जनांस शिक्षा अभंग - ५६४१ ते ५६५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५६४१॥
आपल्या च स्फुंदें । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहू फार त्यासी घोळ ॥२॥
विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥३॥
तुका ह्मणे घाणा । मुढा तीर्थी प्रदक्षिणा ॥४॥
॥५६४२॥
खळा सदा क्षुद्रीं वृष्टि । करी कष्टी सज्जना ॥१॥
करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥२॥
दया संता भांडवल । वेचि बोल उपकार ॥३॥
तुका ह्मणे आपुलालें । उसंतिलेंज्यांणीं तें ॥४॥
॥५६४३॥
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥१॥
पाहें संतांकडे । दोष दृष्टी पाहे भीडे ॥३॥
उंच निंच नाहीं । तुका ह्मणे खळा कांहीं ॥४॥
॥५६४४॥
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हे बरें उभयलोकीं ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥२॥
संतांपाशीं ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचे झाले दोष बळिवंत ॥३॥
तुका ह्मणे क्षीर वासराच्या अंगे । किंवा धांवे लागें विषमें मारुं ॥४॥
॥५६४५॥
उदकीं कालवीं शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥
उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणा संतांचिया ॥२॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाचीच मूतिं ॥३॥
तुका ह्मणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥४॥
॥५६४६॥
उकाडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची जे जोडी तेची चित्तीं ॥१॥
कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥२॥
काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तोंचि बरें ॥३॥
तुका ह्मणे काय उपदेश वेडया । संगें होतो रेडयासवें कष्ट ॥४॥
॥५६४७॥
आपुल्याचा भोतचाटी । मारी करंटी पारख्यां ॥१॥
ऐसे जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढव्वी ॥२॥
गळ गिळी आमिषे मासा । प्राण आशा घेतला ॥३॥
तुका म्हणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥४॥
॥५६४८॥
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥२॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥३॥
तुका म्हणे ग्यानगड । सुखें पावो देवा नाड ॥४॥
॥५६४९॥
लावूनियां पुष्टी पोर । आणि करकर कथेमाजी ॥१॥
पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥२॥
कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हें नासीतसे ॥३॥
तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥४॥
॥५६५०॥
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहू अनर्गळ झाले विषयीं ॥१॥
नाहीं भेद म्हूण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥
तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP