खंड ६ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । अन्यशक्ति आदिशक्तीस प्रार्थित । मयूरक्षेत्र या जगांत । भूस्वानंदमय नामें ख्यात । कां जाहलें तें सांगावें ॥१॥
हें ऐकण्याचें कुतूहल चितांत । आमुच्या परम असे वाटत । शिवादींनीं पूर्वी या क्षेत्रांत । सिद्धि कैसी प्राप्त केली ॥२॥
जगन्माते सांग सांप्रत । भ्रुशुंडी गुरु कैसा होत । कैसें असे हें क्षेत्र मुख्य पुनीत । कोणी स्थापिला गजानन ॥३॥
कोणाकोणासी सिद्धि लाभून । मनोरथ झाले पूर्ण । आदिशक्ते मयूरमहिमान । सर्वसिद्धिप्रद सांग ॥४॥
क्षेत्रांत करिता जपध्यान । स्वल्पकाळें ईप्सित लाभून । उपासका मिळतें समाधान । ऐसें आम्ही ऐकलें असे ॥५॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसें विचारिती महामायेप्रत । भक्तियुक्त त्या आदरें विनत । तेव्हां ती त्यांसी सांगितसे ॥६॥
तो इतिहास परम अद‍भुत । सांगेत आतां तुम्हांप्रत । भ्रुशुंडी शिवाचा संवाद होत । त्यायोगें सर्वही स्पष्ट होईल ॥७॥
हा सर्वसिद्धिप्रद पावन । ऐकतां करी ब्रह्मपद प्रदान । प्रलयकाळीं स्थावरजंगम नष्ट होऊन । देवही सारे लय पावती ॥८॥
तदनंतर अतिलयवेगें होत । पंचभूतें शक्तिहीन क्षणांत । सर्वत्र शून्यरूप विलसत । जाग्रत्ब्रह्म लयास गेलें ॥९॥
सूक्ष्म स्वप्नमयब्रह्म प्रलयांकित । समभाव तैंसें सुषुप्त । तेही आत्मविलीन होत । ऐसा महाप्रलय जाहला ॥१०॥
त्या वेळीं स्वानंद क्षेत्र स्वसंवेद्यरूपें स्थित । ब्रह्मपद प्रदायक पुनीत । विघ्नेश्वर योगनिद्रापर सुप्त । होता मयूर क्षेत्रांत ॥११॥
त्याचा ओ होता परम आधार । बहुत काळ परी निद्रापर । झोपून उठता निःश्वासपर । त्यातून ॐ कारासह वेद जन्मले ॥१२॥
त्यांनी करितां त्याचें स्तवन । त्याचें भक्तियुक्त बोधन । त्यानें सकल जग निर्मून । कृतयुगाचा प्रारंभ केला ॥१३॥
प्रकृति पुरुषादि नानातत्त्वें निर्मित । त्रिगुणात्मक तत्त्वांत वस्तुजात । स्थूलसूक्ष्मात्मक सृजित । विराटरूप नाना भेदकर ॥१४॥
तदनंतर त्रिविधरूपें होत । नाना भिन्न चराचरात्मक उद्‍धृत । ब्रह्म झालें पंचभूत । तीन अवस्थायुत सारीं ॥१५॥
आदिकाळांत मी आदिशक्ति । विलसत होतें महामति । गणेशापासून निर्मिति । कैसी झाली तें सांगवें ॥१६॥
त्याच्या नाभिकमलांतून । ब्रह्मा झाला उत्पन्न । विष्णु पालक मुखांतून । चतुर्भुज तैं प्रकट झाला ॥१७॥
विघ्नेश्वराच्या डोळयांतून । शिव शंकर झाला उत्पन्न । मी आदि शक्ति वामांगापासून । दक्षिणांगातून भानु आदि पंचदेव ॥१८॥
ते अज्ञानानें होते युक्त । त्यांना आपपर न कळत । म्हणोनि ज्ञानलाभार्थ करित । महाअद्‍भुत तप त्या वेळीं ॥१९॥
दिव्य वर्ष सहस्त्र तप आचरित । तेव्हां गणेश प्रसन्न होत । बीज एकाक्षर रूप दाखवित । ह्रदयांत त्यांच्या त्य वेळीं ॥२०॥
ते महेशान मंत्र लाभत । त्याचा जप करिती तैं सतत । त्यायोगें विघ्नेशास भजत । ऐसीं शंभर वर्षें गेलीं ॥२१॥
तेव्हां प्रसन्न झाला मजानन । प्रथम शंकरह्रदयीं प्रकटून । दाखवी आपुलें रूप महान । नर नागमय चतुर्भुज ॥२२॥
तें सर्व चिन्हेंयुक्त । गजाननाचें रूप पाहत । तेव्हां शंकर झाला विस्मित । विचार करूं लागला ॥२३॥
नरकुंजररूप कोण हा स्थित । दिव्य पाहून ह्रदयांत । त्यास प्रश्न विचारण्या इच्छित । तोंच तो झाला अन्तर्धान ॥२४॥
तदनंतर पुनरपि करित । गणेशाचें ध्यान करित । परि त्या महद्‍रूपास न पाहत । सर्वमंगल ॥२५॥
तेव्हां विव्हलचित्त जात । शिव विष्णू समीप भ्रांत । तोही आपुलें ध्यान संपवित । वृत्तांत सांगे शिव त्यासी ॥२६॥
जनार्दनाच्याही ह्रदयांत । नरकुंजर दिसला अद्‍भुत । तोही तेच अद्‍भुत सांगत । जनार्दन शिवाप्रति ॥२७॥
ऐशा क्रमें ते पाच देव भेटती । परस्परांसी अनुभव सांगती । विस्मित होऊन स्वचित्तीं । म्हणती कोण आला ध्यानांत ॥२८॥
त्यांनी पूर्वीं कधी न पाहिला । ऐसा तो गजानन देव दिसला । त्याचें नांवही कोणाल । माहीत नव्हतें तोपर्यंत ॥२९॥
म्हणून ते पंचदेव स्तविती । जो कोणी आला होता चित्तीं । त्यास नमितों भावभक्ति । सर्वांच्या मूळ रूपाला ॥३०॥
करुणानिधे अज्ञाता प्रसन्न । होई आम्हांवरी करूं ध्यान । तोंच आकाशवाणी सुखप्रद ऐकून । विस्मित झाले पंच देव ॥३१॥
ब्रह्मा विष्णू महेश शक्ति । सूर्य हे पांच देव ऐकती । आकाशवाणी सांगात होती । ऐकाहो पंचदेवांनो ॥३२॥
महादेवही मी गणेश । चित्तवृत्ति प्रचालक ईश । ज्याचें तप आचरिलें विशेष । तोच मी तुमच्या होतों ह्रदयीं ॥३३॥
प्रसन्न होऊन प्रथम दाखविलें । तपश्चर्येंनें तुमच्या चित्तांत भलें । बीजाक्षर मंत्रें तोषविलें । जप उत्तम करून तुम्हीं ॥३४॥
परी तुम्ही योगहीन । म्हणोनि न दिलें साक्षात्‍ दर्शन । अधिकार न अद्यापि महान । तो लाभला तुम्हांसी ॥३५॥
म्हणून मी झालो अन्तर्धान । आता माझें तुम्हां व्हावया दर्शन । माझ्या महाभक्त । भ्रशुंडीस शरण । जावें तुम्ही सर्वांनी ॥३६॥
सरळ स्वभावें जाऊन । त्याचे समीप विनतमन । त्यास करून वंदन । तोषवावें तयासी ॥३७॥
तो ज्ञानदाता होईल । लाभून तें ज्ञान अमल । समर्थ व्हाल तुम्ही विमल । माझ्या साक्षत्‍ दर्शनास्तव ॥३८॥
यांत संदेह लव नसत । त्या ज्ञानें व्हाल विश्चिंत । ऐसें बोलून अंतर्हित । जाहला गणेश स्वभावस्थ ॥३९॥
शिवादिदेव त्यास नमून । गेले त्या मुनिपुंगवासमीप सुमन । भ्रुशुंडीस आश्रमीं भेटून । प्रणाम करते जाहले ॥४०॥
विष्णु देव त्या अमल आश्रमांत । भ्रुशुंडीस पाहत । प्रत्यक्ष होता जो शुंडायुक्त । पूर्ण योगानंदमय ॥४१॥
देवेश कर जोडून तयाप्रत । म्हणती धन्य जन्म धन्य व्रत । धन्य विद्या ज्ञानादि करित । आपुल्या पाददर्शनानें ॥४२॥
तूं आदिमध्यान्तवर्जित । धन्य अससी योग्यांत । तो भ्रुशुंडी हें ऐकत । पूजिता झाला त्या सर्वांसी ॥४३॥
त्या सर्व देवास जाणून । तो करी आतिथ्य महान । परमार्थवेत्ता म्हणे वचन । आपण सारे जगदीश्वर ॥४४॥
जगाचे मूलरूप भगवंत । माझ्या आश्रमीं आलांत । माझा भाग्यागौरव हा वाटत । सांगा मज काय कारण ॥४५॥
काय करूं मी सेवा सांप्रत । आपण परमेश्वर साक्षात । भावज्ञ आदिमध्यांत । विश्वाचे पालक सर्व ॥४६॥
अन्य शक्ति विचारिती । महाप्रलयांत ही स्थिति । भ्रुशुंडीची कैसी होती । लयविवर्जित तें सांगावें ॥४७॥
आदिंशक्ते त्या मुनीचें चरित । प्रथम सांग परम पुनीत । महालक्ष्म्यादींचा प्रश्न ऐकत । जगदंबा तैं प्रसन्न झाली ॥४८॥
ती सांगे शक्तींस तें चरित । पूर्वीच सांगितलें समस्त । तें स्मरता संशयरहित । शक्ति म्हणती तियेसी ॥४९॥
भ्रुशुंडीचें महान चरित । स्मरून संतोष आम्हा लाभत । पंचदेवांचे कथानक पावक । आतुर आम्ही ऐकण्या ॥५०॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसे हें कथानक अद्‍भुत । सीताराम गणेशसुत । प्राकृत अनुवाद करीतसे ॥५१॥
मूळ गीर्वाणभाषेंत । श्रीमुद्‍गलपुराण ग्रंथ विलसत । तो वाचून मराठींत । भक्तांस वाटे समाधान ॥५२॥
ऐसें प्रार्थूंन गणेशाप्रत । हा अध्याय संपवित । देसाई कुलोत्पन्न विनत । सीतारामशर्मा भक्तीनें ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते भ्रशुंडि-पंचदेवसमागमो नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP