खंड ६ - अध्याय २१
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः । भ्रुशंडी देवेशांसी सांगती । विकर्म करणार्यांची गति । भैरव त्यांसी कैसे दंडिती । या मयूरक्षेत्रांत ॥१॥
मयूरक्षेत्रांत कोणी क्षत्रिय । वास करोनी करी अपाय । वनांत लोकांत गाठून द्रव्य । मारून त्यांना लटतसे ॥२॥
कुटुंबपोषणीं आसक्त । शिश्नोदरपरायण अत्यंत । विविध पापें जो करित । मयूराख्य या क्षेत्रांत ॥३॥
निर्लज्ज तो परस्त्रीवरी । जबरदस्तीनें बलात्कार करी । जातिभेदादिकही अंतरीं । भेद त्याच्या मुळीं नव्हता ॥४॥
कोणी भगिनी एकटी भेटत । तरी मद्य पिऊन तीस पकडित । आपुली रतिकामना पुरवित । ऐसा खल तो होता ॥५॥
चोर्या ब्रह्महत्या करित । गोवधस्त्रीवधरत । त्याचीं पापें अगणित । कोठवरी मीं सांगावीं ॥६॥
गणेशास वा अन्य देवास । न करी तो नमस्कारास । कोणाचीही पूजा विशेष । न करी तो मोठा पापिष्ठ ॥७॥
तेव्हां भैरव त्यास घेऊन । बांधिती करितो ताडन । नराधमा त्या नेऊन । उभा करिती नग्न भैरवापुढें ॥८॥
त्या महाक्रूर भैरव नायकास । पाहतां भय उपजलें चित्तास । तो क्षत्रिय हाहाकार खास । करून पडला मूर्च्छित तैं ॥९॥
धरणीतळीं तो पडत । त्यासी भैरव सावधान करित । तदनंतर त्यास पुन्हा मारित । मृतिमूर्च्छाविहीन करून ॥१०॥
मायाप्रभावें तयास न येत । मरत वा मूर्च्छा तैसे करित । अग्निकुंडांत फेकित । जाळिती फेकिती तयासी ॥११॥
ऐसी सहस्त्र वर्षें जात । तदनंतर त्यास क्रोधें टाकित । अग्निचक्रावरी अवचित । फिरविती गरगर वेगानें ॥१२॥
हाहाकार तो करित । अग्निज्वाळांत पोळत । परी मरण वा मूर्च्छा न येत । भैरवमायेनें तयासी ॥१३॥
एक हजार वर्षांनंतर । शीतकुंडांत टाकिती ते क्रूर । त्या क्षत्रिय पाप्यास ज्वर । पीडा फार थंडीनें ॥१४॥
ऐसीं एक सहस्त्र वर्षें थंडींत । अतिभयंकर त्यास ठेवित । हैम कुंडांतून काढून ठेवित । तप्त शिलेवरी मग ॥१५॥
शिळेवर ठेवून घणाचे घाव । घालून चूर्ण करिती अवयव । कंटकयुक्त मुद्गरें ठाव । घेती शरीरमर्मांचा ॥१६॥
ऐसी शंभर वर्षें जात । देवसत्तमहो तेव्हां तयाप्रत । यमयातना ते देत । दारून परम असह्य ॥१७॥
विषारी जंतू रुरु चावत । ऐश्या रौरव नरकांत टाकित । तो नराधन तेथ राहत । एक सहस्त्र संवत्सर ॥१८॥
अग्निसदृश त्याचा दाह । सोशीत होता तो सदेह । तदनंतर तेलाच्या कढईत प्रत्यह । तळिती त्यासी भैरवभट ॥१९॥
त्या वेळीं दारूण वेदना होत । त्या हजार वर्षें भोगित । तदनंतर तापल्या वाळूंत । पूरून ठेविती त्या क्षत्रियाधमासी ॥२०॥
तेथही हजार वर्षें दुःख भोगित । तदनंतर पडे पिशाचयोनींत । अत्यंत पीडा भोगित । क्षुधातृषार्त राहतसे ॥२१॥
शीतोष्ण पीडा संत्रस्त । क्षेत्रांत इतस्ततः भटकत । देवदूत त्यास पाहत । तैं दंडानें मारिती ॥२२॥
वेदशास्त्र ध्वनि ऐकून । होम धूमादिक न सहन होऊन । पळून जाई तो पिशाच दीन । मंत्रशस्त्र भयानें ॥२३॥
तीन सहस्त्र वर्षें भूतयोनींत । ऐसी पीडा तो भोगित । तदनंतर भैरवगण नेत । तयासी नग्न भैरवाजवळीं ॥२४॥
त्यास तो प्रणाम करित । जाहला शिक्षेने पुनीत । गणेशाच्या मंदिरीं नेत । जाहले गणेश्वरदर्शन ॥२५॥
त्यायोगें तो ब्रह्मभूत । जाहला पापी क्षत्रिय त्वरित । ऐसे अन्यही पापी मुक्त । जाहले क्षेत्रीं मरण येतां ॥२६॥
ऐशीच अन्य कथा एक । सांगतों जी पापदाहक । शिवमुख्य देवांनो क्षणैक । एकाग्र होऊन ऐकावी ॥२७॥
काश्यप ब्राह्मण या क्षेत्रांत । चौर्य मद्यादींत आसक्त । परस्त्रीलंपट तो सतत । शिश्नोदरपरायण ॥२८॥
ब्रह्महत्या द्रव्यलोभें करित । अधम तो मयूरक्षेत्रांत । हे कळतां राजा काढून घेत । सर्वस्व त्या ब्राह्मणाचें ॥२९॥
धर्मपरायण नरांसी सांगत । बांधा हया ब्राह्मणा त्वरित । तदनंतर क्षेत्राबाहेर टाका म्हणत । नृपाज्ञा जन पाळितीं ॥३०॥
तेव्हां तो द्विज विलाप करित । शपय घेऊन करी व्यक्त । पश्चात्ताप होऊन येत । पुनरपि मयूरक्षेत्रांत ॥३१॥
लोकांसह द्रारयात्रा करित । तें पाहून जन समस्त । दया उपजून चित्तांत । देती अन्नवस्त्रादि तयासी ॥३२॥
चार द्वारांची यात्रा करित । तो ब्राह्मणाधम त्या काळांत । पंचमीस पारणा करित । षष्ठीस सर्पदंशे मेला ॥३३॥
उग्र विषानें तो होतां मृत । भैरव त्यास बांधून नेत । नग्नभैरवापुढें ठेवित । त्यासही शिक्षा बहू केली ॥३४॥
मागें वर्णिली तैश्यापरी । त्यासी यातना झाल्या भारी । विघ्नेशाचें दर्शन होत परी । अंतीं झाला ब्रह्मभूत तो ॥३५॥
क्षेत्रांत जें महापाप केलें । तें द्वारयात्रेनें दूर झालें । आणखी एक वृत्त ऐकिलें । तेंही तुम्हां सांगतसें ॥३६॥
दंडकारण्यदेशांत । अत्रिकुलोद्भव बाह्मण वसत । बाल्यापासून तो करित । पापकर्मे नानाविध ॥३७॥
सुप्रतीक नांवें ख्यात । द्रव्यलोभी तो अत्यंत । जनांचें द्र्व्य चोरून भोगित । असंख्य विषयांचे भोग तो ॥३८॥
एकदां चारही वर्णांचे जन । सप्तपुरी यात्रेंत जाती मिळून । त्यांत होता हाही ब्राह्मण । स्वदेशीं पातला त्यांच्यासवें ॥३९॥
स्त्रीपुत्रांस भूषवित । अनीतिलब्धद्रव्यें सतत । तो तीर्थे विविध हिंडत । चोरी करण्यास त्या स्थळीं ॥४०॥
एकदा कोणी पुराणिक वाचित । मांदिरीं पुराण श्रद्धायुक्त । तेथें हा पापात्मा जात । चोरी करण्याच्या इच्छेनें ॥४१॥
श्रोत्यांमध्यें तो बसत । पुराणश्रवणाचें नाटक करित । तेव्हां त्या स्कंद पुराणांत । ऐकिलें मयूरक्षेत्रमाहात्म्य ॥४२॥
दैवयोगें तें ऐकतां । त्या द्विजाचा बुद्धिभेद तत्त्वतां । होऊन विचार करी आतां । काय करूं मीं द्विजाधम ॥४३॥
केवढीं पापें मीं केलीं । विष देऊन हत्या केली । वधिली मी द्विजमंडळी । तीर्थांत चोर्या बहु केल्या ॥४४॥
काशींत प्रदक्षिणा करित । पंचक्रोशींची जनांसहित । तेव्हां चौर्यादि पापें आचरित । अगणित मी दुष्टबुद्धि ॥४५॥
आतां माझी काय गति होणार । इतुका अधम नसेल नर । ब्रह्मांत जो मग्न समग्र । तोचि खरा ब्राह्मण ॥४६॥
पुराण वाचन समाप्त होत । तैं पुराणिकास भेटला एकांतांत । त्यास प्रणाम करून म्हणत । हात जोडून सुप्रतीक ॥४७॥
सर्व तीर्थांत तैसे क्षेत्रांत । दुष्ट जन जें पाप करित । तें जगतीं वज्रलेप होत । त्याचा नाश कोठें होय ? ॥४८॥
पुराणिक म्हणे तयाप्रत । सप्तपुरींत प्राणी जें पाप करित । तें मयूरक्षेत्रीं प्रवेशें होत । लय सारें ऐसें जाण ॥४९॥
धर्म अर्थ काम मोक्षप्रद । चार प्रकारचीं क्षेत्रें विशद । पांचवें ब्रह्मभावप्रद । तें मयूरक्षेत्र निःसंशय ॥५०॥
तेथ जरी पाप घडत । तरी तें वज्रलेपसम होत । ऐसें त्याचें वचन ऐकत । सुप्रतीक ब्राह्मण तो ॥५१॥
त्यास वंदन करून जात । सहकुटूंब मयूरक्षेत्रांत । यथाविधि यात्रा करित । द्वारादि चिन्हित क्षेत्रवासी ॥५२॥
देवागारांत जाऊन । गणनायकाचें करी पूजन । अंतीं झाला पापविहीन । ब्रह्मभूत तो द्विज ॥५३॥
महेश्वरांनो ऐसे नाना जन । जरी पहिले पापी महान । मयूरक्षेत्रांत प्रवेशून । पापहीन सर्व झाले ॥५४॥
आणखी एक पुरातन । सांगतो चरित्र शोभन । तें ऐकतां संशयहीन । होईल तुमचें अंतःकरण ॥५५॥
धर्मध्वज नांवाचा वाणी । द्रव्यलोभी होता प्राणी । विष देऊन मारिलें झणीं । मातापितरांसी कळूं लागतां ॥५६॥
नित्य द्र्व्यार्थ हत्या करित । नाना द्विजांची तो दुष्टचित्त । एकदा वाण्यांसह तो जात । व्यापारास्तव दंडकारण्यांत ॥५७॥
ते वणिग्जन करिती । माघांत महायात्रा अतिप्रीती । म्हणोनि सारे तैं जाती । मयूरक्षेत्रीं मिळोनी ॥५८॥
त्यांच्या संगें धर्मध्वजही जात । द्रव्याचा लोभ चित्तांत । म्हणोनि आनंदानें प्रवेशत । मोरगांवात तो वाणी ॥५९॥
प्रवेशमात्रें पापें घाबर लीं । तीं सारीं बाहेरच थांबलीं । धर्मध्वजाच्या परतण्याची पाहिली । वाट त्याच्या पातकांनी ॥६०॥
तेथ मयूरक्षेत्रांत । त्या वेळीं तो पाप न करित । यथाविधि यात्रारत । हर्षभरल्या मानसानें ॥६१॥
पुनरपि वाण्यांसह परतत । मयूरेशास सोडून जात । क्षेत्राबाहेर पडता त्वरित । पापें प्रवेशण्या यत्न करिती ॥६२॥
परी तीं पापें त्याच्या शरीरांत । प्रवेशण्या असमर्थ होत । यात्राविधानें शुद्ध असत । स्पर्श त्यास करूं न शकती ॥६३॥
तेव्हां सारीं पापें विचार करिती । काय झालें या वैश्याप्रती । अन्यक्षेत्रीं प्रवेशून झटिती । पापकर्मे हा करीत होता ॥६४॥
वाटलें मयूरक्षेत्रांत । हा पापें करील निश्चित । परी तैसें न घडलें सांप्रत । शुद्धरूप जाहला ॥६५॥
आतां सदैव पुण्य करील । आमची गति काय होईल । तेव्हां हा पापकर्मे करील । ऐसें आतां करूंया ॥६६॥
विचार ऐसा करून । आणावें म्हणती म्हणती महाविघ्न । अन्य पाप्यांच्या ह्रदयीं प्रवेशून । त्या वैश्यासी पीडिती ॥६७॥
अकस्मात चोर तेथ येती । त्या वैश्याचें द्रव्य चोरित । त्यास मारून जर्जंर करिती । दुःखी झाला धर्मध्वज ॥६८॥
तेव्हां पुनरपि पाप करण्या इच्छित । तेवढयांत तो पुराणिक दिसत । त्यास मानसिक पीडा सांगत । प्रणाम करून श्रद्धेनें ॥६९॥
म्हणे मीं सोडिलें होतें पापकर्म । परी कां वांछा होतसे अधम । माझें सर्वस्व चोरांनीं धन । उत्तमोत्तम लुटून नेलें विप्रवरा ॥७०॥
भलें करून बुरें झालें । म्हणोनि माझे चित्त दूषलें । आतां काय करावें भलें । तें सांगा मज सर्वज्ञा ॥७१॥
तेव्हां तो पुराणिक सांगत । ऐकून त्याचा वृतान्त । तुझीं पूर्व उत्कंठित । पीडा करण्या तुज बैश्या ॥७२॥
म्हणोनि तूं सत्वर जाऊन । मयूरेशक्षेत्राचा आश्रय घे महान । पुत्रकलत्रादी आणून । तेथेंच रहा निरंतर ॥७३॥
त्यायोगें धर्मसंयुक्त । तूं वैश्या होशील सतत । दुःखहीन गणेशप्रेमांत । आनंदानें राहशील ॥७४॥
पूर्व पापें तेथें न करतील । पीडा तुजला तीं अबल । मयूरक्षेत्रांत प्रवेशण्या बळ । त्यांना नसे कदापि ॥७५॥
तें ऐकून पुराणिकांचें वचन । हात जोडून प्रणास करून । त्वरेनें मयूरक्षेत्रीं परतून । राहिला तेथ धर्मध्वज ॥७६॥
आणविले दारापुत्र । वैश्यवृत्तीनें तेथ राही पवित्र । गणेशाचें भजन सर्वत्र । करी तो कुटुंबीयांसह ॥७७॥
त्याचीं पापें बाहेर हिंडतीं । धर्मध्वजा पीड्ं न शकतीं । वैश्य ब्रह्मभूत अंतीं । जाहला पंचदेवेशांनो ॥७८॥
म्हणोनि जो नर महादोषयुक्त । त्यानें मयूरक्षेत्रांत । वास करावा सतत । ऐसा अनुभव या कथेचा ॥७९॥
अन्यत्र जरी राज्याभोग । अथवा लाभला स्वर्गभोग । तरी मयूरक्षेत्रांत सुभग । नीव जातिस्थही अधिक सुखी ॥८०॥
आयासहीन ब्रह्मभूत । नर होई या क्षेत्रांत । तेव्हां या ब्रह्मांडमंडळांत । काय आहे या तुल्य ॥८१॥
जो हें मयूरक्षेत्रमहिमान । वाचील ऐकेल वा एकमन । तो स्वभावें पापहीन । होऊन पाळील धर्म सदा ॥८२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खण्डे खण्डे विकटचरिते मयूरे यात्रार्थप्रवेशफलादिवर्णनं नामैकविंशतितमोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP