खंड ६ - अध्याय ४३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढें सांगत । कश्यपाची भार्या विनता ख्यात । रूपशालिनी अत्यंत । गर्भिणी ती जाहली ॥१॥
तिच्यापासून अंडीं दोन । तेजःपुंज झालीं उत्पन्न । त्यांतला ज्येष्ठ सुत अरुण । गरुड त्याचा अनुज झाला ॥२॥
अरुणानें सुर्याची आराधना । करून पुरविली हितकामना । वर लाभून इच्छित मना । संतोष त्याचा जाहला ॥३॥
तो सूर्याचा सारथी असत । अनन्यभावें सेवी सतत । भक्तिभावूर्ण चित्त । सूर्य आत्मा अच्युत ॥४॥
तो सूर्य गणेशास भजत । आनंदानें अविरत । एकदा त्यास प्रणाम करित । अरुण सारथी तयाचा ॥५॥
नंतर खेदयुक्त वचन । म्हणे स्वामी आपण महान । सर्व भावांचा आत्मा शोभन । अमृतमय अपूर्व ॥६॥
आपण एकमेव अद्वितीय । गजाननास भजतां सदय । कोण हा गणेश्वर सावयव । कश्यपाचा पुत्र तो ॥७॥
तो मिथ्यात्मा नसे पूर्ण । देवेशा तुज झाला मोह दारूण । स्वरूपाच्छादन करून । कां भजसी अन्यासी ॥८॥
योगिजन देवादिक जाणून । तुझें रहस्य परम पावन । शांति लाभली महान । तुझ्याहून श्रेष्ठ कोण असे ? ॥९॥
तरी काम परास भजतां । आपलें माहात्म्य कमी लेखितां । तेव्हां सूर्य बोले विनतासुता । सत्य असे तुझें वचन ॥१०॥
तूं मज विशेषें जाणसी । मायायोगज्ञान तुजसी । परी पूर्ण भाव न जाणसी । अज्ञान तुझें हें असे ॥११॥
काय सांगूं तुज प्रत । मीं गणेशापासून संजात । शंकरादी देव समस्त । त्याच्यापासून जन्मले ॥१२॥
हा त्यायोगें ज्येष्ठराज असत । त्याहून ज्येष्ठ कोणी नसत । असत्नानाविध शक्ति ज्ञात । तेथ मीं जाण आत्मा असे ॥१३॥
त्यांच्या समान भावें कीर्तित । आनंदरूप विष्णू जगांत । आनंदाहून पर व्यक्त । शंकर सूर्य संज्ञा ज्यासी ॥१४॥
त्यांच्या योगें गणेश वर्तत । आनंदाख्य जगांत । सर्वसंयोगें कर्तृत्वें ज्ञात । मायायुक्त गणेश्वर हा ॥१५॥
अरूणा तो लाभतो निश्चित । स्वसंवेद्य योगें ह्रदयांत । त्याहून परम अयोग ख्यात । स्वसंवेद्यवर्जित ॥१६॥
त्या योग-अयोगांचा संयोग । तोच हा गणेश्वर सुभग । विचक्षणा वेद सांग । हेंच रहस्य सांगती ॥१७॥
ब्रह्मणस्पति जगीं ज्ञात । तो एक श्रेष्ठ जगांत । आम्ही ब्रह्ममय समस्त । आमचा स्वामी गणराज ॥१८॥
आम्ही सदैव त्याचें भजन । करितों ऐसें सूर्यवचन । ऐकून अरुण करी वंदन । भक्तिभावें विचारी ॥१९॥
तेजस्वीमया पतीस । तो विचारी सूर्यास । म्हणे मज अरुणास । उपाय सांगा गणेशप्राप्तीचा ॥२०॥
ज्या सुखद उपायानें मीं होईन । गाणपत्य देवनायक महान । सूर्य म्हणे तें ऐकून । एकाक्षर विधानें भज तयासी ॥२१॥
त्या उपायें ह्रदयांत । पाहून चिंतामणीस पूजीत । योगिवंद्य होशील जगांत । ऐसें सांगून मंत्र दिला ॥२२॥
विधियुक्त मंत्र स्वीकारून । अरुणें केलें अभिवादन । नंतर उत्तम यनांत जाऊन । उग्र तप त्यानें आचरिलें ॥२३॥
गणेश ध्यानांत तत्पर । योगमार्गे तप उग्र । करून विघ्नेशा तोषवी भक्तिपर । योगसेवापरायण ॥२४॥
त्यायोगें तो योगींद्र वंद्य । चित्त पंचविध ह्रद्य । रसयुक्त त्यागून आद्य । निमग्न गणेशजपांत झाला ॥२५॥
ऐसीं शंभर वर्षें जात । द्विरादानन तेव्हां प्रकटत । भक्तिभावें त्याच्या संतुष्ट । वर देण्यास तैं आला ॥२६॥
तेव्हां तो अरूण न ओळखत । त्या गणेशासी तैसाचि ध्यानरत । ह्रदयांत मग्न असत । आश्चर्य एक घडलें तैं ॥२७॥
संज्ञायुक्त गणेशास पाहत । रथांत जो उपविष्ट । सिद्धिबुद्धींच्या समवेत । आश्चर्यचकित जाहला ॥२८॥
ह्रदयातलें ध्यान सोडून । नेत्र पाहे उघडून । बाहेरही वरद गजानन । पाहता झाला अरूण तेव्हां ॥२९॥
अति हर्षभरें वरती उठून । तयास करितसे वंदन । विधियुक्त पूजन करून । नम्रभावें स्तुती करी ॥३०॥
तो स्तवनास प्रारंभ करित । तत्क्षणीं सूर्यास संज्ञेसहित । पाहूनियां रथारूढ विस्मित । जाहला अत्यंत स्वमानसीं ॥३१॥
गणेशकृपेनें त्यास ज्ञात । सुबुद्धियोगें क्षणांत । गणेश हाच रवि असत । विकटत्वें यांत संशय नसे ॥३२॥
माया नानाभेदयुक्त । आत्मा परी भेदवर्णित । म्हणून विकटसंज्ञ प्रख्यात । आत्माकार हा गजानन ॥३३॥
विकटरूपी सुर्यास भजेन । निरंतर कलांशयुक्त पावन । सूर्यात्मक रूप दाखवून । स्वकीय भेद तो दाखवीतसे ॥३४॥
हें जाणून भक्तियुक्त । आनंदाश्रु तो ढाळित । नियमन करूनिया चित्त । आनंदें स्तोत्र गातसे ॥३५॥
अरुण तेव्हां स्तवन करित । गणनाथा नमन तुजप्रत । तेजपते अनामया तुज वंदित । देवेशा आत्म्या वंदन तुला ॥३६॥
ब्रह्मपतीसी जीवपतीसी । आखुवाहनासी सप्ताश्वासी । स्वानंदवासीसी चतुर्भुजधरासी । सौरलोकनिवासकरा तुज नमन ॥३७॥
सहस्त्रकिरणासी सिद्धिबुद्धिपतीसी । संज्ञानाथासी विघ्नहर्त्यासी । अन्धकारविनाशकासी । हेरंबा तुज नमन असो ॥३८॥
अनंतविश्वासी नामरूपधरासी । मायाचालकासी सर्वेशासी । सर्वपूज्यासी ग्रहराजासी । ग्रहासी तेजदात्या नमन ॥३९॥
यशस्वी गणेशासी परेशासी । विघ्नेशासी विवस्वत भानूसी । ज्योतींच्या पतीसी लंबोदराशी । एकदंता नमन तुजला ॥४०॥
महोत्कटासी गजाननासी । प्रणाम पुनःपुनः तुजसी । जो सूर्य तो विकट तूंच अससी । भेद न दिसे कदापि ॥४१॥
तुझी भक्ति देई मजप्रती । गजास्य तूं गणपती । किती करूं मीं स्तुती । गणाधीशा योगाकारस्वरूपा ॥४२॥
आपणास चतुर्धा विभागून । खेळ करिसी तूं सदा प्रसन्न । ऐसी आपुली स्तुति ऐकून । विकट दाखवी स्वरूपा ॥४३॥
वामांगी संज्ञा युक्त । गजवक्त्रादि चिन्हसहित । त्यास पाहून प्रणाम करित । पांगळा अरूण तो हर्षभरें ॥४४॥
त्यास गणाधीस सांगत । माग वर जो ह्रदयेप्सित । तूं रचिलेलें हें स्तोत्र जगांत । सर्वसिद्धिप्रद होईल ॥४५॥
यांत संदेह कांहीं नसत । चिंतित सारें होय प्राप्त । जो कोणी जप करित । अथवा ऐकत हें स्तोत्र ॥४६॥
महापक्ष्या माझा संतोष झाला । या स्तोत्रानें अन्तःकरणाला । हें स्तोत्र वाचील त्याला । दुर्लभ कांहीं न होईल ॥४७॥
गणेशाचें ऐकून वरदान । पांगळा अरुण करी वंदन । आनंदाश्रुपूर्ण नयन । रोमांचित झाली सारी काया ॥४८॥
अरूण म्हणे गजाननासी । गणाधीशा देई तव भक्तीसी । तुझ्या पदकमळाच्या आश्रयासी । मीं व्हावें गाणपत्यप्रिय ॥४९॥
मज सदा महात्म्यांची संगति । लाभावी हा वर द्या मजप्रती । हें सारें होईल निश्चिती । ऐसा वर विकटें दिधला ॥५०॥
तदनंतर पावला अन्तर्धान । जेव्हां तो विकट गजानन । अरूण जाहला खेदच्छिन्न । तेथेंच राहिला आठवीत ॥५१॥
स्थापून गणपतीची मूर्ती । द्विजहस्तें उत्सव करी प्रीती । भानुविनायक नामें ख्याति । करी तया विकटेशाची ॥५२॥
गणेशासी त्या पूजून । परतला सूर्याकडे अरुण । समग्र वृत्तान्त करी कथन । प्रणास करून तयासी ॥५३॥
त्यानें जो तेथ स्थापिला । तो अरुण गणपति प्रसिद्ध झाला । रथसंस्थ भजे नित्य त्याला । योगशांतिप्रद जो सदा ॥५४॥
ऐसें हें विकटाचें माहात्म्य कथिलें । भानुविघ्नेश अवतरले । त्या गणेशाचें चरित भलें । सर्वसिद्धिप्रदायक ॥५५॥
जो हें ऐकेल वा वाचील । श्रद्धायुक्त नर अमल । त्यास इच्छित फळ लाभेल । अंतीं स्वानंद प्राप्त होई ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते भानुविनायकचरितं नाम त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP