मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५५६१ ते ५५७०

जनांस शिक्षा अभंग - ५५६१ ते ५५७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५५६१॥
आह्मां हें कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥२॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥३॥
तुका ह्मणे येथें खर्‍याचा विकार । न सरती येरा खोटया परी ॥४॥

॥५५६२॥
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥२॥
अंधळ्यास काय हिरा । गारांचि तो सारिखा ॥३॥
तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥४॥

॥५५६३॥
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडी बरळे ॥१॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसाडे ॥२॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥३॥
तुका ह्मणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी ॥४॥

॥५५६४॥
बरगासाठी खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥२॥
ओढाळावी वोंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥३॥
तुका फजीत करी बुच्या । विसरे कुच्या खोडी तेणें ॥४॥

॥५५६५॥
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा झालासे बेश्रम । लाज नाहीं न ह्मणे राम ॥२॥
पाहे वैरियाकडे । डोळे वासुनियां रडे ॥३॥
बांधुनियां यमाहातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥४॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥५॥
अझून तरि मुका । कांरे झालासि ह्मणे तुका ॥६॥

॥५५६६॥
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्‍या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥२॥
काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥३॥
तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥४॥

॥५५६७॥
तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥१॥
काय सांगावें त्याहुनी । ऐका रे धरा मनीं ॥२॥
नव्हे भांडखोर । ओढूनि धरुं पदर ॥३॥
तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥४॥

॥५५६८॥
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥
घरीं देउनि अंतर गांठी । राखा पारिख्यां न सुटे मिठी ॥२॥
घाला पडे थोडेंच वाटे । काम मैंदाचेंच पेटे ॥३॥
तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥४॥

॥५५६९॥
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचेसाठीं विकूं पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचे । निवडी दोहींचें वेगळालें ॥२॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥३॥
तुका म्हणे थीता नागवलाचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥४॥

॥५५७०॥
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥२॥
उपजतां बरें दिसे । रुप वाढतां तें नासे ॥३॥
तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP