मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५९५१ ते ५९६२

जनांस शिक्षा अभंग - ५९५१ ते ५९६२

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९५१॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान घर त्याचें ॥१॥
जये कुळीं नाहीं एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदी तापा ॥२॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥३॥
तुका ह्मणे त्याचे काष्ट हातपाय । किर्तना नवजाय हरीचिया ॥४॥

॥५९५२॥
ऐका ज्यानें विकली कन्या । पवाडे त्या सुण्याचे ॥१॥
नरमांस खादली भाडी । हाडाहाडी ह्मणउनी ॥२॥
तुका ह्मणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेचना ॥३॥

॥५९५३॥
आपण वेगळा विराटू । लागे भक्तीचा चावटू ॥१॥
तोंडीं सांगे याग । पाठीमागें विषय भोग ॥२॥
काय त्याचें ब्रह्मज्ञान । हें तो निकाचें साधन ॥३॥
अंगीं नाहीं भूतदया । तुका ह्मणे गेले वांयां ॥४॥

॥५९५४॥
नामाविण नर । जैसा कुंभाराचा खर ॥१॥
वरी बैसोनियां जाती । माती भरोनी घरा येती ॥२॥
सारा दिवस घरा येतो । सांज झाली सोडुनी येतो ॥३॥
तुका ह्मणे हेचि खट । खातो नरका भरली वाट ॥४॥

॥५९५५॥
लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
जेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥
तुका ह्मणे ऐसे लंड । आह्मी वाहिलें उदंड ॥४॥

॥५९५६॥
देखोदेखी बैसे संताचे संगती । परी नाहीं चित्तीं प्रेम भाव ॥१॥
पायांवरे पडे गडबडा लोळे । अंतरीं डोहळे द्वइतांचे ॥२॥
पाखांडानें माझा पुरविला दुमाळा । काय मी विठ्ठला बोलूं येथें ॥३॥
तुका ह्मणे खिळ पडो त्याच्या तोंडा । न बोलवे भांडा ऐशासवें ॥४॥

॥५९५७॥
कांरे निजलासी निदसुरा । जागा होय फजितखोरा ॥१॥
निद्रा काळाची बहिण । भुक केवळ राक्षसीण ॥२॥
आळस कुटुंबाचा वैरी । त्याणें बहु केला भिकारी ॥३॥
ऐसा आळसाचा परिवारी । हिंडतसे दारोदारीं ॥४॥
करी आळसाचा त्याग । जोडी नारायण श्रीरंग ॥५॥
तुका ह्मणे शिंदळीच्या । सोई धरी गाढवीच्या ॥६॥

॥५९५८॥
पिता सांगे पुत्रापाशीं । नको जाउं पंढरीसी ॥१॥
तेथें आहे एक भुत । भुतें झडपिलें बहुत ॥२॥
भुतें झडपिलें नारदा । धुरु आणि गा प्रल्हादा ॥३॥
भुत गोकुळासी गेलें । भुतें गोपाळ झडपिले ॥४॥
भुत पंढरीस आलें । सुतें पुंडलिका गोविलें ॥५॥
तुका सांगे जन्म जगो । भुत जन्मोजन्मी लागो ॥६॥

॥५९५९॥
झाला स्त्रियेसी लंपट । मायबापासी उद्धट ॥१॥
भय बापाचें न धरी । निंदा सज्जनाची करी ॥२॥
नेणे माय न मावसी । तेणें सांगावें कवणासी ॥३॥
तुका ह्मणे ऐसे लंड । आह्मी पाहिले उदंड ॥४॥

॥५९६०॥
ज्ञान सांगे पोटभरी । करणी अज्ञानाची करी ॥१॥
बाह्यात्कारें होय लीन । अंतरींचा भाव भिन्न ॥२॥
शब्दज्ञान सांगे गोष्टी । अनुभव नाहीं पोटीं ॥३॥
तुका ह्मणे ऐसे लंड । आह्मी पाहिले उदंड ॥४॥

॥५९६१॥
अनुताप नाहीं चित्तीं । काय वाचोनियां पोथीए ॥१॥
चित्तीं नाहीं अनुताप । काय करुनियां जप ॥२॥
गिता वाचे ज्ञानेश्वरी । भिकार्‍याला काठ्या मारी ॥३॥
तुका ह्मणे भावकर्म । काय केल्या न सुटे वम ॥४॥

॥५९६२॥
जितां पित्याची आबळ करी । मेल्या गौदान ब्राम्हणा करी ॥१॥
ऐसा कलियुगीं विचार । क्रियानष्ट झाले नर ॥२॥
जितां दु:खाचे डोंगर । करिती प्रेताचा आदर ॥३॥
तुका ह्मणे ऐसे नष्ट । ते भोगिती अति कष्ट ॥४॥


N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP