मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७६१ ते ५७७०

जनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५७६१॥
उभय भाग्यवंत तरीच समान । स्थळीं समाधान तरीच राहे ॥१॥
युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥२॥
लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥३॥
तुका ह्मणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥४॥

॥५७६२॥
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥
तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अभक्त ते ॥२॥
केवडयामधील निर्गध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥३॥
तुका ह्मणे जेवीं चंदनांतील आळी । न चढे निढळी देवाचिया ॥४॥

॥५७६३॥
अल्प विद्या परि गर्वाशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोण आहे ॥१॥
अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥२॥
सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥३॥
संतांची जो निंदा करी मुखीं जप । खतेलें तें पाप वज्रलेप ॥४॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥५॥

॥५७६४॥
अशाबद्ध वक्ता । भय श्रोतियांच्या चित्ता ॥१॥
गातो तेंचि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥२॥
झालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ॥३॥
माप आणि गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥४॥

॥५७६५॥
संतचरणीं नाहीं गोडी । ज्यासी विषयीं आवडी ॥१॥
त्यासी कैंचा भेटे देव । संतचरणीं नाहीं भाव ॥२॥
संतसेवेसी आंग चोरी । दृष्टि न पडो तयावरी ॥३॥
पाहे गुणदोष संताचे । जळो काळें तोंड त्याचें ॥४॥
तुका ह्मणे संतसेवा । आमुच्या पूर्वजांचा ठेवा ॥५॥

॥५७६६॥
जेवितां ही धरी । नाक हागतिया परी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥२॥
सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥३॥
तुका ह्मणे करी । ताका दुधा एक सरी ॥४॥

॥५७६७॥
माकडें मुठीं धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥२॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥३॥
तुका ह्मणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव । कांहीं तेथें ॥४॥

॥५७६८॥
मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥२॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें बचन जाळावें तें ॥३॥
तुका ह्मणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥४॥

॥५७६९॥
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठीं । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥
मालाचे पैं पेटे वाहताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥२॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥३॥
ज्यासे असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥४॥
तुका ह्मणे शहाणा होईरे गव्हारा । चौर्‍यांशीचा फेरा फिरों नको ॥५॥

॥५७७०॥
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥२॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥३॥
तुका ह्मणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP