जनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५७११॥
रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान ॥१॥
तरी कां तया एका साठीं । कामें अवघीं करणें खोटीं ॥२॥
दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥३॥
तुका ह्मणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥४॥
॥५७१२॥
पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥१॥
सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥२॥
काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥३॥
आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥४॥
लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥५॥
तुका म्हणे नरका जाणें । या या वचनें दुष्टाचे ॥६॥
॥५७१३॥
निंदक तो परउपकारी । काय वर्णू त्याची थोरी ॥
जो रजकाहूनि भला परि । सर्व गुणें आगळा ॥१॥
नेघे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरि देखा ॥
करीतसे साधका । शुद्ध सर ते तिहीं लोकीं ॥२॥
मुख संवदणी सांगाते । अवघें सांठविलें तेथें ॥
जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥३॥
तया ठाव यमपुरी । वास करणें अघोरीं ॥
त्यासी दंडण करी । तुका म्हणे न्हाणी ते ॥४॥
॥५७१४॥
परिसें गे सुनेबाई । नको वेंचूं दूध दहीं ॥१॥
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥२॥
ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥३॥
माझे हातींचा कलवडू । मजवांचूनि नको फोडूं ॥४॥
वळवटक्षिराचें लिंपन । नको फोडूं मज वांचून ॥५॥
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥६॥
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥७॥
भक्षीं परिमित आहारु । नको फारसी वरो सारु ॥८॥
सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥९॥
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥१०॥
सूनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥११॥
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥१२॥
आतां कासया यात्रे जाऊं । काय जाऊनि तेथें पाहूं ॥१३॥
मुलें लेंकरें घर दार । माझें येथेंचि पंढरपुर ॥१४॥
तुका म्हणे ऐसे जन । गोवियेले मायेंकरुन ॥१५॥
॥५७१५॥
एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥१॥
निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥२॥
तुका म्हणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥३॥
॥५७१६॥
भाग्यालागीं लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥
कथे जातां आळसे मन । प्रपंचाचें मोठें ज्ञान ॥२॥
अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥३॥
कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥४॥
तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां ॥५॥
॥५७१७॥
पतिव्रतेची कीर्त्ती वाखाणितां । सिंदळीच्या माथां तिडिक उठे ॥१॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारुन केलें कोणी ॥२॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥
तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥४॥
॥५७१८॥
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥
निरयगांवीं बोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥२॥
अवगुणांचा सांटा करी । तेचि धरी जीवासी ॥३॥
तुका म्हणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवी ॥४॥
॥५७१९॥
वरीवरी बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं झाली ॥१॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥२॥
मनाचा उदार रायाचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥३॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥४॥
तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोंचतें अंतर दुर्जनाचें ॥५॥
॥५७२०॥
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्कद्वारीं ॥१॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥२॥
बरें विचारुनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥३॥
तुका म्हणे रांडलेका । अंतीं जासिल यमलोका ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP