मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५९३१ ते ५९४०

जनांस शिक्षा अभंग - ५९३१ ते ५९४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९३१॥
झालासी शहाणा । होसी संसारवहाणा ॥१॥
भारें नमताती खर । चाले चोरटें मांजर ॥२॥
हाणितां टाळेंत । नेणें होतसे फजित ॥३॥
तुका न मनीं तिकीर । म्हणे हड हड शिर ॥४॥

॥५९३२॥
सांगतांही नाइकती । करुं किती फजित ॥१॥
अवगुणी अप्रमादि । दुर्बुद्धि ते मांजरी ॥२॥
नेघे शिकवी हें कडू । माकडूं हिता नेणें ॥३॥
तुका म्हणे क्रोध उठी । बुद्धि खोटी सांडीना ॥४॥

॥५९३३॥
बेटया सांगतां नाईके । दाटबळें भोगी नर्क ॥१॥
नर लेखी सद्गुरुसी । भस्म आयुष्याच्या राशी ॥२॥
लाजे संता नमस्कारा । धन आयुष्याचा चुरा ॥३॥
तुका म्हणे सांगों किती । काळकुष्टाआंग होती ॥४॥

॥५९३४॥
आयुष्य जयासी बहु असे वृद्धि । वडिलांची बुद्धि श्रेष्ठ होय ॥१॥
आणिली मांडवा बुद्धिसी विचारा । नाहीं वोढावारा मुखालागीं ॥२॥
आला मेला वर लक्ष्मी आणा । कुंभ शिरीं जाणा भरुनियां ॥३॥
मुद ओंवाळावी सांडा धोंडामाती । ओंवाळा आरती मुडतर ॥४॥
शोभनीं अशुभ थोरपण कैसें । बुद्धिसी प्रकाश आवडीसी ॥५॥
तुका ह्मणे काढा बाहेरी येथूनी ॥ याहूनी दुरुनी वेगळाची ॥६॥

॥५९३५॥
देवाचें पूजन न करीच भावें । वेश्येलागीं द्यावे आलंकार ॥१॥
ब्राह्मण अतीथि न घडे पंगती । दासीलागीं प्रीति जेऊं घाली ॥२॥
कुटुंबाची सेवा करितां विटेना । संतांच्या पूजना विट मानी ॥३॥
करी अनाचार श्वानालागीं क्षेम । नाहीं नित्य नेम स्वप्नामाजी ॥४॥
तुका ह्मणे नाहीं कुळधर्म ठावा । यमाचा जाणावा पाहुणा तो ॥५॥

॥५९३६॥
बाळपणीं लळे खेळतोचि वांया ॥ नेणपण जाया ऐसें गेलें ॥१॥
कैसा तारुण्यांत कोणासी न मानी । वसे ताठा मनीं अभिमान ॥२॥
अंगाचिया मदें न बोले कोणासी । डोळे ते पाठीसी नेले तेणें ॥३॥
चवडयावरी चाले मिशांवरी हात । विषयासी हित मेंढा जैसा ॥४॥
कैसी वृद्धपणीं अशक्तता आली । इंद्रियें आपुलीं पारखी तो ॥५॥
तुका ह्मणे अंतीं बैसे यमदंड । पाप पुण्य लंड न विचारी ॥६॥

॥५९३७॥
नाहीं वेदश्रुती ग्रंथाचें श्रवण । श्रेष्ठाचें वचन न मानी तो ॥१॥
नाम नावडे तो करी बोहरी ॥१॥
नाहीं त्याची खरी चित्त शुद्धी ॥२॥
चोरी जारी मारी म्हणतां थरारे ॥ कांहीं तो न स्मरे हरिनाम ॥३॥
तुका ह्मणे जळो जळो त्याची मति । लटिकी ते स्फिती नामाविण ॥४॥

॥५९३८॥
नाहीं भूत दया जया । थोर ह्मणवी कासया ॥१॥
नाहीं दया धर्म चित्तीं । व्यर्थ दंभत्वें मरती ॥२॥
भूतदयेची वासना । कदां नुपजे पाषाणा ॥३॥
तुका ह्मणे शांती । नये त्यापासीं श्रीपती ॥४॥

॥५९३९॥
पंडितांनीं भक्ति मारग उदेला । करी गलबला विवादाचा ॥१॥
नाहीं वर्म ठावें आहें मी कवण । कोठील हें कोण कैचें एथें ॥२॥
सांडिला आचार सत्कर्म हा नेम । पोटासाठीं श्रम राजद्वारीं ॥३॥
एका निषेधासी एकाशीं स्थापावें । तेणें काय द्यावें योग्य होतें ॥४॥
तुका ह्मणे जातां मारग चुकला । मूल गलबला करीतसे ॥५॥

॥५९४०॥
भूषण जगांत तुवां तें साधिलें । धन सांपडलें विद्या थोर ॥१॥
तयामाजि सार कोणता प्रकार । ऐसा हा विचार न पाहेचि ॥२॥
मीच श्रेष्ठ ज्ञानी सांगतो कहाणी । पंडित होऊनी दारोदारीं ॥३॥
एकासी छळावें वादप्रतिवादीं । भाविकासी निंदी मूढ म्हूण ॥४॥
यांत तुला काय लागलेंसे हातीं । विवाद प्रवृत्ति काय काज ॥५॥
तुका ह्मणे मुर्खा न कळेचि देखा ॥ हातासी मृत्तिका तेही नये ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP