मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५९४१ ते ५९५०

जनांस शिक्षा अभंग - ५९४१ ते ५९५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९४१॥
देखोनियां उणें पाहोनियां छिद्रा । बाहीर त्या मुद्रा अपवित्र ॥१॥
सज्जनासी छळी शब्द नरकाडी । कुशब्दाची जोडी सदा करी ॥२॥
कोण्यापरी चित्त भेदावें अंतर । ऐसें त्या साचार बोल बोले ॥३॥
पापाची हे मूर्ती घडलिसे वोजा । दुर्जनाची पूजा पीडा करी ॥४॥
तुका म्हणे दु:ख दुर्जनाच्या संगें । होय मनोभंग वेळोवेळा ॥५॥

॥५९४२॥
पतनाचि जोडी साधियेली मुर्खे । हरिखांत विख कालविलें ॥१॥
न मिळे खावया राहिले उपाय । म्हणोनियां जाय धेडवाडा ॥२॥
न करीच संध्या न करीच जप । साधियलें पाप मुर्खपणें ॥३॥
न मिळे व्यापार घालितसे खिस्ती । यमपुरी वस्ती करावया ॥४॥
तुका म्हणे रांड उपजतां तरी । मारुनी निर्धारीं टाकी ना कां ॥५॥

॥५९४३॥
स्नान संध्या करी जप । खतें पाप वावरे ॥१॥
गोडी मिष्टान्नाची धरी । ब्रह्मचारी म्हणती ॥२॥
हानी आली लाभ नाहीं । आदा पाही वेंचिला ॥३॥
वारी नित्य अन्न खाय । केलें काय रांडेच्या ॥४॥
तुका म्हणे जिव्हा शिस्न । ही प्रयत्नें बांधावीं ॥४॥

॥५९४४॥
मागें तेंचि नाहीं ठावें । तोंडवासी कांहीं द्यावें ॥१॥
झालें लोभाचें मांजर । भिक मागें दारोदार ॥२॥
कोणा वंदी कोणा निंदी । धांव घाली भलते छंदीं ॥३॥
हातीं माप गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥४॥

॥५९४५॥
दुर्जनाचें चित्त सज्जनातें छळी । जोडी पाप बळी वज्र लेप ॥१॥
काय करुं यासी सांगतां नायके । जोडितो पातकें पापराशी ॥२॥
काय आह्मी कधीं कोणाचे अन्याय । करितों मी काय सांगा तरी ॥३॥
न जाईच कदा कोणाचिये घरीं । अपेक्षा निर्धारी छळावया ॥४॥
न बोले चि देखे कोणाचें वाईट । उणें पुरें नीट खरें खोटें ॥५॥
कोणापें बसणें कोणासी बोलणें ॥ आणिका सांगणें काम नाहीं ॥६॥
तुका ह्मणे देव मज ऐशी परी । तुम्ही सुखें घरीं निद्रा करा ॥७॥

॥५९४६॥
दुर्जनाशीं बुद्धि शिकवितां कांहीं । घामें भिजत नाहीं धोंडा जैसा ॥१॥
रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पुराचें ॥२॥
निर्नयनासी जैसा नावडे आरीसा । मुर्खालागीं तैसा शास्त्र बोध ॥३॥
तुका म्हणे ऐसें विकल उदारें । अज्ञान अंधार दूरी केलें ॥४॥

॥५९४७॥
आणा सुगरणी । व्याही बैसले भोजनीं ॥१॥
नेणे समय हा कोण । कोठें वाहते येऊन ॥२॥
एक मागावें आवडी । काय भलत्यासी वाढी ॥३॥
तुका म्हणे अप्रमादीं । नाइकेचि कदा बुद्धी ॥४॥

॥५९४८॥
अनमानवणी । मुख्य वराडी विहिणी ॥१॥
जरा खोकली ते मुग्धा । व्याह्या पात्रीं झाली श्रद्धा ॥२॥
हांसाविलें जन । पावोनियां अपमान ॥३॥
तुका म्हणे ऐशा गुणीं । श्रेष्ठपणा आली हाणी ॥४॥

॥५९४९॥
निंदी हरीदासा कोणी । नर्कखाणी पडे तो ॥१॥
खर्‍यासी पाडी खोटें । शिखी नष्ट तो एक ॥२॥
साच सांडी खरी वस्त । अध:पात पावला ॥३॥
तुका म्हणे सांगों काय । घडों नये सन्निध ॥४॥

॥५९५०॥
परब्रह्म नकळे ज्यासी । काय उपदेश त्यासी ॥१॥
करावे ते नर । ज्ञानाविण ते सुंदर ॥२॥
गुरुमंत्र घेती कानीं । अनाचार धरिती मनीं ॥३॥
लाजे साधुदर्शनासी । परद्वारीं नाक घांशी ॥४॥
हरीकथेचा कंटाळा । द्रव्य वेंचि भोरप्याला ॥५॥
तुका म्हणे ऐसा नर । त्यासी यम देती मार ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP