मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३४ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३४ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३४ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ सुयोधना म्हणे शारद्वत ॥ आतां येथूनि युद्ध झालें प्राप्त ॥ पांडव प्रकटतील यथार्थ ॥ अज्ञातदिवस सरले कीं ॥१॥पांडव केवळ कृशान ॥ आच्छादिले अज्ञात भस्में करून ॥ प्रदीप्त होतील येथून ॥ प्रकाश पूर्ण पडेल ॥२॥सकल राजे मित्र आप्त ॥ साम दान भेद बहुत ॥ करुनि आणावे समस्त ॥ दळ अद्भुत करावें ॥३॥यावरी त्रिगर्तराज तेथ ॥ वीर सुशर्मा बोलत ॥ आमुचें राष्ट्र समस्त ॥ कीचकीं पूर्ण विध्वंसिलें ॥४॥ते गंधर्वीं मारिले समस्त ॥ विराट जाहला बलहत ॥ तरी गोग्रहण करूनि येथ ॥ समस्तही आणावें ॥५॥विराट आहे बलक्षीण ॥ इतुक्यांत राष्ट्र घ्यावें संपूर्ण ॥ मग बोले सुयोधन ॥ वर्तमान जाहलें तें ॥६॥गुप्त हेरीं वर्तमान सांगितलें ॥ गंधर्वीं कीचक मारिले ॥ तेव्हांचि मज ऐसें गमलें ॥ पांडवचि तत्त्वतां ॥७॥धर्म जेथें राहात ॥ भीष्में चिन्हें वर्णिलीं समस्त ॥ तितुकीं वैराटीं आहेत ॥ कौतेय तेथें असती पैं ॥८॥तेथें असतील पंडुनंदन ॥ तरी त्यांचे दिवस अपूर्ण ॥ आम्ही ओळखों तेव्हांचि खूण ॥ पुढती वन सेविती ॥९॥अथवा मारूनि पांडव ॥ हरावें मत्स्यराजवैभव ॥ तेथें गेलिया सर्व ॥ वर्तमान कळेल ॥१०॥पांडव दीन कोशहीन ॥ मित्रहीन नसे सैन्य ॥ ते मारावे अथवा वन ॥ सेवावया धाडावे ॥११॥दोन भाग करावी पृतना ॥ सुशर्मा वीर श्रेष्ठ जाणा ॥ तीस सहस्त्र घेऊनि सेना ॥ दक्षिणेकडे पाठवावा ॥१२॥आम्ही सर्वही मिळून ॥ करूं उत्तरेसी गोग्रहण ॥ आज्ञा देतां दुर्योधन ॥ भेरी सघन ठोकिल्या ॥१३॥वाद्यें लागलीं तुंबळ ॥ मिळालें चतुरंग दळ ॥ कृष्णसप्तमी सबळ ॥ सुशर्मा पुढें धांवला ॥१४॥विराटक्षेत्राची दक्षिण ॥ धांवले आग्नेय कोणाकडून ॥ अष्टमीसी कौरव संपूर्ण ॥ उत्तरेकडे धांवले ॥१५॥विराट विचार करीत ॥ तंव दक्षिणेचे गोप धांवत ॥ आले म्हणती समस्त ॥ गायी नेल्या त्रिगर्तीं ॥१६॥गजबजली विराटनगरी ॥ ठोकिल्या संग्रामसंकेत भेरी ॥ निजदळाशीं बाहेरी ॥ मत्स्यराज निघाला ॥१७॥राजबंधु मानिला शतानीक ॥ निजदळाशीं धांवत देख ॥ मदिराक्षनामा वीरनायक ॥ स्वसेनेशीं निघाला ॥१८॥कंक बल्लव ग्रंथिक ॥ तंतिपाळ चौथा देख ॥ यांसी संगें घेत नृपनायक ॥ रथ पृथक देऊनी ॥१९॥शस्त्रें वस्त्रें देऊन ॥ गौरविले चौघे जण ॥ विराटाचे पाठीशीं जाण ॥ पंडुनंदन चालिले ॥२०॥लागले वाद्यांचे कल्लोळ ॥ दणाणलें उर्वीमंडळ ॥ परमवेगें चतुरंग दळ ॥ परसैन्याशीं मिळालें ॥२१॥पायदळावरी पायदळ ॥ लोटलें तेव्हां तुंबळ ॥ स्वारांशीं स्वार सकळ ॥ एकसरें मिसळले ॥२२॥रथियावरी रथी ॥ देहाशा सांडूनि झगटती ॥ दंतींशीं झगटले दंती ॥ रगडिती दंताघातें ॥२३॥माजलें परम रणमंडळ ॥ धुळीनें पूर्ण जाहलें निराळ ॥ युद्धभूमि तेथें सकळ ॥ रक्तें आरक्त जाहली ॥२४॥धांवती रुधिराचे पाट ॥ पुसती महानदीची वाट ॥ बाणमंडप अचाट ॥ अंतरिक्षीं जाहला ॥२५॥रक्तमेघें भूमि भिजत ॥ धुरळा जाहला समस्त शांत ॥ परस्पर बाण झगटत ॥ तेथें वर्षत ज्वालामाली ॥२६॥शतानीक धांवला ॥ परदळांत मिसळला ॥ चार सहस्त्र ते वेळां ॥ महावीर पाडिले ॥२७॥तों मदिराक्ष धांवत ॥ चपले ऐसा तळपत ॥ महावीर शतांचे शत ॥ प्रेतें केलीं तेधवां ॥२८॥अलातचक्राचिये परी ॥ दोघे तळपती परचक्रीं ॥ मत्स्यराजें ते अवसरीं ॥ रथी मारिले पांच शत ॥२९॥आठ सहस्त्र पाडिले वीर ॥ तों सुशर्मा धांवला सत्वर ॥ हांकें गाजविलें अंबर ॥ मत्स्यराव पाचारिला ॥३०॥सुशर्म्यानें द्श बाण ॥ सोडिले विराटासी लक्षून ॥ विराटें अर्धशत शरेंकरून ॥ सुशर्माराव विंधिला ॥३१॥युद्ध मांडलें तुंबळ ॥ तों मावळलें सूर्यमंडळ ॥ तमें दाटलें भूमंडळ ॥ कीं कृष्णकंबळ पसरलें ॥३२॥आकाश माखलें काजलें ॥ ऐसें समस्तांसी वाटलें ॥ क्षणैक युद्ध बळावलें ॥ तों उदेलें चंद्रबिंब ॥३३॥बोधें निरसे अज्ञान ॥ तैसें तम गेलें निघोन ॥ सुशर्मा ॥ वीर बलवान ॥ विराटसैन्य मारिलें ॥३४॥विराटाचे पाठिराखे बहुत ॥ बाणघायें केले प्रेत ॥ मग रथाखालीं उतरत ॥ सुशर्मा गदा घेऊनी ॥३५॥रथावरी चढोन ॥ विराटासी हातीं धरून ॥ सुशर्मा गेला घेऊन ॥ क्षणमात्र न लागतां ॥३६॥घालूनियां रथावरी ॥ सुशर्मा परतला झडकरी ॥ विराटसैन्य ते अवसरीं ॥ चौपारीं फुटियेलें ॥३७॥धर्म म्हणे भीमा अवधारीं ॥ आम्ही राहिलों याचे मंदिरीं ॥ उपकार फेडीं झडकरी ॥ सोडवीं राजा विराट ॥३८॥कृतांतकिंकाळीसमान ॥ भीम धांवत हांक देऊन ॥ आलों रे आलों ऐसें गर्जोन ॥ तरु उपडून धांविन्नला ॥३९॥भीमासी म्हणे धर्मनृपाळ ॥ वृक्ष नुपडीं विशाळ ॥ ओळखतील दुष्ट सकळ ॥ पांडव हेचि म्हणोनि ॥४०॥मनुष्यासारिखें युद्ध करीं ॥ विराट सोडवीं झडकरी ॥ भीम बैसोनि रथावरी ॥ धनुष्य घेऊनि धांवला ॥४१॥भीमाचे पाठिराखे अभिनव ॥ धांवले नकुल सहदेव ॥ कृतान्तही युद्धीं हांव ॥ ज्यांशीं धरूं शकेना ॥४२॥भीमें फोडिली महाहांक ॥ म्हणे उभा रे उभा नावेक ॥ मजशीं युद्ध करीं क्षणैक ॥ पळों नको पुढारां ॥४३॥मग सुशर्मा होऊनि भयभीत ॥ भीमाकडे माघारा पाहात ॥ म्हणे हा आला कृतान्त ॥ अकस्मात कोण कैंचा ॥४४॥भीमाचे बाण अनिवार ॥ सात सहस्त्र पाडिले वीर ॥ सात शतें महाशूर ॥ नकुळें रणीं पहुडविले ॥४५॥सहदेवें तीन शात ॥ वीर पाडिले तेव्हां क्षणांत ॥ धर्म रथारूढ धांवत ॥ अमित बाण सोडीतसे ॥४६॥सुशर्मा प्रचंड वीर ॥ त्यासी न गणीच युधिष्ठिर ॥ जैसे मूढाचे शब्द अपार ॥ पंडित न गणिती सहसाही ॥४७॥धर्में सोडोनियां बाण ॥ सारथी मारिला न लागतां क्षण ॥ विराट रथाखालीं उतरोन ॥ गदा घेऊन धांवला ॥४८॥सुशर्म्याची गदा घेऊन ॥ त्यावरीच घातली उचलोन ॥ त्रिगर्त रथ सांडून ॥ पळता जाहला तेधवां ॥४९॥तों भीम धांवला वेगेंशीं ॥ सुशर्मा धरिला द्दढ केशीं ॥ जेवीं महाव्याघ्राचे कवेसी ॥ जंबुक पळतां सांपडला ॥५०॥सुशर्मा पाडूनि भूमीवरी ॥ भीमें ताडिला लत्ताप्रहारीं ॥ उरलें सैन्य झडकरी ॥ पळूं लागलें शत्रूचें ॥५१॥नकुळसहदेवीं ते वेळां ॥ गायी गांवाकडे परतविल्या ॥ जयवाद्यांचा लागला ॥ घोष तेव्हां तुंबळ ॥५२॥तुरंग गज महारथ ॥ विराटें लुटिले समस्त ॥ भीमें सुशर्म्यासी त्वरित ॥ धर्माजवळी आणिलें ॥५३॥धुळीनें वदन भरलें ॥ सर्वांगीं रुधिर सुटलें ॥ विराट धर्म ते वेळे ॥ विलोकिती कौतुकें ॥५४॥धर्म म्हणे हा नराधम ॥ कुटिलांमाजी श्रेष्ठ परम ॥ याचें वाचेसी न घ्यावें नाम ॥ सोड जाऊं दे येथोनि ॥५५॥सुशर्म्यासी म्हणे भीमसेन ॥ मी दास ऐसें बोलें वचन ॥ नाहीं तरी तोंड फोडीन ॥ बंदी घालीन बांधोनी ॥५६॥कंका आणि विराटभूपाला ॥ नमस्कार घालीं खला कुटिला ॥ मग सुशर्मा ते वेळां ॥ म्हणे मी दास शरणागत ॥५७॥कंकविराटांसी करितां नमन ॥ भीमें तत्काल दिधला देऊन ॥ पूजिता जाहला चौघांसी ॥५९॥म्हणे अपयश समुद्रा माजी जाण ॥ यश गेलें होतें बुडोन ॥ तें मज सहित काढून ॥ विजय ध्वज उभारिला ॥६०॥न माय ब्रह्मांडा माजी ॥ एवढा उपकार केला आजी ॥ मज तुम्हीं स्थापिलें राज्यीं ॥ जन्मवरी विसरेंना ॥६१॥एकें केला उपकार ॥ जीवदान दिधलें थोर ॥ त्यासी जो नाठवी पामर ॥ अंधतमीं बुडेल तो ॥६२॥जन्मवरी तुम्हांसी जाण ॥ प्राणांहूनि विशेष पाळीन ॥ आपुली कन्या देऊन ॥ सेवा करीन तुमची मी ॥६३॥मज गमतें ऐसें साचार ॥ कीं तुम्ही ईश्वरावतार ॥ मी तुम्हांवरी धरीन छत्र ॥ अहोरात्र न विसंबें ॥६४॥धर्म म्हणे सर्व पावलें ॥ तुझ्या वचनें मन संतोषलें ॥ राया सुटलासी या वेळे ॥ इतुकेन आम्ही कृतकृत्य ॥६५॥धर्म सांगे राजसेवकांस ॥ गांवांत गाजवा ऐसा घोष ॥ कीं विराटें जिंकूनि सुशर्म्यास ॥ पुढती सोडूनि दीधलें ॥६६॥तों अष्टमीचे दिवशीं साचार ॥ धांवले कौरवांचे भार ॥ उत्तरेच्या गायी समग्र ॥ साठसहस्त्र वळियेल्या ॥६७॥गंगात्मज भरद्वाजसुत ॥ गौतमतनय गुरुपुत्र अद्भुत ॥ आदित्यात्मज अंधपुत्र विख्यात ॥ शतबंधूंशीं धांवला ॥६८॥भीष्म पितृव्य बाल्हीक ॥ भूरिश्रवा सौबलादिक ॥ जयद्रथादि वीरनायक ॥ निजभारांशीं धांवले ॥६९॥विराटाचे पशुपाल ॥ त्यांहातीं गायी वळिल्या सकळ ॥ मुख्य गोपाधिप होता चपल ॥ रथारूढ पळाला ॥७०॥आला धांवत नगरांत ॥ उत्तर होता अंतःपुरांत ॥ तयापाशीं येऊनि सांगत ॥ गायी समस्त वळियेल्या ॥७१॥आले कौरवांचे भार ॥ जे कृतांतासही अनिवार ॥ महाराज तूं राजपुत्र ॥ ख्याति लावीं समस्तां ॥७२॥क्षणक्षणां महासभेंत ॥ पिता तुझा तुज वर्णीत ॥ आजि तें करूनि सत्य ॥ दावीं वेगें नरोतमा ॥७३॥पुरुषार्थ करूनि या समयीं ॥ सोडवीं साठ सहस्त्र गायी ॥ वाट पाहती वत्सें गृहीं ॥ धांवें लवलाहीं वीरेशा ॥७४॥उत्तर म्हणे ते समयीं ॥ मजयोग्य सारथी नाहीं ॥ भीष्मद्रोणादिक सर्वही ॥ क्षण न लागतां जिंकीन ॥७५॥दुर्योधन दुःशासन ॥ अश्वत्थामा गौतम कर्ण ॥ शकुनि जयद्रथ दारुण ॥ विभांडीन क्षणार्धें ॥७६॥माझा देखतां पुरुषार्थ ॥ म्हणतील साक्षात हा पार्थ ॥ ऐकतां सैरंध्री हांसत ॥ मग बोलत उत्तरासी ॥७७॥पाथोचा सरथी तत्त्वतां ॥ बृहन्नटा पूर्वीं होता ॥ तरी त्यासी प्रार्थूनि आतां ॥ समागमें नेइंजे ॥७८॥उत्तरेसी पाठवून ॥ आणी येथें बोलावून ॥ पार्थें जाळिलें खांडववन ॥ तेव्हां सारथी हाचि होता ॥७९॥मग उत्तर म्हणे उत्तरेसी ॥ जाऊनि सांगें बृहन्नटेसी ॥ येरी निघाली वेगेंशीं ॥ हंसगती चमकत ॥८०॥कमल नयना बिंबाधरी ॥ कंबुकंठी सुहास्यवक्री ॥ हरिमध्या शुभगात्री ॥ अंजन नेत्रीं सोगयाचें ॥८१॥सर्वालंकारीं मंडित ॥ विद्युल्लते ऐसी चमकत ॥ नयन कटाक्षें मन्मथ ॥ भुलवोनि सोडी क्षणार्धें ॥८२॥असो बृहन्नटेसी प्रार्थूनि उत्तरा ॥ उत्तरापाशीं आणी सत्वरा ॥ रथ सिद्ध केला तये अवसरा ॥ सालंकार शस्त्रास्त्रीं ॥८३॥बृहन्नटा बोले उत्तर ॥ नितंबिनीं माजी मी चतुर ॥ नृत्यगायन जाणें समग्र ॥ अद्यापि समर न देखिलें ॥८४॥उत्तर म्हणे आग्रह न धरीं ॥ बैसें वेगें रथावरी ॥ गायी घेऊनि जाती वैरी ॥ गजपुरासी त्वरेनें ॥८५॥सेनेसहित मत्स्यनृपवर ॥ दक्षिणेसी गेला बल सागर ॥ बोलतां जाहला बहु उशीर ॥ त्वरा करीं बृहन्नटे ॥८६॥कवच घालीं हें अंगीं ॥ स्वहस्तें देत उत्तर वेगीं ॥ बृहन्नटा म्हणे लगबगीं ॥ कैसें ल्यावें कळेना ॥८७॥गदगदां हांसती कुमारी ॥ कैसी धीर धरिशील समरीं ॥ कवच ल्यावें कोणेपरी ॥ तुज आधीं समजेना ॥८८॥ऐसें लाघव दावूनि पार्थ ॥ कवच लेवूनि शस्त्रें बांधीत ॥ माथां केश मागें रुळत ॥ भुजंगा ऐसी त्रिवेणी ॥८९॥दोघे बैसले रथावरी ॥ हळू ह्ळू जात नगरा बाहेरी ॥ बृहन्नटेसी हांसती नारी ॥ चढूनि गोपुरीं विलोकिती ॥९०॥नगरा बाहेरी श्मशान ॥ उजवें घालोनि नेत स्यंदन ॥ मग पार्थें सांवरून ॥ वाग्दोरे द्दढ धरियेले ॥९१॥चापापासूनि सुटला बाण ॥ तैसा नेत त्वरें स्यंदन ॥ तों कौरवभार दुरून ॥ उत्तरें द्दष्टीं देखिला ॥९२॥प्रलयीं विजा झळकत ॥ तैसे ध्वज देखिले तळपत ॥ रणसागरींचीं जहाजें रथ ॥ तैसे विशाल दिसती पैं ॥९३॥हिणाविती भगणांस ॥ तेवीं झळकती रथांचे कळस ॥ उदय पावला बालदिनेश ॥ तैसीं चापें तळपती ॥९४॥जैसे ऐरावताचे सुत ॥ तैसे वारण चौदंत ॥ वरी पाखरा रत्नजडित ॥ भयानक गर्जती ॥९५॥तुरंग उच्चैःश्रव्या समान ॥ वेगें जैसा प्रभंजन ॥ हिंसतां गर्जविती गगन ॥ रत्नालंकारें शोभती ॥९६॥धडकती वाद्यांचे गजर ॥ ऐकतां मेघ भयातुर ॥ दिग्गज कांपती समग्र ॥ सोडूं पाहती अवनीतें ॥९७॥ऐसें असंभाव्य सैन्य देखत ॥ उत्तर थरथरां कांपत ॥ म्हणे बृहन्नटे परतवीं रथ ॥ माझेनें हें देखवेना ॥९८॥हें दळ उचंबळलें अचाट ॥ कीं उसळलें काळकूट ॥ हे सेना नव्हे स्पष्ट ॥ कृतांतें मुख पसरिलें ॥९९॥उचंबळलें मेघडंबर ॥ तैसे दिसती हे वीरभार ॥ मज देखतां न धरवे धीर ॥ प्राण जाईल वाटतें ॥१००॥मग हांसोनि बोले पार्थ ॥ तूं क्षत्रिय न होसी यथार्थ ॥ तुज लागलें नाहीं एक क्षत ॥ तों भयभीत जाहलासी ॥१०१॥तुझा होता बहुत भ्रम ॥ जळो तुझा क्षात्रधर्म ॥ अधमाहूनि अधम ॥ मत्स्योदरी आलासी ॥१०२॥उत्तर म्हणे नगरांत ॥ मज नेऊनि घालवीं त्वरित ॥ जाऊं दे गायी समस्त ॥ मिळती बहुत वांचलिया ॥१०३॥मज पाहवेना पुढें ॥ रथ मुरडीं ग्रामाकडे ॥ माझें वदन जाहलें कोरडें ॥ नेत्र भोंवती गरगरां ॥१०४॥ऐसें बोलूनि तांतडी ॥ रथाखालीं घातली उडी ॥ पळत वगें आडाआडी ॥ आली हुडहुडी हिंवाची ॥१०५॥मागें पाहे कुंतीकुमार ॥ तों रथावरी नाहीं उत्तर ॥ नगरमार्गें पळे सत्वर ॥ मागें पुढें न पाहे ॥१०६॥शत्रू समोर पाहतां द्दष्टीं ॥ त्यांसी न दाखवावी कदा पाठी ॥ पुढें पाहोनि वीर किरीटी ॥ माघारा धांवे त्वरेनें ॥१०७॥प्रभंजनगतीनें वेगेंशीं ॥ पळतां उत्तर धरिला केशीं ॥ ओढूनि आणिला रथापाशीं ॥ उचलूनि वरी घातला ॥१०८॥उत्तरासी धरूं गेला अर्जुन ॥ तें द्रोणें लक्षिलें दुरून ॥ म्हणे हा पार्थ कुंतीनंदन ॥ स्त्रीवेषें अवगला ॥१०९॥भीष्मासी म्हणे भारद्वाज ॥ जो पद्मजजातोद्भवात्मज ॥ त्याचा तनुज हा तेजःपुंज ॥ ओळखों येतसे तूं ओळखीं ॥११०॥इकडे उत्तर पदर पसरून ॥ किरीटीशीं मागे जीवदान ॥ म्हणे माझें धनकोश तुज देईन ॥ सोडीं मज जाऊं दे ॥१११॥सत्स्यरायासी सांगोन ॥ राज्य समस्त तुज देववीन ॥ आम्ही वांचलिया गोधन ॥ बहुसाल मेळवूं ॥११२॥अर्जुन म्हणे धरीं धीर ॥ पैल शमीवरी चढें सत्वर ॥ माझें धनुष्य आणि तूणीर ॥ देईं मज खालतें ॥११३॥येरू म्हणे माझें धनुष्य घेऊन ॥ करीं कां येथें युद्धकंदन ॥ हांसोनि बोले अर्जुन ॥ हीं मानवी चापें कायशीं ॥११४॥तें अग्नीनें दिधलें चाप ॥ त्रिभुवनांत त्याचा प्रताप ॥ ज्याचा गुण ओढितां कंप ॥ सुटे सकल वीरांतें ॥११५॥उत्तर म्हणे बांधलें प्रेत ॥ मी कैसा जाऊं सांग तेथ ॥ पार्थ म्हणे भय नाहीं किंचित ॥ मग तो चढत तेधवां ॥११६॥वेष्टनें काढूनि सत्वर ॥ पाहता जाहला उत्तर ॥ तों प्रचंड सर्प भयंकर ॥ तैसीं चापें दिसताती ॥११७॥वैराटी म्हणे पाहोन ॥ स्पर्श न करवे येथें माझेन ॥ पांचही चापें पूर्ण ॥ शेषाकार दिसती पैं ॥११८॥त्यांत हें मृख्य रुंद सुबद्ध ॥ वरी रत्न जडित कंकर प्रसिद्ध ॥ हें मस्तकीं रेखिलें प्रसिद्ध ॥ शातकुंभबिंदू वरी ॥११९॥तैसाचि प्रचंड अक्षय तूणीर ॥ सांग हें कोणांचें साचार ॥ कौंतेय म्हणे पार्थवीर ॥ त्याचें चाप जाण हें ॥१२०॥देव समस्त जिंकोन ॥ अग्नीसी दिधलें खांडववन ॥ हातीं धरी चतुरानन ॥ पांच सहस्त्र वर्षें हें ॥१२१॥पांचशत संवत्सर ॥ दक्ष धरी हें साचार ॥ तितुकींच वर्षें निर्धार ॥ शक्रवरुणीं धरियेलें ॥१२२॥पंचवीस वर्षें पर्यंत ॥ हातीं धरी तो वीर पार्थ ॥ तैसींच चौघां बंधूंचीं अद्भुत ॥ चापें यशवंत असती पैं ॥१२३॥मग ऐकोनि बोले उत्तर ॥ तो कोठें सांग पार्थवीर ॥ नकुल सहदेव वृकोदर ॥ धर्म द्रौपदी सांग कोठें ॥१२४॥मग ईषद्धास्य करून ॥ म्हणे बापा मीच अर्जुन ॥ कीचक मारिले तो भीमसेन ॥ कंक जाण धर्मराज ॥१२५॥ग्रंथिक आणि तंतिपाल ॥ ते माद्रीपुत्र सहदेव नकुल ॥ सैरंध्री द्रौपदी निर्मला ॥ कीचकप्राणहर्ती जे ॥१२६॥उत्तर बोले मग प्रेमें ॥ सांग अर्जुनाचीं दश नामें ॥ त्या नामांचा अर्थ नेमें ॥ सांग करूनि उघडा पैं ॥१२७॥अर्जुन फाल्गुन जिष्णु तीन ॥ किरीटी बीभत्सु श्वेतवाहन ॥ सव्यसाची विजय कृष्ण ॥ धनंजय हीं दशनामें ॥१२८॥गुद्धवर्ण नव्हे विवर्ण ॥ म्हणोनि नाम अर्जुन ॥ पूर्वाफल्गुनिका नक्षत्र पूर्ण ॥ उत्तराफल्गुनिका दुसरें पैं ॥१२९॥दोहोंचे संधींत जन्मलों जाण ॥ म्हणोनि नाम फाल्गुन ॥ जिंकीन इंद्रादि देवगण ॥ जिष्णु नाम या हेतू ॥१३०॥इंद्रें दिधला किरीट ॥ किरीटी नामाचा बोभाट ॥ युद्धीं बीभत्सु दिसें अचाट ॥ बीभत्सु नाम या हेतू ॥१३१॥श्वेत हय श्वेत रथ जाण ॥ म्हणोनि नाम श्वेतवाहन ॥ उभयहस्तें समसंधान ॥ सव्यसाची या हेतू ॥१३२॥सर्वदाही प्राप्त जय ॥ म्हणोनि नाम विजय ॥ आतां कृष्ण नाम पंडुराय ॥ ठेवीत जाण या हेतू ॥१३३॥श्रीकृष्ण गाय़ी गोपाळ मृत्तिकेच्या मूर्ति करूनि निर्मळ ॥ बाळपणीं खेळें खेळ ॥ कृष्णलीला सर्वदा ॥१३४॥श्री कृष्ण सखा म्हणोन ॥ पंडूनें ठेविलें नाम कृष्ण ॥ राजे जिंकूनि घेतलें धन ॥ धनंजय नाम या हेतू ॥१३५॥मग उत्तर खालीं उतरून ॥ अर्जुनासी करी साष्टांग नमन ॥ आसुवें भरले नयन ॥ देत आलिंगन सप्रेम ॥१३६॥उत्तर म्हणे दुष्ट वचनें ॥ बोलिलों असेन नेणतपणें ॥ तीं क्षमा करावीं दयाघनें ॥ दीनालागीं सर्वदा ॥१३७॥उत्तर म्हणे ते वेळां ॥ आतां न भीं मी कळिकाळा ॥ आज्ञा करिसी जी दयाळा ॥ ती मी मस्तकीं वंदीन ॥१३८॥अर्जुन म्हणे भय न धरीं ॥ पुढें बैसोनि सारथ्य करीं ॥ उत्तर म्हणे ते अवसरीं ॥ आज्ञा अवश्य करीन हे ॥१३९॥मग शमीसी प्रदक्षिण ॥ स्तवीत तेव्हां श्वेतवाहन ॥ शमी तुझें घेतां दर्शन ॥ शमे पाप सर्वही ॥१४०॥शमीदर्शनें शत्रु शमती ॥ शमी वंदितां रोग हरती ॥ शमीदर्शनें जयप्राप्ती ॥ रघुवीरासी जाण पां ॥१४१॥शमीपत्रें शिरीं वंदून ॥ गाडीत तूणीर प्रेमें नमून ॥ उत्तर आणि अर्जुन ॥ रथावरी चढियेलें ॥१४२॥श्रीरंगसारथी दारुक ॥ कीं निर्जरेश्वराचा मातली देख ॥ तैसा उत्तर सुहास्य मुख ॥ सारथी तेव्हां जाहला ॥१४३॥अर्जुनें वरुणास्त्रशर ॥ सोडूनि फोडिलें पृथ्वीचें उदर ॥ तेथेंचि केलें सरोवर ॥ पार्थ उत्तर स्त्रान करिती ॥१४४॥पार्थें नित्यनेम सारून ॥ केलें मानसीं कृष्णाचें ध्यान ॥ जयप्राप्तीसी कारण ॥ कृष्णनाम जपे सदा ॥१४५॥मग उभा राहिला पार्थ ॥ ह्रदयीं चिंतिला विजयरथ ॥ तों आकाशपंथें अकस्मात ॥ अमरनाथें धाडिला ॥१४६॥ध्वज फडकतसे थोर ॥ वर बैसला अंजनी कुमार ॥ अस्त्रें स्मरे पार्थवीर ॥ तीं मूर्तिमंत पातलीं ॥१४७॥अस्त्रें म्हणती अर्जुना ॥ सांग आम्हांसी कांहीं आज्ञा ॥ धनंजय करी प्रार्थना ॥ माझिया मना माजी रहावें ॥१४८॥दिव्य वस्त्रें भूषणें ॥ शक्रें धाडिलीं पार्थाकारणें ॥ तीं घेतलीं अर्जुनें ॥ जीं कां मनुष्यां दुर्लभ ॥१४९॥वेणी उकलूनि ते वेळां ॥ किरीटीनें किरीट घातला ॥ कौरवभार दचकला ॥ तटस्थ पाहती दूरुन ॥१५०॥उदयाचलावरी सूर्यनारायण ॥ कीं सुपर्णावरी इंदिरारमण ॥ हंसावरी चतुरानन ॥ कीं सहस्त्रनयन गजावरी ॥१५१॥गांडीवचापाची गवसणी ॥ अर्जुनें काढिली तये क्षणीं ॥ वाटे कल्पांतविद्युल्लता कडकडोनी ॥ चापामाजी प्रवेशली ॥१५२॥याज्ञिकें होमकुंडांतून ॥ प्रदीप्त केला जैसा अग्न ॥ तैसा तूणीर उघडोन ॥ बांधी झाडून पाठीसी ॥१५३॥तों अवचिन्हें अद्भुत ॥ उठलीं कौरवसेनेंत ॥ सुटतां झंझामारुतं ॥ धुळीनें झांकत सैन्य तेव्हां ॥१५४॥गृध्र आणोनि प्रेतखंडें ॥ टाकिती सकळांचे पुढें ॥ मंद चालती चपळ घोडे ॥ अश्रु नयनीं वाहती ॥१५५॥ऐसें देखोनि दुर्योंधन ॥ म्हणे कां उदेलें दुश्चिन्ह ॥ भयें व्याप्त परिपुर्ण ॥ उद्विग्न मन जाहलें ॥१५६॥इकडे उत्तर म्हणे तये क्षणीं ॥ धनुर्धरां माजी चूडामणी ॥ तूं एकला कीं आजि रणीं ॥ शत्रू बहुत दिसती पैं ॥१५७॥अर्जुन म्हणे साह्य श्रीकृष्ण ॥ कासया पाहिजे बहुत सैन्य ॥ अग्नीसी दिधलें खांडववन ॥ दुसरें कोण तेथें होतें ॥१५८॥गंधर्व रात्रीं जिंकिले ॥ निवातकवच संहारिले ॥ द्रौपदीस्वयंवरीं युद्ध जाहलें ॥ सेना कैंची तेधवां ॥१५९॥उत्तराचा रथ पहिला ॥ तो शमीपाशींच ठेविला ॥ प्रदक्षिणा करूनि बैसला ॥ रथावरी धनंजय ॥१६०॥सकल रथांचा राव ॥ रचना त्याची अभिनव ॥ दिव्य अचलांचा समूह ॥ तैसा ध्वज झळकतसे ॥१६१॥उचंबळलें मेघडंबर ॥ कीं ग्रीष्मकाळींचा दिनकर ॥ कीं गरुडाचा पक्ष सतेज थोर ॥ तैसा फडके नभोमंडळीं ॥१६२॥रत्न जडित वज्रचाकें ॥ स्वकरें घडिलीं शश्यर्कें ॥ रथकळसाचीं रत्नें सुरेखें ॥ भगणांतें हिणविती ॥१६३॥क्षीरसागरांत धुतले ॥ कीं रविलोकींहूनि उतरले ॥ कीं शशिकिरण ॥ आटूनि घडिले ॥ चार्ही घोडे रथाचे ॥१६४॥गोधांगुलित्राण ॥ हस्तीं घालीत अर्जुन ॥ धनुष्याप्रति शर चढवून ॥ ओढी आकर्ण कौंतेय ॥१६५॥गांडीव टणत्कारिलें ते क्षणीं ॥ झणत्कारल्या लघूकिंकिणी ॥ सप्तद्वीपें आणि धरणी ॥ डळमळली अतिभयें ॥१६६॥भोगींद्र द्चकला अंतरीं ॥ पाताळीं कूर्म पृष्ठी सांवरी ॥ आदिवराह धरित्री ॥ उचलूनि देत दाढेनें ॥१६७॥घडघडी विजयस्यंदन ॥ ध्वजीं गर्जे वायुनंदन ॥ त्याभोंवतीं भूतें दारुण ॥ हांकें गगन गाजविती ॥१६८॥जाहली एकचि हांक ॥ बैसे काळाचे मनीं दचक ॥ तों वाजविला कंबुनायक ॥ देवदत्त अर्जुनें ॥१६९॥कौरवदळ भयभीत ॥ वाटे मांडला कल्पान्त ॥ चापापासूनि बाण सुटत ॥ तैसा रथ येत पार्थाचा ॥१७०॥वायूसी मागें टाकून ॥ मनोगतीं जाय स्यंदन ॥ तों उत्तर रथावरून ॥ उसळोन खालीं पडियेला ॥१७१॥तैसें या वायुवेगांत ॥ कृष्णें देऊनियां हात ॥ उत्तर उचलोनि अकस्मात ॥ रथावरी बैसविला ॥१७२॥पाठी थोपटोनि तयासी ॥ म्हणे भिऊं नको मानसीं ॥ विराटपुत्रा क्षत्रिय होसी ॥ कैसें करिसी राज्य पुढें ॥१७३॥बृहस्पती ऐसा वक्ता ॥ तया मतिमंद मिळे श्रोता ॥ तैसा तूं विजयरथा ॥ सारथी प्राप्त जाहलासी ॥१७४॥कौरववाद्यांचा कल्लोळ ॥ आतां होईल एकरोळ ॥ डळमळेल ब्रह्मांडगोळ ॥ तेव्हां मग काय करिसी ॥१७५॥उत्तर प्रत्युत्तर देत ॥ म्यां देखिले बहुत रथ ॥ ध्वजही पाहिले अमित ॥ रथनायक देखिले बहू ॥१७६॥चापेंही देखिलीं असंख्यात ॥ परी हे प्रतिमा नाहीं त्रिभुवनांत ॥ हा भूतांसहित गर्जतां हनुमंत ॥ मज कल्पान्त वाटतो ॥१७७॥तुझा वाजतां देवदत्त ॥ माझें काळीज थरथरां कांपत ॥ बहु न बोलावें म्हणे पार्थ ॥ वाग्दोरे द्दढ धरीं कां ॥१७८॥येथें काळ आलिया समरांगणीं ॥ मी उभाचि फोडीन निजबाणीं ॥ तूं भय न धरीं अंतःकरणीं ॥ देवदत्त वाजवितों ॥१७९॥मग शंख वाजविला अद्भुत ॥ तेणें अवनीतल उलथूं पाहात ॥ खळखळां खालीं रिचवत ॥ भगणें आणि विद्युल्लता ॥१८०॥वाटे अंबर आसुडत ॥ मार्ग नाहीं कोंडला वात ॥ सृष्टि गेली म्हण्त ॥ महावीर ते काळीं ॥१८१॥इकडे महाराज द्रोण ॥ आपुल्यांसी म्हणे सावधान ॥ होय कीं नव्हे अर्जुन ॥ नयन उघडून ओळखा ॥१८२॥मायारूप धरी आदिपुरुष ॥ तैसा अर्जुनें धरिला स्त्रीवेष ॥ संपलिया अज्ञातवास ॥ महावीर प्रकटला ॥१८३॥आमुचें सैन्य तेजहीन ॥ क्षणक्षणां होती अपशकुन ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ॥ करकरती वायस ॥१८४॥शिवा सेनेसमोर ॥ रोदन करिती वारंवार ॥ बृक व्याघ्र भूतें समग्र ॥ सेनेभोंवतीं हिंडती ॥१८५॥दुर्योधन म्हणे ते वेळे ॥ सकल भय एकवटलें ॥ तें गुरूचे ठाय़ीं स्थिरावलें ॥ एकदांचि य़ेऊनी ॥१८६॥अर्जुनाचें करितां स्तवन ॥ पुरे न म्हणे द्रोणाचें मन ॥ यासी भय वाटतें दारुण ॥ ग्रामपंथें जाऊं द्या ॥१८७॥द्रोणाचार्याचें वचन ॥ कोणी धरूं नका प्रमाण ॥ सहज होती अपशकुन ॥ यांचें भय कोण मानी ॥१८८॥द्रोण केवळ ब्राह्मण ॥ येणें करावें वेदाध्ययन ॥ सांगोनि असावें शास्त्रपुराण ॥ युद्धकंदन यासी काय ॥१८९॥याग आणि योग ॥ याणें आचरावा सांग ॥ नानाशास्त्रींचे प्रसंग ॥ निवडूनियां कथावे ॥१९०॥कृपाचार्य समीप येऊनी ॥ दुर्योधनासी म्हणे ते क्षणीं ॥ आचार्य बोलिला जे वाणी ॥ अस्त्य नव्हे सर्वथा ॥१९१॥सृष्टीवरी र्पतिशक्र ॥ तो हा कुंतीचा तृतीयपुत्र ॥ एकला परी सर्वत्र ॥ सेना जर्जर करील हा ॥१९२॥एकलाचि सूर्यनारायण ॥ स्वतेजें उर्वीस घाली पालाण ॥ कीं घटोद्भव एकला जाऊन ॥ केलें आचमन सागराचें ॥१९३॥बलिद्वारीं एकला वामन ॥ ढेंगेंत आटिलें त्रिभुवन ॥ कीं सेनेविरहित भृगुनंदन ॥ निर्वैर करी पृथ्वी हे ॥१९४॥आजपर्यंत अर्जुन अग्न ॥ झांकला होता अज्ञात भस्में करून ॥ प्रकट जाहला आजि पूर्ण ॥ वीरकानन जाळील हें ॥१९५॥ऐसें बोलतां गुरुनंदन ॥ तें न साहेचि कदा कर्ण ॥ वर्णितां साधूचे गुण ॥ दुर्जन जैसे चरफडती ॥१९६॥म्हणे गुरुसुता ब्राह्मणा ॥ तुझी छेदूनि टाकावी रसना ॥ किती वर्णिसी अर्जुना ॥ बंदीजना सारिखा ॥१९७॥कर्ण खङ्ग घेऊनि ते वेळां ॥ गुरु सुतावरी धांवाला ॥ म्हणे ब्राह्मणा अधमा तुजला ॥ मारीन आतां येथेंचि ॥१९८॥आतांचि अर्जुन जिंकून ॥ तुझें टाकीन शिर छेदून ॥ तंव तो महावीर गुरुनंदन ॥ खङ्ग घेऊन धांवला ॥१९९॥म्हणे रे कर्णा सूतपुत्रा ॥ तुझें शिर छेदीन अपवित्रा ॥ गुरुनिंदका कुपुत्रा ॥ कुटिला खळा मलिना ॥२००॥पार्थसिंहाची निंदा देखा ॥ करितोसी मागें जंबुका ॥ अलिका म्हणे विनायका ॥ धरोनि आणीन क्षणार्धें ॥२०१॥तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानलासी धरूं म्हणत ॥ ह्रदयीं भावी स्वद्योत ॥ पाडीन आदित्य खालता ॥२०२॥ललभ बहुत मिळोनी ॥ विजेसी घालूं पाहती वदनीं ॥ लवणाचा गज धांवोनी ॥ सागर शोषूं भावीत ॥२०३॥यशोधैर्यादि सद्नुण ॥ सभाग्याचे कर्णीं ऐकोन ॥ परम खेद मानिती दुर्जन ॥ नसतें दूषण लाविती ॥२०४॥परम कुमती जो बलहीन ॥ मागें निंदा करी रात्रंदिन ॥ समर भूमीहूनि पळे उठोन ॥ हें लक्षण ग्रामासिंहाचें ॥२०५॥मशक क्रोधें संतप्त ॥ गिळूं पाहे सगळा पर्वत ॥ परी तो केवीं मावेल वदनांत ॥ मिथ्या जल्प तेवीं तुझा ॥२०६॥अश्वत्थामा घेऊनि खडग ॥ कर्णावरी उठला सवेग ॥ तों रथाखालता उतरूनि सवेग ॥ दुर्योंधन धांवला ॥२०७॥म्हणे गुरु सुता क्षमा करीं ॥ पार्थ उभा ठाकला वैरी ॥ समय ओळखोनि चतुरीं ॥ आपुले शब्द वेंचावे ॥२०८॥ऐसें बोलोनि गुरु नंदन ॥ रथीं बैसविला नेऊन ॥ तैसाचि प्रार्थूनियां कर्ण ॥ स्यंदनावरी चढविला ॥२०९॥द्रोण म्हणे रे कर्णा ॥ आजि पुरुषार्थ दावीं नयनां ॥ जिंकिल्याविण अर्जुना ॥ जाऊं नको माघारा ॥२१०॥आम्ही शूर आणि ब्राह्मण ॥ मुखीं चहूं वेदांचें अध्ययन ॥ पाठीसी सदा धनुष्यबाण ॥ वरें शरें समर्थ पैं ॥२११॥शास्त्र आणि शस्त्र ॥ दोन्ही रक्षितों आम्ही विप्र ॥ निःक्षत्रिय केली धरा समग्र ॥ एका ब्राह्यणें जाण पां ॥२१२॥शापादपि शरादपि ॥ ब्राह्मण तपस्वी तेजोरूपी ॥ जमदग्नि गौतम वसिष्ठ तपी ॥ शस्त्रें शस्त्रें समर्थ पैं ॥२१३॥बृहस्पति आणि शुक्र ॥ शापें शरें परम तीव्र ॥ गुरुनिदेचें फल समग्र ॥ भोगाल तुम्ही आतांचि ॥२१४॥कर्ण आणि द्रोण यांत ॥ कलह व्हावा जों बहुत ॥ तों द्रोणासी प्रार्थोनि गंगासुत ॥ बैसवी स्वस्थ स्वस्थळीं ॥२१५॥भीष्म म्हणे गुरु द्रोणा ॥ तुझा महिमा न वर्णवे कोणा ॥ आम्ही शिष्य तुझे सुजाणा ॥ तव वचनें प्राण देऊं ॥२१६॥चालतां सूर्य़ाचा रथ ॥ तूं खोळंबविशील क्षणांत ॥ प्रतिसृष्टि करिशील यथार्थ ॥ ब्रह्मदेवा दटावूनी ॥२१७॥असो यावरी शंतनुसुत ॥ पांडवांचे दिवस गणीत ॥ अधिकमास वेगळे करीत ॥ तेरा वर्षें परिपूर्ण ॥२१८॥तेरा वर्षें चांद्र मास ॥ आधिक जाहले बारा दिवस ॥ सत्यप्रतिज्ञ पांडव विशेष ॥ अधर्मपंथें न जाती ॥२१९॥ऐकें सुयोधना वचन ॥ अर्धराज्य दे त्यांलागून ॥ न मानिसी तरी युद्ध करून ॥ सर्वही हिरोन घेतील ॥२२०॥यावरी सुयोधन म्हणे ऐका ॥ सुईचे अग्रीं लागली मृत्तिका ॥ इतुकेंही नेदीं त्यांसी देखा ॥ युद्धाविण वीर मी ॥२२१॥भीष्म म्हणे खेळूनि द्यूत ॥ कपटें राज्य घेतलें समस्त ॥ तें न चले आतां अनर्थ ॥ पुढें युद्ध आरंभिल्या ॥२२२॥आतां असो हे मात ॥ सौन्य चार भाग करा त्वरित ॥ एका भागें गायी समस्त ॥ हस्तिनापुरा पाठवाव्या ॥२२३॥एक भाग सैन्य घेऊन ॥ दुर्योधना जाईं तूं येथून ॥ गायी अवघ्या सांभाळून ॥ नगरपंथें जाईं कां ॥२२४॥उरली जे अर्धपृतना ॥ तिणें आम्ही आटोपूं अर्जुना ॥ तें मानलें सुयोधना ॥ घेऊनि सेना निघाला ॥२२५॥गायींसमवेत सुयोधन ॥ चालिला तेव्हां न लागतां क्षण ॥ मग भीष्म द्रोण आणि कर्ण इंहीं चक्रव्यूह रचियेला ॥२२६॥नगरपंथें जाय सुयोधन ॥ तें धनंजयें लक्षिलें दुरून ॥ आतां उठेल पार्यपंचानन ॥ दुर्योधनगजावरी ॥२२७॥ते कथा अति रसाळ ॥ ऐकोत पंडित कुशळ ॥ विराटपर्व सुरस निर्मळ ॥ सुमंगल परिसतां ॥२२८॥श्रीमद्भीमातट विहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥ श्रीधरवरदा अत्युदारा ॥ बोलें पुढारां कथारस ॥२२९॥पांडवप्रताप अन्नसत्र ॥ निर्दोषान्न परम पवित्र ॥ श्रोते जेवोत क्षुधातुर ॥ कर्णद्वारेंकरोनी ॥२३०॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चौतिसाव्यांत कथियेला ॥२३१॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रातापे विराटपर्वणि दक्षिणोत्तरगोग्रहणं नाम चतुस्त्रिंशाध्यायः ॥३४॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप विराटपर्व चतुस्त्रिंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP