मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६५१ ते ५६६०

जनांस शिक्षा अभंग - ५६५१ ते ५६६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५६५१॥
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे आभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥२॥
आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥३॥
तुका ह्मणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥४॥

॥५६५२॥
अनुभवे वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥
कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥२॥
जातीऐसा दावी रंग । बहु जग या नांवें ॥३॥
तुका ह्मणे कद्योत तें । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥४॥

॥५६५३॥
परपीडक तो आह्मां दावेदार । विश्वीं विश्वंभर ह्मणऊनि ॥१॥
दंडूं त्यागूं बळें नावलोकूं डोळा । राखूं तो चांडाळ ऐसा दुरि ॥२॥
अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥३॥
तुका ह्मणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥४॥

॥५६५४॥
पुढें जेणें लाभ घडे । तेंचि वेडे नाशिती ॥१॥
येवढी कोठें नागवण । अंधारुन विष घ्यावें ॥२॥
होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरुं तें ॥३॥
तुका ह्मणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥४॥

॥५६५५॥
झालों ह्मणती त्याचें जना सोंग । दावी आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझे ॥१॥
शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥२॥
तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥३॥
पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥४॥
तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥५॥

॥५६५६॥
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार ॥१॥
घडों नेदीं तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥२॥
आपुलीच करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥३॥
तुका ह्मने गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥४॥

॥५६५७॥
देवाचिया वस्त्रा स्वप्नींही नाठवी । स्त्रियेसी पाठवीए उंच साडी ॥१॥
गाईचें पाळण नयेचि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥२॥
लेकराची रास स्वयें धांवे क्षाळूं । न ह्मणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥३॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥४॥

॥५६५८॥
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥
अतीत देखोनी होय पाठमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥२॥
द्विजा नमस्कारा मनीं भाव कैंचा । तुर्काचे दासीचा लेंक होय ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥४॥

॥५६५९॥
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशीं ॥२॥
देवाब्राह्मणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥३॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुर्गधीशीं अतिआदरें ॥४॥
तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥५॥

॥५६६०॥
चिरगुटें घालूनी वाढविलें पोट । गर्‍हवार बोभाट जनांमध्यें ॥१॥
लटिकेची डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥
तुका ह्मणे अंतीं वांझ तेची खरी । फजिती दुसरी जनांमध्यें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP