खंड ६ - अध्याय १८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश भ्रुशुण्डीस विचारती । मयूरक्षेत्रीं जे पूजनीय असती । त्यांची सांगावी महती । शास्त्रीं जैसी कथिली असे ॥१॥
भ्रुशुंडी सांगती पंचदेवांप्रत । देव गणेश उत्तराभिमुख असत । त्याच्या वामांगीं सिद्धि वसत । क्षेत्रामध्यें ऐसी रचना ॥२॥
ती सिद्धि चामरव्यजनयुक्त । नाना शक्तिसमन्वित । ती सती भक्तियुक्त । गणराजास सेवितसे ॥३॥
गणेशाच्या उजव्या बाजूस । विद्यायुक्त बुद्धि सुरस । कलांनीही ती सरस । सरस्वती समीप उभी असे ॥४॥
सुगंधि वस्तु करीं घेऊन । परमार्थवाचकाना सती महान । नित्य आदरें करी पूजन । भजन भावें गणेशाचें ॥५॥
पुढयांत लक्ष लाभ सुत । भक्तिपूर्ण नम्र कंधर असत । गणाध्यक्षा ते सेवित । नानाविध उपचारांनी ॥६॥
मार्गें भ्रामरी महादेवी असत । नाना शक्तींनी ती युक्त । ती सेवितसे देवास सतत । मयूरेश्वर प्रभूसी ॥७॥
गणराजाच्या आसनाखाली । इशु सागरा भरती आली । सहस्त्रदल कमळाची लाली । फाकली त्या सागरावरी ॥८॥
तीव्रादि शक्तिसंयुक्त । विघ्नेश्वर तेथ विराजत । देवींसहित सेवन करित । रममाधुरी गजानन ॥९॥
ऐसा हा गणेश्वर पूजनीय । सर्वद भक्तांसी महनीय । त्याच्या पुढयांत विनेय । असती उंदीर आणि मोर ॥१०॥
ते दोघे उभे कर जोडून । सिद्धयोगिनी निरांजन । ओवाळिती करिती भजन । ऐशी शोभा तेथ असे ॥११॥
पृष्ठभागीं मयूरेशाच्या असती । प्रमोदादी गण आयुधे हस्तीं । ते सतत पूजनीय वर्तती । गणेशभक्तिसंयुक्त या क्षेत्रांत ॥१२॥
पूर्वदिशेस धर्ममंडप दिसत । तेथ स्वयं विष्णु निवसत । तो गणेशसेवेस्तव उत्कंठित । सांगे गणेशधर्म सारे ॥१३॥
गाणपत्थ प्रियत्वें पूजनीय । तो भक्तांसी आदरणीय । दक्षिण मंडपाचा आश्रय । शंभुदेवें घेतला असे ॥१४॥
तो गणेशपर शब्दांचे अर्थ सांगत । शुद्ध अर्थ प्रकटवित । त्यायोगें मानव होत । गणेशज्ञानानें संपन्न ॥१५॥
पश्चिम दिशेस संस्थित । काम नामा मंडप विख्यात । तेथ महाशक्ति निवास महेश्वर करित । मानवांस प्रेरणा ती देई ॥१६॥
गणेशकामनापर करित । आद्य सौख्य गणेशपर सांगत । उत्तरेकडील मुक्तिमंडपांत । सुर्यदेव रहातसे ॥१७॥
गणेश भक्तियुक्त बोध करित । गाणेशी मुक्ति प्रकटवित । पूर्णमोक्षप्रद जी असत । रवि देवांसी त्या पूजावें ॥१८॥
गणेशाच्या सान्निध्यांत । मुद्‍गलादी महाभक्त । ते भक्तिमाहाम्य सांगत । उजव्या बाजूस ते असती ॥१९॥
भक्तनायकां समवेत । गुहयधारक तो ख्यात । अव्याहत गति वर्णन करित । रहस्य गणेशभक्तीचें ॥२०॥
डाव्या बाजूस योगिजनसहित । शुकयोगी तेथ वसत । गाणेशयोगाचें विवरण करित । सर्व साधकांपुढे तो ॥२१॥
मुद्‍गल तैसे शुकयोगी असत । पूजनीय गणेशभक्तांप्रत । ते विघ्नेश्वराचे लाडके भक्त । ऐसें जाणा महादेवांनो ॥२२॥
देवमुख्यांचे मंडप कथिले । आतां त्यापुढचें वर्णन भलें । ते तुम्हीं पाहिजे ऐकिलें । एकचित्तें देवांनो ॥२३॥
त्या पुढती अष्ट विनायक स्थित । वक्रतुंडादी विख्यात । त्यानंतर अष्ट माता विराजत । त्या पुढतों आठ भैरव ॥२४॥
विविध दिशांत वसत । पूजनीय देवेशांनों भक्तांप्रत । गणेशाच्या डाव्या बाजूस स्थित । संकष्टी चतुर्थी पावन ॥२५॥
उजव्या अंगीं शुक्ला चतुर्थी । गणेश सेवोत्सुक चित्तीं । पृष्ठभागीं शमी मंदार विलसती । दूर्वा पुढयांत गणनायकाच्या ॥२६॥
पूर्वभागीं नग्नभैरव देव । दक्षिण भागीं नीलकंठ प्रतापी शिव । शश्चिमेस कृतिवास अपूर्व । उत्तरेला भीमेश ॥२७॥
ऐसे हे सर्व गणनायका भजत । विघ्नराजासी सेवित । गणेशासी भक्तिसंयुत । सदैव ध्याती हे सर्व ॥२८॥
त्यापुढती दिक्‍पालरूप सेवित । सशस्त्र नित्य प्रीतियुक्त । ऐसे हे मुख्य गर्भागारस्थित । कांहीं सेवासमयीं येती ॥२९॥
कांहीं नित्यवास करिती । त्याची सांगतो माहिती । सर्व सिद्धिप्रद महाभाग ते जगतीं । महाप्रभू विनायक ॥३०॥
विदर्भांतील वक्रतुंड ख्यात । बल्लाळ यल्लिंग हेरंब असत । महेशांनो विद्यापुर समाश्रित । विघ्नेश पारिनेरस्थ ॥३१॥
भालचंद्र तैसा वर्तत । गंगातटवासी ज्ञानेश दत्तात्रेयासहित । चिंतामणि तो स्थावरस्थ । तैसाचि सिद्धी विनायक ॥३२॥
सिद्धिक्षेंत्रस्थ तैसाचि विख्यात । महागणपति प्रतापवन्त । मणिपुरस्थ विघ्नहर विलसत । विजयस्थ तैसा विनायक ॥३३॥
कश्यपाच्या घरीं जो राहत । एलास्थ लक्ष विघ्नपसात । बंसालचा गणेशान वसत । विघ्नराज या क्षेत्रीं ॥३४॥
जीर्णपूःस्थ आशापूरक । अमलक्षेत्रग एक । प्रवालस्थ गणेश राजवेश्मास्थित पावक । ऐसे बहुविध गणप तेथ असती ॥३५॥
मयूरेशाचा आश्रय घेऊन । राहती ते गर्भागारीं प्रसन्न । विघ्नराज हे कलात्मक पावन । त्या एका गजाननाचे ॥३६॥
गर्भागार गणेशाचें मूर्तिरूप । जाणावें तें विशेष सुरूप । सर्वभादें सेवितां पाप । अशेष नष्ट होत असे ॥३७॥
शत कोटी गणेशान । राहती गर्भागारीं प्रसन्न । नर मुनीनीं स्थापित पावन । गर्भागारीं पंडितांनो ॥३८॥
गर्भांगारीं गणेशान । स्वनामांकित स्थापून । जगद्‍ ब्रह्म स्थापिता पुण्य महान । जें मिळे त्याची गणना नसे ॥३९॥
जो जीणोंद्धार करित । त्यासी संपूर्ण फल लाभत । मूर्तिखंड पाहता जी पूर्ण करित । तरीही फळ लाभतसे ॥४०॥
देवेशा विचारिती भ्रुशुंडीप्रत । तुमचें वचन आश्चर्यकारक वाटत । हे गणेश्वर असंख्यात । कोणी तेथे स्थापिले ? ॥४१॥
त्यांची संख्या सांगावी । आमुची संभ्रमावस्था दूर करावी । भ्रुशुंडी म्हणे ऐकावी । कैसी वसति गणेश्वरांची तेथ ॥४२॥
कोणी परमाणुस्वरूपें वसती । काहीं त्रसरेणु प्रमाण असती । अंगुष्ठ पर्व एवढयाप्रमाणें वर्तती । देहधारी शंभु मुख्यक मुनीही ॥४३॥
चतुर्हस्त प्रमाण मयूरेश । पीठादिसंयुत देवांनो तो परेश । सिद्धिबुद्धी द्विहस्त प्रमाण सर्वेश । मनोभावें पूजिती ॥४४॥
सेवालालस गणराजास सेविती । हस्तमात्र प्रमाण समस्त असती । चार धनुष्य प्रमाण जगतीं । धर्ममंडप ख्यात असे ॥४५॥
त्याच्या दुप्पट प्रमाण असत । सभोंवती अर्थमंडप सुविख्यात । त्याच्या द्विगुण प्रमाणोक्त । काममंडप जाणावा ॥४६॥
त्याच्याहून एक पादहीन । मुक्तिमंडप महान । दहा धनूष्यें दूर गणेशापासून । असे धर्माचा मंडप ॥४७॥
त्या त्या द्वारीं असती मंडप । दिशा देवतांचे सुस्वरूप । मुख्यमंडपाच्या पूर्वदिशेस स्थित । वक्रतुंड दहा धनुष्य दूर ॥४८॥
पंधरा धनुष्य दूर असत । विलसत तो एकदंत । ऐश्या रीती पांच धनुषाधिक्य दूर पर्वत । विविध दिशांत विघ्नप ॥४९॥
आठ गणनाथांहून दूर । पाच धनुष्यें अंतर । मातृका असती उदार । ऐसी असे क्षेत्रवृद्धी ॥५०॥
त्या मातृकांहून दूर । पांच धनुष्यें अंतरावर । चतुर्थी पूर्वभागीं सुंदर । तैशाच अन्य देवता ॥५१॥
त्यांपासून पांच धनुष्यें दूर । नग्न भैरवादी क्षेत्रवीर । त्याच्यापासून पाच धनुष्यें अंतर । दिक‍पाळ तेथ स्थित असती ॥५२॥
पूर्व ईशान्य दिशांच्या मध्यांत । प्रजापति स्वयं स्थित । नैऋती पश्चिमे मध्यें वसत । शेष जाणा महेश्वरांनो ॥५३॥
त्यांच्यापासून पांच धनुष्यें दूर । वज्रादि असती सुंदर । क्षेत्रमानप्रमाणें वृद्धिन्यूनपर । ऐसें यथाशास्त्र विधान हें ॥५४॥
गर्भागाराचें विस्तार महिमान । कथिलें तुम्हांसी शोभन । अन्यही नाना गणेशान । सेवेस्तव वसती गर्भागारीं ॥५५॥
हें माहात्म्य जो ऐकत । अथवा जो हें वाचित । मनीं भक्तिसंयुत विनीत । देवहो सर्व पापमुक्त होत ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते गर्भागारस्यप्रमाणवर्णनं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP