मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३५ वा

पांडवप्रताप - अध्याय ३५ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ जनमेजय म्हणे वैशंपायना ॥ सुरस वक्ता तूं शास्त्रसंपन्ना ॥ तुझ्या वचनामृतें आमुच्या श्रवणां ॥ तृप्ति जाहली न वाटे ॥१॥
गायी घेऊनि सुयोधन ॥ गेला गजपुरपंथ लक्षून ॥ परी कैसा धांवला अर्जुन ॥ बोलें तेंचि स्त्रेहाळा ॥२॥
यावरी बोले व्यासशिष्य ॥ राया तेंचि ऐकें सुरस ॥ जातां देखोनि दुर्योंधनास ॥ पार्थ संतप्त जाहला ॥३॥
घडघडिला विजयरथ ॥ चापीं बाण लावीत पार्थ ॥ ध्वजीं बैसला हनुमंत ॥ भुभुःकार करीतसे ॥४॥
भूतें आवेशें हांका देत ॥ त्यांत वाजविला देवदत्त ॥ द्रोण म्हणे आला पार्थ ॥ तों दोन शर सोडिले ॥५॥
गुरुचरणापुढें जाण ॥ अकस्मात पडिले दोन बाण ॥ द्रोणें पाहिला अर्जुन ॥ कर जोडून नमीतसे ॥६॥
दोन शार सोडूनि तये क्षणीं ॥ भेदिले कर्णाचिये कर्णीं ॥ कीं ते दूतचि येऊनी ॥ सावधान म्हणती कर्णा ॥७॥
उत्तरासी म्हणे अर्जुन ॥ महातस्कर दुर्योधन ॥ जातो गोधन घेऊन ॥ धांवडीं स्यंदन तिकडेचि ॥८॥
सर्व पृतना उजवी घालून ॥ बाणा ऐसा धांवे अर्जुन ॥ मग बोले गुरु द्रोण ॥ केवीं सुयोधन वांचेल ॥९॥
भीष्म द्रोण आणि कर्ण ॥ कृपाचार्य गुरुनंदन ॥ शतकौरव दुःशासन ॥ सेना घेऊन धांवती ॥१०॥
दुर्योधनासी वेष्टिलें ॥ तों पार्थें शरजाल सोडिलें ॥ असंख्य वीर भेदिले ॥ थोर मांडलें निर्वाण ॥११॥
शलभ येतां बहुत ॥ वृक्ष जैसा आच्छादत ॥ तैसे सपक्ष दिसत ॥ बाण अंगीं सर्वांच्या ॥१२॥
श्रावणारि तनयदूत ॥ वारंवार गर्जना करीत ॥ कौरवांचीं वाद्यें समस्त ॥ एक्सरें वाजती ॥१३॥
घोष जाहला तुंबळ ॥ तों गायी परतल्या सकळ ॥ विराटनगरा तत्काल ॥ पुच्छें उचलून पळाल्या ॥१४॥
वत्सें आठवूनि मनीं ॥ धांवती ऊर्ध्व पुच्छें करूनी ॥ कीं अर्जुन यशस्वी म्हणोनी ॥ पुच्छगुढया उभारिल्या ॥१५॥
इकडे कौरव वीर समस्त ॥ एकला देखोनि वीर पार्थ ॥ बाण असंख्य सोडीत ॥ तो ते तोडीत तितुकेही ॥१६॥
अर्जुना समोर कर्ण ॥ धांवत वेगें जेवीं पवन ॥ किरात नामें चित्रसेन ॥ कर्णबंधु म्हणवीत ॥१७॥
तो कर्णापुढें धांवत ॥ टाकी अर्जुनावरी ॥ बाणशत ॥ तों धांवला वीर कर्ण त्वरित ॥ कैवर्तक कर्णबंधु ॥१८॥
तेणें शर सोडिले बहुत ॥ महाराज तो कृष्ण रणपंडित ॥ त्यावरी हे पाखंडी बहु उठत ॥ शारजालमतें घेऊनि ॥१९॥
परी पार्थचापमुखांतून ॥ सुटती अद्भुत शब्दबाण ॥ टाकिती शरवाग्जाल तोडून ॥ क्षणमात्र लागतां ॥२०॥
विकर्ण आणि चित्रसेन ॥ पार्थें पाडिले प्रेतें करून ॥ दोन बाणीं दोघे जण ॥ अर्कजसदना पाठविले ॥२१॥
जैसा वन जाळी दावाग्न ॥ तैसें अर्जुनें पाडिलें सैन्य ॥ पंचबाणीं भेदिला कर्ण ॥ ह्रदयवर्म लक्षूनियां ॥२२॥
सर्व सेना घाय़ाळ ॥ जैसे पळस फुलले पुष्कळ ॥ तैसे आरक्त वीर सकळ ॥ बाणघातें जाहलें ॥२३॥
कर्णें अधर चावून ॥ सोडिले तेव्हां द्वादश बाण ॥ ते अर्जुनें तत्काल तोडून ॥ एकीकडे पाडिले ॥२४॥
कौतुक पाहे कौरव वाहिनी ॥ कर्णाचा रथ आच्छादिला बाणीं ॥ सर्व महारथी तये क्षणीं ॥ बाणेंकरूनि वेष्टित ॥२५॥
अर्जुनें वर्मीं भेदिले बाण ॥ विकल जाहला परम कर्ण ॥ समरींचा रथ काढून ॥ सारथी नेत एकीकडे ॥२६॥
हें देखोनि अवघे अवघे धांवले ॥ अर्जुनबाणीं सर्व खिळिले ॥ सकल रथी एकवटले ॥ ध्वजचिन्हें तळपती ॥२७॥
द्रोणा चिये ध्वजीं झळकत ॥ कंडलुप्रतिमा देखत ॥ कृपाचार्य ध्वजीं तळपत ॥ कुंडवेदिका साजिरी ॥२८॥
गुरुपुत्राचा ध्बज विशेष ॥ वरी रेखिले कनकधनुष्य ॥ दुर्योधन ध्वजीं निःशेष ॥ महाभुजंग रेखिला ॥२९॥
कर्णाचे धज्वीं गज ॥ कनकरसें रेखिला सतेज ॥ भीष्माचे पांचही ध्वज ॥ शुभ्र रजतासारिखे ॥३०॥
कोणाचे ध्वजीं चंद्रा ॥ कोठें नक्षत्रें कोठें मित्र ॥ नानारंगांचे विचित्र ॥ विद्युत्प्राय झळकती ॥३१॥
असो कपिवर ध्वज ते वेळां ॥ शारद्वतें वेगें वेढिला ॥ दश बाणीं पार्थ खिळिला ॥ ह्रदयावरी लक्षूनियां ॥३२॥
पार्थबाण तीक्ष्ण वेगीं ॥ खडतरले गौतम पुत्रांगीं ॥ घटिका चार ते पसंगीं ॥ युद्ध जाहलें तुंबळ ॥३३॥
कृपाचार्य योद्धा प्रबळ ॥ परी पार्थें केला अतिविकळ ॥ बीभत्सु म्हणे उत्तरा चपळ ॥ द्रोणाकडे रथ नेईं ॥३४॥
सर्वांसी सव्य घालून ॥ गुरूचे रथासी केली प्रदक्षिण ॥ आतां युद्ध होईल दारूण ॥ पहावया देव पातले ॥३५॥
सुदर्शन विमानीं बैसोन ॥ पाहों आला शचीरमण ॥ तेहतीस कोटी देवगण ॥ बैसोन युद्ध पाहती ॥३६॥
एकादश रुद्र द्वादश अर्क ॥ अष्टनायिका अष्टवसु मुख्य ॥ गण गंधर्व यक्षनायक ॥ आणि वैश्रवन पातला ॥३७॥
वसु रुद्रादित्यादिक ॥ अर्यमा पितृगण सकळिक ॥ स्वर्गवासी राजे सात्त्विक ॥ दिव्य शरीरें पाहती ॥३८॥
शिबिकेंत हरिश्श्चंद्र दिलीप ॥ अज आणि दशरथ भूप ॥ आणिक कित्येक राजे पुण्यरूप ॥ विलोकिती विमानीं ॥३९॥
तेथींचा दिव्य सुवास ॥ कटकांत येत आसमास ॥ असो इकडे द्रोणास ॥ नमीत पार्थ भावार्थें ॥४०॥
म्हणे धन्य आजि नयन ॥ जाहलें महाराजा तुझें दर्शन ॥ तेरा वर्षांत आजि देखिले चरण ॥ जाहलों पावन सर्वस्वें ॥४१॥
होतां श्री गुरूचें दर्शन ॥ अवदशा गेली निघोन ॥ गुरुदर्शनें करून ॥ स्वपद पावूं आपुलें ॥४२॥
अहो सद्नुरो द्रोणाचार्या ॥ तुम्हांवरूनि ओंवाळीन हे काया ॥ तरी उत्तीर्ण नव्हें गुरुवर्या ॥ उपकार तुमचे असंख्य ॥४३॥
निजपुत्राहूनि आगळा ॥ मजवरी स्नेह तुमचा दयाळा ॥ आमुच्या आळी पुरविल्या सकळा ॥ बालपणीं समर्थें ॥४४॥
गुरुनिंदा करील जो दुर्जन ॥ त्याचें तत्काल आयुष्य क्षीण ॥ तो अपयश पावे न लागतां क्षण ॥ गुरुचरण विसरे जो ॥४५॥
असो आतां जो मांडला व्यवहार ॥ तोचि संपादावा समग्र ॥ स्वामींनीं सोडावे आधीं शर ॥ मग मी सत्वर प्रेरीन ॥४६॥
एक मेरु एक मंदर ॥ एक समुद्र एक अंबर ॥ एक वासुकी एक भोगींद्रा ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥४७॥
एक वसिष्ठ एक वामदेव ॥ एक प्रेम एक सद्भाव ॥ एक सद्विवेक एक गौरव ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥४८॥
एक चंद्र एक चंडकिरण ॥ एक रमापति एक उमारमण ॥ एक बृहस्पति एक पाकशासन ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥४९॥
एक तपस्वी एक उदास ॥ एक औदार्य एक धैर्यविशेष ॥ एक पुण्य एक यश ॥ तेवीं निर्दोष दिसती पैं ॥५०॥
एक ज्ञान एक विज्ञान ॥ एक आनंद एक समाधान ॥ एक सगुण एक निर्गुण ॥ दोन्हा स्वरूपें हरीचीं ॥५१॥
एक साधक एक सिद्ध ॥ एक वैराग्य एक बोध ॥ एक क्षमा एक ब्रह्मानंद ॥ तेवीं दोघे दिसती पैं ॥५२॥
असो द्रोणें वीस बाण ॥ टाकिले पार्थावरी दारुण ॥ ते अर्जुनें निवारून ॥ पन्नास मार्गण सोडिले ॥५३॥
ते निवारूनियां द्रोण ॥ सोडिले तेणें शत बाण ॥ सहस्त्र बाण अर्जुन ॥ प्रेरीत तेव्हां द्रोणावरी ॥५४॥
यावरी लक्षांचे लक्ष शर ॥ टाकिते जाले अपार ॥ मान तुकाविती समग्र ॥ सव्य तर्जनी हालवूनि ॥५५॥
म्हणती धन्य धन्य पार्थ ॥ धन्य गुरु द्रोण समर्थ ॥ भीष्म कर्ण समस्त ॥ विलोकिती कौरव पैं ॥५६॥
द्रोणावें बाणजाल ॥ पार्थ छेदी तत्काल ॥ जैसें उगवतां सूर्यमंडल ॥ भगनें सर्व झांकती ॥५७॥
कीं एक उठतां विनायक ॥ असंख्य संहारी दंदशूक ॥ कीं सुटतां चंडवात देख ॥ जलदजाळ वितळे पैं ॥५८॥
द्रोण सोडी एक शर ॥ त्यापासूनि निघती अपार ॥ जैसा एकुलता एक पुत्र ॥ संतति वाढे बहु त्याची ॥५९॥
अंसभाव्य अर्जुनाचे बाण ॥ सुटती वेगें चापापासून ॥ जैसे चतुराचे मुखांतून ॥ शब्द अपार निघताती ॥६०॥
अर्थक्रम पदक्रमें करून ॥ पंडित करिती वेदाध्ययन ॥ तेवीं चपलत्वें अर्जुन ॥ बाण सोडी अनिवार ॥६१॥
कीं मेघींहूनि अवधारा ॥ अपार सुटती तोयधारा ॥ ओंकारापासूनि अपारा ॥ ध्वनि जैसे निघती पैं ॥६२॥
कीं मूलमायेपासोनि एकस्रें ॥ असंख्य जीवसृष्टी उभारे ॥ चपललेखकापासोनि त्वरें ॥ असंख्य अक्षरें उमटती ॥६३॥
बहुत शर भेदूनि गेले ॥ परी पार्थाचें ठाण न चळे ॥ जेवीं पंचबाणाचेनि मेळें ॥ मारुनि न चळे कल्पांतीं ॥६४॥
हाणितां कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न जाय सोडूनि स्थान ॥ कीं वर्षतां अपार घन ॥ अचल स्थान सोडीना ॥६५॥
निंदकें निंदितां अपार ॥ चळेना साधूचें अंतर ॥ प्रर्‍हादासी लाविले विखार ॥ परी तो धीर न सोडी ॥६६॥
पार्थें निर्वाण बाण सोडिला ॥ द्रोणाचे ह्रदय वर्मीं बैसला ॥ मूर्च्छना येऊनि ते वेळां ॥ ध्वजीं टेंकला ॥ आचार्य ॥६७॥
धन्य वीर अर्जुन ॥ देव करिती विमानीं स्तवन ॥ आनंदाश्रु जाण ॥ नेत्रीं लोटले शक्राचे ॥६८॥
क्षणोक्षणीं सुमन भार ॥ वर्षतसे पुरंदर ॥ इकडे गुरूचा रथ सत्वर ॥ सारथी काढी समरींचा ॥६९॥
जैसी कल्पान्तवीज कडकडी ॥ तैसा गुरुपुत्र धांवला तांतडी ॥ अर्जुनावरी बाण सोडी ॥ मिति नाहीं तयांतें ॥७०॥
अर्जुनचापाचें शित ॥ गुरुपुत्रें छेदिलें अकस्मात ॥ कौरव संतोषले समस्त ॥ म्हणती द्रोणपुत्र धन्य हा ॥७१॥
धनुष्यासी शिट नूतन ॥ लावी ते क्षणीं अर्जुन ॥ सोडूनि एक सवेग बाण ॥ गुरुसुता मूर्च्छित पाडिलें ॥७२॥
उत्तर म्हणे पार्था ॥ प्रलय मांडला मज भोंवता ॥ मज सारथ्य न करवे आतां ॥ प्राण जाईल वाटतें ॥७३॥
तुझें चाप करकरित ॥ प्रलयविजे ऐसें झळकत ॥ ध्वजीं गर्जत हनुमंत ॥ माझंने येथें न बैसवे ॥७४॥
पार्था तुजकडे माझेनी ॥ न पाहवे ये क्षणीं ॥ वाटतें कृतान्त येऊनी ॥ रथावरी बैसला ॥७५॥
पृथिव्यादि पंचभूतें ॥ भोंवताती मज वाटतें ॥ ऐशिया आवर्ती मातें ॥ घातलें तुवां कासया ॥७६॥
पार्थ म्हणे भय कांहीं ॥ धरूं नको चित्तीं पाहीं ॥ तों गुरुसुत ते समयीं ॥ सावध जाहला सवेंचि ॥७७॥
धनंजयाचे अक्षय तूणीर ॥ गुरु सुताचे सरले शर ॥ शरीर जाहलें जर्जर ॥ मग रहंवर मुरडिला ॥७८॥
तों रथ सांवरून ॥ धांवला तेव्हां सूर्यनंदन ॥ तीक्ष्ण अर्जुनाचे बाण ॥ ह्रदयीं त्याचे खडतरती ॥७९॥
पार्थ म्हणे रे कर्णा ॥ सभेमध्यें केली वल्गना ॥ बोललासी दुष्ट वचना ॥ त्याचा झाडा दे आजि ॥८०॥
हरिलीं द्रौपदीचीं वसनें ॥ तो झाडा आजि देणें ॥ ऐसें बोलूनि अर्जुनें ॥ बाण काढिला अद्भुत ॥८१॥
बाणाग्रीं दैवत सहस्त्र नयन ॥ तो शर ओढूनि आकर्ण ॥ कर्णाचे ह्रदयीं भेदोन ॥ मूर्च्छनागत पाडिला ॥८२॥
जिकडे असे गंगासुत ॥ तिकडे धांवला पार्थाचा रथ ॥ प्रथम शरें अकस्मात ॥ ध्वज छेदिला भीष्माचा ॥८३॥
चामीकरवर्ण तूणीर ॥ तो सवेंचि छेदिला सत्वर ॥ ऐसें देखतां धार्तराष्ट्र ॥ एकदांचि सरसावले ॥८४॥
दुःशासनें सोडिले तीन शर ॥ ह्रदयीं भेदिला सारथि उत्तर ॥ दोन बाणीं पार्थवीर ॥ ह्रदयावरी भेदिला ॥८५॥
पार्थें सवेंचि सोडूइ बाण ॥ चाप तूणीर टाकिले छेदून ॥ मग कपाळीं दुःशासन ॥ एक शरें भेदिला ॥८६॥
मूर्च्छें व्यापिला दुःशासन ॥ सारथियें पळविला स्यंदन ॥ तों धांवला गंगानंदन ॥ निर्वाण बाण सोडीत ॥८७॥
चार घटिका पर्यंत ॥ भीष्में युद्ध केले अद्भुत ॥ शतशरें वीर पार्थ ॥ भेदिला तेव्हां समरांगंणीं ॥८८॥
शेवटीं पार्थें सोडिला शर ॥ ह्रदयीं भेदिला गंगा कुमार ॥ तेणें गिरगिरी आली अपार ॥ विकल शरीर पडियेलें ॥८९॥
तों रथारूढ दुर्योधन ॥ वेगें धांवला वर्षत बाण ॥ ललाटीं भेदिला ॥ अर्जुन ॥ परी तो न गणीच तयाचें ॥९०॥
पाथें सोडिला एक शर ॥ छेदिलें सारथियाचें शिर ॥ सवेंचि तुरंग आणि रहंवर ॥ चूर्ण केले समरांगणीं ॥९१॥
सोडूनियां दिव्य बाण ॥ ह्रदयीं भेदिला सुयोधन ॥ मग सवेंचि कौरवीं उचलून ॥ नेला काढून समरींचा ॥९२॥
पार्थ म्हणे रे अंधपुत्रा ॥ कां रे पळतोसी अपवित्रा ॥ माघारा फिरें कृष्णवक्रा ॥ निलाजरा तूं साच ॥९३॥
असे तूं कुरुकुला लाविला डाग ॥ तुज काय होय छत्र राजभोग ॥ राजा धर्म सभाग्य ॥ सर्व वैभव तयाचें ॥९४॥
हरिलीं द्रौपदीचीं वस्त्रें ॥ तुझीं खंडविखंड करीन ॥ गात्रें ॥ दुःशासन कर्ण अपय शपात्रें ॥ पहुडवीन समरांगणीं ॥९५॥
भीष्म द्रोणादि समस्त ॥ ऐकत होते सभे आंत ॥ मृत व्याघ्रचर्म निश्चित ॥ नाम आम्हां ठेविलें ॥९६॥
कोल्हे हे अरण्यांतील ॥ नपुंसक पांडव सकल ॥ बोलिलासी तें सफल ॥ करूनि दावीं आजि आम्हां ॥९७॥
आम्ही नपुंसक किंवा रणशूर ॥ दाखवितों आतां माघारा फीर ॥ हरिलीं द्रौपदीचीं वस्त्रें समग्र ॥ त्याचें उसणें घेईन मी ॥९८॥
ऐसे अर्जुनाचे वाग्बाण ॥ ह्रदयीं खडतरले तीक्ष्ण ॥ तों कौरव पातले अवघे जण ॥ सैन्यासह पार्थावरी ॥९९॥
तों दुर्योधनबंधु विकर्ण ॥ गजारूढ धांवे वर्षत बाण ॥ पार्थें तो समोर देखोन ॥ टाकिला खिळून सर्वांगीं ॥१००॥
पार्थें क्रोधें वज्रबाणीं ॥ गज उभाचि चिरिला रणीं ॥ सकळ कौरव मार्गणीं ॥ खिळियेले प्रतापें ॥१०१॥
पार्थ म्हणे घेऊनि जय सत्य ॥ जा रे जयवाद्यें वाजवीत ॥ मग मोहनास्त्र शक्रदत्त ॥ अर्जुनें शेवटीं सोडिलें ॥१०२॥
कनकबीज भक्षितां ॥ जैसी सर्वांगीं येत विकलता ॥ तैसीच जाहली सर्वांची अवस्था ॥ शस्त्रें वस्त्रें गळालीं ॥१०३॥
उत्तरासी सांगें कृष्ण ॥ कृष्णेचें केलें वस्त्रहरण ॥ तरी तूं खालीं उतरून ॥ वस्त्रें हरीं सर्वांचीं ॥१०४॥
तिघे विप्र विप्र आणि गंगासुत ॥ यांसी न लावीं कदा हात ॥ रथातळीं उतरूनि त्वरित ॥ उत्तर शस्त्रें वस्त्रें हरीत पैं ॥१०५॥
कर्णदुर्योधनादि समस्त ॥ शतही नागविले अंधसुत ॥ शस्त्रें वस्त्रें भरिले रथ ॥ रिते समरींचे घेऊनी ॥१०६॥
कर्णाचीं वस्त्रें पिंवळीं ॥ दुर्योधनाची वस्त्रें सोनसळीं ॥ भगिनीलागीं गोळा केलीं ॥ गणती नाहीं तयांची ॥१०७॥
प्रवापनास्त्र सोडून ॥ देता जाहला श्वेतवाहन ॥ अर्धमिशा अर्धदाढया बोडून ॥ न लागतां क्षण टाकिल्या ॥१०८॥
कोणाचें अर्धमस्तक बोडिलें ॥ कोणाचे पांच पाट काढिले ॥ दुर्योधनाचा मुकुट ते वेळे ॥ वहनावरी फोडिला ॥१०९॥
काढिली वामभागदाढी ॥ सव्य भाग मिशी बोडी ॥ तिघे द्विज आणि भीष्म सोडी ॥ पार्थाज्ञेंकरोनियां ॥११०॥
ऐसें त्या अस्त्रें करून ॥ आलें पार्थापाशीं फिरोन ॥ तूणीरामाजी जाऊन ॥ स्वस्थ राहिलें नवल हें ॥१११॥
मग अर्जुनें दिव्यरथ ॥ एकीकडे काढिला त्वरित ॥ जैसें शुक्तिके बाहेरी झळकत ॥ मुक्त सतेज निराळें ॥११२॥
महाप्रलयीं सर्व निरसून ॥ एक ब्रह्म उरे निर्मळ पूर्ण ॥ तैसा शोभला अर्जुन ॥ एकला एक रथाशीं ॥११३॥
गिळूनि सर्व नक्षत्रांसी ॥ एक सूर्य निरम्र ॥ आकाशीं ॥ तैसाचि कृष्णसखा ते दिवशीं ॥ समरभूमीसी शोभला ॥११४॥
अश्चत्थामा भीष्म द्रोण ॥ त्यांप्रति बोलत अर्जुन ॥ मी एकला हे बहुत जण ॥ युद्धकंदन करिताती ॥११५॥
तरी यांसी गजपुरास नेऊन ॥ करवावें स्त्रियांचें दर्शन ॥ जयवाद्यें वाजवून ॥ ग्रामामाजी मिरवावें ॥११६॥
आजि यांसी दिधलें जीवदान ॥ तों सावध जाहला दुर्योधन ॥ म्हणे पळाला काय अर्जुन ॥ कैसा सोडून दिला तुम्हीं ॥११७॥
मग बोले अश्वत्थामा ॥ आजि अर्जुनें केली सीमा ॥ नागवूनि सर्वां तुम्हां ॥ दाढया मिशा भादरिल्या ॥११८॥
तुम्हीं संपूर्ण जय घेतला ॥ गजपुरासी मिरवत चला ॥ आजि तुमचा सोहळा ॥ ब्रह्मांडांत न समाये ॥११९॥
श्वासोच्छवास टाकून ॥ अधोमुख पाहे दुर्योधन ॥ दुरूनि विलोकी अर्जुन ॥ उभा ठाकोन मुहूर्त एक ॥१२०॥
गंगात्मज आणि तिघे विप्र ॥ त्यांसी नमस्कारी पार्थवीर ॥ म्हणे मी जातों अपार ॥ स्त्रेह आतां असों द्यावा ॥१२१॥
दुर्योधनानिमित्त साचार ॥ तुमचे चरणीं पडिलें अंतर ॥ ऐसें बोलोनि पार्थवीर ॥ रथ मुरडूनि चालिला ॥१२२॥
देखोनि कौरवांची गती ॥ विमानीं सुर आणि सुरपती ॥ गदगदां सर्व हांसती ॥ म्हणती फजिती थोर हे ॥१२३॥
खेद करीत दुर्योधन ॥ गेला गजपुरा निघोन ॥ शमीपाशीं अर्जुन ॥ आला तेव्हां त्वरेनें ॥१२४॥
कौरवांचे लोक पाहीं ॥ लपाले होते ठायीं ठायीं ॥ पार्थ देखोनि भयें सर्वही ॥ शरणागत जाहले ॥१२५॥
महाराजा आम्ही तुझे दास ॥ पार्थ म्हणे जा गजपुरास ॥ भय नाहीं तुम्हांस ॥ स्वस्थचित्तें सुखी असा ॥१२६॥
धनुष्य शमीवरी ठेवून ॥ पूर्ववत होय अर्जुन ॥ अद्दश्य जाहला दिव्यस्यंदन ॥ शस्त्रास्त्रांसमवेत ॥१२७॥
उत्तरासी म्हणे पार्थ ॥ माझा सांगों नको पुरुषार्थ ॥ पितयासी सांग वृत्तान्त ॥ म्यां सर्व जिंकिले ॥१२८॥
उत्तर म्हणे एवढी गोष्टी ॥ मज न साजे किरीटी ॥ अर्जुन म्हणे न करीं स्फुटी ॥ दिवस तीन राहें उगा ॥१२९॥
मग उत्तरासी रथीं बैसवीत ॥ बृहन्नटा सारथी होत ॥ गोरक्षकांहातीं पार्थ ॥ सांगूनि धाडी रायातें ॥१३०॥
उत्तरें जिंकिले कौरव ॥ वैभव हिरोनि घेतलें सर्व ॥ तों इकडे विराटराव ॥ ग्रामांत आला गजरेंशीं ॥१३१॥
रायासी सांगती प्रधान ॥ कौरवीं केलें उत्तरगो ग्रहण ॥ मग बृहन्नटा सारथी करून ॥ उत्तर एकला धांवला ॥१३२॥
कौरवांचे बहुत भार ॥ हा एकला निर्भय वीर ॥ सद्न्द जाहला राजेंद्र ॥ म्हणे कुमार पुरुषार्यीं ॥१३३॥
स्वसेनेसी सांगे नृपवर ॥ धांवा एकला गेला कुमार ॥ बृहन्नटा सारथी निंद्य थोर ॥ अति अधीर नपुंसक ॥१३४॥
ऐसें ऐकतां युधिष्ठिर ॥ हास्यमुखें देत प्रत्युत्तर ॥ बृहन्नटा सारथी निर्धार ॥ तेथें जयासी काय उणें ॥१३५॥
तों गोरक्षक आले धांवत ॥ राया उत्तर जाहला जयवंत ॥ विभांडूनि कौरव समस्त ॥ शस्त्रें वस्त्रें हरियेलीं ॥१३६॥
गायी घेऊनि सकळा ॥ महाद्वारा जवळी आला ॥ तों कंक म्हणे ते वेळां ॥ नवल काय या गोष्टीचें ॥१३७॥
बृहन्नटा सारथी जेथें ॥ काळ उभा न राहे तेथें ॥ रायें गौराविलें गोरक्षकांतें ॥ वस्त्रालंकारीं तेधवां ॥१३८॥
शृंगारिलें अवघें नगर ॥ ग्रामदैवतें पूजिलीं समग्र ॥ वाद्यघोषें लोक सत्वर ॥ सामोरे जाती उत्तरासी ॥१३९॥
कंकासी म्हणे विराटराव ॥ अक्ष आणीं खेळों डाव ॥ धर्म म्हणे हा महोत्सव ॥ न धरीं पाश हातीं आतां ॥१४०॥
परी विराट नायके कांहीं ॥ म्हणे अवश्य खेळावें ये समयीं ॥ कंक म्हणे राया कदाही ॥ न खेळावें ॥ तत्त्वतां ॥१४१॥
पांच पांडव खेळून ॥ कोणतें पावले कल्याण ॥ नैषधा सारिखें निधान ॥ व्यसनीं पडिलें खेळोनी ॥१४२॥
रायें घेतले हातीं पाश ॥ तों लोक आले आसमान ॥ सांगती उत्तराचा हर्ष ॥ थोर पुरुष प्रतापी ॥१४३॥
कंक म्हणे परम पुरुषार्थी ॥ जेथें बृहन्नटा सारथी ॥ सकल कार्यें सिद्ध होती ॥ ऐकता नृपति कोपला ॥१४४॥
मग म्हणे रे ब्राह्मणा कंका ॥ षंढाची प्रशंसा सांगसी मूर्खा ॥ अपमानोनि माझ्या बालका ॥ वर्णिसी प्रशंसा तयाची ॥१४५॥
उत्तर पुरुषार्थी भूमंडळीं ॥ भीष्म द्रोणादिक बळी ॥ कौरव नागवूनि सकळी ॥ केले भग्न क्षणार्धें ॥१४६॥
कंका तूं मूर्ख पूर्ण ॥ तुज वांचावयाचें असेल कारण ॥ तरी न बोलें ऐसें वचन ॥ वर्णीं गुण उत्तराचे ॥१४७॥
धर्म म्हणे समरीं आल्या काल ॥ बृहन्नटा तत्काल जिंकील ॥ ऐसें ऐकतां कोपला भूपाल ॥ अक्ष ताडिला मुखावरी ॥१४८॥
अक्ष आदळला कपाळीं थोर ॥ नासिकाद्वारें चाललें रुधिर ॥ अंजुळींत धरी युधिष्ठिर ॥ द्रौपदी पात्र घेऊनि धांवे ॥१४९॥
तों मिरवत आला उत्तर ॥ पुढें सांगों येती दूत सत्वर ॥ राव म्हणे येऊं द्या कुमार ॥ तों युधिष्ठिर दूतां सांगे ॥१५०॥
कानीं जाणविली मात ॥ उत्तर एकला येऊं द्या आंत ॥ बृहन्नटेसी गृहांत ॥ जाय ऐसें निरोपावें ॥१५१॥
बृहन्नटा पाहतां हें रक्त ॥ विराटासी मारील प्रधाना सहित ॥ तों उत्तर येऊनि अकस्मात ॥ वंदूनि भेटे नृपातें ॥१५२॥
उत्तर पाहे धर्माकडे ॥ तंव तो बैसला एकीकडे ॥ सैरंध्रीनेम पात्र धरिलें पुढें ॥ अशुद्ध वाहे भडभडां ॥१५३॥
उत्तर जाहला भयभीत ॥ पित्यासी पुसे वृत्तान्त ॥ विराटें कथिलें समस्त ॥ बोले सुत तेधवा ॥१५४॥
म्हणे अनर्थ केला पूर्ण ॥ राया नमस्कारीं हा ब्राह्मण ॥ वेगें करीं प्रसन्न ॥ घेईं मागोन कल्याण ॥१५५॥
मग विराट उठोन ॥ करी धर्माचें समाधान ॥ म्हणे म्यां कर्म केलें दारुण ॥ क्षमा करीं सर्वही ॥१५६॥
रायें अशुद्ध धुवोन ॥ कंकासी वस्त्रालंकार देऊन ॥ आपणा जवळी बैसवून ॥ बोलतसे अत्यादरें ॥१५७॥
धर्म म्हणे ते अवसरीं ॥ जरी रक्त पडतें अवनीवरी ॥ तरी हे समस्त नगरी ॥ लया जाती क्षणमात्रें ॥१५८॥
तों बृहन्नटा येत तेथ ॥ विराटपुत्राप्रति म्हण्त ॥ धन्य त्वां केला पुरुषार्थ ॥ यशवंत प्रतापी तूं ॥१५९॥
भीष्म द्रोण कर्ण वीर ॥ काळासही अनिवार ॥ ते तुवां जिंकिले समग्र ॥ धन्य वीर प्रतापी तूं ॥१६०॥
उत्तर म्हणे ऐक मात ॥ कां कोरडा वानिसी पुरुषार्थ ॥ एक देवपुत्र आला अकस्मात ॥ विजयी रथ घेऊनी ॥१६१॥
विभांडोनि सकळ कौरव ॥ पुरुषार्थ हा केला सर्व ॥ तें युद्ध पाहावया अपूर्व ॥ इंद्रादि देव पातले ॥१६२॥
तें युद्ध पाहतां दारुण ॥ एकवटले माझे प्राण ॥ मज तेणें आणिलें सांभाळूणन ॥ गुप्त जाहला रथाशीं ॥१६३॥
विराट म्हणे तो दवसुत ॥ कोठें मज दावीं त्वरित ॥ उत्तर म्हणे तीन दिवसांत ॥ प्रकटेन ऐसें बोलिला ॥१६४॥
रायासी म्हणे वैशंपायन ॥ जवळी निधानें असोन ॥ दरिद्रियासी न होती द्दश्यमान ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥१६५॥
कीं ह्रदयीं असतां जगदीश्वर ॥ नेणती अज्ञानी ॥ पामर ॥ तैसे घरीं असतां पंडुकुमार ॥ नेणवेचि तयातें ॥१६६॥
याउपरी तिसरे दिनीं ॥ उत्तम सुमुहूर्त पाहोनी ॥ प्रातःकाळीं उठोनी ॥ मंगल स्नानें पांडव करिती ॥१६७॥
दिव्य वस्त्रें दिव्यालंकार ॥ उत्तरें आणिले अपार ॥ पूर्वरूपें धरोनि सत्वर ॥ दिव्या भरणीं शोभले ॥१६८॥
अमौल्य अलंकार वस्त्रें ॥ द्रौपदीस अर्पिलीं उत्तरें ॥ जैसें भवानीस ॥ स्कंदवीरें ॥ अत्यादरें पूजिलें ॥१६९॥
उगवले पंचा दित्य ॥ तैसे चालिले पंडुसुत ॥ विराटराज सभेचे आंत ॥ प्रातःकालीं पातले ॥१७०॥
सुवर्णदंड धरोनि हातीं ॥ नकुल सहदेव पुढें चालती ॥ छत्र धरी सुभद्रापती ॥ धर्मावरी तेधवां ॥१७१॥
भीमसेन चामरें धरीत ॥ सभेसी येऊनि अकस्मात ॥ राजसिंहासनीं वैसत ॥ धर्मराज तेधवां ॥१७२॥
छत्र चामरें करून ॥ पाठीसी उभे भीमार्जुन ॥ वैकुंठींचे पार्षदगण ॥ जैसे विष्णूचे पृष्ठभागीं ॥१७३॥
जय विजय अभिनव ॥ तेवीं शोभले नकुल सहदेव ॥ कीं तें पंचायतन अपूर्व ॥ विराट भाग्यें प्रकटलें ॥१७४॥
तों विराट लोकां सहित ॥ सभेसी जों येऊनि पाहात ॥ तों पांच पुरुष दीप्ति मंत ॥ राजचिन्हीं देखिले ॥१७५॥
सभय आणि विस्मित ॥ होऊनि पाहे तेव्हां तटस्थ ॥ तों उत्तर येऊनि त्वरित ॥ रायाप्रति सांगतसे ॥१७६॥
पित्यासी म्हणे उत्तर ॥ ओळखिले काय पंडुकुमार ॥ संपूर्ण एक संवत्सर ॥ सेवा केली आमुची ॥१७७॥
कंक तोचि हा धर्म ॥ बल्लव तो ओळखीं भीम ॥ बृहन्नटा धरिलें नाम ॥ तो महाराज ॥ धनंजय ॥१७८॥
ग्रंथिक आणि तेतिपाल ॥ सहदेव आणि नकुल ॥ कौरव विभांडिले सकल ॥ तो हा पार्थ जाण पां ॥१७९॥
अग्नीस देऊनि खांडववन ॥ युद्धीं पराभविला पाकशासन ॥ सकळ कौरव पराभवून ॥ द्रौपदी वरिली स्वयंवरीं ॥१८०॥
सैरंध्री ते द्रौपदी देख ॥ भीमें मारिले अवघे कीचक ॥ हिडिंब आणि बक ॥ जेणें पूर्वीं मर्दिले ॥१८१॥
राज सूय़यज्ञीं सर्व नृपती ॥ या धर्मरायासी पूजिती ॥ अहो या धर्माची कीर्ति ॥ सहस्त्रवदना न वर्णवे ॥१८२॥
विराट म्हणे ऐकें सुता ॥ कालचे युद्धीं तत्त्वतां ॥ सुशर्मा मज धरूनि नेतां ॥ इंहीं पुरुषार्थें सोडविलें ॥१८३॥
ऐसें बोलतां विराट ॥ प्रेमें दाटला त्याचा कंठ ॥ म्हणे उपकार केला अचाट ॥ काय आतां आठवूं ॥१८४॥
विराट दोन्ही कर जोडून ॥ धरी धर्माचे द्दढ चरण ॥ धर्मरायें विराटा उचलून ॥ दिलें आलिंगन अति प्रेमें ॥१८५॥
विराट करूं लागला स्तवन ॥ साही निधानें घरीं असोन ॥ कांहीं नेणोंचि महिमान ॥ आम्ही पूर्ण देवहत ॥१८६॥
ज्योतिर्लिंग पूजावें वहिलें ॥ तें म्यां अभाग्यें पायीं ताडिलें ॥ अमृतें संमार्जन केलें ॥ मूर्खपणें नेणोनियां ॥१८७॥
शोधीत कामधेनु आली घर ॥ तीस केले काष्ठा प्रहार ॥ काग म्हणोनि स्वगेंद्न ॥ पाषाण हाणूनि उडविला ॥१८८॥
कल्प वृक्ष उगवला द्वारीं ॥ तो तोडुनि टाकिला दूरी ॥ कीं चिंतामणि उडविला बाहेरी ॥ गोफणी लावूनि अभाग्यें ॥१८९॥
भाग्यें परीस लाधला घरीं ॥ तो फोडूनि रचिली पायरी ॥ मी अभागी त्याचपरी ॥ पांडव घरीं नोळखीं ॥१९०॥
केला सद्नूरूचा अनादर ॥ म्यां अपमानिले संत साचार ॥ भाग्यें घरा आले हरिहर ॥ घातले बाहेर न पूजितां ॥१९१॥
असो भीम आणि अर्जुन ॥ करिती विराटाचें समाधान ॥ चौघे बंधू क्षेमालिंगन ॥ देते जाहले सप्रेम ॥१९२॥
इकडे जाहला जो वृत्तान्त ॥ तो सुदेष्णेसी कळला समस्त ॥ द्रौपदीचे पायीं लागत ॥ म्हणे माये अपराधी मी ॥१९३॥
तूं कमलेची अपर प्रतिमा ॥ आम्ही नेणों तुझा महिमा ॥ सावित्री सरस्वती उमा ॥ त्यांची उपमा तुजलागीं ॥१९४॥
इकडे विराट ते अवसरीं ॥ धर्मराया पुढें पदर पसरी ॥ सर्व अन्याय क्षमा करीं ॥ नेणोनियां घडले जे ॥१९५॥
सर्वही राज्य सेना कोश ॥ विराटें अर्पिलें निःशेष ॥ मी तुमचा दासानुदास ॥ सर्वखेंशीं साह्य असें ॥१९६॥
पांडवांकडे पाहे विराट नृपती ॥ नेत्रांसी नव्हे कदा तृप्ती ॥ जिव्हा न धाय करितां स्तुती ॥ दाटे प्रीति अंतरीं ॥१९७॥
विराट म्हणे अवधारा ॥ माझी कन्या आहे उत्तरा ॥ हे देईन पार्थवीरा ॥ तरीच धन्य मी साच ॥१९८॥
पार्थ म्हणे अंतःपुरांत ॥ म्यां कन्ये समान पाळिली सत्य ॥ तरी अभिमन्यूसी द्यावी यथार्थ ॥ स्नुषा आमुची करावी ॥१९९॥
उत्तरेचा स्नेह मजवरी कैसा ॥ गुरु किंवा पिता जैसा ॥ तरी सुभद्रेची स्नुषा ॥ निर्धार हा साच पैं ॥२००॥
श्रीकृष्णभगिनीसुत ॥ प्रत्यर्जुन रणपंडित ॥ मग विराट आणि नृपनाथ ॥ पत्र लिहिती द्वारके ॥२०१॥
इंदिरावरा कमलनेत्रा ॥ जलदवर्णा चारुगात्रा ॥ भक्तपालका स्मरारि मित्रा ॥ परात्परा गोविंदा ॥२०२॥
तुझें नाम घेतां जाण ॥ सकल पातकें होती दहन ॥ जैसा तृणा लागतां हुताशन ॥ भस्म होय क्षणार्धें ॥२०३॥
तूझें करितां ध्यान ॥ आणि मनीं पाहतां चरण ॥ मग तेथें कर्म कोण ॥ उरुं शके सांग पैं ॥२०४॥
सहकुटुंब सहसेना ॥ लग्नासी यावें जगन्मोहना ॥ उत्तरा दिधली अभिमन्या ॥ सत्वर आपण येइंजे ॥२०५॥
पूर्वीं सकल राजे जिंकून ॥ पांडवीम केले आपणाधीन ॥ तितुक्यांसी पत्रें लिहून ॥ धर्मरायें पाठविलें ॥२०६॥
अभिमन्य़ूचें एथें लग्न ॥ पुढें क्रुरुक्षेत्रीं युद्ध दारुण ॥ तरी सकलीं राजकरभार घेऊन ॥ विराट नगरा येइंजे ॥२०७॥
विराट नगरा बाहेर ॥ उपलव्यनामें नगर ॥ त्याचे प्रदेशीं धर्मराज नृपवर ॥ शिबिरें देऊनि राहिला ॥२०८॥
तों छप्पन्नदेशींचे नृपवर ॥ शाण्णव कुळींचे राज कुमार ॥ सह सेना करभार अहेर ॥ धर्मरायासी भेटले ॥२०९॥
इकडे लहधर श्रीधर ॥ आनकदुंदुभि उग्रसेन नृपवर ॥ सात्यकी उद्धव अक्रूर ॥ कृष्ण कुमार निघाले ॥२१०॥
छप्पन्न कोटी यादव वीर ॥ कृष्ण स्त्रिया सोळा सहस्त्र ॥ रुक्मिण्यादि समग्र ॥ कृष्ण नायिका निघाल्या ॥२११॥
सुभद्रेसहित अभिमन्य ॥ विराट नगरा चालिलें लग्न ॥ तों विराट धर्म सामोरे येऊन ॥ यादवेश्वरा भेटले ॥२१२॥
वाजी वारण रथ ॥ दास दासी अपरिमित ॥ अपार धन देऊनि पंडुसुत ॥ परम पुरुषें तोषविला ॥२१३॥
द्रुपद शिखंडी धृष्टद्युम्न ॥ पांडवांचे पंच कुमार जाण ॥ अग्नि होत्र पात्रें घेऊन ॥ धौम्य कुल गुरु पातला ॥२१४॥
धन वस्त्रें अलंकार ॥ येणें भरूनि हस्ती अपार ॥ धर्मासी भेटला द्रुपद नृपवर ॥ सर्व अहेर समर्तिले ॥२१५॥
सर्वही रथ घेऊन ॥ द्वारकेहूनि आला इंद्रसेन ॥ सप्रधान लग्नाचें कारण ॥ उत्तर विराट संपादिती ॥२१६॥
साह्य जेथें श्रीकृष्ण ॥ तेथें कांहीं न पडे न्यून ॥ यथासांग जाहलें लग्न ॥ उत्तर अभिमन्यु वधूवरें ॥२१७॥
लग्न सोहळा वर्णावा समस्त ॥ तरी वाढेल अपार ग्रंथ ॥ उघोगपर्व अद्भुत ॥ पुढें वर्णन असे हो ॥२१८॥
मूळ भारतीं वैशंपायन ॥ बोलिला इतुकेंचि वचन ॥ कीं यथा सांगा जाहलें लग्न ॥ ध्वनि तार्थ जाण विला ॥२१९॥
असो विराटें आंदण ॥ पूर्वींच दिलें तनु मन ॥ पांडवांची संपदा पहिल्याहून ॥ शत गुणीं विशेष चढियेली ॥२२०॥
सुदेष्णा द्रौपदी रुक्मिणी ॥ मुख्य जेथें वर्‍हाडिणी ॥ उत्तरा सुंदर देखोनी ॥ परमानंद सर्वांसी ॥२२१॥
आले जे लग्नासी राजेश्वर ॥ धर्म देत तयां वस्त्रालंकार ॥ धन देऊनि अपार ॥ अवनीश्वर तोष विले ॥२२२॥
चार दिवस जाहलें लग्न ॥ पुढें कृष्ण धर्म सभा करून ॥ विचार आरंभितील एथून ॥ उधोगपर्व तेंचि पैं ॥२२३॥
विराटपर्व येथें संपलें ॥ पुढें उद्योगपर्व आरं भिलें ॥ जें श्रवण करितां सकलें ॥ कलिकल्मषें दूर होती ॥२२४॥
एका हत्तर अध्याय सुरस ॥ विराटपर्व अतिविशेष ॥ श्लोक संख्या वेदव्यास ॥ सांगत किती ऐका ते ॥२२५॥
दोन सहस्त्र पांच शत ॥ दश श्लोक आगळे गणित ॥ संख्या केलीसे नेमस्त ॥ सत्यवती ह्रदय रत्नें ॥२२६॥
विराटपर्व ऐकतां विशेष ॥ सर्व शत्रूंचा होय विनाश ॥ संपत्ति आयुष्य निर्दोष यश ॥ प्राप्त होईल श्रवण करितां ॥२२७॥
पर्वापर्वा प्रति पूजा करून ॥ द्यावें ब्राह्मणांसी भोजन ॥ त्यासी सर्वदा साह्य श्रीकृष्ण ॥ करितां श्रवण भारत ॥२२८॥
सालं कृत सहस्त्र गायी ॥ ब्राह्मणांसी दिधल्या ग्रहण समयीं ॥ तें फळ हाता ये लवलाहीं ॥ विराटपर्व ऐकतां ॥२२९॥
पांडुरंग नगर अपूर्व ॥ तेथें कथिलें विराटपर्व ॥ पंढरीनाथ कर्ता सर्व ॥ काव्यरचना सुरस हे ॥२३०॥
चंद्रभागा मान ससरोवर ॥ प्रेम कल्हारें जेथें अपार ॥ तेथें राजहंस रुक्मिणीवर ॥ सर्वदाही विराजे ॥२३१॥
श्रीमद्भीमातटी दिगंबर ॥ ब्रह्मानंद अत्युदार ॥ तेथें याचक श्रीधर ॥ अनन्य भजन मागतसे ॥२३२॥
चंचु भरोनि टिटवा ॥ समुद्र रिता करील केव्हां ॥ भारत अद्भुत रुक्मिणीधवा ॥ माझेनें कैसें वर्णवे ॥२३३॥
तूं जरी राशिशील पाठी ॥ तरी ग्रंथ जाईल शेवटीं ॥ श्रीधरवरदा जगजेठी ॥ कृपाद्दष्टीं पाहें पां ॥२३४॥
पांडवप्रताप ग्रंथ अपूर्व ॥ त्यामाजी अध्याय चार विराटपर्व ॥ पुढें उद्योगपर्व अपूर्व ॥ ब्रह्मानंदें परिसिजे ॥२३५॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ अपूर्व ॥ त्यामाजी अध्याय चार विराटपर्व ॥ पुढें उद्योगपर्व अपूर्व ॥ ब्रह्मानंदें परिसिजे ॥२३५॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ पस्तिसा व्यांत कथियेला ॥२३६॥
इति श्रीश्रीधरकृत  पांडवप्रतापे विराटपर्वणि उत्तरगो ग्रहण पांडवप्रकटनाभिमन्युविवाहो नाम पंचत्रिंशत्तमाध्यायः ॥३५॥
श्रीगोपीजनवल्लभार्पणमस्तु ॥

॥ श्रीपांडवप्रताप विराटपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP