जनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५७०१॥
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥
दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥२॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥३॥
तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड ॥४॥
॥५७०२॥
खोंकरी आधण होय पाकसिद्धि । हें तों घडों कधीं शकेचि ना ॥१॥
खापराचे अंगीं घसितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥
पालथे घागरी रिचविता जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥३॥
॥५७०३॥
नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥
आधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥२॥
आर्तभूता न घाली पाण्याचा चूळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥३॥
एकासी आड पडोनी होंकरी । एकासी देखोनी लपवी भाकरी ॥४॥
एकासी धड न बोले वाचा । लाभेवीण केला आयुष्यनाश ॥६॥
॥५७०४॥
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दु:खे तरीं लव धड धडी ॥१॥
न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥२॥
न पवे धांवणे न पवेचि लाग । न चलती माग धरावया ॥३॥
भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥४॥
तुका ह्मणे नेदी हाका मारुं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥५॥
॥५७०५॥
नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥
नाहीं मानूं येत वाजटाचे बोल । कोरडेच फोल चवी नाहीं ॥२॥
तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥३॥
तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांड पुर्या ॥४॥
॥५७०६॥
अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचिये चित्तीं बोध कैंचा ॥१॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥२॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैचें ॥३॥
अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥४॥
तुका ह्मणे जळो ऐसियाचें तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥५॥
॥५७०७॥
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकां चारी ॥१॥
अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥२॥
ऐशिया दांभिकां कैंची हरिसेवा । नेणेचि सद्भावा कोणे काळीं ॥३॥
तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळले चित्त कामक्रोधें ॥४॥
॥५७०८॥
आपुल्या पोटासाठीं । करी लोकांचिया गोष्टी ॥१॥
जेणें घातलें संसारी । विसरला तोचि हरी ॥२॥
पोटा घाली अन्न । न ह्मणे पतीतपावन ॥३॥
मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥४॥
तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं ॥५॥
॥५७०९॥
स्वयें आपणचि रिता । रडे पुढिलाच्या हिता ॥१॥
सखा हें ना तैंसे झालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥२॥
सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥३॥
तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥४॥
॥५७१०॥
आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥१॥
आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बईल चुकला मोरा ॥२॥
तुका ह्मणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP