जनांस शिक्षा अभंग - ५६३१ ते ५६४०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५६३१॥
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥
समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥२॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन ते ॥३॥
तुका ह्मणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥४॥
॥५६३२॥
ढेंकणासी बाज गड । उत्तरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥२॥
बोरामध्यें वसे अळी । अठोळीच भोंवती ॥३॥
पोटासाठीं वेंची चणे । राजा ह्मणे तोंडें मी ॥४॥
बेडकांनीं चिखल खावा । काय ठावा सागर ॥५॥
तुका ह्मणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥६॥
॥५६३३॥
हेंदर्याचे भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥२॥
अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥३॥
तुका ह्मणे फजितखोरा । ह्मणतां बरा उगा रहा ॥४॥
॥५६३४॥
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतो ॥२॥
काय अगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कशापाशीं ॥३॥
तुका ह्मणे येथें करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनी ॥४॥
॥५६३५॥
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥२॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥३॥
तुका ह्मणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥४॥
॥५६३६॥
नेणे सुने चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥२॥
क्षार ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥३॥
वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥४॥
॥५६३७॥
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यू तो सरिसा ॥१॥
कैसी झाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥२॥
संसाराची खंती मावळल्या तरी शक्ति ॥३॥
तुका ह्मणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥४॥
॥५६३८॥
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडीं माती पाडोनि ॥२॥
लागलीसे पाठी लाज । झालें काज नासाया ॥३॥
तुका म्हणे कुश्चळ मनी । विटंबनीं पडिलीं तीं ॥४॥
॥५६३९॥
चोराचीया धुडका मनीं । वसे आनीं लंछन ॥१॥
ऐशा आह्मी करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥२॥
ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥३॥
तुका ह्मणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥४॥
॥५६४०॥
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥
हुंगों नये गोर्हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥२॥
अळसियाचें अंतर कुडें । जैसें मढें निष्काम ॥३॥
तुका ह्मणे ऐशा हातीं । मज श्रीपती वांचवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP