जनांस शिक्षा अभंग - ५५४१ ते ५५५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५५४१॥
कांहीं नित्य नेमाविण । अन्न खाय तोचि श्वान ॥
वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥
झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥२॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोलेचि स्वप्नीं ॥
पापी तयाहुनी । आणिक नाहीं दुसरा ॥३॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥
पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥४॥
कांहीं संतांचें पूजन । न घडे तीर्थाचें भ्रमण ॥
यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥५॥
तुका ह्मणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥
देवा विसरुनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥
॥५५४२॥
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥२॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥३॥
तुका म्हणे नाचति पोरं । खोडितां येरें अंग दुखे ॥४॥
॥५५४३॥
जेणें मुखें स्तवी । तेंचि निंदेपाठी लावी ॥१॥
ऐसी अधमाचि याती । लोपी सोनें खाय माती ॥२॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥३॥
विंचू लाभाविण । तुका म्हणें वाहे शीण ॥४॥
॥५५४४॥
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥
विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयांविण ॥२॥
सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥३॥
तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥४॥
॥५५४५॥
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥२॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥३॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥४॥
॥५५४६॥
धिग जीणें तो बाईले आधीन । परलोक मान नाहीं दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडेचि ना ॥२॥
धिग जिणें आलस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥३॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानलागीं साधुपणा ॥४॥
तुका ह्मणे धिग ऐसे झाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥५॥
॥५५४७॥
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥२॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥३॥
तुका ह्मणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥४॥
॥५५४८॥
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्हाडीचा दांडा । वरग घलीच तोंडा ॥२॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥३॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्तांची माय ॥४॥
॥५५४९॥
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे ह्मैसी ॥१॥
गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवंसा ॥२॥
नका काढूं माझीं पेवें । तुह्मीं बरळा भूस खावें ॥३॥
भिकारियाचे पाठीं । तुह्मी घेउनि लागा काठी ॥४॥
सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान ॥५॥
वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥६॥
तुह्मी खावें ताकपणी । जतन करा तूपलोणी ॥७॥
नाहीं माझे मनी । पोरें रांडा नागवणी ॥८॥
तुका ह्मणे नीट । होतेम तैसें बोले स्पष्ट ॥९॥
॥५५५०॥
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें ॥१॥
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥२॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥३॥
तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP