खंड ६ - अध्याय २८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश विचारिती भ्रुशुंडीप्रत । हया तीर्थोंत्तमांत । जे सिद्धि लाभले जगांत । त्यांचें सांगा सुखद चरित । आम्हांसी येथ संक्षेपें ॥१॥
भ्रुशुंडी तेव्हां देवांस देवांस म्हणत । मयूरेशक्षेत्रीं जा तुम्हीं समस्त । माझ्या आज्ञेनुसार त्वरित । तेथ सिद्ध व्हाल सारे ॥२॥
सर्व ज्ञान लाभून । सिद्धि सर्वही मिळून । स्कंदपुराणांत विस्तारें शोभन । माहात्म्य कथिलें असे सारें ॥३॥
मीं संक्षेपानें कथिलें । क्षेत्रमाहात्म्य अवर्णनीय भलें । देवेशांनी पुनरपि प्रार्थिलें । नित्य यात्रा सांगा आम्हांसी ॥४॥
क्षेत्र प्रदक्षिणेची माहिती । अन्य नरांची यात्रा कीर्ती । सर्व सिद्धिप्रद जी जगतीं । ती सांगा कृपा करोनी ॥५॥
कोणी जन स्वभावें पापयुक्त । मयूरक्षेत्रीं निवास करित । नग्नभैरव त्यांस घालवित । नगराच्या बाहेरी ॥६॥
परी संस्कारें समायुक्त । गाणपत्य तो कैसा होत । पुनरपि संमान लाभत । या क्षेत्रांत तो कैसा ? ॥७॥
भ्रुशुंडी पूर्ववृत्तात्न तै सांगत । बंगाल प्रांतीं विप्र वसत । गणपतिपरायण अत्यंत । विश्वामित्र कुळांतला ॥८॥
त्याचें नांव शंभु असत । महायश तो पुण्यवंत । त्याच्या प्रवेशून ह्रदयांत । नग्नभैरव बुद्धिभेद करी ॥९॥
त्यायोगें तो द्विज व्यथित । म्हणे क्षणभंगुर हा देह वर्तत । केव्हां पाहीन मयूरेशा पुनीत । देहधारक मीं अहो ॥१०॥
नंतर पत्नीपुत्रासह निघत । घर सोडून यात्रारत । भिक्षा मागून उदर भरित । द्रव्यहीण तो शंभुविप्र ॥११॥
दोन महिनें मार्ग चालून । पोहोचला जेव्हां तो बाह्मण । गणेशतीर्थाच्या तीरीं तैं महान । आनंद झाला ह्रदयांत ॥१२॥
मयूरेशास प्रथम पूजित । तदनंतर यात्रा करी विधानयुक्त । क्षेत्रसंन्यासभावें भजत । द्विरदानना गणेशासी ॥१३॥
अंतीं स्वानंदलोकीं जात । गणनायका नित्य भजत । हृदयांत त्याच्या विराजत । प्रभु गणेश सर्वदा ॥१४॥
आतां जे अन्य पापपर । क्षेत्रत्याग करिती ऐसे नर । त्यांचें विचित्र चरित्र । ऐका आतां देवेश हो ॥१५॥
वसिष्ठ कुळींचा एक ब्राह्मा वसत । त्या पवित्र मयूरक्षेत्रांत । परी जन्मापासून तो असत । महापापी चौर्यरत ॥१६॥
तो न करी कधी वेदाध्ययन । मदोन्मत्त यौवनीं होऊन । मद्यमांसादींचें सेवन । परस्त्रीसंगही प्रिय त्यासी ॥१७॥
त्याचा बुद्धिभेद करित । नग्नभैरव तैत ओ ब्राह्मण दुर्वृत्त । परस्त्रीस एका पकडून करीत । विदर्भ प्रांतांत प्रयाण ॥१८॥
ऐश्यापरी आधिपत्य करित । नग्नभैरव मयूरक्षेत्रांत । दंडधारक जो सर्व श्रेष्ठ । सत्ता चाले तयाची ॥१९॥
दुसरें एक आख्यान । पापी नराचें करितों कथन । मयूरक्षेत्रीं जाण्या इच्छून । जे न तेथें पोहोचले ॥२०॥
द्राविडांत वैश्य जन वसत महापापी जे विख्यात । विषादि देऊन ठार मारित । द्रव्यलोभें अन्य जनांसी ॥२१॥
शंभु सोमक कुब्ज कंबळ । ऐसे चार मित्र प्रबळ । मद्यमांस रत । अमंगळ । परस्त्री लालस सर्वही ते ॥२२॥
शिश्नोदर परायण । पुण्य लेशही न मिळवून । स्वधर्मनियम सोडून । स्वच्छंदानें रहात होते ॥२३॥
त्याच नगरांत होत वसत । श्यामल नाम वैश्य धनवंत । तो महापापी दैवयोगें मरत । शंकर नामिक मेव्हणा त्याच्या ॥२४॥
तो शंकर स्वधर्म निरत । पुण्यकर्मपरायण वर्तत । अस्थिसंचय श्यामलाचा करित । उद्धार त्याचा व्हावया ॥२५॥
एक मास होता तो वैश्य जात । एकदा जैं तेव्हां भेटत । ते चार वैश्य धूर्त पापरत म्हणे विनयानें ॥२६॥
ह्या श्यामल वैश्याच्या अस्थि असत । तुमच्या स्वाधीन मी करित । त्या न्यावा मयूरक्षेत्रांत । दंडकारण्यीं जाणार तेव्हां ॥२७॥
व्यापार करण्या तेथ निघालात । तरी माझें करा हें प्रार्थित । श्यामलाच्या अस्थि गणेशतीर्थात । करा विसर्जित ब्रह्ममुखाप्रदीं ॥२८॥
तैसेंचि करूं ऐसें सांगून । देऊन तयासी आश्वासन । चार वैश्य ते करिती गमन । मयूरक्षेत्रीं जाण्यासी ॥२९॥
तेथ नग्नभैरव विघ्न आणित । त्यांचें सर्वस्व चोर हरित । अस्थिसंचयही नष्ट होत । दुःखें परतले स्वगृहासी ॥३०॥
किंचिद्‍द्रव्य शेष राहत । तें घेऊन ते परतत । मयूरेश यात्रा न करित । ठरवलेली पापी ते ॥३१॥
बुद्धिभेद होऊन त्यांचा न जात । श्यामलाच्या अस्थि मयूरक्षेत्रांत । ऐसा भैरव महाबळवंत । गणेशाज्ञेचें पालन करी ॥३२॥
तो रक्षितो क्षेत्र उत्तम । भैरवाचें हें चरित्र मनोरम । जो ऐकेल भावयुक्त परम । त्यास सर्वं शुभ मयूरक्षेत्रीं ॥३३॥
देवेश पुनरपि प्रार्थित । त्या भ्रुशुंडी योग्याप्रत । ऐसा जो महाभागा नग्नभैरव विख्यात । स्तोत्र त्याचें वर्णावें ॥३४॥
त्या स्तोत्रें करितां स्तवन । तो न होईल ऋद्ध दारुण । बुद्धिभेद आमुचा न करून । क्षेत्रप्रदेश देईल आम्हां ॥३५॥
भ्रुशुंडी म्हणे ऐका एकचित्त । फलदायक हें अद्‍भूत । जै नग्नभैरव संतुष्ट होत ॥ पाठ याचा भावें करितां ॥३६॥
सर्वंमायाविहीनासी । सर्व मायाप्रचालकासी । सर्वांतर्यामीसी नित्यासी । नग्नभैरवा तुला नमन ॥३७॥
मयूरेशपरासी मयूरपुरपालाकासी । धार्मिकांच्या संरक्षकासी । अधर्मनिरतां दंडकर्त्यासी । नग्नभैरवा नमन तुला ॥३८॥
सदा स्वानंदानिष्ठासी । पापीजनां दंडकर्त्यांसी महाभळवंतासी । ब्रह्मादि प्रचालकासी । ऐशा नग्नभैरवा नमन तुला ॥३९॥
अमेयशक्तिसी भुक्तिमुक्ति प्रदात्यासी । गणेशांचें पालनकर्त्यासी । प्रलयकाळांत शूळ उगारिसी । ऐशा नग्नभैरवा तुला नमन ॥४०॥
त्य प्रलयकाळांत ब्रह्मांड । भिवविसी तूं उदंड । शूळप्रोत महांड । नग्नभैरवा नमन तुला ॥४१॥
अट्टाहसें देवेंद्रांसी । तैसेंचि संत्रस्त करिसी असुरांसी । गणनाथापुढें नृत्य करिसी । नग्नभैरवा नमन तुला ॥४२॥
तूं हें सर्व विश्व पसरविसी । आदिअंत मध्यगत । तूंच अससी । मयूरसंस्थ आम्हां सर्वांसी । रक्षण करी दयाळा ॥४३॥
आम्ही अनन्यभावें भजत । शूळधारका तुज नमित । अखिल कारण तूं शाश्वत । जगत्प्रवृत्ती तव भयानें ॥४४॥
प्रत्येक प्राणिमात्रास करित । स्वव्यापारमग्न तूं जगांत । तुझ्या आधारें जग नांदत । परेशा रक्षी आम्हांसी ॥४५॥
तुझी भक्ति आमुच्या मनांत । दृढ करी तूंच सतत । गणेशक्षेत्र तुझ्या स्वाधीन असत । निवास आम्हां तेथ देई ॥४६॥
नग्नभैरवा तुज नमन । पुनः पुन्हा अभिवादन । नग्नभैरवाचें हें स्तोत्र महान । वाचितांत ऐकतां शुभप्रद ॥४७॥
धनधान्यादिक सर्व लाभत । भुक्तमुक्तिसमन्वित । या स्तोत्रानें जो स्तवित । नग्नभैरव देवांसी ॥४८॥
या स्तोत्राच्या वाचनें न घडत । मयूरक्षेत्राचा विरह जन्मांत । जयांसी दुर्लभ कांहीं न होत । जैसी श्रद्धा तैसें फळ ॥४९॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते नग्नभैरवप्रशंसा नामाष्टाविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP