मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २ रा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २ रा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २ रा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ संपलें अगाध सिंधुमथन ॥ ऐका सिंहावलोकनेंकरून ॥ कद्रू विनता येऊन ॥ वारू विलोकिती रवीचा ॥१॥पाहोनि आल्या निजसदनीं ॥ कद्रू म्हणे विनते साजणी ॥ उच्चैःश्रवा कोणे वर्णी ॥ येरी म्हणे शुद्ध धवल ॥२॥चंद्रकिरणांचा ओतिला ॥ कीं शुद्धरजताचा घडिला ॥ कीं जान्हवीनीरें धुतला ॥ दुग्धवर्ण तेजस्वी ॥३॥कद्रू म्हणे सत्य जाण ॥ परी पुच्छ आहे कृष्णवर्ण ॥ अरुणजननी बोले वचन ॥ तुझे नयन तरळले ॥४॥कद्रू म्हणे पुच्छ श्वेत ॥ जरी मज दाखविसी यथार्थ ॥ तरी सहस्त्र अयनेंपर्यंत ॥ दासी तुझी होईन मी ॥५॥जरी श्यामवर्ण पुच्छ पाहीं ॥ तरी तूं दासी माझी होईं ॥ उदयीक जाऊं लवलाहीं ॥ पुच्छ पहावया वारूचें ॥६॥रात्रीं पुत्र पाचारूनी ॥ रुदन करी कद्रू ते क्षणीं ॥ म्हणे असत्य पातकेंकरूनी ॥ विनतेनें मज मारविलें ॥७॥तरी तुम्ही सर्वही जाऊन ॥ वारूच्या पुच्छास दंश करून ॥ करून दाखावा श्यामवर्ण ॥ दासी आमुची विनता मग ॥८॥व्याल म्हणती तत्क्षणीं ॥ आम्हांस भस्म करील तरणी ॥ समर्थसीं द्वंदू बांधूनी ॥ मग आम्हीं कोठें राहावें ॥९॥कद्रू कोपली अनिवार ॥ शापशस्त्रें ताडिले विखार ॥ म्हणे तुम्हांतें सापत्न आणि वैश्वानर ॥ करितील संहार चुकेना ॥१०॥जनमेजयाचा याग परम ॥ तेथें तुम्ही व्हाल भस्म ॥ ऐसा शाप ऐकतां उत्तम ॥ मानिता जाहला परमेष्ठी ॥११॥सर्प हिंसक चांडाळ ॥ महादुर्मती विखार खळ ॥ वाढेल बहु त्यांचें कुळ ॥ बरें शापिलें कद्रूनें ॥१२॥ऐकोनि मातेचा शाप देख ॥ भयभीत धांवती दंदशूक ॥ कृष्णकेश होऊनि सकळिक ॥ पुच्छीं जडले वारूच्या ॥१३॥कद्रूनें तें जाणून ॥ विनतेस पदरीं धरून ॥ ओढिली म्हणे श्वेतवर्ण ॥ पुच्छ कोठें दाखवीं ॥१४॥उदया येतां वासरमणी ॥ विनतेस नेलें ओढूनी ॥ पुच्छ श्यामवर्ण पाहुनी ॥ विनता वचन न बोले ॥१५॥मग कद्रूनें ओढोनी ॥ दासी करून ठेविली सदनीं ॥ जैसी धेनु कर्दमीं जाऊनी ॥ अकस्मात गुंतली ॥१६॥सहस्त्र वर्षें भरतां पूर्ण ॥ आपेंआप अंड उलोन ॥ प्रकटे महाराज सुपर्ण ॥ जैसा सूर्य कल्पांतींचा ॥१७॥ किंवा प्रकटला प्रळयाग्न ॥ ब्रह्मांड उजळलें तेजेंकरून ॥ लोक भाविती प्रळय पूर्ण ॥ करिती स्तवन अपार ॥१८॥तुझें स्मरण करितां निःशेष ॥ उतरे संसारविखार विष ॥ तुझे जे कां अनन्य दास ॥ त्यांच्या स्मरणें सर्प पळती ॥१९॥पक्ष स्पर्शतां जगती ॥ गरुडपाचूच्या खाणी उमटती ॥ चोवीस सहस्त्र योजनें गणती ॥ दोन पक्ष दोहींकडे ॥२०॥बिंबप्रवाळरंगाहून ॥ आरक्त चंचु चरण लोचन ॥ किरीटकुंडलें मंडित ध्यान ॥ चतुर्भुज रूप तुझें ॥२१॥तुज भजती जे आवडीं ॥ तेचि गरुडोपासक गारोडी ॥ तुझ्या स्मरणें सर्पकोडी ॥ पळतील उठोनियां ॥२२॥पंचाहत्तर सहस्त्र योजनें थोर ॥ एवढें तुझें दीर्घ शरीर ॥ दोनी पक्ष चोवीस सहस्त्र ॥ वेदध्वनी उमटती ॥२३॥पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही ॥ पक्षांमधून उमटती ध्वनी ॥ पक्षतेज झळकतां मेदिनी ॥ पाषाण होती दिव्य पाचू ॥२४॥तुझें तेज अंबरीं प्रचंड ॥ करपोन जाईल बह्मांड ॥ नाभी नाभी म्हणे गरुड ॥ चिंता कांहीं करूं नका ॥२५॥जे विष्णुभक्तिविहीन ॥ ज्यांसी नावडे स्मरण कीर्तन ॥ निंदक दुष्ट दुर्जन ॥ त्यांसी विदारीन क्षणार्धें ॥२६॥माता पिता गुरु ब्राह्यण ॥ साधु संत हरिभक्त जाण ॥ यांसी द्वेषी जो दुर्जन ॥ त्यांसी विदारीन क्षणार्धें ॥२७॥वेद शास्त्र पुराण ॥ करिती जे कां अप्रमाण ॥ विष्णु शिव जे निंदिती दुर्जन ॥ त्यांसी विदारीन क्षणार्धें ॥२८॥हरिशिवप्रतिमा म्हणे पाषाण ॥ तीर्थमहिमा सांडी खंडून ॥ निंदी हरिस्वरूपें सगुण ॥ त्यांसी विदारीन क्षणार्धें ॥२९॥म्हणोनि प्रजा हो निश्चिती ॥ सद्धावें करा भगवद्भक्ती ॥ तरी तुम्हां अहोरातीं ॥ घरटी घालून रक्षीन ॥३०॥प्रजांचें करून समाधान ॥ अद्भुत तेज आच्छादून ॥ मातेचें घ्यावया दर्शन ॥ सर्पसदना पातला ॥३१॥देखोनि मातेचे क्लेश ॥ परम संतापला खगेश ॥ दासीपुत्र सुपर्णास ॥ सर्प म्हणती मागें पुढें ॥३२॥कद्रू म्हणे गरुडा पाहीं ॥ रमणकद्वीपाप्रती सर्प नेईं ॥ सुपर्णें पृष्ठीं वाहोनि लवलाहीं ॥ सर्प नेले तया स्थाना ॥३३॥सर्पांची सत्ता देखोन ॥ म्हणे मातेस सुपर्ण ॥ तुझ्या पालटास जाण ॥ मागेल तें देईन मी ॥३४॥विनता म्हणे कद्रूतें ॥ माझ्या पालटा माग दिव्य वस्तूतें ॥ कद्रू म्हणे मजसहित पुत्रांतें ॥ अमृतपान करवीं कां ॥३५॥तुवां दिधलिया अमृत ॥ तत्काळचि तुज करीन मुक्त ॥ विनता गरुडासी सांगत ॥ अपेक्षित सर्पांचें ॥३६॥बाहू पिटूनि बोले पुरुषार्थ ॥ देवांसी जिंकोनि आणितों अमृत ॥ गरुड चालिला त्वरित ॥ निषाद भक्षित समुद्रींचे ॥३७॥भक्षिले बहुत निषादगण ॥ त्यांत सांपडला एक ब्राह्मण ॥ तो तत्काळ टाकिला उगळून ॥ श्रेष्ठवर्ण म्हणोनियां ॥३८॥क्षुधानल नव्हें शांत ॥ कश्यप म्हणे पुत्रा ऐक त्वरित ॥ देवलोकीं सरोवर अद्भुत ॥ कूर्मकुंजर त्यांत भांडती ॥३९॥विभावसु सुप्रतीक ॥ पूर्वी हे बंधू दोघे देख ॥ द्रव्यसंबंधें एकास एक ॥ शापून ऐसे जाहले ॥४०॥तीन योजनें जाण ॥ दोघांचें शरीर विस्तीर्ण ॥ गरुडें तत्काळ मारून ॥ अंतरिक्षें घेऊनि जातसे ॥४१॥जंबुवृक्षाची विशाळ ॥ शतयोजनें शाखा निर्मळ ॥ वरी बैसतां खगपाळ ॥ तंव ती शाखा मोडली ॥४२॥विजेऐसी कडकडत ॥ गरुड विलोकून पाहात ॥ तों पानोपानीं समस्त ॥ जडले वालखिल्य येऊनी ॥४३॥साठीसहस्त्र त्यांचा मेळा ॥ सर्व पर्णीं जडोन ठेला ॥ अंगुष्ठप्रमाण परी आगळा ॥ प्रताप त्यांचा न वर्णवे ॥४४॥मरतील आतां ब्राह्मण ॥ गरुड उडाला शाखा घेऊन ॥ मुखीं कूर्म इभ धरोन ॥ अंतरिक्ष हिंडतसे ॥४५॥संकटीं पडला सुत ॥ देखोन कश्यय प्रार्थीत ॥ म्हणे स्वामी भग्न शाखा त्वरित ॥ सांडून जा पूर्वस्थळा ॥४६॥ऐकोन कश्य पाचें वचन ॥ मानसगती अवघे जण ॥ हिमाचलाप्रती जाऊन ॥ तपध्यान आरं भिती ॥४७॥विहंगोत्तमें क्षुधाहरण ॥ केलें इभ कूर्म भक्षून ॥ कनकशाखा नेऊन ॥ हिमाद्रिशिरीं ठेविली ॥४८॥वैनतेयबळ अगाध ॥ देखोनि इंद्राचा अपराध ॥ हा दुसरा शक्र प्रसिद्ध ॥ वालखिल्य करीत होते ॥४९॥शौनक म्हणे सूता ॥ शक्रें काय अन्याय केला होता ॥ सूत म्हणे कश्यपें याग करितां ॥ पुत्रोत्पत्तीकारणें ॥५०॥साठीसहस्त्र वालखिल्य जाणा ॥ समिधा आणूं चालिले वना ॥ मूर्ति अंगुष्ठप्रमाणा ॥ परम वेगें चालती ॥५१॥शिखा यज्ञोपवीत धोत्रें ॥ चिमणींच झळकती पवित्रें ॥ परी सामर्थ्यें जयांचीं विचित्रें ॥ न गणती शक्रसूर्यांतें ॥५२॥वेदशास्त्रचर्चा करीत ॥ एक एक दर्भकाडीसी धरीत ॥ शनैःशनैः जाती कष्टत ॥ तों गोष्पदीं उदक देखिलें ॥५३॥पाय निसरोन अकस्मात ॥ आंत पडले विप्र समस्त ॥ बुचकळ्या देतां तेथ ॥ कासावीस जाहले ॥५४॥जीवाचिये काकुळती ॥ एकास एक झोंबती ॥ टाळी वाजवून अमरपती ॥ हांसे विमानीं गदगदां ॥५५॥पहा हो गोष्पदजळीं ॥ विप्र हे बुडती सकळी ॥ परी धांवोनि नये जवळी ॥ कौतुक मात्र विलोकीत ॥५६॥मग वालखिल्य जोडिल्या हस्तीं ॥ स्तविते जाहले रमापती ॥ विश्वव्यापक सगुणमूर्ती ॥ काढीं आम्हां येथोनियां ॥५७॥मग धांवूनि श्रीकरधर ॥ कडेसी काढिले ब्रह्मपुत्र ॥ परी इंद्र हांसला तेणें विप्र ॥ परम संताप पावले ॥५८॥तेथेंचि आरंभिलें तप तीव्र ॥ दुसरा करूं इच्छिला प्रतिशक्र ॥ कंपायमान शचीवर ॥ शरण गेला कश्यपा ॥५९॥मग कश्यपें येऊन ॥ स्तविले सर्व ते ब्राह्मण ॥ म्हणे मजवरी द्दष्टी देऊन ॥ कोप सोडा आतां हा ॥६०॥तुम्हीं निर्मिला दुसरा इंद्र ॥ तरी तो आतां करा खगेंद्र ॥ वीर्यें बलसागर ॥ शक्रहून विशेष ॥६१॥शक्रसमर्थ्य करून क्षीण ॥ त्याचा प्रताप वाढेल गहन ॥ मग विनतागर्भीं दिव्य रत्न ॥ पक्षीश्वर जन्मला ॥६२॥द्वादश मित्र करूनि एकत्र ॥ घडिला तो सर्पामित्र ॥ जो विष्णुभक्तांचा परम मित्र ॥ ऐका चरित्र तयाचें ॥६३॥असो पक्षवातेंकरून ॥ हडबडिलें स्वर्गभुवन ॥ शक्रास म्हणे अंगिरानंदन ॥ सावधान अमृत रक्षा ॥६४॥गरुड देखोनियां द्दष्टीं ॥ धांवती सुरवरांच्या थाटी ॥ करिते जाहले शस्त्रवृष्टी ॥ परी न गणी सुपर्ण तो ॥६५॥अकांत भावे निर्जरदळीं ॥ शस्त्रें सकळांचीं गिळियेलीं ॥ देवसेना विदारिली ॥ दिक्पाळ सकळ पळविले ॥६६॥लागतां नखांचा मार ॥ शस्त्रें चूर्ण जाहलीं समग्र ॥ पाठी देऊन सत्वर ॥ पळती निर्जर त्वरेनें ॥६७॥वीज झळके अंतराळीं ॥ तेवीं विहंगमराज तळपे दळीं ॥ अमृतकुंडाजवळी ॥ लक्षीत आला निजबळें ॥६८॥ तों तेथें ज्वाळावर्ण ॥ विझविली चंचू उदकेंकरून ॥ वायूचें करणार खंडण ॥ कर्तरीयंत्र उपडिलें ॥६९॥रजतकलशीं सुधारस ॥ भरोनि चालिला खगेश ॥ अद्भत देखोनि श्रीनिवास ॥ धांवोनि चक्र मोकलिकें ॥७०॥येतां देखोनि सुदर्शन ॥ गरुडें गिळिलें न लगतां क्षण ॥ ह्रदयस्थ जो कां भगवान ॥ त्याचे हातीं दीधलें ॥७१॥सुपर्णास म्हणे नारायण ॥ माग तुज मी जाहलों प्रसन्न ॥ मग बोले विनतानंदन ॥ तूंचि मागें मज कांहीं ॥७२॥हरि बोले सुहास्यवदन ॥ सुपर्णा तूं होईं माझें वहन ॥ गरुडें धांवोनि चरण ॥ श्रीरंगाचे वंदिले ॥७३॥असो तो सर्पारि जाण ॥ तेथून जाहला विष्णुवाहन ॥ ईद्रही स्त्रेहें येऊन ॥ सुपर्णास भेटला ॥७४॥इंद्र म्हणे तूं कश्यपकुमर ॥ होसी माझा तूं सहोदर ॥ अमृत पाजून विखार ॥ अमर सहसा करूं नको ॥७५॥वैनतेय म्हणे कौतुक पाहीं ॥ सुधाघट नेतों लवलाहीं ॥ अंतरें ठेवितांच ते समयीं ॥ घेऊन येईं तुझा तूं ॥७६॥ऐसा संकेत सांगून ॥ सर्पसदना आला सुपर्ण ॥ अमृत कुंभ दावून ॥ म्हणे स्त्रानें करा आतां ॥७७॥गंगाजळ पुण्यरूप ॥ तेथें स्त्रान करिती सर्प ॥ सुधारसघट खगाधिप ॥ कुशमंडळीं ठेवी तेव्हां ॥७८॥म्हणे माझी माता येथून ॥ मुक्त जाहली दासीपणापासून ॥ साक्षी धरणी सूर्यनारायण ॥ बोलो गर्जोनि अंडजप्रभू ॥७९॥तों इंद्र अद्दश्यरूपें येऊन ॥ सुधारसघट नेला उचलोन ॥ कृतांत नेतो जैसा प्राण ॥ कोणासही न कळतां ॥८०॥स्त्रानसंध्या करून व्याळ ॥ धांवोनि आले तेथें सकळ ॥ शोधिती सकळ कुशमंडळ ॥ न दिसे सुधारसघट कोठेंही ॥८१॥हाहाकार करिती फणी ॥ घेती वक्षःस्थळ कपाळें बडवोनी ॥ म्हणती ठकविलें आम्हांलागुनी ॥ कपट केलें सुपर्णें ॥८२॥अमृतघट ठेविला जेथें ॥ चाटिती सर्प दर्भांतें ॥ तों जिव्हा चिरल्या समस्तांतें ॥ दुःख जाहलें अपार ॥८३॥हातींचा गेला सुधारस ॥ वरी जिव्हा चिरल्या विशेष ॥ सर्प द्विजिव्ह निःशेष ॥ अद्याप जन पाहती ॥८४॥ मग सत्तावीस व्याळकुळें ॥ समूळ ग्रासिलीं खगपाळें ॥ उरले ते पळाले ॥ विवरद्वारें पाताळीं ॥८५॥स्कंधीं घेऊन विनतेसी ॥ सर्पारि गेला निजाश्रमासी ॥ विनता आणिली कश्यपापासीम ॥ ऐक्यता केली सुपुत्रें ॥८६॥हें सुपार्णाख्यान जे पढती ॥ बहुत श्रोतयां ऐकविती ॥ त्यांस पृष्ठीं वाहोनि अंतीं ॥ गरुड नेईल वैकुंठा ॥८७॥आणि संसारीं असतां सदा ॥ कदा न होय सर्पबाधा ॥ ऐसी व्यासवचनमर्यादा ॥ असत्य नव्हे काळत्रयीं ॥८८॥असो शेष वासुकी सर्प सकळी ॥ तप करिती हिमाचळीं ॥ विष्णुनाभ येऊन ते काळीं ॥ पुसता जाहला तयांतें ॥८९॥कां आरंभिलें तप घोर ॥ शेष वासुकी बोलती उत्तर ॥ चांडाळ हे परम विखार ॥ यांच्या संगें बुडालें आम्ही ॥९०॥सुपर्णासीं सदा वैर ॥ चालविती हे विखार ॥ आणि मातृशाप अनिवार ॥ सर्पसत्रीं भस्म व्हावें ॥९१॥म्हणोन तीव्र तपवैश्वानर ॥ त्यांतचि जाळूं आपलें शरीर ॥ मग बोले चतुर्वक्र ॥ भय मानसीं धरूं ॥ नका ॥९२॥माथां घेऊन कुंभिनी ॥ अक्षयी राहा पातालभुवमीं ॥ हरिस्मरण करा अनुदिनीं ॥ शाप तुम्हांसी बाधेना ॥९३॥ मग सर्षपप्राय धरणी ॥ शेष घे माथां उचलुनी ॥ खल कुटिलभाव टाकुनी ॥ भगवद्भजनीं राहिला ॥९४॥सहस्त्रफणींचा मध्यमणी ॥ त्यावरी पुष्पवत धरली धरणी ॥ परम भक्त म्हणवुनी ॥ त्यावरी पहुडे नारायण ॥९५॥मिळोनि दुर्जन विखार ॥ एकांतीं करिती विचार ॥ म्हणती जनमेजयाचें सत्र ॥ न चले ऐसें करावें ॥९६॥एक म्हणती प्रधान मोहून ॥ विवेक सांगून मोडावर यज्ञ ॥ एक म्हणती रात्रीं जाऊन ॥ ऋत्विजगण डंखावे ॥९७॥होमद्र्व्य समूळीं हून ॥ नासावें गरळ घालून ॥ किंवा जनमेजयासी मारून ॥ टाकावें परीक्षितीसारखें ॥९८॥एक म्हणती विषधारा अमोघ ॥ पाडाब्या यज्ञावरी मेघ ॥ एक म्हणती सवेग ॥ गजपूरचि बुडवावें ॥९९॥वासुकी म्हणे ते क्षणीं ॥ दुष्ट पडतील हुताशनीं ॥ सुष्ठु रक्षील आस्तिक मुनी ॥ भविष्य असे पूर्वींचें ॥१००॥परम सुरस भार कथा ॥ पावन होय श्रोता वक्ता ॥ शौनकादिऋषी समस्तां ॥ सूत सांगे आदरें ॥१०१॥जो पांडवकुळीं कुलभूषण ॥ सर्व लक्षणीं विराजित पूर्ण ॥ जो परीक्षितीचा नंदन ॥ जनमेजय राजेंद्रा ॥१०२॥विद्याप्रवीण गुणसमुद्र ॥ भारतसागरउल्हासंचद्र ॥ सुर भूसुर सप्तकर ॥ तृप्त ज्याचे निजगृहीं ॥१०३॥कलीमाजी राज्य करून ॥ केलें कलीसी निग्रहण ॥ करी गोविप्रप्रतिपालन ॥ प्रजाजन सुखरूप ॥१०४॥षोडशवर्षें विराजित ॥ सभेसी बैसला नृपनाथ ॥ अमात्य हस्त जोडून समस्त ॥ उभे तिष्ठत निजस्थानीं ॥१०५॥सभा घनवटळी पूर्ण ॥ पुढें गर्जती बंदीजन ॥ तों सर्वांकडे पाहून ॥ जनमेजय बोलत ॥१०६॥माझा पिता अभिमन्यु नंदन ॥ अल्पवयींच कां त्यास मरण ॥ वर्तलें तें सर्व कारण ॥ श्रुत पूर्ण मज करावें ॥१०७॥अमात्य जाहले सद्नदित ॥ नृपास आले अश्रुपात ॥ सभा राहिली निवांत ॥ प्रधान सांगे वर्तलें तें ॥१०८॥पांडव निजधामा गेलियावरी ॥ कली सुटला उर्वीवरी ॥ परीक्षिती नृप राज्य करी ॥ कुंजर पुरीं तेधवां ॥१०९॥तो कुरुकुलावतंस नृपती ॥ पवित्र राजा परीक्षिती ॥ राज्यामाजी बहुत नीती ॥ धर्माऐसी चालवीत ॥११०॥मृगयाव्याजेंकरूनी ॥ चतुरंगसेनादळ घेऊनी ॥ हिंडतां घोर काननीं ॥ सायक लावुनी शरासना ॥१११॥तों दूर देखिला कुरंग ॥ सायकें विंधिला सवेग ॥ घायाळ पळत तो वेगें मृग ॥ पाठीं धांवे नृपती तो ॥११२॥आंगीं भेदला असतां मार्गण ॥ घोर कांतार लंघी हरिण ॥ राजा पाठीसीं धांवतां शीणा ॥ बहुसाला पावला ॥११३॥राव परम तृषाक्रांत ॥ तों गोपाळ देखिले बहुत ॥ नाना विनोद करीत ॥ जाहले उन्मत्त दुग्धपानें ॥११४॥त्यांसी नृप पुसे जीवन ॥ भरोनि आणिती दुग्धद्रोण ॥ गोप म्हणती करीं पयःपान ॥ परी तें नेघे सर्वथा ॥११५॥महापर्वताचे दरीमधून ॥ मृग गेला चुकावून ॥ भोंवता पाहे अभिमन्युनंदन ॥ तों ऋषिआश्रम देखिला ॥११६॥तंव तया आश्रमांत ॥ शमीक ऋषि बैसला ध्यानस्थ ॥ तयास परीक्षिती पुसत ॥ कुरंग गेला या वाटे ॥११७॥तंव तो समाधिसुखें तल्लीन ॥ दारुप्रतिमा जेवीं रहिताप्राण ॥ राव विषाद पावोन ॥ म्हणेग गर्वें न बोले ॥११८॥विनाशकाळीं बुद्धि विपरीत ॥ अविद्या आठवली मनांत ॥ ईश्वरी माया अद्भुत ॥ पूर्वकर्म सुटेना ॥११९॥मृत उरग होता पडला ॥ धनुष्यकोटीनें उचलिला ॥ कंठीं ऋषीच्या घातला ॥ नेणवे त्याला कांहीं तें ॥१२०॥परम सज्ञान चतुर ॥ विवेकसमुद्रींचा पोहणार ॥ बहुतांस सांगे नीतिशास्त्र ॥ तो कुबुद्धिकूपीं पडियेला ॥१२१॥परम पुण्यवंत परीक्षिती ॥ परी कर्माची गहन गती ॥ घोर अनर्थ करून नृपती ॥ कुंजर पुरा प्रती गेला ॥१२२॥तंव तें सर्पशरीर घाणत ॥ दुर्गंधी सुटली अरण्यांत ॥ पिपीलिका आंगास झोंबत ॥ सावचित्त शमीक नोहे ॥१२३॥ऋषि जाती आश्रमावरून ॥ कंटाळती उरग देखोन ॥ त्याचा पुत्र श्रृंगी तपोधन ॥ ब्रह्मदर्शना गेला होता ॥१२४॥मागें रायें य़ेऊन वनीं ॥ करून गेला दुष्ट करणी ॥ तें नेणून सर्व ब्राह्मणीं ॥ कंटाळती आश्रमातें ॥१२५॥नित्यनेम सारोन आश्रमा येत ॥ तों स्वाध्यायी भेटले बहुत ॥ म्हणती पिता तुझा ध्यानस्थ ॥ मृतसर्प गळां त्याचे ॥१२६॥तो वेगें आश्रमासी आला ॥ मृतसर्प गळां देखिला ॥ परम क्षोभ पावला ॥ जेवीं कल्पांतीं व्योमकेश ॥१२७॥अनुचित कर्म करून निश्चिती ॥ गेला नागपुरा परीक्षिती ॥ सर्व कळलें तयाप्रती ॥ ऋध चित्तीं न समाये ॥१२८॥हातीं घेऊनि सलिल ॥ शापशस्त्र सोडिलें सबळ ॥ जें हरि हर देवपाळ ॥ असत्य करूं न शकती ॥१२९॥आजपासून सातवे दिनीं पूर्ण ॥ तक्षकदंशें पावेला मरण ॥ मग मृत सर्प काढून ॥ अंग क्षालन करी उदकें ॥१३०॥बाप रे नकळे होणार ॥ ऋधें शापिला नृपवर ॥ सावध जाहला शमीक ऋषीश्वर ॥ पुढें पुत्र देखिला ॥१३१॥न सांगतां कळला समाचार ॥ शापिला कुरु कुलदिवाकर ॥ क्षमाशील तो योगीश्वर ॥ श्रृंगीप्रती बोलतसे ॥१३२॥म्हणे अहा कर्म निंद्य केलें ॥ राजहिंसा जोडिली बळें ॥ त्या रायाचेनि स्त्रेहमेळें ॥ या वनीं सुखी राहतों ॥१३३॥प्रजापाळक पवित्र ॥ पांडवकुळीं तेवढाच उरला ॥ आहा अविवेकें अनर्थ केला ॥ राजा शापिला परीक्षिती ॥१३४॥भूसुरां पाळी भूपती ॥ तेणें यज्ञायागादि कर्में चालती ॥ मग संतोषोनि सुरपती ॥ पर्जन्य पाडी समयोचित ॥१३५॥तेणें सर्वोंषधी पिकून ॥ सुख पावती सकळ जन ॥ गाईंस होय तृण जीवन ॥ हा धर्म राजयाचा ॥१३६॥शमीक विचारी चित्तीं ॥ शाप न टळे कल्पांतीं ॥ श्रृंगी म्हणे कर्मगती ॥ न टळे निश्चिती तत्त्वतां ॥१३७॥मग गौरमुखनाम शिष्य ते वेळे ॥ शमीकें त्यास आज्ञापिलें ॥ रायासी सावध करीं वहिलें ॥ शाप न टळे कल्पांतीं ॥१३८॥मग तो गौरमुख ब्राह्मण ॥ परीक्षितीपाशीं येऊन ॥ कांहीं न देतां आशीर्वचन ॥ मौनेंकरून उगाचि ॥१३९॥मग नरेश्वरें नमून ॥ केलें गौरमुखाचें पूजन ॥ तो म्हणे राया कर्म गहन ॥ वनीं करून आलासी ॥१४०॥शमीक ऋषि पुण्यात्मा ॥ जो कमलोद्भवाची प्रतिमा ॥ तो बोलिला वचनें नृपसत्तमा ॥ तींच तुजला समर्पितों ॥१४१॥मृगयानंदें येऊनि वनीं ॥ गेलास कंठीं मृतसर्प घालूनी ॥ तें मम पुत्रें देखोनी ॥ पर्म क्षोभ पावला ॥१४२॥शापकुठारें परम तीक्ष्ण ॥ आयुष्यतरु छेदिला मूळींहून ॥ जीं ऐकतां वचनें अवर्षण ॥ होय सर्व सुखाचें ॥१४३॥सप्त दिवस होतां पूर्ण ॥ तक्षक दंश करील येऊन ॥ तत्काळ जाशी भस्म होऊन ॥ मरीचिनंदनसदना प्रती ॥१४४॥शक्र शिव कमलासन ॥ अन्यथा न करी त्याचें वचन ॥ सावध होईं येथून ॥ करीं यत्न बहुसाल ॥१४५॥तक्षकविषहरणार्थ ॥ उपाय करीं अत्यद्भुत ॥ ऊठ पळें पळें मृत्यु सत्य ॥ जवळ आला येथूनी ॥१४६॥गौरमुख हें सांगोन ॥ निघतां नृपें धरिलें चरण ॥ म्हणे सांग शमीका जाऊन ॥ मी अन्यायी सर्वखें ॥१४७॥माझा अपराध प्रचंड ॥ त्याहून करा विशेष दंड ॥ दुष्कृतकर्म गहन प्रचंड ॥ न सुटे भोगिल्यावीण पैं ॥१४८॥शमीकचरणीं माझें भाळ ॥ सांग ठेविलें मीं सहस्त्र वेळ ॥ परत्रीं तरी दोषमूळ ॥ मज झगटूं नेदीं तूं ॥१४९॥असो बोळवून गौर मुखा ॥ पाचारी अमात्य प्रजा सकळिका ॥ जाहलें कर्म तें सर्व देखा ॥ श्रुत केलें समस्तां ॥१५०॥टाकावया श्वासोच्छास ॥ यावरी नाहीं अवकाश ॥ कोणे तीर्थीं करूं वास ॥ कोण सत्पुरुष भेटेल ॥१५१॥कोठें देव होईल प्रकट ॥ नाशील हें एवढें अरिष्ट ॥ करील स्वरूप साक्षात्कार स्पष्ट ॥ ऐसा श्रेष्ठ गुरु कोठें ॥१५२॥तक्षकविष उतरी ॥ ऐसा कोठें धन्वंतरी ॥ स्त्रानें अज्ञान जाय दूरी ॥ ऐसें तीर्थ कोठें असे ॥१५३॥वारी मृत्युभय नेटें ॥ ऐसा सोयरा आहे कोठें ॥ हे राज्यविलास मोठे ॥ मज कासया सांग पां ॥१५४॥हडबडून राव उठिला ॥ म्हणे तक्षक आला रे आला ॥ मज संतचरणीं घाला ॥ तों तेथें प्रकटला नारद ॥१५५॥नृपें नारदाचे चरण धरिले ॥ म्हणे गुरुवर्या आयुष्य सरलें ॥ सातां दिवसां मरण आलें ॥ सार्थक केलें जाय कैसें ॥१५६॥व्यास वाल्मीकि महापुरुष ॥ ध्रुव प्रर्हाद ज्याचे शिष्य ॥ तो नारद बोलिला सारांश ॥ गोष्टी ऐकें नृपश्रेष्ठा ॥१५७॥व्यासपुत्र शुक जाण ॥ जो योगियांमाजी चूडारत्न ॥ त्याच्या मुखेंकरून ॥ श्रीभागवत श्रवण करीं ॥१५८॥ऐक नृपते सावधान ॥ पूर्वीं राजा खद्वांग जाण ॥ तेणें तीन मुहूर्तीं सार्थक करून ॥ हरिपद पूर्ण पावला ॥१५९॥सात दिवसपर्यंत ॥ तुज अवकाश आहे निश्चित ॥ उपाय हाचि यथार्थ ॥ भागवत परिसें कां ॥१६०॥नारद गेला सांगोन ॥ रायें केलें शुकाचें स्मरण ॥ तत्काळ उभा ठाकला येऊन ॥ देदीप्यमान दयाळू ॥१६१॥षोडश वर्षी विराजित ॥ ज्याच्या तेजासी उणा आदित्य ॥ ज्याचे स्वरूपावरून मन्मथ ॥ ओंवाळून टाकावा ॥१६२॥सुधापान करिती निर्जर ॥ त्याहून शुकाचें शरीर सुंदर ॥ सुहास्यवदन आकर्ण नेत्र ॥ जटाभार मस्तकीं ॥१६३॥विभूति चर्चूनि सुंदर ॥ विराजे गौरवर्ण कलेवर ॥ द्दढ कौपीन पंचशर ॥ जेणें तोडरीं घातला ॥१६४॥मोह भ्रम क्रोध काम ॥ जेणें जाळोनि केलें भस्म ॥ रंभेनें छळिलें होऊन सकाम ॥ न चळे मन तत्त्वतां ॥१६५॥तो प्रकटला महाराज शुक ॥ कक्षेस भागवतपुस्तक ॥ देखोनि परीक्षिती नृपनायक ॥ भाल ठेवी शुकचरणीं ॥१६६॥स्वामी शुका व्यासनंदना ॥ तोडीं वेगें संसारबंधना ॥ पुढती मिठी घालोनि चरणा ॥ प्रेमभरें स्फुंदत ॥१६७॥मग बोले व्यससुत ॥ सर्पभयें तूं अतिव्याप्त ॥ क्षणक्षणां दचकसी यथार्थ ॥ सर्प सर्प म्हणवूनी ॥१६८॥तुझें मन नाहीं स्थिर ॥ कैसा होसी श्रवणीं सादर ॥ मग परीक्षिति राजेंद्र ॥ स्थल पाहे श्रवणातें ॥१६९॥गगनचुंबित लोहस्तंभ ॥ त्यावरी द्दढ गृह निर्मिलें स्वयंभ ॥ त्यांत बैसविला राव सुप्रभ ॥ जेवीं मित्र उदयाचलीं ॥१७०॥ह्रदयीं रक्षिजे जैसा प्राण ॥ कृपण जतन करी जैसें धन ॥ तैसें रक्षिलें मन ॥ हरिचरणीं आवडीं ॥१७१॥स्तंभाभोंवत्या निर्धारीं ॥ बैसल्या ऋषी श्वरांच्या हारी ॥ जैसे मान ससरोवरीं ॥ राजहंस विराजती ॥१७२॥नाना यंत्र मंत्र मणी ॥ स्तंभीं बांधिती आणूनी ॥ सुपर्णसूक्तेकरूनी ॥ द्विज जप करिताती ॥१७३॥नाना अनुष्ठानें पुरश्चरण ॥ महामंत्र जपती ब्राह्मण ॥ सेना सन्निध करून ॥ प्रधान रक्षिती भोंवतीं ॥१७४॥त्या गृहामाजी शुक परीक्षिती ॥ बैसले जैसे शक्र वाचस्पती ॥ शुक म्हणे धरणीपती ॥ न करीं खंती भवभयाची ॥१७५॥अठरा सहस्त्र दिव्यग्रंथ ॥ विष्णुलीला श्रीभागवत ॥ शुकमुखें श्रवण करीत ॥ नृपनाथ परीक्षिती ॥१७६॥राजेंद्र बैसतां श्रवणीं ॥ प्रधानासी बोला वूनी ॥ म्हणे धन्वंतरी शोधूनी ॥ अवनीवरी काढावा ॥१७७॥वाराणसी विश्वनाथनगरी ॥ तेथें असे महा ध्वंतरी ॥ द्रव्य मागेल तें घरीं ॥ देऊनि येथें आणावा ॥१७८॥यावरी द्वादशस्कंध भागवत ॥ सत्यवतीसुतसुत सांगत ॥ सप्रेम राजा ऐकत ॥ भवभय समस्त विसरला ॥१७९॥तक्षकभयें अत्य़ंत ॥ गोष्ट प्रकटली देशांत ॥ सकल राजे सुह्र्द आप्त ॥ येते जाहले पहावया ॥१८०॥परस्परें ऐकतां समाचार ॥ धन्वंतरी कश्यपनामा विप्र ॥ तो गजपुरास येतां सत्वर ॥ तक्षक मार्गीं भेटला ॥१८१॥विप्ररूप धरूनी ॥ तक्षक पुसे त्यालागूनी ॥ बहुत त्वरें धांवसी वनीं ॥ कोठें जातोस सांग पां ॥१८२॥तो म्हणे परीक्षिति महाराज ॥ पांडवकुलीं विजयध्वज ॥ त्यास तक्षक दंश करितां सहज ॥ मी उतरीन क्षणार्धें ॥१८३॥तक्षक म्हणे कश्यपासी ॥ मीच ग्रासूं जातों नृपासी ॥ तुझी मंत्रविद्या कैसी ॥ दाखवीं आतां तत्वतां ॥१८४॥तेथें एक सरोवर भरला ॥ तीरीं न्यग्रोधवृक्ष वाढला ॥ वरी एक द्विज चढला ॥ पत्रें तोडी वृक्षाचीं ॥१८५॥तक्षक धांवें क्रोधेंकरूनी ॥ वृक्ष दंशिला निजदशनीं ॥ तत्काळ कोळसे होऊनी ॥ विप्रासहित दग्ध जाहला ॥१८६॥कश्यपें तैसेंच ते क्षणीं ॥ सरोवरींचें उदक मंत्रूनी ॥ शिंपितांचि टवटवोनी ॥ वट मागुती विस्तारला ॥१८७॥विप्र तैसाच पत्रें तोडीत ॥ मग त्यास तक्षक म्हणत ॥ धन्य तुझा सद्नुरु समर्थ ॥ ऐसा मंत्र दीधला ॥१८८॥तूं जातोस उतरावयासी ॥ शृंगीचें वचन ॥ असत्य करिसी ॥ माझ्या प्रतापा उणें आणिसी ॥ जाय वेगेंसीं माघारा ॥१८९॥तो म्हणे नृप देईल धन ॥ मी पीडिलों दारिद्येंकरून ॥ तक्षक म्हणे त्याचे शतगुण ॥ द्रव्य देईन तुजलागीं ॥१९०॥भूमींतील विवर उघडिलें ॥ तक्षकें अपार द्रव्य काढिलें ॥ सेवकांचे मस्तकीं दिधलें ॥ पठविलें गृहा त्याच्या ॥१९१॥असो कश्यप मागें परतविला ॥ लांच देऊन न येसा केला ॥ तक्षक तेथून निघाला ॥ गुप्त आला गजपुरासी ॥१९२॥तों सप्तम दिवसाचे आंत ॥ संपत आलें श्रीभागवत ॥ सप्रेम परीक्षिति ऐकत ॥ क्षालन होत महात्पापां ॥१९३॥जप तप विप्र करीत ॥ देखोनियां तक्षक हांसत ॥ ऋषिवचन असत्य ॥ याचेनि केवीं होय पां ॥१९४॥तक्षकें पाठविले ब्राह्मण ॥ कापटयवेषी विखार पूर्ण ॥ अस्ता जातां सूर्यनारायण ॥ वेळ साधून चालिले ॥१९५॥पुष्पें फळें घेऊन ॥ चालिले राजदर्शना ब्राह्मण ॥ विशालरूप आच्छादून ॥ तक्षक सूक्ष्म जाहला ॥१९६॥सान कीटक होऊन ॥ फलगर्भींरिघाला दुर्जन ॥ घ्यावया नृपाचा प्राण ॥ जात लपोन दुरात्मा ॥१९७॥कक्षेस घेऊन पाश ॥ मैंद जैसे आले यात्रेस ॥ तैसे विप्रवेषें वेदघोष ॥ करीत सर्प चालिले ॥१९८॥नृपास जाणविती प्रधान ॥ तपोवनाहूनि आले ब्राह्मण ॥ येऊं द्या म्हणे उत्तरानंदन ॥ द्विज जीवन आमुचें ॥१९९॥रायें ब्राह्मण नमस्कारिले ॥ इतुक्यांत श्रीभागवत संपलें ॥ नृपें शुकास पूजिलें ॥ अंतर्धान पावला तो ॥२००॥सुवासिक पक्क फलें विविध ॥ विप्र रायास देती प्रसाद ॥ नृपें सकलांस देऊन शुद्ध ॥ आपुला भाग घेतला ॥२०१॥पूर्वकर्माचें गहन बल ॥ ज्यामाजी होता तक्षक खल ॥ तें राजविभागा आलें फल ॥ अंतकालसमयासी ॥२०२॥सकल विप्र पूजिले तये क्षणीं ॥ द्विज प्रार्थिती प्रीतीकरूनी ॥ राया हें फल घेऊनी ॥ मुखामाजी ॥ घालीं कां ॥२०३॥रायें फल उकलिलें ते वेळीं ॥ तों आंतून निघाली आरक्त अळी ॥ परीक्षितीनें सकळांस दाविली ॥ म्हणे वेळ टळली मरणाची ॥२०४॥अळी निघाली ये वेळे ॥ इतुकेन आमुचें मरण टळलें ॥ आळीस सहज ग्रीवेवरी ठेविलें ॥ तों तक्षकें धरिलें विशाल रूप ॥२०५॥आरक्तवर्ण फणिमंड्ळ ॥ धुधुःकारासरिसे भडकले ज्वाळ ॥ भयानक रसना विशाळ ॥ कडकडून दंश केला ॥२०६॥मुखींच्या ज्वाला गगनीं जाती ॥ ग्रीवास्थालीं वेष्टिला नृपती ॥ सेवक आणि द्विज पळती ॥ उडया टाकूनि चहूंकडे ॥२०७॥त्या लोकगृहासमवेत ॥ राजा भस्म जाहला तेथ ॥ गजपुरीं एकचि आकान्त ॥ नोळखती कोणा कोणी ॥२०८॥लोक पळती ग्राम सोदून ॥ प्रळय वर्तला दारुण ॥ गुणिया लांच देऊन ॥ परतविला चांडाळें ॥२०९॥वटवृक्षीं होता जो ब्राह्मण ॥ तेणें हें सांगितलें वर्तमान ॥ ब्रह्मशाप परम दारुण ॥ घेतला प्राण परीक्षितीचा ॥२१०॥योग्ययोग्य असो ब्राह्मण ॥ परी सहसा न करावें छळण ॥ घडे तरी पूजावा प्रीतींकरून ॥ न घडे तरी न निंदिजे ॥२११॥ब्रह्मशाप दुर्धर देख ॥ परिक्षिती पावला ॥ विष्णुलोक ॥ मग ऋषि अमात्य सकळिक ॥ जनमेजया स्थापिती तूतें ॥२१२॥ऐसें हें पूर्वकथन ॥ प्रधानीं सांगितलें संपूर्ण ॥ राजा नेत्रांसी वस्त्र लावून ॥ करी रोदन पितयालागीं ॥२१३॥सभा जाहली सद्नदित ॥ प्रजेस गहिंवर न धरवत ॥ नेत्रीं अश्रुधारा स्फुंदत ॥ काय बोलत ते वेळां ॥२१४॥व्यर्थ गेला पुत्रधर्म माझा ॥ अहा परीक्षिती कुरुकुलध्वजा ॥ चांडाळें तक्षकें प्राण तुझा ॥ एकाएकीं घेतला ॥२१५॥सात दिवस उपोषण ॥ करूं दिल्हें नाहीं उदकपान ॥ अवचितां घेतला प्राण ॥ महादुर्जनें तक्षकें ॥२१६॥मध्येंच लांच देऊनि प्रबळ ॥ गुणिया परतविला तत्काळ ॥ परम पाणी दुष्ट खळ ॥ करीन निर्मूल कुल त्याचें ॥२१७॥ह्र्दय हस्तें पिटून ॥ म्हणे देहत्याग करीन ॥ किंवा तक्ष काचा प्राण ॥ घेईन आतां निर्धारें ॥२१८॥सूड घेईन पितयाचा ॥ निर्वंश करीन तक्षकाचा ॥ समुदाय मेळ विला ऋषींचा ॥ सर्पसत्र आरंभिलें ॥२१९॥सर्प संहारावे समस्त ॥ उत्तंक ऋषीचें मनोगत ॥ ते गोष्टीस साह्य त्वरित ॥ रुरु जाहला तेधवां ॥२२०॥राव श्वासोच्छवास टाकीत ॥ दशन बिंबाधरीं रोंवीत ॥ क्रोध नाटोपे हस्त चुरीत ॥ नयन आरक्त जाहले ॥२२१॥कुशल जाणते मंत्र तीक्ष्ण ॥ ते अविलंबें आण विले ब्राह्मण ॥ जे मंत्रोच्चार करितां पूर्ण ॥ सर्पांच्या थाटी भस्म होती ॥२२२॥गरुडास्त्रमंत्रो पासक ॥ तीच गारुडी विद्या सम्यक ॥ कोटींच्या कोटी अही सकळिक ॥ भस्मकर्ते क्षणार्धें ॥२२३॥विप्र म्हणती भूभुजनायका ॥ पितृभक्त होसी निका ॥ सर्प भस्म करितां देखा ॥ त्रिभुवनीं कीर्ति गाजेल ॥२२४॥राव लागे विप्रचरणीं ॥ आतां करून दाखवा करणी ॥ तक्षका आठवतां माझे मनीं ॥ प्राण व्याकुळ होताती ॥२२५॥अवश्य म्हणूनियां भूसुर ॥ सामुग्री सिद्ध केली समग्र ॥ गौड मल्याळ देश आंध्र ॥ तेथींचे विप्र पातले ॥२२६॥ज्यांचिया विद्यासामर्थें ॥ आवाहन करितां मंत्र दैवतें ॥ उभीं ठाकती येऊनि तेथें ॥ यज्ञकुंडाजवळी पैं ॥२२७॥सकल तीर्थी राहाणार द्विज ॥ सप्तपुर्यांमाजील सतेज ॥ सर्पसत्रीं महाराज ॥ नृपें आदरें आणिले ॥२२८॥अथर्वणवेदींचे ब्राह्मण ॥ कृष्णवस्त्रें परिधान ॥ कृष्णांबरेंच प्रावरण ॥ आरक्त नयन होमधूम्रें ॥२२९॥ज्यांचा पेटला क्रोधाग्न ॥ ब्रह्मांड जाळितील न लगतां क्षण ॥ क्षणें इंद्रपद हिरोन ॥ रंकासही देतील ॥२३०॥कुंड वेदिका मंडप सत्वर ॥ करिती चतुर सूत्राधार ॥ हवनसामग्री समग्र ॥ सिद्धू करून ठेविली ॥३३१॥अतींद्रियद्र्ष्टे ब्राह्मण ॥ ज्यांस भूतभविष्यज्ञान ॥ म्हणती सिद्धी न पावे यज्ञ ॥ होईल खंडन शेवटीं ॥३३२॥आग्रह करील एक ब्राह्मण ॥ पूर्णाहुति होऊं नेदी पूर्ण ॥ जनमेजय क्रोधायमान ॥ भरीं भरला नाटोपे ॥३३३॥शौनकादिक श्रोतेजन ॥ सूताप्रती करिती प्रश्न ॥ मख खंडील जो ब्राह्मण ॥ त्याचें कथन सांगें पां ॥३३४॥सूत म्हणे तो आस्तिक ॥ परम तपस्वी दुसरा अर्क ॥ सर्पकुलांचा रक्षक ॥ कथानक ऐका त्याचें ॥३३५॥परम तपस्वी जरत्कार ॥ हिंडत असतां वनांतर ॥ कूपगर्तेंत आपुले पितर ॥ अधोवदन देखत ॥३३६॥त्यांसी पुसे तुम्ही कोण ॥ तंव ते करिते जाहले रोदन ॥ आम्ही तुझे पितृगण ॥ वंशखंडण केलें तुवां ॥३३७॥तूं स्त्री करून आधीं ॥ करीं वंशवल्लीची वृद्धी ॥ तेणें आम्हां ब्रह्मपदीं ॥ ठाव देईल अब्जज ॥३३८॥जरत्करू म्हणे ते क्षणीं ॥ माझिया नामाची मिळेल तरुणी ॥ तरीच गृहस्थाश्रमीं वर्तूनी ॥ वंशवृद्धि करीन ॥३३९॥करीत पृथ्वीपर्यट्न ॥ ठायीं ठायीं बोले गर्जून ॥ माझ्या नामाची स्त्री आणून ॥ भिक्षेलागीं द्या कोणी ॥२४०॥मी वृद्ध शक्तिक्षीण ॥ माझ्यानें न देववे अशन वसन ॥ आज्ञा भंगितां टाकून ॥ जाईन तिजला क्षणार्धें ॥२४१॥ऐसें ऐकतां वचन ॥ हांसती देशोदेशींचे जन ॥ कोणी न देत प्रतिवचन ॥ तामसी ब्राह्मण देखोनियां ॥२४२॥स्वर्ग मृत्यु अष्टलोकपाल ॥ जरत्करें शोधिले सकल ॥ मग गर्तेपाशीं येऊन तत्काळ ॥ गर्जोन सांगे पितरांतें ॥२४३॥ तुमचे गांठीं पुण्य असेल ॥ तरी संकल्प हा होईल सफल ॥ कन्यादान कोणी करील ॥ मन्नामक वधूचें ॥२४४॥ पातालास गेला ब्राह्मण ॥ हांक फोडी आक्रोशे करून ॥ ते नय्नद्वारें करिती श्रवण ॥ चक्षुःश्रवे सर्वही ॥२४५॥ बाह्यणाचें वृत्त सकळिक ॥ वासुकीस सांगती दंदशूक ॥ भविष्य जाणोनि अहिनायक ॥ अनुजा आपुली जरत्करी ॥२४६॥तेथें आणिली श्रृंगारुनी ॥ म्हणे हे माझी कनिष्ठ भगिनी ॥ दुसरी इंदिरा लावण्याखाणी ॥ धर्मपत्नी कराहो ॥२४७॥जरत्कारू म्हणे तत्त्वतां ॥ तुम्हां समर्थांची हे दुहिता ॥ स्वरूप श्रृंगार पाहातां ॥ उर्वशी रंभा दासी ॥ पैं ॥२४८॥नम्र असावें मृदु वचन ॥ बोलोन हरावें माझें मन ॥ आज्ञा भंगितां जाईन टाकून ॥ अनुमान कांहीं न करितां ॥२४९॥हे जातीची पद्मीण शुद्ध ॥ सुवासें वेधले मिलिंद ॥ इचें पाहतां वदनारविंद ॥ मीनकेतन भुले पैं ॥२५०॥महेरीचें बल दावून ॥ भ्रतारास मानिती जैसें तृण ॥ कीं वनींचें मर्कट जाण ॥ धरून आणूनि नाचविती ॥२५१॥वासुकी म्हणे ऋषीलागूनी ॥ तैसी नव्हे माझी भगिनी ॥ रूपवती चातुर्यखाणी ॥ पतिभजनीं सादर ॥२५२॥चीरभूषणें सर्व संपदा ॥ तीस मी पुरवीन सर्वदा ॥ होऊं नेदीं कांहीं आपदा ॥ अंगिकारा स्वामी ही ॥२५३॥मग यथासांग लाविलें लग्न ॥ चार दिवस संपादून ॥ जरत्कारीस संगें घेऊन ॥ आश्रमा आला आपुलिया ॥२५४॥सर्प सेवा करिती अनुदिन ॥ बांधोन दिधलें सुवर्णसदन ॥ सकल संपत्ति आणून ॥ राजभोग समर्पिती ॥२५५॥नित्यनैमित्तिक कर्में समस्त ॥ अन्नसत्र नित्य चालवीत ॥ अतिथिपूजनें दानें देत ॥ पतीचें अनुमत जाणूनी ॥२५६॥ऐसा काल क्रमीत बहुत ॥ जरत्करीस गर्भ राहात ॥ जैसा सूर्य दीप्तिमंत ॥ तैसा उदरांत पुत्र वसे ॥२५७॥गर्भ राहिला उदरीं ॥ हें नेणेचि जरत्कारी ॥ तों कोणे एके अवसरीं ॥ नित्यकर्म सारूनियां ॥२५८॥निद्रेनें व्यापिला जरत्कार ॥ तिचे मांडीवरी ठेवी शिर ॥ निद्रिस्थ जाहाला ऋषीश्वर ॥ तों दिनकर मावळला ॥२५९॥मनीं विचारी ऋषिललना ॥ आदित्य जातो अस्तमाना ॥ संध्याहोमकाल जाणा ॥ टळतां ऋषि कोपेल ॥२६०॥जागें करितां कोपेल तत्क्षणीं ॥ न करितां सत्कर्मा होईल हानी ॥ मनीं विचारी नागभगिनी ॥ दोष सामान्य थोर कोण ॥२६१॥निद्रा घेइजेल रजनींत ॥ परी सत्कर्म भंगें प्रायश्चित ॥ मग चरण चुरीत बोलत ॥ गेला आदित्य अस्तमाना ॥२६२॥म्हणे होम देऊन ये क्षणीं ॥ मग पहुडावें सुखशयनीं ॥ ऐसें ऐकतां क्रोधेंकरूनी ॥ जरत्करू ऊठिला ॥२६३॥तुझे अंकीं पडतां भार ॥ कष्टी जाहलीस तूं सुकुमार ॥ वृद्ध देखोन भ्रतार ॥ हेलना गर्वें करिसी तूं ॥२६४॥माझी आज्ञा न होतां पूर्ण ॥ सूर्य केवीं पावेल अस्तमान ॥ मी न देतां अर्घ्यदान ॥ अग्निसेवन यथाविधी ॥२६५॥क्षण एक धरून धीर ॥ पहावा होता चमत्कार ॥ कैसा मावळता दिनकर ॥ जरत्कारु न ऊठतां ॥२६६॥मी वृद्ध देखतां नयनीं ॥ हेलना करिसी तूं सर्पिणी ॥ आतां नांदें बंधुसदनीं ॥ नष्टकर्में यथार्थ ॥२६७॥जरत्कारु चालिला उठोनी ॥ पाठीं धांवे नागभगिनी ॥ द्दढ धरिले पाय दोन्ही ॥ अश्रु नयनीं वाहती ॥२६८॥म्हणे आग्रह करिसी पापिणी ॥ तरी भस्म करीन शापूनी ॥ थरथरां कांपे कामिनी ॥ भयेंकरूनि न बोले ॥२६९॥सर्प ठायीं ठायीं दडती ॥ भयें समोर कोणी न येती ॥ भगिनीचे चरण धरिती ॥ शांतवीं पति आपुला ॥२७०॥त्वरें जात जरत्कार ॥ पाठीं धांवे सुकुमार ॥ म्हणे महाराज तुम्ही सत्त्वसमुद्र ॥ माझा त्याग न करावा ॥२७१॥सुकुमार ते कामिनी ॥ अडखळोन पडे धरणीं ॥ पद्मीण ते पद्मलोचनी ॥ बाहू उभारोनि हांक देत ॥२७२॥सांडूनियाम ललना ॥ न जावें हो तपोधना ॥ मज वधून याच क्षणा ॥ ऋषिवर्या जाइंजे ॥२७३॥तुमचे सुकुमार चरण ॥ मी आपुले केशीं झाडीन ॥ एवढा अन्याय क्षमा करून ॥ पोटीं घालीं ऋषिवर्या ॥२७४॥कांहीं मी कापटय नेणें ॥ बोलिल्यें आज भोळेपणें ॥ सर्वज्ञें विचारून पाहाणें ॥ क्षमा करणें अन्याय हा ॥२७५॥मागें पाहे जरत्कार ॥ तों पाठीसीं धांवे सुकुमार ॥ ह्रदयीं दाटला गहिंवर ॥ सजल नेत्र जाहले ॥२७६॥जवळ येतां जरत्कारी ॥ म्हणे तूं जाईं माघारी ॥ येरी म्हणे ते अवसरीं ॥ वचन ऐका महाराज ॥२७७॥पुत्रफल नाहीं पूर्ण ॥ कैसे उद्धरतील पितृगण ॥ माझे बंधु सर्प जाण ॥ निराशा त्यांची जाहली ॥२७८॥आज्ञा भांगिली म्हणून ॥ कद्रूनें शापिले संपूर्ण ॥ म्हणे सकुल भस्म होऊन ॥ जा रे तुम्ही दुर्जन हो ॥२७९॥जनमेजयाचे सत्रीं परम ॥ अवघे उरग होतील भस्म ॥ त्यांत किंचित्स्वस्तिक्षेत ॥ राहावे नेम एक असे ॥२८०॥माझे जठरसत्पात्रीं जाण ॥ स्वामी तूं करिशील वीर्यदान ॥ तो पुत्र होतां निर्माण ॥ सर्पकुलें रक्षील ॥२८१॥ऐसें बोलतां जरत्कारी ॥ ऋषि म्हणे तूं अवधारीं ॥ तुझें गर्भशुक्तिकेमाझारीं ॥ मुक्ताफल पुत्र आहे ॥२८२॥नास्तिक नाहीं आस्तिक ॥ पुत्र होईल जैसा अर्क ॥ जेवीं वसिष्ठ वामदेव शुक ॥ चौथा देख तैसा हा ॥२८३॥ऐसें जरत्कारू बोलिला ॥ तत्काल तेथें गुप्त जाहला ॥ विकल पडली नागबाला ॥ पतिवियोगेंकरूनियां ॥२८४॥साबध करून विखारीं ॥ घरा नेली जरत्कारी ॥ वासुकी म्हणे सुंदरी ॥ आम्हांस अभय देईं कां ॥२८५॥येरी म्हणे तुमचा रक्षक ॥ गर्भांत आहे सत्य आस्तिक ॥ आनंदले सर्प सकळिक ॥ गुढिया तोरणें उभविती ॥२८६॥अभ्रें आच्छादिलें अर्कस्वरूप ॥ कीं काश्मीरसनदनींचा जैसा दीप ॥ नवमास भरतां पुण्यरूप ॥ आस्तिक जन्म पावला ॥२८७॥जैसा विधूम पावक ॥ तैसा जन्मला मुनि आस्तिक ॥ आनंदले सर्प सकळिक ॥ गगनीं हर्ष न मावे ॥२८८॥नागिणी नाग सकळिक ॥ प्राणाऐसें रक्षिती बालक ॥ कृत्तिकाप्रथमचरणीं देख ॥ मुनि आस्तिक जन्मला ॥२८९॥जातकर्मादि उपनयन ॥ वासुकी करी स्वयें आपण ॥ च्यवनभार्गवा पासून ॥ विद्या प्राप्त तयासी ॥२९०॥संहिता ब्राह्मण अरण ॥ छंद निघंट शिक्षा जाण ॥ ज्योतिष सूत्र व्याकरण ॥ निरूक्त दशग्रंथ पढियेला ॥२९१॥बोलका जैसा अंगिरासुर ॥ तेजस्वी जैसा आदित्य ॥ तपस्वी जैसा भासत ॥ व्योमकेश दुसरा जो ॥२९२॥शीतल जैसा शीतकर ॥ मेघा हून अति उदार ॥ ब्रह्मांड मोडून रचणार ॥ दुसरें पुढती सामर्थें ॥२९३॥पुढें अनुसंधान पाहीं ॥ हस्तिनापुरीं ऋषि सर्वही ॥ मिळाले जन मेजयाचे गृहीं ॥ सर्पसत्र आरंभिलें ॥२९४॥सिंहावलोकनेंकरून ॥ पहा मागील अनुसंधान ॥ जे पांडित भक्त विचक्षण ॥ निर्मत्सर मन ज्यांचें ॥२९५॥आदिपर्व सुधारस ॥ सज्जन श्रोते हे त्रिदश ॥ पान करोत अति सुरस ॥ ब्रह्मानंदेंकरोनियां ॥२९६॥ब्रह्मानंद महाराज पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ वंदूनि ते उभयतां ॥ परम आल्हाद पावलों ॥२९७॥या उभयतांचें नाम सार ॥ श्रीधर जपे हा मंत्र ॥ श्रीपांडुरंग रुक्मिणीवर ॥ तेणेंकरून तोषला ॥२९८॥श्रीधर नाम आपुलें ॥ अभंगीं तेणें घातलें ॥ त्याचें चरित्र वहिलें ॥ तेणेंचि कथिलें ऐका तें ॥२९९॥सुरम पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ द्वितीयाध्यायीं कथियेला ॥३००॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्रीधरकृत ॥ परीक्षितिनिधन सत्ररंभाद्भुत ॥ आस्तिकजन्मकथन केलें ॥३०१॥इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि द्वितीयाध्यायः ॥ श्रीकृष्पार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP