मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७४१ ते ५७५०

जनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५७४१॥
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥२॥
स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥३॥
तुका ह्मणे जडा । काय चाले या दगडा ॥४॥

॥५७४२॥
विती येवढेंसे पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥२॥
अभिमाना  सिरीं भार । झाले खर तृष्णेचे ॥३॥
तुका म्हणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥४॥

॥५७४३॥
देखोवेखीं करिती गुरु । नाहीं ठाउका विचारु ॥१॥
वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥२॥
शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥३॥
तुका ह्मणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥४॥

॥५७४४॥
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकार ज्ञान ॥१॥
त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाण ॥२॥
प्रेतदेह गौरविलें । तैसें विटंबवाणें झालें ॥३॥
तुका ह्मणे खाणें विष्टा । तैशा देहबुद्धि चेष्टा ॥४॥

॥५७४५॥
बाईल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥१॥
सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥२॥
जातां पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥३॥
न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥४॥
फजित केले जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं ॥५॥
गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥६॥
तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥७॥

॥५७४६॥
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडीच साटीं ॥२॥
निंदी कोणा स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥३॥
तुका ह्मणे भांड । जळो जळो त्याचें तोंड ॥४॥

॥५७४७॥
द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥२॥
कथाकाळी निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥३॥
भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥४॥
तुका ह्मणे जाण । नर गाढवाहुनि हीन ॥४॥

॥५७४८॥
संताचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥२॥
तुका ह्मणे गंगे अग्नीसी विटाळ । लावी तो चांडाळ दु:ख पावे ॥३॥

॥५७४९॥
चुंबळीचा करी चुंबळीशीं संग । अंग वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसें फळ दावे परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥२॥
माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडुनियां सुना बिदी धुंडी ॥३॥
तुका ह्मणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढे ॥४॥

॥५७५०॥
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥२॥
प्रेमसुखा आड । काय वाजतें चाभाड ॥३॥
तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP