मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६२१ ते ५६३०

जनांस शिक्षा अभंग - ५६२१ ते ५६३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५६२१॥
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥
अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये वळा सिक धरा ॥२॥
भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥३॥
तुका ह्मणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥४॥

॥५६२२॥
धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥
जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्मे ॥२॥
विषयांचा माज । कांहीं धरुं नेदी लाज ॥३॥
तुका ह्मणे लांसी । माया नाचविते कैसी ॥४॥

॥५६२३॥
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥
पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥२॥
न ह्मणे रामराम । मनें वाचे हेंचि काम ॥३॥
तुका ह्मणे भागा । आली निंदा करी मागा ॥४॥

॥५६२४॥
न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥२॥
करावें लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥३॥
न कळे उचित । तुका ह्मणे नीत हित ॥४॥

॥५६२५॥
माहार मातें चपणी भरे । नकळे खरें पुढील ॥१॥
वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी नलगेचि ॥२॥
श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥३॥
तुका ह्मणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥४॥

॥५६२६॥
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥
जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥२॥
मेला राखे दिस । ज्यालेपण झालें वोस ॥३॥
तुका ह्मणे देवा । लोभें न पुरेचि सेवा ॥४॥

॥५६२७॥
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीनें गोविंदा हेंचि एक आवडे ॥१॥
टाळ वाद्य गीत नृत्य अंत:करणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥२॥
नये अळसें मोडूं अंग कथे कानवडे ढुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥३॥
तोंडीं विडा माने ताठा थोरपणें घाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥
कथे इच्छी मान दावूनियां थोरपण । रजा संकोच न लुगडीं सावरी तो चांडाळ ॥५॥
आपण बैसे बाजेवरी सामान्य हरिच्या दासां धरी तरि तो सुळावरी वाहिजे निश्चयेसी ॥६॥
येतां न करी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न ह्मणतां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥७॥
तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणाऋणी समर्थ भावें ॥८॥

॥५६२८॥
जन्मांतरीचा परीट न्हावी । जात ठावी त्यानें ते ॥१॥
वाखर जैसा चरचरी । तोंड करी संवदणी ॥२॥
पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥३॥
तुका ह्मणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥४॥

॥५६२९॥
नाम दूषी त्याचें नको दरुषण । विष तें वचन वाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाइकजे कानीं । निंदेची पोहणी उठे तेथें ॥२॥
काय साच लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥३॥
काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करुं ॥४॥
तुका म्हणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥५॥

॥५६३०॥
कावळियासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥
तैसें कुधनाचे जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥२॥
कडु भोंपळयाचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥३॥
तुका ह्मणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP