खंड ६ - अध्याय ८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी सांगे देवांसी । चतुर्द्वारमय वर्णिलें तुम्हांसी । आता द्वारविस्तारासी । संक्षेपानें सांगेन ॥१॥
पूर्वेंकडील दारांत स्थित । लक्ष्मीनारायण उभय त्या क्षेत्रांत । ती विविध तीर्थक्षेत्रें विर्मित । स्वस्थानार्थ आदरानें ॥२॥
ब्रह्मांडांत वैष्णव क्षेत्रें निर्मिती । गणेशकृपेनें तीं जगतीं । लक्ष्मीचींही क्षेत्रें शास्त्रसंमती । स्वनिवासयोग रचिलीं विविध ॥३॥
दक्षिणद्वारीं शक्तिशिव असत । ते उभय गणेशकृपायुक्त । क्षेत्रें विविध रचित । नाना स्थळीं स्वयोग्य ॥४॥
ब्रह्मांडांत शिवनिर्मित । शैव क्षेत्रें पुनीत । शक्ति जी क्षेंत्रें वसवित । त्यास शाक्त क्षेत्रें म्हणती ॥५॥
रति आणि कामें निर्मिली । पश्चिद्वारीं क्षेत्रें भलीं । विघ्नराजाच्या प्रभावें झालीं । मायेनें तीं ख्यात तेथ ॥६॥
मातृकांची क्षेत्रें रतिनिर्मित । दिक्पालक्षेत्रें मदनसृष्ट । उत्तरद्वारी संस्थित । महीवाराह दोघेही ॥७॥
ते आपापली क्षेत्रें वसवित । गणेशमायेनें या जगांत । जीं जीं सौरसंज्ञ क्षेत्रें भूतलीं असत । तीं तीं रचिलीं वरदानें ॥८॥
देव ते परिवारासहित । महातप आचरित । क्षेत्रज्ञ ते क्षेत्रसंयुक्त । गणेशाच्या महिम्यानें ॥९॥
नाना मंत्रांचा जप करून । गजानना देवा ध्याऊन । त्यास अत्यंत तोषवून । विशेषें नित्य भक्तीनें ॥१०॥
क्षेत्रें तैशा देवता पूजित । क्षेत्रस्थ गणनायका एकचित्त । ऐसीं वर्षशतें पूर्ण होत । प्रसन्न झाला तैं गजानन ॥११॥
त्या क्षेत्रांस वर देण्या येत । त्यास पाहून तीं वंदित । भक्तिभावें मान वाकवीत । स्तविती स्तुतिस्तोत्रांनीं ॥१२॥
क्षेत्रांसहित देव स्तवित । ब्रह्मासी विघ्नराजासी आम्ही वंदित । स्वानंदस्थ गणेशासी नमित । आदिमध्यांतहीनासी ॥१३॥
भुक्तिमुक्तिप्रदात्यासी । नानाविध खेळकरासी । ज्येष्ठराजासी सृष्टिकर्त्यासी । संहर्त्यासी नमन असो ॥१४॥
सुपात्रासी मोहप्रचारकासी । गुणेशासी गुणचालकासी । परेशासी मोहदासी । गजाननासी नमन असो ॥१५॥
सर्वयोगमयासी । योगेशासी । सिद्धबुद्धिपतीसी चिंतामणीसी । सिद्धिबुद्धिमयासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी नमन असो ॥१६॥
पूर्वागीं विष्णुरूपासी । दक्षिणांगीं शिवात्म्यासी । पश्चिमांगीं मायारूपासी । उत्तरांगीं रविरूपा नमन ॥१७॥
चतुर्विध भूतमात्र निर्मून । नित्य खेळे जो गजानन । नाना विश्वरूपें घेटा प्रसन्न । त्यास स्तवण्या कोण समर्थ असे ॥१८॥
धन्य आम्हीं धन्य जगांत । ब्रह्मणस्पति आला दृष्टिपथांत । ब्रह्मांचा चालक जो असत । गजानन परमेश्वर ॥१९॥
सांग वेदही स्तुति करण्या न शकती । तेथ आमची काय मति । म्हणोनि प्रणाम करितो ही स्तुति । गोड मानून घ्यावी देवा ॥२०॥
ऐसी स्तुति करून नमित । गणेशासी देव समन्वित । सर्व क्षेत्रासहित प्रणत । भक्तिभाव समन्वित ॥२१॥
तेव्हां त्यास गणनायक म्हणत । आपुल्या भक्तांसी तपतोषित । भक्तिप्रिय तो वर देण्या इच्छित । काय देऊं सांगा तुम्हांस ॥२२॥
जें जें असेल तुमचें ईप्सित । तें तें देईन तुम्हांप्रत । तुमच्या स्तोत्रें तुष्टचित्त । ऐसें प्रिय हें स्तोत्र असे ॥२३॥
हें तुम्हीं रचिलेलें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । तो माझा प्रिय होईल । इच्छित सारे त्यास मिळेल ॥२४॥
भुक्तिमुक्तितप्रद सुखद । धनधान्यविवर्धक पुत्रपौत्रद । सिद्धिलाभें संतोषद । ऐसें महत्त्व या स्तोत्राचें ॥२५॥
माझ्या सन्निध राहून । जो हें स्तोत्र वाचील प्रसन्न । सर्वक्षेत्रभव पुण्य लाभून । अन्तीं स्वानंद लाभेल ॥२६॥
गणेशाचें ऐकून वचन । देव हर्षोत्फुल्लमन । त्यास प्रणाम करून । क्षेत्रांसहित त्यास म्हणती ॥२७॥
जरी आम्हांवरी तूं प्रसन्न । वर देण्या उत्सुक गजानन । तरी तुझ्या पादपद्मीं मन । भक्तिसंयुक्त जडो नित्य ॥२८॥
आम्हांसी कां सृजिलें असत । आमुचें कार्य सांग आम्हांप्रत । आम्ही सर्व तुझ्या आज्ञेंत । सर्वकाळ राहतों ॥२९॥
स्वानंदी निवासार्थ द्यावें । महादेवा आम्हां स्थान बरवें । तेथ तुज पूजूं नित्यभावें । भक्तिभावें समन्वित ॥३०॥
आपुल्या ज्ञानें युत । करी आम्हां सर्वांसी त्वरित । तुझ्या वश आम्हीं समस्त । ज्ञानयुक्त तुझें भजन करूं ॥३१॥
भ्रुशुंडी कथा पुढें सांगत । त्यांचें ऐकून वचन म्हणत । करूणानिधि गणेश स्नेहयुक्त । महेश्वरा त्या महाभागांसी ॥३२॥
माझ्या वरदानें क्षेत्रांनों जगांत । उपासका द्यावें स्वकार्यरताप्रत । धर्मार्थकाममोक्षयुक्त । सामर्थ्य माझ्या भक्तांसी ॥३३॥
कांहीं धर्मदायक कांहीं अर्थदायक । कामद कांहीं मोक्षदायक । कांहीं त्या क्षेत्रीं मरतां फलदायक । कांहीं कर्मयोगे मोक्षप्रद ॥३४॥
तैसेच तेथील देव फलप्रद । पूजनें दर्शनें सुखप्रद । स्वस्वक्षेत्र प्रियात्मक शांतिद । ऐसें माझें वरदान ॥३५॥
त्या क्षेत्रांस विविध नांवें देत । काशी प्रयागादि पुनीत । त्यांचें मग वर्णन असत । अशक्य सदा सर्वांसी ॥३६॥
पुनरपि तो त्यास म्हणत । करुणानिधि कृपायुक्त । आपापल्या क्षेत्रांत । राहावें कलांशें आनंदानें ॥३७॥
या माझ्या स्वानंद क्षेत्रांत । पूर्णज्ञानें वास करा समस्त । क्षेत्रांनो मज भजा भक्तियुक्त । निरंतर एकनिष्ठनें ॥३८॥
आपापल्या कार्यांत । दक्ष रहाल संशयातीत । गर्वहीन माझ्या भक्तिभावयुक्त । सर्व क्षेत्रांनो भूतलावरी ॥३९॥
मानव जे तीर्थयात्रा करिती । देवांस यथाविधि पूजिती । त्या पुण्यप्रभावें राहती । अन्तीं स्वानंदक्षेत्री माझिया ॥४०॥
माझ्या या आनंदक्षेत्रांत । निवास करूनी मरण पावत । तो होईल बह्मभूत । ऐसें माझें वरदान ॥४१॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । क्षेत्रें हर्षयुक्त होऊन । तेथेंचि राहिलीं आनंदें ॥४२॥
गणेंशासी पूजित । आपापल्या स्थानास जात । क्षेत्रें सर्व देवांसहित । ज्ञानयुक्त जाहलीं ॥४३॥
जैसें गजाननें कथिलें । तैसें सर्वांनी केलें । तदनंतर गणेशाप्रत केलें । हर्षयुक्त मानवानें ॥४४॥
तेथ क्षेत्रांसहित देव समस्त । स्वानंद क्षेत्रीं त्या पुनीत । विघ्नेश्वरास सतत भजत । आदरानें भक्तिभावें ॥४५॥
हें क्षेत्रांचें देवांचे चरित । जो ऐकेल अथवा वाचीत । त्यास विघ्नेश्वर देत । क्षेत्रवास निःसंशय ॥४६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते नाना क्षेत्रदेवोत्पत्तिवर्णनं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP