जनांस शिक्षा अभंग - ५५३१ ते ५५४०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५५३१॥
देखोनि हरखली अंड । पुत्र झाला ह्मणे रांड ॥
तंव तो झाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पिडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥
थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥२॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचे शरीरें ॥
बोले निष्ठुर उत्तरें । पापदृष्टि मळिणचित्त ॥३॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ।
तुका ह्मणे खळ ह्मणोनियां निषिद्ध तो ॥४॥
॥५५३२॥
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरुनि गोविंदा ॥२॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥३॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥४॥
॥५५३३॥
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥
हो कां नर अथवा नारी । रांड तये नांवें खरी ॥२॥
नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥३॥
बोलियेली संतीं । केली बोडोनी फजिती ॥४॥
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥५॥
॥५५३४॥
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळा आणिकाचें देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥२॥
कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रुप दावी कुष्टी मळिण वरी ॥३॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥४॥
॥५५३५॥
देखोनी पुराणिकाची दाढी । रडे फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरें दिसे जनां । भिन्न भावना ॥२॥
आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥३॥
बोलों नये मुखावाटां । ह्मणे होतां त्यांचा तोटा ॥४॥
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी ह्मणे होय ॥५॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥६॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥७॥
तुका ह्मणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥८॥
॥५५३६॥
अतिवादी नव्हे शुद्धया वीजाचा । ओळखा जातीचा अत्यंज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥२॥
तुका ह्मणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥३॥
॥५५३७॥
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंबे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो ह्मणे इतर लोक तैसे ॥२॥
तुका ह्मणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥
॥५५३८॥
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥१॥
कैसा पाहे चर्मदृष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥२॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥३॥
तोचि कानीं होणे । कोण बोंब तुका ह्मणे ॥४॥
॥५५३९॥
छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥
येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥२॥
नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥३॥
तुका ह्मणे याति । भ्रष्ट तयाची ते मति ॥४॥
॥५५४०॥
मांडवाच्या दारा । पुढें आणिला ह्यातारा ॥१॥
ह्मणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥२॥
समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥३॥
तुका ह्मणे खरा । येथुनियां दूर करा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP