खंड ६ - अध्याय १९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश भ्रुशुंडीस प्रार्थिती । आतां देवागाराचें माहात्म्य आम्हांप्रती । सांगा कोण मुख्यजन पूजनीय असती । गणपीं वरी जे रत सदा ॥१॥
भ्रुशुंडी तैं सांगत । विष्णुदेव द्वारकेसहित । गणेशाच्या पूर्वभागीं स्थित । देवेंद्रसत्तमांनो ॥२॥
जीं जीं वैष्णव क्षेत्रें असतीं । मथुरादी तीं सर्व वर्तती । पूर्वभागीं तेजें विलसती । द्वारकाही तेथ असे ॥३॥
शंभर धनुष्यें प्रमाण । गर्भागारापासून । त्या द्वारकेंत रामकृष्ण । प्रद्युम्न अनिरुद्धही राहती ॥४॥
गणेशाची भक्ति करण्यास । पुष्टिपति गणेशाची मूर्ति सुरस । स्थापून जनार्दनसेवेस । करिती द्वारकावासीय ॥५॥
कुंडरूपें तेथ गोमती । गणेशभक्तिस्तव करी वसती । त्या कुंडांत स्नान करिती । ते ब्रह्महत्यादि पापमुक्त ॥६॥
श्रावण मासीं कृष्णपक्षांत । नरनारी मयूर क्षेत्रांत । जे जनार्दनासी पूजित । त्यांसी सर्व अर्थ प्राप्त ॥७॥
त्यांच्या पूजनमात्रें पापवर्जित । मनोप्सित लाभ होत त्वरित । शत यज्ञांचें फळ वर्तत । तुलनेनें त्याच्या सम ॥८॥
मथुरेच्या डाव्या बाजूला । द्वारकेचा वास भला । ही सर्वार्थप्रदायिनी पूजकाला । रामकृष्ण बालरूपधारी तेथें ॥९॥
त्यांचें करावें पूजन । सर्वं कामफलप्रद तें पावन । गौरी विनायकास तेथ स्थापून । हे उभय जनार्दंन सेवा करिती ॥१०॥
तेथेंच डोहरूपें वसत । यमुना नदी साक्षात । तींत स्नान करिता पापमुक्त । देवेशांनो नर होई ॥११॥
कृष्णाष्टमीस ती यात्रा ख्यात । प्रतिमासीं जनांसी पुनीत । सारें अशुभ ती जाळित । ऐसा प्रभाव जाणावा ॥१२॥
अयोध्या दक्षिणांगीं स्थित । त्याच प्रमाणावरी शोभिवंत । द्वारकेपासून तेथ ख्यात । शरयू कुंडक शोभिवंत ॥१३॥
तेथ राम लक्ष्मण भरत । शत्रुघ्न ही प्रेमें स्थापित । ऐसे जन हेरंबभक्त । सेवा तत्पर सर्वदा ॥१४॥
चैत्र शुक्ल नवमीस भरत । यात्रा तेथें वार्षिक विधिवत । आनंदें ती करिता होत । दुरितांचा संहार ॥१५॥
द्वारकेच्या पुरोभागीं । सत्यवतीसुत व्यास जगीं । सर्वधर्मज्ञ संस्थित भोगी । दहा धनुष्यें अंतरीं निवास ॥१६॥
त्यापुढें नरसिंह वामन । मत्स्य त्यापुढें विष्णुअ पावन । बुद्ध तैसे नर नारायण । दोघे देव त्यापुढतीं ॥१७॥
हयग्रीव त्यापुढें सम अंतरावर । वामांगभागीं दहा धनुष्यपर । विष्णुरूप वसती उदार । मथुरेसी सुखप्रद ॥१८॥
त्या रूपांचे करितों कथन । महेशांनो करा श्रवण । कूर्म परशुराम कल्की महान । पृश्निसूत कपिल तैसा ॥१९॥
सिद्धेश शेष सनकादी योगी । आपापलें नाम देऊन जगीं । गणनायकासी स्थापिती अनुरागी । भजती त्यांसी सदैव ॥२०॥
अयोध्येच्या पुढती संस्थित । सात जनार्दन पुनीत । त्यांचीं नावें मुदित । नारद कार्तवीर्य अत्रि यज्ञ ॥२१॥
ऋषभ पृथु वैन्य मोहिनी । आपापल्या नामांकित करोनी । विघ्नेश्वरांनी स्थापन करूनी । भावयुक्त ते भजती ॥२२॥
प्रतिमासीं द्वादशीस करावी । त्यांची पूजा क्रमें बरवी । विष्णूंची चोवीस रूपें ध्यावीं । सदा क्षेत्रनिवश्यांनी ॥२३॥
ते विष्णुअंश संभूत । द्वारकास्थ अवांतरी स्थित । सर्वही मयूरक्षेत्रांत । हितकारक प्रख्यात ॥२४॥
स्वयं विष्णु तेथ राहत । त्या जागेस या क्षेत्रांत । विकुंठ ऐसें नांव असत । दोनशें धनुष्यें अंतरावरी ॥२५॥
एकादशी तिथीस भजती । त्यांना जन भावभक्ति । त्यायोगें पूजक होती । सौभाग्ययुक्त मयूरक्षेत्रीं ॥२६॥
अन्यही नाना अवतार । तैसीच विविध क्षेत्रें अपार । हया मयूर क्षेत्रांत निरंतर । गणेशभक्तीस्तव वास करिती ॥२७॥
वैकुंठवासी भगवन्त । स्थापना करून विधियुक्त । अनन्यभावें सिद्धिविनायका पूजित । परम भक्ति तयाची ॥२८॥
अन्य जे वैष्णवरूपयुक्त । ते आपापल्या नामें गणेशास स्थापित । त्यास भावभक्तीनें भजत । ऐसें पूर्वांग गर्भागाराचें ॥२९॥
आतां दक्षिणांगाचें वर्णन । संक्षेपें करितों पावन । मध्यभागीं गर्भागारापासून । दोनशें धनुष्यावरी काशी असे ॥३०॥
तेथ विश्वेश वसत । भक्तिपरायण जो अत्यंत । ढुंदिराजाची स्थापना करित । अनन्यमनें भजे तयासी ॥३१॥
मणिकर्णिका कुंड पापहारक । तेथ स्नान करितां निःशंक । पातकें ब्रह्महत्यादिक । दूर होती ऐसा महिमा ॥३२॥
भागीरथी सरोवर । देवनायकहो तेथे सुंदर । त्यांत स्नान करितां नर । पापविमुक्त होत असे ॥३३॥
क्षेत्रवासी करिती पूजन । प्रदोषकाळीं प्रसन्न । माघ कृष्ण चतुदर्शीस शोभन । यात्रा करिती मानव ॥३४॥
वार्षिक यात्रा क्षेत्रनिवासी । जे करिती विश्वनाथ तोषवायासी । ते सर्व भोगिती सुखासी । अंवती असे डावीकडे ॥३५॥
त्याच प्रमाणांत दूर । सर्वदा पुण्ययुक्त तें नगर । तेथ महाकाल शंकर । स्वयं करिती निवास सदा ॥३६॥
क्षिप्रानदींतून उत्पन्न वर्तत । महाकालाचें कुंड तें ख्यात । त्यांत स्नान करिता होत । पापाचा विनाश सत्वरची ॥३७॥
जे सोमवारीं प्रदोषसमयीं पूजिती । ते सर्व धनधान्ययुक्त होती । काशीच्या दक्षिणभागीं वसती । मायापुरीची महेशांनो ॥३८॥
दक्षयज्ञच्छेदका ईश्वरासी । प्रदोषकाळीं त्रयोदशीसी । शनि युक्तास जे क्षेत्रस्थ पूजिती त्यांसी । सर्व इच्छित लाभतसे ॥३९॥
तेथ गंगानदीचें दार । कुंडरूपें विलसे दूर । स्नान त्यांत करितां नर । वांछित फळ सत्वर पावे ॥४०॥
काशीच्या पुढें त्र्यंबक स्थित । शंभर धनुष्य अंतरीं विलसत । त्याच्या क्षेत्रीं गोदावरी असत । महानदी ती प्रख्यात ॥४१॥
त्यांत स्नान करिता दूर होती । गोमांस भक्षणादी पातकें जगतीं । कपिल गणनाथास स्थापून पूजिती । भक्तिसंयुक्त ते तपासी ॥४२॥
तितक्याच अंतरावरी क्षेत्रांत । वैद्यनाथ असे स्थित । भक्तांसी सर्वार्थ देत । भवसागराचा नाशकर्ता ॥४३॥
भवरोगविनाशक ख्यात । वैद्य शिव परम अद्‍भुत । गणनाथ नाम औषध देत । योग साधकांसी अपूर्व ॥४४॥
उत्कटेश तितुक्याच अंतरीं स्थित । गणेशभक्तीस्तव उत्कंठित । त्र्यंबकाच्या वामभागीं स्थित । रामेश नाम शंकर ॥४५॥
त्याच प्रमाणावरती क्षेत्रांत । समुद्र कुंडरूपें वसत । त्यापुढतीं सोमनाथ वर्तत । मल्लिकार्जुन त्यापुढें ॥४६॥
त्याच प्रमाणांत संयुक्त । आपापल्या तीर्थसमन्वित । त्र्यंबकाच्या दक्षिणांगीं वर्तत । घुसृणेश प्रभु प्रसन्न ॥४७॥
तैसाचि ओंकारेश्वर । देव अमलेश्वरयुक्त थोर । तळयाचें रूप घेऊन नीर । नर्मदा नदीचें तेथ असे ॥४८॥
त्याच्या दर्शनें पाप नासत । स्नान करिता फळ अद्‍भुत । दश जन्मकृत पापें नष्ट । निश्चित ऐसें मुनि सांगती ॥४९॥
तदनंतर क्रमानें असत । केदार शंभु त्याच प्रमाणांत । ऐसे हे शिवरूप ख्यात । मयूरेश्वर क्षेत्रांत ॥५०॥
कृष्णपक्षांत चतुर्दशदिनी । प्रतिमासीं पूजनीय ते असोनी । क्षेत्रवासी जनांसी मनीं । ध्यानें इष्टार्थदायक ते ॥५१॥
त्यापुढें महाक्षेत्रांत । कैलासनिवासी शिव साक्षात । चारशें धनुष्यावरी वर्तत । तें क्षेत्र कैलासनाथाचें ॥५२॥
तेथ भागीरथी नदी वाहत । स्वानंदानें विलसत । त्यांत स्नानमात्रें होत । विशेष फलदायी ती ॥५३॥
त्या क्षेत्रीं महागणपतीस । स्थापून करी पूजनास । गाणपत्य अग्रणी शिव तयास । भजतसे आदरानें ॥५४॥
दक्षिणेस शैव देवालय । ऐसें हें दक्षिणांग निलय । कथिलें संक्षेपें अभ्युदय । पावे नर हें ऐकतां ॥५५॥
आतां पश्चिमांग कथन । करितों तें करा श्रवण । पांचशें धनुष्यांवरी महान । महालक्ष्मी कामदात्री ॥५६॥
भक्तांस साक्षात्‍ इष्टदात्री । लक्ष्मी कुंडभव तीर्थ निर्मात्री । त्यांत स्नानमात्रें दूर करिती । दारिद्रय तैसें पाप सारें ॥५७॥
तिच्या वामांगीं स्थित । महाकाळी शक्ति ख्यात । तेथेच कालीसर पापनाशक पुनीत । ऐसें माहात्म्य जाणावें ॥५८॥
दक्षिणांगीं महासरस्वती । त्या शक्तीच्या सारस्वत कुंडाची महती । जाडयमांद्यहारक ती । आतां महालक्ष्मीचें कार्य जाणा ॥५९॥
स्वानंदवासाची स्थापना करित । ती गणनायकास भजत । अष्टमी तिथीस पूजिली जात । महेशांनो जनांकडून ॥६०॥
महाकाली सिद्धीशा स्थापित । भक्तिपरायण त्यास भजत । आनंदानें नित्य त्यास ध्यात । जन तियेसी पूजिती ॥६१॥
महासरस्वती बुद्धीशास स्थापित । तृतीयेस त्यास भजत । तिची पूजा करिती सतत । भक्तगण प्रेमानें ॥६२॥
महालक्ष्मीच्या पुढे स्थित । विष्णुकांची पुरी क्षेत्रांत । विघ्नेपास स्थापून भजत । लक्ष्मीहस्तें विष्णू त्यासी ॥६३॥
अष्टमीस तो पूजावा । क्षेत्रवासीयांनीं बरवा । सर्वदायक हा देव जाणावा । पापनाशकर त्यांचा ॥६४॥
त्याच्या पुढतीं मातृकाक्षेत्र वर्तत । दोनशें धनुष्यें विस्तृत । माहेश्वरीचें तेंही स्थान अद्‍भुत । त्यापुढतीं कौमार्यक्षेत्र असे ॥६५॥
तेंही तेवढेंच विस्तृत । त्या नांवाच्या तीर्थयुक्त । त्यापुढती वाराहीचें क्षेत्र ज्ञात । सर्वदायक परम श्रेष्ठ ॥६६॥
वाराही दुरितनाशिनी तेथ साक्षात । गणेशसेवेंत असे रत । त्यानंतर ऐंद्रीचें महाक्षेत्र कीर्तित । गणेश्वरासी भजतसे ॥६७॥
महाकालीचें पुर तदनंतर । नारसिंही शक्ति भयंकर । ती दैत्यांना भयदायिनी उग्र । त्यापुढे शाकंभरी शक्ति ॥६८॥
त्यापुढती रक्तदंतिका । त्यापुढे भीमा तीर्थयुक्ता पावका । तदनंतर महासरस्वतीच्या ऐका । शक्ती ज्या येथ वास करिती ॥६९॥
वैष्णवी ब्राह्मी चामुंडा । त्रिपुरा ती मयुरीं विरूढा । कुंडरूपें तीर्थांचा सर्वदा । स्वस्व क्षेत्र पर निवास असे ॥७०॥
त्यापुढे क्षेत्रें कुंडरूप करून । सर्व शक्ति येथ राहून । मयुरेश्वराचें करिती भजन । स्थापून गणेश स्वनामांकित ॥७१॥
गाणपत्य स्वभावें पूजिती । अनन्यभावें गजाननास स्मरती । अन्यही शक्तितिर्थीं वसती । शक्ति जाणा नानाविध ॥७२॥
नवमी तिथीस यात्रा करावी । नरें सुखाची जोड मिळवावी । त्या सर्वांची नामावळी अशक्य मज वर्णन करण्या ॥७३॥
परी त्यांत नऊ कोटी मुख्य असती । ऐसी असे शास्त्रोक्ति । पांचशें धनुष्य अंतरावरती । लंबोदर गणेशशक्ति स्थापित ॥७४॥
गणेशासी ती भजत । तिची यात्रा अष्टमीस ख्यात । आतां उत्तर दिशेस जे स्थित । देव त्यांचीं कथितों नावें ॥७५॥
गर्भागारापासून । चारशें धनुष्यावरी पितामह पावन । तो वेदपारंगत महान । क्षेत्रांत या निवास करी ॥७६॥
त्याच प्रमाणांत वामांगीं असत । अग्निदेव गणराज सेवेंत । अग्नींनी विविध असे सहित । गणेशसेवा तत्पर जे ॥७७॥
दक्षिणांगी स्वयं कर्म असत । नानाविध कर्मांनी तें वेष्टित । सूर्याच्या कलांपासून अद्‍भुत । ऐशा तीन मुख्य शक्ति ॥७८॥
ब्रह्मदेवाच्या आश्रयें स्थित । सारस्वत सर विख्यात । सरस्वती नदीरूप तेथ वर्तत । सर्व सौख्यप्रदा सर्वदा ॥७९॥
तेथ स्नान करिता दूर होतीं । पापें जरी महान असती । मंदबुद्धित्वें नष्ट होतीं । मनुजांचीं देवसत्तमहो ॥८०॥
तेथ स्नान करिता पापें नासतीं । जाडयभाव क्षीण होती । चतुरानन तेथ स्थापिती । सिद्धिबुद्धिपति गणेश ॥८१॥
सदा त्याच्या पूजेंत तत्पर । भक्तियुक्त ब्रह्मा चतुर । अग्नीनें स्थापिला विनायक थोर । भजे त्यास नित्य आदरें ॥८२॥
आग्नेयकुंड तेथ असत । सर्व पापांचा तें नाश करित । स्नानमात्रें प्राप्त होत । प्राण्यांसी अग्निलोक तेथें ॥८३॥
कर्मकुंड समीप स्थित । तेथें स्नान करिता नष्ट होत । त्रिविध कर्म पूर्वकृत । कायिक वाचिक मानसिक ॥८४॥
ब्रह्मक्षेत्राच्या पुढे वर्तत । दोनशें धनुष्य प्रमाणे वेदांगक्षेत्र पुनीत । त्यापुढती भानुक्षेत्र विख्यात । त्याचें प्रमाण तेवढेंच ॥८५॥
त्याच्या पुढे इंद्रक्षेत्र असत । सर्वअर्थप्रदायक पुनीत । अग्नीच्या पुढे वर्तत । रवीचें क्षेत्र सम आकार ॥८६॥
त्यानंतर गभस्तीचें । तैसेंचि पुढती यमाचें । पुरोभागी कर्माचें । त्या आकाराचें तीर्थ असे ॥८७॥
सुवर्णरेताचें क्षेत्र ज्ञात । दैवाकर नामें जगांत । त्यानंतर मित्रक्षेत्र ख्यात । त्यापुढती क्षेत्र विष्णूचें ॥८८॥
इंद्राचें तैसें वरुणाचें । सूर्याचें क्षेत्र सम आकाराचें । त्या सूर्यंक्षेत्रांत बारा सूर्यांचें । स्थान बरवें जाणावें ॥८९॥
आपापल्या तीर्थांसहित । कुडरूपें मयूरक्षेत्रांत । आपुल्या नामें मूर्ति स्थापित । निरंतर सेविती गणेशासी ॥९०॥
त्यापुढती शिवकांची असत । त्यांत शक्तियुक्त शिव वसत । सोमयुक्त प्रदोषीं पूजित । त्यास ते जन सुखी होती ॥९१॥
हेरंबास स्थापून भजत । सर्वभावें गणेशाप्रत । त्याचें तीर्थ सर्व पापनाशक वर्तत । अद्‍भुत महिमा तयाचा ॥९२॥
प्रतिपदेस क्षेत्रांतील । अग्नि पूजावा प्रतापवंत अमल । सर्व पापनिहंता निर्मल । द्रव्यलाभप्रद तो होई ॥९३॥
सप्तमीस पूजनीय पितामह । जाडयभाव हरी तो निःसंदेह । भानुसप्तमीस पूजितां कर्मदेह । दोषविहीन होय नराचा ॥९४॥
संक्रान्तिसमयीं पूजावे । बारा सूर्य साधकें प्रेमभावें । तेणें सर्व रोगांपासून व्हावें । मुक्त त्यांनी परिणामीं ॥९५॥
त्यापुढे स्वयं निवसत । सौर लोकांत रवि तेजोयुक्त । चारशें धनुष्यें प्रमाण असत । क्षेत्र त्या सूर्य देवाचें ॥९६॥
रविवारीं त्या देवेशाचें पूजन । निरंतर करावें एकमन । सर्वार्थ सिद्धि लाभून । लाभेल उत्तम मुक्ति नरासी ॥९७॥
आदिदेव तेथ स्थापित । वरद नायक गणनाथ पूनीत । कालभृतांमध्य वरिष्ठ । सूर्य पूजी गणेशासी ॥९८॥
त्यापुढें चंद्रदेव । शंभर धनुष्यप्रमाण क्षेत्रांत । त्याचें क्षेत्र सर्व अभदायक प्रख्यात । त्यापुढें बुध क्षेत्र ॥९९॥
त्यापुढें असे गुरु वास करित । चंद्राच्या वामांगीं मंगळ स्थित । त्याच्या पुढें भार्गव असत । शनैश्वर विलसे त्यापुढें ॥१००॥
चंद्राच्या दक्षिणभागीं वसत । राहू जो सर्व शत्रूंचें मर्दन करित । त्यापुढती केतु असे रहात । नक्षत्रें समस्त त्यापुढतीं ॥१०१॥
आपापल्या नामांकित गणेशास । भक्तियुक्त भजती ते विशेष । नक्षत्रें ग्रह भजती तयास । क्षेत्रांत निवास करूनिया ॥१०२॥
त्यांच्या त्यांच्या वारीं पूजन । करावें जनांनी एकमन । पौर्णिमेस राहून भजून । अमावस्येस केतु पूजावा ॥१०३॥
सूर्याचे जे अन्य अवतार । आपापल्या क्षेत्री स्थिर । त्यांचीं नांवें असती अपार वर्णनातीत तीं जाणा ॥१०४॥
देवालयाच्या आठ दिशांत । अष्ट मुख्य भैरव असत । अनेक गौण भैरवांसहित । देवसेवेंत तत्पर ॥१०५॥
इंद्र अग्नि पूर्व भागांत । यम निऋति दक्षिणेंत । वरुण वायुदेव पश्चिमेस स्थित । कुबेर निऋति उत्तरेला ॥१०६॥
अष्टमीस भैरव पूजावे । पिशाचाचे नायक ते जाणावे । भूतादींचें भयनाशक स्वभावें । ऐसे हे भैरव प्रख्यात ॥१०७॥
दशमी तिथीस दशदिक्पाल । पूजावे मन ठेवून निर्मंळ । चोरादींचें भय समूळ । नष्ट होय त्यायोगें ॥१०८॥
स्वानामांकित मूर्ति स्थापिती । दिगीश गणेश्वराम भजती । भैरव ते भजन करिती । विघ्नेश्वर मयूरेश्वराचें ॥१०९॥
पूर्वद्वाराच्या सन्निध बसत । शंभर धनुष्य प्रमाणात । तेथ द्वितीयेस पूजित । अश्विनीकुमारांस साधक ॥११०॥
देवागारांत गणेशास स्थापून । महाप्रभूचें करिती भजन । त्यायोगें रूपलावण्ययुक्त शोभन । अश्चिनीकुमार उभय झाले ॥१११॥
दक्षिणेस गौरी स्कंद अस्त । ते गणेशाची स्थापना करित । विघ्नेशासी नित्य आदरें भजत । त्यांचें करिता पूजन ॥११२॥
पूजक सौभाग्ययुक्त होत । आपुला आचार जरी पाळित । तरी त्याचें चित्त सुनियत । होईल ह्यांत ना संशय ॥११३॥
षष्ठी तिथीस स्कंदास भजावें । तृतीयेस पार्वतीस उपासावें । मयूरेश भक्ता यां दोघांस नमावें । तेणें नरास सौख्यलाभ ॥११४॥
पश्चिमेस नाग महाबलवंत । वासुकि मुख्य संस्थित । द्वारासमीप नागकुंड ख्यात । अमल पुनीत जें असे ॥११५॥
पंचमीस करावें त्याचें पूजन । तेणें होय दारिद्रयनाशन । सर्व व्याधि विहीन । जेणें मानव होय सदा ॥११६॥
उत्तरेस धननाथास पूजावें । एकादशीस विशेषें ध्यावें । त्रयोदशीस धर्मराजा आराधावें । यांत नसे कांहीं संशय ॥११७॥
धर्मप्रद हा सवा पुण्यवर्धक । अन्य देवही शुभदायक । समस्तही देवालयीं पावक । पौर्णिमेस त्यासी पूजावें ॥११८॥
यमाच्या सन्निध वसती । क्षेत्रवासी पितर निश्चिती । त्यांची पूजा अमावास्येस करिती । त्यांचा वंश वाढतसे ॥११९॥
तेहतीस कोटी देव वसत । सर्वत्र या क्षेत्रांत । त्यांचीं स्थानें वर्णनातीत । ऐसे देवही जाणावे ॥१२०॥
देवागारांचें माहात्म्य कथिलें । यात्रायुक्त देवतावर्णन केलें । आता मयूराचें चरित्र भलें । सांगतों पुढती ऐकावें ॥१२१॥
देवागारापासून दोन धनुष्यांवर । राहतो येथ भृगुवर । भृगुतीर्थकुंड ज्ञात पापहर । स्नानें वंध्यत्व दोष हरे ॥१२२॥
तैसेंचि प्रजानाथा भृगूस पूजित । त्यास सर्व अर्थ होत प्राप्त । रोहिणीत त्याची यात्रा करित । क्षेत्रवासी जन मोदे ॥१२३॥
त्यानें महायोगी भृगु तुष्ट । देईल सर्वही जें इष्ट । आपुल्या नामांकित विघ्नेश्वरास संतुष्ट । स्थापून पूजी अनन्यभावें ॥१२४॥
त्याच्या वामांगीं साक्षात । त्याच प्रमाणांत स्थित । पुलह त्यास पुजितां होत । कर्मयुक्त नर सदा ॥१२५॥
पुलहतीर्थ नामक कुंड असत । तेथ जे दोषहारक पुनीत । गणेशास स्थापून भजत । अनन्यभावें तयासी ॥१२६॥
मृगशीर्ष नक्षत्रांत । त्याची यात्रा मयूर क्षेत्रांत । करिता ती वाढवित । पुण्यक्षेत्रवासी भक्ताचे ॥१२७॥
दक्षिणांगीं ऋतु असत । त्याचेही कुंड शोभायुक्त । गणेश्वरास स्थापून भक्त । योजी तो नित्य गणेशासी ॥१२८॥
आद्रा नक्षत्रांत पूजावा । क्षेत्रवासीयांनी तो भजावा । यज्ञाचें फळदाता तो जाणावा । यात्रा विधियुक्त केल्यावरी ॥१२९॥
भृगूच्या पुढें शंभर धनुष्यांवर । च्यवन मुनि वसे उदार । धाताविधाता तो सर्व । भार्गवमुनी येथ राहती ॥१३०॥
पाचशें धनुष्यें अंतर । शौनकादी समस्त मुनिवर । राहती तेथ ते पूजावे निर्भर । पंचमीस मनोभावें ॥१३१॥
श्रवण नक्षत्रांत त्यांस पूजित । तैसें पुण्यभावना संभवत । पुलहाच्या पुढें असत । पौलह मुनि प्रख्यात ॥१३२॥
त्यांचें करावें पूजन । रेवती नक्षत्र असतां शोभन । तरी सर्वदायक पावन । पौलह मुनि गणेशभक्त ॥१३३॥
ऋतूच्या पुढें असती । ऋतुवंश समुद्‍भवीं मुनिक्षेत्रीं । ते सर्वं योगज्ञ जगतीं । पुण्यवर्धन प्रतापशाली ॥१३४॥
अश्विनी नक्षत्री पूजन । करितां त्याचें सर्व अर्थ लाभून । गणेशास तेथें स्थापून । भक्तितत्पर विप्र सेविती ॥१३५॥
त्यापुढें देवगंधर्व राहती । विश्वावसु पुरोगम भजती । दोनशें धनुष्यें प्रमाण जगतीं । मयूरक्षेत्र त्याचे असे ॥१३६॥
उर्वशी रंभा आदि अप्सरा वसत । शंभर धनुष्य क्षेत्र ज्ञात । पुनर्वसु नक्षत्रांत । अप्सरापूजन । विशेषें ॥१३७॥
फुलांनीं गंधर्वांचें पूजन करितां लाभे सुख मानधन । नाना मुनिगण प्रसन्न । राहती या मयूर क्षेत्रीं ॥१३८॥
विश्ववामित्र याज्ञावल्क्य पराशर । श्वेतकेतू वामदेव थोर । रैभ्य निदाघक इअत्यादि मुनिवर । त्यांची गणना अशक्य वाटे ॥१३९॥
आपापल्या नामांकित मूर्ति स्थापिती । लंबोदरास ते भजती । तीर्थे आपुलीं निर्मिती । तेही पूजितां सुखप्रद ॥१४०॥
पूर्वभागीं जें जें असत । त्याचें वर्णंन केलें भावयुक्त । आतां दक्षिणेस जी वास्तु असत । त्याचें वर्णन करीतसे ॥१४१॥
देवालयाच्या दक्षिणेस असत । चारशें धनृष्गें प्रमाण क्षेत्र पुनीत । तें वसिष्ठ मुनीचें ज्ञात । तोही पूजी गणेशासी ॥१४२॥
स्थापून गणेश स्वनामांकित । निर्मी कुंडही अति उदात्त । त्यांत स्त्रान करिता होत । पापें सारी दूर झणीं ॥१४३॥
भरणी नक्षत्रीं पूजावा । हा वसिष्ठ गणेश बरवा । तेणें वंश वाढवावा । यात्रा करून मयूरक्षेत्रीं ॥१४४॥
त्याच्या वामांगभागीं स्थित । अत्रि जो सवार्थदाता विनत । आपुल्या नामांकित स्थापित । गणेश तोही या क्षेत्रांत ॥१४५॥
अत्रितीर्थंही तेथ असत । त्यांत स्नान करिता मान लाभत । कृत्तिका नक्षत्रें विशेषयुत । फलदायी त्याचें पूजन ॥१४६॥
दक्षिणांगीं वसिष्ठाच्या वर्तत । पुलस्त्य मुनि तो प्रभावयुक्त । आपुल्या नामांकित स्थापित । तोही ढुंडि गणेश येथे ॥१४७॥
त्याचें भजन तो करित । वसिष्ठकुंड तेथ प्रख्यात । त्यांत स्नान करिता दूर होत । आसुरभावसंभूत मल ॥१४८॥
धनिष्ठा नक्षत्र पूजित । महापुनीत जो नर भावयुक्त । यात्रा गणेशाची करित । त्यास सर्व अर्थ लाभे ॥१४९॥
वसिष्ठापासून दोनशें धनुष्यें दूर । वसिष्ठ मुनिवर उदार । अत्रीच्या पुढती आत्रेय थोर । त्याच प्रमाण अंतरी असती ॥१५०॥
पुलस्त्याच्या पुढें पौलस्त्य वसत । आपापल्या तीर्थांत । स्थापून विघ्नेश्वर स्वनामांकित । पूजिती भक्तियुक्त सर्वदा ॥१५१॥
मघा नक्षत्रांत वसिष्ठांचें पूजन । चित्रा नक्षत्रीं आत्रेयांचें पूजन । हस्त नक्षत्र असतां शोभन । पौलस्त्यकास पूजावें ॥१५२॥
अनादि नाना मुनिगण । या क्षेत्रीं राहती सगुण । त्यांतील मुख्यांचे वर्णन । करितों देवसत्तमांनो ॥१५३॥
कण्व जैमिनि एक द्वित । त्रित रेवत मेधातिथि विख्यात । भारद्वाज जमदग्नीं गौतम ज्ञात । बहुत अन्य मुनिवर ऐसे ॥१५४॥
त्यांनीही स्थापिलें गणेश । पूजिती ते भक्तीनें परमेश । त्यांच्या पूजनें नरास । सर्व कामार्थ लाभती ॥१५५॥
पूर्वी सांगितल्या नक्षत्रांत । त्यांची यात्रा नर करित । तरी त्याचें सर्व पाप नष्ट होत । ऐसें माहात्म्य क्षेत्राचें ॥१५६॥
त्याच्या पुढे पिशाचेश भूतेश । सिद्धाचारण वागीश । त्यांचे पूजन विशेष । मंगळवारीं करावें ॥१५७॥
आता पश्चिम दिशेस असत । त्या वास्तूचेम वर्णन करित । माहात्म्य क्षेत्रसंभूत । महादेवांनों ऐकावें ॥१५८॥
देवालयापासून अष्टशत । धनुष्यें अंतरावरी स्थान असत । दक्षाचें तेथ तीर्थ ख्यात । देवहो दक्षतीर्थ नाम त्याचें ॥१५९॥
तेथ स्नान करितां नर । दुर्बुद्धिमुक्त होतो सत्वर । सुबुद्धि उत्पन्न होऊन श्रेष्ठ नर । होतसे तो नर जगतांत ॥१६०॥
त्याची महायात्रा करिती । अभिजित नक्षत्रांत जे भावभक्ति । क्षेत्रवासी नर त्या प्राप्ति । सद्‍बुद्धि तेणें उपजतसे ॥१६१॥
दक्षाच्या वामभागीं संस्थित । मरीची महा ऋषि प्रख्यात । त्याचें ही तीर्थ ज्ञात । स्वाति नक्षत्रीं यात्रा त्याची ॥१६२॥
दक्षवासी आनंदें करिती । यात्रा योगींद्राची प्रीती । वृद्धिकारक ती जगतीं । मय़ूर क्षेत्राचें हें वैशिष्टय ॥१६३॥
त्या दक्षाच्या दक्षिणेस वर्तत । अंगिरानामा योगिश्रेष्ठ विख्यात । पूजनीय तो जनांप्रत । ज्ञानदाता प्रसन्न ॥१६४॥
तीर्थ तेही प्रख्यात । कुंडरूपें योग्याचे असत । त्यांत स्नान करितां लाभत । मानवास उत्तम ज्ञान ॥१६५॥
दक्षादी तीन ज्ञात । ते स्वनामांकित स्थापित । गणनायकास ते पूजित । निरंतर एक मनें ॥१६६॥
दक्षाच्या पुढती असती । साठ मुली त्याच्या ज्या सेविती । गणनायकास अति भक्ति । क्षेत्र विस्तार चारशें धनुष्यें ॥१६७॥
रविवारीं पूजितां तयासी । वंश सौभाग्य वर्धंन विशेषी । त्यांच्या पुढें सर्व प्रजा गणराजासी । पूजिण्या तत्पर उभी असे ॥१६८॥
धनिष्ठा नक्षत्रांत । पूजितां सुख सारें लाभत । त्यांचे क्षेत्र दोनशें धनुष्यें विस्तुत । तेही स्थापिती गणेश मूर्ति ॥१६९॥
आपापल्या नामें अंकित । गणेश स्थापून नित्य पूजित । मरीचीच्या पुढें वसत । मारीच काश्यपादी समस्त ॥१७०॥
त्यांची पूजा शततारका नक्षत्रांत । करितां धनप्रद ते होत । चारशें धनुष्यें क्षेत्र विस्तृत । तेही स्थापिती विघ्नेश्वर मूर्ति ॥१७१॥
त्यांसी पूजिती निरंतर । त्यापुढें अंगिरस उदार । त्याच परिमाणांत क्षेत्र । तीर्थही त्या महर्षींचे ॥१७२॥
स्वनामांकित लंबोदर स्थापिती । ते सदैव त्यांस पूजिती । आश्लेषा नक्षत्रांत लोकरीती । महायात्रा तयांची ॥१७३॥
ती करितां पुवपौत्र वृद्धि होत । क्षेत्रवांसि जनांप्रत । अन्यही मुनिवर तेथ वसत । महायोगींद्र गणेशभक्त ॥१७४॥
दुर्वांस गालव त्रिशिर । अगस्य मृकंड मार्कडेय थोर । दधीचि या सर्वांसी नर । पूजिती पूर्वोक्त दिवसांत ॥१७५॥
हे योगिसत्तम सौख्यदाते । तीर्थरूप कुंडाचे स्थापनकर्ते । गणेशास स्थापून एकचित्तें । पूजिती तयासी निरंतर ॥१७६॥
क्षेत्रवासी नर पूजिती । आदरें जे त्यांसी जगतीं त्यापुढती किंनर साध्य विद्याधर राहती । सेविती गणनाथासी सदा ॥१७७॥
तेही पूजनीय नरांप्रत । पूजितां सर्व इच्छित पुरवित । ऐसें हें हें माहत्म्य अद्‍भुत । पश्चिमदिशेचिया वास्तूचें ॥१७८॥
आतां उत्तर बाजूल असत । जी वास्तु तिचें महत्त्व सांगत । मयूरक्षेत्र संस्थित जो असत । देवश्रेष्ठ हो ऐकावे ॥१७९॥
देवागारापासून पाचशें धनुष्यें दूर । अष्ट वसु राहती थोर । स्थापून स्वनामांकित गणेश्वर । सदैव त्यांसी ते पूजिती ॥१८०॥
आपापलें तीर्थभव कुंड निमिंती । त्यांत स्नान करिता सौख्यप्राप्ति । पूणिमेस त्यांची पूजा करिती । ऐसी रुढी प्रचलित असे ॥१८१॥
त्या अष्टवसूंच्या वामागभागीं । कामदायक धेनू जगीं । त्याच प्रमाणांत । तयालागीं । क्षेत्र असे विस्तारपर ॥१८२॥
त्या धेनूचें तीर्थ असत । त्याही स्थापिती गणनाथ । आपापल्या नामांकित । पूजिती भक्तिपूर्वक विधानें ॥१८३॥
द्वदशी तिथीस पूजित । जे तर कामधेनुयुक्त । सुरांस विनीत । क्षेत्रवासी भक्तियुक्त । त्यांच्या कामना पूर्ण होती ॥१८४॥
दक्षिणांगीं देवल असित । तेही गणेश्वर मूर्ति स्थापित । योगिसत्तम त्यास पूजित । त्यांच्या पूजनें सुखलाभ ॥१८५॥
उतरा नक्षत्रांत विशेषयुत । पूजावे ते दोघे जगांत । एकनिष्ठ त्यास जे पूजित । त्यांची पातकें नष्ट होती ॥१८६॥
वसूंच्या पुढें द्रोनशें धनुष्यांवर । वसुक्षेत्र असे सुंदर । गार्ग्याचें त्यास पूजितां नर । विद्यावंत होतील ॥१८७॥
उत्तराषाढा नक्षत्रांत । यात्रा त्यांची सांप्रदायांत । स्वतः गर्ग महायोगी भजत । गणेशासी मनोभावें ॥१८८॥
कामधेनू क्षेत्रापुढती । मौद्‍गलांची असे वसती । गणपप्रिय ते ते सेविती । विघ्नराजासी सर्वदा ॥१८९॥
देव विप्र मांडूक सेविती । देवल असितांच्या पुढती । गणनाथासी सर्व पूजिती । भक्तियुक्त अंतःकरणें ॥१९०॥
उत्तरा भाद्रपदांत । मौद्‍गल पूजावे भक्तियुक्त । त्यायोगें योगसिद्धि लाभत । ऐसें शास्त्र सांगतसे ॥१९१॥
मांडूकांचें पूजन करिती । पूर्वफाग्ल्गुनी नक्षत्रांत भावभक्ती । तेणें व्याधिदोष दूर होती । यांत कांहीं संशय नसे ॥१९२॥
असितादी हे समस्त । स्वनामांकित गणेशा पूजित । तीर्थेही आपुलीं निर्मित । त्यांच्या पूजनें शांतिलाभ ॥१९३॥
त्यांच्या पुढती महात्मे मुनी असत । त्यांतले मुख्य मी सांगत । धौम्य वाल्मीकी वाचक्नवी ख्यात । मंकणक कहोड मुनी ॥१९४॥
सुमंतु वैशंपायन पर्वत । जाबालि पैल ऋष्णशृंगादी प्रतापवंत । लोमश विभांड बल्लव वसत । अन्यही थोर महर्षी ॥१९५॥
आपापलीं तीर्थें स्थापिती । तैशाच गणराजाच्या मूर्ति । स्वनामांकित त्या पुजिती । उत्तराषाढा नक्षत्रीं पूजन त्यांचें ॥१९६॥
तरी सर्व पापें नष्ट होतीं । त्यापुढें । गुह्यक हनुमानाची वसती । पवनात्मजासह यह रक्षोगण भजती । गणनायकासी तेथ ॥१९७॥
ढुंढीच्या मूर्ति स्थापिती । त्याचें ध्यान सदा करिती । उत्तराभाद्रपदा नक्षत्रीं करिती । पूजन त्यांचें शूभप्रद ॥१९८॥
मुक्तिक्षेत्राच्या ईशान्येस असत । प्रणव सर विख्यात । प्रणवाकृति तेथ मूर्ति असत । स्नानें अनाहत ध्वनि लाभ ॥१९९॥
तेथ सरस्वतीसह वसत । ओंकार गणेश पुनीत । चतुर्थी तिथीस त्यास पूजित । सर्वसिद्धिप्रदायकासी ॥२००॥
त्यापुढतीं नग्नभैरवाचे दूत । संरक्षणार्थ । सर्वत्र स्थित । महाबळानें हें युक्त । अन्यही नानाविध महात्मे ॥२०१॥
जे वसती या क्षेत्रांत । त्यांचें वर्णन शब्दातीत । गणना त्यांची असंख्यात । ऐसें हें चरित्र उत्तरांगाचें ॥२०२॥
महादेवांनो सर्वसिद्धिप्रद । सांगितलें तुम्हां सुखद । यात्रादि युक्त शोभाप्रद । पंद देवांनों संक्षेपें ॥२०३॥
हे वर्णन क्षेत्रवासीयांचें ऐकत । अथवा जो हें स्वयं वाचित । मुख्य़ तयांचें पुण्य चरित । त्यास लाभतीं सर्व सुखें ॥२०४॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणें षष्ठे खंडे विकटचरिते क्षेत्रवासिचरितवर्णनं नामैकोनविंशतितमोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP