खंड ६ - अध्याय ४५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढें सांगत । ऐसे नाना अवतार घेत । महात्मा विकट ते असंख्यात । वर्णनातीत महादेवींनो ॥१॥
भक्तिप्रिय स्वभावें घेत । अवतार भक्तविघ्न निवारणार्थ । मयूरक्षेत्रीं सांप्रत । जावें तुम्हां सर्वांनीं ॥२॥
तेथ मीही पूर्णं ख्पें वसत । येथ कलांशें संस्थित । क्षेत्रीं जाऊन विश्वेश्वरा सतत । शक्तींनो भजा भक्तीनें ॥३॥
त्यानें योगींद्रवंद्य व्हाल । विषयभावांत चित्तावर मळ । साठतो म्हणून विमल । व्हावें तुम्हीं शक्तींनो ॥४॥
गणेशमार्गांचा आश्रय घेऊन । विकटास भजा एकमन । वेदादींतही कर्म शोभन । कीर्तिलें जें गणेशपर ॥५॥
तेच नित्य भक्तियुक्त । आचरावें तुम्हीं श्रद्धायुक्त । गणेशमूर्तीचें चिंतन ह्रदयांत । सदैव करा प्रिय शक्तींनो ॥६॥
मानसी तैसी बाह्म पूजा । करून गणेशा तोषवा सहजा । विषयांत विरक्त होऊन भजा । विकटास तीच उत्तम भक्ति ॥७॥
गणेशावरी होऊन आसक्त । करावी भक्ति ऐसी अविरत । मुद्गल सांगती दक्षाप्रत। आदिशक्तित तैं देई ॥८॥
एकाक्षर मंट्र शक्तींप्रत । विधियुक्त गणराजाचा उदात्त । नंतर ती मौन धरित । शक्ती करिती प्रणाम ॥९॥
तदनंतर त्या भक्तियुक्त । महाकाळीं प्रमुख त्यांत । दक्षा मयूरक्षेत्रीं त्वरित । तेथ पाहसी आदिशक्तीसी ॥१०॥
तिची पूजा करून । ढुंढीस पूजिती एकमन । तदनंतर तप महान । आचरिलें त्यांनी शंभर वर्षें ॥११॥
तेव्हां त्यांच्या पुढें प्रकटत । मयूरेश्वर हर्षित । त्यास प्रणास करून पूनित । नानाविध उपचारांनीं ॥१२॥
मनोरम सोळा संस्कारयुक्त । पूजा करून वंदित । कर जोडून स्तवन करित । महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ॥१३॥
मयूरेशासी विघ्नेशासी । भक्तविघ्नहर्त्यांसी । विघ्नदाता तूं अभक्तासी । गणेशा तुला सदा नमन ॥१४॥
लंबोदरासी देवासी । मूषकध्वजासी अनाथनाथासी । नाथांच्याही नाथासी । परेशा तुला नमोनमः ॥१५॥
महेशासी सिद्धिदात्यासी । गजाननासि अनंतासी । सदा स्वभक्तां सर्वदासी । ब्रह्मपतीसी तुज नमन ॥१६॥
शांतिमयासी महात्म्यासी । शांतीच्या शांतिरूपासी । हेरंबासी कवीसी । कविरूपा तुज नमस्कार ॥१७॥
कवीस कविपददात्यासी । कवीशासी सिद्धिबुद्धिपदासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिचालका तुज नमन ॥१८॥
माया मायिक चिन्हांनीं । खेळ करिसी प्रतिदिनीं । योगशांतिस्थ भाव ठेवूनी । शांतिप्रद तूं तुज नमन ॥१९॥
शक्तीस भानूस विष्णूस । शंकराच्या नाना रूपधरास । नाना खेळ करणार्यास । पुनःपुनः नमन करितसे ॥२०॥
वेदादीही जेथ मौन । धरिती तेथ काय करूं स्तवन । शिवादी देवही धरिती मौन । तेथ पाड काय आमुचा ॥२१॥
मयूरध्वजा करितों नमन । भक्ति दे तुझी एकमन । सर्वेशा तुझ्या क्षेत्रीं निवास पावन । देई देवा गणाधीशा ॥२२॥
गणेश ते सर्व वर देती । भक्तितुष्ट त्यांसी म्हणती । जो हें स्तोत्र वाचील जगतीं । अथवा ऐकेल भावयुक्त ॥२३॥
तो इहलोकीं भोग भोगून । अंतीं स्वानंद लाभून । ब्रह्मपदाचा लाभ होऊन । धन्यत्वर पावेल अक्षय ॥२४॥
दक्षा महान चरित । कथिलें विकटाचें संक्षेपें तुजप्रत । श्रद्धा ठेवितां सतत । सर्वसिद्धिप्रदायक हें ॥२५॥
यासम अन्य कांहीं नसत । कोठेंही कांहीं जगांत । हें साक्षात ब्रह्मपद पूर्ण असत । अधिक काय वर्णाचें ॥२६॥
हें विकटाचें महिमान । करील पठण अथवा श्रवण । तो नरोत्तम सिद्दि लाभून । धन्य होईल निश्चयें ॥२७॥
एक आवर्तन नित्य करील । तो विकटरूप होईल । त्याचें दर्शनही अमल । पावन सर्व जनां होत ॥२८॥
जेवढीं अन्य साधनें असत । त्यांनीं जेवढे पुण्य लाभत । त्याहून शंभरपट प्राप्त । पुण्य या खंडाच्या श्रवणानें ॥२९॥
कांहीं करितां होमहवन । तैसेंची भजनपावन । अथवा तळीं धर्मशाळा बांधून । सार्वजनिक सेवा करी ॥३०॥
तें इष्टपूर्तादिक कर्म । करिता भक्तिपूर्ण मनोरम । त्याहूनही शतगुण पुण्य शोभन । लाभतें खंड हा ऐकता ॥३१॥
अन्य पुराणें इतिहासयुक्त । ऐकतां पुण्य जें लाभत । त्याहून अधिक पुण्य प्राप्त । ह्या खंडाच्या वाचनानें ॥३२॥
काय वर्णांवें बहुत । जेथ ब्रह्मपति असे वर्णित । त्या विकटाच्या सम जगांत । अन्य कोण संभवेल ॥३३॥
सूत म्हणे शौनकाप्रत । ऐसें सांगून मुद्गल थांबत । महायोग्यांस त्या नमित । दक्षप्रजापति हर्षानें ॥३४॥
तेव्हां मुद्गल त्यास म्हणत । सांगितलें तुजला विकटचरित । कामासुराचा नाशकर पुनीत । द्विजोत्तमा दक्षा हें पूर्ण ॥३५॥
धर्मार्थकाममोक्षदायक । ब्रह्मपर हें पावक । ह्यासम अन्य न सौख्यदायक । आणखी काय ऐकूं इच्छिसी ॥३६॥
ऐसें मुद्गलें विचारिलें । तेव्हां दक्षें काय सांगितलें । तें पुढील खंडीं वर्णिलें । सीताराम विनम्र गणेशचरणीं ॥३७॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडें विकटचरितसमाप्तिवर्णनं नाम पंचचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
॥ इति श्रीमुद्गलपुराणे षष्ठः खंडः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP