मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८११ ते ५८२०

जनांस शिक्षा अभंग - ५८११ ते ५८२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८११॥
प्रदक्षणा घाली आवा । ह्मणे गोहो यावा गांवा ॥१॥
पुण्य कैंचें तया गांठीं । वित्त वेंची लोभासाठीं ॥२॥
करी चतुर्थी सोमवार । ह्मणती पोटीं व्हावें पोर ॥३॥
परिसाचे सांटे वटी । मागतसे गारगोटी ॥४॥
तुका ह्मणे मोल । देऊन घेतला अमोल ॥५॥

॥५८१२॥
साधुसज्जनासी सदा भेटों जाय । शठ वंदी पाय नम्रपणें ॥१॥
ज्याचे गिवसुणी गुणदोष पाहे । दुर्विनीत राहे तया ठायीं ॥२॥
तुका ह्मणे जाणे सर्व ज्याचे भाव । देवा आदिदेव पांडुरंग ॥३॥

॥५८१३॥
एक शिष्य केला ज्यानें । समस्त गांव जाळिले त्यानें ॥१॥
द्रव्य मागे शिष्यापासी । पूर्वज गेले नरकवासी ॥२॥
नाम विकी राघोबाचे । जळो काळें तोंड त्याचें ॥२॥
तुका ह्मणे निरपेक्षी । देव साह्य होय त्यासी ॥४॥

॥५८१४॥
कथां करोनियां मोल ज्यापें घेती । तेही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंडित स्मरा रामराम ॥२॥
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥३॥
तुका ह्मणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥४॥

॥५८१५॥
सुन सासुचे ऐकेना । रांड सुदीसी नांदेना ॥१॥
बळेंच आपण रुसावें । जिव देतें हें ह्मणावें ॥२॥
गरीब पाहून दादल्यासी । हिसाळती घोडी जैसी ॥३॥
दादला देखोनियां वेडा । म्हणे माझी इष्टा फेडा ॥४॥
ऐसी डंकीण त्या गांवीं ॥ तुका ह्मणे व्हा गोसांवी ॥५॥

॥५८१६॥
भजन तें ओंगळवाणे । नरका जाणें चुकेना ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेले ॥२॥
वेदीं सांगितलें तें न करी । ब्रह्म ह्मणे दुराचारी ॥३॥
तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा विषयांचा भ्रम ॥४॥

॥५८१७॥
जळो त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥
सदा भोंवयासी गांथी । क्रोध धडधडीत पोटीं ॥२॥
फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥३॥
तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥४॥

॥५८१८॥
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुच्छ । खापरा परीस काय करी ॥२॥
काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥३॥
तुका ह्मणे वज्र भंगे एकवेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥४॥

॥५८१९॥
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥
तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥

॥५८२०॥
नाहीं संतांशी शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥
ह्मणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥२॥
करिती विठोबाची भक्ति । दया धर्म नाहीं चित्तीं ॥३॥
तेथें नाहीं माझा देव । व्यर्थ श्रमवी हा जीव ॥४॥
अंगीं नाहीं क्षमा दया । ह्मणती भेट पंढरिराया ॥५॥
नाहीं धर्माची वासना । काय करोनी प्रदक्षिणा ॥६॥
ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥७॥
नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥८॥
जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP