खंड ६ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढती सांगत । मयूरेश जाऊन त्या क्षेत्रांत । सिंधूची मूर्ति स्थापिली पहात । क्रोधभरें ती चूर्ण करी ॥१॥
आतां ती वार्ता दूत । सांगतील सिंधूप्रत । या विचारें भयभीत । मुनिजन शंकरादि सारे ॥२॥
तेथही मायारूप घेऊन । दैत्येंद्र आले दबा धरून । शिवसुता मारण्या उत्सुकमन । त्यास मारी मयूरेश नित्य ॥३॥
तदनंतर विघ्नविनाशास्तव । इंद्रयज्ञ आरंभी शिव । मयूरेश मोडी तो यज्ञ क्रोधभाव । व्यक्त करून यज्ञस्थळीं ॥४॥
तेव्हां इंद्र देवांसहित । मयूरेशासवें लढत । त्यास जिंकून गणराज स्वपुरांत । विजयाच्या आनंदात ॥५॥
अन्य शक्ति विचारिती । तेव्हां आदिशक्तीप्रती । सिंधूच्या कारागारीं जे असती । ते देव तेथ कैसे आले ॥६॥
मयूरेशाविरुद्ध लढले । हें कैसें शक्य झालें । तें सांगून पाहिजे केलें । संशय पटल तूं दूर ॥७॥
आदिशक्ति तैं सांगत । मेरुसंस्थ महेशान असत । दैत्य त्यांसी बद्ध करित । परी ते समर्थ न होती ॥८॥
देव त्रिविध असती ख्यात । तत्त्वाकार शक्तींनो ते ज्ञात । कर्ममय ते देहरूप असत । शास्त्र ऐसें सांगतसे ॥९॥
सर्व भावांत चमकत । म्हणून देव ऐसे ख्यात । देवत्व त्यात त्रिविध वर्तत । वेदवादी हें जाणती ॥१०॥
शंभर अश्वमेध यज्ञ करित । तो इंद्रपद भोगित । कर्मज देव ऐसे राहत । कांचनाचलीं मेरूपर्वतीं ॥११॥
मंदारादि स्थानांत । त्यांचीं नगरें वर्तत । त्यांत असुरादि जिंकित । यांत कांहीं संशय नसे ॥१२॥
ब्रह्मदेवाच्या दिवसांतीं ते जात । मन्वंतरपरायण लयांत । यज्ञाचें फळ पूर्ण भोगित । तेव्हां पुनः जन्म घेती ॥१३॥
पुनरपि मनुष्य जातींत न येती । जैसें कर्म तेथ करिती । तैसें फळ ते लाभती । ऐसें रहस्य जाणावें ॥१४॥
अन्य कर्ममय देव स्थित । व्यापून सर्व विश्व राहत । आपल्या अधिकारानुरुप वर्तत । कर्मपरायण ते सारे ॥१५॥
जठराग्नि तैसा बाहयाग्नि । अधिकार त्या देवांचे असोनी । यमयातनादीपासुनी । अन्य अद्‍भुताधिकारी ते ॥१६॥
दैत्याच्या त्यावरी प्रभाव न पडत । कर्मबळें कादापि विश्वांत । सदा अधिकारसंयुक्त । ते देत दुसर्‍या प्रकारचे ॥१७॥
योगबळें योगीश । तो देवांसी चालवितो परेश । अन्य कोणत्या बळें अनीश । चलन न पावती अधिकारयुत ॥१८॥
ब्रह्मदेवाच्या दिवसांनीं न पावत । मृत्यु हे देव श्रेष्ठ । कर्मरूप प्रधारक असत । निराधार हे सारें ॥१९॥
जेव्हां महाप्रलय होत । तेव्हां हेही लय पावत । यांत संशय कांहीं नसत । ऐका शक्तींनो रहस्य हें ॥२०॥
लोकपरिवारासहित । ते पुनः देहधारी होत । मृत्युलोकीं नर समस्त । कर्मनियंत्रित । असतातीं ॥२१॥
जैसें कर्म करिती । तैसें ते फळ लाभती । तत्त्वरूप देव असती । वेदांमध्यें प्रकीर्तित ॥२२॥
ते तत्त्वानें चराचर विश्व । आनंदविती अभिनव । उत्पत्ति स्थिति संहार भाव । ब्रह्माकारस्वभावें राहती ॥२३॥
हे जगदीश्वर समस्त । महाप्रलय जेव्हां होत । तेव्हां स्वविहार संपवित । योगनिद्रा तैं घेती ॥२४॥
योगाकार ते विशेषे असत । पुनः निर्मून ब्रह्मांडे खेळत । देवनायक त्यास नसत । योगबळानें ही भीती ॥२५॥
योग हा द्विविध वर्णित । विबुधोत्तमांनी शास्त्रांत । वायुसाधनदानी लाभत । प्राण्यायामादिकांनी ॥२६॥
त्या योगानें तत्त्वस्थ होत । देवही योग्याच्या वंशजगांत । केव्हां तें करावें रहस्य ज्ञात । शास्त्रमार्गानुसार ॥२७॥
संप्रज्ञात असंप्रज्ञात । योग द्विविध असे ख्यात । दुसरा ब्रह्मभूत विदित । योग्यांसी तो साध्य महा ॥२८॥
त्या योगबळें योगी जिंकती । सुरनरासी साध्यांत जगती । देव त्यायोगें त्यांच्या वश होती । करिती जें जें ते इच्छित ॥२९॥
प्रारब्धचाळविती योगीवश होऊन । देव ते होत पराधीन । तेव्हां त्या देवांच्या विहारीं योगिजन । आसक्त होती तैं योगभ्रष्ट ते ॥३०॥
ते जन्ममृत्यु वश होती । योग्यांच्या योगभावें देवांस भीती । तत्त्वरूप ते जाणावे जगती ॥ वेदवाद हयास प्रमाण ॥३१॥
कर्म एक त्रिविधस्थांचें । एकेक आश्रित रूपांचे । त्याच्या सेवनें भजनें त्यांचें । द्वंद्वरूप वर्ततसे ॥३२॥
आतां प्रकृत अवतार चरित । विकटाचें ऐका एकचित्त । एकदा ब्रह्मदेव मयूरक्षेत्रांत । आला तें क्षेत्र पहावया ॥३३॥
तेव्हां तो मोहयुक्त । विचार आपुल्या करी मनांत । हा शिवाचा पुत्र ज्ञात । यास नमन मीं न करावें ॥३४॥
मीं ज्येष्ठ हा गणेश्वर साक्षात । जरी यांत संशय नसत । तरी परीक्षा घेऊन पश्चात । नमन मीं करीन यासी ॥३५॥
ऐसा विचार करून ब्रह्मांडांत । शिवशक्तिसमन्वित । अन्तर्धान पावून राहत । गुप्तरूपें ब्रह्मदेव ॥३६॥
मयूरेश तें जाणून । निर्मीं चराचर जग प्रसन्न । ब्रह्मदेव तें पाहून । शरण गेला पुनः त्यासी ॥३७॥
तेव्हां श्वासासह आंत ओढित । ब्रह्म यास ओढी उदरांत । तेथ अनंत ब्रह्मांडें भटकत । ब्रह्मदेव येथून तेथे ॥३८॥
ऐसें सहस्त्र वर्षें जात । तेव्हां उच्छ्‍वासमार्गें टाकित । बाहेर त्या विधीस बळवंत । मयूरेश महायश ॥३९॥
बाहेर येऊन विधाता पाहत । एक क्षण त्यास तैं विस्मित । होऊन पुनरपि शरण जात । स्तुती करी तयाची ॥४०॥
तदनंतर हर्षयुक्त होऊन । परतला स्वस्थानीं विनतमन । मयूरक्षेत्रीं तेव्हांपासून । ब्रह्मकमंडलू वर्ततसे ॥४१॥
ऐशा प्रकारें विधीचा मद । हरण करून खेळे सुखद । द्विजपुत्रासवें हर्षद । मयूरेश जो जगत्स्त्रष्टा ॥४२॥
भक्तांसी जो सर्व देत । ऐसा हा देव उदात्त । पुढें एकदा भाद्री चतुर्थी येत । शुक्ल पक्षांतली तेव्हां ॥४३॥
तेव्हां गणेश्वराची मृन्मय मूर्ति । आपापल्या घरीं स्थापिती । शंकरादि गण सर्व पूजिती । आदरानें त्या मूर्तीसी ॥४४॥
मयूरेश स्वतः बनवित । शुंडादंडादि चिन्हयुक्त । मूर्ति एक तिज पूजित । स्तुती करी जोडून कर ॥४५॥
मयूरेश त्या स्वरूपांत । स्वतःचीच स्तुति करीत । गणनाथा वंदन तुजप्रत । सर्वविघ्नविदारक नमन तुला ॥४६॥
भक्तांना जे दुष्टरूप असत । त्यांना जो विघ्न देत । ब्रह्मांचा पति जो उदात्त । सर्व सिद्दिप्रदाता ॥४७॥
अमेय मायेनें युक्त । ऐशा ढुंढे नमन तुजप्रत । वक्रतुंडा मीं प्रणाम करित । वक्रांचा तूं नाशकर ॥४८॥
परात्म्यासी लंबोदरासी । सर्वांच्या जठरस्थासी । चिंतामणिस्वरूपासी । पंचचित्तधरा नमन असो ॥४९॥
हेरंबासी परेशासी । दीनांसी दीनरूपासी । योगेशासी सदा शांतिदात्यासी । शांतिमयासी नमन असो ॥५०॥
शांतीच्या शांतिरूपासी ॥ गणेशासी ज्येष्ठराजासी । पूज्यासी विकटासी । ज्येष्ठांस पददात्या नमन तुला ॥५१॥
सर्वांच्या मातापित्यासी । अनादीसी विघ्नपासी । सर्वांच्या आदिस्वरूपासी । विघ्नांच्या विघ्नरूपा नमन तुला ॥५२॥
सर्वसत्तात्मकासी । स्वानंदवासीसी सर्वपूज्यासी । संयोग अयोग मूर्तीसी । भक्तांस भक्तिदात्या नमन तुला ॥५३॥
महोदरासी भीमासी । पाप्यांसी दंडदात्यासी । स्वधर्मनिरतां सुखदात्यासी । मयूरवाहना नमन तुला ॥५४॥
मयूरेश्वरासी आखुवाहासी । सर्वेशासी परात्परासी । काय स्तवूं मीं तुजसी । गणाधीशा योगाकारस्वरूपा ॥५५॥
शिवादीही असमर्थ झाले  । स्तुति करूं न शकलें । वेदादिकही मूकत्य पावले । तेथें माझी काय कथा ॥५६॥
आम्हीं तुझे सदा दास । करी आमुच्या रक्षणास । देई दृढ भक्ति तुझी आम्हांस । जेणें माया न बाधेल ॥५७॥
बुद्धीशा तुज माझें नमन । ऐसें मयूरेशासी स्तवून । मयूरेश झाला नत एकमन । पूजाविधि आचरे भक्तीनें ॥५८॥
ऐशा रीतीं शिवादि पूजिती । सर्वही ते गणनायकाप्रती । मुनिगणही सर्व स्थापिती । मृण्मयमूर्ति विशेषें ॥५९॥
त्या कालावधींत तेथ येत । एकनिष्ठ पूजी विश्वदेव तीर्थें हिंडत । यदृच्छेनें तेथ प्राप्त । एकनिष्ठ पूजी नारायणा ॥६०॥
तो नित्य पूजी नारायणासी । शेषशायी जो सुखविलासी । अव्याहतगति तो पापासी । जाळून टाकी तपानें ॥६१॥
समुद्रमध्यांत वसत । त्या जनार्दना तो भजत । नंतर जलादिक समस्त । सेवन करी भक्तीनें ॥६२॥
अत्यन्त भक्तियोगें पावत । गाणेशांत योग्यता वरिष्ठ । माया करून झाकून टाकित । ज्ञान विश्वदेवाचें ॥६३॥
मायेनें मयूरेश जाणत । शेषशायीचा वृत्तान्त । बुद्धिमोहानें तो विसरस । योगमायेनें रहस्य सारें ॥६४॥
विश्वदेव येऊन पार्वतीप्रत । भिक्षा पायसादींची मागत । तीही तें त्यास देत । अपोशन करून स्मरण करीं ॥६५॥
शेषशायीचें स्मरण करित । तो महादुःदुखयुक्त । तेथेचि जाहला स्थित । तो द्विजोत्तम त्यासमयीं ॥६६॥
तदनंतर गणराज खेदयुक्त । नारायण होऊन सांत्वन करित । चार वर्षांचा तो बाळ पूजित । पराशरसुत मूर्तीसी ॥६७॥
मृन्मय उपचारांनी पूजित । त्या मूर्तीसी भक्तियुक्त । गणेशाख्य ज्ञान त्याप्रत । विश्वेदेवासी देत असे ॥६८॥
त्या शांतिप्रद ज्ञानें युक्त । गाणपत्य स्वभावें नमित । गुणेश्वरासी तैं शांतित प्राप्त । विश्वेदेव गेला स्वस्थानीं ॥६९॥
एकानिष्ठेनें मुनि भजत । मयूरेशासी एकनिष्ठ । ऐश्या सुव्रतें विस्मृत । भावें कैसे ज्ञान संछादलें ॥७०॥
विष्णूचा पराक्रम हटवून । खेळे तेथ मयूरेश प्रसन्न । द्विजबाळांसह क्रीडा पावन । करित होता गजानन ॥७१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते विष्ण्वादिपराधीनतादर्शनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP