मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८७१ ते ५८८०

जनांस शिक्षा अभंग - ५८७१ ते ५८८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८७१॥
देवब्राह्मणांसी न जाय शरण । दासीचे चरण भावें वंदी ॥१॥
संतासी देखुनी करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासिचिया ॥२॥
तुका म्हणे ऐसे जे मुर्ख जहाले । जन्मोनियां गेले भारवाही ॥३॥

॥५८७२॥
घरीं अखंड जांवई । कर्ज काढी सासूबाई ॥१॥
ऐसें मायेचें लक्षण । तुम्ही पहावें शोधून ॥२॥
दारीं ब्राह्मण भिक्षा मागे । नाहीं म्हणुनी सुनें सांगे ॥३॥
आशेसाठीं भुलल्या बाया । तुका म्हणे गेल्या वांया ॥४॥

॥५८७३॥
अवचित लावी अग्न ॥ विष दान मोलाचें ॥१॥
वृत्ती हरी बलात्कारें । खोटें खरें न पाहे ॥२॥
रवरव कुंभपाक । भयानक अघोर ॥३॥
दु:ख भोगी बहु काळ । तो चांडाळ कुळेंसी ॥४॥
सुटलिया वांया जाय । बधिर होय पांगुळा ॥५॥
जीव नाहीं हात खुळे । फुटले डोळे गर्भांध ॥६॥
तेज नाहीं अंगकांती । अंगें वहाती दुर्गंधी ॥७॥
तुका म्हणे केला सांठा । बुद्धि फांटा दोषांचा ॥८॥

॥५८७४॥
दया नाहीं हृदयचित्तीं । काय वाचोनियां पोथी ॥१॥
नाहीं धर्माची वासना । काय घालोनीं प्रदक्षना ॥२॥
नाहीं संतमहंतां मान ॥ काय वाचोनी पुराण ॥३॥
तुका म्हणे हे किती । नरका गेले पुढें जाती ॥४॥

॥५८७५॥
चंद्रकळा चोळी आणा । तेव्हां उदक देईन स्नाना ॥१॥
सोनसळे आणा गहूं । मग मी तुम्हा घालीन जेऊं ॥२॥
माझी हौस न पुरविली । मज दुल्लड नाहीं केली ॥३॥
तिखट जाहली गे कढी । ऐसें म्हणतां धरली दाढी ॥४॥
तुका म्हणे बाइल खोटी । तेथें कैंची सुखगोष्टी ॥५॥

॥५८७६॥
जाय तिकडे पिडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥
थोर झाल्या चुका । वर कां नाहीं घातली ॥१॥
भुमी कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥
निष्ठुर उत्तरें । पापदृष्टी मळीण चित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥३॥
तुका म्हणे खळ । म्हणोनियां सिद्धतो ॥४॥

॥५८७७॥
मुखें बोलतो वाचाळ । अंतरीं विषय सकळ ॥१॥
शरीर जहालेंसे मलीन । बहु भरले दुर्गुण ॥२॥
काम क्रोध हेलावती । दश इंद्रियें फांकती ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥५८७८॥
जेथें वसे थोरपण । तेथें कैंचा नारायण ॥१॥
मीच एक थोर जाण । ऐसें मिरवी भुषण ॥२॥
अंगीं भरलासे ताठा । गळा घालोनियां गेठा ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥५८७९॥
आह्मी जातो वाराणसी । जतन करा गाई म्हशी ॥१॥
हात लावाल पेंवतोंडा । वरील खावा कण्या कोंडा ॥२॥
ब्राह्मणासी घालाल अन्न । तरी कापाल माझी मान ॥३॥
पाहुणा राउळ येईल घरा । तुह्मी नि:शंक धोंडे मारा ॥४॥
कोण येईल आप्त सखा । तुह्मी चुल पेटवूं नका ॥५॥
तुका ह्मणे परतोन येसी । नाहीं भरंवसा देहासीं ॥६॥

॥५८८०॥
स्मरे रामनामा । त्यासी ह्मणे जो रिकामा ॥१॥
काय त्याचें व्यर्थ जिणें । खळवादी तो दुर्जन ॥२॥
तीर्थ व्रत करी । तया ह्मणतो भिकारी ॥३॥
करी धर्म दानें । त्यासी अभागिया ह्मणे ॥४॥
जप तप नेम । ह्मणे करी त्या अधम ॥५॥
भाविक जो भोळा । त्यासी म्हणती दुबळा ॥६॥
तुका म्हणे अंतीं । यमपुरीं त्यासी वस्ती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP