खंड ६ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढें सांगत । एकदा दैत्यराजेंद्र म्हणत । बलिमुख्य असुराप्रत । कामासुर महाप्रतापी ॥१॥
कामासुर म्हणे ऐका हित । बळी रावण मुख्य असुरहो सांप्रत । नीतिनिपुण तुम्हीं समस्त । सांगा हें योग्य अयोग्य वा ॥२॥
बह्मांड मी जिंकीन निश्चित । वरप्रभावें समस्त । तुमच्या साहाय्यें मी युक्त । शुक्राचार्य माझे रक्षक ॥३॥
वरदानाचें माहात्म्य न होत । कदापि वृथा या जगांत । आपण जयहीन युद्धांत । होणार नाहीं कधींही ॥४॥
कामासुराचें तें वचन । ऐकून म्हणती दित्येंद्र सत्तम । हर्षयुक्त मनीं होऊन । करांची ओंजळ बांधूनिया ॥५॥
आपण योग्य तेंच सुचविलें । आम्ही सर्व तुमचे सेवक सगळे । महेशेंद्रासी जिंकूं स्वबळें । प्रतापानें महाभागा ॥६॥
तुमच्या पराक्रमाची तुलना नसत । या ब्रह्मांडमंडळांत । दैत्येंद्रा शुक्र साहाय्यभूत । आतां चिन्ता कशीची ? ॥७॥
तदनंतर ते सर्व जाती । नीति पारंगता शुक्रास भेटती । त्यास प्रणास करून पूजिती । त्याच्या सह निघाले युद्धासी ॥८॥
चतुरंग सेनायुक्त । अपार सैनिक होते ज्यांत । चंद्र जैसा तारांगणांत । तैसा कामासुर त्यांत शोभे ॥९॥
नाना वाहनस्थ वीर । शस्त्रधर काहीं वृक्षधर । काहींच्या पर्वत करीं अघोर । रणदुर्मद ते निघाले ॥१०॥
जैसें अथांग समुद्रांत । सर्वत्र पाणीपाणी दिसत । तैसें कामासुराचें सैन्य अमित । संख्यातीत अपार ॥११॥
बलि रावणादि असुर । जेथ उभे करण्या युद्ध घोर । कोण नृप होणार । समर्थ त्यांच्यासवे लढण्या ॥१२॥
तया कांहीं राजे शरण आले । कांहीं रणांगणीं मेले । कांहीं राज्य सोडून पळाले । वनांत भयसमन्वित ॥१३॥
ऐशापरी भूमंडळ जिंकून । सप्तद्वीपयुक्त जें महान । दैत्येश विजयी होऊन । हर्षनिर्भर जाहले ॥१४॥
तदनंतर जाऊन पाताळांत । नागांसह शेषास जिंकित । वश करून त्यांस जात । स्वर्गी जेथे देव वसती ॥१५॥
कामासुर खल येत । महादैत्यांसह स्वर्गांत । हें कळतां भयभीत । जाहले देवगण सगळे ॥१६॥
बृहस्पतीस विचारून । ते शंकराची भेट घेऊन । त्यास सांगती वर्तमान । राज्य सोडून सारे गेले ॥१७॥
ब्रह्माविष्णु मुख्य सुर । भयोद्विग्न झाले फार । दैत्येंद्रमुख्य स्वर्ग समग्र । शून्य पाहती अमरावती ॥१८॥
म्हणोनी विना विरोध प्रवेशत । कामासुरादि अमरावतींत । इंद्रासनावरी विराजत । कामासुर दर्पानेम तैं ॥१९॥
तो अन्य दैत्यवीरांनी संपृत । कामासुर नंतर स्थापित । विविध दैत्य सान्निध्यांत । तदनंतर गेला ब्रह्मलोकीं ॥२०॥
तेथही सारे शून्य असत । रिकामा ब्रह्मलोक ख्यात । प्रजापतिपदावरी बसत । कामासुर त्या वेळीं ॥२१॥
तेथ कांहीं काल भोगित । नानाविध भोग अनंत । तदनंतर वैकुठीं जात । दैत्यवीरांच्या संगतीनें ॥२२॥
तो लोकही देवशून्य असत । तें पाहूनी साए हर्षयुक्त । कामासुर विष्णुपदीं बसत । रममाण झाला अल्पकाळ ॥२३॥
नाना दैत्यांस म्हणत । कामासुर हर्षयुक्त । मायामोहें तो मोहित । अत्यंत गर्वयुक्त वचन तेव्हां ॥२४॥
सांगा मीं काय न जिंकिलें । असेल ऐसें स्थान राहिलें । तरी तें मज सांगा पहिलें । जिंकीन तेंही क्षणांत ॥२५॥
विष्णुमुख्य देवेंद्र पळाले । नपुंसकासम ते वागले । माझ्यासमोर न ठाकले । रणांगणीं लढण्या कोणी ॥२६॥
देवेंद्र सगळे युद्धहीन । आतां आपण विजयी महान । तदनंतर शंबर दैत्यवचन । म्हणे वैरसमन्वित ॥२७॥
दैत्यवर्यांनी प्रेरित । असुरांचें हित चिंतित । म्हणे कामासुरा जिंकी सांप्रत । शंभुमहादेवास तूं ॥२८॥
तयाच्या आश्रयें देवमुख्य वसती । त्यांस जिंकितां तेही हरती । तेव्हांच ब्रह्मांडाचा राजा निश्चिती । होशील तूं कामासुरेंद्रा ॥२९॥
शिवानें तुज वर दिला म्हणून । जरी असेल कृतज्ञपण । तरी ऐक हित वचन । उपकार त्यानें कांहीं न केला ॥३०॥
आमुचें स्वधर्मयुक्त वचन । सर्वांसी सुखदायक शोभन । कर्मांचे देणें फलदान । हें देवांचें कर्म नेमिलें असे ॥३१॥
तं जरी देवता न देत । तरी नाश त्यांचा निश्चित । त्यांच्या आज्ञेनें कर्माधार चालत । जग सर्वदा समग्र ॥३२॥
तूं दैत्येशा समर्थत्वपर । कर्मबळेचि झालासी थोर आम्हीं सारे तपहीन तत्पर । आहोंत राजा आश्रित तुझे ॥३३॥
आता शंभूस जिंकून । सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करून । असुरांशी मान्यता दे मिळवून । आम्ही प्राणपणे मदत करू ॥३४॥
तूं त्यास जिंकशील । या भयानें देवांसी सबल । आपुल्या शत्रूंना देत अचल । आश्रय तो शंभूदेव ॥३५॥
सुर असुर हा वेदांत । सांगितला असे सतत । शिव जरी देवमय ख्यात । दैत्य हितप्रद होईल कैसा ॥३६॥
अहो तीन शक्तींनो, हें ऐकून । कामासुर करी मनन । प्रतापी परी मोहयुक्त मन । तथ्य मानी त्या वचनांत ॥३७॥
दैत्यांसी म्हणे शोभन । सांगितलें तुम्ही हितवचन । तुम्हां सहित याच क्षणीं जाऊन । जिंकीन त्या शंकरासी ॥३८॥
खरोखरचि तदनंतर । घेऊन दैत्यसेनेचा संभार । स्वारी करण्या शंकरावर । कामासुर निघाला ॥३९॥
त्याचें ससैन्य आगमन । जाणतां शंकर चिंतामग्न । देवांसह विचारविनिमय करून । कैलास सोडून पळाला ॥४०॥
अरण्यांत कोठेंतरी देवांसहित । गुहांमध्ये निवास करित । सदाशिव होउनी भयभीत । महादेव संत्रस्त झाला ॥४१॥
कैलासावरी जेव्हां जात । शून्य सारें तेथ पाहत । हर्षभरें तो प्रवेशत । दैत्यवीरांसहित । तेव्हां ॥४२॥
कैलासशिखरावर चढून । कामासुरें केला घोष महान । दैत्यांचा ध्वज फडकवून । कैलासाचा राजा झाला ॥४३॥
तेथील जे भोग समस्त । ते भोगिले अविरत । अन्य भोग कल्पून रमत । त्यांत दैत्यवीरांसह तो ॥४४॥
ऐश्यापरी ब्रह्मांड जिंकून । तो महा उग्र आनंदून । कृत्यकृत्य स्वतःस मानून । गर्वोद्धत झाला दैत्येंद्र ॥४५॥
ऐसा बहुत काळ जात । कामासुरासी होती सुत । शोषण त्याचा ज्येष्ठ पुत्र असत । त्यासी करी कैलासनाथ ॥४६॥
भयवर्जित तो नेमित । दुःपूर नाम आपुला कनिष्ठ पुत्र । विकुंठाधिपतिपदीं ख्यात । बळीस सौरलोक प्रभु केले ॥४७॥
महाअसुर तो स्थापित । प्रभु तो रावणास शक्तिलोकांत । शंबरास ब्रह्मलोकांत । महिषा इंद्रलोकनाथ करी ॥४८॥
रणदुर्मदा दुर्मदास स्थापित । कामासुर यमपुरीचें राज्य देत । ऐसें नाना असुर अधिकारयुक्त । केले त्यानें त्रिभुवनांत ॥४९॥
तदनंतर अन्य असुरांसहित । परतला तो भूमंडळीं त्वरित । राहुन आपल्या पुरींत । राज्य करी आनंदानें ॥५०॥
स्त्री मद्य मांस रत । त्रैलोक्यलभ्य भोग भोगित । भोगी सुह्रज्जनांसहित । न समजे काल कैसा गेला ॥५१॥
आपणास अमर मानित । स्वपराक्रमें मदोन्मत्त । शक्तींनो कामासुर तो दुष्ट । ऐशा परी वागतसे ॥५२॥
चराचरांत जें जें वर्तत । तें तें त्याच्या स्वाधीन असत । आपणासम कोणी न जगांत । ऐसें बळगर्वित त्यास वाटे ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते कामासुरविजयवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP