खंड ६ - अध्याय १४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी सांगे देवांसी । पुरातन वृत्त सांगतो तुम्हांसी । महाभागहो ऐका मनासी । करून एकाग्र भक्तिपर ॥१॥
एकदा कोण्य एका विप्राची कान्ता । पतिविहीन अरण्यीं असतां । पडली वनवासी भिल्लांच्या हातां । कामासक्त ते तिज पीडिती ॥२॥
तेव्हां ती त्या दुर्जनांप्रत । आपुलें पातिव्रत्य रक्षण्या म्हणत । आजपासून पांचव्या दिनीं प्रसन्नचित्त । तुमची स्त्री मी होईन ॥३॥
हें माझें सत्य वचन । यांत संदेह न धरावा उदार मन । माझें सर्वस्व अर्पीन । पांचव्या दिवशीं तुम्हांस ॥४॥
तोंपर्यंत मज न स्पर्शावें । आपुल्या कामेच्छेसी आवरावें । तें ऐकतां वचन बरवें । ते दुष्ट चोर संतोषले ॥५॥
परतून गेले स्वगुहेंत । म्हणती पांचव्या दिवशीं प्राप्त । होईल हिचें रतिसुख सांप्रत । मानावी हिची प्रार्थना ॥६॥
परी ती विप्रभार्या वनांत । शोकमग्न चित्तें विचार करित । यजमानांच्या यज्ञकार्यांत । पति माझे कर्तव्यार्थ ॥७॥
आतां मी एकटी गृहांत । चोर येतील भ्रष्ट कराया परत । आतां एकटी काय करूं मी आर्त । जातें शरण मयूरासी ॥८॥
मयुरक्षेत्र समीप वर्तत । तेथ यात्रा करता प्राप्त । स्वधर्मफळ मनुजाप्रत । ऐसें पंडित सांगती ॥९॥
ऐसा निश्चय करून । मयूरक्षेत्रांत जाऊन । गणेशतीर्थांत ती करी स्नान । नंतर पूजी गणनायकासी ॥१०॥
पूर्वद्वारस्थित शक्तौस पूजित । तदनंतर मयूरेश पूजनीं रत । विधानपूर्वक ती होत । ऐसें पूजन करी पांच दिन ॥११॥
पांचव्या दिवशीं ती परतत । स्वगृहीं वचन पाळित । सत्यव्रत ती ते दुष्ट येत । वन्य चोर तिज भोगाया ॥१२॥
ती धर्मशक्तियुत गणेशास स्मरत । तैं तो आश्चर्य घडत । त्या सर्व दुष्ट चोरांस जाळित । अग्नि त्वरित गणेशाज्ञेनें ॥१३॥
ती विप्रस्त्री मनीं विस्मित । गणेशासी श्रेष्ठ मानित । धर्मशक्तिस्थ गणेशा पूजित । मरणान्ती गेली वैकुंठासी ॥१४॥
विष्णूनें तिज सत्कारिली । पुनरपि त्या स्त्रीस पतीस भेटविली । पतिनिष्ठेनें तिनें केली । धर्मतत्परपणें त्याचीं सेवा ॥१५॥
अंतीं स्वानंदगा होत । देवनायिका ब्रह्मभूत । महाभक्तीनें ती स्वपतिसहित । ऐसा अद्भुत वृत्तान्त ॥१६॥
ऐसे नानाविध जन । नाना वर्णांत उत्पन्न । नरनारी असंख्य प्रसन्न । महासिद्धि लाभलें मयूरक्षेत्री ॥१७॥
आणखी एक कथा सांगत । दक्षिणद्वारासंबंधी सांप्रत । ती ऐका आदरें तेणें चित्त । संशयमुक्त होईल तुमचें ॥१८॥
मद्रदेशाचा नृप बळवंत । शास्त्रनीति प्रजापालनरत । सामंत अनेक त्यास पीडित । सर्व एकदां मिळून ॥१९॥
त्यांचें नियंत्रण करण्यात । बळ नव्हतें पुरेसें तयास । म्हणोनी होऊन मनीं उदास । राज्य सोडून तो गेला ॥२०॥
मुनिसार्दूला शौनका भेटत । कार्यसिद्धीचा उपाय पुसत । त्याचा वृत्तान्त ऐकून सांगत । मयूरेशा शरण जावें ॥२१॥
मयूरेश्वरक्षेत्रांत । दक्षिण भागीं द्वार असत । त्याची यात्रा करिता विधियुक्त । सर्व अर्थ प्राप्त । होतो ॥२२॥
भद्रसेन राजा शौनका नमित । तदनंतर मयूरक्षेत्रासे जात । दक्षिणद्वारयात्रा करित । भक्तिसंयुत श्रद्धेनें ॥२३॥
तदनंतर पुनरपि स्वनगरा जात । विघ्नेश्वरासी मनीं स्मरत । भद्रसेन सर्व सत्रूंस जिंकित । ऐसा प्रभाव या द्वारयात्रेचा ॥२४॥
यात्राविधानें नर होत । समर्थ आपुल्या क्षेत्रांत । स्वजातिभव अर्थ निश्चित । लाभतसे तयाला ॥२५॥
भद्रसेन दक्षिणद्वार यात्रा करित । भक्तिभावें त्यानंतर सतत । गणेशासी पूजित विनीत । मरणोत्तर गेला कैलासीं ॥२६॥
मरणोत्तर पुनरपि जन्मत । वैश्य जातोंत मयूरक्षेत्रांत । देवांनो नित्य गणेंश्वरा भजत । अंतीं स्वानंद लोकांत गेला ॥२७॥
क्षेत्रांत मरण येतां होत । मेघ वैश्य ब्रह्मभूत । ऐसे नानाविध जन लाभत । वांछित अर्थ देवांनी ॥२८॥
त्या सर्वांचा वृत्तान्त । असे देवहो वर्णनातीत । आज पश्चिचमद्वारविषयीं कथा सांगत । ऐका परम अर्थप्रदा ॥२९॥
भारक नांवाच्या नगरांत । साम नामक वैश्य रहात । एकदा तो रोगांनी पीडित । दरिद्री भोगहीन झाला ॥३०॥
त्यानें स्कंदपुराणातलें । स्वानंदक्षेत्र माहात्म्य वाचलें । त्यायोगें विस्मित झाले । चित्त त्या साम वैश्याचें ॥३१॥
तो मयूरक्षेत्रांत जात । विधियुक्त पश्चिमद्वारयात्रा करित । तीर्थ देवांस पूजित । जरी रोगांनी त्रस्त होता ॥३२॥
त्या पुण्यप्रभावें रोगमुक्त । होऊन झाला हर्षयुक्त्त । स्वगृहीं परतून चालवित । वैश्यवृत्ति आपुली ॥३३॥
धनाढय झाला सर्वमान्य जगांत । पश्चिमद्वारयात्रेचा महिमा अद्भुत । गणनायका सदैव भजत । विविध भोगांची प्राप्ति तयासी ॥३४॥
अंतीं शक्तितलोकांत जात । तेथ परम सौख्य उपभोगित । पुनरपि मयूरक्षेत्रांत । ब्राह्मण जन्म पावला ॥३५॥
वेदयारंग होऊन । शिवशर्मा नमा लाभून । मयूरक्षेत्रांत संन्यास भाव घेऊन । पूजितसे मोरयासी ॥३६॥
अंतीं स्वानंदलोकांत । जाऊन झाला ब्रह्मभूत । आतां उत्तरद्वारयात्रेचें महत्त्व अद्भुत । त्याची एक कथा ऐका ॥३७॥
कर्णाट प्रांतीं शूद्र असत । भीमनावें जनांस ज्ञात । एकदां तो पुराण ऐकत । तेव्हां खेद त्यास झाला ॥३८॥
विचार करी स्वचित्तांत । मायामय हें सर्व असत । तें त्यजून ज्ञात जगांत । मुक्तिमार्ग अनुसरीन ॥३९॥
होऊन अति खेडयुक्त । येथ होता तो हिंडत । एकदा त्यास वनांत । भेटले तपोधन विश्वामित्र ॥४०॥
त्यास प्रणास करून उभा राहत । कर जोडून विनवित । मुक्तिमार्ग सांगा मजप्रत । तेव्हां मुनि म्हणे तयासी ॥४१॥
विश्वामित्र सांगे भीमाप्रत । सत्कर्मे करतां आश्रमोचित । अनेक जन्मांच्या पुण्यें लाभत । मुक्तिठेवा नरासी ॥४२॥
म्हणून तूं महाक्षेत्रांत । मयूरेशाच्या जाई त्वरित । तेथ उत्तरद्वारयात्रा करितां प्राप्त । होईल मुक्ति तुजसी शूद्रा ॥४३॥
विनासायास लाभेल । मुक्ति तुजला झणीं विमल । खेद करूं नको तूं अमल । होशील त्या क्षेत्रांत ॥४४॥
विश्वामित्राची ही आज्ञा मानून । भीणें केलें तयास वंदन । तदनंतर मयूरक्षेत्रीं गमन । केलें त्यानें श्रद्धेनें ॥४५॥
तेथ उत्तरद्वारयात्रा करित । शूद्र तो विधियुक्त । पुनः स्वगृहीं परतत । देहज कर्म करूं लागला ॥४६॥
स्वधर्मयुत विधियुक्त । स्त्रीपुत्रादींच्या सहित । त्रिवर्णांची सेवा करित । हर्षयुक्त मानसें तो ॥४७॥
गणेशासी नित्य भजत । अंतीं सूर्यलोकीं जात । तदनंतर शुक्लगतीनें प्राप्त । मोक्षरूप तयासी ॥४८॥
महेश्वरांनो इअसा प्रभाव असत । क्षेत्रयात्रेचा जगांत । ऐसे नानाविध लोक लाभत । मुक्ति त्या मयूरक्षेत्रांत ॥४९॥
त्यांचें चरित वर्णनातीत । पूर्णयात्रेचें फळ अद्भुत । त्याविषयी एक कथा सांप्रत । सांगतो सर्वसिद्धिबुद्वि प्रदायक ॥५०॥
मालवदेशी दुंदुभिस्वन । एक शूद्र पापी दुर्जन । तो द्र्व्यलोभी जनांस मारून । त्यांचें द्र्व्य लुटीतसे ॥५१॥
ब्राह्मण गाईआदींसही न सोडित । सर्वांत तो पीडा देत । एकदा कोणी वैश्य धनवंत । जाई मालवांतून दंडकारण्यीं ॥५२॥
व्यापारास्तव तो द्रव्य घेऊन । नाना जनाकीर्ण मार्गावरून । मयूरेश क्षेत्रांत जाऊन । यात्रा करी गणनाथाची ॥५३॥
त्याच्या मागून तो शूद्रही जात । चतुर्द्वारयात्रा तोही करित । विविधजनांसह तो चांडाळ राहत । पवित्र मयूरक्षेत्रीं ॥५४॥
त्या शूद्राच्या मनांत । धनाची अभिलाषा प्रथम असत । ती या द्वारयात्राप्रबावें दूर होत । विचार करी तो स्वमानसीं ॥५५॥
दुंदुभिस्वन म्हणे स्वचित्तांत । मी मानाविध पापकर्मे जगांत । केली आतां मरणोत्तर मजप्रत । कोणती गती प्राप्त होईल ॥५६॥
तदनंतर वैश्यास प्रणाम करून । स्वधर्मपालन निश्चय करून । स्वस्थानास गेला परतून । आपुलें उचित कर्म करी ॥५७॥
पूर्वद्वारयात्रापुण्यें मति । स्वधर्माचरणीं जडली होती । दक्षिणद्वारपुण्यें जगतीं । सत्ता लाभली तयासी ॥५८॥
पश्चिमद्वार पुण्यें रोगादी मुक्त । धनाढय विविध भोगयुक्त । उत्तरद्वारयात्रेनें प्राप्त । महामोक्ष शुक्लगतीनें ॥५९॥
द्वारयात्रा करित । त्यांचें चरित्र वर्णनातीत । नानावर्णाश्रित लाभत । विविध इच्छित फळ लाभ ॥६०॥
नर नारी कीटकादि जात । मयूरक्षेत्रीं जे भक्तियुक्त । द्वारयात्रा करित । चतुर्विध फळ प्राप्त त्यांसी ॥६१॥
ऐसें हे द्वार यात्राचरित । जो ऐकत अथवा वाचित । त्याचें सर्व कर्म होत । सफल यांत संशय नसे ॥६२॥
ओमिति श्रीमादांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकतचरिते द्वारयात्रावर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP