मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६८१ ते ५६९०

जनांस शिक्षा अभंग - ५६८१ ते ५६९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५६८१॥
संसाराचे धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥
हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥२॥
लाज तेवढी नारायणीं । वांकडी वाणी पोरांपें ॥३॥
तुका ह्मणे बेशरमा । श्रमावरी पडिभरु ॥४॥

॥५६८२॥
देवें दिला देह भजना गोमटा । तो या झाला भाटा बाधिकेच्या ॥१॥
ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥२॥
दास ह्मणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥३॥
तुका ह्मणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें निर्मळ व्हावयासी ॥४॥

॥५६८३॥
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥
तुका ह्मणे थुंका त्याचे तोंडांवरी । जातो यम पुरी भोगावया ॥३॥

॥५६८४॥
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥
आपल्या आपण नाहीं शोभा येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥२॥
खाणार ताकाचें असे तें माजीरें । आपणेंचि अधीर कळों येतें ॥३॥
तुका ह्मणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥४॥

॥५६८५॥
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥
लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईची घाणी ॥२॥
पुष्प जवळी नाका । दुर्गंधीच्या नांवें थुंका ॥३॥
तुका ह्मणे किती । उपदेशहीन जाती ॥४॥

॥५६८६॥
दर्पणासि बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥
गुण ज्याचा जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥२॥
चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥३॥
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥४॥

॥५६८७॥
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥२॥
नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतो ॥३॥
तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥४॥

॥५६८८॥
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा धरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥
जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥२॥
कामधेनु देखे जैशा गाईह्मैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥३॥
तुका ह्मणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥४॥

॥५६८९॥
तरी च हीं केलीं । दानें वाईट चांगलीं ॥१॥
एकें एका शोभवावें । केलें कवतुक देवें ॥२॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥३॥
तुका ह्मणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥४॥

॥५६९०॥
अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥१॥
नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥
तुका ह्मणे नांदों आपल्या प्रतापें । तयाची लोकांपें स्तुती सांगों ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP