंकाप्रती ॥ मजप्रती भोगीं तूं ॥१०३॥मी गुरुतुल्य गुरुगृहिणी ॥ वचन एवढें माझें मानीं ॥ येरें ऐकतां निजकर्णीं ॥ बोटें घालूनि बुजवीत ॥१०४॥हरिस्मरण करुन देख ॥ म्हणे तूं माता मी बालक ॥ मनीं भावोनि परम दुःख ॥ परता गेला उठोनियां ॥१०५॥भुजंगावरी न घालवे हात ॥ उडीन टाकवे अग्नींत ॥ तैसी पर सती भावीत ॥ तरी तो नारायण नर नव्हे ॥१०६॥रूपवती सभाग्य उदार तरुण ॥ एकांतीं प्रार्थी स्वयें येऊन ॥ ज्याचें विकार न पावे मन ॥ तरी तो नारायण नर नव्हे ॥१०७॥एकान्त वनीं एकला फिरत ॥ महारजता लोह देखत ॥ पायें ढकलून पुढें जात ॥ तरी तो नारायण नर नव्हें ॥१०८॥निंदक निंदिती रात्रंदिन ॥ संतापें न पोळे ज्याचें मन ॥ हरिरूप देखे सर्व जन ॥ तरी तो नारायण नर नव्हे ॥१०९॥मनोजय वासनाक्षय ॥ सर्वज्ञ दयाळ सदा सदय ॥ रावरंक समान पाहे ॥ तरी तो नारायण नर नव्हे ॥११०॥बैद आश्रमा आला परतोन ॥ ज्ञानद्दष्टया कळलें वर्तमान ॥ म्हणे हा ईश्वर केवळ पूर्ण ॥ इंद्रियजित निश्चयें ॥१११॥गुरुकृपा आणि शास्त्रीं द्दष्टी ॥ ब्रह्मवेत्ता सत्कर्मराहाटी ॥ तरी सकळ तीर्थें भेटी ॥ येती त्याचिया जाणिजे ॥११२॥बैदें उत्तंक धरिला ह्रदयीं ॥ म्हणे सर्व सुख पावसी गृहीं ॥ आतां स्वस्थलाप्रती जाईं ॥ तंव तो काय बोलत ॥११३॥म्हणे कांहीं गुरुदक्षिणा ॥ मज मागावी सर्वज्ञा ॥ स्त्रियेस पुसे तो ऋषिराणा ॥ माग कांहीं इच्छित ॥११४॥म्हणे यूप भूपालाची गृहिणी ॥ दिव्य कुंडलें तिचे कर्णीं ॥ तीं आणूनि दे चौथे दिनीं ॥ मांगल्यकर्मीं त्यावया ॥११५॥तीं कुंडलें रविसमद्युती ॥ इच्छिले वेळे अमृत स्रवती ॥ येरू चालिला त्वरितगती ॥ तों मार्गीं वृषभ देखिला ॥११६॥त्यावरी एक पुरुष देखिला ॥ तेणें गोमय दिधलें ते वेळां ॥ म्हणे हें सेवीं बाळा ॥ येरें तत्काळ भक्षिलें ॥११७॥मूत्र लाविलें वदनीं ॥ तयासी वंदन करूनी ॥ गुरूपासका कृत्रिमकरणी ॥ कोणाचीही चालेना ॥११८॥पुढें चालिला वेगेंकरून ॥ लंघिलें परम घोर विपिन ॥ पावोनि यूपराजसदन ॥ तंव कोठें कांहीं दिसेना ॥११९॥बाहेर आला परतोन ॥ निकेतनीं न दिसे गृहिणी पूर्ण ॥ म्हणे उच्छिष्ट असेल वदन ॥ मुखप्रक्षालन करी वेगें ॥१२०॥मग शुद्ध होऊनि पुढती ॥ प्रवेशला निकेतनाप्रती ॥ तों देखिली जैशी पार्वती ॥ सर्वलक्षणीं मंडित ॥१२१॥केलें बहुत स्तवन ॥ सांगितलें सकळ वर्तमान ॥ म्हणे गुरु गृहिणीनें पूर्ण ॥ तुझीं कुंडलें मागितलीं ॥१२२॥भूपालआज्ञेवरून ॥ द्विज तोषविला कुंडलें देऊन ॥ म्हणे कुंडलें अमूल्य पूर्ण ॥ तक्षकें हीं मागितलीं ॥१२३॥परी मीं दिधलीं नाहींत ॥ तीं तुजलागीं जाहलीं प्राप्त ॥ तरी मार्गीं सांभाळीं बहुत ॥ तक्षक नेईल एकादा ॥१२४॥यूपराज म्हणे तूं धन्य ॥ आज पितृयज्ञ जाईं संपादून ॥ उत्तंक आज्ञेवरून ॥ राहिला होता ते दिवशीं ॥१२५॥तों मुक्तकेश होऊन ॥ वाढिलें होतें दिव्यान्न ॥ परी क्षणभरी लागला पूर्ण ॥ पर्युषितपण सहज आलें ॥१२६॥आंत केश पडिला गळून ॥ ऋषि म्हणे न जेवीं मी पूर्ण ॥ रायें कोपोनि शापिला ब्राह्मण ॥ तव संतति न वाढो ॥१२७॥राजा विचारून पाहात ॥ तों केश देखिला अन्नांत ॥ अधोवदनें विलोकीत ॥ प्रत्युत्तर नेदी कांहीं ॥१२८॥मग संतोषविला ब्राह्मण ॥ तत्काल केलें शापमोचन ॥ येरू म्हणे गुरुभक्तासी पूर्ण ॥ शापबंधन बाधीना ॥१२९॥मग अभय मागून घेतलें निःशंक ॥ पुढती करूनि शुद्ध पाक ॥ पिंडपितृयज्ञ करूनि देख ॥ मगुती उत्तंक बोळविला ॥१३०॥तो गुरुभक्त निर्दोष ॥ परनारी मानी जैसें विष ॥ दुसर्याचे गुणदोष ॥ द्दष्टीं न पडती जयाचे ॥१३१॥आज्ञा घेऊनि उत्तंक ऋषी ॥ जाता जाहला पवनवेगेंसीं ॥ चिंता वाटे मानसीं ॥ मागें पुढें पाहात ॥१३२॥तों तक्षक पाठीशीं धांवत ॥ उत्तंक जाहला तृषाक्रांत ॥ वापीचे तीरीं ठेवीत ॥ दिव्य कुंडलें तेधवां ॥१३३॥उदक प्राशितां उत्तंकें ॥ कुंडलें नेलीं तक्षकें ॥ येरू पाठीं धांवे तवकें ॥ तंव तो भूमींत प्रवेशला ॥१३४॥काष्ठदंडें तो खणीत ॥ वरूनि विलोकी विबुधनाथ ॥ होऊनियां कृपावंत ॥ वज्र प्रेरी तत्काल पैं ॥१३५॥धरा फोडून सवेग ॥ करून दाविला मोकळा मार्ग ॥ उत्तंक प्रवेशला मनीं राग ॥ न सांवरे तयातें ॥१३६॥नागभुवन देखे अद्भुत ॥ पद्मिनी नारी विराजित ॥ ब्राह्मण तक्षका धुंडीत ॥ निर्भय निःशंक एकला ॥१३७॥तों देखिला धाता विधाता ॥ श्वेतकृष्णदोरा कांतितां ॥ द्वादशधारचक्र पाहतां ॥ द्वादशपुत्र षट्कुमार ॥१३८॥तंव एक देखिला महापुरुष ॥ तो म्हणे स्तवीं इंद्रास ॥ तेणें स्तवितां अमरेश ॥ तों श्वेताश्व देखिला ॥१३९॥पुरुष म्हणे उत्तंका ॥ या तुरंगाचें अपान फुंकीं कां ॥ येरें तैसेंचि केलें देखा ॥ तों अपूर्व वर्तलें ॥१४०॥अश्वाचे मुखीं कर्णीं नयनीं ॥ ज्वाळा प्रकटती ते क्षणीं ॥ धूर भरला पाताल भुवनीं ॥ तडफडती पादोदर ॥१४१॥तक्षक भयभीत ते क्षणीं ॥ कुंडलें उत्तंका देऊनी ॥ म्हणे मज अकस्मात सांपडलीं वनीं ॥ तुझीं म्हणूनि नेणें मी ॥१४२॥पुरुष म्हणे उत्तंकालागूनी ॥ पळें वेगें अश्वावरी बैसोनी ॥ येरें तो पुरुष वंदूनी ॥ ओळंघे तुरंगीं त्वरेनें ॥१४३॥चतुर्थ दिवशीं तो द्विजन्मा ॥ पावला वेगें बैदाश्रमा ॥ कुंडलें देऊनि रामा सद्नुरूची तोषविली ॥१४४॥बैदें हृदयीं धरिला उत्तंक ॥ म्हणे मार्गीं काय देखिलें कौतुक ॥ येरू म्हणे स्वामी तूं रक्षक ॥ नानापरी सांभाळिलें ॥१४५॥परी भेटले ते कोण ॥ सांगावें तें कृपा करून ॥ गुरु म्हणे वृषभारूढ पुरुष जाण ॥ ऐरावतारूढ इंद्र तो ॥१४६॥गोमय भक्षिलें विशेष ॥ तोचि जाण सुधारस ॥ तरी सर्पभुवनाहूनि निर्दोष ॥ विषरहित आलासी ॥१४७॥क्षपणक तो कलि सत्य ॥ तुज व्यसनीं पाडूं पाहात ॥ परी पुण्यशील तूं गुरुभक्त ॥ तुज स्पर्श न करवे ॥१४८॥धाता विधाता देखिले ते क्षणीं ॥ कृष्ण श्वेत दोरे दोनी ॥ ते दिवसरात्र्यंश गणीं ॥ देखिले नयनीं तुवां कीं ॥१४९॥द्वादशधार देखिलें चक्र ॥ ते द्वादश मेघ चढले अपार ॥ देखिले जे षट्कुमार ॥ षड् ऋतु तेच पैं ॥१५०॥पातालीं पुरुष तो मेघ जाण ॥ अश्व तो ओळखें द्विमूर्धान ॥ तेणें तुझी साह्यता करून ॥ एथवरी आणिलें ॥१५१॥मग उत्तंकासी धरूनि ह्रदयीं ॥ म्हणे स्वाश्रमाप्रति जाईं ॥ तूं सर्वदा हो विजयी ॥ बहुत सुख भोगीं कां ॥१५२॥आश्रमा आला उत्तंक ॥ परी तक्षकें भोगविलें दुःख ॥ तें आठवूनि देख ॥ तळमळित विप्र तो ॥१५३॥मग जाऊनि कुरुक्षेत्रा ॥ भेटला जनमेजय नरेंद्रा ॥ म्हणे सर्पसत्र करुनि पवित्रा ॥ पितृसूड घेईं कां ॥१५४॥अरे परीक्षितीचा प्राण ॥ घेतला तक्षकें न लगतां क्षण ॥ ऐसें जनमेजया क्षोभवून ॥ सर्पसत्र मांडिलें ॥१५५॥यावरी च्यवनभार्गवाचा पुत्र ॥ प्रतीतिनामें परम पवित्र ॥ रुरुनामा ऋषीश्वर ॥ त्याचे पोटीं जन्मला ॥१५६॥त्याची प्रिया प्रवीण पद्मिनी ॥ रूपवती चातुर्य खाणी ॥ ते आश्रमीं असतां कामिनी ॥ सर्पदंश जाहला ॥१५७॥तिचें आलिंगूनि कुणप ॥ रुरु करी दीर्घ विलाप ॥ तिचे आठवूनि गुण स्वरूप ॥ वदन पिटी आक्रोशें ॥१५८॥म्हणे मित्रपुत्रा कृपावंता ॥ उठवीं एवढी लावण्यसरिता ॥ म्यां जोडिलें असेल त्या सुकृता ॥ पालटें इचे देईन ॥१५९॥साधु संत देव ब्राह्मण ॥ माता पिता गुरु जाण ॥ यांचें केलें असेल भजन ॥ तरी प्राण परतो इयेचा ॥१६०॥अयाचित दुर्बळ ब्राह्मण ॥ पीडिला बहुत ऋणेंकरून ॥ त्याचें केलें असेल ऋणमोचन ॥ तरी प्राण परतो इयेचा ॥१६१॥दीन परदेशी रोगिष्ठ केवळ ॥ त्याचा केला असेल सांभाळ ॥ मिथ्या अभिशाप बोलतां खळ ॥ जरी उठोनि गेलों असें ॥१६२॥अनाथप्रताग्निसंस्कार ॥ तरूण दरिद्रियाचें लग्न साचार ॥ साह्य केलें असेल निर्धार ॥ तरी प्राण परतो इयेचा ॥१६३॥रुरु स्त्रीचें प्रेत घेऊनी ॥ रुदन करी घोर वनीं ॥ तों देवदूत गगनीं ॥ विमानीं बैसोनि ऐकती ॥१६४॥तिहीं विमानगति खुंटवून ॥ पाहते जाहले एक क्षण ॥ करुणाशब्द ऐकोन ॥ ह्र्दय त्यांचें कळवळलें ॥१६५॥परोपकार परम पुण्य ॥ सत्तासामर्थ्य वेंचून ॥ मित्र आपुला मित्रनंदन ॥ प्रार्थूनि प्राण आणिला ॥१६६॥सावध जाहली पद्मिनी ॥ रुरूचा हर्ष न माये गगनीं ॥ देवदूतांचे चरण धरुनी ॥ स्तवन करी क्षणक्षणां ॥१६७॥बहुत ग्रंथ कासया श्रवण ॥ सारासारविचार पूर्ण ॥ अर्धश्लोकीं व्यास सांगे संपूर्ण ॥ निगमाग मगुह्य जें ॥१६८॥श्लोकार्ध ॥ परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ॥ परोपकार हेंच पुण्य अमूप ॥ परपीडा हेंच महत्पाप ॥ आपुले यत्नें पुण्यरूप ॥ क्लेश हरती परांचे ॥१६९॥आपणासमान विश्व पाहात ॥ पराच्या मोदें अति संतोषत ॥ परक्लेशें व्याकुलचित्त ॥ परोपकारी पुरुष तो ॥१७०॥संकटीं पडतां प्राणी ॥ पाठीस घाली कृपा करूनी ॥ केलें सुकृत न वदे वदनीं ॥ परोपकारी पुरुष तो ॥१७१॥धिक् संपदा धिक् ज्ञान ॥ धिक विद्या धिक् अभिमान ॥ परोपकार केलियाविण ॥ संपत्ति विधवा निंद्य ती ॥१७२॥परोपकाराविण नर ॥ पशुवत संसारीं साचार ॥ जे लेइले ते श्रृंगार ॥ प्रेतास व्यर्थ जेवीं केले ॥१७३॥तो यानारूढ हिंडत ॥ जैसें दहनार्थ चालविलें प्रेत ॥ पुढें वाद्यें वाजवीत ॥ तेवीं तो व्यर्थ संसारीं ॥१७४॥रुरु म्हणे धन्य धन्य ॥ देवदूत तुम्ही पावन ॥ तुमचे चरणावरून ॥ देह सांडणें हो माझा ॥१७५॥असो देवदूत गेले तेथूनी ॥ आश्रमा आला प्रिया घेऊनी ॥ परी सर्पाचा अपराध आठवूनी ॥ तळमळित रात्रंदिवस ॥१७६॥रुरूनें सांडूनि अनुष्ठान ॥ हस्तीं लोहदंड सबळ घेऊन ॥ सर्प मारी शोधून ॥ वरुळें बिळें सर्वही ॥१७७॥करितां सर्पसंहार ॥ देखिला दुंदुभिनामा अजगर ॥ वरी करितां दंडप्रहार ॥ तंव तो काय बोलिला ॥१७८॥मी पूर्वीं होतों विप्र ॥ खगनामा मुनीश्वर ॥ म्यां करूनि वस्त्राचा विखार ॥ साधुसंतां भेडसाविलें ॥१७९॥भयभीत ब्राह्मण ॥ पळाले जप ध्यान सोडून ॥ हांसले सकळ विषयी जन ॥ तेणें शापून मज सर्प केलें ॥१८०॥कोपिष्ठ तपस्वी साधुराव ॥ बलिष्ठ प्रतिष्ठित महानुभाव ॥ यांसीं विनोद करितां अपाव ॥ कदा काळीं चुकेना ॥१८१॥तरी रुरु अवधारीं ॥ सर्वथा तूं मज न मारीं ॥ जनमेजयाचे सत्रीं ॥ संहार सर्पां होईल ॥१८२॥रुरूचे दर्शनें साचार ॥ उद्धरला तो अजगर ॥ दिव्यदेह पावूनि सत्वर ॥ स्वर्गप्रति पावला ॥१८३॥मातृशापेंकरून देख ॥ यागीं जळतील दंदशूक ॥ सूतासी म्हणे शौनक ॥ कथा सांगें सुरस ती ॥१८४॥दक्षाच्या कन्या तत्त्वतां ॥ कश्यपस्त्रिया कद्रू विनता ॥ लावण्यखाणी पतिव्रता ॥ परी मत्सर दोघींमध्य़ें ॥१८५॥सेवेनें तोषविला भ्रतार ॥ देत कश्यप दिव्य वर ॥ कद्रूस म्हणे तुज पुत्र ॥ सहस्त्र एक होतील ॥१८६॥परम बलिष्ठ दोघे जण ॥ विनते तुज होतील नंदन ॥ दोघींस देऊनि रेतदान ॥ कश्यप गेला अनुष्ठाना ॥१८७॥यथाकाळें कद्रू वेल्हाळी ॥ सहस्त्र अंडीं प्रसवली ॥ दिव्य तेजोमय आगळीं ॥ विनता अंडीं दोन प्रसवे ॥१८८॥होतां पंचशत संवत्सर ॥ सहस्त्र अंडीं उलोन सत्वर ॥ जन्मले घोर विखार ॥ भयंकर धुंधुकारती ॥१८९॥शेष वासुकी तक्षक अही ॥ कर्कोटक ऐरावत धनंजय पाहीं ॥ मणिव्यालपत्रादि सर्वही ॥ पुत्र ऐसे प्रसवली ॥१९०॥कद्नू देखोनि पुत्रवती ॥ विनता तळमळी परम चित्तीं ॥ दिवस न भरतां स्वहस्तीं ॥ अंडें एक फोडिलें ॥१९१॥तों चरणाकडे अर्धशरीर ॥ निपजलें नाहीं साचार ॥ रुधिरमांसमय ताम्र ॥ लवथवीत न धरवे ॥१९२॥तो माहाराज अरुण ॥ मातेस बोलिला शापवचन ॥ दिवस न होतां संपूर्ण ॥ अंडें फोडिलें त्वरेनें ॥१९३॥जिचे द्वेषें फोडिलें अंडें पाहीं ॥ तिचेच घरीं दासी होईं ॥ सहस्त्र हायनें कदाही ॥ तुज सुटका नव्हेचि ॥१९४॥वचन ऐकें निर्धारीं ॥ दुसरें अंडें जतन करीं ॥ सहस्त्र वर्षाउपरी ॥ आपेंआप उलेल ॥१९५॥त्यांत जन्मेल सुपर्ण ॥ सोडवील दासीपणापासून ॥ करील त्रैलोक्य पावन ॥ विष्णुवाहन होईल तो ॥१९६॥ऐसा जन्मला अरुण ॥ आरक्तवर्ण देदीप्यमान ॥ सूर्यरथीं सारथी होऊन ॥ अद्यापि अचल बैसला ॥१९७॥मग दुसरें अंडें निगूढ स्थळीं ॥ ठेवीत विनता वेल्हाळी ॥ यावरी कद्रू एके काळीं ॥ कापटय धरून बोलत ॥१९८॥उच्चैःश्रवा नयनीं ॥ पाहूं चला दोधीजणी ॥ मग सूर्याजवळ येऊनी ॥ विलोकित्या जाहल्या ॥१९९॥अतिश्वेत तेजाळ ॥ उदधि मंथूनि नवनीतगोळ ॥ शशांकबंधु तो निर्मळ ॥ वेग प्रबळ तयाचा ॥२००॥त्या अश्वोत्तमाची प्रतिमा ॥ निर्मूं न शके कमलजन्मा ॥ ज्याचिया वेगाची सीमा ॥ मनासही आकळेना ॥२०१॥शौनक म्हणे सूता निर्धारीं ॥ उच्चैःश्रवा कैसा जन्मला समुद्रीं ॥ सूत म्हणे अवधारीं ॥ चरित्र त्याचें किंचित ॥२०२॥इंद्रास गुरुअवज्ञेचा दोष ॥ वरी दुर्वासाचा शाप विशेष ॥ तेणें स्वर्गसंपत्ति निःशेष ॥ समुद्रांत पडियेली ॥२०३॥सर्व त्रिदश द्शाहीन ॥ पद्मोद्भवा गेले शरण ॥ मग ब्रह्मयासमवेत मिळोन ॥ वैकुंठास पातले ॥२०४॥बहुत करितां स्तवन ॥ तोषला पद्माक्षीरमण ॥ म्हणे दैत्यांस साह्य करून ॥ समुद्रमंथन करा तुम्ही ॥२०५॥अन्योक्तीच्या प्रसंगेंसीं ॥ धाकटें काम सांगा दैत्यांसी ॥ त्यावरी ते गर्वराशी ॥ अवलंबतील थोर कार्य ॥२०६॥तेथें मी तुमची पाठी ॥ सर्वस्वें रक्षीन जगजेठी ॥ ऐसी ऐकतां गोष्टी ॥ त्रिदशेश्वर चालिला ॥२०७॥आत्मकार्य साधावया पूर्ण ॥ बलीच्या गृहासी येई सहस्त्रनयन ॥ विरोचनसुतें सन्मान ॥ बहुत केला ते समयीं ॥२०८॥इंद्र म्हणे क्षीराब्धि मंथून ॥ रत्नें काढावीं संपूर्ण ॥ तुमचा आमचा समान ॥ विभाग करूं साच हें ॥२०९॥अवश्य म्हणे प्रल्हादपौत्र ॥ देव दानव जाहले एकत्र ॥ विधि म्हणे रवी अवक्र ॥ मंराचळ पाहिजे ॥२१०॥सहस्र योजनें भूमीमाझारीं ॥ एकदशसहस्त्र योजनेंवरी ॥ बहु प्रयत्न केला सुरासुरीं ॥ परी कोणासी उपटेना ॥२११॥मग शेषाहातीं मुरारी ॥ पर्वत काढची झडकरी ॥ तडाडिली तेणें धरित्री ॥ गजबजलें त्रिभुवन ॥२१२॥शेषें उचलून मंदरगिरी ॥ ठेविला क्षीराब्धीचे तीरीं ॥ बिरडी तेव्हां निर्धारीं ॥ वासुकीची केली हो ॥२१३॥कमलावराचे संकेतें ॥ इंद्र म्हणे दानवांतें ॥ तुम्हीं धरणें पुच्छातें ॥ मुख प्रतापें धरितों आम्ही ॥२१४॥दैत्य बोलती सत्राणें ॥ अधमांग धरावें बलहीनें ॥ शचीवर अवश्य म्हणे ॥ मुख तुम्हीच धरा आतां ॥२१५॥असो दैत्यीं मुख द्दढ धरिलें ॥ देवीं पुच्छ आकळिलें ॥ विषवाधेवेगळें ॥ तमालनीळें त्यांस केलें ॥२१६॥समुद्रीं घालितां मंदरगिरी ॥ बुडत चालिला निधीरीं ॥ मग तो बैकुंठविहारी ॥ कमठ तळीं जाहला ॥२१७॥गर्जना करिती सुरासुर ॥ घुमों लागला क्षीरसागर ॥ मंथन मांडिलें अनिवार ॥ तडतडी शरीर वासुकीचें ॥२१८॥हेलावले सप्त पाताळ ॥ घुमघुमी विरिंचिगोळ ॥ जळचर वनचर सकळ ॥ गतप्राण पैं होती ॥२१९॥देव दैत्य श्रमले अपार ॥ आंगीं लोटती घर्मपूर ॥ तों मांडला प्रलय थोर ॥ विष दूर्धर प्रकटलें ॥२२०॥वासुकीच्या मुखामधून ॥ कालकूत उसळलें दारूण ॥ दैत्यांचे समूह संपूर्ण ॥ दग्ध करीत चालिलें ॥२२१॥विषाग्नि पेटला दारुण ॥ आहाळूं लागलें त्रिभुवन ॥ देव दैत्य शिवस्तवन ॥ करिते जाहले तेधवां ॥२२२॥कृपें धांवला कैलासनायक ॥ पसरोनियां विशाळ मुख ॥ विष प्राशिलें सकळिक ॥ कंठींच देख धरियेलें ॥२२३॥विषानल जाहला शीतल ॥ घुसळण मांडिलें सबळ ॥ चतुर्दश रत्नें तत्काळ ॥ निघतीं जाहलीं तेधवां ॥२२४॥कमला कौस्तुभ शार्ङ्ग शंख ॥ देऊनि पूजिला विकुंठनायक ॥ वसिष्ठासी कामधेनु देख ॥ उच्चैः श्रवा भास्करातें ॥२२५॥चंद्र स्वेच्छें विचरे गगनीं ॥ सुरा देती दैत्यांलागुनी ॥ ऐरावत पारिजातक ॥ रंभा रमणी ॥ सहस्त्राक्ष आवरी ॥२२६॥विष पूर्वींच निघालें ॥ तेंही चतुर्दशांत गणिलें ॥ अमृतकुंभ घेऊन ते वेळे ॥ धन्वंतरी निघाला ॥२२७॥ अमृतकुंभ देखतां द्दष्टीं ॥ धांवल्या दैत्यांच्या कोटी ॥ सकळीं घालूनियां मिठी ॥ सुधारसघट नेला ॥२२८॥म्हणती देवीं ठकविलें पूर्ण ॥ अवघीं रत्नें नेलीं हिरून ॥ आतां सुधाकुंभ गेलिया प्राण ॥ सर्वथा नेदूं देवांसी ॥२२९॥देव युद्धासी उठावले ॥ परी अमृत दानवांकरीं गेलें ॥ इंद्रें वक्षःस्थल पिटिलें ॥ म्हणे नासलें काज सर्व ॥२३०॥धांव धांव श्रीकरधरा ॥ वैकुंठवासी करुणाकरा ॥ कैवारिया मुरहरा ॥ पावें सत्वर ये वेळे ॥२३१॥मग तो परम पुरुष कैवल्यदानी ॥ प्रकटला मोहिनीरूप धरूनी ॥ जिच्या स्वरूपावरूनी ॥ ब्रह्मांडचि वोंवाळिजे ॥२३२॥आदिमाया प्रणवरूपिणी ॥ तेही लागे इचे चरणीं ॥ अनंत शक्तींची स्वामिणी ॥ वेदपुराणीं वंद्य जे ॥२३३॥ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही ॥ गर्भीं पाळी बाळें तान्हीं ॥ दंततेज झळकतांक्षणीं ॥ महामणी पाषाण होती ॥२३४॥कोटयनुकोटी मीनकेतन ॥ संडणें होत नखावरून ॥ आंगींचा सुवास संपूर्ण ॥ ब्रह्मांड भेदून वर जाई ॥२३५॥सहज बोलतां क्षितीं ॥ वाटे रत्नराशी विखुरती ॥ पदमुद्रा जेथें उमटती ॥ कमळें उगवती दिव्य तेथें ॥२३६॥त्या सुवासास वेधून वसंत ॥ भोंवता गडबडां लोळत ॥ असो कैवल्य कनकलतिका अद्भुत ॥ वैकुंठींहून उतरली ॥२३७॥नयनकटाक्षबाण ॥ सोडी असुरांकडे पाहून ॥ दैत्य ओंवाळूं पाहती प्राण ॥ वचनावरून तियेच्या ॥२३८॥देवीं दैत्यीं युद्ध सांडिलें ॥ पहावया भोंवतीं मिळाले ॥ समस्तांचे मनोमृग पाडिले ॥ नयनकटाक्षबाणेंचि ॥२३९॥बळी म्हणे इजवरून ॥ कमळा सांडावी ओंवाळून ॥ जरी हे मज वरील संपूर्ण ॥ तरी रत्नलाभ पावलों ॥२४०॥या ब्रह्मांडमंडपांत देख ॥ ऐसें स्वरूप न होय आणिक ॥ तों ते चित्कळा हास्यमुख ॥ करून बोले बळीसी ॥२४१॥कोण कार्य काय स्वार्थ ॥ कलह आरंभिला येथ ॥ बळीनें अवघा वृत्तान्त ॥ तियेप्रति सांगितला ॥२४२॥ठकवूनि नेलीं अवघीं रत्नें ॥ आतां भांडती अमृताकारणें ॥ आमुचा व्यवहार तुवां निवडणें ॥ वचनाधीन तुझ्या आम्ही ॥२४३॥मोनिनी म्हणे ते नष्ट सर्व ॥ महाठक मी जाणें देव ॥ जरी माझे वचनीं धराल भाव ॥ तरी अमृत वाढीन मी ॥२४४॥बळी म्हणे न्याय करीं ॥ आमुचा बहु अभिमान धरीं ॥ ऐसें बोलोनि मोहिनीचे करीं ॥ अमृतकुंभ दिधलासे ॥२४५॥विचित्र शाळा निर्मिल्या तेथ ॥ सर्वां हातीं स्त्रनें करवीत ॥ दैत्यपंक्ती समस्त ॥ उच्चस्थळीं बैसविल्या ॥२४६॥ देव खालीं बैसविले ॥ यावरी मोहिनी काय बोले ॥ प्रथम कोणा वाढूं वहिलें ॥ निरोप मजला सांगावा ॥२४७॥तों दैत्य बोलती विहित ॥ आधीं देवांस वाढीं अमृत ॥ पाठीं आम्ही समस्त ॥ प्राशन करूं साच हें ॥२४८॥सिंहिकासुत राहु कुटिला ॥ दैत्यांमाजी धूर्त खळ ॥ म्हणे दैत्य भुलले सकळ ॥ मोहिनीरूपें विष्णु हा ॥२४९॥म्हणे बोलतां नये ॥ मनांत गुप्त ठेविली मात ॥ देवांचा वेष धरूनि धूर्त ॥ सुरपंक्तीस बैसला ॥२५०॥चंद्रार्कांमध्यें जाऊन ॥ राहु बैसला कपट धरून ॥ तों यथानूक्रमेंकरून ॥ अमृत वाढी मोहिनी ॥२५१॥राहूचिया करांत ॥ मोहिनी घाली अमृत ॥ येरू मागें पुढें पाहात ॥ म्हणे त्वरित हें घ्यावें ॥२५२॥श्रेष्ठीं घेतलें नसतां अकस्मात ॥ राहु प्राशीत अमृत ॥ तें चंद्रार्कीं लक्षून त्वरित ॥ मोहिनीस खुणाविलें ॥२५३॥दैत्य जाणोनि मोहिनी देख ॥ काढूनि वामकर्णींचें ताटंक ॥ राहूचें शिर एकाएक ॥ गगनपंथें उडविलें ॥२५४॥शिर गर्जना करी निराळीं ॥ म्हणे दैत्य हो ठकलेत सकळी ॥ मोहिनीरूपें वनमाळी ॥ अमृत नेदी दैत्यांतें ॥२५५॥एकचि जाहला हाहाकार ॥ अमृतकुंभ सत्वर ॥ पळविता जाहला पुरंदर ॥ हातोहात तेधवां ॥२५६॥मोहिनी जाहली गुप्त ॥ संग्राम मांडला अद्भुत ॥ देव म्हणती दैत्य रे दैत्य ॥ साह्य समर्थ श्रीवल्लभ ॥२५७॥सवेंच नरनारायनरूप धरून ॥ पुन्हां प्रकटला भगवान ॥ दैत्य अपार संहारून ॥ विजयी देव जाहले ॥२५८॥केलें अमृतहरण ॥ दुःख ह्रदयीं आठवून ॥ पुन्हां दैत्य करिती भांडण ॥ म्हणती वांचून काय आतां ॥२५९॥अकाल प्रलय देखोनि ते वेळां ॥ विधीनें नारद पाठविला ॥ तो देवांस म्हणे आगळा ॥ अभिमान सांडा व्यर्थ हा ॥२६०॥सर्व वस्तू नेल्या ठकवून ॥ पुनः त्यांसींच करितां भांडण ॥ नारदवचनें करून ॥ देव सर्व माघारले ॥२६१॥मग बळीस म्हणे नारदमुनी ॥ तुज काळ साह्य नाहीं ये क्षणीं ॥ आतां विश्वजित यज्ञ करूनी ॥ इंद्रपद घेईं मग ॥२६२॥यथार्थ मानून दैत्य ॥ स्वस्थळा परतले समस्त ॥ ग्रहणीं राहु केतु झोंबत ॥ चंद्र सूर्यांस तैंपासूनी ॥२६३॥मग शतमख करी बळी ॥ वामनरूपें वनमाळी ॥ प्रकटोनि घातला पाताळीं ॥ अचळ राज्य दिधलें त्या ॥२६४॥सूत सांगतां हें कथन ॥ तोषले शौनकादि मुनिजन ॥ सुधारसाहूनि गहन ॥ गोड कथा ऐकिली ॥२६५॥ब्रह्मानंदें जोडूनि कर ॥ भक्तपंडितां विनवी श्रीधर ॥ पुढें कथा सुरस फार ॥ अत्यादरें परिसिजे ॥२६६॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ प्रथमाघ्यायीं कथियेला ॥२६७॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्रीधरकृत ॥ मंगलचरण उत्तंककथाभावार्थ ॥ समुद्रमंथन संपविलें ॥२६८॥इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि प्रथमाध्यायः ॥१॥श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ श्रीपांडवप्रताप - आदिपर्व - प्रथमाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP