मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३१ वा

पांडवप्रताप - अध्याय ३१ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः॥ जनमेजय बोले सुखसंपन्ना ॥ वैशंपायना परम सज्ञाना ॥ भारतकथारस श्रवणा ॥ सुरस लागे तुझे मुखें ॥१॥
करुनि तीर्थयात्रा समग्र ॥ द्वैतवना आले पंडुकुमार ॥ यावरी खल धार्तराष्ट्र ॥ काय करिते जाहले ॥२॥
मग बोले वैशंपायन ॥ एकत्र होऊनि दुर्जन ॥ दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ विचा करिती एकांतीं ॥३॥
आलीं द्वादश वर्षे भरत ॥ तेराव्यांत पांडव होती गुप्त ॥ पुढें युद्ध होईल प्राप्त ॥ अति अनर्थ दिसतो पैं ॥४॥
स्वर्गीहूनि विद्या अद्भुत ॥ शिकोनि आला अभिमन्युतात ॥ समरांगणी कृतान्त ॥ युद्ध करुं न शकेचि ॥५॥
प्रसन्न करुनि व्योमकेश ॥ अस्त्रविद्या शिकला निःशेष ॥ तैसीज वासवें निर्दोष ॥ विद्या तयासी समर्पिली ॥६॥
लोकपाल प्रसन्न सर्व ॥ विद्या दिधली अपूर्व ॥ निःशेष पुशिला ठाव ॥ निवातकवच दैत्यांचा ॥७॥
शकुनि म्हणे वनांत ॥ ते जों निजसुरे आहेत ॥ रात्रीं जाऊनि अकस्मात ॥ करावा घात पांचांचा ॥८॥
दंदशूक जों निद्रित जाण ॥ मुख ठेंचावें घालूनि पाषाण ॥ विषवल्ली जों आहे लहान ॥ तों उपटून टाकावी ॥९॥
गोधनें पाहावया नयनीं ॥ घोषयात्रेचें मिष करुनी ॥ गोष्टी न फुटतां द्वैतवनीं ॥ रजनीमाजी वधावी ॥१०॥
आणि आपुली वैभवसंपत्ती ॥ चतुरंग दळ न माये जगतीं ॥ हें दाखवावें पांडवांप्रती ॥ पाहोनि होती अधोवदन ॥११॥
दरिद्री वनांत पांडव ॥ वैभव त्यांसी दावूं सर्व ॥ आमुची श्री देखोनि गर्व ॥ हरेल त्यांचा निश्चयें ॥१२॥
उदय पावतां वासरमणी ॥ उडुगणें लपती गगनीं ॥ दृष्टीं देखतां महामणी ॥ मग गारांसी कोण पुसे ॥१३॥
मृगेंद्र आला ऐकोन ॥ वारण सोडिती तत्काल प्राण ॥ तैसे पांडव आम्हां देखोन ॥ निस्तेज होती तत्त्वतां ॥१४॥
फावलें तरी टाकावे वधून ॥ नाहीं तरी वैभवबळ दाखवून ॥ यावें सवेंचि परतोन ॥ राष्ट्र आपुलें विलोकीत ॥१५॥
ऐसें बोलतां शकुनी ॥ दुर्योधन आनंदला मनीं ॥ श्वान जैसें वांति देखोनी ॥ परम आवेशें धांवत ॥१६॥
शिंदीवन देखतां बहुत ॥ मद्यपी जैसा आनंदत ॥ कीं जारासी अवचित प्राप्त ॥ मल्याळदेश जाहला ॥१७॥
मनांत ऐसी उपजे हौस ॥ कीं शंख करावा बहुवस ॥ तों आला फाल्गुनमास ॥ गगनीं हर्ष न समाये ॥१८॥
तैसें शकुनीचें वचन ॥ ऐकोनि तोषे दुर्योधन ॥ मग अंधाप्रति येऊन ॥ पुसता जाहला तेधवां ॥१९॥
म्हणे घोषयात्रा करुन  ॥ आपुलें राष्ट्र पाहोन ॥ मृगया करीत द्वैतवन ॥ येऊं पाहोन तैसेचि ॥२०॥
वृद्ध म्हणे पांच पांडव ॥ द्वैतकाननींचे कंठीरव ॥ तुम्ही इभ तेथें सर्व ॥ आपुलें वैभव दावूं जातां ॥२१॥
जागे न करावे निद्रित व्याघ्र ॥ चेतवूं नये महाविखार ॥ तरी तुम्ही जाऊनि सत्वर ॥ घोषयात्रा करुनि येइजे ॥२२॥
देवव्रत भारद्वाज शारद्वत ॥ विदुर आणि शारद्वतीसुत ॥ यांसी कळों नेदितां मात ॥ सेनेसहित निघाले ॥२३॥
विदुरासी समजलें ते क्षणीं ॥ दुर्जन चालिले सेना घेऊनी ॥ परी तो गजबजला नाहीं मनीं ॥ म्हणे यांचेनें काय होतें ॥२४॥
रुक्मिणीनयनाज्बविकासमित्र ॥ पाठीसी असतां पांडवमित्र ॥ काय करिती दुर्जन अमित्र ॥ दुःखासी पात्र होती ॥२५॥
जो निजजनहृदयारविंदमिलिंद ॥ जगदंकुरमूलकंद ॥ तो पाठीसी असतां ब्रह्मानंद ॥ पांडवांअधीन सर्वदा ॥२६॥
असो इकडे कौरवभार ॥ घोषप्रदेशीं होऊनि स्थिर ॥ घारोष्ण पय पवित्र ॥ प्राशन करिती यथेच्छ ॥२७॥
एक तृप्त होती दधि सेवून ॥ एक करिती मद्यपान ॥ एकमेकांसी आग्रह करुन ॥ पाजून मत्त जाहले ॥२८॥
तुच्छ म्हणती सुधारस ॥ त्याहूनि मद्यपान विशेष ॥ नाना फळें भाजूनि सुरस ॥ बहु विलास दाविती ॥२९॥
यावरी ते दुष्ट सकळी ॥ आले द्वैतारण्याजवळी ॥ ज्या वनीं केळी नारळी ॥ कर्पूरकदली डोलती ॥३०॥
कृष्णागर मलयागर चंदन ॥ सुवासें भरलेंसे गगन ॥ जैसे सज्जनांचे गुण ॥ न सांगतां प्रकटती ॥३१॥
खर्जुर कदंब रातांजन ॥ अंजीर औदुंबर सीताफळ जाण ॥ आम्रवृक्ष भेदिती गगन ॥ सूर्यकिरण माजी न पडे ॥३२॥
जेथें वसे सदा धर्म ॥ धर्म तेथें सुख परम ॥ सुख तेथें आराम ॥ सहज होय सकलांतें ॥३३॥
आराम तेथें वसती संत ॥ संत तेथें आनंद बहुत ॥ आनंद तेथें भगवंत ॥ सदा रक्षीत उभा असे ॥३४॥
घाला घालूं चालले रजनींत ॥ हें जाणोनि निर्जरनाथ ॥ गंधर्वपतीस प्रेरीत ॥ कुंतीसुत रक्षावया ॥३५॥
मदें धांवत कौरवभार ॥ तों वाटे रमणीक सरोवर ॥ गंधर्वराज सहपरिवार ॥ चित्रसेन क्रीडे तेथें ॥३६॥
दूत धांवती उन्मत्त ॥ गंधर्वांसी तंव बोलत ॥ कोण तस्कर तुम्ही येथ ॥ सोडा पंथ सत्वर ॥३७॥
दुर्योधन गजबज ऐकोन ॥ दूतांसी देई पुढें पाठवून ॥ म्हणे मार्गावरी आहेत कोण ॥ त्यांसी ताडन करुनि काढा ॥३८॥
दूत धांविन्नले उन्मत्त ॥ गंधर्वांसी तवकें बोलत ॥ कोण रे तस्कर तुम्ही जेथ ॥ सोडा पंथ रायातें ॥३९॥
गंधर्व पुसती राव कोण ॥ ते म्हणती पृथ्वीपति दुर्योधन ॥ लवकर उठावें इथून ॥ घेऊनि प्राण पळा वेगें ॥४०॥
गंधर्वीं ऐसें ऐकोन ॥ दूतांसी केलें बहु ताडन ॥ जैसीं बिडालकें धरुन ॥ महाकुंजरें मर्दिली ॥४१॥
दूत म्हणोनि सोडिले जीवंत ॥ माघारे आले धांवत ॥ अहीचे कवेंतूनि अकस्मात ॥ मूषक जैसे पळाले ॥४२॥
दोहीं हस्तीं शंख करीत ॥ सुयोधना सांगती वृत्तान्त ॥ पर्वततुल्य अद्भुत ॥ गंधर्व पुढे बैसले ॥४३॥
आम्हीं प्रताप वर्णितां तुझा ॥ त्यांहीं केली आमुची पूजा ॥ ऐसें ऐकतां अंधतनुजा ॥ क्रोध अद्भुत नाटोपे ॥४४॥
निजभारेंशीं ते अवसरीं ॥ दुर्योधन धांवे गंधर्वांवरी ॥ जैसे वृषभ सिंहाचे दरी ॥ माजी जाऊनि चवतालले ॥४५॥
गंधर्वांसहित चित्रसेन ॥ सरसावला युद्धालागून ॥ बाणवृष्टि करुन ॥ कौरवसैन्य खिळियेलें ॥४६॥
चित्रसेनपंचाननापुढें ॥ कर्ण सुयोधन जंबुक बापुडे ॥ मोहनास्त्र घालूनि वेडे ॥ केले सर्व एकदांचि ॥४७॥
रथ तुरंग चाप तूणीर ॥ क्षणांत कर्णाचे केले चूर ॥ सुयोधनाचा ॥ स्यंदन सत्वर ॥ तिलप्राय केला हो ॥४८॥
एकएका कौरवाप्रती ॥ दश दश गंधर्व धरिती ॥ सुयोधना धरुनि बहुतीं ॥ हस्त माघारे बांधिले ॥४९॥
कर्ण पळे सत्वर ॥ घेतलें घोर कांतार ॥ मागें पुढें पाहे भयातुर ॥ चरणीं धांवों लागला ॥५०॥
यजमान परम संकटीं पडे ॥ देखोनि आश्रित पळती चहूंकडे ॥ तैसे दुर्योधनाचे वीर गाढे ॥ पळूनि गेले अष्टदिशां ॥५१॥
कित्येकीं शस्त्रें सांडून ॥ आडमार्गे घेतलें रान ॥ नाना सोंगें घेऊन ॥ पळते जाहले तेधवां ॥५२॥
द्वैतारण्यांत धांवोन ॥ गेले कित्येक सेवक प्रधान ॥ धर्मराजासी वर्तमान ॥ सांगती रडोन ते वेळां ॥५३॥
म्हणती भीमार्जुना शस्त्रें घ्यावीं ॥ तुमचे बंधू नेले गंधर्वीं ॥ ऐकोनि हास्य केलें सर्वीं ॥ द्रौपदीधौम्यांसमवेत ॥५४॥
वृकोदर बोले स्पष्ट ॥ जेथें वसेकौटिल्य कपट ॥ तेथें ईश्वर करील तळपट ॥ अन्यायवाट देखतां ॥५५॥
आमुचा करावय वध ॥ येत होते होऊनि सिद्ध ॥ सिंधुजाहृदयारविंदामिलिंद ॥ तेणें विपरींत केलें हें ॥५६॥
वैशंपायन गर्जोनि बोलत ॥ कृष्ण भक्तांचे जे विरुद्ध करीत ॥ त्यांसी गति हेचि प्राप्त ॥ होय निश्चयें जाणिजे ॥५७॥
साधुसंत गोब्राह्मण ॥ यांचा घात चिंतितां दुर्जन ॥ विघ्नसमुदाय दारुण ॥ तयांवरी रिचवती ॥५८॥
श्रोतयांसी म्हणे श्रीधर ॥ सर्वांसी विनवितों जोडूनि कर ॥ भगवद्भक्तांशीं अणुमात्र ॥ द्वेष सहसा करुं नका ॥५९॥
अजातशत्रु युधिष्ठिर ॥ सकळ जीवांचें माहेर ॥ शत्रूंचाही हितकर ॥ जो उदार सर्वस्वें ॥६०॥
शांतिवैरागरींचा हिरा प्रत्यक्ष ॥ वैराग्यवनींचा कल्पवृक्ष ॥ सर्वदा कमलपत्राक्ष ॥ अंतर्बाह्म रक्षी तया ॥६१॥
जो विवेकरत्नांचा किरीट ॥ ज्ञानमंदाकिनीचा लोट ॥ जो स्वप्नींही नेणे कपट ॥ तो धर्मराज धर्मात्मा ॥६२॥
क्षमावनींचे निधान ॥ कीं सदयतेंचें उद्यान ॥ लक्षूनियां भीमार्जुन ॥ आज्ञा जाण करीतसे ॥६३॥
आम्ही पांच ते एकशत ॥ मिळोनि बंधू समस्त॥ त्यांसी गंधर्व धरुनि नेत ॥ पहावें विपरीत कैसें हें ॥६४॥
त्यांसी आम्हां राज्यसंबंध ॥ म्हणोनि पडलें विरुद्ध ॥ आणिकें करितां त्यांसी बंध ॥ आम्ही अवश्य धांवावें ॥६५॥
तरी तुम्ही लवकर धांवा ॥ शत्रु उपकार करोनि रक्षावा ॥ यशध्वज उभारावा ॥ कौरवांसी सोडवूनि ॥६६॥
मग बोले फाल्गुन ॥ आम्हांसी तों आज्ञा प्रमाण ॥ सिद्ध करोनि चार्‍ही स्यंदन ॥ चौघे जण निघाले ॥६७॥
भीमार्जुन नकुल सहदेव ॥ समीरापरी घेती धांव ॥ तों गंधर्वी कौरव ॥ बांधोनि नेले अंतरिक्षीं ॥६८॥
वृषभ बांधिले दावणीं ॥ कीं ते तस्कर धरिले वनीं ॥ तैसा दीनमुख दुर्योधन नयनीं ॥ मागें पुढें विलोकी ॥६९॥
कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैसी भीमें फोडिली हांक ॥ तो नाद ऐकतां देख ॥ गंधर्वचक्र कंपित जाहलें ॥७०॥
म्हणती काय आले काळ ॥ कीं उतरले लोकपाळ ॥ तों अमर्याद शरजाळ ॥ भीमार्जुन सोडिती ॥७१॥
पांडव आले देखोन ॥ खालतें पाहती अंधनंदन ॥ परम निर्दय दुर्जन ॥ म्लानवदन जाहले ॥७२॥
गंधर्व बोलती परतोन ॥ कां करितां युद्धकंदन ॥ पार्थ म्हणे बंधू धरुन ॥ काय कारण न्यावया ॥७३॥
तुम्ही गंधर्व तस्कर ॥ शरजाळें करुं पसरुन ॥ काननामाजी विचरती ॥७५॥
शर वर्ष चित्रसेन ॥ परी ते न गणिती पंडुनंदन ॥ जैसे अबलांचे बोल रसहीन ॥ विद्वज्जन न मानिती ॥७६॥
गारा पडती एकसरें ॥ तैसीं पडती गंधर्वशिरें ॥ मग पृथेचे तृतीयपुत्रें ॥ संहारास्त्र सोडिलें ॥७७॥
मग चित्रसेन पुढें होऊन ॥ म्हणे पार्था तूं माझा मित्र प्राण ॥ तरी हें अस्त्र आवरुन ॥ घेईं मागुती तुझें तूं ॥७८॥
ऐसें वचन ऐकूनि मागुतें ॥ अस्त्र आवरिलें वीर पार्थे ॥ मग भेटले चित्रसेनातें ॥ चौघे बंधू तेधवां ॥७९॥
चित्रसेन म्हणे अंधकुमार ॥ महाकपटी दुराचार ॥ यांचा कां घेसी कैवार ॥ शिक्षा साचार योग्य यांसी ॥८०॥
त्रिदशेश्वरें आज्ञा करुन ॥ आणविलें यांसी धरुन ॥ हे तुम्हांसी वधावयालागून ॥ येत होते रजनींत ॥८१॥
हे घातकी तस्कर दुर्जन ॥ यांची खंडावीं नासिकें कर चरण ॥ अथवा शिरें छेदून ॥ आतांचि टाकीन तवाज्ञें ॥८२॥
पार्थ म्हणे धर्माज्ञा ॥ अलोट आम्हांसी सर्वज्ञा ॥ मग पांडव आणि गंधर्वसेना ॥ धर्मापाशीं पातलीं ॥८३॥
कौरव बांधिले आकर्षून ॥ उभे केले पुढें नेऊन ॥ श्रीकृष्णभगिनी येऊन ॥ पाहती जाहली कौतुकें ॥८४॥
हांसोनि पांचाली बोले ॥ बरेच गंधर्वीं कौरव पूजिले ॥ दुर्योधन दुःशासन ते वेळे ॥ अधोवदन पाहती ॥८५॥
धर्म म्हणे सोडा सत्वर ॥ बंधू कष्टी जाहले समग्र ॥ तें कौतुक ऋषीश्वर ॥ भोंवताले विलोकिती ॥८६॥
गंधर्वीं दिधले सोडून ॥ धर्मरायाची आज्ञा घेऊन ॥ स्वर्गीं गेला चित्रसेन ॥ निजविमानीं बैसोनियां ॥८७॥
पांडवकरें गंधर्व ॥ पडले होते ते सर्व ॥ उठविता जाहला वासव ॥ सुधावृष्टि करोनियां ॥८८॥
इकडे दुर्योधनासी म्हणे धर्म ॥ हें कां तुज आठवलें कर्म ॥ तस्करविद्येनें श्रम ॥ पावलासी फार तूं ॥८९॥
तूं जन्मोनि कुरुवंशीं ॥ निंद्य कर्म आचारलासी ॥ नकुलसहदेवां द्रौपदीसी ॥ हास्य नावरे तेधवां ॥९०॥
पार्थ म्हणे समरीं येऊन ॥ युद्ध करावें होतें निर्वाण ॥ नीच कर्म आचरोन ॥ डाग लाविला कुलासी ॥९१॥
भीम दुःशासनासी म्हणत ॥ जय पावलां तुम्ही समस्त ॥ आतां वाद्यें वाजवीत ॥ गजपुरांत मिरवावें ॥९२॥
दुर्योधन म्हणे धर्मराया ॥ आज्ञा देई गुणालया ॥ युधिष्ठिर आलिंगूनियां ॥ समाधान करी तेधवां ॥९३॥
बंधूंसह दुर्योंधन ॥ चालिला धर्मासी पुसोन ॥ अपमानें अधोवदन ॥ चरणचालीं जातसें ॥९५॥
मनांत भावी दुरोधन ॥ शत्रूंनी सोडविलें धांवोन ॥ आतां काय व्यर्थ वांचून ॥ द्यावा प्राण विष घेऊनि ॥९६॥
जरी गंधर्व नेते बांधोन ॥ आमुचीं शिरें टाकिते छेदून ॥ तरी बरें होतें जाण ॥ त्याहूनि अपमान हा वाटे ॥९७॥
मी तप करीन दारुण ॥ पांडवांचा घ्यावया प्राण ॥ अथवा देशांतर सेवीन ॥ काय वदन दावूं लोकां ॥९८॥
दुर्जनासी करितां उपकार ॥ तो तत्काल मानी अपकार ॥ पयःपानें विखार ॥ आपुला गुण टाकीना ॥९९॥
षोडशोपचारें पूजिला कृशान ॥ तरी पोळाया न करी अनमान ॥ दुर्जनाचें हित करितां पूर्ण ॥ पडे परतोन दुरात्मा ॥१००॥
असो मागीं मिळाला परिवार ॥ भेटे येऊनि सूर्यपुत्र ॥ समाधान करिती सर्वत्र ॥ दुर्योधनाचें तेधवां ॥१०१॥
लाभ मृत्यु आणि भय ॥ काळेंकरुनि होय जाय ॥ त्याचा खेद मानूनि काय ॥ धैर्य पुढती धरावें ॥१०२॥
काया आहे जंव जीवंत ॥ तंव न सोडावा पुरुषार्थ ॥ उद्यां जिकूं पंडुसुत ॥ एकछत्री राज्य करुं ॥१०३॥
मग बोले दुर्योधन ॥ विदुर भीष्म द्रौणी द्रोण ॥ यांसी काय दावूं वदन ॥ सेवीन कानन यावरी ॥१०४॥
परम कांतार घोरांदर ॥ लक्षोनि एक सरोवर ॥ ते दिवशीं राहिले धार्तराष्ट्र ॥ भोजन शयन नाठवे ॥१०५॥
दुर्योधन चिंताग्रस्त ॥ भूमीवरी शयन करीत ॥ दुःखनिद्रा अति लोटत ॥ तंव अद्भुत वर्तलें ॥१०६॥
पाताळीं जे दैत्य समस्त । दुर्योधनाचा जाणोनि वृत्तान्त ॥ कृत्या एक अकस्मात ॥ त्यांणीं तेथें पाठविली ॥१०७॥
तिणें येऊनि ते वेळां ॥ दुर्योधन नेला पाताळ ॥ भेटला दैत्यां सकळां ॥ सांगे वर्तला वृत्तान्त ॥१०८॥
दुर्योधनाचें समाधान ॥ करिती सर्व दैत्य मिळोन ॥ अंधपुत्र करी रोदन ॥ म्हणे मी न जाईं गजपुरा ॥१०९॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ यांचें पांडवांकडे चित्त ॥ आम्हां गंधर्वीं नेलें हे मात ॥ तयांलागीं समजेल ॥११०॥
पांडवीं सोडविलें पाहें ॥ हें दुःख त्रिभुवनीं न माये ॥ पृथ्वीचे सर्व नृपवर्य ॥ हांसतील मज देखतां ॥१११॥
दैत्य म्हणती ऐकें वचन ॥ शारद्वत भीष्म द्रोण ॥ यांचे अंगीं संचरोन ॥ पांडवसेना संहारुं ॥११२॥
ऐसें करुनि समाधान ॥ पूर्वस्थला घालविला नेऊन ॥ दुर्योधन जागा होऊन ॥ सांगे स्वप्न कर्णातें ॥११३॥
मग कर्ण म्हणे युद्धांत ॥ तुज जय होईल अत्यंत ॥ मग वाहनीं बैसोनि समस्त ॥ गजपुराप्रति पावले ॥११४॥
सकल वाद्यें राहवून ॥ ग्रामांत प्रवेशे अधोवदन ॥ भीष्म विदुर आणि द्रोण ॥ वर्तमान कळलें त्यांस हें ॥११५॥
पांडवां रक्षक वैकुंठनाथ ॥ त्यांसी कोण करील विपरीत ॥ ब्रह्मानंदें पंडुसुत ॥ द्वैतारण्यीं विचरती ॥११६॥
इकडे कर्णे दिग्विजय करुन ॥ द्रव्य आणिलें मेळवून ॥ सकल राजे बोलावून ॥ महायज्ञ आरंभिला ॥११७॥
मनीं योजिली कुटिल युक्ती ॥ बोलावूं पाठविलें पांडवांप्रती ॥ द्यूत खेळूनि मागुती ॥ वनवासा पाठवावें ॥११८॥
कीं त्रयोदश वर्ष भरल्याविण ॥ केवीं ग्रामांत बैसलां येऊन ॥ ह्या गोष्टीचें दूषण लावून ॥ पुन्हां वनवासा योजावा ॥११९॥
पांडवाप्रति गेले दूत ॥ म्हणती यागासी चला समस्त ॥ धर्मराज हांसोनि बोलत ॥ आम्ही तेथें न येऊं कदा ॥१२०॥
त्रयोदश वर्षे होतां पूर्ण ॥ येऊं बोलाविल्याविण ॥ असो समाप्त जाहला यज्ञ ॥ दुर्जनांचा गजपुरीं ॥१२१॥
इकडे द्वैतारण्यांत ॥ मृगयेसी गेले पंडुसुत ॥ दौपदी एकली आश्रमांत ॥ तों कौतुक एक वर्तलें ॥१२२॥
सेनेसह जयद्रथ ॥ शाल्वदेशीं लग्ना जात ॥ वाटे चालतां अकस्मात ॥ पांचाळी दृष्टीं देखिली ॥१२३॥
जी स्वरुपाची पूर्णसीमा ॥ जी अपर्णेची अपरप्रतिमा ॥ वृत्रारि शर्व अंबुजजन्मा ॥ ऐसी निर्मूं न शकती ॥१२४॥
कमलमृगमीनखंजन ॥ कुरवंडी करावी नेत्रांवरुन ॥ अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण ॥ चरणांगुष्ठीं न तुळेचि ॥१२५॥
आकर्ण नेत्र निर्मल मुखाब्ज ॥ देखोनि लज्जित द्विजराज ॥ मृगेंद्र देखोनि जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्यां ॥१२६॥
परम सुकुमार घनश्यामवर्णी ॥ ओतिली इंद्रनीळ गाळुनी ॥ दंततेजें जिंकिल्या हिरेखाणी ॥ बोलतां मेदिनी प्रकाश पडे ॥१२७॥
सर्वलक्षणसंयुक्त ॥ म्हणोनि पृथ्वीचा नृपनाथ ॥ मुखें कीर्तिनगारा वाजवीत ॥ सौंदर्यशालिनी म्हणोनि ॥१२८॥
जिचे अंगींचा सुवास ॥ जाय अर्धयोजन विशेष ॥ जयद्रथ देखोनि तीस ॥ मदनज्वरें व्यापला ॥१२९॥
म्हणे ऐसी नवरी टाकून ॥ कासया करुं जावें लग्न ॥ हातीं आलिया दिव्य रत्न ॥ काय कारण गारेचें ॥१३०॥
हे सकल प्रमदांची ईश्वरी ॥ इची प्रतिमा नसे उर्वीवरी ॥ ऐसी सोडूनियां नवरी ॥ शाल्वदेशा कां जावें ॥१३१॥
तक्र मनीं जों इच्छीत ॥ तों हातासी आलें अमृत ॥ तेवीं आम्हां जाहलें येथ ॥ पूर्वदत्तेंकरुनी ॥१३२॥
पांडव एकले वनांत ॥ त्यांसी वधीन एके क्षणांत ॥ मग कोटिकनामें दूत ॥ पांचालीजवळी धाडिला ॥१३३॥
पांचालकन्या सुरेख ॥ पांच सिंहांची ललना देख ॥ त्या सतीस जयद्रथ जंबुक ॥ सिद्ध जाहला न्यावया ॥१३४॥
कोटिक तेथें येऊन ॥ पांचालीस पुसे तूं कोण ॥ तुझें रुप देखोन ॥ देवही प्राण ओंवाळिती ॥१३५॥
वदनचंद्र निष्कलंक ॥ नरनरेंद्र चकोर होती देख ॥ पाहतां तव मुख सुरेख ॥ दंग पार्थिव जाहला ॥१३६॥
विद्युल्लता झळके ज्यापरी ॥ उभी द्वारीं पांडवनारी ॥ अंचल रुळे उर्वीवरी ॥ प्रकाश दूरी झळकतसे ॥१३७॥
द्रौपदी म्हणे मार्गस्थ दूता ॥ मी पंडुस्त्रुषा पांडववनिता ॥ पांचालरायाची दुहिता ॥ भगिनी मन्मथजनकाची ॥१३८॥
कोण आला आहे राव ॥ सांग वनांत गेले पांडव ॥ ते आतांचि येतील सर्व ॥ आतिथ्य तुमचें करितील ॥१३९॥
कोटिकानें येऊन ॥ सांगितलें वर्तमान ॥ मग जयद्रथ खालीं उतरोन ॥ आश्रमद्वारीं पातला ॥१४०॥
म्हणे हे लावण्यरत्नराशी ॥ चातुर्यसरोवरराजहंसी ॥ जरी तूं मज माळ घालिसी ॥ तरी पावसी सर्व सुखें ॥१४१॥
तुज योग्य भ्रतार ॥ कदा नव्हेत पंडुकुमार ॥ वनवास हा परम घोर ॥ येथें फार श्रमलीस तूं ॥१४२॥
मी सिंधुरायाचा सुत ॥ माझें नाम जयद्रथ ॥ तुजकारणें आणिला रथ ॥ आरुढें सत्वर यावरी ॥१४३॥
ऐसें ऐकतां ते गोरटी ॥ भ्रूमंडला घालीत आंठी ॥ म्हणे प्रलयचपला घालूनि पोतीं ॥ शलभ कैसा वांचेल ॥१४४॥
मशक भावी मानसीं ॥ कीं पर्वत दाबीन दाढेशीं ॥ वृश्चिक खदिरांगारासी ॥ ताडूनि कैसा वांचेल ॥१४५॥
पांच पांडव प्रलयाग्न ॥ त्यांची ज्वाला मी अति दारुण ॥ तूं पतंग तीत्तें कवळून ॥ सांग कैसा वांचसी ॥१४६॥
व्याघ्र निजला वनांत ॥ त्याची जिव्हा पुढें लोंबत ॥ ते जंबुक तोडूनि स्वस्थ ॥ केवीं पावेल गृहातें ॥१४७॥
महाभुजंगाचें दर्शन देख ॥ पाहूनि केवीं वांचेल मंडूक ॥ तृणालिका विनायक ॥ धरोनि कैसा नेईल ॥१४८॥
इभ मदें गर्जना करी ॥ जंव दृष्टीं न देखे केसरी ॥ प्राण घेऊनि पळें लवकरी ॥ पांडव आतांचि येतील ॥१४९॥
रणपंडितांमाजी सतेज ॥ दृष्टीस पडतां तो कपिध्वज ॥ आणि भीमगदा पाहतां निस्तेज ॥ होऊनि पडसी मशका ॥१५०॥
असो पल्लवीं धरुनि जयद्रथ ॥ पांचालीस बळेंचि ओढीत ॥ तंव ती अंचल अंग झाडीत ॥ लोटिला पतित सतीनें ॥१५१॥
जयद्रथ उलथोनि पडला ॥ मागुती उठोनि धांवला ॥ बळेंचि उचलोनि राजबाळा ॥ रथावरी घातली ॥१५२॥
पृतनेसह जयद्रथ ॥ पळत आपुले नगर जात ॥ जयवाद्यें वाजवीत ॥ मनीं भावीत आनंदातें ॥१५३॥
हिंसकस्कंधीं बस्त विशेष ॥ मानसीं मानी परम हर्ष ॥ कीं द्विजां पीडितां नहुष ॥ आनंद मानी मानसीं ॥१५४॥
पांडवनामें घेऊनी ॥ हांक मारी श्रीकृष्ण भगिनी ॥ कंपित जाहली कुंभिनी ॥ महासती आक्रंदतां ॥१५५॥
पक्षी धांवती गगनीं ॥ हांक देती आक्रोशेंकरुनी ॥ पंडुपुत्र हो धांवा ये क्षणीं ॥ द्रुपदनंदिनी नेली दुष्टेम ॥१५६॥
मृगया करुनि पंडुसुत ॥ आश्रमाकडे त्वरें येत ॥ तों धांवतां देखत पुरोहित ॥ धौम्यनामक त्वरेनें ॥१५७॥
आणीकही ऋषी धांवती ॥ पांडवांसी वेगें पालविती ॥ मृगेंद्र हो तुमची सत्कीर्ती ॥ जयद्रथजंबुक नेतसे ॥१५८॥
आश्रमीं ठेवूनि धौम्याप्रती ॥ पवनवेगें पांचही धांवती ॥ जेवीं उरगाचा मार्ग खगपती ॥ काढीत धांवे त्वरेनें ॥१५९॥
कीं इभकलभें वनांतरीं ॥ पाहों धांवती जेवीं केसरी ॥ तों सेनेसह पळतां झडकरी ॥ पृथाकुमरीं देखिला ॥१६०॥
गर्जना करीत भीमार्जुन ॥ उभा रे तस्करा दावीं वदन ॥ तुझें नासिक आणि कान ॥ करचरण छेदितों ॥१६१॥
जयद्रथ सेनेसमवेत ॥ उभा राहे तेव्हां त्वरित ॥ भीम गदा घेऊनि धांवत ॥ जैसा कृतान्त महाप्रलयीं ॥१६२॥
गजरथांचा संहार ॥ करी तेव्हां वृकोदर ॥ धर्मार्जुन सोडिती शर ॥ प्रलयचपलेसारिखे ॥१६३॥
सहदेव आणि नकुळ ॥ संहारिती पायदळ ॥ बाण भेदती जैसी व्याळ ॥ वल्मीकांतरीं प्रवेशती ॥१६४॥
जयद्रथ सोडीत बाण ॥ वृष्टि करी जेवीं पर्जन्य ॥ परी ते न मानिती पंडुनंदन ॥ शिरें तोडून पाडिती ॥१६५॥
धर्मे अर्धचंद्रबाण ॥ लवलाहीं ॥ भेदिला जयद्रथाचे हृदयीं ॥ रथातळीं ते समयीं ॥ नकुल उतरोनि धांवला ॥१६६॥
वारणचक्रांत भृगनायक ॥ एकला चवताळे निःशंक ॥ तैसी असिलता खेटक ॥ नकुल धांवे घेऊनि ॥१६७॥
शस्त्रें पाडिजे कदलीस्तंभ ॥ तैसे नकुळें पाडिले इभ ॥ तुरंगस्यंदनांचे कदंब ॥ संहारिले प्रतापें ॥१६८॥
चपळा तळपे अंबरीं ॥ तेवीं फिरत सैन्यसागरीं ॥ नकुलघटोद्भवें ते अवसरीं ॥ सेनासिंधु प्राशिला ॥१६९॥
संकट जाणोनि जयद्रथ ॥ द्रौपदीस सांडूनियां पळत ॥ पांचाली म्हणे धरा त्वरित ॥ तस्कर दुष्ट सोडूं नका ॥१७०॥
मग पवनवेगेंकरुन ॥ धांवले तेव्हां भीमार्जुन ॥ महाशार्दूल धरी हरिण ॥ तेवीं आसडून पाडिला ॥१७१॥
यथेच्छ मारुनि लत्ताप्रहार ॥ बांधोनि आकर्षिले मागें कर ॥ क्षुरमुख काढूनि शर ॥ पांच पाट काढिले ॥१७३॥
धर्मे दौपदीपुढें त्वरित ॥ उभा केला जयद्रथ ॥ मग बोले सुभद्राकांत ॥ यासी वधावें जरी आतां ॥१७४॥
तरी दुखवेल गांधारी ॥ मग त्यासी पुसती ते अवसरीं ॥ घेऊनि द्रुपदराजकुमारी ॥ कां तूं पळत होतासी ॥१७५॥
मग म्हणती तयास ॥ म्हणें तूं पांडवांचा दास ॥ धर्म आणि द्रौपदीस ॥ नमूनि जाईं दुर्जना ॥१७६॥
जयद्रथासी म्हणे धर्म ॥ ऐसें न करीं कदा कर्म ॥ तो दीनवदन परम ॥ धर्मरायासी विनवीत ॥१७७॥
सत्य सांगतों राया धर्मा ॥ अन्याय माझा करीं क्षमा ॥ सोडिला तो पापात्मा ॥ अधोवदन जातसे ॥१७८॥
म्हणे जनां केवीं दाखवूं वदन ॥ मग गंगाद्वाराप्रति जाऊन ॥ करोनि तपानुष्ठान ॥ प्रसन्न केला व्योमकेश ॥१७९॥
त्याप्रति बोले त्रिनेत्र ॥ माग तूं इच्छित वर ॥ तो म्हणे पांडवांशीं विजय निर्धार ॥ मजलागीं देईं पां ॥१८०॥
मग बोले अपर्णानाथ ॥ समीप नसतां सुभद्राकांत ॥ जय तुजला तेव्हां प्राप्त ॥ क्षणैक होईल जाण पां ॥१८१॥
ऐसा घेऊनि वरार्थ ॥ नगरासी गेला जयद्रथ ॥ बहु मनीं संतोषत ॥ पंडुसुत जिंकीन मी ॥१८२॥
असो ऐसा करितां वनवास ॥ द्वादश वर्षे भरलीं पांडवांस ॥ द्रौपदीसहित आश्रमास ॥ विचार करिती जाऊनी ॥१८३॥
इकडे स्वप्नीं येऊनि कर्णास ॥ सांगता जाहला चंडांश ॥ कुंडलें मागेल अमरेश ॥ त्यासी सर्वथा देऊं नको ॥१८४॥
देतांचि कर्णभूषण ॥ आयुष्य तुझें होईल क्षीण ॥ मग बोले उदार कर्ण ॥ नेदीं माझेनें न म्हणवे ॥१८५॥
मग बोले गभस्ती ॥ त्याकडे एक मागें शक्ती ॥ असो कर्ण महामती ॥ अनुष्ठाना बैसला ॥१८६॥
जपतां सूर्योपस्थान ॥ शक्र आला विप्रवेष धरुन ॥ म्हणे महाराज तूं उदार कर्ण ॥ देईं कुंडलें श्रवणींचीं ॥१८७॥
कर्ण म्हणे तूं शचीरमण ॥ पूर्वीं गेलासी कवच घेऊन ॥ आतां देतों कर्णभूषण ॥ परी तूं प्रसन्न मज होई ॥१८८॥
अवश्य म्हणे विबुधपती ॥ कर्ण म्हणे मज देईं महाशक्ती ॥ कुंडलें काढूनि निश्चितीं ॥ निर्जरेश्वर पूजिला ॥१८९॥
महाप्रलयींची मुख्य चपला ॥ तैसी शक्रें शक्ति दिधली ते वेळां ॥ न्यासमंत्र प्रेरणकला ॥ कृपेनें सर्व सांगत ॥१९०॥
म्हणे हे निर्वाण्सांगातिणी ॥ महाशत्रूवरी प्रेरीं समरांगणीं ॥ ऐसें सांगोनि ते क्षणीं ॥ शचीरमण गुप्त जाहला ॥१९१॥
कवचकुंडलें देऊन ॥ तोषविला पाकशासन ॥ कर्णाचें उदारत्व देखून ॥ सुर सुमनें वर्षती ॥१९२॥
हें जाणोनि वर्तमान ॥ हर्षे निर्भर पंडुनंदन ॥ कौरव परम दीनवदन ॥ म्हणती कर्णे काय केलें ॥१९३॥
इकडे पांडवाश्रमासी ॥ धांवत आला एक ऋषी ॥ म्हणे अरणीपात्रें ठेविलीं वृक्षीं ॥ तों मृग एक पातला ॥१९४॥
अरणीपात्रें श्रृंगी गोंवून ॥ घेऊनि गेला जैसा पवन ॥ ऐकतां पांच पंडुनंदन ॥ चापें घेऊन धांवले ॥१९५॥
आटोपिती जंव मृग ॥ तंव तो जातसे सवेग ॥ बहुत करितां लाग ॥ नाकळे समीप देखतां ॥१९६॥
सवेंचि मृग जाहला गुप्त ॥ वटवृक्षाखालीं पांडव बैसत ॥ होऊनियां चिंताक्रांत ॥ म्हणती काय करावें ॥१९७॥
नकुलासी म्हणे युधिष्ठिर ॥ न्यग्रोधावरी चढें सत्वर ॥ तृषाक्रांत जाहलों नीर ॥ पाहें चहूंकडे विलोकूनी ॥१९८॥
कोणे पंथें गेला मृग ॥ हेही पाहें सवेग ॥ मग तो माद्रीहृदयारविंदभृंग ॥ वरी चढोनि सांगत ॥१९९॥
म्हणे या दिशेसी उद्यान ॥ सरोवरीं उदक गहन ॥ तेथेंचि गुप्त असे हरिण ॥ तो शोधून आणावा ॥२००॥
खालीं उतरुनि तत्काल ॥ त्वरेनें जाय वीर नकुल ॥ पात्र नसे भरावया जल ॥ तूणीर घेऊनि धांवला ॥२०१॥
तेथें बैसला होता एक पुरुष ॥ तो गुप्तरुपें म्हणे नकुलास ॥ माझे प्रश्न सांगसी निर्दोष ॥ तरीच सलिल पिशी हें ॥२०२॥
न सांगतां प्राशिल्या जीवन ॥ तत्काल पावसी तूं मरण ॥ नकुल म्हणे माझे प्राण ॥ उअदकाविण जाताती ॥२०३॥
धर्मराज तृषाक्रांत ॥ उदकालागीं वाट पाहत ॥ तुझे प्रश्न सांगावया येथ ॥ मी रिकामा नसें कीं ॥२०४॥
जीवन प्राशितां माद्रीसुत ॥ तत्काल पडला प्रेतवत ॥ उशीर लागला म्हणोनि त्वरित ॥ सहदेव तेथें पातला ॥२०५॥
नकुलाऐसेंचि होऊन ॥ तोही पावला तैं मरण ॥ मग गेला अर्जुन ॥ त्याचीही जाहली तेचि गति ॥२०६॥
मग पातला भीमसेन ॥ त्यासही तेणें पुशिले प्रश्न ॥ बळें सेवितां जीवन ॥ तोही जाहला प्रेतवत ॥२०७॥
मग धर्मराज आला तेथ ॥ तों चौघे बंधू झाले मृत ॥ यक्ष धर्मासी म्हणत ॥ सांग त्वरित प्रश्न माझे ॥२०८॥
सांगसी जरी माझे प्रश्न ॥ तरी बंधू उठतील चौघेजण ॥ अरणीपात्रें गेलों घेऊन ॥ तो मीच ल्जाण मृगवेषें ॥२०९॥
धर्म म्हणे महापुरुषा ॥ बोल ल्तुझा प्रश्न कैसा ॥ येरु म्हणे सूर्य आकाशा ॥ चढे कैसा सांग पां ॥२१०॥
कैसा पावतो अस्त ॥ कोठें राहतो आदित्य ॥ यावरी प्रत्युत्तर देत ॥ धर्मपुत्र धर्मात्मा ॥२११॥
म्हणे ब्राह्मण देती अर्घ्यदान ॥ सोडिती ब्रह्मास्त्र मंत्रोन ॥ त्या पुण्यें दैत्य वधून ॥ रवि चढे ऊर्ध्वपंथ ॥२१२॥
धर्मकर्म करितां बहुत ॥ सूर्य सुखें पावे अस्त ॥ सत्यामाजी तो राहत ॥ न माने असत्य आदित्या ॥२१३॥
श्रोत्रिय तो सांग कवण ॥ धर्म देत प्रतिवचन ॥ वेदाध्ययन अग्निसेवन ॥ सुशील परम श्रोत्रिय तो ॥२१४॥
बुद्धिमंत सांग कोण ॥ जो करील विप्रसेवन ॥ देवत्व ब्राह्मणासी जाण ॥ कोण्या अर्थे सांग पां ॥२१५॥
तप आणि सत्य ॥ ब्राह्मणासी येणें देवत्व ॥ संत ते कोण त्वरित ॥ मज सांगें सर्वज्ञा ॥२१६॥
तत्त्व जाणते निश्चित ॥ ते जाण ज्ञाते महंत ॥ पाप तें कोण अद्भुत ॥ परपीडा परनिंदा ॥२१७॥
पुण्य तें काय साचार ॥ तरी करावा परोपकार ॥ सांग कोणता अनाचार ॥ सत्कर्मत्याग जाणिजे ॥२१८॥
कोण पावतो सांग मोद ॥ अनृणी अप्रवासी पावे आनंद ॥ आश्चर्य कोण सांग विशद ॥ मजलागीं धर्मात्म्या ॥२१९॥
एक मृत्यु पावतां देख ॥ उरले ते मानिती सुख ॥ आश्चर्य हें निःशंक ॥ मज वाटतें जाण पां ॥२२०॥
आतां सांगें पंथ कोण ॥ ज्या वाटेनें जाती संतजन ॥ वार्ता काय ती संपूर्ण ॥ सांग मजला युधिष्ठिरा ॥२२१॥
सकल भूतांसी काळ पचवीत ॥ हेचि वार्ता मुख्य येथ ॥ गुरु कोण सांग निश्चित ॥ सर्वज्ञ दयाळ उदार जो ॥२२२॥
शिष्य कोण सांग साचार ॥ भाविक प्रज्ञावंत उदार ॥ विष तें कोण सांग सत्वर ॥ गुरुची अवज्ञा करणे जी ॥२२३॥
काय करावें सत्वर ॥ छेदावा संसारार्णव दुस्तर ॥ मोक्षतरुचें बीज काय साचार ॥ शुद्धज्ञान क्रियेसह ॥२२४॥
कोण शुचिष्मंत बोल विशद ॥ अंतर्बाह्य मानसीं शुद्ध ॥ पंडित कोण निर्द्वंद्व ॥ सद्विवेक ज्यापाशीं ॥२२५॥
कोण जन्मला निश्चित ॥ परोपकारीं जो सदा रत ॥ तस्कर कोण बोल त्वरित ॥ पंच विषय निर्धारें ॥२२६॥
मद्याहूनि काय मोहक ॥ धर्म म्हणे स्त्रेह देख ॥ अंध कोण निःशेष ॥ विषयास्था सुटेना ज्या ॥२२७॥
शूर कोण सांग येथ ॥ स्त्रीलोचनबाणें नव्हे व्यथित ॥ गहन काय बोल सत्य ॥ स्त्रीचरित्र जाण पां ॥२२८॥
दरिद्री तो सांग केवळ ॥ ज्याची न जाय हळहळ ॥ लघुत्वाचें काय मूळ ॥ पराशा ज्यासी सुटेना ॥२२९॥
निद्रित कोण सांग दृढ ॥ मतिमंद मूढ ॥ नरक तो कोण गूढ ॥ कुटुंबकाबाड न सुटे जया ॥२३०॥
सुख तें कोण सांग ॥ तरी सर्वसंगपरीत्याग ॥ बधिर कोण नाहीं ज्या विराग ॥ हित नायके जो शिकवितां ॥२३१॥
नलिनीपत्रावरी उदक ॥ तैसें सांग काय क्षणिक ॥ आयुष्य धन यौवन देख ॥ नसे भरंवसा सर्वथा ॥१३२॥
कोणा वश सर्व प्राणी ॥ जो नम्र सत्यभाषणी ॥ भूषण काय ल्यावें कर्णीं ॥ हरिकथाश्रवणनिरुपण ॥१३३॥
करावा कोठें सांग वास ॥ संतनिकट कीं काशीस ॥ चार गोष्टी असती सुरस ॥ कोणत्या सांग शेवटीं ॥१३४॥
मधुर बोलूनि करिजे दान ॥ गर्वरहित निःसीम ज्ञान ॥ क्षमायुक्त शूरत्व पूर्ण ॥ भाग्य आइ उदारत्व ॥१३५॥
या चार गोष्टी दुर्लभ तत्त्वतां ॥ यक्ष म्हणे पंडुसुता ॥ कोणता बंधु तत्त्वतां ॥ उठवूं सांग प्रथम मी ॥१३६॥
धर्म म्हणे तूं दयाळ ॥ आधीं उठवीं माझा नकुल ॥ यक्ष म्हणे तूं पुण्यशील ॥ सत्य होसी धर्मात्मा ॥१३७॥
मग एकदांचि चौघे जण ॥ बंधू बैसविले उठवून ॥ मग धर्म बोले कर जोडून ॥ तूं कोण दर्शन मज देईं ॥१३८॥
मग म्हणे मी तुझा पिता ॥ यमधर्म आहें तत्त्वतां ॥ तुझें सत्त्व पहावया आतां ॥ मृगवेषें मी आलों ॥१३९॥
मग यम देत दर्शन ॥ पांचही जण वंदिती चरण ॥ अरणीपात्रें आणून ॥ प्रीतीकरोन दीधलीं ॥२४०॥
तुम्ही करितां अज्ञातवास ॥ कोनी नोळखतील तुम्हांस ॥ क्रमावें विराटनगरीं वर्ष ॥ पुढें राज्यास पावाल ॥२४१॥
ऐसें सांगोनि सूर्यनंदन ॥ तत्काळ पावला अंतर्धान ॥ पांडव आश्रमासी येऊन ॥ देतील द्विजां अरणीपात्रें ॥२४२॥
याउपरी पंडुसुत ॥ ऋषींप्रति आज्ञा पुसत ॥ अज्ञातवास त्वरित ॥ यावरी प्राप्त जाहला ॥२४३॥
येथूनि एक वर्षपर्यंत ॥ व्हावें लागेल आम्हां गुप्त ॥ कंठ धर्माचा दाटत ॥ वियोग न साहवे विप्रांचा ॥२४४॥
ऋषी सप्रेम होऊन ॥ धर्मासी देती आशीर्वचन ॥ लवकरी प्राप्त हो राज्यासन ॥ शत्रु समस्त निवटोनियां ॥२४५॥
समस्तांची आज्ञा घेऊन ॥ ते भूमिका सांडून ॥ एक कोश पुढें जाऊन ॥ पांडव जाण उतरले ॥२४६॥
तेथें बैसोनि विचार ॥ करितील आतां पंडुकुमार ॥ तें ब्रह्मानंदें श्रीरुक्मिणीवर ॥ श्रीधरमुखें वदवील ॥२४७॥
अरण्यपर्व संपलें येथ ॥ पुढें विराटपर्व गोड बहुत ॥ तें श्रवण करितां समस्त ॥ पापतापदहन होय ॥२४८॥
ज्यांचा ऐकतां वनवास ॥ आपणा सुख होय विशेष ॥ संकट निरसे निःशेष ॥ त्यांची करुणा ऐकतां ॥२४९॥
या पर्वाचे अध्याय संस्कृत ॥ संख्या बोलिला सत्यवतीसुत ॥ दोनशें अध्याय सुरस बहुत ॥ एकोणसत्तर वरी बरवे ॥२५०॥
एकादश सहस्त्र चौसष्टी ॥ इतुके श्लोकांची मूळगांठी ॥ सारांश कथा गोष्टी ॥ पांडुरंगें वदविली ॥२५१॥
नव अध्यायां संपूर्ण ॥ वनपर्व जाहलें निरुपण ॥ तेविसाव्या अध्यायापासून ॥ एकतीसपर्यंत जाणिजे ॥२५२॥
येथूनि चार अध्याय अपूर्व ॥ पुढें परिसा विराटपर्व ॥ महासंकट हरेल सर्व ॥ श्रवण पठन करितांचि ॥२५३॥
ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥ श्रीधरहृदयकल्हारभ्रमरा ॥ तव वरदें जगदुद्धार ॥ ग्रंथ पुढें चालो कां ॥२५४॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताम ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकतिसाव्यांत कथियेला ॥२५५॥
इति श्रीपांडवप्रतापे श्रीधरकृतटीकायां घोषयात्रा - जयद्रथविटंबन - कुंडलाभिहरण - यक्षप्रश्नकथनं नाम एकत्रिंशत्तमाध्यायः ॥३१॥
॥ श्रीकृष्णार्पणामस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ इति श्रीपांडवप्रताप अरण्यपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP