खंड ६ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति अन्यशक्तींस । सांगतसे कथा सुरस । घेऊन जलंधररूपास । पुनरपि गेला जैं जनार्दन ॥१॥
नाना वीर समायुक्त । बहुविध सेवद्कांनी सेवित । नागरिक तैसे मित्र मानित । महेषा जिंकून असुर आला ॥२॥
गणेशमायेनें युक्त । वृंदा त्या वसमयीं सत्य मानित । हर्षभरें त्यास पूजित । पति परमेश्वर रूपानें ॥३॥
त्या गुणशालिनी सुंदरीस पाहून । केशव गेला मोहून अप्रतिम रूपसंपन्न । यौवनभरात जी होती ॥४॥
नारायण नंतर एकांतात । तिच्यासवे रतिसुख भोगित । तीही स्नेह समायुक्त । उत्साहित होऊन साथ देई ॥५॥
आता शंकराचा वृत्तांत । गणेश कृपेनंतर जो घडत । गणेशमायेचा प्रभाव दिसत । शक्तींनो सावध ऐकावा ॥६॥
शंकर क्रोधसंयुक्त लढत । त्या वैर्‍यांशी त्वेषयुत । चक्रानें तो संहारित । दैत्याचें उत्कट सेनादल ॥७॥
जलंधर स्वयं मायायुक्त । त्याच्या सवें तैं लढत । राक्षसी देवताही लढत । परस्परांशी उत्साहानें ॥८॥
तिकडे विष्णु वृंदेसहित । भोगी रतिमुख आनंदांत । त्यायोगे तिचें पातिव्रत्य नष्ट । जलंधरावरी प्रभाव त्याचा ॥९॥
शंकर गणेशचक्र सोडून । जलंधराचें करी हनन । तेव्हा देव विप्रेंद्र स्तवन । शंकराचें सर्व करिती ॥१०॥
त्यांच्यासह तो जात । कैलास पर्वतावरी परत । तदनंतर धर्माचरणरत । जाहले मानव निश्चयें ॥११॥
विश्व सारें आनंदांत । बुडालें त्या विजयें तुष्ट । सर्वान स्वकर्मरत । जाहले कैलासभूमिवरी ॥१२॥
विष्णु नित्य वृंदेस भोगित । नाना रतिक्रीडेंत मग्न होत । तैं तेथ दैत्य पराभूत । परतून सांगती सर्व वृत्त ॥१३॥
म्हणती प्रतापी शंकर । त्यानें वधिला जलंधर । तें ऐकूनी विस्मित फार । सर्व जन जाहले ॥१४॥
जलंधररूपें अन्य नर । कोण हा राहत वृंदेसह सुर । ही किंवदन्ती पसरता नगरभर । अन्तर्धान झाला श्रीविष्णु ॥१५॥
वृंदेस कळता वृत्तान्त । ती चिता पेटवून त्यात । उडी मारून स्वदेह जाळित । त्यायोगें गेली स्वर्गासी ॥१६॥
तिज पाहून मोहयुक्त । विष्णु तेथें रुदन करित । वृंदेचें चरित्र आठवून मोहित । मायावश जाहला ॥१७॥
वृंदेच्या चितेजवळी बसून । विलाप करी जनार्दन । दैत्य पाताळांत गेले पळून । भयाकुल सर्व झालें ॥१८॥
विष्णूस देव उपदेश करिती । मुनिजन हितवचन सांगती । परी कामबाण पीडित चित्तीं । दारुण यातना विष्णु भोगी ॥१९॥
तेव्हां त्या विष्णूचें वीर्य पडत । कामबाणें तो पीडित । भूपृष्ठावरी तें तेजयुक्त । त्यांतून एक पुरुष जन्मला ॥२०॥
त्या अमोघ विष्णुवीर्यापासून । जन्मून तो पुरुष शोभन । कामरूप अति महान । संचार करी धरेवरी ॥२१॥
विष्णु तेथेचि बसत । देव तेव्हां वृंदेस प्रार्थित । विष्णूची पत्नी होई सांप्रत । तपानें आराधिलें त्यानें तुला ॥२२॥
तिनें स्वीकारून तें वचन । वुक्षरूप तुलसी होऊन । शिलारूप विष्णूशी लग्न । शुभकर ती करती झाली ॥२३॥
कार्तिक मासी शुक्त पक्षांत । जनार्दनास द्वादशी तिथीस वरत । महादेवीनों त्यानें मुदित । विष्णुदेव जाहला ॥२४॥
तिज घेऊन वैकुंठांत । विष्णु हर्षभरें जात । आनंदित जाहले अमर समस्त । तिकडे काम बळी जाहला ॥२५॥
तो विष्णुवीर्यज सुत । महातेजस्वी वनांत । हिंडत असता त्यास भेटत । शुक्राचार्य असुरगुरु ॥२६॥
शुक्र त्यास उपदेशित । शिवपंचाक्षर पुनीत । ती दीक्षा मिळता जात । प्रणाम करुनी तयासी ॥२७॥
घोर वनांत जाऊन । काम करी तप दारुण । शंभूस तोषवी एकमन । निराहार नित्य तप करी ॥२८॥
त्याच्या ऐशा उग्र तपें होत । सुर मानव संभ्रान्त । दिव्य सहस्त्र वर्षांनी ते न शक्त । उभें राहण्या त्याच्यापुढें ॥२९॥
तेव्हां देव महादेवास प्रार्थित । दया करा दैत्येशावर सांप्रत । तैं शंकर प्रकट होत । दैत्यापुढें त्या समयीं ॥३०॥
त्यास जागवून म्हणत । वर माग मी प्रसन्न असत । शंकरास पाहून वंदित । कर जोडून तो कामासुर ॥३१॥
वरती उठून पूजा करित । भक्तिभावें त्यास स्तवित । यजुर्वेंदांतील रुद्रस्तोत्र म्हणत । शंकरासी तोषविलें ॥३२॥
शंकरासी संतुष्ट पाहून । महासुर बोले विनीत । वचन । हर्षोत्फुल्ल त्याचे नयन । भक्त वत्सला वरदात्यास त्या ॥३३॥
महेश्वरा जर तूं प्रसन्न । झालास देण्या वरदान । तुझी दृढ भक्ति देई सुमन । राज्य ब्रह्मांडाचें मजला ॥३४॥
जे उत्पत्ति स्थिति संहारयुक्त । त्यापासून मज भय नसो जगांत । ऐसें करी देवा मजप्रत । नाथा बळवंत तू मजला ॥३५॥
ज्यासी जन्म स्थिति मरण । ऐशा महेश्वरांच्या हातून । मज न येवो कदापि मरण । ऐसा वर देई मजला ॥३६॥
आरोग्यादि समायुक्त । विजयी सदा संग्रामांत । देव देवेश्वर सर्वातीत । करी मज प्रभावबळें ॥३७॥
जें जें मी इच्छित । तें तं मिळावें मजप्रत । तुझ्या अनुग्रहें सर्वत्र सतत । परमेश्वरा नमन तुला ॥३८॥
आदिशक्ति म्हणे अन्य शक्तींप्रत । कामासुराचें वचन ऐकत । शंकर होउनी विस्मित । म्हणे तयासी तपें प्रसन्न ॥३९॥
शिव म्हणे तयाप्रत । दुर्लभ असे तुझे वांछित । देवांसी दुःख त्यानें संभवत । परी तें तुजसी देईन ॥४०॥
महा उग्र तपानें मी तृप्त । महासुरा जे जे वर तूं मागत । ते ते सफल होवोत । माझ्या वरदानें आता ॥४१॥
तूं श्रेष्ठत्व पावशील । सदा सुखांत राहशील । ऐसें बोलून वचन सबल । शिव पावला अंतर्धान ॥४२॥
तो महासुर तेथेंचे असत । हर्षभरें तो नाचत । नंतर तो शरण जात । स्वगुरुशुक्राचार्यांसी ॥४३॥
सर्वविचारज्ञ शुक्राप्रत । सांगे तो सर्व वृत्तान्त । जाहला शुक्रही हर्षभरित । दैत्याचार्य योगींद्र ॥४४॥
तदनंतर कामासुर वरित । महिषासुरपुत्रीस सुविहित । तृष्णा तिचें नाम ख्यात । रूपवती गुणसंपन्न ती ॥४५॥
तदनंतर दैत्यगण दिगंतातून । आले एकत्र मिळून । त्यांच्यापुढें अभिषके पावन । शुक्रें केला कामासुरासी ॥४६॥
वेदमंत्रांच्या जयघोषांत । ब्राह्मणहस्ते । विधिवत । कामासुर राजश्रीनें युक्त । जाहला ह्रष्ट विलासी तैं ॥४७॥
त्यानें नेमिले पांच प्रधान । रावण शंबर महिष महान । बळी दुर्मद महा ओजस्वी बलवान । नगर निर्मिलें नवीन ॥४८॥
रतिद ऐसें नाव ठेवीत । शुक्रवचनानुसार वागत । सर्व अपेक्षायुक्त त्या नगरांत । दैत्यदानव राक्षस गेले ॥४९॥
तेथ जाऊन ते राहती । चातुर्वर्ण्य सुखे नांदती । या नगराची शोभा होती ॥ वर्णण करण्या अशक्य ॥५०॥
ऐसी कामासुरास राज्यप्राप्ती । होऊन तो प्रबळ जगतीं । पुढें जाहली काय गती । तें परिसा पुढील अध्यायांत ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते कामासुरराज्यप्राप्तिवर्णनं नाम तृतीयोध्याः समाप्तः ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP