मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६६१ ते ५६७०

जनांस शिक्षा अभंग - ५६६१ ते ५६७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५६६१॥
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचताती पुढें संसाराच्या ॥१॥
झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥२॥
हात दांत कान हालविती मान । दाखविती जन मानावया ॥३॥
तुका ह्मणे किती झालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥४॥

॥५६६२॥
संतांच्या हेळणें वाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥२॥
संताचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विटाळ बहु त्याचा ॥३॥
तुका ह्मणे केली प्रज्ञा याच साठीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥४॥

॥५६६३॥
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥
कैचें पुण्य तया गांठीं । व्रतें वेची लोभासाठीं ॥२॥
वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य ॥३॥
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥४॥
तुका ह्मणे मोल । देऊन घेतला सोमवल ॥५॥

॥५६६४॥

गुरुपादाग्रींचे जळ । त्यास मानी जो विटाळ ॥१॥
संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥२॥
गुरुतीर्थी अनमान । यथासांग मद्यमान ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥५॥

॥५६६५॥
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥
आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥२॥
इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरीं वास लागे ॥३॥
तुका ह्मणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाठीं ॥४॥

॥५६६६॥
पुत्र झाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥
आतां काशासाठीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥२॥
ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥३॥
मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥४॥
झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटी ॥५॥
तुका म्हणे बेटया । भांडवल नलगे खटया ॥६॥

॥५६६७॥
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥
जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥२॥
काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥३॥
तुका ह्मणे गुण । दरुषणें अपशकुन ॥४॥

॥५६६८॥
दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥
जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥२॥
घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥३॥
तुका ह्मणे धीरें । देव नुपेक्षील खरें ॥४॥

॥५६६९॥
काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिल ॥१॥
तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ॥२॥
न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसें ॥३॥
तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्टा ॥४॥

॥५६७०॥
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥
नारायणाचिया लोपें । घडलीं अवघींचि पापें ॥२॥
जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥३॥
तुका ह्मणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP