खंड ६ - अध्याय १
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूताप्रत । प्राज्ञा तूं कथिलें परमाद्भुत । लंबोदराचें माहात्म्य तेणें तृप्त । जाहलों मी मुनिश्रेष्ठा ॥१॥
अहो गणेशाचें महिमान । सर्व संतोषकारक परम पावन । श्रवणमात्रेंही तें करी प्रदान । ब्रह्मसायुज्य साधकासी ॥२॥
आता विकटाचें महिमान । योगामृत जें महान । सर्वसिद्धिप्रद कथन । पूर्णपणें करी सूता ॥३॥
जें मुद्गलें दक्षाप्रत । कथिलें पूर्वी गणेशवृत्त । तें मजला सविस्तृत । सांगे ताता दयाघना ॥४॥
तुझ्या संगतींत संतुष्ट । झालों आम्ही विशेषें सांप्रत । कथाश्रवणें भावी काळांत । कृतकृत्य होऊं आम्हीं ॥५॥
सूत म्हणती उत्तम प्रश्न । भार्गव शिरोमणि तूं परम । सारग्राही शौनका उत्तम । यांत संदेह कांहीं नसे ॥६॥
आपणां सर्वांच्या प्रीतिकराण । करीन गणनाथाचें चरित्र वर्णन । ब्रह्मभूतप्रद जें महान । गणेशाहून श्रेष्ठ अन्य नसे ॥७॥
वेदज्ञान ऐसें सांगत । अल्प पुण्ययुक्त जे असत । त्यांची प्रीति न वाढत । गणेशउपासना मार्गांत ॥८॥
पूर्वी महायोगी मुद्गलाप्रत । दक्षें विचारलें योगरहस्य अद्भुत । त्यानें जें सांगितलें तयाप्रत । तेंच द्विजांनों ऐका आतां ॥९॥
दक्ष म्हणे मुद्गलाप्रत । धन्य जन्मकर्मादि वाटत । ज्यायोगें तुझें दर्शन प्राप्त । पुण्यवशें निःसंशय ॥१०॥
आतां सांगे मजप्रत । विकटाचें अद्भुत चरित । लंबोदराचा महिमा ऐकून मनांत । उत्कंठा अधिकचि वाढली ॥११॥
कैसा हा गणाध्यक्ष असत । त्याचें ब्रह्म कोणतें असत । कोणत्या योगानें तो लाभत । अवतार त्याचे किती असती ॥१२॥
त्याचा विहार कोठें चालत । तो भूमीवर कां अवतरत । कोणत्या दैत्यांसी मारीत । देवांनी कैसी स्तुति केली ॥१३॥
ऐसे त्याचे विविध चरित । माननीया सांगावे मजप्रत । आपणांसम महाभाग असत । परोपकारांत निमग्न ॥१४॥
संसरसागरांत जे बुडत । नौकारूप तुम्हीं त्यासीं जगांत । म्हणोनि तारावें मज सांप्रत । ऐसे तुम्हां प्रार्थितसे ॥१५॥
सूत म्हणे शौनकाप्रत । दक्ष विनयपूर्वक ऐसें प्रार्थित । त्यानें होऊन संतुष्टचित्त । सुद्गल सांगती तयासी ॥१६॥
दक्षा धन्य धन्य तूं जगांत । गणेशकथा ऐकूं इच्छित । प्रश्न विचारून भक्तियुक्त । वाढविसी माहात्म्य गणेशाचें ॥१७॥
तूम साक्षात् ब्रह्मसुत । तेव्हां आश्चर्य काय हयाच्यात । तुझ्या भक्तिभावें प्रसन्नचित्त । सांगतो तुजला रहस्य सारें ॥१८॥
विकटाचें सारें महिमान । ब्रह्मभूतकर महान । सर्वसिद्धिप्रद पावन । संक्षेपानें तुज सांगतो ॥१९॥
दक्षा ऐतिहासिक वृत्त । सांगतो जें असे अद्भुत । विकट गणेशाचें आख्यान पुनीत । ऐक आतां भक्तिभावें ॥२०॥
आदिमाया शक्तिलोकांत । महाशक्ति निरामय विलसत । ईश्वरासह देवता सेवत । भक्तिभावें तिज सर्वदा ॥२१॥
एकदां ती महाशक्ति । गणेशाच्या पूजनात होती । निमग्न नियमानुसार चित्तीं । अन्य शक्ति तिज पाहती ॥२२॥
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती । तैशाचि अन्य देवतां विचारिती । महाशक्तीसी प्रश्न विनीतमती । कोणाचें पूजन तूं करिशी ? ॥२३॥
तूं साक्षात् सर्वरूप जगतीं । जगद्ब्रह्मातें प्रकाशदा सुमती । तुझ्या ध्यानयोगें होती । ब्रह्मभूत समस्त जन ॥२४॥
धर्म अर्थकाममोक्ष देसी । आपुल्या तूं भक्तांसी । सर्व शक्तींना मूलभूत वर्तसी । वेदांत ऐसें कथिलें असे ॥२५॥
ब्रह्मा विष्णु शिवादिक होत । तुझ्या अनुष्ठानें सतत । समर्थ आपापल्या कार्यांत । कर्माचें फल तूं देसी ॥२६॥
तपांचें तैसें ज्ञानाचें । फल देसि तूंच साचें । तुझ्याहून श्रेष्ठ न कोणी याचें ॥ प्रमाण वेदशास्त्रांत ॥२७॥
ऐसें असून नित्यनियमित । गणेशमूर्तीसी तूं पूजित । सदैव त्याचें ध्यान करित । त्याचें कारण काय असे ॥२८॥
सदैव त्याची नामावलि जपत । जगदंबिके तूं भक्तियुक्त । सर्व प्राण्यांचे भुलविण्या चित्त । गुहयगोपनार्थ हें करिसी का ॥२९॥
सर्व सत्ताधारी देवी जगांत । तूंच यांत संशय नसत । ऐसे असोनि मोहयुत । आम्हांसी कां करिसी परी ॥३०॥
लाज सोडून विचारित । आज तुजला शुद्धचित्त । तुज पाहून गणेश पूजारत । आश्चर्य आम्हां वाटत असे ॥३१॥
दासी तुझ्या पायाच्या जगांत । आम्हीं सर्वही जगांत । तुजविण आम्हां श्रेष्ठ न दिसत । त्रैलोक्यांत समग्र ॥३२॥
ऐसे त्या तीन मुख्य शक्ति । जेव्हां आदिशक्तीस विचारिती । तेव्हां ती स्नेहे तयांप्रती । म्हणे ऐका मुख्य रहस्य ॥३३॥
माझ्या हृदयांत जें रहस्य असत । सर्वसिद्धिप्रद पूर्ण योगयुक्त । तें सारें परम अदभुत । ऐका प्रमुख देवतांनो ॥३४॥
सार्या तुम्हीं कल्याणयुक्त । मी सर्वव्यापी असे जगांत । गणेशाच्या अंशरूप आपण समस्त । म्हणून गण गणेशाचे ॥३५॥
पूर्वी आपण चार समुत्पन्न । शंभु विष्णु सूर्य तैसाचि महान । गणेशापासून म्हणून । त्याचें पूजन मीं करिते ॥३६॥
नामरूपात्मक सर्व जगांत । माझ्यापासून उत्पन्न होत । जें जें असतें नामरूपात्मक । तें तें सर्वही नाशिवंत ॥३७॥
उत्पत्तिनाश कार्यांत । सदा आधार ब्रह्म असत । स्वानंदमय सत्ययुक्त । देवी सूर्यरूपे मूलाधार ॥३८॥
असद् सतमय उभयरूप असत । विष्णु समरूप व्यवस्थित । नेतिरूप शिव वर्तत । चवथा तो शास्त्रदृष्टा ॥३९॥
या चारांच्या संयोगें होत । पाचवा स्वानंद जो साक्षात । स्वसंवेद्य तो प्राप्त होत । योगसेवेनें जगांत ॥४०॥
या पाचांहून भिन्न । जो वर्ततो त्यावाचून । संयोग अयोग यांचें मिलन । होतां तोचि गणेशयोग ॥४१॥
पंच चित्तवृत्तींचा चालक जगतीं । म्हणोनि तयांसी म्हणती । त्या चिंतामणीची भावभक्ती । योगमार्गें पहा देवींनों ॥४२॥
मायारूपा सिद्धि असत । भ्रांतिप्रद विविधा जगांत । भ्रांतिधारकरूपा वर्तत । बुद्धी ऐसे शास्त्र सांगे ॥४३॥
त्यांचा स्वामी गणेशान । स्वानंदनगरीं करी वसन । योगशांतिमय तो महान । लक्षलाभांचा तो पिता ॥४४॥
‘ग’ कार तो संयोग असत । ‘ण’कार अयोगाचें रूप ख्यात । त्यांचा स्वामी तो गणाधीश असत । कला आपण सर्व त्याच्या ॥४५॥
म्हणोनि भक्तिभावयुक्त । भजतसे गणेशास सतत । न पाडण्या तुम्हां मोहांत । अथवा गुहय रक्षणार्थ ॥४६॥
हे सर्व तुम्हां कथिलें । माझ्या नियमांविषयी बोलिलें । चित्त माझें पावन झालें । चिंतामणीचें ध्यान करितां ॥४७॥
ज्यांचें चित्त काममोहित । त्यांना गजानन न दिसत । भजन कर्त्यासिही न पावत । जरी ते असती भावहीन ॥४८॥
अज्ञान आवरणानें युक्त । परात्पर शक्ति मज त्याची म्हणत । आपण गण त्याचे समस्त । शंभु विष्णु मुख्यादि ॥४९॥
निर्गुणरूप गज असत । तेंच गणेशाचें आनन म्हणत । कंठाखाली सगुण असत । देहधारी उभय संयोगें ॥५०॥
ऐसें सांगून थांबत । स्वानंदवासिनी मौन धरित । तेव्हां त्या अन्य शक्ति विस्मित । होऊन राहिल्या निजांतरीं ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणें षष्ठे खंडे विकटचरिते शक्तिध्यानवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP