मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५५७१ ते ५५८०

जनांस शिक्षा अभंग - ५५७१ ते ५५८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५५७१॥
विचार नाहीं नर खर तो ऐसा । वाहे ज्ञान पाठीं भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणें त्यासी तोंच वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥२॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरुनि सांडी पायां लागली ते विष्ट ॥३॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥४॥

॥५५७२॥
यथार्थ वाद सांडुनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरितां सांगे कुठार्‍याचें नांव । दोघांचेही पाव हात जाती ॥२॥
तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥

॥५५७३॥
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥
बासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥२॥
समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥३॥
तुका म्हणे काय वांयां चाळणी । पिट पिट घाणी हागवणेंची ॥४॥

५५७४॥
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥२॥
त्याचियानें दु:खी मही । भार तेही न साहे ॥३॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु आयुष्या ॥४॥

॥५५७५॥
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥
नाठेळाची भक्ति कुचराचें वळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥२॥
सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥३॥
तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धंदधंद सिंदळीचे ॥४॥

॥५५७६॥
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनियां ॥१॥
हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥२॥
हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेषें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥३॥
तुका ह्मणे पाहा ऐसें झालें जन । सेवाभक्तिहीन रसीं गोडी ॥४॥

॥५५७७॥
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरि मन ॥१॥
असोनियां नसे कथे । मूर्ख आभाग्य तें तेथें ॥२॥
निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥३॥
पापाचे सांगती । तोंडीं ओढाळांचे माती ॥४॥
हिताचिया नांवे । वोस पडिले देहभावें ॥५॥
फजित करुनि सांडी । तुका करी बोडाबोडी ॥६॥

॥५५७८॥
काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥
केलें हरिकथेनें वाज । अंतरोनि जाते निज ॥२॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥३॥
तुका ह्मणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥४॥

॥५५७९॥
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥
व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥२॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥३॥
तुका ह्मणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥४॥

॥५५८०॥
लटिकें तें रुचे । साच कोणांही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥२॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥३॥
कांहीं न मनी हेकड । तुका उपदेश माकड ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP