मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५५९१ ते ५६००

जनांस शिक्षा अभंग - ५५९१ ते ५६००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५५९१॥
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥
एकाविण एका । कैंचें मोल होतें फुका ॥२॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥३॥
काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥४॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥५॥
तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥६॥

॥५५९२॥
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥१॥
करिती पातकांची धनी । मोल न घेतां साबणीं ॥२॥
फुकाचे मजुर ओझें वागविती भार ॥३॥
पार उतरुं ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥४॥

॥५५९३॥
दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला ॥
पालथे घागरी घातलें जीवन । न धरीच जाण तेंही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणें पतनचि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा ॥
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हें आले संवसारा ॥२॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो ॥
कुचर मुग नयेचि पाका । पाहतां सारिखा होता तैसा ॥३॥
तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रयत्न कांहीं ।
ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥४॥

॥५५९४॥
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥
रागें यमधर्म जाचविती तया । तुज दिलें कासया मुख कान ॥२॥
विषयांच्या सुखें अखंड जागसी । न वजे एकादशी जागरणा ॥३॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥४॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥५॥
तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥६॥

॥५५९५॥
बोलविसी माझें मुख । परिया जना वाटे दु:ख ॥१॥
जया जयाची आवडी । तयालागी ते चरफडी ॥२॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगीं मेळवी दाढा ॥३॥
खाऊं नये तेंचि मागे । निवारितां रडूं लागे ॥४॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥५॥
नये भीडा सांगों आन । पथ्य औषधा कारण ॥६॥
धन माया पुत्र दारा । हें तों आवडी नरका थारा ॥७॥
तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥८॥

॥५५९६॥
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥२॥
सुखपुराणी आचारशीळा । दु:ख वाटे अनर्गळा ॥३॥
शूरा उल्हास अंगीं । गांढया मरण ते प्रसंगीं ॥४॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन कळें धांवे रंगीं ॥६॥
तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरां ॥७॥

॥५५९७॥
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥
पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥२॥
जाणों त्याच्या वाचें । कांहीं सोडिलें गांठीचें ॥३॥
तुका ह्मणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥४॥

॥५५९८॥
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥२॥
विंचु हाणी नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥३॥
तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥४॥

॥५५९९॥
काय सर्पा खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥२॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥३॥
तुका ह्मणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥४॥

॥५६००॥
आणिकां छळावया झालासी शहाणा । स्वहिता घातलें खानें ॥
आडिके पैके करुनि सायास । कृपणें सांचलें धन ॥
न जिरे क्षीर श्वानासी भक्षितां । याती तयाचा गुण ॥
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ॥
घेऊनि स्फटिकमणि टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥२॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखें फळ ॥
सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती । वरुषलें सर्वत्र जळ ॥
कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ॥
तैं चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष झालें त्याची गरळ ॥३॥
भक्षूनी मिष्टान्न साकर । सहित सोलूनी केळें ॥
घालूनीयां घसां अंगोळिया । वांति करुं पाहे बळें ॥
कुंथावयाची आवडी वोंवा । उन्हवणी रडती बाळें ॥
तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पावती तैसींच फळें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP