मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३८ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३८ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३८ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ वैशंपायन म्हणे पुण्यरूपा ॥ ऐकें जन मेजया महानृपा ॥ चार याम क्रमिली क्षपा ॥ सनत्सुजात समागमें ॥१॥मेघापरीस उदार ॥ ज्ञान वर्षला तो विधिपुत्र ॥ उदयाचलीं येतां मित्र ॥ तम निःशेष हारपलें ॥२॥परम देदीप्यमान तरणी ॥ भीष्म शारद्वत द्रोण द्रौणी ॥ सुयोधन दुःशासन कर्ण शकुनी ॥ सभास्थानीं बैसले ॥३॥अर्कज सौबल बाल्हीक ॥ प्रज्ञाचक्षु क्रुरु नायक ॥ सभा घन वटली सम्यक ॥ शक्रस्थाना सारिखी ॥४॥तों संजय परम प्रवीण ॥ सभेसी बैसला येऊन ॥ मग सांगता जाहला वर्तमान ॥ पंडुकुमारांचें सर्वही ॥५॥धर्में वृद्धकनिष्ठां लागून ॥ सांगितलें आशीर्वाद क्षेम नमन ॥ दुर्योधन म्हणे तरी संजया संपूर्ण ॥ सांग अर्जुन बोलिला तें ॥६॥संजय म्हणे जें ते बोलिले ॥ तेंचि कथितों नाहीं आगळें ॥ तुम्ही जरी न कोपाल वहिलें ॥ तरी वर्तलें तें सांगेन मी ॥७॥प्रज्ञाचक्षु म्हणे कां कोपावें ॥ बोलिले तेंचि त्वां सांगावें ॥ संजय म्हणे ऐकावें ॥ सर्व सादर होऊनी ॥८॥क्रोधें बोलिला अर्जुन ॥ दुरात्मा जो सूतपुत्र कर्ण ॥ त्याचा समरीं घेईन प्राण ॥ तरीच गांडीव वापधारी मी ॥९॥धर्मराज उघडील दिव्य द्दष्टी ॥ तेव्हां भस्म करील सर्व कौरव सृष्टी ॥ हा वृकोदर वीर जेठी ॥ यापुढें पृष्ठी कृतान्त दावी ॥१०॥माद्री सुत इच्छीत मनीं ॥ केव्हां माजेल रणचेदिनी ॥ द्वारावतीची भवानी ॥ श्रीरंगरूपिणी चतुर्भुज ॥११॥तीस आम्हीं नवशिलें उदंड ॥ कीं तुज पुढें करूं होमकुंड ॥ कौरव बस्त प्रचंड ॥ दळासहित बळी देऊं ॥१२॥आम्ही अरण्यांत श्रमलों बहुत ॥ कौरव समरीं लोळवूं समस्त ॥ धर्माचा क्रोध सांचला बहुत ॥ कौरव संहार करील तो ॥१३॥कुठारधार छेदी सर्व वनें ॥ कीं तृण जाळिजे त्रिचरणें ॥ भीम सूर्य शत्रू उडुगणें ॥ तेजहीन पैं होती ॥१४॥शत्रु जलद जाल सघन ॥ भीम सुटतां प्रभंजन ॥ क्षणें जाती वितळोन ॥ शीघ्रकाळें यावरी ॥१५॥कौरव वमूषकांचा मार्ग लक्षी ॥ सहदेव भुजंग धुसधुशी ॥ नकुलव्याघ्र आपटी शेंपटी ॥ शत्रुजंबुक कोठें वसती ॥१६॥हा महावीर धृष्टद्युम्न ॥ नरवीरांमाजी पंचानन ॥ हा सात्यकी प्रलयाग्न ॥ शत्रूवन जाळूं इच्छी ॥१७॥हे प्रतिविंध्यादि पांच कुमार ॥ उदित युद्धासी अहोरात्र ॥ हा कृष्ण सद्दश सौभद्र ॥ कृतांतासी गणीना ॥१८॥मेरु मंदार सबळ सदट ॥ तैसे द्रौपद आणि विराट ॥ देशोदेशींचे राजे अचाट ॥ त्यांचा पराक्रम न वर्णवे ॥१९॥दुर्योधन दुःशासन ॥ यांचा काळ भीमसेन ॥ हें हरि हर कमलासन ॥ नव्हे अप्रमाण ॥ त्यांचेनी ॥२०॥भीष्माचा काळ शिखंडी जाण ॥ द्रोणासी बधील धृष्टद्युम्न ॥ सर्व भौम धर्म आपण ॥ शल्यासी मारूं इच्छीत ॥२१॥सहदेव शकुनीचा काळ ॥ उलूकासी मारील नकुळ ॥ कौलिकपुत्राचें शिरकमळ ॥ मीच छेदीन स्वहस्तें ॥२२॥उरले जे कां धार्त राष्ट्र ॥ सर्वांचा काळ हा वृकोदर ॥ धृतराष्ट्राचें पालन समग्र ॥ आम्हीच करूं शेवटीं ॥२३॥वीज तळपे जैसी अंबरीं ॥ तैसा श्रीरंग रथ फेरी ॥ तेव्हां वीर पळतील दशदिशांतरीं ॥ शस्त्रें अस्त्रें टाकोनियां ॥२४॥कौरव तस्कर संपूर्ण ॥ यांचे तोडीन हस्त चरण ॥ जयद्रथाचें शिर छेदीन ॥ द्रौपदीस घेऊन पळत होता ॥२५॥त्यांहीं शब्द शस्त्रें सोडिलीं अपार ॥ लोहशस्त्रें आम्ही देऊं प्रत्युत्तर ॥ कृष्णद्वेषी चांडाळ समग्र ॥ संहारीन नेम हा ॥२६॥माझिया चापासी आहे गवसणी ॥ परी प्रतिचाप क्षणक्षणां झणाणी ॥ तृणीर भरलासे बाणीं ॥ करकरती बाहेर ॥ यावया ॥२७॥काळ फोडीन रणांगणीं ॥ यवपिष्टवत करीन धरणी ॥ आकाशमंडप उघडोनी ॥ पाडीन स्वर्ग खालता ॥२८॥माझिया रथाचा ध्वज अद्भुत ॥ वायु नसतां फडकत ॥ भूतांसह हनुमंत ॥ वाट पाहात रणाची ॥२९॥सर्पाचिया परी झडकरी ॥ असिलता निघती मेणाबाहेरी ॥ शक्ति जाळ माझें थरथरी ॥ अस्त्रें विचार करिताती ॥३०॥परम प्रतापी पंडुकुमार ॥ परी धृतराष्ट्र आणि गंगापुत्र ॥ शारद्वत आचार्य गुरुवर ॥ यांचे चरण न विसरती ॥३१॥मग बोले गंगा नंदन ॥ विधीनें केलें प्रजांचें समाधान ॥ भूभार उतरावया संपूर्ण ॥ नरनारायण अवतरले ॥३२॥ते हेचि कृष्णार्जुन ॥ भूभार ॥ उतरतील संपूर्ण ॥ दुर्योधना होईं सावधान ॥ वंशवन जळूं नको ॥३३॥कपिध्वज रणांगणीं ॥ देखिला नाहीं तुम्हीं नयनीं ॥ तोंवरी धर्मासी आणोनी ॥ राज्य विभाग देइंजे ॥३४॥आतां नायकसी आमुचें वचन ॥ समरीं जेव्हां सोडिशील प्राण ॥ तेव्हां होईल आठवण ॥ आमुचिया वचनाची ॥३५॥कर्ण शकुनि दुःशासन ॥ यांचें नायकें कदा वचन ॥ मम वाक्यसुधारस सेवून ॥ आमर होऊन नांदें कां ॥३६॥सक्रोध बोले वीर कर्ण ॥ अरे हा भयभीत वृद्ध पूर्ण ॥ क्षत्रियधर्म सोडून ॥ दीनवदन गोष्टी सांगे ॥३७॥सेनेसमवेत पांडव ॥ मी रणीं संहरीन सर्व ॥ एकछत्री राणीव ॥ दुर्योधनाचें करीन मी ॥३८॥भीष्म म्हणे रे कर्णा ॥ कां करिसी व्यर्थ वल्गना ॥ गोग्रहणीं गेऊनि कृष्णवदना ॥ कां रे सर्व पळालां ॥३९॥गंधर्वीं कौरव धरूनि नेले ॥ तेव्हां तुझें बळ कोठें गेलें ॥ अधम हो तुम्हां सोडविलें ॥ भीमार्जुनीं धांवोनी ॥४०॥यावरी महाराज गुरुद्रोण ॥ धृतराष्ट्रासी बोले वचन ॥ जें बोलिला देवव्रत गर्जोन ॥ सत्य सत्य जाण हें ॥४१॥जों माजली नाहीं रणकुंभिनी ॥ तों मैत्री करा जाऊनी ॥ तों अंध म्हणे ते क्षणीं ॥ मज भय वाटे भीमाचें ॥४२॥भीमाचिया बळापुढें ॥ न तुळती उभय दळें पडिपाडें ॥ त्याचा गदाघाय ज्यावरी पडे ॥ तेथें उरी उरेना ॥४३॥मी तयाचें समाधान ॥ पहिलेंचि करितों जाऊन ॥ तरीच हा अनर्थ ॥ चुकता दारुण ॥ आतां ते कदा नाटोपती ॥४४॥उपजत मूर्ख माझे नंदन ॥ नायकती श्रेष्ठांचें वचन ॥ भीम ऐरावत दारुण ॥ वंशवन उपडील ॥४५॥तेणें जरासंध मारिला ॥ किर्मीर हिडिंब बक वधिला ॥ सबळ कीचकांचा मेळा ॥ मृत्यु नगरा धाडिला ॥४६॥तो या सकळांसी मारील देख ॥ माझेनें नायकवेल स्नुषांचा शोक ॥ मी त्यांचे द्वारीं लोळेन बहुतेक ॥ पुत्रशोकें करू नियां ॥४७॥धन्य पांडव बलवंत ॥ माझी मर्यादा पाळिती बहुत ॥ येर्हवीं हे दुर्जन समस्त ॥ नेतील क्षणांत बांधोनि ॥४८॥संजय म्हणे द्रौपदी सभेसी ॥ आणिली तेव्हां उगाचि होतासी ॥ आतां काय या गोष्टी करिसी ॥ भय मानसीं धरोनियां ॥४९॥तुझे पुत्र बांधून ॥ गंधर्वीं नेले धरून ॥ तेव्हां धांवले भीमार्जुन ॥ पराक्रमें त्यांहीं सोडविले ॥५०॥परम पराक्रमी वृकोदर ॥ करील तव पुत्रांचा संहार ॥ तुझी बालबुद्धि साचार ॥ मोहेंकरोनि तत्त्वतां ॥५१॥दुर्योधन बोले वचन ॥ हा अनिवार कृतांतासी द्रोण ॥ रणपंडित परम निपुण ॥ कृपाचार्य पराक्रमी ॥५२॥संहाररुद्राची अपरप्रतिमा ॥ तो हा नरलोकीं अश्वत्थामा ॥ या कर्णाचा युद्धमहिमा ॥ एका वक्रें न वर्णवे ॥५३॥निष्पांडवी धरित्री ॥ करीन सत्वर यावरी ॥ हे राजे मजकारणें समरीं ॥ प्राण देतील भरंवसा ॥५४॥पांडव निर्बल पक्षहीन ॥ त्यांत साह्य जरी आले स्वर्गाहून ॥ शक्र शिव रमारमण ॥ कमलासन जरी आला ॥५५॥त्यांसही संहारूं समरीं ॥ हा निश्चिय आमुचे अंतरीं ॥ रेवतीरमण गुरु शिरीं ॥ बळ माझें जाण पां ॥५६॥धर्म भ्याड अति दीन ॥ पांच गांव मागतो कर जोडून ॥ परी एक पाऊल धरणी जाण ॥ त्यास नेदीं निर्धारें ॥५७॥मी गदा पडताळीन जेव्हां ॥ समरीं मजशीं न तगे मघवा ॥ या सर्व राजांचा वर्णावा ॥ पराक्रम किती हो ॥५८॥करूनि एकत्र द्वादश मित्र ॥ हा घडिला कीं स्वर्धुनी पुत्र ॥ या द्रोणाशीं माजवी समर ॥ ऐसा वीर नसेचि ॥५९॥आम्ही दळाशीं अवघेजण ॥ एकीकडे बळें संपूर्ण ॥ एकला हा वीर कर्ण ॥ पराक्रमें आगळा ॥६०॥वीरचक्रचूकडामणी ॥ उदार धीर समरांगणीं ॥ तरी कवचकुंडलें मागोनी ॥ गोला घेऊनि सुत्रामा ॥६१॥ही वासवी शक्ति सोडील कर्ण ॥ तेव्हां कदा न वांचे अर्जुन ॥ भीष्मप्रतिज्ञा अति दारुण ॥ वीर मारीन दश सहस्त्र ॥६२॥संजय म्हणे पंडुकुमार ॥ निर्भय निःशंक ॥ प्रलयरुद्र ॥ समरीं ठाकतील समोर ॥ पंचादित्य प्रतापी ॥६३॥सभोंवता एक योजन ॥ दिसे अर्जुनाचा उंच स्यंदन ॥ कपिवरध्वज भेदीत गगन ॥ दश योजन भोंवता दिसे ॥६४॥तिंहीं वांटूनि घेतले वीर ॥ शिखंडीचा भाग गंगा पुत्र ॥ धृष्टद्युम्न महावीर ॥ द्रोण गुरुसी वधील ॥६५॥शल्यासी वधील धर्म ॥ दुर्योधनदुःशासनांसी भीम ॥ समरीं मारील हा नेम ॥ शतही बंधूंसमवेत ॥६६॥कर्णासी सुभद्रावर ॥ मारील समरीं निर्धार ॥ सहदेवहातें शकुनि वीर ॥ मृत्यु सदना जाईल ॥६७॥शकुनीचा पुत्र उलूक जाण ॥ नकुल त्याचा घेईल प्राण ॥ बृहद्वल आणि लक्ष्मण ॥ यांसी आवंतिलें अभिमन्यें ॥६८॥यादववीर युयुधान ॥ तेणें नेमिला चेकितान ॥ तुमचें अकरा अक्षौहिणी सैन्य ॥ द्दष्टीं नाहीं तयांचे ॥६९॥एकल्या अर्जुनें गोग्रहणीं ॥ केला पुरुषार्थ आठवा मनीं ॥ शतही कीचक मारूनी ॥ निशींत टाकिले वृकोदरें ॥७०॥दुर्योधन बोले पराक्रम ॥ उद्यां पांडवांचा करीन होम ॥ धृतराष्ट्र बोले अतिसंभ्रम ॥ कां बल्गना व्यर्थ करिसी ॥७१॥अरे प्राणींतसमयीं जाण ॥ माझें तुम्हांसी आठवेल वचन ॥ परमपराक्रमी भीमार्जुन ॥ संहारितील सर्वांसी ॥७२॥संजय म्हणे एकांतीं जाण ॥ दिव्यस्यंदनीं श्रीकृष्णार्जुन ॥ एक शय्येवरी दोघेजण ॥ पहुडले नयनीं देखिले म्यां ॥७३॥नकुल सहदेव सौभद्र ॥ जेथें जाऊं न शकती द्रौपदीपुत्र ॥ तें परमसुवास एकान्त मंदिर ॥ तेथें पार्थ श्रीधर पहुडले ॥७४॥ध्वजवज्ररेखांकित बरवे ॥ देखिले म्यां श्रीरंगाचे तळवे ॥ ते सुभद्रावरे प्रेमभावें ॥ तळहातितां देखिले म्यां ॥७५॥सनका दिक कमलासन ॥ करितां योगयाग साधन ॥ यांचेही द्दष्टीस जाण ॥ अगोचर पदतळवे ते ॥७६॥ते पाय आपुले अंकीं धरून ॥ क्षणोक्षणीं तळहाती अर्जुन ॥ सवेंचि हातीं धरूनि श्रीकृष्ण ॥ पहुडवीत पार्थातें ॥७७॥भोजन शयन पान ॥ गमनागमन संभाषण ॥ एके ठायीं दोघे जण ॥ क्षणभरी दूर न होती ॥७८॥ते निजले असतां दोघेजण ॥ तेथें मी निजभाग्यें करून ॥ उभा ठाकलों जाऊन ॥ तोम उभयतांचे चरण देखिले ॥७९॥श्रीकृष्णतळव्यांवरी चिन्हें अद्भुत ॥ तैशींचे पायीं झळकत ॥ मी देखोनि जाहलों तटस्थ ॥ धन्य भाग पार्थाचें ॥८०॥अर्जुनासी निद्रा नाहीं निःशेष ॥ म्हणोनि नाम गुडाकेश ॥ मज देखतां तो नरवीरेश ॥ उठोनियां बैसला ॥८१॥श्रीरंगाचे चुरितां चरण ॥ सावध जाहला जगज्जीवन ॥ मज आसनावरी बैसवून ॥ गौरव बहुत पैं केला ॥८२॥मी बोलिलों तेथें वचन ॥ कीं जातों कुंजरपुरा लागून ॥ मग मजप्रति रुक्मिणीरमण ॥ बोलिला तेंचि ऐकें पां ॥८३॥सांगें भीष्मद्रोणदुर्यो धनां ॥ सकळ भूभुजां थोरलहानां ॥ भगदत्तशल्यकर्णी ॥ संजया सांग सर्वांसी ॥८४॥जप तप याग दानें ॥ अष्टभोग ललनांसी देणें ॥ पुत्रकन्यांचीं समाधानें ॥ संभाषणें मित्रांशीं ॥८५॥करा दिव्यान्न भोजना ॥ ठेवूं नका कांहीं वासना ॥ तुम्हां आलें मरण चुकेना ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥८६॥द्रौपदीच्या दुःखें करून ॥ मी आरंबळें रात्रंदिन ॥ अर्जुनाची पाठी राखोन ॥ संहार करिन सर्वांचा ॥८७॥त्रिदशांसह शचीरमण ॥ तुम्हां रक्षूं आलिया जाण ॥ क्षणांत हें ब्रह्मांड जाळीन ॥ सुदर्शन सोडूनियां ॥८८॥पार्थाचे हस्तें करून ॥ एकादन अक्षौहिणी दळ संहारीन ॥ नातरी हें सुदर्शन ॥ मी सोडीन शेवटीं ॥८९॥या पांचांतूनि एक वीर ॥ करील तुमचा संहार ॥ अवघे जालिया एकत्र ॥ तरी मग उरी कायसी ॥९०॥ऐसें एकांतीं कृष्णार्जुन ॥ बोलिले तेव्हां मज लागून ॥ दोघांचें बोलणें एकचि जाण ॥ नसे अन्य दुसरें पैं ॥९१॥ऐसें ऐकतां अंबिकानंदन ॥ भयभीत होऊनि बोले वचन ॥ दुर्योधना वर्तमान ॥ पुढें बरें दिसेना ॥९२॥हें दळ मेळ विलें त्वां निर्धारीं ॥ याचा भरंवसा कदा न धरीं ॥ पार्थासी साह्य समरीं ॥ हरि हर इंद्रादि जाणिजे ॥९३॥मग बोलती सुयोधन कर्ण ॥ तुम्ही सुखें करा मंदिरीं शयन ॥ क्षणांत पांडव संहारून ॥ दळासह टाकूं आम्ही ॥९४॥गंगात्मज म्हणे कर्णा ॥ कां करिसी व्यर्थ वल्गना ॥ गोग्रहणीं कृष्ण वदना ॥ करूनि पळालेति सर्वही ॥९५॥श्रीरंग सोडील सुदर्शन ॥ मग कैंचे उरेल तुमचें सैन्य ॥ नका कुल टाकूं संहारून ॥ ऐका वचन शिकविलें ॥९६॥क्रोधें बोले कर्ण वीर ॥ आहे गंगाकुमार ॥ तों मी कदा न धरीं शस्त्र ॥ नेम माझा हा जाणिजे ॥९७॥शस्त्रें टाकूनि रागें कर्ण ॥ गेला जेव्हां सभेंतूनि उठून ॥ तेव्हां भीष्मासी म्हणे सुयोधन ॥ तुम्ही पाठिराखे पांडवांचे ॥९८॥तुमचे बळें आम्ही पाहीं ॥ समरीं सहसा भीत नाहीं ॥ आम्ही चौघे मिळूनि सर्वही ॥ पांडवसेना संहारूं ॥९९॥दुःशासन शकुनि कर्ण ॥ चौथा मी पराक्रमी सुयोधन ॥ टाकूं सर्व संहारून ॥ भरंवसा पूर्ण असों द्यावा ॥१००॥विदुर बोले तेव्हां नीती ॥ जे कां स्वजातीशीं विरोध करिती ॥ वृद्धांसी क्षणोक्षणीं अपमानिती ॥ ते अनर्थीं पडतील ॥१०१॥धृतराष्ट्र म्हणे सुयोधना ॥ बा रे ऐकें वृद्धांचे वचना ॥ द्रौपदीस्वयंवरीं भीमार्जुनां ॥ साह्य कवण होता पैं ॥१०२॥गोग्रहणीं साह्य नव्हता कृष्ण ॥ आतां मिळालें अपार सैन्य ॥ तों दुर्योधन सभा सोडून ॥ रागें गेला सवसदना ॥१०३॥अंधासी एकांतीं येऊन ॥ भेटला सत्यवतीनंदन ॥ म्हणे हें एकीकडे ॥ त्रिभुवन ॥ एक जनार्दक एकीकडे ॥१०४॥श्रीकृष्ण महिमा अपार ॥ नेणाच तुम्ही पामर ॥ मनें सृष्टि मनें संहार ॥ करी साचार श्रीकृष्ण ॥१०५॥पांडवांचें निमित्त करून ॥ भूभार उतरील संपूर्ण ॥ भव पंकजोद्भव कर जोडून ॥ ज्याचें स्तवन करिताती ॥१०६॥गांधारीनें दुर्योधन ॥ एकांतीं आणिला बोलावून ॥ म्हणे ऐकें वडिलांचें वचन ॥ भेटें जाऊन धर्मराजा ॥१०७॥उतरावया भूभार ॥ अवतरलासे श्रीकरधर ॥ न ऐकसी शिकविलें साचार ॥ तरी मरण जवळी आलें ॥१०८॥भीम घालील गदा उचलोन ॥ मग माझें आठ विसील वचन ॥ हें कालत्रयीं न चुके जाण ॥ सत्य वचन सांगतें ॥१०९॥इकडे जगद्वंद्य जगज्जीवन ॥ त्याप्रति धर्मं बोले वचन ॥ तुजवांचूनि रक्षिता जाण ॥ दुजा कोण असे आम्हां ॥११०॥बाळाचें पालन करीं बरवें ॥ हें मातेसी काय सांगावें ॥ शांति क्षमा दया धरा म्हणावें ॥ न लागेचि सज्जनां ॥१११॥श्रीरंग श्याम सुंदर ॥ आपण जावें हस्तिनापुरा ॥ कौरवांचे शोधावें अंतरा ॥ साम भेद करोनि ॥११२॥त्रयोदश वर्षें वनीं क्रमिलीं ॥ कुंती माता मज अंतरली ॥ तिची भेट होय वनमाळी ॥ त्वरितचि करीं ऐसें तूं ॥११३॥परम उन्मत्त दुर्योधन ॥ राज्यमदें मद्यपान ॥ स्त्रीविषय धन यौवन ॥ तेणें करून भुललासे ॥११४॥यावरी बोले राजीवनयन ॥ मी तेथवरी एकदां जाईन ॥ शिष्टाई करूनि बोधीन ॥ दुरात्म्या दुर्योधनातें ॥११५॥युधिष्ठिर म्हणे जगन्नाथा ॥ तो तुझें न ऐके बोधितां ॥ मज ऐसें वाटतें चित्ता ॥ त्वां एथूनि नच जावें ॥११६॥मग बोले रुक्मिणी जीवन ॥ मी एकदां तेथवरी जाईन ॥ संदेह सर्व फेडीन ॥ जेणेंकरूनि बोल न लागे ॥११७॥तेथें वर्ततां विपरीत ॥ सुदर्शन सोडीन अकस्मात ॥ करीन दुष्टांचा निःपात ॥ एका क्षणांत धर्मराया ॥११८॥धर्म म्हणे श्रीहरी ॥ सर्व भावें करावी मैत्री ॥ भीम म्हणे मुरारी ॥ पंच ग्राम माग त्यांतें ॥११९॥पार्थ म्हणे समान ॥ जरी अर्ध राज्य देतील वांटून ॥ आणि दुर्योधनें एथें येऊन ॥ धर्मरायासी नमावें ॥१२०॥तंव बोले नकुल ॥ जरी दुर्योधन शरण येईल ॥ अर्ध राज्य देईल ॥ तरीच मैत्री करावी ॥१२१॥ऐसें ऐकोनि द्रुपदनंदिनी ॥ म्हणे श्रीरंगा मी तुझी भगिनी ॥ अद्यापि घातली नाहीं वेणी ॥ त्रयोदश वर्षें जाहलीं कीं ॥१२२॥हातीं धरोनियां केश ॥ म्हणे हे जगन्निवास ह्रषीकेश ॥ दुःशासनें धरुनि निःशेष ॥ नेलें ओढीत सभेमाजी ॥१२३॥ऐसें बोलतां द्रुपदबाळा ॥ नयनीं अश्रु कंठ दाटला ॥ म्हणे विश्वव्यापका ते वेळां ॥ वस्त्रें पुरविलें त्वां असंख्य ॥१२४॥मज सभेंत करितां नग्न ॥ हे पांचही पाहती अधोवदन ॥ आतां होऊनियां दीन ॥ पंच ग्राम मागती ॥१२५॥अंगीं बलप्रती असतां पूर्ण ॥ मग कां मागावें याचकपण ॥ प्रतापें समर माजवून ॥ राज्यासन मग घ्यावें ॥१२६॥हें जरी न होय तुमचेन ॥ तरी जा मागुती सेवा अरण्य ॥ पंच पुत्र आणि अभिमन्य ॥ दुर्जन संहारीन यांहातीं ॥१२७॥ऐसें पांचाळी बोलतां ते क्षणीं ॥ आसुवें भिजतसे कुंभिनी ॥ श्रीरंग म्हणे वो माय बहिणी ॥ खेद मनीं करूं नको ॥१२८॥यावरी सत्वरचि जाणा ॥ एकेक कौरव येती रणा ॥ स्नानासी जातील कौरवललना ॥ तें तूं डोळां विलोकिसी ॥१२९॥ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ करोनियां जप हवन ॥ आपुले स्यंदनावरी आरूढोन ॥ निघता जाहला गरुड ध्वज ॥१३०॥वारू योजिले अतिसुरेख ॥ शैब्य सुग्रीव बलाहक ॥ मेघपुष्प चवथा देख ॥ पुढें दारुक धुरेसी ॥१३१॥शंख चक्र गदा पद्म ॥ घेऊनि बैसला मेघश्याम ॥ सवें सात्यकी बीरोत्तम ॥ निघाले वेगेंकरोनी ॥१३२॥पांडव आणि भूभुज ॥ सकळी ॥ बोळवीत चालिले वनमाळी ॥ मग श्रीरंगें राहवूनि ते वेळीं ॥ निघे वेगेंचि गजपुरा ॥१३३॥वाटेसी जातां जगदीश्वर ॥ भेटती बहुत ऋषीश्वर ॥ म्हणती आम्ही येतों समग्र ॥ कौरव सभेसी श्रीरंगा ॥१३४॥तूं तेथें बोलसी कवणे रीती ॥ तें आमुचे श्रवण ॥ ऐकूं इच्छिती ॥ अवश्य म्हणे रुक्मिणीपती ॥ यावें सत्वर मागूनियां ॥१३५॥मेघीं विद्युल्लता देदीप्यमान ॥ तैसें हातीं झळके सुदर्शन ॥ कोटिमदनतात जगन्मोहन ॥ शोभायमान दिसतसे ॥१३६॥क्षीराब्धीचें ठेवणें देख ॥ तैसा लखलखीत हातीं शंख ॥ गदा ते वाटे बहुतेक ॥ आदित्यतेजें घडियेली ॥१३७॥वाटे चंडकिरण आटून ॥ घडिलें हातींचें दिव्य पद्म ॥ सच्चिदानंद मेघश्याम ॥ निगमागम वर्णिती जया ॥१३८॥प्रलयाग्नीचा कल्लोक भडकत ॥ तैसे उत्तरीयवस्त्र झळकत ॥ दशांप्रति मुक्ता तळपत ॥ कृत्तिकापुंज ज्यापरी ॥१३९॥तो परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शभ्रयशा चढलें बिक ॥ कीं शुद्ध श्र्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरूनि उटियेला ॥१४०॥कीं दिव्य रजत गाळोनि ओतिलें ॥ कीं पेरोजें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतोयें ओपिलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१४१॥तो सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसिकुसुमाभास पूर्ण ॥ त्याचिया रंगेकरून ॥ नीलोत्पलें लेपिलीं ॥१४२॥नभासी चढला तोचि रंग ॥ त्याचि प्रभेनें रंगले मेघ ॥ इंद्रनीळ मणि सुरंग ॥ त्याचि प्रकाशें जाहले ॥१४३॥तेथींचें सौंदर्य अद्भुत ॥ गरुडपाचूसी तेज दिसत ॥ मर्गजासी बिक चढत ॥ तनु सांवळी देखोनि ॥१४४॥तो वैकुंठींचा सुकुमार ॥ भक्तह्रन्मंदिरांगणमंदार ॥ कुरवंडी करावी साचार ॥ कोटि मकरध्वज करूनियां ॥१४५॥ब्रह्मांड फोडोनि बाहेरी ॥ अंगींचा सुवास धांवत वरी ॥ लावण्यामृत सागर कैटभारी ॥ लीलावतारी वेधक जो ॥१४६॥पूर्ण ब्रह्मानंद यादवेंद्र ॥ लीलाविग्रही श्रीकरधर ॥ ह्रदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेम बळें ॥१४७॥असो निघाला जेव्हां यादवेंद्र ॥ धर्में अनिवार महावीर ॥ सवें दिधले सहस्त्र शूर ॥ जे कालातें न लेखिती ॥१४८॥आणि कही सेवकांचीं चक्रें ॥ सेवा करणार चतुर निर्धारें ॥ सवें दिधले सूपशास्त्रें ॥ जाणते आणि हडपिये ॥१४९॥धृतराष्ट्रासी जाहलें श्रुत ॥ कीं गजपुरा येतो ॥ मन्मथतात ॥ तो सभेंत समस्तां आज्ञापीत ॥ जा हो समस्त सामोरे ॥१५०॥सन्मान करूनि बहुत ॥ सभेंत आणा तो भगवंत ॥ त्यासी पूजितां सुख अद्भुत ॥ अकल्याण न पूजितां ॥१५१॥दुर्योधना सभा श्रृंगारीं ॥ स्वहस्तें हरीची पूजा करीं ॥ असो श्रृंगारिली नगरी ॥ मखरें द्वारीं गुढिया बहू ॥१५२॥शक्रसभेहूनि आगळी ॥ सभा तेव्हां श्रृंगारिली ॥ ज्या मार्गें येत वनमाळी ॥ शिबिरें दिधलीं तये ठायीं ॥१५३॥जे जे स्थळीं राहात वनमाळी ॥ सेवक राबती उपचारीं सकळीं ॥ चंदनकस्तूरींचे सडे ते वेळीं ॥ शिंपितां सुगंध फांकतसे ॥१५४॥दुःशासनाचिये सदनीं ॥ वस्तीस स्थळ नेमिलें चक्रापाणी ॥ दुर्योधनाची दांभिक करणी ॥ कापटय अंतरीं कल्पोनियां ॥१५५॥पद्मदलाकार वदन ॥ वाचा शीतळ जेवीं चंदन ॥ परी ह्रदयीं कापटय दारुण ॥ दुर्योधन दुरात्मा तो ॥१५६॥अंतरीं शठत्व अपार ॥ शब्द सुरस बाहेर आदर ॥ परी चित्तांत परम कातर ॥ कापटय सागर दुरात्मा ॥१५७॥साधुवेष धरोनि शुद्ध ॥ यात्रेसी आले जैसे मैंद ॥ कीं वाटपाडे रजनींत प्रसिद्ध ॥ सिद्ध होऊनि बैसले ॥१५८॥जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतळपण ॥ कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥१५९॥तैसा तो पापी सुयोधन ॥ वरी वरी बोले गोड वचन ॥ शकुनि दुःशासन कर्ण ॥ तिघांसी एकांतीं बोला विलें ॥१६०॥म्हणे शिष्टाई करूं येतां कृष्ण ॥ त्यासी करावें येथें बंधन ॥ इतुकेनें पांडव बलक्षीण ॥ सहजचि मग जाहले ॥१६१॥त्रिकालज्ञानी जो विदुर ॥ त्यासी कळला सर्व समाचार ॥ तें जाणोनि गंगाकुमार ॥ म्हणे संहार होईल आतां ॥१६२॥तों येरीकडे नगर प्रदेशीं ॥ राहिला तेव्हां ह्रषीकेशी ॥ प्रातःकाळीं उठोनि गजपुरासी ॥ येता जाहला जगद्नुरु ॥१६३॥धृतराष्ट्र म्हणे सामोरें ॥ श्रीरंगासी जावें त्वरें ॥ सदनासी आणावें आदरें ॥ वाद्यगजरेंकरोनियां ॥१६४॥शकुनि सुयोधन दुःशासन कर्ण ॥ हे चौघे भिन्न करून ॥ अवघे निघाले जगज्जीवन ॥ आणावया सामोरे ॥१६५॥भीष्म द्रोण शारद्वत ॥ दळभाराशीं निघाला कृपीसुत ॥ आबालवृद्ध समस्त ॥ पौरजन धांवती पहावया ॥१६६॥आपुलिया गोष्ठीं गोपुरीं ॥ चढोनि पाहती नरनारी ॥ मंडपघसणी जाहली भारी ॥ कृष्ण सुकुमार पाहावया ॥१६७॥महाराज भवगज विदारक पंचानन ॥ त्यासी भेटले भीष्म द्रोण ॥ मग अनुक्रमें करून ॥ लहान थोर आलिंगिती ॥१६८॥ग्रहचक्रीं जैसा मित्र ॥ तैसा शोभे स्मरारि मित्र ॥ भक्तद्वेषी जे अमित्र ॥ त्यांसी शासन कर्ता जो ॥१६९॥लीलाविग्रही भगवंत ॥ मिरवत आला गजपुरांत ॥ धृतराष्ट्र गृहीं प्रवेशत ॥ अंबिकासुत आनंदला ॥१७०॥प्रज्ञाचक्षु उभा ठाकून ॥ श्रीरंगासी दिधलें आलिंगन ॥ मग कनकासनीं बैसवून ॥ विश्वपूज्य पूजिला ॥१७१॥सभेंत बैसला जगन्नाथ ॥ चौघे कपटी विलोकिती गुप्त ॥ सूर्य पहावया दिवाभीत ॥ भयभीत जैसे कां ॥१७२॥पूजिलें देखोनि जगज्जीवना ॥ परम खेद वाटे दुर्जनां ॥ मग तो सर्वज्ञ घेऊनि आज्ञा ॥ विदुरगृहा प्रति गेला ॥१७३॥विदुरें घालोनि लोटांगण ॥ नयनोदकें क्षाळिले चरण ॥ श्रीरंगाचे मुखावरून ॥ निंबलोण उतरिलें ॥१७४॥वस्तु ओंवाळोनि अपार ॥ याचकांसी देता जाहला विदुर ॥ आसनीं बैसवूनि उपचार ॥ पूजेचे सर्व समर्पिले ॥१७५॥म्हणे धन्य माझे नयन ॥ देखती श्रीरंगाचे चरण ॥ धन्य पर्व सुदिन ॥ आजि मज जाहलें ॥१७६॥अष्टमी नवमी चतुर्दशी ॥ दिनत्रय पुण्यराशी ॥ पिंडपितृयज्ञ महा मखासी ॥ निश्चयेंशीं केलें म्यां ॥१७७॥घरासी आला श्रीकरधर ॥ तरी इतुकें पुण्य जोडलें समग्र ॥ असो विदुराशीं एकांत विचार ॥ बहुत केला श्रीरंगें ॥१७८॥यावरी तो इंदिरावर ॥ प्रवेशे कुंतीचें मंदिर ॥ पितृभगिनीसी सर्वेश्वर ॥ वंदन करीत आदरें ॥१७९॥कुंती गळां मिठी घालून ॥ शोक करी पांडवांलागून ॥ मग श्रीरंगें तीस बैसवून ॥ वर्तमान सांगीतलें ॥१८०॥कुंती म्हणे जगजेठी ॥ उपजत माझीं बाळकें कष्टी ॥ अहा सृष्टिकर्त्या परमेष्ठी ॥ माझें प्राक्तन ऐसें कां ॥१८१॥मज टाकूनि काननास ॥ गेले पांचही राजहंस ॥ परम सुकुमार डोळस ॥ द्नुपदात्मजा गेली सवें ॥१८२॥तेरा वर्षें जाहलीं पूर्ण ॥ मी प्राणसखीस कै देखेन ॥ सभेसी गांजिली नेऊन ॥ तुवां मान रक्षिला तिचा ॥१८३॥कृष्णा पांडवांसी सांग त्वरित ॥ जरी तुम्ही असाल माझे सुत ॥ तरी युद्ध करूनि अद्बुत ॥ राज्य घ्यावें सर्वही ॥१८४॥मज दुःख जाहलें दिनरजनीं ॥ मम प्राणसखी तव भगिनी ॥ रजस्वला एकवसनी ॥ सभेंत दुर्जनीं गांजिली ॥१८५॥असो पितृभगिनी लागोनी ॥ संबोखी तेव्हां मोक्षदानी ॥ म्हणे जें जें असे तुझें ॥ तैसेंचि होऊनि येईल ॥१८६॥सभेसी बैसला सुयोधन ॥ तेथें सात्यकीसह गेला श्रीकृष्ण ॥ पुढें येऊनि अंधनंदन ॥ क्षेमालिंगन ॥ दिधलें पैं ॥१८७॥उत्तमासनीं बसैवून ॥ पूजिला जेव्हां जगज्जीवन ॥ जो त्रिभुवन सुंदर सुहास्यवदन ॥ त्यासी सुयोधन बोलत ॥१८८॥म्हणे आजि जगज्जीवना ॥ माझे गृहासी यावें भोजना ॥ परी न मानी यादवराणा ॥ वेदपुराणां वंद्य जो ॥१८९॥श्रीकृष्ण म्हणे दुयोंधना ॥ आम्ही आलों ज्या कारणा ॥ तें झालिया विण भोजना ॥ न करूं जाण सर्वथा ॥१९०॥पांडव माझे पंचप्राण ॥ त्यांशीं द्वेष करी जो अनुदिन ॥ त्याचे गृहीं सहसा भोजन ॥ कल्पांतींही मज घडेना ॥१९१॥मद्भक्तांचा द्वेष करी ॥ तोचि माझा मुख्य वैरी ॥ त्यासी मी नाना प्रकारीं ॥ निर्दाळीन सुयोधना ॥१९२॥विदुराचे मी आजि निजमंदिरीं ॥ भोजन करीन निर्धारीं ॥ ऐसें बोलूनि कंसारी ॥ उठोनि गेला स्वस्थाना ॥१९३॥भीष्म द्रोण जाऊनि तेथें ॥ प्रार्थिते जाहले श्रीहरीतें ॥ म्हणती विश्वव्यापका भोजनातें ॥ चला आमुचे सदनासी ॥१९४॥हरि म्हणे मी येईन भोजन ॥ परी समय नोहे आणा मना ॥ मग त्यांणीं घेऊनि आज्ञा ॥ स्वसदनासी गमन केलें ॥१९५॥मग विप्रांसह मनमोहन ॥ विदुरगृहीं करी भोजन ॥ विदुराची भक्ति देखून ॥ जगज्जीवन भाळला ॥१९६॥असो भोजन ॥ जाहलिया एकांतीं ॥ विदुर म्हणे जगत्पती ॥ हा दुर्योधन पापमती ॥ परम चांडाळ दुरात्मा ॥१९७॥तुम्ही येथें येवोनि कांहीं ॥ हा सर्वथा ऐकणार नाहीं ॥ त्याचे सभेसी कदाही ॥ न जावें तुम्हीं श्रीरंगा ॥१९८॥सैन्यबळें माजोनि कुमती ॥ जगत्पते तुझा द्वेष करिती ॥ त्यांचे सवें निश्चिती ॥ न बोलावें तुवां कदाही ॥१९९॥मग बोले जगज्जीवन ॥ चार गोष्टी पाहों सांगोन ॥ नायकती तरी दुर्जन ॥ फळें पावतील शेवटीं ॥२००॥असो ते रजनींत रमानाथ ॥ विदुरगृहीं निद्रा करीत ॥ उषःकालीं उठोनि समस्त ॥ सत्कर्मधर्म आटोपिती ॥२०१॥विदुरगृहासी ते क्षणीं ॥ येत दुर्योधन आणि शकुनी ॥ म्हणती वडील बैसले ते स्थानीं ॥ चक्रपाणी तुम्ही चला ॥२०२॥अवश्य म्हणे कमलाकांत ॥ निजरथीं बैसोनि त्वरित ॥ सवें घेतला विदुर भक्त ॥ निजरथावरी रमावरें ॥२०३॥शकुनि सुयोधन ॥ निजरथीं ॥ बैसोनि चालिले सभेप्रती ॥ सहस्त्र वीर सवें निघती ॥ श्रीरंगाचे तेधवां ॥२०४॥सौबल आणि तो सात्यकी वीर ॥ कृष्णरथीं बैसले प्रीतिपात्र ॥ सभे येतां जलदगात्र ॥ उभे ठाकती सर्वही ॥२०५॥श्रेष्ठासनीं बैसवून ॥ धृतराष्ट्रें पूजिला जगन्मोहन ॥ यावरी जें जाहलें वर्तमान ॥ तें पुढिले अध्यायीं परिसिजे ॥२०६॥पांडवप्रताप ग्रंथ सुंदर ॥ सकळ साहित्याचें भांडार ॥ ब्रह्मानंदें सांगे श्रीधर ॥ पंडित चतुर परिसोत कां ॥२०७॥हा असे वरद ग्रंथ ॥ जें कर्णीं सांगे पंढरीनाथ ॥ तेंचि लिहिलेंसे यथार्थ ॥ श्रीधर वदे श्रोतयां ॥२०८॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अडतिसाव्यांत कथियेला ॥२०९॥इति श्री श्रीधरकृतपांडप्रतापे उद्योगपर्वणि अष्टत्रिंशत्तमाध्यायः ॥३८॥ ॥ श्रीकृष्णार्पनमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP