जनांस शिक्षा अभंग - ५५२३ ते ५५३०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५५२३॥
सुखें वोळंब दावीं गोहा । माझें दु:ख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥२॥
निपट मज न चले । अन्न पातली गहूं सांजा तीन ॥३॥
गेले वारीं आणिली साकर । सात दिवसा दाहा शेर ॥४॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर पथ्या ॥५॥
दो पाहारा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥६॥
नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥७॥
अंगीं चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥८॥
हाड गळोनि आलें मास । माझें दु:ख तुह्मां नेणवे कैसें ॥९॥
तुका ह्मणे जिता गाढव केला । मिलियावरि नरका गेला ॥१०॥
॥५५२४॥
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातों भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥२॥
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिलें डोकें सांडिला मोहो ॥३॥
शेजारणीच्या गेली रागें । कुतर्यांनीं घर भरिलें मागें ॥४॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥५॥
तुका ह्मणे वांच्या रागे । फेडिले सोंवळें देखिलें जगें ॥६॥
॥५५२५॥
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥२॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥३॥
नेणे शब्द पर । तुका ह्मणे परउपकार ॥४॥
॥५५२६॥
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥२॥
भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥३॥
तुका ह्मणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥४॥
॥५५२७॥
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच झाला नष्टा । आवघ्या अपसव्य चेष्टा ॥२॥
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥३॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥४॥
॥५५२८॥
दानें कांपे हात । नावडे तेविशीं मात ॥१॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥२॥
न वजती पाय । तीर्था म्हणे वेचूं काय ॥३॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥४॥
॥५५२९॥
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज । माता त्याचि लाज लावा पापी ॥२॥
परपीडे परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचें ॥३॥
न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहावे दोष सकळही ॥४॥
परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥५॥
तुका ह्मणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥६॥
॥५५३०॥
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥
नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥२॥
माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥३॥
तुका ह्मणे चित्त । मळिण करा तें फजित ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP